Thursday, October 28, 2010

बटाटेवडे

माझ्या बाबतीत बटाटेवडे बनवणे म्हणजे म्हणता ना 'किस झाड की पत्ती! ' किंवा 'बाए हाथ का खेल' अगदी तसेच आहे. बटाटेवडे करायला मला कधीच कंटाळा आला नाही आणि येणारही नाही. बटाटावडा हा माझा सर्वात आवडता आहे, तसा तो कधी कुणाला आवडला नाही असे ऐकीवात नाही.



बटाटेवडे कसे करायचे असे मी कधी कोणाला विचारले नाही. खूप आवडीचा पदार्थ असल्याने आई कसे वडे बनवत ते पाहून कॉलेजमध्ये असतानाच आम्ही दोघी बटाटेवडे करण्यात तरबेज होतो. कधीही पटकन मनात आले की करायचे का बटाटेवडे! असे एकमेकींना विचारत असू. बटाटेवडे असे म्हणायचाच अवकाश की तासाच्या आत आम्ही दोघी बहिणी गरम गरम बटाटेवडे खायला सुरवात करायचो. जलद चित्रफीत कशी चालते अगदी तसेच व्हायचे आम्हा दोघींचे. एकजण कुकराला बटाटे उकडत ठेवायचो गॅस मोठा करून. दुसरी लसूण सोलून, मिरच्या आले लसूण वाटून तयार ठेवायची. कुकराची वाफ मुरून ते बटाटे बाहेर काढले जायचे. कुकराचे झाकण पटकन उघडले गेले नाही तर राग यायचा. किती मुरायला वेळ! झाकण सैल करून कुकराची शिट्टी वर करून फूऽ‌ऽस असा आवाज येऊन वाफ बाहेर यायची की झाकण पटकन पडायचे! गरम गरम बटाटे साणशीने एकेक करत पकडून रोळीत ठेवायचो. रोळी लगेच गार पाण्याच्या नळाखाली! तरीही बटाटे इतके काही गरम असायचे! फडक्यात एकेक बटाटा ठेवून साले काढायचो. एकीकडे तोंडाने फुंकर! हाताला खूप चटके बसायचे. खूप गरम बटाटे चमच्याने बारीक करायचो. ते करेपर्यंत एक जण खूप बारीक कांदा चिरायची. लाल सालींचे कांदे व हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून बटाटेवड्याचे सारण तयार होईतो एकजण डाळीचे पीठ भिजवायची. कढईत तेल घालून तापले रे तापले की बटाटेवडे तळून ते ताटलीत घालून गरम गरम, तिखट तिखट, हायहुई करत बटाटेवडे खायचो. असे गरम गरम व तिखट तिखट बटाटेवडे खाल्ले ना की तोंडाला जी चव येते ती काही औरच!





भारतात असताना कंपनीने दिलेल्या घरात जेव्हा राहायला गेलो तेव्हा मला 'पॉटलक' हा प्रकार माहिती झाला. पहिल्या पॉटलकच्या वेळी मला माझ्या आवडीचा पदार्थ करायला मिळाला नाही. बाहेरगावी गेलो होतो. परत आल्यावर पॉटलक असल्याचे कळले व माझ्याकडे कोणीच न घेतलेला पदार्थ आला तो म्हणजे 'पुरी' ७० ते ८० पुऱ्या बनवल्या होत्या. दिवाळीच्या वेळी मला मैत्रिणीने सांगितले ' तू तुझ्या आवडीचा पदार्थ आधीच सांगून ठेव' मला माझ्या आवडीचा पदार्थ आणि तोही मोठ्या प्रमाणात बनवण्याची संधी आली आणि तो पदार्थ म्हणजे बटाटेवडे! कोणाचीही मदत न घेता एकटीने ७० ते ८० वडे बनवले. मला कोणी मदतीला येऊ का? असे विचारले तर मी सरळ 'नाही' असे सांगते कारण की माझा खूप गोंधळ होतो. लसूण सोलण्यापासून ते मोठ्या डब्यात बटाटेवडे भरण्यापर्यंत सगळे एकटीने केले. त्यातला एकही वडा घरी परत आला नाही. मला खूप आनंद झाला होता त्यावेळी.





दुसरे पॉटलक अमेरिकेत आलो तेव्हा त्या वर्षाअखेरीस झाले. नववर्ष साजरे केले तेव्हा. त्यावेळीही असेच ७०-८० बटाटेवडे बनवले होते. तेलगू कुटुंबे होती. त्यांना हा मराठी पदार्थ खूप आवडला. तिसऱ्या पॉटलकच्या वेळी उत्तर भारतीय कुटुंबे होती. त्यात एक मुसलमान जोडपे होते, इक्बाल फरहाना. जेव्हा एकत्र जेवणावळी होत तेव्हा फरहाना मला म्हणायची 'आप वो बटाटा करके लाइए. बटाटेवड्यांना ती बटाटा म्हणायची.

Thursday, October 14, 2010

भरडा वडे भाजणी



भरडा वडे भाजणी

जिन्नस:

हरबरा डाळ २ वाट्या
तांदुळ १ वाटी
उडदाची डाळ १ वाटी
पाव वाटी तुरीची डाळ
पाव वाटी मुगाची डाळ
गहू पाव वाटी
जिरे पाव वाटी

वरील सर्व जिन्नस जाडसर दळून आणा.

Wednesday, October 13, 2010

थालिपीठाची भाजणी



जिन्नस :

ज्वारी २ पेले
बाजरी २ पेले
तांदुळ २ पेले

याच्या निम्मे डाळी

हरबरा डाळ दीड पेला
उडदाची डाळ दीड पेला

अर्धा पेला गहू
धने १ पेला

मधम आचेवर कढई ठेवा व वरील सर्व जिन्नस भाजून घ्या. गार झाले की गिरणीतून जाडसर दळून आणा.

Monday, October 04, 2010

बटाटा भाजी



जिन्नस :

बटाटे ३-४
पाऊण कांदा
३-४ मिरच्या
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा धनेजिरे पावडर
मीठ
साखर
तेल
मोहरी, हिंग, हळद (फोडणीसाठी)

क्रमवार मार्गदर्शन : बटाटे कूकरमध्ये उकडून घ्या. गार झाले की त्याची साले काढून मध्यम आकाराच्या फोडी करा. कांदाही मध्यम आकाराच्या फोडी करून चिरा. मिरच्यांचे तुकडे करा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात जरूरीपुरते तेल घाला. तेल तापले की त्यात मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात मिरच्यांचे तुकडे व चिरलेला कांदा घाला. परतून घ्या. त्यावर झाकण ठेवा. नंतर काही सेकंदाने झाकण काढा व परत थोडे परता. असे दोन तीन वेळा करा. कांदा कच्चा राहता कामा नये. कांदा शिजला का नाही हे पाहण्यासाठी कालथ्याने शिजलेल्या कांद्यावर थोडे टोचून पहा. कांदा कालथ्याने तुटला की तो शिजला असे समजावे. नंतर त्यात चिरलेले बटाटे घाला व परतून घ्या. ढवळा. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड व चवीप्रमाणे मीठ घाला. थोडी साखर घाला. नंतर परत हे सर्व मिश्रण नीट सर्व बाजूने ढवळा. आता परत झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून परत थोडे परता. असे दोन तीन वेळा करा. गॅस बंद करा. भाजीवर झाकण ठेवा. वाफेवर ही भाजी चांगली शिजली की चविष्ट लागते.

या भाजीत कांदा जास्त घालावा म्हणजे डोशाबरोबर बटाट्याची भाजी देतात तशी लागते. वाढताना त्यावर थोडी चिरलेली कोथिंबीर व ताजा खवलेला नारळ घाला. या भाजीत कडीपत्त्ता घातल्यास जास्त चांगली चव येते. कडीपत्ता फोडणीत घालावा.

Thursday, September 02, 2010

कडधान्य भिजवणे



१ वाटी हिरवे मूग
पाणी

दुपारी किंवा रात्री जेवणासाठी मुगाची/इतर कडधान्याची उसळ करायची असेल तर आदल्या दिवशी सकाळी मूग पाण्यात भिजत घाला त्यावर झाकण ठेवा. रात्री झोपताना पाण्यासकट हे मूग एका चाळणीत ओता. पाणी निघून जाईल. या चाळणीवर मूग पूर्णपणे झाकून जातील असे झाकण ठेवा व चाळणीखाली एक पातेली ठेवा. उरलेले सर्व पाणी निथळून जाईल. दुसऱ्यादिवशी सकाळी मुगाला मोड आलेले असतील. भिजलेल्या एका वाटीचे मोड आलेले मूग ४ वाट्या होतील. ४ जणांकरता उसळ होईल.

Friday, July 23, 2010

चमचमीत बटाटा



जिन्नस :

३-४ मध्यम आकाराचे बटाटे
पाणीपुरी मसाला
चाट मसाला
लाल तिखट
धनेजिरे पूड
चिंचगुळाचे दाट पाणी
हिरवी चटणी (कोथिंबीर मिरची लसूण)
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेला टोमॅटो
बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ
बारीक शेव
दही
बटर३-४ चमचे
साखर

क्रमवार मार्गदर्शन : बटाटे कूकर मध्ये उकडून घ्या. नंतर उकडलेले बटाटे बारीक चिरा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात बटर घालून बारीक चिरलेले बटाटे घाला व परता. नंतर त्यात आवडीप्रमाणे पाणीपुरी मसाला, चाट मसाला, लाल तिखट, धनेजिरे पूड घाला. चवीला मीठ घाला. नंतर हे सर्व मिश्रण खरपूस परता. कालथ्याने बारीक बटाटे अजुनही खूप बारीक करा. त्याचा लगदा झाला पाहिजे. गार झाल्यावर त्याचे गोल आकाराचे पॅटीस करा.

मिरची, कोथिंबीर, लसूण व मीठ याची चटणी करा. चिंच गुळाच्या दाट पाण्यात थोडे लाल तिखट, धनेजिरे पूड व मीठ घालून त्याची चटणी करा.

एका खोलगट डीश मध्ये बटाट्याचे तयार केलेले पॅटीस घाला. त्यावर लसूण मिरचीची चटणी घाला. नंतर चिंचगुळाची चटणी घाला. नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा,टोमॅटो व बारीक शेव घाला. थोडी कोथिंबीर पेरा. नंतर त्यावर दही घाला व चिमुटभर लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ व साखर पेरून खायला द्या. अतिशय चविष्ट डीश आहे.

ही पाककृती माझी नाही. माझ्या मैत्रिणीची आहे. तिचे नाव सौ दिप्ती जोशी.

Wednesday, July 21, 2010

कोथिंबीर वडी



जिन्नस :

जाडसर चिरलेली कोथिंबीर ३ वाट्या
अर्धी वाटी हरबरा डाळीचे पीठ
५ चमचे तेल
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा धनेजिरे पूड
हळद चिमूटभर
चवीपुरते मीठ

क्रमवार मार्गदर्शन : चिरलेली कोथिंबीर धुवून घ्या. धुवून रोळीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवा. पाणी पूर्णपणे निथळले गेले पाहिजे. नंतर त्यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड, हळद, तेल व मीठ घालून ढवळा व त्यामध्ये मावेल इतके डाळीचे पीठ घाला. ३ वाट्या चिरलेल्या कोथिंबीरीत अर्धा वाटी डाळीचे पीठ मावले. नंतर हाताने सर्व मिश्रण एकत्र करून त्याचा लोडासारखा आकार बनवा व तो एका पातेल्यात घालून कूकर मध्ये उकडून घ्या. पातेल्यावर झाकण ठेवा.पातेल्याला थोडे तेल लावून घ्या. कूकर थंड झाला की त्याचे झाकण काढून लोडासारख्या बनवलेल्या आकाराच्या पाहिजे त्या आकाराच्या वड्या पाडा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. त्यात पुरेसे तेल घालून वड्या खरपूस तळा. आकर्षक सजावट करून खाण्यासाठी ठेवा. चहासोबत या वड्या छान लागतात. या वड्या हलक्याफुलक्या, खुसखुशीत व कुरकुरीत होतात.

Monday, July 19, 2010

कुरडई



  • गहू २ वाट्या
  • हिंग
  • मीठ
  • पाणी
  • तेल

२ वाट्या गहू पाण्यात ३ दिवस भिजत घाला. रोज एकदा पाणी बदला. ४ थ्या दिवशी मिक्सर ग्राईंडर मधून गहू वाटा. गहू वाटताना त्यात थोडे पाणी घाला. एका भांड्यामध्ये थोडे पाणी घ्या व त्यात हे वाटलेले गहू घालून सपीटाच्या चाळणीने गाळून घ्या. गाळलेले गव्हाचे पाणी एका भांड्यात जमा होईल व वर राहिलेले गव्हाचे मिश्रण परत एकदा पाणी घेउन ते चाळणीने परत चाळून घ्या. हे गव्हाचे वाटलेले मिश्रण आहे ते हाताने पिळून ते पाणी सपीटाच्या चाळणीत ओता. असे २-४ वेळा केले की जे पाणी भांड्यात जमा होईल ते एक दिवस तसेच राहू देत. नंतर दुसऱ्या दिवशी भांड्यात जमा झालेले वरचे पाणी काढा. खाली पांढरा शुभ्र गव्हाचा साका जमा होईल. तो साधारण लाप्शीइतका दाट असेल. साका १ वाटी असेल तर पाणी १ वाटी घ्या. एका वाटीच्या पाण्यात थोडा चवीपुरता हिंग घाला. तसेच मीठही घालून पाणी एका भांड्यात घेऊन मध्यम आचेवर तापत ठेवा. उकळी यायच्या आत गव्हाचा एक वाटी साका त्यात घालून लगेच पटापट ढवळा. गुठळी होऊन देऊ नका. नंतर गॅस मंद आचेवर ठेवा व त्यावर झाकण ठेवा. वाफेवर चीक तयार होईल. २-३ दणदणीत वाफा द्या.


हा चीक गरम असतानाच सोऱ्यात घालून कुरडया घाला. कुरडया घालताना सोऱ्याला तेलाचा हात लावा. खाण्यासाठी हा चीक उत्तम लागतो. चीकामध्ये गोडतेल घालून खा. खूप पौष्टिक व चविष्ट आहे हा चीक.

कुरडया कडक उन्हात वाळवा. सणासुदीला पानात डावीकडे तळण या प्रकारात कुरडई तळून ठेवा.

सजावट (१४)




blueberry, watermelon, apple, pear, cilantro

Monday, July 12, 2010

गोड लिंबू लोणचे



वाढणी: २ जण

पाककृतीला लागणारा वेळ: १५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

* लिंबू ६ (हिरव्या/पिवळ्या सालीचे)
* लाल तिखट पाव वाटी
* मीठ 1 वाटी
* साखर दोन वाट्या
* जीरे पूड अर्धा चमचा

क्रमवार मार्गदर्शन:

६ पैकी ५ लिंबाच्या प्रत्येकी चार किंवा आठ फोडी करून त्यात लाल तिखट, मीठ, साखर व जीरेपूड घालून चमच्याने ढवळा/एकत्रीत करा. या मिश्रणाची चव घेऊन जे काही कमी वाटत आहे (तिखट, मीठ साखर) त्याप्रमाणे अजून थोडे घालून ढवळा. नंतर काचेच्या बरणीमधे हे तयार झालेले लोणचे भरून ठेवा. बाटलीमधे भरल्यावर एक लिंबू चिरून त्याचा रस लोणच्यामधे पिळावा. लिंबाच्या फोडी मुरायला बराच वेळ लागतो पण लोणच्याचा खार २-४ दिवसात तयार होतो.

हे लोणचे उपासाला चालते. शिवाय मेतकूट-तूप-भात याबरोबर खायलाही छान लागते.

Saturday, July 03, 2010

गुलाबजाम

गुलाबजाम माझ्या स्वप्नात आला असे कधीच झाले नाही आणि होणारही नाही कारण की तो माझ्या अजिबातच आवडीचा नाही. आणि असेही गुलाबजाम हा काय स्वप्नात येण्यासारखा पदार्थ आहे का!? स्वप्नात येणारे पदार्थ म्हणजे आमरस, पुरणपोळी, श्रीखंडपुरी!! सासरीमाहेरी पण वरचेवर गुलाबजाम कधीच कुणी केले नाहीत.




मध्यंतरी डॉ कपूर यांच्याकडे एका मित्राला भेटण्यासाठी म्हणून जाण्याचा योग आला. तिथे त्यांनी बनवलेले गुलाबजाम खाल्ले आणि ते मला खूपच आवडून गेले. ५-६ गुलाबजाम आवडीने खाल्ले. माझ्या खाण्यात जर दुसऱ्याने बनवलेला पदार्थ आला आणि जर का तो मला खूपच आवडला तर मी लगेचच त्याची कृती विचारून घेते. डॉ कपूरांनी मला सविस्तर कृती सांगितली आणि मी पण त्यातल्या खाचाखोचा विचारून घेतल्या. गुलाबजाम बनवण्याकरता जे जिन्नस त्यांनी सांगितले होते ते आणले व आत्मविश्वासाने करायला घेतले. त्यांनी जे प्रमाण सांगितले होते त्याच्या अर्धे प्रमाण घेतले. पाकाबद्दल खात्री होतीच. सांगितलेले जिन्नस एकत्र करून गुलाबजामचे गोळे बनवले. मध्यम आचेवर कढई तापत ठेवून त्यात तेलही घातले. गुलाबजाम तळताना मंद आचेवर सावकाशीने तळावेत असे सांगितले होते म्हणून मी मुद्दाम जाड तळ असलेली कढई घेतली म्हणजे तेलही पटकन तापत नाही. तेल तापले आहे का नाही ते बघायला बनवलेल्या पिठाचा छोटा कण घातला तो हळूहळू करत तेलाच्या वर आला. आता हे अगदी बरोबर तापमान आहे. सावकाशपणे छान गुलाबजाम तळले जातील म्हणून तीन चार तेलामध्ये घातले. थोड्यावेळाने उलटले पाहते तो काय! कमी कमी होत जाऊन पार विरघळून गेले! अरेच्या हे कसे काय झाले? बहुतेक तेल नीट तापले नसावे म्हणून असे झाले असेल म्हणून अजून २-३ घातले तरी असेच परत. कढई दुसरीकडे ठेवून पटकन नेहमीची पटकन तापणारी पातळ तळ असणारी कढई ठेवली. यावेळी तेल थोडे जास्त घातले कारण गुलाबजाम तळायला थोडा वाव कमी पडला असेल आधी म्हणून असे झाले असेल असे वाटले. यावेळी मोजून दोनच गुलाबजाम तेलात सोडले. यावेळी तर घातल्या घातल्या पटकन विरघळले. होत्याचे नव्हते झाले! पूर्ण मूड ऑफ झाला. गॅस बंद केला. इतके सगळे व्यवस्थित अर्थात अंदाजानुसार निम्मे केलेले जिन्नस घेतले तरी हे असे व्हावे! एका कढईच्या तळाशी काळपट थर तर दुसऱ्या कढईच्या तळाशी काळपट चॉकलेटी थर! सर्व काही फेकून देण्याच्या लायकीचे झाले होते.


दुसऱ्या दिवशी आईशी फोनवर बोलताना सांगितले की मी एका पद्धतीने गुलाबजाम करून बघितले पण सर्व विरघळले. तू सांग ना मला गुलाबजामची कृती. रवामैद्याचे होतात का गं गुलाबजाम? आईने सांगितले की गुलाबजामाला खवा लागतो. खव्यात थोडा मैदा घालून तो दुधात भिजवायचा. पण इथे खवा नाही ना मिळत! खव्यावरून मला रिकोटा चीझची आठवण झाली. मी खव्याला पर्याय म्हणून रिकोटा चीझ वापरते व माझ्या पद्धतीने तशा काही पाककृतीही केल्या आहेत. नाहीतरी मला गुलाबजामचा प्रयोग करायचा होताच.


सकाळी फोन झाल्यावर जेवणानंतर शांत चित्ताने आईने सांगितलेल्या कृतीनुसार सुरवात केली. रिकोटा चीझ मैदा व दूध एकत्र केले. खरं तर दूध खूप काही घातले नाही कारण रिकोटा चीझ ओलसर असते त्यात आईने सांगितलेल्या प्रमाणानुसारच मैदा घातला व अगदी थोडे दूध घातले. एकत्र केल्यावर पीठ बरेच सैलसर वाटले म्हणून अजून थोडा मैदा घातला कारण की गुलाबजामचे गोळे व्यवस्थित बनायला पाहिजेत. आदल्यादिवशीचा विरघळण्याचा अनुभव होता. मला वाटले की पीठ वळण्या इतपत तरी घट्ट झाले पाहिजे. पाक केला. मध्यम आच ठेवून कढई व त्यात तेल घालून गोल वळलेले गुलाबजामही घातले. विरघळणे तर सोडाच पण जरासुद्धा इकडचे तिकडे हालले नाहीत. मला खूप आनंद झाला. चॉकलेटी रंगाचे गुलाबजाम खूप छान दिसत होते. पाकातही सोडले. डावेने ढवळले. थोडे मुरू देत मग चव घेऊ! थोड्यावेळाने बघितले तर पाक गरमच होता. विचार केला की चव बघायला काय हरकत आहे. पाक गुलाबजाम मध्ये शिरत आहे का नाही हे तरी कळेल. वाटीत घालून चमचा गुलाबजाम मध्ये घातला तर थोडा कडक लागला. खाल्ला तर पाक अजिबातच आत शिरला नव्हता. गरम पाकातच गुलाबजाम आणि तेही गरम असतानाच घालायचे असे सांगितल्यासारखेच केले तरीही पाक गुलाबजाम मध्ये शिरत नाही म्हणजे कमाल झाली! बहुतेक हे सर्व प्रकरण बिघडले आहे याचा अंदाज आलाच. पाक गार झाल्यावर चव घेतली तर पहिल्यापेक्षाही गंभीर परिस्थिती होती. खूप चिवट व कडक झाले होते. बाहेरून पाक होता तितकेच गोड.


आता कधीही या गुलाबजामच्या फंदात पडायचे नाही असे ठरवले पण चैन कुठे पडते! काही दिवसांनी परत एकदा गुलाबजामच्या जय्यत तयारीत. यावेळी पूर्णपणे माझा अंदाज वापरला. मूळ पाककृतीमधला एक जिन्नस बदलून दुसरा घेतला. बटर व दूधही थोडे कमीच घेतले. यावेळी मात्र एकदम छान!! अजूनही एक दोन प्रयोग केले की "खूपच "छान या सदरात मोडतील. त्यादिवशीचे गुलाबजाम किती छान झालेत ना! असे म्हणून एकेक करत लगेचच संपले. मूळ पाककृतीनुसारही एक दोन वेळा बनवणार आहे. किंचित सोडा घालतात असे ऐकीवात आहे. माझ्या अंदाजानुसार बनवले त्यात सोडा घातला नव्हता. तसेही मूळ कृतीमध्येही सोडा सांगितलेला नाही. दूध व बटरही अंदाजाने घेतले आहे त्यामुळे नेमके प्रमाण पाककृती लिहीन तेव्हाच. मूळ पाककृतीमध्ये दुधाची पावडर, बिस्व्किक, बटर व दूध सांगितले आहे. गुलाबजाम जमल्याचा आनंद आहे. जेवणानंतर स्वीट डिश म्हणून ही पाककृती तर अगदी उत्तम आहे याबद्दल वाद नाही!!

Tuesday, June 22, 2010

ओल्या नारळाच्या वड्या



वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

ओल्या नारळाचा खव २ वाट्या/स्वादची कोकनट पावडर
3-4 चमचे साजूक तूप
अदपाव वाटी दूध
सव्वा वाटी साखर (ज्यांना वड्या व्यवस्थित गोड हव्या असतील त्यांनी साखरेच प्रमाण दीड ते पावणेदोन वाट्या घ्यावे.)
साखर बुडेल एवढे पाणी
रिकोटा चीझ २/३ चमचे



क्रमवार मार्गदर्शन : एका पातेल्यात साखर व साखर बुडेल इतके पाणी घ्या व ते गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. त्याचवेळी दुसऱ्या पातेल्यात थोडे साजूक तूप, नारळाचा खव, दूध व रिकोटा चीझ घालून परतून घ्या. एकतारी पाक झाला की त्यात नारळाच्या खवाचे परतून झालेले मिश्रण घाला व कालथ्याने ढवळत रहा. थोड्यावेळाने साखर विरघळून मिश्रण घट्ट व्हायला लागेल. मिश्रण कडेने कोरडे झाले आणि घट्ट लागायला लागले की त्याचा एकत्र गोळा तयार होईल. गॅस बंद करून अजून थोडे मिश्रण घोटून घ्या. दोन ताटल्यांना साजूक तूप लावून घ्या व हे तयार झालेले मिश्रण ओता व कालथ्यानेच थोडे एकसारखे करा. नंतर तूपाचा हात घेऊन किंवा एका प्लॅस्टिकच्या कागदाला तूपाचा हात लावून मिश्रण एकसारखे थापा. कोमट असताना कालथ्याने किंवा सुरीने वड्या पाडा. मिश्रण खूप गार झाले की कापलेल्या वड्या कालथ्याने सोडवून डब्यात भरा.

खाऊ म्हणून न्यायला ह्या वड्या छान आहेत. या वड्या उपवासाला चालतात. तळून केलेल्या बटाट्याच्या चिवड्याबरोबर ही वडी छान लागते.

Wednesday, June 16, 2010

काजूवडी



वाढणी : १ जण

जिन्नसः

काजू पूड सव्वा वाटी
अर्धी वाटी साखर
पाव वाटी दूध
साजूक तूप १ चमचा

क्रमवार मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. त्यात १ चमचा तूप, काजूपूड, साखर व दूध घालून लगेचच हे मिश्रण कालथ्याने ढवळायला घ्या. सतत एकसारखे सर्व बाजूने ढवळत रहा. काही वेळाने मिश्रण कोरडे होऊ लागेल. ढवळताना कालथा जड लागायला लागेल. मिश्रण कोरडे होऊन जवळ येईल व गोळा होईल. एका ताटलीला थोडे साजूक तूप लावा व हे मिश्रण त्यावर घालून सर्व बाजूने एकसारखे थापा. कोमट असताना वड्या पाडा. १० ते १५ वड्या होतात. ही पाककृती खूप सोपी आहे आणि झटपट होणारी आहे.

ही पाककृती माझी नाही. माझ्या मैत्रिणीची आहे. तिचे नाव सायली जोशी. धन्यवाद सायली.

Thursday, May 27, 2010

गोड लिंबू लोणचे

लग्नानंतर आयायटीत वसतिगृहात राहिल्या लागल्यापासून जी काही छोटी मोठी सुट्टी मिळत असे तेव्हा आमची धाव नेहमी पुण्याकडेच असायची. माझी मोठी मामी त्यावेळेला दादरला रहायची तिच्याकडे अधुनमधून जायचो. ती नेहमी म्हणायची एकदा ये माझ्याकडे रहायला नेहमी पुण्याला पळत असतेच.

मामीकडे राहण्याचा योग लवकरच जुळून आला. विनायकला काही कामानिमित्ताने बाहेरगावी जायचे होते. विचार केला यावेळेला मामीकडे जाऊया. तिच्याकडे रहायला गेले आणि तिला म्हणाले मामी मला लिंबू लोणचे शिकवशील का? म्हणजे नेहमीचे नाही हं. गोड लिंबू लोणचे, मला ते खूप आवडते. म्हणाली मी तुला करूनच देते. १५ लिंबांचे करून देते. करताना बघ म्हणजे पुढच्यावेळी तू लोणचे घालशील तेव्हा सोपे जाईल. हे लोणचे तर खूपच सोपे असते. त्याकरता तुला दोन काचेच्या बरण्या लागतील त्या घेऊ आधी आपण आणि अजून आहेस ना ५-६ दिवस तेव्हा सावकाशीने घालू.

बाजारात लिंबांसाठी व बरण्यांसाठी फेरफटके मारले. बरण्या छानच मिळाल्या. चॉकलेटी रंगाच्या आणि त्याला लाल झाकण. जाड काचेच्या पारदर्शक ठेंगण्याठुसक्या बरण्या खूप छान दिसत होत्या. बरण्या घरी आल्यापासून आम्ही दोघींनी बरण्यांचे खूप कौतुक चालवले होते. कमी किंमतीत किती छान मिळाल्या ना! आकाराने पण वेगळ्याच आहेत, रंग पण नेहमीसारखा नाही, खूप वेगळा आणि छान! लिंबांकरता परत दुसऱ्या दिवशी भाजीमार्केटमध्ये फिरलो. इकडे बघ, तिकडे बघ, कितीला दिली लिंबे? खूप महाग आहेत. मामी भाजीवाल्यांकडचे लिंबू बघून वास घ्यायची, हाताने दाबून बघायची. मी खूप वैतागले होते. एक तर दादरला नेहमी गर्दी असते. एवढी काय चिकित्सा! मला तर कधी एकदा लिंबू कोणचे घालून खाते असे झाले होते! परत तिसऱ्या दिवशी आमच्या दोघींचे फेरफटके बाजारात! मला म्हणाली अगं लिंबू पण नीट बघून घ्यावी लागतात. खूप मोठी नकोत, लहानही नकोत. लिंबाचे साल पण पातळ हवे. शेवटी मामीला हवी तशी लिंबे मिळाली.

घरी आल्यावर जेवलो. दुपारचा चहा प्यायला मग लोणच्याला सुरवात. लिंबे धुवून घेतली. ती कोरड्या फडक्याने पुसली. विळी धुवून घेतली ती पण कोरड्या फडक्याने पुसली. बरण्या आधीच धुवून पुसून तयार होत्या. लिंबू सुद्धा चिरण्याची एक पद्धत आहे. उभे नाही चिरायचे, आडवे चिरायचे. मला तर त्यावेळेला उभे आडवे काहीच कळाले नाही! लिंबे चिरताना पण त्यावर दाब द्यायचा नाही, हलक्या हाताने चिरायची. त्यात लाल तिखट व मीठपण नेहमीचे मिसळण्याच्या डब्यातले घालायचे नाही कारण की हे उपवासाचे लोणचे असते. पूर्वी लाल तिखट वर्षाचे घालून ठेवलेले असायचे त्यातले लागेल तेवढेच लाल तिखट काढून ठेवले होते मामीने. मीठ पण उपवासाला वेगळे म्हणून ठेवलेले त्यातलेच वापरले.

लोणचे कालवले व बरण्यात भरले. रात्रीच्या जेवणाला म्हणले घ्यायचे का लोणचे ह्यातले. मामी म्हणाली अगं थांब मुरू देत जरा थोडेसे! दुसऱ्या दिवशी लोणच्याच्या खाराची चव बघितली. मामी किती छान झालयं गं लोणचे! मामी म्हणाली झालाय ना छान. आवडले ना तुला. आवडले म्हणजे काय मस्तचं झाले आहे. मी नेहमी घालणार आता हे लोणचे. मला खूप आवडते. दोन दिवसांनी घरी आल्यावर आम्ही दोघांनी लोणचे खाण्याचा जो सपाटा लावला की खार संपून लोणच्याच्या फोडीच शिल्लक राहिल्या. त्याही मुरल्यावर मस्त लागल्या.

त्यानंतर मी हे लोणचे कधी घातलेच नाही. लिंबाच्या लोणच्याचा मुहूर्त बरेच वर्षानंतर इथे अमेरिकेत आल्यावर लागला. भारतात असताना आई तर दरवर्षी नवीन लोणचे घातल्यावर जुने मुरलेले आम्हां दोघी बहिणींना द्यायची, मग मुद्दामून कोण घालतयं लोणचे! इथे सुद्धा दोनदाच घातले गेले. परत एकदा घालायचे आहे. दर वेळेला लिंबे आणते आणि घोकत राहते घालायचे घालायचे म्हणून, शेवटी ती अशीच पोहे उपम्यांवर पिळून संपतात!

Tuesday, May 18, 2010

टोमॅटो सूप




वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

लाल टोमॅटो छोटे ६,
छोटा अर्धा कांदा,
एक छोटा बटाटा
लाल तिखट,
मिरपूड,
साखर, मीठ


क्रमवार मार्गदर्शन: टोमॅटो, कांदा व बटाटा चिरून एका पातेल्यात घाला व त्यात ते बुडतील इतपत पाणी घालून कूकरमध्ये शिजवून घ्या. गार झाल्यावर त्यातील पाणी एका पातेल्यात काढा. बटाटा व टोमॅटोची साले काढून बटाटे टोमॅटो व कांदा मिक्सरमधून बारीक करून घ्या. नंतर हे मिश्रण गाळणीने गाळून घ्या. नंतर शिजवताना घातलेले पाणी की जे आधिच काढलेले आहे ते पण या गाळलेल्या मिश्रणामधे घाला.


नंतर या मिश्रणामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट, मिरपूड, मीठ व साखर घालून एक उकळी आणा. झाले सूप तयार.

टोमॅटो सूपास कांद्यामुळे तिखटपणा व बटाट्यामुळे दाटपणा येतो.

गाळून घेतल्यामुळे टोमॅटोतील बिया व मिक्सरमधे बारीक करताना जर बटाट्याचे तुकडे राहिले असतील तर ते सूपामध्ये येत नाहीत. एकजीव व दाट सूप होते. गरम गरम सूपामध्ये थोडे बटर घाला.



माहितीचा स्रोत:बहिण सौ रंजना जेरे

Friday, May 07, 2010

भरलेली चिली पोबलॅनो




जिन्नस :

चिली पोबलॅनो २
बटाटे मध्यम २
लाल तिखट अर्धा ते पाऊण चमचा
धनेजिरे पूड अर्धा ते पाऊण चमचा
मीठ
पाव लिंबू
लसूण २-३ पाकळ्या बारीक चिरून
कांदा थोडा बारीक चिरून
तेल
सजावटी साठी किसलेले चीझ

क्रमवार मार्गदर्शन : बटाटे उकडून घ्या. उकडल्यावर त्याची साले काढून हाताने बारीक करा. नंतर त्यात कांदा लसूण अगदी बारीक चिरून घाला. लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ घालून थोडे लिंबू पिळा. हे झाले मिरचीच्या आतमध्ये भरायचे सारण. मिरची धुवून कोरड्या फडक्याने पुसून घ्या व मध्ये एक चिर पाडा. आता तयार केलेले बटाट्याचे सारण चिर पाडलेल्या भागातून मिरचीमध्ये भरा. मध्यम आचेवर पसरट पॅन ठेऊन त्यात थोडे तेल घाला. ते तापले की लगेचच त्यावर भरलेल्या मिरच्या ठेवा. त्यावर झाकण ठेवा. आता आच एकदम मंद ठेवा. मंद आचेवर या मिरच्या शिजतील. अधून मधून झाकण काढून बघावे. नंतर थोड्यावेळाने अलगद मिरच्या उलटा व परत झाकण ठेवा. दुसऱ्या बाजून मिरची शिजेल. आता परत सुलट्या करा व शिजवा. मंद आचेवर मिरची शिजते.

मिरच्या गार झाल्या की एका ताटलीत काढून त्यावर किसलेले चीझ घाला. अशा पद्धतीची मिरची मेक्सीकन उपहारगृहामध्ये मिळते. पण ती उकडलेली असते. व आतील सारणात पण तिखट मीठ नसते. फक्त उकडलेले बटाटे बारीक करून घातलेले असतात. ही मिरची मी इंडीयन स्टाईलने केलेली आहे. जशी आपण भरली सिमला मिरची करतो तशीच पद्धत आहे. याची चव छान लागली. ही मिरची चवीला अगदी थोडी तिखट असते. आणि शिजल्यावर पण छान वास येतो. ही मिरची फ्राईड राईस किंवा मसालेभाताबरोबर छान लागते. नुसती सुद्धा खायला छान लागते.

Wednesday, April 28, 2010

घारगे





वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

लाल/पिवळा भोपळ्याचा कीस १ वाटी
गूळ १ वाटी
तांदुळाचे पीठ अर्धी वाटी
रवा अर्धी वाटी
कणीक अदपाव वाटी
साजूक तूप अर्धा चमचा

क्रमवार मार्गदर्शन: मध्यम आचेवर कढई ठेवा. कढईत थोडे साजूक तूप घालून भोपळ्याचा कीस व गूळ एकत्र करून शिजवून घ्या. शिजवताना त्यावर ताटली ठेवली तर पटकन शिजतो. शिजल्यावर गरम असतानाच त्या मिश्रणात पूरेल इतकेच तांदुळाचे पीठ, रवा व कणीक घालून व्यवस्थित ढवळा. ढवळल्यावर या मिश्रणाचा गोळा तयार होईल. नंतर अर्ध्या तासाने त्या मिश्रणाचे छोटे गोळे करून ते प्लॅस्टीकच्या कागदावर थोडासा तेलाचा हात लावून जाड थापा. थापताना तेलाचा हात घेऊन थापले तर पटकन थापले जातात. साधारण लहान पुरी एवढ्या आकाराचे हे घारगे तेलात मध्यम आचेवर लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या.

यामध्ये घेतलेले गुळाचे प्रमाण थोडे जास्त आहे असे वाटते, कारण खूप गोड झाले. ज्यांना खूप गोड आवडत नसेल त्यांनी गुळाचे प्रमाण निम्मे किंवा पाऊण घ्या.

घारग्यांवर गोठलेले साजूक तूप पसरवून खावे. हे घारगे श्रावणात सोमवारी संध्याकाळी उपास सोडताना नैवेद्याला करतात. ह्याबरोबर भाजणीचे तिखट वडेही करतात. तिखट वडे व गोड घारगे असा नैवेद्य असतो.

Tuesday, April 27, 2010

भरड्याचे वडे



वाढणी : २ जण

जिन्नस :

भरड्याचे/भाजणीचे पीठ २ वाट्या
तिखट १ चमचा
हळद अर्धा चमचा
चवीपुरते मीठ
थोडीशी चिरलेली कोथिंबीर

क्रमवार मार्गदर्शन : भरड्याचे पीठ एका ताटलीत घ्या व त्यामध्ये हळद, तिखट, मीठ व चिरलेली कोथिंबीर घालून हे मिश्रण चांगले कालवून घ्या म्हणजे तिखट मीठाची चव सर्व पीठाला लागेल. नंतर एका पातेल्यात २ वाट्या पाणी घालून ते मध्यम आचेवर गॅसवर ठेवा. पाण्याला उकळी आली म्हणजे पाण्याला बुडबुडे आले की गॅस बंद करा. त्यातले थोडे पाणी एका वाटीत बाजूला काढून ठेवा. नंतर त्यामध्ये कालवलेली भाजणी घालून पटापट ढवळा. ढवळताना ओले झालेले पीठ जर कोरडे वाटले तर काढून ठेवलेले पाणी त्यात घाला अन्यथा नको. नंतर त्यावर झाकण ठेवा. २ तास हे पीठ असेच मुरू देत. झाकण ठेवल्याने आतल्या आत जी पाण्याची वाफ आहे त्यात हे मीठ मुरते व शिजते. याला उमले करणे असे म्हणतात.


२ तासाने पीठ थोडे तेल व पाणी घेऊन मळून घ्या व त्याचे छोटे गोळे करा. एका प्लॅस्टिकच्या पातळ कागदावर तेल लावून हे गोळे त्यावर थापून एकेक करून लालसर रंगावर तळा. गोळे थापताना ते मध्यम आकाराचे करा. फार जाड नकोत व फार पातळ नकोत असे थापा. या वड्यांबरोबर लोणी अथवा दही खूप छान लागते. हे वडे घारगे/वडे या नैवेद्यासाठी करतात श्रावणी सोमवरी संध्याकाळी उपवास सोडताना. ही वड्यांची भाजणी वेगळी आहे. या भाजणीला भरडा असेही म्हणतात. कारण हे पीठ जाडसर भरड्यासारखे दळतात. ही थालिपीठाची भाजणी नाही. त्याची रेसिपी लवकरच देईन. मी ही भाजणी भारतातून आणली. इथे इंडीयन स्टोअर्स मध्ये मिळते का नाही ते माहिती नाही. थालिपीठाच्या भाजणीचेही अश्याच पद्धतीने वडे करतात पण त्यात लसूण घालतात. हे वडेही छान लागतात.

Thursday, April 22, 2010

मोकळ भाजणी



वाढणी : १ जण

जिन्नस :

थालिपीठाची भाजणी १ वाटी
लाल तिखट अर्धा ते पाऊण चमचा
हळद चिमूटभर
हिंग पावडर चिमूटभर
मीठ
चिरलेला कांदा १ वाटी
कच्चे/ भाजलेले दाणे अर्धी वाटी
तेल
फोडणीकरता मोहरी, हिंग, हळद
चिरलेली कोथिंबीर
ओला नारळ
साजूक तूप


क्रमवार मार्गदर्शन : एका ताटलीत थालिपीठाची भाजणी घ्या. त्यात लाल तिखट, हळद, हिंग व चवीपुरते मीठ घालून व पाणी घालून पीठ भिजवा. थालिपीठ बनवण्याकरता जसे पीठ बनवतो तसे पीठ बनवा. हा भिजवलेला पीठाचा गोळा थोडा सैलसर असावा. नंतर मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात जरूरीपुरते तेल घाला. तेल तापले की त्यात मोहरी, हिंग हळद घालून फोडणी करून त्यात चिरलेला कांदा घाला . नंतर त्यावर झाकण ठेवा व वाफेवर कांदा शिजवा. नंतर त्यात दाणे घालून थोडे परतून घ्या व भिजवलेल्या भाजणीचा गोळा घाला. हा गोळा कालथ्याने मोडून मोकळा करावा. नंतर त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदाने हे झाकण काढून परत कालथ्याने मिश्रण मोकळे करा. असे बरेच वेळा करा म्हणजे मिश्रण मोकळे होईल. एकीकडे सर्व बाजूने ढवळत राहा म्हणजे फोडणी सर्वत्र एकसारखी लागेल. थोडक्यात वाटली डाळीसारखीच ही कृती आहे.


मोकळी भाजणी तयार झाली की खायला देताना एका डीश मध्ये घालून त्यावर चिरलेली कोथिंबीर, ओला नारळ व साजूक तूप घालून द्यावी. सोबत लिंबाची फोड. ही एक चविष्ट व पौष्टिक पाककृती आहे.

Saturday, April 17, 2010

पास्ता

वाढणी:२ जणांना पाककृतीचे जिन्नस: पास्ता ३ मुठी भरुन नळकांडीच्या आकाराचा किंवा जो आवडेल त्या आकाराचा चिरलेला कोबी वाटीभर, चिरलेले गाजर १ वाटी चिरलेली सिमला मिरची १ वाटी मटारचे दाणे वाटीभर लसूण २-३ पाकळ्या चिरलेला कांदा ४ चमचे टोमॅटो सॉस ४२५ ग्रॅम, (hunt's किंवा spaghetii) जे आवडेल ते तेल, तिखट १ चमचा, धने-जीरे पूड १ चमचा, मोहरी, हिंग, हळद मीठ क्रमवार मार्गदर्शन: सर्वात प्रथम एका कढईत पास्ता पाणी घालून शिजवून घ्यावा. नंतर दुसऱ्या कढईत तेल घालून ते तापले की त्यात मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करावी. नंतर बारीक चिरलेल्या लसुण पाकळ्या व कांदा घालून नंतर बारीक चिरलेला कोबी, गाजर, सिमला मिरची उर्फ ढब्बू मिरची, व मटारचे दाणे घालून परतून घ्या व मंद वाफेवर शिजवा. (जशी भाजी शिजवतो तसे). नंतर त्यात १ चमचा लाल तिखट, १ चमचा धने-जिरे पूड व चवीप्रमाणे मीठ घालून परता. परतून झाल्यावर त्यात शिजवलेला पास्ता व टोमॅटो सॉस घालून ढवळा. नंतर एक दोन वाफा देऊन परत एकदा नीट ढवळून घ्या. गरम गरम पास्ता तयार! नंतर आवडीचे एखादे आयस्क्रीम खा. एका वेळचे दोघांचे मस्त जेवण होते. माहितीचा स्त्रोत : श्री राजेश गोस्वामी