Showing posts with label पाककृती स्पर्धा विजेते पदार्थ. Show all posts
Showing posts with label पाककृती स्पर्धा विजेते पदार्थ. Show all posts

Tuesday, January 16, 2007

निवगरी




वाढणी:जितकी माणसे तितक्या निवगऱ्या

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

उकडीच्या मोदकांना करतो तशी उकड करणे
कोथिंबीर, मिरच्या, जिरे किंवा जिऱ्याची पावडर
मीठ
उकड मळण्यासाठी तेल,पाणी

क्रमवार मार्गदर्शन:

ही पाककृती सोपी आहे. ज्यांना उकडीचे मोदक करता येतात, त्यांना निवगरी करणे काही अवघड नाही. तांदुळाच्या पीठाची केलेली उकड तेल-पाण्यामधे मळून घेणे. त्यात चवीप्रमाणे मिरच्या वाटून घालणे, चवीप्रमाणे मीठ, चिरलेली कोथिंबीर व जिरे/जिरे पावडर घालुन परत मळून घेउन वड्याच्या गोल आकाराप्रमाणे पातळ थापणे. मोदक जसे वाफेवर उकडतो त्याचप्रमाणे केळीच्या पानावर ठेवून उकडणे. गोड मोदक खाताना मधुन मधुन तिखट निवगरी खायला छानच लागते.
मध्यम आचेवर एका पातेल्यात २ वाट्या पाणी तापत ठेवा. त्यात थोडेसे मीठ व २ चमचे तेल घाला. या पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करा. उकळलेल्या पाण्यात तांदुळाची पीठी घालून कालथ्याने पटापट एकसारखे ढवळा. नंतर परत मंद आचेवर हे पातेले ठेवून त्यावर झाकण ठेवा. एक दणदणीत वाफ येऊ देत. नंतर झाकण काढून ही तयार झालेली उकड एका ताटलीत काढून घ्या व त्यामध्ये पाणी व तेल घालून चांगली मळून घ्या.


रोहिणी

Sunday, January 14, 2007

इडली











वाढणी:४ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस
तांदुळ २ वाट्या (लाँग ग्रेन राइस)
उडदाची डाळ १ वाटी
चवीपुरते मीठ

क्रमवार मार्गदर्शन: २ वाट्या तांदुळ व १ वाटी डाळ दोन्ही वेगवेगळ्या पातेल्यात दुपारी १२ ला भिजत घालणे. रात्री १० ला मिक्सर/ब्लेंडर मधून बारीक वाटून घेणे. वाटून झालेले पीठ एका पातेल्यात झाकून ठेवणे. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता न्याहरीला किंवा दुपारी १२ वाजता जेवायला इडली करणे. दुसऱ्यादिवशी हे झाकून ठेवलेले पीठ फसफसून वर येते. आंबट होते.

इडली करायच्या वेळेला एका पातेल्यात फसफसलेले पीठ काढून घेऊन त्यात चवीप्रमाणे मीठ घालून व थोडे पाणी घालून डावेने चांगले घोटून घेणे. हे पीठ आपण भज्यांना पीठ भिजवतो इतके पातळ झाले पाहिजे. (पळीवाढे) गंधासारखे एकजीव दिसायला हवे. नंतर इडली स्टँडला तेलाचा हात लावून त्यात हे पीठ घालणे. नंतर कूकरमध्ये थोडे पाणी घालून इडली स्टँड त्यामध्ये ठेवून कूकरची शिटी काढून गॅसवर (मध्यम आचेच्या थोडी वर आच ठेवून) १५ मिनिटे ठेवणे. गॅस बंद केल्यावर १५ मिनिटांनी कूकरचे झाकण काढून सुरीने सर्व इडल्या सोडवून घेणे.

चटणी किंवा सांबारासोबत गरमागरम इडली खाणे. डोश्याला वरील दिलेलेच डाळ तांदुळाचे प्रमाण वापरणे. वरील मिश्रणात एकदा इडली व एकदा डोसे होतात.

खोलगट डीशमध्ये गरम इडली सांबार घालून त्यावर ओल्या नारळाची पातळ चटणी व बारीक शेव घालून खावयास देणे.