Showing posts with label सँडविच. Show all posts
Showing posts with label सँडविच. Show all posts

Saturday, February 21, 2009

सँडविच



जिन्नस:


स्लाइस ब्रेड
बटर/साजुक तूप
बटाटावड्याचे सारण

बटाटावड्याचे सारण : बटाटे उकडून, त्याची साले काढुन कुस्करुन घ्यावेत. त्यात कांदा, लसुण पाकळ्या, मिरच्या व कोथिंबिर खूप बारीक चिरुन घालणे, लिंबू पिळावे. चवीपुरते मीठ व साखर घाला. ह्या सर्व मिश्रणाचा लगदा करा. हे बटाट्याचे सारण तसेच कच्चे राहु देत.


क्रमवार मार्गदर्शन: ब्रेडच्या कडा काढा. एका स्लाइसवर बटर/साजुक तूप लावा. एका स्लाइसवर बटाटावड्याचे सारण पसरवून लावा. थर पातळ/जाड आवडेल तसा. नंतर हे स्लाइस एकमेकांवर ठेवून सँडविच टोस्टर मध्ये भाजून घ्या. गरमागरम टोमॅटो केच अप अथवा सालसा बरोबर खा.

Tuesday, October 07, 2008

सँडविच




जिन्नस:


मटार, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची, बटाटा, कांदा, टोमॅटो,
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद,
लाल तिखट, धनेजीरे पूड, पावभाजी मसाला, मीठ, लिंबू
स्लाईस ब्रेड
बटर अथवा साजूक तूप

वाढणी : ज्या प्रमाणात हवे असेल त्या प्रमाणात.


क्रमवार मार्गदर्शन :


जाड चिरलेला फ्लॉवर, कोबी व सिमला मिरची, मटार, बटाटा कूकरमध्ये शिजवून घ्या. नंतर ते चाळणीमध्ये घालून ठेवा म्हणजे त्यातले पाणी निथळून जाईल. कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्या.
मध्यम आचेवर कढईमध्ये थोडे तेल तापवून घ्या व नेहमीसारखी फोडणी करा. त्यात बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घालून परता. गॅस बारीक करून अधून मधून परतत राहा खमंग होईपर्यंत. मग त्यात उकडलेल्या भाज्या डावेने घोटून घेऊन घाला व ढवळा. नंतर त्यात लाल तिखट, धनेजीरे पूड, पावभाजी मसाला घाला. चवीप्रमाणे मीठ घालून चांगले ढवळून घ्या. नंतर त्यावर चवीप्रमाणे लिंबू पिळून परत एकदा एकसारखे ढवळून घ्या.


भाजी गार झाली की ब्रेडच्या स्लाईसच्या कडा काढून घ्या. ब्रेडच्या एका स्लाईसला बटर अथवा साजूक तूप लावा व एका स्लाईसवर मसालेदार भाजी पसरवून घ्या. दोन्ही स्लाईस एककेकांवर ठेवून सँडविच टोस्टर मध्ये भाजून घ्या.


थोडक्यात पावभाजी साठी जी भाजी करतो तशीच करायची आहे.


टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम असतानाच खा!

Monday, July 09, 2007

सँडविच (१)








वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

ब्रेडचे स्लाइस १६ विब्स किंवा ग्रेट व्हॅल्युचा व्हाईट ब्रेड स्प्लीट टॉप
लाल टोमॅटोच्या चकत्या ३०-३५, हिरवी चटणी वाडगाभर
उकडलेल्या बटाट्याच्या चकत्या ३०-३५, मीठ चवीनुसार
काकडीच्या चकत्या ३०-३५, बटर/साजुक तूप,
कांद्याच्या चकत्या ३०-३५, मिरपूड १ चमचा
टोमॅटो केचप, धारदार सुरी

क्रमवार मार्गदर्शन: हे सँडविच बनवताना धारदार सुरी आवश्यक आहे. ओला नारळ, १-२ मिरच्या, कोथिंबीर व चवीपुरते मीठ घालून सौम्य चटणी करणे. या चटणीमधे कोथिंबीर जास्त घालणे. चटणी हिरवी दिसायला हवी. नंतर सर्व स्लाइसच्या सर्व कडा सुरीने काढणे. नंतर एका स्लाइसला बटर/साजुक तूप पसरवून लावणे. दुसऱ्या स्लाइसला चटणी पसरवून लावणे. उकडलेला बटाटा, टोमॅटो, कांदा व काकडी याच्या धारदार सुरीने अतिशय पातळ चकत्या करून घेणे. नंतर ज्या स्लाइसवर चटणी लावली असेल त्यावर प्रत्येकाच्या २-३ चकत्या लावून त्यावर थोडीशी मिरपूड व चवीपुरते मीठ घालणे. नंतर त्यावर बटर/साजुक तूप लावलेला स्लाइस ठेवून थोडासा हाताने दाब देणे. आता या तयार झालेल्या सँडविचचे धारदार सुरीने चार भाग करणे. नंतर अलगद हाताने हे चारही भाग एका ताटलीत घालून त्यावर टोमॅटो केचप घालून खायला देणे.

२ स्लाइसचे मिळून एक, असे ४ सँडविच एकाचे एका वेळचे पोटभर जेवण होते.

माहितीचा स्रोत:बहीण सौ रंजना जेरे

अधिक टीपा:सँडविच खाल्यावर त्यावर ज्युस/आइस्क्रीम/आंबा किंवा खजूर-बदाम-काजु मिल्क शेक जे आवडेल ते घेणे. आवडत असल्यास सँडविचवर किसलेले चीझ घालणे.

Monday, January 15, 2007

सँडविच

वाढणी:२ जणांना भरपूर

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

पावाचे स्लाइस १२
बटर किंवा साजुक तूप
मटारचे दाणे २ वाट्या, बटाटा १ मध्यम,
कांदा अर्धा, टोमॅटो १, बारीक चिरलेला कोबी १ वाटी,
बारीक चिरलेली सिमला मिरची १ वाटी, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
लसुण पाकळ्या ७-८, हिरव्यागार तिखट मिरच्या ५-६


क्रमवार मार्गदर्शन: मटारचे दाणे व बटाटा उकडून घ्यावेत. नंतर रोवळीमधे ठेवावेत, म्हणजे त्यातील पाणी निथळून जाईल. नंतर कुस्करलेला बटाटा, कुस्करलेले मटारचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, लसुण, हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, सिमला मिरची व कोथिंबीर हे सर्व चमच्याने एकत्रित करुन घेणे. चवीप्रमाणे मीठ घालणे. परत एकदा मिश्रण एकत्रित करणे.

नंतर एका स्लाइसवर तयार केलेले भाज्यांचे मिश्रण पसरणे (जाड थर) व एका स्लाइसवर बटर किंवा साजुक तूप पसरणे. हे दोन्ही स्लाइस एकमेकांवर ठेवुन ब्रेड टोस्टर मधे भाजून घेणे. व गरम गरम खाणे.


रोहिणी