Showing posts with label पाककृती स्पर्धा उपविजेते पदार्थ. Show all posts
Showing posts with label पाककृती स्पर्धा उपविजेते पदार्थ. Show all posts

Friday, April 17, 2009

भरली तोंडली


वाढणी : २ जण



जिन्नस :




तोंडली २० ते २२ नग
ओल्या नारळाचा खव अर्धी वाटी
दाण्याचे कूट अर्धी वाटी
तीळ कूट पाव वाटीच्या कमी
लाल तिखट १ चमचा
धनेजीरे पूड १ चमचा
गरम मसाला १ चमचा
गूळ चिरून 5-6 चमचे
मीठ
चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, हळद


क्रमवार मार्गदर्शन : तोंडली पाण्याने धूवून ती रोवळीत पाणी निथळण्यासाठी ठेवा. पाणी निथळले की कोरड्या फडक्याने पुसून घ्या. प्रत्येक तोंडल्याची देठे काढा दोन्ही बाजुने. नंतर दोन्ही बाजूने अगदी थोडे चिरा मसाला भरण्यासाठी. नारळाचा खव, दाणे व तीळाचे कूट, लाल तिखट, गरम मसाला, धनेजीरे पूड, गूळ, चवीपुरते मीठ व चिरलेली कोथिंबीर हे सर्व एकत्र करून मसाला तयार करून घ्या. मसाल्याची चव बघा. काही कमी जास्त हवे असल्यात ते जिन्नस घाला. नंतर प्रत्येक तोंडल्यामध्ये मसाला भरून घ्या चित्रात दाखवल्याप्रमाणे. मसाला पूर्ण भरून झाला आणि तरीही थोडा उरला तर तो उरलेला मसाला वाटीत भरून ठेवा.



मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात फोडणीसाठी तेल घाला. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा व लगेच त्यात मसाला भरलेली तोंडली घालून थोडी ढवळून घ्या. आच मध्यम असुदेत. त्यावर झाकण ठेवा. वाफेवर ही तोंडली शिजतील. काही सेकंदांनी झाकण काढा व त्यात थोडे पाणी घाला. परत झाकण ठेवा. व परत ते काढून परत पाणी घाला. उरलेला मसालाही त्यात घाला. मसाला उरला नसेल आणि कमी वाटत असेल तर नंतर हवा तसा मसाला वरूनही घालता येतो. वाफेवर तोंडली शिजली की गॅस बंद करा. तोंडली शिजली की त्याचा रंग बदलेल. आणि शिवाय डावेने टोचूनही बघा. तोंडली सहज तुटली की ती शिजली असे समजावे. पाणी पण ज्याप्रमांणे रस हवा असेल त्याप्रमाणात घालावे.



ही भरली तोंडली खूपच चविष्ट लागतात. पूर्वी लग्नकार्यामधे मुंबईत ही भरली तोंडली खाल्ली आहेत. बऱ्याच प्रमाणात करायची असेल तर तोंडली आधी कूकर मध्ये शिजवून घ्यावीत. ती खूप गार झाली की मग त्यामध्ये मसाला भरावा. पोळीभाताबरोबर छान लागतात. नुसती वाटीत घेऊन खायला पण मस्त लागतात.

Tuesday, November 18, 2008

सुरळीची वडी




जिन्नस:

हरबरा डाळीचे पीठ १ वाटी
पाऊण वाटी आंबट ताक,
सव्वा वाटी पाणी
१ चमचा मैदा
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या (कमी तिखट असलेल्या)
बारीक चिरलेली कोथिंबीर
नारळाचा खव
किंचित लाल तिखट व हळद, चवीपुरते मीठ
किंचित साखर
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद



मार्गदर्शन:



वाटीभर तेलाची फोडणी करून घ्या. बारीक चिरलेल्या मिरच्या , कोथिंबीर आणि नारळाचा खव 3-4 वाट्या करा. त्यात चवीपुरते थोडे मीठ व थोडी साखर घाला.



डाळीचे पीठ, आंबट ताक, मैदा व पाणी एकत्र करून हाताने कालवावे. त्यात अगदी थोडे तिखट, हळद व चवीपुरते मीठ घाला. पीठ कालवताना पीठाच्या छोट्या गुठळ्या होतात त्या हाताने पूर्णपणे मोडून काढा. नंतर हे एकसंध झालेले मिश्रण एका कढईत घालून गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. कालथ्याने हे मिश्रण सतत ढवळावे लागते. काही वेळाने हे मिश्रण शिजेल. शिजल्यावर त्यावर एक झाकण ठेवा व आच मंद करा. २-३ मिनिटांनी झाकण काढून परत सर्व मिश्रण एकसारखे करा. आता हे मिश्रण पूर्णपणे शिजलेले असेल. गॅस मंद ठेवा.



2 मध्यम आकाराची स्टीलची ताटे उपडी करा व त्यावर प्रत्येकी थोडे मिश्रण घाला. एकावेळी एका ताटावर थोडेसे मिश्रण घालून त्यावर थोडे तेल लावलेला प्लॅस्टीकचा पसरट कागद ठेवून अगदी हलक्या हाताने लाटण्याने लाटा. सर्वबाजूने एकसारखे पातळ लाटा. याप्रमाणे 2 - 3 ताटे करून घ्या. मिश्रण गरम असतानाच लाटले जाते म्हणून एका वेळी एक ताट. तोवर बाकीचे मिश्रण कढईतच ठेवा मंद आच करून.


आता सुरीने उभे कापून वड्या पाडाव्या. नंतर त्यावर मिरच्या कोथिंबीर व नारळाचा खव सर्व बाजूने घाला. शिवाय तयार केलेली फोडणीही घाला. प्रत्येक पट्टी अलगद हाताने गुंडाळी करून एक गोल वळकटी करा. वळकटीसारख्या गोल केलेल्या वड्या म्हणजेच सुरळीच्या वड्या.

त्यावर परत थोडी फोडणी व खवलेल्या ओल्या  नारळाचे  तयार केलेले सारणही घाला. 


Tuesday, October 07, 2008

सँडविच




जिन्नस:


मटार, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची, बटाटा, कांदा, टोमॅटो,
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद,
लाल तिखट, धनेजीरे पूड, पावभाजी मसाला, मीठ, लिंबू
स्लाईस ब्रेड
बटर अथवा साजूक तूप

वाढणी : ज्या प्रमाणात हवे असेल त्या प्रमाणात.


क्रमवार मार्गदर्शन :


जाड चिरलेला फ्लॉवर, कोबी व सिमला मिरची, मटार, बटाटा कूकरमध्ये शिजवून घ्या. नंतर ते चाळणीमध्ये घालून ठेवा म्हणजे त्यातले पाणी निथळून जाईल. कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्या.
मध्यम आचेवर कढईमध्ये थोडे तेल तापवून घ्या व नेहमीसारखी फोडणी करा. त्यात बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घालून परता. गॅस बारीक करून अधून मधून परतत राहा खमंग होईपर्यंत. मग त्यात उकडलेल्या भाज्या डावेने घोटून घेऊन घाला व ढवळा. नंतर त्यात लाल तिखट, धनेजीरे पूड, पावभाजी मसाला घाला. चवीप्रमाणे मीठ घालून चांगले ढवळून घ्या. नंतर त्यावर चवीप्रमाणे लिंबू पिळून परत एकदा एकसारखे ढवळून घ्या.


भाजी गार झाली की ब्रेडच्या स्लाईसच्या कडा काढून घ्या. ब्रेडच्या एका स्लाईसला बटर अथवा साजूक तूप लावा व एका स्लाईसवर मसालेदार भाजी पसरवून घ्या. दोन्ही स्लाईस एककेकांवर ठेवून सँडविच टोस्टर मध्ये भाजून घ्या.


थोडक्यात पावभाजी साठी जी भाजी करतो तशीच करायची आहे.


टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम असतानाच खा!

Monday, January 15, 2007

पोळी


वाढणी:१ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

कणीक १ वाटी (मध्यम)
मीठ चिमुटभर
तेल २ चमचे
पाणी
१ मध्यम वाटी कणकेच्या ४ पोळ्या होतात

क्रमवार मार्गदर्शन:

कणीक भिजवणे

कणिक भिजवताना त्यात थोडे चविपुरते मीठ व तेल घालावे. थोडे थोडे पाणी घालुन कणिक भिजवावी, सैल अथवा घट्ट नसावी. थोडे तेल घालुन कणिक खूप मळावी, म्हणजे एकसारखी भिजेल. भिजल्यावर १५ मिनिटांनी पोळ्या कराव्या.


पोळी लाटणे

पोळी लाटताना परत थोडी कणिक मळुन घेणे. कणकेचा मध्यम आकाराचा गोळा घेउन तो गव्हाच्या पिठात बुडवुन लाटावा, थोडासा लाटुन त्यावर तेल लावुन त्रिकोणी अथवा गोल घडी करावी. परत गव्हाचे पीठ लावून ती गोल अथवा त्रिकोणी पोळी लाटावी. लाटताना पिठाचा वापर जास्त करावा म्हणजे पोळी पोळपाटाला कधिही चिकटत नाही. पोळी कडेकडेनी लाटावी, म्हणजे लाटण्याचा दाब पोळीच्या सर्व कडेच्या बाजुंवर एकसारखा पडला पाहिजे. लाटण्याचा दाब पोळीच्या मध्यभागी जास्त झाला तर मध्यभागी पोळी पातळ व बाजुने जाड होईल, त्यामुळे भाजताना पोळी मध्यभागी जास्त भाजली जाइल व कडा जाड राहिल्याने कच्या रहातील.


पोळी भाजणे


पहिली पोळी लाटायच्या आधी गॅसवर मध्यम आचेवर तवा ठेवावा,म्हणजे पोळी लाटेपर्यंत तवा चांगला तापेल. तवा नेहमी मध्यम आचेवर ठेवावा. कमी आचेवर तापलेल्या तव्यावर पोळी भाजली तर कडक होईल, जास्त आचेवर भाजली तर कच्ची राहील. पोळी भाजताना कमितकमी वेळा उलटावी. पोळी भाजताना जेथुन वाफ बाहेर येत असेल तेथे वाटीने दाबुन ठेवावी म्हणजे दुसरीकडून पोळी फुगते. असे केल्याने पोळी सर्व बाजुने भाजली जाते, फुगते. पोळी तव्यावरुन खाली काढल्यावर ती पोलपाटावर आपटावी, म्हणजे चक्क मोडावी, म्हणजे आतील वाफ निघुन जाते व पोळी कडक होत नाही. नंतर पोळीला २ ते ३ थेंब तेल लावून पोळीच्या डब्यात ठेवणे.

कणिक भिजवल्यापासुन भाजेपर्यंत सर्व काळजी घेतली तर पोळ्या चांगल्या होणारच.

टीपः पोळ्या जास्तीत जास्त आपल्याकडून लाटल्या गेल्या की आपोआपच जास्तीत जास्त चांगली पोळी होण्याचे कौशल्य प्राप्त होते, आणि म्हणूनच रोज दुपारी जेवायला पोळी भाजी हा मेनू असावा.

रोहिणी

Thursday, October 26, 2006

रंगीत सांजा




वाढणी:२ जणांना


पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस

रवा १ वाटी (बारीक अथवा जाड)
टोमॅटो १, अर्धे गाजर, अदपाव वाटी मटार, अर्धा कांदा
१ लहान बटाटा, अर्धी सिमला मिरची, ४-५ श्रावणघेवडा शेंगा
अदपाव भाजलेले दाणे, २ मिरच्या, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
खवलेला ओला नारळ १ वाटी, अर्धे लिंबू, अर्धा चमचा लाल तिखट,
तेल, मोहरी, हिंग, हळद, जिरे, मीठ, साखर, बारीक शेव


क्रमवार मार्गदर्शन:

सर्वात आधी मध्यम आचेवर रवा किंचीत तांबुस रंग येईपर्यंत भाजून घ्या. . फोडणीमध्ये हिरव्या मिरच्या, लाल तिखट व वरील सर्व भाज्या बारीक चिरून घाला व परतून घ्या. १-२ वाफा देवून शिजवा.  नंतर त्यात २ वाट्या पाणी घालून व लिंबू पिळून, चवीनुसार मीठ व थोडीशी साखर घालून कालथ्याने ढवळून एक उकळी
आणा. उकळी आली की त्यात भाजलेला रवा घालून पटापट कालथ्याने ढवळा. गुठळी होऊन न देणे. नंतर त्यावर झाकण ठेवून १-२ वेळा दणदणीत वाफ आणून परत कालथ्याने  ढवळा. सांजा मोकळा झाला पाहिजे.


वर दिलेल्या सर्व भाज्या बारीक चिरून (बटाटा, कांदा, मटार, श्रावणघेवडा उर्फ बीन्स, सिमला मिरची, गाजर, टोमॅटो ) साधारण २-३ वाट्या होतात.



अधिक टीपा:हा रंगीत सांजा खाताना त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर , खवलेला ओला नारळ व बारीक शेव घालून खा. सर्व भाज्या घातल्याने हिरवा, पिवळा, पांढरा, लाल रंग येतो. शिवाय त्यावर कोथिंबीर,ओला नारळ व शेव घातल्याने खायलाही मजा येते.