Monday, March 23, 2020

दह्यातला दुधी

जिन्नस :
दुधी भोपळ्याच्या फोडी २ ते ३ वाट्या
टोमॅटो बारीक चिरलेला अर्धा मोठा
कांदा बारीक चिरलेला पाव
लसूण पाकळ्या ३ ते ४ (बारीक चिरलेल्या)
आलं बारीक तुकडा (बारीक चिरलेले
ओल्या नारळाचा खव अर्धी वाटी
दाण्याचे कूट अर्धी वाटी
चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
दही ३ ते ४ चमचे (पाणी घालून पातळ करा)
१ ते २ चमचे डाळीचे पीठ (पातळ केलेल्या दह्यामध्ये कालवून घ्या)
हिरवी मिरचीचे तुकडे ३ ते ४
फोडणीसाठी तेल (नेहमीपेक्षा थोडे जास्त)
फोडणीसाठी मोहरी, जिरे,हिंग, हळद,
लाल तिखट १ चमचा
धनेजिरे पूड १ चमचा
साखर २ चमचे
मीठ चवीपुरते
कढीपत्ता ४ ते ५ पाने

क्रमवार मार्गदर्शन : पातेल्यात फोडणीसाठी तेल टाकून ते गॅसवर ठेवा. आच मध्यम हवी. तेल पुरेसे तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा.

नंतर त्यात लगेच  चिरलेले आलं, लसूण, हिरव्या मिरच्यांचे तुकडे व कढीपत्ता घाला. नंतर लगेच बारीक चिरलेला कांदा, व टोमॅटो घाला व हे सर्व मिश्रण डावेने परतून घ्या. नंतर लगेचच दुधी भोपळ्याच्या फोडी घाला व परत एकसारखे ढवळून घ्या. आता झाकण ठेवा.

आच थोडी वाढवा. तेलाच्या फोडणीमध्ये घातलेले जिन्नस तेलामध्येच चांगले शिजू देत. आता झाकण काढून त्यात
अगदी थोडे  पाणी घाला.


परत पातेल्यावर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून दुधी भोपळ्याच्या फोडी नीट शिजल्या आहेत की नाही ते बघावे. त्या शिजल्या असतील तर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ व साखर घालून ढवळावे. थोडे पाणी घालून त्यात चिरलेली कोथिंबीर, दाण्याचे कूट व नारळाचा खवही घालावा. नंतर हे सर्व मिश्रण एकसारखे करून परत झाकण ठेवून शिजवावे. झाकण काढून त्यात पातळ केलेले दही आणि त्यात कालवलेले हरबरा डाळीचे पीठ हे मिश्रण घालावे. एकसारखे नीट ढवळून घ्यावे. आणि आता फक अजून एक वाफ द्यावी. आता गॅस बंद करा.

अशी ही तयार झालेली गरमागरम भाजी चवीला खूपच छान आणि चविष्ट लागते. ही भाजी स्वनिर्मित आहे. दूधीच्या दोन भाज्या आधीच लिहिल्या आहेत. एक दुधातली आणि दुसरी मुगाची डाळ घालून केलेली. आता परत काहीतरी वेगळेपणा आणण्यासाठी भाजी करून पाहिली.


2 comments:

Mohinee said...

हाय रोहिणी .. तुला सांगू .. या सेम ग्रेव्हीमध्ये ढेमशाचीही भाजी छान लागेल. मी कधीकधी करते दही घालून ढेमशी .. मुळात मी ढेमशी करेन असं मला लग्नापूर्वी कोणी सांगितलं असतं तर मी चिडलेच असते ! पण इथे खूप खातात ढेमशी 😄😄
बाय द वे मस्त भाजी ..

rohini gore said...

तुझ्या प्रतिक्रियेबद्दल अनेक धन्यवाद मोहिनी !! पण मला सांग ढेमशे म्हणजे काय? मला माहिती नाहीये ही भाजी. :D :)