Wednesday, October 01, 2025

चविष्ट दडपे पोहे

जिन्नस :
पातळ पोहे ३ मुठी
चिरलेला कांदा मूठभर
चिरलेला अर्था टोमॅटो
साखर अर्था चमचा
लिंबू पिळून २/३ चमचे
मीठ चवीनुसार
फोडणी साठी तेल, मोहोरी, जिरे, हिंग, हळद
कच्चे दाणे मूठभर
चिरलेली कोथिंबीर २/३ चमचे
खवलेला ओला नारळ २/३ चमचे
लाल तिखट १ चमचा
क्डीपत्ता ५-६ पाने

क्रमवार मार्गदर्शन : सर्वात आधी पोहे चाळून एका वाडग्यात घ्या. पोह्यांवर लाल तिखट, मीठ, व साखर पेरा. सगळीकडे एकसारखी घाला. नंतर एका कढल्यात तेल तापत ठेवा. ते तापले की त्यात कच्चे दाणे तळून वाडग्यातील पोह्यात घाला. ते पण असेच सगळीकडे पसरून घाला. नंतर उरलेल्या तेलात कडीपत्ता घाला व तो तडतडला की तो पोह्यात घाला. आता फोडणीकरता तेल घालून त्यात मोहरी जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा व ही फोडणी पोह्यात घाला. सगळीकडे पसरून घाला व लगेचच डावेने पोहे एकसारखे करा. चिवडा करतो तसेच हे पोहे करायचे आहेत. असा चिवडा तयार झाला की खमंग वास दरवळतो. नंतर त्यात चिरलेली कोथिंबीर , कांदा व टोमॅटो घालून खवलेला नारळही घाला. लिंबाचा रस घाला. आता डावेनेच एकसारखे पोहे ढवळा. असे हे दडपे पोहे केले. नेहमीचे दडपे पोहे खाऊन कंटाळा आला होता. त्यामुळे उलट्या क्रमाने रेसिपी केली. म्हणजे सर्व जिन्नस आधी घालून मग आपण फोडणी घालतो व नंतर तिखट मीठ घालतो. तसे न करता आधी तिखट,मीठ, साखर वगैरे घालून नंतर बाकीचे जिन्नस घातले.  टोमॅटोने पोहे ओलसर झाले व चविला अप्रतीम लागले. चिवडा व भेळेची एकत्र चव आली होती.

माहितीचा स्त्रोत : अर्चना जहागिरदार/कुलकर्णी. डोंबिवलीत हिच्याकडे गेलो तेव्हा तिने असे दडपे पोहे केले होते. मी माझा अंदाज लावून पोहे बनवले आहेत.

Tuesday, September 09, 2025

ब्रेडचा उपमा

 जिन्नस :

ब्रेडचे स्लाईस ४ (याचे छोटे तुकडे करून घ्या)
चिरलेला कांदा १ वाटी
मिरच्या ३ ते ४ (मध्यम आकाराचे तुकडे करा)
टोमॅटोच्या फोडी ३-४
चिरलेली कोथिंबीर २ चमचे
ओला नारळ खवलेला २ चमचे
मूठभर कच्चे/भाजलेले दाणे
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्था चमचा
चवीपुरते मीठ
अर्धा चमचा साखर
कडिपत्ता ५ ते ६ पाने
फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग हळद
चवीपुरते लिंबू (उपम्यावर घालण्यासाठी)

 

क्रमवार मार्गदर्शन : मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. पातेले पुरेसे तापले की त्यात तेल घाला. तेल पुरेसे तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग हळद घालून फोडणी करा व त्यात मिरच्यांचे तुकडे, कडिपत्ता, चिरलेला कांदा व टोमॅटो घालून मूठभर कच्चे/भाजलेले दाणे घाला. परतून घ्या. परतल्यावर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा. परतून घ्या. सर्व जिन्नस चांगले शिजले पाहिजेत. आता शिजलेल्या मिश्रणात ब्रेडचे तुकडे घाला. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ व साखर घालून ढवळा. नंतर त्यात ओल्या नारळाचा खव व चिरलेली कोथिंबीर घालून परत एकदा नीट ढवळा. गॅस थोडा मोठा करून मिश्रण परतून घ्या म्हणजे ब्रेडचे तुकडे पण भाजले जातील. आता गॅस बंद करा. बाऊल मध्ये आता ब्रेडचा उपमा घाला व त्यावर थोडे लिंबू पिळून खायला द्या. पोटभरीचा उपमा तयार आहे. वेगळी चव येते. 


Wednesday, April 09, 2025

दुधी भोपळ्याचे भरीत

 जिन्नस :
दुधी भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी २ ते ३ वाट्या
दाण्याचे कूट मूठभर
दही ५-६ चमचे
मीठ, साखर,
लाल तिखट, धनेजिरे पूड दोन्ही मिळून पाव ते अर्धा चमचा
३-४ मिरच्यांचे तुकडे, कडीपत्ता
बारीक कांदा व टोमॅटो बारीक चिरून घाला- १-२ चमचे

मोहरी,हिंग हळद तेल फोडणीसाठी

क्रमवार मार्गदर्शन : दुधीच्या फोडी कूकरमध्ये शिजवून घ्या. शिजताना थोडे पाणी घाला. शिजल्यावर त्यातले पाणी काढून टाका. फोडी पूर्णपणे थंड होऊ देत. शिजवलेल्या फोडीत, दाण्याचे कूट, लाल तिखट, धनेजिरे पूड, साखर, मीठ  व दही घाला व ढवळा. नंतर त्यामध्ये अगदी थोडा कांदा व टोमॅटो चिरून घाला. थोडी कोथिंबीर चिरून घाला. मिश्रण ढवळा. नंतर तेल तापवून त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. फोडणीत मिरच्यांचे तुकडे व कडीपत्ता घाला. फोडणी करून दुधीच्या फोडीच्या मिश्रणात घाला. वेगळे  व छान लागते हे भरीत. आज सहज विचार मनात आला आणि हे भरीत केले. भोपळ्याच्या भरीतासारखीच याची कृती आहे. फक्त भरताला थोडा रंग व चव येण्यासाठी कांदा व टोमॅटो चिरून घातला आहे.



Sunday, September 08, 2024

कांदे बटाटे

कांदे बटाटे

कांदा आणि बटाटा मला खूप प्रिय आहेत. ते घरात कायमच असतात माझ्या आणि सर्वांच्याही. सर्वांना सामावून घेतात हे दोघे. प्रत्येक भाजीला सामावून तर घेतातच. शिवाय आयत्यावेळेला कोणी पाहूणे रावळे आले की मदतीलाही धावून येतात. कांदा जसा की पोह्यात उपम्यात लागतो तसा मी बटाटाही घालते. पोह्यात आणि उपम्यात कांदे बटाटे जास्तीच असतात माझ्या ! आयत्यावेळेला कुणी पाहुणे आले तर बटाट्याच्या काचऱ्यात थोडा तरी कांदा हवाच. पटकन काचऱ्या करा. पोळी लाटा की जेवण तयार. कूकर मध्ये तेल घालून फोडणीत कांदे बटाटे घाला की पाचच मिनिटात एका शिट्टीत रस्सा तयार ! बटाट्याच्या काचऱ्या तर पोळीशी छान लागतातच. शिवाय धिरड्या सोबत, ताकभाताबरोबर, मऊ भाताबरोबर चवीत भर घालतात. लज्जतच वाढवतात. तिखट तिखट गरम गरम काचऱ्यांबरोबर जेवण तर छान होतेच. तोंडालाही चव येते. कांदाबटाटा रस्सा लाल तिखटाचा आणि नुसती हिरवी मिरचीचा ठेचा घातला तरी चवदार होतो. 
 
 
बटाट्यावड्यात मी नेहमीच थोडा कांदा चिरून घालते. शिळ्या पोळ्या असल्या की त्यासोबत कोणतीही भाजी नसली तरी चालते. कांदा बारीक चिरून, त्यावर लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ आणि कच्चे तेल घाला. सर्व शिळ्या पोळ्या एका मिनिटात संपतील. तांदुळाच्या उकडीबरोबर कच्चा कांदा आणि तोही हाताने फोडलेला. फोडणीच्या पोळीत आणि फोडणीच्या भातात कांदा ! किती चविष्ट आहेत हे पदार्थ. बटाट्याची तर बातच निराळी. पोटॅटो फ्राईड एकदा का तळायला घेतले की एकेक किलो बटाटे हा हा म्हणता संपतात. या पदार्थात बटाटा जाडाजुडा आणि उंच पाहिजे म्हणजे लांब लांब जाड फोडी करून त्या पाण्यात घालायच्या आणि तेलात सोडायच्या. खमंग तळल्या की ताटलीत लाल तिखट, मीरपूड, मीठ लावून खायच्या. आहाहा ! तोंड स्वच्छ होते.तसेच तेल तिखट मीठ पोहे यात बारीक कांदा चिरून घालायचा आणि कच्चे पातळ पोहे चावून चावून खाल्ले की तोंड स्वच्छ होते. पिठल्यात कांद्याच्या जाड फोडी घालून परता. सोबत लसूण पाकळ्या आणि हिरव्यागार मिरच्या. कढईतून गरम गरम पिठले पानात वाढायचे आणि सोबत पोळी. गरम इतके हवे की तोंड पोळले पाहिजे. स्वाद यातच आहे.
 
 
साबुदाणा खिचडी, वडे, थालिपीठ, या सर्वात मी कच्चा सालं न काढलेला बटाटा घालते. सॅंडविच, सामोसा मध्ये उकडून बटाटा. उपासाच्या दिवशी बटाट्याचे डांगर ! उन्हाळ्यात बटाट्याचे पापड, साबुदाणा चकलीत, चिकवड्यात उकडून बटाटा. किती किती बहुगुणी आहे हा ! बटाटा उकडून तो किसून वर्षाभराचा वाळवून ठेवतात म्हणजेच बटाट्याचा वाळवलेला कीस. हा बटाट्याचा किसाचा चिवडा तर मला प्रचंड प्रिय आहे ! तेलात तळताना खूपच फुलून येतो. मोठ्या परातीत हा तळलेला कीस ठेवायचा. उरलेल्या तेलात कच्चे दाणेही तेलात तळून त्यात घालायचे. त्यावर लाल तिखट, मीठ, जिरेपूड, आणि साखर घालून एकत्र कालवायचा आणि खायचा. खूप तळायचा. उरलेला डब्यात भरून ठेवायचा. हा चिवडा खाल्यावर जी चव येते ना ती शब्दात वर्णन करता येणार नाही इतका हा चिवडा मला आवडतो. मी खूप मिस करते या चिवड्याला. मला एकदा इंडियन स्टोअर मध्ये वाळवलेला बटाट्याचा कीस दिसला होता. अर्थात मी लगेचच तो घेतला. खूप दिवस पुरतो. खाताना मला पूर्वीच्या दिवसांची आठवण येत होती.
 
 
बटाटेवडे तर मनात आले की केले, खाल्ले. एकदा आम्ही युट्युबवर डोंबिवलीतला वडा पाव कुठे कुठे मिळतो हे पहात होतो. जेवण व्हायचे होते. वडे पहाताना आणि खाताना इतके काही खावेसे वाटले की लगेच कूकर मध्ये बटाटे उकडले आणि हाहा म्हणता वडे तयार ! सर्वांचे प्रिय आहेत ना ! कांद्याची पीठ पेरून भाजी आणि दुसरी एक नुसती परतून भाजी दोन्हीही चविष्ट लागतात. पीठ नुसते पेरायचे हं जास्त नको. परतून भाजीत दाण्याचे कूट, कोथिंबीर हवीच. पोळीबरोबर दोन्ही भाज्या पटकन होणाऱ्या आणि चवही आणणाऱ्या ! खूप पूर्वी मी प्रत्येक भाजीत बटाटा घालायची. मी जेव्हा कामावर जायचे तेव्हा आम्ही तिघी एकत्र डबा खायचो. तिथली लक्ष्मी मला म्हणायची. रोहिणी तुम हर सबजीमें बटाटा क्यु डालती है रे ! मी तिला म्हणायचे अरे मुझे बटाटा बहूत प्यारा है रे ! दिप्तीला सांगायचे मराठीतून मला आवडतो बटाटा खूप. मिळून येते ना भाजी ! ती म्हणायची हो गं. पण तू खूपच खातेस ग बटाटे !
 
 
कोबी-बटाटा, वांगं - बटाटा, गवार -बटाटा, बीन्स, फ्लॉवर यामध्ये बटाटा. किती मिळून येतात बरे या भाज्या. टोमॅटो सूपात बटाटा घातला की दाट होते की नाही? म्हणजे कूकर मध्ये उकडवायचे व मिक्सर मधून काढायचे. सणासुदीला बटाटा - कांदा भजी डावीकडे हवीत ना. गोडाधोडाच्या जेवणात ही भजी जेवणाची गोडी वाढवतात! मूगडाळ खिचडीत पण थोडा कांदा घालून परतायचा. बटाटाही घालायचा. मला तर सांबारातही बटाटा लागतो. मित्रमैत्रिणी, नातेवाईक आपल्या घरी आले की आपण लगेचच कांदे पोहे करतो. पटकन होतात. मुलं मुली बघण्याच्या कार्यक्रमात कांदे पोहेच दोघांना एकत्र आणतात आणि लग्नाच्या बंधनात अडकवतात. किती महत्वाचा आहे हा कांदा ! सणासुदीचे ताट सजवताना उकडून बटाट्याची भाजी किती महत्वाची असते ! माहीत आहे ना ! ताटातल्या उजव्या बाजूची शान वाढवते. मला कांदा बटाटा ही जोडी खूपच आवडते. तुम्हाला आवडते का? कांदे बटाटे दोन्ही आवडते असले तरी डाव्या उजव्यामध्ये उजवा बटाटा !! Rohini Gore

Tuesday, July 23, 2024

मक्याचा दाण्याचे थालिपीठ

 जिन्नस :

२ कणसे किसून घ्या. त्यात मावेल इतके हरबरा डाळीचे पीठ घाला व थोडेसे तांदुळाचे पीठ घाला. नंतर त्यात किसलेले आलं (थोडेसे) व १ पाकळी लसूण (बारीक चिरून) घाला. शिवाय बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा तिखट, धनेजिरे पूड, अगदी थोडी हळद व चवीपुरते मीठ घाला. हरबरा व तांदुळाचे पीठ खूप नको. त्यातही तांदुळाचे पीठ अगदी थोडे घाला. हे पीठ थोडे सैलसर भिजवा. त्यात १ चमचा तेल घाला. आता एका तव्याला तेल लावून ते तव्यावर पसरवा व त्यावर भिजलेल्या पिठाचे थालिपीठ लावा. थालिपीठ थापताना हातावर थोडे तेल घालून थापा. थालिपिठाला भोके पाडा व त्यातही तेल घाला. मध्यम आचेवर थालिपीठ करताना त्यावर झाकण ठेवावे. चुर्र असा आवाज आला की झाकण काढून थालिपीठ उलटून घ्या व परत त्यावर झाकण ठेवा.


काही सेकंदाने झाकण काढा व गॅस बंद करा. थालिपीठ खरपूस झालेले असेल. टोमॅटो सॉस बरोबर हे कुरकुरीत व खुसखुशीत थालिपीठ छान लागते. जरा वेगळी चव.





Wednesday, July 17, 2024

उपासाचे बटाटेवडे

जिन्नस

मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे २
किसलेले आले १ ते दीड चमचा
खूप बारीक चिरलेल्या मिरच्या १ ते दीड चमचा
लिंबू पाव चमचा
चवीपुरते मीठ (सारण व पीठ भिजवण्यासाठी)
चिरलेली कोथिंबीर २ ते ३ चमचे
शिंगाड्याचे पीठ अर्धी वाटी
साबुदाण्याचे पीठ २ चमचे
दाण्याचे कूट २ - ३ चमचे
लाल तिखट अर्धा ते पाऊण चमचा
तेल अर्धा चमचा
वडे तळण्यासाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन : उकडलेले बटाटे कुस्करून घ्या. त्यात चिरलेले आले, मिरच्या व कोथिंबीर घाला. लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घाला. शिवाय दाण्याचे कूट घाला. आता एका पातेल्यात शिंगाडा पीठ, साबुदाणा पीठ, लाल तिखट व चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण पाणी घालून भिजवावे. जास्त घट्ट आणि जास्त पातळ नको. या पिठात अर्धा चमचा कच्चे तेल घालून परत एकदा पीठ कालवून घ्या. कढईत तेल तापत ठेवा. ते व्यवस्थित तापले की गॅस बारीक करा. बटाटेवड्याचे जे सारण बनवले आहे त्याचे चपटे-गोल गोळे करून शिंगाड्याचे जे पीठ भिजवले आहे त्यात बुडवून वडे कढईत सोडा आणि तपकिरी लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या. २ बटाट्याचे ६ वडे होतात. चवीला छान लागतात. हे वडे खास उपास स्पेशल आहेत. नेहमीच्या बटाटया वड्यांसारखेच हे वडे लागतात. खूप महिने झाले ही मी तयार केलेली रेसिपी डोक्यात घोळत होती. आज मुहूर्त लागला.





Wednesday, January 03, 2024

मुगाच्या डाळीची आमटी

 जिन्नस :

मुगाची डाळ १ वाटी (कूकरमध्ये शिजवून घ्या. यातील शिजवलेली अर्ध्या डाळीची आमटी बनवा. अर्धी फ्रीज मध्ये ठेवा म्हणजे नंतर परत एकदा आमटी करता येईल) शिजवताना २ वाट्या पाणी घाला.
थोडे आले, २ मिरच्या, ३ ते ४ लसूण पाकळ्या (बारीक तुकडे करा अथवा मिक्सर मधून बारीक करा)
कांदा ५ ते ६ पाकळ्या (कांदा उभा आणि बारीक चिरा)
टोमॅटो अर्धा किंवा १ (मध्यम आकाराचे तुकडे करा)
फोडणीसाठी तेल (नेहमीपेक्षा थोडे जास्त घ्या)
मोहरी, जिरे, हिंग, हळद
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
चवीपुरते मीठ
आमटीला लागणारे पाणी (पातळ/घट्ट जसे हवे त्याप्रमाणात पाणी घालावे)

मार्गदर्शन : कढई मध्यम आचेवर तापत ठेवा. नंतर त्यात फोडणीसाठी तेल घाला. (५ ते ६ चमचे) नेहमी फोडणी करतो त्यापेक्षा थोडे जास्त घाला. तेल तापले की त्यात मोहरी जिरे हिंग हळद घालून फोडणी करावी. नंतर  चिरलेले आले, लसूण, कांदा, कडीपत्ता, टोमॅटो एकेक करत घाला. आच थोडी वाढवावी. फोडणी छान झाली पाहिजे. आणि हा घातलेला मसाला चांगला परतून घ्यावा म्हणजे आमटीला छान चव येते. नंतर शिजलेली मूगडाळ घालून ढवळावे व नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड व चवीपुरते मीठ घालून परत नीट ढवळावे. आता यात जरूरीपुरत पाणी घाला व परत नीट ढवळा. आमटीला छान उकळी येऊ देत. आता ही गरम व चविष्ट आमटी तयार झाली आहे. गॅस बंद करा. परत एकदा आमटी सर्व बाजूने नीट ढवळून घ्या. गरम भातावर ही आमटी घाला व साजूक तूपही घाला. थंडी मध्ये ही आमटी खूपच छान लागते. नुसती वाटी मध्ये घेऊन प्यायली तरी चालेल. त्यात थोडे साजूक तूप घालावे. चव अप्रतीम आहे. तुम्हाला हवा तसा मसाला कमी जास्त घाला. मसाला जास्त झाला तरी चालेल पण कमी नको.