Showing posts with label पोह्याचे पदार्थ. Show all posts
Showing posts with label पोह्याचे पदार्थ. Show all posts

Wednesday, October 01, 2025

चविष्ट दडपे पोहे

जिन्नस :
पातळ पोहे ३ मुठी
चिरलेला कांदा मूठभर
चिरलेला अर्था टोमॅटो
साखर अर्था चमचा
लिंबू पिळून २/३ चमचे
मीठ चवीनुसार
फोडणी साठी तेल, मोहोरी, जिरे, हिंग, हळद
कच्चे दाणे मूठभर
चिरलेली कोथिंबीर २/३ चमचे
खवलेला ओला नारळ २/३ चमचे
लाल तिखट १ चमचा
क्डीपत्ता ५-६ पाने

क्रमवार मार्गदर्शन : सर्वात आधी पोहे चाळून एका वाडग्यात घ्या. पोह्यांवर लाल तिखट, मीठ, व साखर पेरा. सगळीकडे एकसारखी घाला. नंतर एका कढल्यात तेल तापत ठेवा. ते तापले की त्यात कच्चे दाणे तळून वाडग्यातील पोह्यात घाला. ते पण असेच सगळीकडे पसरून घाला. नंतर उरलेल्या तेलात कडीपत्ता घाला व तो तडतडला की तो पोह्यात घाला. आता फोडणीकरता तेल घालून त्यात मोहरी जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा व ही फोडणी पोह्यात घाला. सगळीकडे पसरून घाला व लगेचच डावेने पोहे एकसारखे करा. चिवडा करतो तसेच हे पोहे करायचे आहेत. असा चिवडा तयार झाला की खमंग वास दरवळतो. नंतर त्यात चिरलेली कोथिंबीर , कांदा व टोमॅटो घालून खवलेला नारळही घाला. लिंबाचा रस घाला. आता डावेनेच एकसारखे पोहे ढवळा. असे हे दडपे पोहे केले. नेहमीचे दडपे पोहे खाऊन कंटाळा आला होता. त्यामुळे उलट्या क्रमाने रेसिपी केली. म्हणजे सर्व जिन्नस आधी घालून मग आपण फोडणी घालतो व नंतर तिखट मीठ घालतो. तसे न करता आधी तिखट,मीठ, साखर वगैरे घालून नंतर बाकीचे जिन्नस घातले.  टोमॅटोने पोहे ओलसर झाले व चविला अप्रतीम लागले. चिवडा व भेळेची एकत्र चव आली होती.

माहितीचा स्त्रोत : अर्चना जहागिरदार/कुलकर्णी. डोंबिवलीत हिच्याकडे गेलो तेव्हा तिने असे दडपे पोहे केले होते. मी माझा अंदाज लावून पोहे बनवले आहेत.

Tuesday, July 22, 2008

तेलतिखटमीठपोहे


पातळ पोहे २ मुठी चाळून निवडून घ्या. त्यात अर्धी मूठ भाजलेले शेंगदाणे, मूठभर बारीक चिरलेला कांदा, अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट, चवीपुरते मीठ, ५-६ चमचे कच्चे तेल, पाव चमच्याहून कमी साखर घालून हाताने कालवून घ्या. चमचमीत पोहे तय्यार!!

Saturday, July 19, 2008

सजलेले पोहे






वाढणी:२ जण



पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे



पाककृतीचे जिन्नस:



जाड पोहे अडीच वाट्या, चिरलेला कांदा १ वाटी
बटाट्याचे त्रिकोणी पातळ काप अर्धी वाटी
भाजलेले दाणे अर्धी वाटी, मटार अर्धी वाटी,
चिरलेली कोथिंबीर व ओला नारळ पाउण वाटी
साखर, मीठ, तेल अर्धी वाटी, अर्धा चमचा लाल तिखट
मोहरी, हिंग, हळद, हिरव्या मिरच्या १-२



क्रमवार मार्गदर्शन:




सर्वात आधी पोहे चाळून व निवडून पाण्याने धुवून घ्या व ते पाणी निथळण्यासाठी रोळीमध्ये ठेवा. कढईत तेल मध्यम आचेवर तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी, हिंग, व हळद घालून फोडणी करा. नंतर लगेच लाल तिखट घालून बाकीचे सर्व जिन्नस (कांदा, बटाटा, मटार, मिरच्यांचे तुकडे) घालून परता. नंतर त्यावर झाकण ठेवा व १-२ मिनिटांनी झाकण काढून परत ढवळा. असे १-२ वेळा करा म्हणजे कांदा बटाटा वगैरे सर्व नीट शिजेल. शिजले की त्यात कोथिंबीर व ओला नारळ घालून परत परता व गॅस बारीक करा. नंतर त्यात भिजवून ठेवलेले पोहे घालून चांगले ढवळा. नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ व अर्धा चमचा साखर घालून परत चांगले ढवळा. आता परत त्यावर झाकण ठेवा १-२ मिनिटे म्हणजे पोहे पण वाफेवर शिजतील. नंतर झाकण काढून परत एकदा ढवळा. आणि गरम गरम डीश मध्ये खायला द्या.


Friday, May 25, 2007

पातळ पोह्यांचा चिवडा



वाढणी:२ जण (८-१० दिवस पूरेल इतका)

पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे


पाककृतीचे जिन्नस:
पातळ पोहे १० वाट्या
डाळं १ वाटी,
भाजलेले शेंगदाणे १ वाटी
गोटा खोबऱ्याच्या खूप पातळ चकत्या १ वाटी
हिरव्या मिरच्या ४-५, कढिपत्ता १०-१५ पाने
धनेजीरे पावडर १ चमचा, लाल तिखट १ चमचा, पिठीसाखर २ चमचे
मीठ चवीनुसार, तेल १ वाटी, मोहरी,हिंग,जिरे, हळद फोडणीसाठी


क्रमवार मार्गदर्शन: सर्वात आधी चाळणीने पोहे चाळून ते निवडून घेणे. नंतर मध्यम आचेवर कढई ठेवून ती तापली की त्यात साधारण अर्धी कढई मावतील इतके पोहे घालून सतत ढवळणे. ढवळल्यावर काही वेळाने पोहे दुमडले जातील आणि कुरकुरीत होतील. पोहे कुरकुरीत झाले की नाही हे बघण्याकरता हाताने मोडून बघावेत. त्याचा चुरा झाला की पोहे कुरकुरीत झाले असे समजावे. अशा रितीने सर्व पोहे कुरकुरीत भाजून घेणे. भाजलेले पोहे एका परातीत ठेवणे.



पोहे भाजून झाल्यावर मोठ्या कढईत एक वाटी तेल घालून त्यात नेहमी फोडणी करतो त्यापेक्षा जास्त मोहरी, जिरे, हिंग हळद व अर्धा चमचा तिखट घालून लगेच त्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून परतणे. हिरव्या मिरच्यांच्या रंग बदलला की लगेच दाणे घालणे व परतणे. दाण्याचा रंग बदलला(थोडा तांबुस झाला की) की डाळं घालणे व परतणे. डाळ्याचा रंग बदलला (तांबुस) की कढिपत्ता घालून परतणे. कढिपत्त्याचा रंग बदलला की सर्वात शेवटी अतिशय पातळ केलेल्या गोटा खोबऱ्याच्या चकत्या घालून परत परतणे. खोबऱ्याचा काळपट चॉकलेटी रंग झाला की मग त्यात भाजलेले सर्व पोहे घालून पटापट ढवळणे. नंतर गॅस थोडा बारीक करून त्यात अर्धा चमचा लाल तिखट, धनेजीरे पूड, साखर व चवीनुसार मीठ घालून पटापट ढवळणे. पटापट ढवळणे अशासाठी की फोडणी गरम असताना सर्व पोह्यांना समान तेल-तिखट-मीठ लागते. नंतर चिवड्याची चव बघून जे काय कमी असेल त्याप्रमाणे ते घालून (तिखट, मीठ) लगेच पटापट ढवळणे. नंतर गॅस बंद करून ५ -१० मिनिटांनी परत एकदा ढवळून त्यावर वर्तमान पत्राचा कागद झाकण म्हणून कलता ठेवणे. चिवडा एकदम गार झाला की डब्यात भरून घट्ट झाकण लावणे. जी वाटी पोहे घेण्याकरता वापरली तीच वाटी इतर साहित्य घेण्यासाठी वापरणे.

ह्याच पद्धतीने ५-१० किलोचा चिवडा पण करता येतो. पोहे भाजण्याची पद्धत हीच. पोहे बऱ्याच प्रमाणात असल्यामुळे ते भाजल्यावर वर्तमानपत्रावर काढून ठेवणे. नंतर फोडणी न करता दाणे, डाळं ..... इत्यादी तेलात हिंग व हळद घालून वेगवेगळे परतून त्या पसरलेल्या पोह्यांवर ओतणे व लगेच ढवळणे. म्हणजे एकदा फक्त दाणे, एकदा मिरच्या, एकदा खोबरे असे क्रमाक्रमाने. पोहे ढवळताना थोडे मीठ व साखर पण घालणे. हे सर्व झाले की मोठ्या कढईत वेगळी तेलाची फोडणी (मोहरी, हिंग, जीरे, लाल तिखट ) करून त्या कढईत मावतील इतके पोह्यांचे तयार झालेले मिश्रण घालून मीठ, साखर, धनेजीरे घालून ढवळणे. ह्याप्रमाणे थोडा थोडा करून तयार झालेला चिवडा परत दुसऱ्या वर्तमानपत्रावर ओतून चव बघणे. जे कमी असेल ते (फोडणी सुद्धा कमी वाटली तरी ती सुद्धा ) त्याप्रमाणे सर्व घालून परत ढवळणे. या पद्धतीने लग्नकार्यात येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांसाठी घरी केलेला चिवडा व (लाडूही) भरपूर प्रमाणात व चांगल्या चवीचा करता येतो.


रोहिणी
माहितीचा स्रोत:सौ आई

Monday, January 15, 2007

जाड पोह्यांचा चिवडा
















वाढणी:१ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

जाड पोहे ३ मूठी
भाजलेले शेंगदाणे १ मूठ
लाल तिखट अर्धा चमचा, हळद अर्धपाव चमचा
मीठ, तेल, चिमूटभर साखर, चिमूटभर हिंग


क्रमवार मार्गदर्शन: प्रथम पोहे चाळून घेणे. नंतर कढईत तीव्र आचेवर तेल तापले की मग गॅस बारीक करून पोहे तळून घेणे. हे पोहे चांगले फुलून येतात. पोहे कढईतून काढताना झाऱ्याने व्यवस्थित निथळून घेणे. हे पोहे तेल खूप पितात म्हणून तळून झालेले व झाऱ्याने पूर्णपणे निथळलेले पोहे पेपरटॉवेलवर पसरून ठेवणे, म्हणजे सर्व तेल कागदाला शोषले जाईल. नंतर हे पोहे एका पातेल्यात घालून त्यात तिखट, हळद, हिंग, साखर, भाजलेले शेंगदाणे (साले काढून) व चवीनुसार मीठ घालून चमच्याने एकसारखे करणे.

हा चिवडा करायला सोपा आहे. कुरकुरीत व चविष्ट लागतो.

माहितीचा स्रोत:सिंपल डिंपलची आई

अधिक टीपा:कार्यालयातून आल्यावर गरमागरम चहा बरोबर हा चिवडा खाल्ला तर रात्रीचा स्वयंपाक करण्यास उत्साह येतो.


» you can't post comments
प्रे. प्रशासक (शुक्र, ०८/०९/२००६ - १६:५८) हार्दिक अभिनंदन
ह्या पाककृतीबरोबर रोहिणी ह्यांनी मनोगतावर ५० पाककृती लिहून पूर्ण केल्याचे कळते.
हार्दिक अभिनंदन!

Wednesday, September 13, 2006

रंगीत पोहे


वाढणी:दोन जणांना


पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस

पोहे जाड ३ वाट्या
कांदा , सिमला मिरची , बटाटे, टोमॅटो, गाजर , मटार, हिरव्या मिरच्या ४-५,
खवलेला ओला नारळ व चिरलेली कोथिंबीर
तेल,मोहरी,जिरे,हिंग,हळद
मीठ, साखर

क्रमवार मार्गदर्शन: सर्वात आधी पोहे रोळीमधे घुवून ठेवा. नंतर सिमला मिरची, कांदा, गाजर,बटाटे, मिरच्या,  हे सर्व उभे चिरा. प्रमाण प्रत्येकी पाव ते अर्धा तुकडा. हे सर्व उभे आणी खूप बारीक चिरणे महत्वाचे आहे. नंतर तेलाची फ़ोड्णी करुन त्यामधे उभे चिरलेले वरील सर्व जिन्नस आणि मटार व चिरलेला टोमॅटो घालून एक- दोन वाफ़ा आणा.  नंतर त्यामधे पोहे घालून  त्यात चवीप्रमाणे मीठ, व थोडी साखर घालून सर्व एकसारखे परता. व एक दोन वाफा आणा.

खायला देताना त्यावर कोथिंबीर , ओला नारळ , आणि थोडे लिंबू पिळून खावयास द्या.
भाज्या घातल्याने पोहे रंगीबेरंगी दिसतात.

दडपे पोहे













वाढणी:२ जणांना


पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे


पाककृतीचे जिन्नस


पातळ पोहे ३ वाट्या
कांदा लहान १, तिखट हिरव्या मिरच्या ५,६
कोथिंबीर, खवलेला ओला नारळ, लिंबू,
नारळाचे पाणी
शेंगदाणे


क्रमवार मार्गदर्शन:पातळ पोह्यांवर नारळाचे पाणी आणि लिंबू पिळून हातानेच थोडे कालवून त्यावर झाकण ठेवणे. नंतर त्यामधे कांदा, कोथिंबीर बारीक चिरुन घालणे,नंतर वरुन तेलाची फ़ोडणी घालून पोहे ढवळणे. फोडणीत बारीक मिरच्या चिरुन व शेंगदाणे घालणे.

हे पोहे पातेल्यात परतून करत नाहीत. ह्या पोह्यांना पातळ पोहेच वापरायचे असतात. बाजारात पातळ पोहे आणि जाड पोहे असे दोन प्रकारचे पोहे मिळतात. जाड पोहे रंगीत पोह्यांना वापरतात.

रोहिणी गोरे