Showing posts with label मी स्वयंपाकघरात नवीन आहे. Show all posts
Showing posts with label मी स्वयंपाकघरात नवीन आहे. Show all posts

Tuesday, June 18, 2013

कणीक भिजवणे


जिन्नस :
गव्हाचे पीठ ४ वाट्या
पाणी २ वाट्या
गोडतेल मोठाले ५ ते ६ चमचे
पाऊण चमचा मीठ


मार्गदर्शन : एका परातीत गव्हाचे पीठ घ्या. त्यात अर्धा चमचा मीठ घाला. थोडे थोडे पाणी घालून कणीक ओली करा. कणीक ओली करताना एकीकडे चमच्याने सगळ्या बाजूने ढवळत रहा. ४ वाट्या कणकेसाठी २ वाट्या पाणी लागते. आता ही ओली झालेली  कणीक अजूनही थोडीफार कोरडीच असेल. नंतर एक चमचा तेल हातावर घ्या आणि ओली झालेली  कणीक हातानेच एकसारखी करून मळून घ्या व त्याचा गोळा बनवा. हा कणकेचा गोळा बनवताना अजूनही कणकेच्या गोळ्याच्या आजुबाजूला थोडे गव्हाचे पीठ कोरडे राहिलेले दिसेल. त्यात अगदी थोडे पाणी घालून तेही त्या गोळ्यात मिक्स करा. कणकेचा गोळा मळताना एकेक चमचा हातावर तेल घेत राहा व गोळा मळत रहा. आता हा मळलेला कणकेचा गोळा अर्धा तास मुरवत ठेवा. कणकेच्या गोळ्यावर झाकण ठेवा. अर्ध्या तासानंतर परत थोडे हातावर तेल घालून कणकेचा गोळा मळा. आता तुम्हाला कणीक नितळ दिसायला लागेल. नितळ झालेल्या कणकेच्या पोळ्या बनवा.

Monday, February 18, 2013

रस्सा



जिन्नस :

एक मोठा बटाटा (साले काढावीत. )
अर्धा कांदा
दीड लाल टोमॅटो
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा धनेजिरे पूड
अर्धा चमचा गरम मसाला
४-५ चमचे दाण्याचे कूट
४-५ चमचे ओल्या नारळाचा खव
चवीपुरते मीठ
पाव चमचा साखर
तेल फोडणीसाठी
मोहरी, जिरे, हिंग, हळद



मार्गदर्शन : बटाटा, कांदा, टोमॅटो या सर्वाच्या मध्यम आकाराच्या फोडी करा. मध्यम आचेवर छोटा कूकर तापत ठेवा. तो तापला की त्यात तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात बटाटा कांदा व टोमॅटोच्या केलेल्या फोडी घाला. हे मिश्रण एकदा ढवळून घ्या. नंतर त्यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला, मीठ, साखर, दाण्याचे कूट, व ओला नारळ घालून परत हे मिश्रण डावेने नीट ढवळून घ्या. नंतर त्यामध्ये  एक वाटी पाणी घाला. परत एकदा डावेने ढवळून घ्या. कूकरचे झाकण लावा. व एक शिट्टी करा. झटपट रस्सा तयार झाला आहे. गॅस बंद करा.

Tuesday, February 12, 2013

झटपट आमटी

जिन्नस :

तुरीची डाळ १ वाटी
अर्धा चमचा तिखट
अर्धा चमचा धनेजिरे पूड
अगदी थोडा गूळ
मीठ
फोडणीकरता तेल
मोहरी, हिंग, हळद
पाणी ३ वाट्या
थोडी चिरलेली कोथिंबीर
अर्धा कांदा चिरलेला
अर्धा टोमॅटो चिरलेला
१ मिरची चिरलेली



मार्गदर्शन : तुरीची डाळ पाण्यामध्ये ५-१० मिनिटे भिजत घाला. मध्यम आचेवर एक छोटा कूकर तापत ठेवा. तो तापला की मग त्यात फोडणीकरता तेल घाला. ते तापले की मग त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. नंतर लगेचच चिरलेली मिरची, कांदा व टोमॅटो घाला. थोडे परतून घ्या. नंतर त्यात तुरीची भिजलेली डाळ (डाळ भिजत घातलेली आहे, त्यातले पाणी काढून टाका. ) तिखट, धनेजिरे पूड, चवीपुरते मीठ व थोडा गूळ व चिरलेली कोथिंबीर घाला. हे सर्व मिश्रण पळीने नीट ढवळून घ्या. नंतर त्यामध्ये ३ वाट्या पाणी घालून परत एकदा नीट ढवळा. आता कूकरचे झाकण लावा व ३ शिट्ट्या करा व गॅस बंद करा. झटपट आमटी तयार झालेली आहे.

माहितीचा स्त्रोत : कु. गौरी जपे ( मावस पुतणी)


Thursday, September 02, 2010

कडधान्य भिजवणे



१ वाटी हिरवे मूग
पाणी

दुपारी किंवा रात्री जेवणासाठी मुगाची/इतर कडधान्याची उसळ करायची असेल तर आदल्या दिवशी सकाळी मूग पाण्यात भिजत घाला त्यावर झाकण ठेवा. रात्री झोपताना पाण्यासकट हे मूग एका चाळणीत ओता. पाणी निघून जाईल. या चाळणीवर मूग पूर्णपणे झाकून जातील असे झाकण ठेवा व चाळणीखाली एक पातेली ठेवा. उरलेले सर्व पाणी निथळून जाईल. दुसऱ्यादिवशी सकाळी मुगाला मोड आलेले असतील. भिजलेल्या एका वाटीचे मोड आलेले मूग ४ वाट्या होतील. ४ जणांकरता उसळ होईल.

Thursday, September 24, 2009

फोडणी

जिन्नस :

तेल २ चमचे
मोहरी पाव चमच्यापेक्षा कमी
हिंग चिमुटभर
हळद आदपाव चमचा

क्रमवार मार्गदर्शन : सर्वात आधी मध्यम आचेवर एक कढलं तापत ठेवा. काही सेकंदाने त्यात तेल घाला. तेल तापायला थोडा वेळ लागतो. तेल व्यवस्थित तापल्याशिवाय फोडणी करू नये. तेल पटकन तापायला हवे असेल तर आच थोडी वाढवा. तेल तापले की नाही हे बघण्यासाठी एक चाचणी करा. तेलामध्ये २-३ मोहरीचे दाणे घालून पहा. ते तडतडले की उडतात. असे झाले की तेल तापले असे समजावे. तेल लवकर तापण्यासाठी आच थोडी वाढवली असेल तर ती मध्यम आचेपेक्षा कमी करा. आता त्यात मोहरी घाला. तापलेल्या तेलात मोहरी चांगलीच तडतडते. ती तडतडली की अगदी लगेच चिमुटभर हिंग घालून लगेच हळद घाला व गॅस बंद करा. हिंग व हळद घातली की दोन्हीचा रंग बदलेल. ही झाली बेसिक फोडणी. एकदा फोडणी नीट जमली की काही वेळेला त्यात गरजेनुसार मोहरीबरोबर थोडे जिरे, तिखट/मिरच्यांचे तुकडे/दाणे किंवा मेथिचे दाणे घालावेत.

वरील दिलेले तेल मोहरीचे प्रमाण थोड्या उरलेल्या भाताला फोडणी देण्याकरता दिलेले आहे. भाजी आमटी ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तेल व फोडणीचे जिन्नस जास्त लागतील. असे म्हणतात की फोडणी चांगली झाली की पदार्थ चांगला होतो. फोडणी चांगली झाली की तुमचा अर्धा पदार्थ चांगला झाला असे समजावे त्यामुळे फोडणी कच्ची पण राहता कामा नये अथवा जळता कामा नये. फोडणी कच्ची राहिली अथवा जळाली तर पदार्थाला अजिबात चांगली चव येत नाही. फोडणी करताना तेल चांगले तापले की फोडणी चांगलीच होते. हिंग पण खूप जास्त नको नाहीतर कडवट चव येते. हळद सुद्धा ज्याप्रमाणात भाजी आमटी करायची असेल त्याप्रमाणात हवी. हळद कमी झाली तर पदार्थाला रंग येत नाही, जास्त झाली तर हळदटलेली चवही चांगली लागत नाही.

Monday, August 10, 2009

पुरण



वाढणी : २ जण

जिन्नसः

हरबरा डाळ १ वाटी
गूळ पाऊण वाटी
साखर पाव वाटी

क्रमवार मार्गदर्शन : कूकरच्या एका भांड्यात हरबरा डाळ पाण्याने धूऊन घ्या. त्यात ३ वाट्या पाणी घालून कूकर मध्ये शिजवून घ्या. ही डाळ शिजायला वेळ लागतो त्यामुळे कूकरला ४-५ शिट्ट्या कराव्यात म्हणजे डाळ एकजीव होते व चांगली शिजते. कूकर गार झाला की शिजलेली डाळ एका चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी काढून घ्या. चाळणीखाली राहील असे एखादे पातेले चाळणीखाली ठेवा म्हणजे डाळीमधले निथळलेले पाणी त्यात जमा होईल. हे पाणी तुम्ही कटाच्या आमटीकरता वापरू शकता. डाळीतले पाणी व्यवस्थित निथळून गेले की मग ही डाळ फूड प्रोसेसर/पुरणयंत्रात बारीक करून घ्या. आता मध्यम आचेवर कढई/पातेले ठेवा व त्यात बारीक केलेली डाळ, साखर-गूळ घालून शिजवत ठेवा. अधून मधून कालथ्याने ढवळत राहा म्हणजे पुरण करपणार नाही. आता हे मिश्रण पातळ होईल कारण साखर व गूळ विरघळेल. थोड्यावेळाने मिश्रण घट्ट होईल. मिश्रण घट्ट झाले व पूर्ण एका जागी जमा होऊ लागले की समजावे की पुरण झालेले आहे. आता गॅस बंद करा.

वर जे साखर गुळाचे प्रमाण दिले आहे ते तुम्ही आपापल्या आवडीनुसार घेऊ शकता.

अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी गूळ
१ वाटी साखर
१ वाटी गूळ,
पाऊण वाटी साखर व पाव वाटी गूळ
१ वाटी साखर व अगदी थोडा गूळ चवीकरता
१ वाटी गूळ व अगदी थोडी साखर चवीकरता

मी पुरणपोळीसाठी अर्धी वाटी साखर व अर्धी वाटी गूळ हे प्रमाण घेते १ वाटीच्या हरबरा डाळीसाठी. गुळाचा खमंगपणा व साखरेची गोडी अशी दुहेरी चव खूप छान लागते.

पुरणाची पोळी, दिंड, कडबू करतात. किंवा श्रावणात नैवेद्यासाठी करतात.