Showing posts with label साबुदाण्याचे पदार्थ. Show all posts
Showing posts with label साबुदाण्याचे पदार्थ. Show all posts
Friday, May 24, 2013
फोडणीची साबुदाणा खिचडी
जिन्नस :
भिजलेला साबुदाणा अर्धी वाटी
दाण्याचे कूट मूठभर
दाणे २-३ चमचे
मटार मूठभर
पाव कांदा चिरलेला
एक छोटा बटाटा (काचऱ्या चिरतो त्याप्रमाणे चिरा)
हिरवी मिरचीचे तुकडे २ते ३
लाल तिखट पाव चमचा
मूठभर चिरलेली कोथिंबीर
फोडणीकरता तेल
मोहरी,जिरे, हिंग, हळद
मीठ चवीपुरते
साखर पाव चमचा
भिजलेला साबुदाणा हाताने ढवळून एकसारखा करून घ्या. त्यात लाल तिखट, मीठ, साखर व दाण्याचे कूट घालून परत एकदा साबुदाणा एकसारखा ढवळून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा. (हळद रंग येण्यापुरती अगदी थोडीच घालावी) नंतर त्यात मिरचीचे तुकडे, चिरलेला कांदा व बटाटा घाला. मटारही घाला. हे सर्व मिश्रण परतून घ्या. नंतर त्यात अगदी थोडे मीठ घाला व झाकण ठेवा. फोडणीत घातलेले सर्व जिन्नस शिजले की त्यात साबुदाणा घाला. या साबुदाण्यात आपण आधीच दाण्याचे कूट, मीठ, साखर व लाल तिखट मिक्स करून ठेवले आहे. साबुदाणा घातला की परत एकसारखे ढवळून घ्या. नंतर झाकण ठेवून एक वाफ द्या. काही सेकंदाने झाकण काढा व परत ढवळा. आता थोडी चिरलेली कोथिंबीर घालून एकसारखे करून घ्या. आता गॅस बंद करा. गरमागरम खिचडी खा. आवडत असल्यास थोडे लिंबू पिळा. या खिचडीची चव थोडी वेगळी लागते. मला ही चव आवडली. करून पहा. तुम्हालाही आवडेल.
Friday, June 29, 2012
चिकवड्या
जिन्नस :
अर्धी वाटी साबुदाणा
४ वाट्या पाणी
चवीपुरते मीठ
क्रमवार मार्गदर्शन : अर्धी वाटी साबुदाणा रात्री भिजवून ठेवा. साबुदाणा खिचडीला जसा साबुदाणा भिजवतो तसा भिजवा. त्यात थोडे पाणी राहू द्या. सकाळी भिजलेला साबुदाणा हाताने मोकळा करून घ्या. मध्यम आचेवर पातेले ठेवा व त्यात ४ वाट्या पाणी व मीठ घाला. नंतर त्यात मोकळा केलेला साबुदाणा घाला व हे मिश्रण शिजवा. शिजवताना डावेने हे मिश्रण ढवळत राहा म्हणजे पातेल्याला खाली लागणार नाही. पळीवाढे इतपत मिश्रण आटले की गॅस बंद करा. साबुदाणा शिजला की त्याचा पांढरा रंग जाईल म्हणजे मिश्रण झाले असे समजावे. नंतर प्लस्टीकच्या कागदावर चिकवड्या घाला. चिकवड्या घालताना जवळ जवळ घाला म्हणजे बऱ्याच चिकवड्या कागदावर मावतील. चिकवड्या चमच्याने घाला. चमच्याने मिश्रण कागदावर घातले की थोड्या गोल आकार देवून पसरवा. चिकवड्या जास्त पातळ नको व जाडही नकोत. चिकवड्यांना वाळवण्यासाठी खूप कडक उन लागते. २-३ तास कडक उन्हात चिकवड्या वाळल्या की हलक्या हाताने त्यांना उलटवा व दुसऱ्या बाजूने परत २-३ तास उन दाखवा. म्हणजे दोन्ही बाजूने चिकवड्या पूर्णपणे वाळतील. नंतर चिकवड्या एका पातेल्यात घाला व दुसऱ्या दिवशी परत उन्हात ठेवा. चिकवड्या चांगल्या कडकडीत वाळल्या पाहिजेत म्हणजे छान फुलतात. नंतर गरम तेलात चिकवड्या तळून भाजक्या शेंगदाण्याबरोबर खा. खूप छान लागतात. उपवसाला या चिकवड्या चालतात. अर्धी वाटी साबुदाण्यात छोट्या चिकवड्या ६० ते ६५ होतात.
Labels:
उन्हाळी पदार्थ,
उपवासाचे पदार्थ,
साबुदाण्याचे पदार्थ
Wednesday, March 28, 2012
साबुदाणा वडा

वाढणी:२ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
साबुदाणा १ वाटी
बटाटा १, अर्धे छोटे लिंबू
बारीक वाटलेल्या हिरव्या तिखट मिरच्या ५-६ किंवा दीड ते २ चमचे लाल तिखट
पाव वाटी चिरलेली कोथिंबीर
दाण्याचे कूट पाव ते अर्धी वाटी
चवीपुरते मीठ,
१ चमचा साखर
तळणीसाठी तेल,
क्रमवार मार्गदर्शन: १ वाटी साबुदाणा ४ तास भिजत घालावा. भिजवताना पाणी निथळून घ्यावे. ४ तासानंतर भिजलेला साबुदाणा मोकळा करून घ्यावा. त्यात कच्चा बटाटा साल न काढता किसून घाला. नंतर त्यात वाटलेल्या मिरच्या किंवा लाल तिखट, मीठ व साखर घाला. नंतर त्यात दाण्याचे कूट घालून लिंबू पिळा व चिरलेली कोथिंबीर घाला. हे मिश्रण हाताने नीट कालवा. कालवताना थोडे पाणी घाला. मिश्रण मिळून येण्यापुरतेच पाणी घालावे.
आता मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात तेल घाला व साबुदाण्याचे मिश्रण बनवले आहे त्याचे गोल आकाराचे वडे लालसर रंगावर तळून घ्या. वडे तळल्यावर ते पेपर टॉवेल वर ठेवा म्हणजे त्यातले तेल निथळून जाईल. नारळ्याच्या चटणीसोबत हे वडे छान लागतात.
Friday, October 17, 2008
साबुदाणा थालिपीठ
भिजलेला साबुदाणा १ वाटी
बारीक वाटलेल्या तिखट मिरच्या २ चमचे
शिंगाड्याचे पीठ ३-४ चमचे
१ छोटा कच्चा बटाटा किसलेला (साले काढून)
बारीक चिरलेली कोथिंबीर व नारळाचा खव अर्धी वाटी
१ चमचा साखर
अर्धी वाटी दाण्याचे कूट
चवीपुरते मीठ
साजूक तूप/तेल
क्रमवार मार्गदर्शन :
वरील सर्व साहित्य एकत्र करून नीट कालवून घ्या. हे कालवलेले पीठ जर घट्ट वाटले तर अगदी थोडे पाणी घाला. एकत्रित केलेल्या मिश्रणाचे २ मोठे गोळे करा. तव्याला तेल/तूप लावून घ्या. त्यावर एक गोळा ठेवून सर्वबाजूने एकसारखे थालिपीठ थापा. नंतर त्यावर ४-५ भोके पाडून त्यात तेल/तूप घालून मध्यम आचेवर तवा ठेवावा. त्यावर झाकण ठेवावे. काही सेकंदाने झाकण काढून थालिपीठ कालथ्याने उलटून घ्या. काही सेकंदाने थालिपीठ तव्यावरून काढा. थालिपीठ तांबूस रंग येईपर्यंत ठेवा. म्हणजे खरपूस होईल.
हे थालिपीठ लाल तिखट घालूनही करतात. बाकीचे सर्व साहित्य वरील प्रमाणे फक्त बारीक वाटलेल्या मिरची ऐवजी लाल तिखट व थोडी जिरे पावडर घालून असेच थालिपीठ करा.
दोन्ही प्रकारे हे थालिपीठ छान लागते. सोबत थंडगार दही व गोड लिंबू लोणचे छान लागते.
Wednesday, July 16, 2008
साबुदाण्याची खिचडी
वाढणी:२ जण
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस:
१ वाटी चांगल्या प्रतीचा साबुदाणा
दाण्याचे कूट मूठभर, १ छोटा बटाटा
हिरवी मिरची १-२, लाल तिखट पाउण ते १ चमचा
जिरे १ चमचा, साजूक तूप/तेल ५-६ चमचे
मीठ, साखर, चिरलेली कोथिंबीर २-३ चमचे
खवलेला ओला नारळ २-३ चमचे
क्रमवार मार्गदर्शन:
साबुदाणा पाण्याने धुवून २-३ तास भिजत घालावा. थोडेसे पाणी राहू द्या म्हणजे जास्त चांगला भिजेल. कच्चा बटाट्याची साले काढून त्याचे काचऱ्या चिरतो तसे पातळ काप करून पाण्यामध्ये घाला. मध्यम आचेवर कढई ठेवा. त्यात तेल/साजूक तूप घालून ते पूरेसे तापले म्हणजे त्यात जिरे घाला, ते तडतडले की त्यात मिरच्यांचे चिरलेले तुकडे घाला व पातळ चिरलेला बटाटा घाला व परता. बटाटा घालताना त्यातले पाणी काढून टाका. त्यावर १-२ मिनिटे झाकण ठेवून बटाटे वाफवून घ्या. ते शिजले की त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर व खवलेला ओला नारळ घालून परत परता. आता गॅस मंद करा. त्यात थोडेसे मीठ पेरून परत थोडे परता. आता भिजवलेला साबुदाणा आहे तो हाताने मोकळा करून घ्या. त्यात लाल तिखट,चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा साखर व दाण्याचे कूट घालून चांगले ढवळून घ्या. व हे ढवळलेले मिश्रण कढईत घालून सगळीकडून खिचडी चांगली ढवळा. नंतर त्यावर झाकण ठेवून १-२ मिनिटे वाफवून घ्या. असे एक दोन वेळा करा, म्हणजे साबुदाणा चांगला शिजेल व त्याचा रंगही बदलेल. कालथ्याने खिचडी परत परत व्यवस्थित ढवळा म्हणजे मोकळी होईल. गोळा होणार नाही. तेल/तूप कमी वाटले तर वरून थोडे घालून ढवळणे.
साबुदाणा भिजवल्यावर दर अर्ध्या तासाने मोकळा करून घ्या. दोन बोटांच्या चिमटीत साबुदाणा धरून तो व्यवस्थित भिजला आहे ना याची खात्री करून घ्या. भिजला नसेल तर थोडासा पाण्याचा हबका मारून त्यावर परत झाकण ठेवा.
खिचडी सर्वात चविष्ट साजूक तूपातील होते.
Monday, September 04, 2006
साबुदाणा भजी
वाढणी:२ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ वाटी साबुदाणा
मूठभर दाण्याचे कूट
१ साल न काढलेला कच्चा बटाटा (मध्यम आकाराचा)
१ चमचा लाल तिखट
अर्धा चमचा साखर, चवीपुरते मीठ
शिंगाड्याचे पीठ ३-४ चमचे, तळणीसाठी तेल
क्रमवार मार्गदर्शन:
१ वाटी साबुदाणा २-३ तास भिजत घालणे. नंतर त्यात कच्चा बटाटा साल न काढता किसून घालणे. तिखट, मीठ, साखर, दाण्याचे कूट व शिंगाड्याचे पीठ घालून हे मिश्रण एकसारखे करून घेणे. या मिश्रणाची लहान लहान भजी मध्यम आचेवर तेलामध्ये तांबुस रंगावर तळणे. ही भजी ओल्या नारळाच्या चटणीसोबत खायला छान लागतात. ओल्या नारळाच्या चटणीमध्ये दही मिसळले तर जास्त छान लागते.
लाल तिखटाच्या ऐवजी हिरव्या मिरच्यांची पेस्ट घातली तरी चालते.
माहितीचा स्रोत:सौ आई
अधिक टीपा:उपवासाच्या दिवशी संध्याकाळी खायला छान लागतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे साबुदाण्याच्या वड्याप्रमाणे ही अजिबात तेलकट होत नाहीत.
रोहिणी गोरे
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ वाटी साबुदाणा
मूठभर दाण्याचे कूट
१ साल न काढलेला कच्चा बटाटा (मध्यम आकाराचा)
१ चमचा लाल तिखट
अर्धा चमचा साखर, चवीपुरते मीठ
शिंगाड्याचे पीठ ३-४ चमचे, तळणीसाठी तेल
क्रमवार मार्गदर्शन:
१ वाटी साबुदाणा २-३ तास भिजत घालणे. नंतर त्यात कच्चा बटाटा साल न काढता किसून घालणे. तिखट, मीठ, साखर, दाण्याचे कूट व शिंगाड्याचे पीठ घालून हे मिश्रण एकसारखे करून घेणे. या मिश्रणाची लहान लहान भजी मध्यम आचेवर तेलामध्ये तांबुस रंगावर तळणे. ही भजी ओल्या नारळाच्या चटणीसोबत खायला छान लागतात. ओल्या नारळाच्या चटणीमध्ये दही मिसळले तर जास्त छान लागते.
लाल तिखटाच्या ऐवजी हिरव्या मिरच्यांची पेस्ट घातली तरी चालते.
माहितीचा स्रोत:सौ आई
अधिक टीपा:उपवासाच्या दिवशी संध्याकाळी खायला छान लागतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे साबुदाण्याच्या वड्याप्रमाणे ही अजिबात तेलकट होत नाहीत.
रोहिणी गोरे
Labels:
उपवासाचे पदार्थ,
तळलेले पदार्थ,
भजी,
साबुदाण्याचे पदार्थ
Subscribe to:
Posts (Atom)


