Sunday, September 08, 2024

कांदे बटाटे

कांदे बटाटे

कांदा आणि बटाटा मला खूप प्रिय आहेत. ते घरात कायमच असतात माझ्या आणि सर्वांच्याही. सर्वांना सामावून घेतात हे दोघे. प्रत्येक भाजीला सामावून तर घेतातच. शिवाय आयत्यावेळेला कोणी पाहूणे रावळे आले की मदतीलाही धावून येतात. कांदा जसा की पोह्यात उपम्यात लागतो तसा मी बटाटाही घालते. पोह्यात आणि उपम्यात कांदे बटाटे जास्तीच असतात माझ्या ! आयत्यावेळेला कुणी पाहुणे आले तर बटाट्याच्या काचऱ्यात थोडा तरी कांदा हवाच. पटकन काचऱ्या करा. पोळी लाटा की जेवण तयार. कूकर मध्ये तेल घालून फोडणीत कांदे बटाटे घाला की पाचच मिनिटात एका शिट्टीत रस्सा तयार ! बटाट्याच्या काचऱ्या तर पोळीशी छान लागतातच. शिवाय धिरड्या सोबत, ताकभाताबरोबर, मऊ भाताबरोबर चवीत भर घालतात. लज्जतच वाढवतात. तिखट तिखट गरम गरम काचऱ्यांबरोबर जेवण तर छान होतेच. तोंडालाही चव येते. कांदाबटाटा रस्सा लाल तिखटाचा आणि नुसती हिरवी मिरचीचा ठेचा घातला तरी चवदार होतो. 
 
 
बटाट्यावड्यात मी नेहमीच थोडा कांदा चिरून घालते. शिळ्या पोळ्या असल्या की त्यासोबत कोणतीही भाजी नसली तरी चालते. कांदा बारीक चिरून, त्यावर लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ आणि कच्चे तेल घाला. सर्व शिळ्या पोळ्या एका मिनिटात संपतील. तांदुळाच्या उकडीबरोबर कच्चा कांदा आणि तोही हाताने फोडलेला. फोडणीच्या पोळीत आणि फोडणीच्या भातात कांदा ! किती चविष्ट आहेत हे पदार्थ. बटाट्याची तर बातच निराळी. पोटॅटो फ्राईड एकदा का तळायला घेतले की एकेक किलो बटाटे हा हा म्हणता संपतात. या पदार्थात बटाटा जाडाजुडा आणि उंच पाहिजे म्हणजे लांब लांब जाड फोडी करून त्या पाण्यात घालायच्या आणि तेलात सोडायच्या. खमंग तळल्या की ताटलीत लाल तिखट, मीरपूड, मीठ लावून खायच्या. आहाहा ! तोंड स्वच्छ होते.तसेच तेल तिखट मीठ पोहे यात बारीक कांदा चिरून घालायचा आणि कच्चे पातळ पोहे चावून चावून खाल्ले की तोंड स्वच्छ होते. पिठल्यात कांद्याच्या जाड फोडी घालून परता. सोबत लसूण पाकळ्या आणि हिरव्यागार मिरच्या. कढईतून गरम गरम पिठले पानात वाढायचे आणि सोबत पोळी. गरम इतके हवे की तोंड पोळले पाहिजे. स्वाद यातच आहे.
 
 
साबुदाणा खिचडी, वडे, थालिपीठ, या सर्वात मी कच्चा सालं न काढलेला बटाटा घालते. सॅंडविच, सामोसा मध्ये उकडून बटाटा. उपासाच्या दिवशी बटाट्याचे डांगर ! उन्हाळ्यात बटाट्याचे पापड, साबुदाणा चकलीत, चिकवड्यात उकडून बटाटा. किती किती बहुगुणी आहे हा ! बटाटा उकडून तो किसून वर्षाभराचा वाळवून ठेवतात म्हणजेच बटाट्याचा वाळवलेला कीस. हा बटाट्याचा किसाचा चिवडा तर मला प्रचंड प्रिय आहे ! तेलात तळताना खूपच फुलून येतो. मोठ्या परातीत हा तळलेला कीस ठेवायचा. उरलेल्या तेलात कच्चे दाणेही तेलात तळून त्यात घालायचे. त्यावर लाल तिखट, मीठ, जिरेपूड, आणि साखर घालून एकत्र कालवायचा आणि खायचा. खूप तळायचा. उरलेला डब्यात भरून ठेवायचा. हा चिवडा खाल्यावर जी चव येते ना ती शब्दात वर्णन करता येणार नाही इतका हा चिवडा मला आवडतो. मी खूप मिस करते या चिवड्याला. मला एकदा इंडियन स्टोअर मध्ये वाळवलेला बटाट्याचा कीस दिसला होता. अर्थात मी लगेचच तो घेतला. खूप दिवस पुरतो. खाताना मला पूर्वीच्या दिवसांची आठवण येत होती.
 
 
बटाटेवडे तर मनात आले की केले, खाल्ले. एकदा आम्ही युट्युबवर डोंबिवलीतला वडा पाव कुठे कुठे मिळतो हे पहात होतो. जेवण व्हायचे होते. वडे पहाताना आणि खाताना इतके काही खावेसे वाटले की लगेच कूकर मध्ये बटाटे उकडले आणि हाहा म्हणता वडे तयार ! सर्वांचे प्रिय आहेत ना ! कांद्याची पीठ पेरून भाजी आणि दुसरी एक नुसती परतून भाजी दोन्हीही चविष्ट लागतात. पीठ नुसते पेरायचे हं जास्त नको. परतून भाजीत दाण्याचे कूट, कोथिंबीर हवीच. पोळीबरोबर दोन्ही भाज्या पटकन होणाऱ्या आणि चवही आणणाऱ्या ! खूप पूर्वी मी प्रत्येक भाजीत बटाटा घालायची. मी जेव्हा कामावर जायचे तेव्हा आम्ही तिघी एकत्र डबा खायचो. तिथली लक्ष्मी मला म्हणायची. रोहिणी तुम हर सबजीमें बटाटा क्यु डालती है रे ! मी तिला म्हणायचे अरे मुझे बटाटा बहूत प्यारा है रे ! दिप्तीला सांगायचे मराठीतून मला आवडतो बटाटा खूप. मिळून येते ना भाजी ! ती म्हणायची हो गं. पण तू खूपच खातेस ग बटाटे !
 
 
कोबी-बटाटा, वांगं - बटाटा, गवार -बटाटा, बीन्स, फ्लॉवर यामध्ये बटाटा. किती मिळून येतात बरे या भाज्या. टोमॅटो सूपात बटाटा घातला की दाट होते की नाही? म्हणजे कूकर मध्ये उकडवायचे व मिक्सर मधून काढायचे. सणासुदीला बटाटा - कांदा भजी डावीकडे हवीत ना. गोडाधोडाच्या जेवणात ही भजी जेवणाची गोडी वाढवतात! मूगडाळ खिचडीत पण थोडा कांदा घालून परतायचा. बटाटाही घालायचा. मला तर सांबारातही बटाटा लागतो. मित्रमैत्रिणी, नातेवाईक आपल्या घरी आले की आपण लगेचच कांदे पोहे करतो. पटकन होतात. मुलं मुली बघण्याच्या कार्यक्रमात कांदे पोहेच दोघांना एकत्र आणतात आणि लग्नाच्या बंधनात अडकवतात. किती महत्वाचा आहे हा कांदा ! सणासुदीचे ताट सजवताना उकडून बटाट्याची भाजी किती महत्वाची असते ! माहीत आहे ना ! ताटातल्या उजव्या बाजूची शान वाढवते. मला कांदा बटाटा ही जोडी खूपच आवडते. तुम्हाला आवडते का? कांदे बटाटे दोन्ही आवडते असले तरी डाव्या उजव्यामध्ये उजवा बटाटा !! Rohini Gore

2 comments:

Anonymous said...

छान लिहिले आहेस. मस्त बटाटा कहाणी एन्जॉय केली. तु सगळं टेस्टी बनवतेय. दीप्ती!!

rohini gore said...

Thank you so much Dipti !!