Tuesday, December 06, 2011

पुरणपोळी

आमच्यात पुरणावरणाचा घाट असतो बरं का! कोणताही सण आला की बाकीचे कोणतेही पक्वान्न असले तरी पुरण हे लागतेच! इति देब्रा! कोब्रा या पुरणावरणाच्या फंदात कधी पडत नाहीत. घाट घालण्याच्या क्रियेत ते जरा लांबच राहतात!





मला पण आठवायला लागेल की मी पुरण किती वेळा आणि केव्हा घातले होते बरे! आठवून काही फायदा नाही. कारण की लांबलचक रेसिपींपासून मी जरा दूरच असते. भारतात असताना जास्तीचे कोणी पाहुणे आले किंवा सणासुदीला तयार श्रीखंडच आणायचे, अमूल व वारणा! या अमुलवारणाचे डबे तर मला खूपच आवडायचे.





अमेरिकेत आल्यावर मात्र बरेच आवडणारे तिखटगोड पदार्थ घरात करण्यावाचून गत्यंतर उरले नाही. एकदा माझ्या पंजाबी मैत्रिणीने फोन करून मला सांगितले की मला पुरणपोळी शिकायची आहे आपण करायची का एकदा? मी तुझ्या मदतीला येईन. मी म्हणाले चालेल की! करू या, येत्या होळीच्या मुहूर्तावरच करू. मलाही खूप आवडते! विचार केला या दोघा पंजाबी नवराबायकोबरोबर अजूनही ओळखीच्या चार पाच मित्रमैत्रिणींना बोलावू. मस्तपैकी पुरणावरणाचा घाटच घालू की जो जन्मात कधी घातला नाही!






पंजाबी दोघे जण, दक्षिण भारतीय दोघे जण, आम्ही दोघे व एक मराठमोळा मित्र म्हणजे ७ ते ८ जणांचा पुरणपोळीचा बेत ठरवला. त्यावेळी माझ्याकडे पुरणयंत्र नव्हते, अजूनही नाही. खरे तर पुरण हे पुरणयंत्रातूनच जास्त चांगले वाटले जाते. पुरणयंत्र नसताना पुरणपोळीचा घाट घातला होता.






पुरण जास्तीत जास्त बारीक कसे करायचे यावर एक युक्ती काढली. त्यावेळेला माझ्याकडे भारतातून आणलेला मोठा कुकर होता. त्यात ६ वाट्यांची हरबरा डाळ शिजवली. इलेक्ट्रिक शेगडीवर कुकराला वाफ धरायला अर्धा तास तरी जातोच. कुकराला शिट्या भरपूर केल्या, इतक्या की आतल्या डाळीचा भुगा पडून ती उलट शिट्टीतून बाहेर यायला लागली! नंतर डाळ साखरगुळ घालून शिजवायला कढईत ठेवली. शिजवताना एकीकडे कालथ्याने डाळीवर वार करत राहिले जेणेकरून सर्व डाळ खूप बारीक झाली पाहिजे. मिश्रण छान मिळून आले होते. मिश्रण गार झाले. कणकेलाही चांगलेच तिंबून घेतले होते. आता एवढी सगळी जय्यत तयारी झाल्यावर पोळ्या कशा काय बिघडतील!?






कणकेच्या छोट्या गोळ्याला हातानेच पुरीसारखा आकार दिला. त्यात पुरणाचा साधारण मुठीइतका गोळा भरून पोळी लाटायला सुरवात केली. पोळी लाटली जात होती पण लाटताना भरड लाटली जात आहे हे जाणवत होते. पोळीमधून अगदी छोटे छोटे न शिजलेले डाळीचे बारीक कण पोळीच्या वरती आले होते. पोळी ठिगळ लावलेल्या कापडाप्रमाणे दिसत होती. पूरण शिजले होते पण त्यात खूप छोटे डाळीचे बारीक कण न शिजताच तसेच राहून गेले होते. सर्व पोळ्या करून मग एकत्रच सर्व जेवायला बसणार होतो. कुणीतरी म्हणाल्याचे आठवले की पुरणयंत्र नसेल तर मिक्सर मधून बारीक करता येते. इथले ब्लेंडर म्हणजे काय दिव्यच असतात. पुरण घातले ब्लेंडरमध्ये तर पुरणाचा सगळ्यात खालचा थर फिरत होता. वरचा थर' जैसे थे' स्थितीत होता. म्हणतात ना की काम बिघडले तर कामात काम अजूनच वाढत जाते. मिक्सरमध्ये पुरण बारीक झाले नाहीच, शिवाय मिक्सर धुण्याचे एक काम वाढले.






मैत्रिणीला सांगितले की या पुरणामधले सर्व न शिजलेले डाळीचे बारीक कण वेगळे करायला घे. मला जाम वैतागायला झाले होते. मैत्रीण म्हणाली 'आप क्युं चिंता कर रही है, मै ये काम कर देती हुँ अलग करनेका' काम खूपच किचकट होऊन बसले होते. ती मैत्रीण आरामात एका परातीत पुरण घेऊन न शिजलेले कण बाजूला करत होती. एकीकडे दूरदर्शन बघत होती. मी मनात 'अगं बाई ही वेळ आरामात दूरदर्शन बघून तांदूळ निवडण्याची नाहीये. युद्धपातळीवर कामे व्हायला हवीत.' मग मी पण अर्धे मिश्रण एका परातीत घेतले आणि दोघींनी मिळून डाळीचे बारीक कण अलग करण्याचे काम करत राहिलो. तसे काम पटकन झाले आणि एकीकडे हासत राहिलो:D एकमेकींना छोटे कण दाखवत राहिलो, 'ये देख,,, कितने है,,, छोटे कण,,:) ' या डाळीच्या कणांचे अलग करण्याच्या कामात मी जास्त वेळ रेंगाळत राहिले नाही. एकेक करत मी पुरणपोळ्या लाटायला सुरवात केली. आता पुरणपोळ्या मऊसूत छान होत होत्या. दोघे दोघे करत जेवायला बसले. गरम गरम पोळ्यांवर भरपूर साजूक तूप! पोळ्या पटापट संपत होत्या. सगळ्यात शेवटी माझ्या वाटणीच्या गरम पोळ्या घेऊन त्यावर भरपूर साजूक तूप घातले आणि 'आहाहा,,, ' करत पोळ्या खाल्ल्या. मला पुरणपोळी वर भरपूर तूप लागते. पोळीवर तूप तरंगायला हवे.






त्या एपिसोडनंतर मी इतक्या पोळ्या कधीच केल्या नाहीत. आम्हाला दोघांना एक वाटी हरबरा डाळीच्या पोळ्या भरपूर होतात. अजूनही माझ्याकडे पुरणयंत्र नाही. पण माझे काहीही अडत नाही. आता मी हरबरा डाळ शिजवण्या आधी एक तास गरम पाण्यात भिजत घालते आणि मग कुकरामध्ये शिजवते. बाकीचे सर्व तसेच.