Thursday, October 28, 2010

बटाटेवडे

माझ्या बाबतीत बटाटेवडे बनवणे म्हणजे म्हणता ना 'किस झाड की पत्ती! ' किंवा 'बाए हाथ का खेल' अगदी तसेच आहे. बटाटेवडे करायला मला कधीच कंटाळा आला नाही आणि येणारही नाही. बटाटावडा हा माझा सर्वात आवडता आहे, तसा तो कधी कुणाला आवडला नाही असे ऐकीवात नाही.



बटाटेवडे कसे करायचे असे मी कधी कोणाला विचारले नाही. खूप आवडीचा पदार्थ असल्याने आई कसे वडे बनवत ते पाहून कॉलेजमध्ये असतानाच आम्ही दोघी बटाटेवडे करण्यात तरबेज होतो. कधीही पटकन मनात आले की करायचे का बटाटेवडे! असे एकमेकींना विचारत असू. बटाटेवडे असे म्हणायचाच अवकाश की तासाच्या आत आम्ही दोघी बहिणी गरम गरम बटाटेवडे खायला सुरवात करायचो. जलद चित्रफीत कशी चालते अगदी तसेच व्हायचे आम्हा दोघींचे. एकजण कुकराला बटाटे उकडत ठेवायचो गॅस मोठा करून. दुसरी लसूण सोलून, मिरच्या आले लसूण वाटून तयार ठेवायची. कुकराची वाफ मुरून ते बटाटे बाहेर काढले जायचे. कुकराचे झाकण पटकन उघडले गेले नाही तर राग यायचा. किती मुरायला वेळ! झाकण सैल करून कुकराची शिट्टी वर करून फूऽ‌ऽस असा आवाज येऊन वाफ बाहेर यायची की झाकण पटकन पडायचे! गरम गरम बटाटे साणशीने एकेक करत पकडून रोळीत ठेवायचो. रोळी लगेच गार पाण्याच्या नळाखाली! तरीही बटाटे इतके काही गरम असायचे! फडक्यात एकेक बटाटा ठेवून साले काढायचो. एकीकडे तोंडाने फुंकर! हाताला खूप चटके बसायचे. खूप गरम बटाटे चमच्याने बारीक करायचो. ते करेपर्यंत एक जण खूप बारीक कांदा चिरायची. लाल सालींचे कांदे व हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून बटाटेवड्याचे सारण तयार होईतो एकजण डाळीचे पीठ भिजवायची. कढईत तेल घालून तापले रे तापले की बटाटेवडे तळून ते ताटलीत घालून गरम गरम, तिखट तिखट, हायहुई करत बटाटेवडे खायचो. असे गरम गरम व तिखट तिखट बटाटेवडे खाल्ले ना की तोंडाला जी चव येते ती काही औरच!





भारतात असताना कंपनीने दिलेल्या घरात जेव्हा राहायला गेलो तेव्हा मला 'पॉटलक' हा प्रकार माहिती झाला. पहिल्या पॉटलकच्या वेळी मला माझ्या आवडीचा पदार्थ करायला मिळाला नाही. बाहेरगावी गेलो होतो. परत आल्यावर पॉटलक असल्याचे कळले व माझ्याकडे कोणीच न घेतलेला पदार्थ आला तो म्हणजे 'पुरी' ७० ते ८० पुऱ्या बनवल्या होत्या. दिवाळीच्या वेळी मला मैत्रिणीने सांगितले ' तू तुझ्या आवडीचा पदार्थ आधीच सांगून ठेव' मला माझ्या आवडीचा पदार्थ आणि तोही मोठ्या प्रमाणात बनवण्याची संधी आली आणि तो पदार्थ म्हणजे बटाटेवडे! कोणाचीही मदत न घेता एकटीने ७० ते ८० वडे बनवले. मला कोणी मदतीला येऊ का? असे विचारले तर मी सरळ 'नाही' असे सांगते कारण की माझा खूप गोंधळ होतो. लसूण सोलण्यापासून ते मोठ्या डब्यात बटाटेवडे भरण्यापर्यंत सगळे एकटीने केले. त्यातला एकही वडा घरी परत आला नाही. मला खूप आनंद झाला होता त्यावेळी.





दुसरे पॉटलक अमेरिकेत आलो तेव्हा त्या वर्षाअखेरीस झाले. नववर्ष साजरे केले तेव्हा. त्यावेळीही असेच ७०-८० बटाटेवडे बनवले होते. तेलगू कुटुंबे होती. त्यांना हा मराठी पदार्थ खूप आवडला. तिसऱ्या पॉटलकच्या वेळी उत्तर भारतीय कुटुंबे होती. त्यात एक मुसलमान जोडपे होते, इक्बाल फरहाना. जेव्हा एकत्र जेवणावळी होत तेव्हा फरहाना मला म्हणायची 'आप वो बटाटा करके लाइए. बटाटेवड्यांना ती बटाटा म्हणायची.

11 comments:

  1. तिव्र निषेध.. सकाळी सकाळी बटाटेवड्यांची आठवण करून दिल्याबद्दल......
    बटाटे वडे आणि घोसळ्याची भजी माझा ’दिवा’ आहे असं आई म्हणते...

    ReplyDelete
  2. Sunakshi9:20 PM

    Nice recipe..
    pan just cooking la suruvat keli aahe. so 1 tasamadhe not possible aani te pan ekatila. :(
    But I will try it tomorrow

    ReplyDelete
  3. प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद!! दवबिंदु, तुमचा प्रतिसाद वाचला, पण मला तो पब्लिश करता येत नाही. कारण की तो स्पॅम मध्ये गेला आहे. तो तिथे कसा काय गेला ते माहीत नाही. पण तुमच्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद! आणि उमाचेही आभार!

    ReplyDelete
  4. Anonymous4:07 PM

    Rohini Taai,

    Vaachun tondaala paani sulta!!! Agdi atta hya kshaani garam garam batate vada khaavasa vattoy! Tumhi ektine evdhya mothya pramanavar batate vade kele hey vachun kharach kautuk vatla. Tumhi batate vade kasey karta hey thodkyaat kallay pan tarihi detailed kruti and most importantly proportions nakki post kara. Tumchya krutine karun pahin aNhi tumchya haatche samjun khaien! :)

    ReplyDelete
  5. पहिल्यांदा तुमच्या अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद! मी वडे लिहिले आहेत. "वडे" या लेबल मध्ये पहा. सोबत बटाटेवडे चित्रही आहे. करून पाहा आणि सांगा कसे झाले ते! धन्यवाद.

    http://rohinivinayak.blogspot.com/search/label/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87

    वर वडे लेबलची लिंक दिली आहे. यात सर्व प्रकारचे वडे आहेत. साबुदाणा वडा, मेदुवडा, भाजणी वडा वगैरे.

    ReplyDelete
  6. dava bindu, tumacha abhipray batatevade madhe publish jhala aahe. thanks.

    ReplyDelete
  7. बटाटेवडे करण्यामागे दोघी बहिणी कशा पटापट कामाला जुंपायच्या ह्याचे वर्णन बटाटेवड्यांपेक्षाही जास्त चवदार आणि कुरकुरीत आहे. आम्ही तिघी बहिणीही, पोहे [मग ते कोणतेही असो, कांदे/बटाटे/मिक्स] करायचे म्हंटले की अशीच धावपळ करायचो, ते आठवले.
    छानच रोहिणीताई !

    अवनी राजोपाध्ये

    ReplyDelete
  8. Thanks avani. ase lahanpaniche divas kiti chhan astat na ga!

    ReplyDelete
  9. sundar - video pan changla aahe :)

    ReplyDelete