Showing posts with label भजी. Show all posts
Showing posts with label भजी. Show all posts

Wednesday, April 26, 2023

कोथिंबिरीची भजी

 जिन्नस:

चिरलेली कोथिंबीर २ वाट्या
हरबरा डाळीचे पीठ पाव ते अर्धी वाटी
पाव चमचा लाल तिखट
पाव चमचा धनेजिरे पूड
चिमूटभर हळद,
चवीपुरते मीठ
तेल अर्धा चमचा (गार किंवा गरम केलेले)
तळणीसाठी तेल

मार्गदर्शन : चिरलेली कोथिंबीर चाळणीत घालून धुवून घ्या. पाणी निथळण्यासाठी चाळणीखाली एक ताटली ठेवा. पाणी पुर्णपणे निथळायला हवे. नंतर ही चिरलेली कोथिंबीर एका भांड्यात काढून घ्या. त्यात  डाळीचे पीठ, चिमूटभर हळद, लाल तिखट, धनेजिरे पूड व चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण कालवा. नंतर अगदी थोडे पाणी घालून परत कालवा. हे मिश्रण थोडे सैलसर झाले पाहिजे. पातळ नको आणि घट्ट तर नकोच. नंतर यात अर्धा चमचा तेल (गार किंवा गरम) घाला. परत एकदा चमच्याने मिश्रण ढवळा. आता कढईत तेल तापत ठेवा. तेल पुरेसे तापले की त्यात चमच्याने एकेक करत भजी सोडा. आच मध्यम ठेवा. लालसर रंग येईपर्यंत भजी तळा व नंतर झाऱ्याने टिश्यु पेपर वर काढून घ्या म्हणजे तेल झिरपेल.

ही भजी खाताना कोथिंबिरीचा उग्रपणा चवीत आला पाहिजे म्हणूनच डाळीचे पीठ जास्त घालायचे नाही. याचप्रमाणे मेथीची व पालकाची भजी करा. मस्त लागतात. पालक-मेथी-कोथिंबीर याची चव भजी खाताना लागली पाहिजे.


 

Monday, July 23, 2012

कांदा भजी


 जिन्नस :

मोठा कांदा अर्धा
हरबरा डाळीचे पीठ ६ चमचे मोठे
तांदुळाचे पीठ २ चमचे मोठे
तिखट १ चमचा
पाव चमचा हळद
चवीपुरते मीठ
मूठभर चिरलेली कोथिंबीर
तळणीसाठी तेल
पीठ भिजवण्यापुरते पाणी




मार्गदर्शन : कांदा उभा व पातळ चिरा. हरबरा डाळीच्या पीठामध्ये तांदुळाचे पीठ घाला. नंतर त्यात तिखट, हळद, मीठ व चिरलेली कोथिंबीर घालून व पाणी घालून पीठ भिजवा. पीठ खूप पातळ नको व खूप जाड नको. चमच्याने भजी कढईत सहज सोडता येतील इतपत पीठ भिजवा. पीठ भिजले की त्यात चिरलेला कांदा घालून चमच्याने ढवळा. आता कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात तेल घाला. तेल जरा जास्तच घालावे म्हणजे भजी नीट तळली जातात. तेल पुरेसे तापले की त्यात चमच्याने एकेक भजी सोडून लालसर रंगावर तळून ती एका पेपर टॉवेल वर घाला. भजी झाऱ्याने नीट निथळून घ्या. तेल पुरेसे तापले हे बघण्यासाठी भजी तळण्याच्या आधी अगदी थोडे पीठ घालून पहा. चूर्र असा आवाज आला पाहिजे. भजी तळण्यासाठी तेल खूप तापवावे लागते. मध्यम आच ठेवा व भजी तळा. एका बाजूने भजी तळून झाली की भजी झाऱ्याने उलटी करा व दुसऱ्या बाजूनेही भजी लालसर रंगावर तळली गेली पाहिजेत म्हणजे कच्ची राहणार नाहीत.

Wednesday, January 25, 2012

brussels sprouts balls



जिन्नस :

किसलेले brussels sprouts ८ ते १० नग
एका मिरचीचे बारीक तुकडे
लाल तिखट
धने जिरे पूड
कोथिंबीर
मीठ
डाळीचे पीठ
तळणीसाठी तेल


क्रमवार मार्गदर्शन : वरील सर्व जिन्नस एकत्र करा व त्यात अगदी थोडे पाणी घालून छोटे छोटे गोल बनवा. गोल बनवण्याइतपतच पीठ घट्ट भिजवावे. नंतर मध्यम आचेवर कढई ठेवा व त्यात पुरेसे तेल घाला. तेल तापले की गॅस मंद ठेवा व त्यात वरील जिन्नसापासून बनवलेले गोळे सोडा. लालसर रंग येईपर्यंत तळा. एका बाजूने लालसर झाले की गोळे अलगद उलटा व परत लाल रंग येईपर्यंत तळा. वर तिखट मीठाचे प्रमाण दिले नाही. अगदी थोडे घालायचे आहे सर्व काही. मिरची पण तिखट नसलेली घाला. काही मिरच्या तिखट नसतात. कोथिंबीर पण थोडीच घाला. हे गोळे मधल्यावेळी चहासोबत खायला छान लागतात. नाहीतर जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी पण करायला हरकत नाही.

Tuesday, August 18, 2009

पालक भजी




वाढणी : २ जण

जिन्नस :

बारीक चिरलेला पालक ३ वाट्या
हरबरा डाळीचे पीठ दीड वाटी
लाल तिखट १ चमचा
धनेजीरे पूड १ चमचा
मीठ चवीपुरते
तळणीसाठी तेल


सजावटीसाठी :
बारीक चिरलेला पांढरा कांदा
शेंदरी गाजराच्या पातळ चकत्या (गाजराची साले काढा)
कोथिंबीरीची पाने

क्रमवार मार्गदर्शन : बारीक चिरलेला पालक पाण्याने धूउन चाळणीमध्ये पाणी निथळ्यासाठी ठेवा. चाळणीखाली एक ताटली ठेवा म्हणजे पाणी निथळून ताटली जमा होईल. पाणी निथळले की काही वेळाने चिरलेला पालक एका भांड्यामध्ये घाला. त्यात हरबरा डाळीचे पीठ, लाल तिखट, धनेजिरे पूड व चवीपुरते मीठ घाला. पाण्याने हे पीठ सैलसर भिजवा. भजी चमच्याने सहज कढईमध्ये घालता आली पाहिजेत इतके पातळ पीठ भिजवा. आता मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात भजी तळली जातील इतके तेल घाला. काही सेकंदाने तेल तापेल. भजी तळण्यासाठी तेल जास्त तापावे लागते. ते पुरेसे तापले आहे की नाही याकरता अगदी थोडे भिजवलेले पीठ तेलात घाला. ते जर लगेच वर आले तर तेल पुरेसे तापले असे समजावे. आता या तापलेल्या तेलातले २ मोठे चमचे तेल हे भज्यांच्या पीठात घाला. चुर्र असा आवाज येईल. मग हे भज्यांचे मिश्रण चमच्याने एकसारखे करून घ्या. तापलेल्या तेलात चमच्याने भजी घालून तळा. ही भजी कुरकुरीत व हलकी फुलकी होतात. भजी तळून झाली की ती एका पेपर टॉवेल वर घाला म्हणजे त्यातले तेल निथळून जाईल.

एका डीशमध्ये ही भजी मधोमध ठेवा. व बाजूने गाजराचे काप, कोथिंबीरीची पाने, व चिरलेला कांदा याची चित्रात दाखवल्याप्रमाणे सजावट करा. याचप्रमाणे मेथीची भजीही करतात.

Monday, September 15, 2008

पालक भजी

जितकी पालक पाने तितकी भजी:


पालकाची निवडक पाने पाण्याने धुवून ती अलगद हाताने फडक्याने पुसून घ्या. हरबरा डाळीच्या पीठामध्ये थोडेसे तांदुळाचे पीठ घ्या. त्यात थोडे लाल तिखट, थोडी हळद, थोडी हिंग पावडर व चवीपुरते मीठ घालून पीठ जरा पातळसर भिजवा. कढईत तीव्र आचेवर तेल तापवून घ्या. तेल चांगले तापले की मध्यम आच ठेवा. पालकाची पाने एकेक करून डाळीच्या पीठामध्ये बुडवून ती तळण्यासाठी कढईत अलगद सोडा. काही वेळाने झाऱ्याने उलटा, व तांबुस रंग येईपर्यंत तळा. अशी ही हलकीफुलकी व कुरकुरीत भजी चवीला छान लागतात. पाहुणे आले की जेवणामध्ये ही भजी खूप उठून दिसतात.

Tuesday, August 26, 2008

बटाटा भजी





वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

२ बटाटे मध्यम आकाराचे
लाल तिखट १ चमचा,
धनेजीरे पूड १ चमचा, मीठ
चिरलेली कोथिंबीर मूठभर
हरबरा डाळीचे पीठ १ ते दीड वाटी
तळणीसाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन:

बटाट्याची साले काढून बटाटे धुवून घ्या. नंतर त्याचे गोल पातळ काप करा. डाळीच्या पीठामध्ये लाल तिखट, धनेजीरे पूड, चिरलेली कोथिंबीर, व चवीपुरते मीठ घालून पातळ पीठ भिजवा. पीठ खूप पातळ नको. मध्यम आचेवर कढईत पुरेसे तेल तापवून घ्या. भिजलेल्या पीठ थोडे गरम केलेल्या तेलामध्ये घाला ते फुलून वर येईल व तेलावर तरंगायला लागेल म्हणजे हे तेल भजी तळण्यासाठी पुरेसे तापलेले आहे असे समजावे. नंतर कापलेले बटाट्याचे काप एकेक करून भिजलेल्या पीठामध्ये बुडवून तेलात सोडा. काही सेकंदांनी ही भजी झाऱ्याने उलटी करा. तांबुस रंग येईपर्यंत तळा, म्हणजे पक्की तळली जातील.
यासोबत लसणीची चटणी, दाण्याची चटणी, आंब्याचे लोणचे व चिंचेचा ठेचा मस्त लागतो. गरम आमटीभाताबरोबर ही भजी छान लागतात.

बाहेर मुसळधार पाऊस पडत आहे... विजांचा गडगडाट व लखलखाट चालू आहे....तुम्ही ऑफिसमधून भिजत घरी आलेला आहात.. तुमची आवडती व्यक्ती घरी आलेली आहे... आईने चिंच गुळाची आमटी केलेली आहे.. डायनिंग टेबलवर जेवणाची सुरवात झालेली आहे.. आई गरम गरम भजी वाढत आहे... डावीकडे चटणी, लोणचे, कोशिंबीर आहे... एकीकडे गप्पांना बहर आलेला आहे... एकीकडे दूरदर्शनवर बातम्या चालू आहेत... इतक्यात लाईट जातात... पूर्णपणे अंधार... बाबा नेहमीच्या जागी ठेवलेली मेणबत्ती घेऊन ती प्रज्वलित करतात... आणि मग मेणबत्तीच्या प्रकाशात जेवणाची लज्जत अजूनच वाढते.....

Tuesday, January 16, 2007

भाज्यांची भजी

वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

कोबी, गाजर, मटार, सिमला मिरची, श्रावणघेवडा
हिरव्या तिखट मिरच्या
लिंबू अर्धे, मीठ
डाळीचे पीठ
तांदुळाचे पीठ
तळण्यासाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन: वरील सर्व भाज्या खूप बारीक चिरणे. प्रत्येक बारीक चिरलेली भाजी १ वाटी घेणे व मटारचे दाणे १ वाटी. ५-६ हिरव्या मिरच्या आधी उभ्या व नंतर आडव्या बारीक चिरणे. हे सर्व एका पातेलीमधे घालून त्यात चवीप्रमाणे लिंबू व मीठ घालणे. नंतर त्यात डाळीचे पीठ जास्त आणि तांदुळाचे पीठ थोडेसे घालून पीठ भिजवणे. हे पीठ नेहमीच्या भज्यांप्रमाणे पाणी घालुन भिजवायचे नाही. हे पीठ भिजवताना मिळून आले नाही तर थोडेसे पाणी घालायला हरकत नाही.

भिजवलेले हे पीठ मुठीत घेउन २-३ वेळा दाबून (लाडू वळतो तसे) तेलात सोडून तळावेत. लांबटगोल आकार द्यावा.

रोहिणी

पाव-भजी



वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

पावाचे स्लाइस ६
चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, हिरव्या तिखट मिरच्या ४
लाल तिखट, मीठ, हिंग, हळद
हरबरा डाळीचे पीठ १ वाटी,
तांदुळाचे पीठ ४ -५चमचे
तळायला तेल

क्रमवार मार्गदर्शन: पहिल्याप्रथम पावाच्या स्लाइसच्या सर्व कडा काढणे. नंतर त्याचे सुरीने चार तुकडे करणे. हरबरा डाळ व तांदुळाच्या पिठामधे चविप्रमाणे तिखट,मीठ व थोडीशी हळद आणि थोडासा हिंग घालणे. चिरलेली कोथिंबीर व बारीक चिरलेल्या मिरच्या घालून बटाटयाच्या भज्यांना भिजवतो तसे पिठ भिजवणे. (खूप पातळ पिठ भिजवू नये) पावाचे केलेले तुकडे पिठात भिजवून तांबुस रंग येईपर्यंत तळणे. ६ स्लाइसमधे २४ भजी होतील.

तांदुळाचे पिठ घातल्याने भजी कुरकुरीत होतात आणि कोथिंबीर व मिरच्या घातल्याने भज्यांना वरुन हिरवा रंग येतो म्हणून दिसायला छान दिसतात व चविला चांगली लागतात.

रोहिणी

सिमला भजी




वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

सिमला उर्फ ढब्बू मिरची २ (लांब आकाराच्या)
डाळीचे पीठ १ वाटी, अधपाव वाटी तांदुळाचे पीठ
लाल तिखट १ चमचा, हळद अर्धपाव चमचा, हिंग चिमुटभर, मीठ
तळणीसाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन: सिमला मिरची लांबट म्हणजेच उभी व बारीक चिरणे. डाळीच्या पीठात तांदुळाचे पीठ, लाल तिखट, हळद, हिंग व चवीपुरते मीठ घालून भजी करायला पीठ लागते (थोडे सैलसर) त्याप्रमाणे भिजवावे व त्यामधे सिमला मिरचीचे उभे चिरलेले काप घालून भजी करणे. (ज्याप्रमाणे बटाटा भजी करतो तशी) तादुंळाच्या पीठामुळे भजी कुरकुरीत होतात. खूप मस्त लागतात. उभी चिरल्यामुळे दिसायला पण छान दिसतात.


रोहिणी

Monday, September 04, 2006

साबुदाणा भजी

वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस

१ वाटी साबुदाणा
मूठभर दाण्याचे कूट
१ साल न काढलेला कच्चा बटाटा (मध्यम आकाराचा)
१ चमचा लाल तिखट
अर्धा चमचा साखर, चवीपुरते मीठ
शिंगाड्याचे पीठ ३-४ चमचे, तळणीसाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन:
१ वाटी साबुदाणा २-३ तास भिजत घालणे. नंतर त्यात कच्चा बटाटा साल न काढता किसून घालणे. तिखट, मीठ, साखर, दाण्याचे कूट व शिंगाड्याचे पीठ घालून हे मिश्रण एकसारखे करून घेणे. या मिश्रणाची लहान लहान भजी मध्यम आचेवर तेलामध्ये तांबुस रंगावर तळणे. ही भजी ओल्या नारळाच्या चटणीसोबत खायला छान लागतात. ओल्या नारळाच्या चटणीमध्ये दही मिसळले तर जास्त छान लागते.
लाल तिखटाच्या ऐवजी हिरव्या मिरच्यांची पेस्ट घातली तरी चालते.

माहितीचा स्रोत:सौ आई

अधिक टीपा:उपवासाच्या दिवशी संध्याकाळी खायला छान लागतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे साबुदाण्याच्या वड्याप्रमाणे ही अजिबात तेलकट होत नाहीत.

रोहिणी गोरे