Wednesday, October 31, 2012

दुधी भोपळा


जिन्नस :

मध्यम आकाराचा दुधी भोपळा
पाव वाटी मुगाची डाळ
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
हिरवी मिरची चिरलेली २
दाण्याचे कूट मूठभर
ओल्या नारळाचा खव मूठभर
चवीपुरते मीठ
साखर १ ते २ चमचे
दूध अर्धा ते १ कप
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, हळद



मार्गदर्शन :  भाजी करण्याच्या आधी थोडावेळ मुगाची डाळ पाण्यात भिजत घाला. दूधी भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात फोडणीसाठी तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा व लगेचच त्यामध्ये चिरलेल्या मिरच्या व मुगाची डाळ घालून थोडे परतून घ्या. आता दुधीभोपळ्याच्या फोडी घालून ढवळा. त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदांने झाकण काढा व त्यात अगदी थोडे पाणी घाला. असे अगदी थोडे थोडे पाणी घालून भाजी शिजवून घ्या. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ व साखर घाला. भाजी ढवळून घ्या. नंतर त्यात दाण्याचे कूट व नारळाचा खव घाला. व गार दूध घाला. दूध तापवून मग ते गार झाल्यावर घाला. आता परत झाकण ठेवा व थोड्यावेळ भाजी शिजू दे. थोड्यावेळाने झाकण काढा. आता ही भाजी चांगली मिळून मिसळून आलेली असेल. दाटपणाही आला असेल. दुध घातल्याने एक वेगळी चव येते. ही भाजी पोळीपेक्षाही गरम भाताबरोबर जास्त चांगली लागते.


Thursday, October 18, 2012

ढेपसे


जिन्नस :


वांग्याचे काप १५
डाळीचे पीठ १ वाटी
तांदुळाचे पीठ अर्धी वाटी
लाल तिखट दीड चमचा
धने जिरे पूड दीड चमचा
अगदी थोडा हिंग
हळद चिमूटभर
चवीपुरते मीठ
तेल पाव ते अर्धी वाटी



मार्गदर्शन : ढेपश्यांसाठी निमुळते वांगे लागते. या वांग्याच्या जाडसर गोल चकत्या करा व त्या पाण्यात टाका. सर्व चकत्या पाण्यात टाकल्यावर पाणी काढून टाका व चकत्या एका रोळीत ठेवा म्हणजे सर्व पाणी निथळून जाईल. एका भांड्यात डाळीचे पीठ, तांदुळाचे पीठ घ्या. त्यामध्ये लाल तिखट, धने जिरे पूड, हळद, हिंग व मीठ घाला. मीठ थोडे जास्त घालावे. नंतर वांग्याची एकेक चकती घेऊन तिला चमच्याच्या टोकाने टोचावे. दोन्ही कडून टोचावे म्हणजे त्याला चिरा पडतील. आता एका ताटलीत वर तयार केलेले पीठ पसरून घ्या व त्यावर एक चकती ठेवून त्यावर परत पीठ घालून हाताने दाबा. परत चकतीच्या दुसऱ्या बाजूनेही असेच पीठ घालून दाबा. हे पीठ दाबून जितके चकतीमध्ये बसवता येईल तितके बसवा. अश्या रितीने सर्व चकत्या करून घ्या. एकेक चकती झाली की एकावर एक ठेवा. १५ मिनिटांनी ढेपसे करायला घ्या. मध्यम आचेवर तवा तापत ठेवा. तो तापला की त्यावर २-४ चमचे तेल घाला व ते कालथ्याने सर्व तवाभर पसरवा. त्यावर एका वेळी २ चकत्या ठेवा. आता आच थोडी कमी करा व चकत्यांवर झाकण ठेवा. काही सेकंदानी झाकण काढा व चकत्या उलटून परत त्यावर थोडे तेल सोडा. चकतीच्या आजुबाजूनेही तेल सोडा व परत त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून परत त्यावर थोडे तेल घाला.


अश्या रितीने सर्व ढेपसे करून घ्या. चकत्यांवर झाकण ठेवल्याने वांग्याच्या चकत्या व त्यामध्ये दाबून भरलेले पीठ शिजते. चकत्या जाडसर चिरल्याने कुरकुरीत होतात. शिवाय तांदुळाच्या पीठानेही त्या कुरकुरीत होतात. हे ढेपसे गरम गरम खायला जास्त चांगले लागतात. गरम आमटी भाताबरोबर छान लागतात. अथवा चहासोबत खायला हरकत नाही.

Monday, October 15, 2012

डिंकाचे लाडू


जिन्नस :

तळलेला डिंक अर्धी वाटी
बदाम, पिस्ते, काजू प्रत्येकी २५
किसलेले गोटा खोबरे १ वाटी
अदपाव वाटी खसखस
अदपाव वाटी खारकेची पावडर
साजूक तूप १०-१२  चमचे
पिठीसाखर पाऊण वाटी


मार्गदर्शन : डिंक हरबरा डाळ किंवा तुरीची डाळ दिसते इतका बारीक करून घ्यावा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात २ ते ३ चमचे साजूक तूप घालून डिंक तळून घ्या. साजूक तूप थोडे थोडे करत घाला. एकदम घालू नका. नाहीतर मिरगटलेला वास येतो. डिंक तळून झाला की उरलेल्या तूपात बदाम, काजू, पिस्ते लालसर रंग येईपर्यंत परतून घ्या. सर्वात शेवटी खारकेची पूड उरलेल्या तूपात भाजून घ्या. डिंक तळण्याच्या आधी किसलेले गोटा खोबरे व खसखस भाजून घ्या. नंतर परतलेले बदाम, काजू, पिस्ते यांची मिक्सरवर पावडर करून घ्या. थोडी जाडसर असली तरी चालेल. डिंक तळला की छान फुलून येतो. तो हाताने चुरावा. भाजलेले खोबरे व खसखस चुरडावी किंवा मिक्सर मधून थोडी बारीक करावी. पिठीसाखर नसेल तर घरात असलेली साखर मिक्समध्ये बारीक करून घ्यावी. वरील सर्व मिश्रण एकत्रित करावे व लाडू वळावेत. लाडू वळले गेले नाहीत तर अजून थोडे साजूक तूप घालावे. पाहिजे असल्यास एकेका लाडवाला एकेक बेदाणा लावावा. हे लाडू ठिसूळ होतात. त्यामुळे अलगद हाताने डब्यात घालून ठेवावे. हि एक सोपी पद्धत आहे.  तळून घेतलेल्या डिंकाचा चुरा जितका होईल त्याच्या दुप्पट बाकीच्या जिन्नसाची पावडर झाली पाहिजे. एका वाटीचा चुरलेला तळून घेतलेला डिंक असेल तर बाकीचा सुकामेवाचा चुरा दोन वाट्या झाला पाहिजे. थोडा जास्ती चालेल.
या सर्व मिश्रणाच्या निम्मी साखर घ्यावी. आवडीप्रमाणे बाकीचा सुकामेवाही घालावा.