Friday, September 14, 2007

आंबोळी



वाढणी:ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

तांदुळ ३ वाट्या
हरबरा डाळ पाउण वाटी, उडीद डाळ पाऊण वाटी
गहू अदपाव वाटी, मेथी अर्धी वाटी
जिरे २ चमचे
धने १ चमचा
आंबट ताक, लाल तिखट, मीठ, लसूण
हळद, हिंग, तेल

क्रमवार मार्गदर्शन:

तांदुळ, हरबरा डाळ, उडीद डाळ, गहू, मेथी,जिरे व धने हे सर्व एकत्र करून गिरणीतून दळून आणणे. ज्या प्रमाणात आंबोळी घालायची असेल तेवढे पीठ घेऊन त्यात आंबट ताक घाला. ३ वाट्या पीठ असेल तर अर्धी वाटी आंबट ताक घालून जरूरीपुरते पाणी घालून थोडेसे पातळ भिजवा. ४-५ तासानंतर या पीठात अजून थोडे पाणी घालून पीठ एकसारखे करून घ्या. नंतर त्यात आवडीप्रमाणे लसूण अर्धवट ठेचून (पेस्ट नको) घाला. चवीपुरते लाल तिखट, मीठ, किंचित हळद व हिंग घालून परत एकदा डावेने पीठ एकसारखे करा. तापलेल्या तव्यावर तेल पसरून त्यावर पीठ पसरून त्यावर झाकण ठेवा. काही वेळाने ही आंबोळी उलटा. परत थोडे तेल त्यावर सर्वबाजूने घाला. झाली आंबोळी तयार. (धिरडे/घावन/डोसे घालतो तसेच घालायचे आहे)

खायला देताना सोबत लसणाची झणझणीत चटणी किंवा कैरीचे लोणचे द्या. ताटलीमध्ये खायला देताना आंबोळीवर साजूक तूप घालावे.

माहितीचा स्रोत:सौ आई

अधिक टीपा:आंबोळी बाळंतिणीला खायला देतात. जास्त करून पावसाळ्याच्या दिवसात खातात. पौष्टीक आहे. मेथीची कडवट चव चांगली लागते.

3 comments:

rohini gore said...

Thanks Kiran

Subodh Deshpande said...

मेथी अर्धी वाटी, नक्की !

rohini gore said...

hoho ardhi vati nakki, karan bakiche sarv saamaan 4 te 5 vatya aahet,, aani hi amboli khatana thodi kadvatach lagte, pan tyachi chav chhan lagte,, aani potatla methi kenvhahi changli,, pavsalyat amboli khane uttam ! thanks for comment ! :)