Wednesday, January 03, 2024

मुगाच्या डाळीची आमटी

 जिन्नस :

मुगाची डाळ १ वाटी (कूकरमध्ये शिजवून घ्या. यातील शिजवलेली अर्ध्या डाळीची आमटी बनवा. अर्धी फ्रीज मध्ये ठेवा म्हणजे नंतर परत एकदा आमटी करता येईल) शिजवताना २ वाट्या पाणी घाला.
थोडे आले, २ मिरच्या, ३ ते ४ लसूण पाकळ्या (बारीक तुकडे करा अथवा मिक्सर मधून बारीक करा)
कांदा ५ ते ६ पाकळ्या (कांदा उभा आणि बारीक चिरा)
टोमॅटो अर्धा किंवा १ (मध्यम आकाराचे तुकडे करा)
फोडणीसाठी तेल (नेहमीपेक्षा थोडे जास्त घ्या)
मोहरी, जिरे, हिंग, हळद
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
चवीपुरते मीठ
आमटीला लागणारे पाणी (पातळ/घट्ट जसे हवे त्याप्रमाणात पाणी घालावे)

मार्गदर्शन : कढई मध्यम आचेवर तापत ठेवा. नंतर त्यात फोडणीसाठी तेल घाला. (५ ते ६ चमचे) नेहमी फोडणी करतो त्यापेक्षा थोडे जास्त घाला. तेल तापले की त्यात मोहरी जिरे हिंग हळद घालून फोडणी करावी. नंतर  चिरलेले आले, लसूण, कांदा, कडीपत्ता, टोमॅटो एकेक करत घाला. आच थोडी वाढवावी. फोडणी छान झाली पाहिजे. आणि हा घातलेला मसाला चांगला परतून घ्यावा म्हणजे आमटीला छान चव येते. नंतर शिजलेली मूगडाळ घालून ढवळावे व नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड व चवीपुरते मीठ घालून परत नीट ढवळावे. आता यात जरूरीपुरत पाणी घाला व परत नीट ढवळा. आमटीला छान उकळी येऊ देत. आता ही गरम व चविष्ट आमटी तयार झाली आहे. गॅस बंद करा. परत एकदा आमटी सर्व बाजूने नीट ढवळून घ्या. गरम भातावर ही आमटी घाला व साजूक तूपही घाला. थंडी मध्ये ही आमटी खूपच छान लागते. नुसती वाटी मध्ये घेऊन प्यायली तरी चालेल. त्यात थोडे साजूक तूप घालावे. चव अप्रतीम आहे. तुम्हाला हवा तसा मसाला कमी जास्त घाला. मसाला जास्त झाला तरी चालेल पण कमी नको.


 

Tuesday, January 02, 2024

कोथिंबीर वडी

 जिन्नस :

चिरलेली कोथिंबीर २ वाट्या ( चिरलेली कोथिंबीर धुवुन चाळणीत निथळत ठेवा)
हरबरा डाळीचे पीठ १ वाटी
तांदुळाचे पीठ २ चमचे
लसूण २ पाकळ्या, आलं अगदी थोडे, कडिपत्ता ४-५ पाने, मिरच्यांचे तुकडे २-४ (बिया काढून टाका)
पाणी १ वाटी
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
फोडणीसाठी तेल २ चमचे
मोहरी, जिरे, हिंग, हळद (फोडणीसाठी)
चवीपुरते मीठ

मार्गदर्शन :

डाळीचे पीठ, तांदुळाचे पीठ, लाल तिखट, धनेजीरे पूड, मीठ घालून पीठ सैलसर भिजवा. हे पीठ पातळही नको आणि घट्टही नको. पळीवाढं झाले पाहिजे. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. नंतर त्यात २ चमचे तेल घाला. तेल तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा व त्यात चिरलेलं आलं, लसूण पाकळ्या, मिरच्यांचे तुकडे, आणि चिरलेली कोथिंबीर घाला. कडीपत्याची पानाचे तुकडे करून घाला व हे मिश्रण परता. नंतर त्यात डाळीचे भिजवलेले पीठ घाला. आच मध्यम आचेवरून थोडी जास्त करा. हे सर्व मिश्रण आपण पिठलं करतो त्याप्रमाणे ढवळत रहा. आता गॅस बंद करा. ढवळताना या मिश्रणाचा गोळा होतो.  आता हा गोळा एका ताटलीत पसरवून घ्या. गोळा पसरवण्याच्या आधी ताटलीला तेल लावून घ्या. पूर्ण थंड झाल्यावर वड्या कापा व तेलात खरपूस तळा. खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत वड्या होतील.


 

Thursday, November 30, 2023

सांज्याची पोळी

जिन्नस

जाड रवा १ वाटी
चिरलेला गूळ १ वाटी
साखर अर्धी वाटी
साजूक तूप २ ते ४ चमचे
पाणी दीड वाटी
गव्हाचे पीठ २ वाट्या
थोडे मीठ
तेल १ ते २ चमचे

क्रमवार मार्गदर्शन :

मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. नंतर त्यात २ चमचे साजूक तूप आणि रवा घालून खमंग भाजा. नंतर त्यात दीड वाटी पाणी घालून झाकण ठेवा. आच मंद करा. एक दणदणीत वाफ येऊ देत. नंतर रवा नीट ढवळून घ्यावा. नंतर त्यात गूळ १ वाटी व अर्धी वाटी साखर घालून परत ढवळा. परत झाकण ठेवा. आच मंद असू देत. परत काही सेकंदाने झाकण काढून परत एकसारखे नीट ढवळा. हा आपला नेहमीचा शिरा झाला आहे. फक्त यात दुप्पट पाणी घालायचे नाहीये आणि तूपही जास्त घालायचे नाही. शिरा थंड करायला ठेवा. आता कणिक भिजवून घ्या. आपण नेहमी पोळ्यांना भिजवतो तशीच कणिक भिजवायची आहे. कणकेत थोडे मीठ व १-२ चमचे तेल घाला. कणिक सैल भिजवा. थोडे पाणी जास्त घालून मळा व नंतर त्यात तेल घालून अजून नीट मळून घ्या. पुरणपोळीला जितकी सैल कणिक लागते तितकी सैल भिजवायची नाहीये. कणिक अर्धा तास भिजली की परत एकदा नीट मळून घ्या. आता शिराही थंड झाला असेल. आता मध्यम आचेवर तवा ठेवा. पुरणपोळीसारखीच ही पोळी करायची आहे. पुरणपोळीसारखी हलक्या हाताने लाटावी लागत नाही. पिठी लावताना गव्हाचीच लावा. तव्यावर पोळी घाला व छान खरपूस भाजा. पोळी लाटताना आपण जसे कडेकडेने लाटतो तशीच ही पोळी लाटायची आहे. खूप फुगते. शिऱ्याचा गोळा करून घेताना शिऱ्यात थोडे साजूक तूप घालून मळा. गरम पोळीवर साजूक तूप घाला व गरम असतानाच खा ! या पोळ्या गारही छान लागतात. १ पोळी खाल्ली तरी पोट भरते. १ वाटीच्या शिऱ्यात ७ पोळ्या होतात.


 

Tuesday, November 28, 2023

कोबीची भाजी

 जिन्नस :

कोबी ४ ते ५ वाट्या (उभा आणि बारीक चिरा)
बटाटा १ (साले काढू नका, काचऱ्यांना चिरतो तसा पातळ चिरा)
टोमॅटोच्या फोडी ४ ते ५
लाल तिखट १ चमचा
धनेजीरे पूड १ चमचा
मीठ चवीपुरते
चिमूट भर साखर
हिरव्या मिरच्या २ (जाड तुकडे करा)
कढीपत्ता ५-६ पाने
फोडणीकरता तेल, मोहरी, जिरे, हिंग व हळद

क्रमवार मार्गदर्शन :

चिरलेला कोबी पाण्याने धुवून एका रोळीत पाणी निथळण्याकरता ठेवा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. त्यात जरूरीपुरते तेल घाला. तेल तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, बटाटा व टोमॅटो घाला व कालथ्याने परतून घ्या. नंतर त्यात चिरलेला कोबी घाला व परत सर्व मिश्रण चांगले परतून घ्या. आता गॅस बारीक करा व कढईवर झाकण ठेवा. मंद आचेवर भाजी शिजवा. काही मिनिटांनी झाकण काढा व भाजी परता. परत एकदा वाफ द्या. भाजी शिजली की त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ व साखर घालून भाजी सर्व बाजूने ढवळा व झाकण ठेवून एक वाफ द्या. ही भाजी खूप चविष्ट लागते. पोळी भाताबरोबर खा.


 

 

Wednesday, November 08, 2023

7 cup barfi

जिन्नस :

हरबरा डाळीचे पीठ
ओल्या नारळाचा खव
साजूक तूप (पातळ करून)
भाजलेले बदाम-पिस्ते-काजू पूड
दूध (गरम करून गार करा)
साखर दीड वाटी
(साखर सोडून बाकी सर्व जिन्नस अर्धी वाटी)

क्रमवार मार्गदर्शन : मंद आचेवर कढई तापत ठेवा. त्यात आधी हरबरा डाळीचे पीठ घाला व पातळ केलेले तूपही घाला आणि मिश्रण भाजायला सुरवात करा. काही सेंकंद झाले की त्यात ओल्या नारळाचा खव घालून परत भाजा. नंतर काही सेकंद झाले की त्यात सुकामेवाची (बदाम,काजू,पिस्ते) पावडर घाला व ढवळा. नंतर लगेच दूध व साखर घाला आणि सतत ढवळत रहा. आता हे मिश्रण पातळ होईल. सर्व बाजूने सारखे ढवळत रहा. मिश्रण हळूहळू एकत्र यायला लागते. अजूनही खूप ढवळत रहा व मिश्रण कढईच्या बाजूने कोरडे पडायला लागेल. ढवळताना जड लागायला लागेल. आता गॅस बंद करा. मिश्रण अजूनही एकसारखे काही सेकंद ढवळत रहा. कूकर मध्ये भात लावतो त्या डब्याला साजूक तूपाचा हात लावा व हे मिश्रण त्यात ओता. त्यावर बारीक केलेले काजूचे तुकडे सजावटीसाठी घाला व एकसारखे करा. पूर्ण गार झाल्यावर वड्या पाडा. बर्फी चवीला खूप छान झाली आहे. यावर्षीच्या दिवाळीत लक्ष्मी पूजनाला प्रसाद म्हणून छान होईल. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !


 



Friday, September 29, 2023

तळणीचे मोदक

 जिन्नस

ओल्या नारळाचा खव ३ वाट्या
साखर दीड वाटी
साजूक तूप अर्धा चमचा
दूध (ओला नारळाचा खव भिजेल इतपत)
कणिक १ वाटी
मैदा १ वाटी
२-३ चमचे मोहन (कडकडीत गरम तेल)
चिमूटभर मीठ

क्रमवार मार्गदर्शन : मंद आचेवर कढई ठेवा. त्यात साजूक तूप, दूध, नारळाचा खव व साखर घाला व सारण एकजीव करा. आता आच मध्यम करा आणि सारण एकसारखे ढवळत रहा. सारख वितळून ओल्या नारळात एकजीव झाली की सारण तयार होते. गॅस बंद करा. आता एका परातीत कणिक मैदा घ्या. त्यात थोडे मीठ टाका व कडकडीत तेलाचे मोहन घाला आणि पीठ भिजवा. पीठ भिजवायला पाणी थोडे लागते. पुरी करताना खूपच घट्ट कणिक भिजवायला लागते. कणिक घट्ट भिजवा पण खूप घट्ट नको. भिजवल्यावर हातात थोडे तेल घेऊन कणिक मळा.


अर्ध्या तासाने मोदक करायला सुरवात करा. भिजवलेल्या पिठाची बारीक गोळी करून खूप पातळ पुरी लाटा. त्यात सारण भरा आणि उकडीच्या मोदकासारख्याच सर्व बाजूने कळ्या पाडा आणि मोदक वळा. एकेक मोदक करून झाला की तो ओल्या फडक्यात ठेवा म्हणजे वाळणार नाहीत. आता मध्यम आचेवर कढई ठेऊन त्यात मोदक तळण्यासाठी तेल घाला. तेल व्यवस्थित तापू दे. तेल तापले आहे की नाही ते बघण्यासाठी त्यात पिठाचा छोटा कण घाला. तो लगेच वर आला की तेल तापले असे समजावे. आता आच परत मंद करा व सर्व मोदक तळून घ्या. त्यात एक करंजी पण तळा. वरील दिलेल्या साहित्यात ११ मोदक आणि एक करंजी होते. मोदक खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. बाप्पाला नैवेद्य दाखवा.


 

Wednesday, April 26, 2023

कोथिंबिरीची भजी

 जिन्नस:

चिरलेली कोथिंबीर २ वाट्या
हरबरा डाळीचे पीठ पाव ते अर्धी वाटी
पाव चमचा लाल तिखट
पाव चमचा धनेजिरे पूड
चिमूटभर हळद,
चवीपुरते मीठ
तेल अर्धा चमचा (गार किंवा गरम केलेले)
तळणीसाठी तेल

मार्गदर्शन : चिरलेली कोथिंबीर चाळणीत घालून धुवून घ्या. पाणी निथळण्यासाठी चाळणीखाली एक ताटली ठेवा. पाणी पुर्णपणे निथळायला हवे. नंतर ही चिरलेली कोथिंबीर एका भांड्यात काढून घ्या. त्यात  डाळीचे पीठ, चिमूटभर हळद, लाल तिखट, धनेजिरे पूड व चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण कालवा. नंतर अगदी थोडे पाणी घालून परत कालवा. हे मिश्रण थोडे सैलसर झाले पाहिजे. पातळ नको आणि घट्ट तर नकोच. नंतर यात अर्धा चमचा तेल (गार किंवा गरम) घाला. परत एकदा चमच्याने मिश्रण ढवळा. आता कढईत तेल तापत ठेवा. तेल पुरेसे तापले की त्यात चमच्याने एकेक करत भजी सोडा. आच मध्यम ठेवा. लालसर रंग येईपर्यंत भजी तळा व नंतर झाऱ्याने टिश्यु पेपर वर काढून घ्या म्हणजे तेल झिरपेल.

ही भजी खाताना कोथिंबिरीचा उग्रपणा चवीत आला पाहिजे म्हणूनच डाळीचे पीठ जास्त घालायचे नाही. याचप्रमाणे मेथीची व पालकाची भजी करा. मस्त लागतात. पालक-मेथी-कोथिंबीर याची चव भजी खाताना लागली पाहिजे.