Friday, March 22, 2013
लाल भोपळ्याची भाजी
जिन्नस :
लाल भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी ३ ते ४ वाट्या (पाण्याने धुवून निथळून घ्या)
दाण्याचे कूट २ मुठी
खवलेला ओला नारळ १ मूठ
चिरलेली कोथिंबीर २ ते ३ चमचे
लाल तिखट १ चमचा
मेथी दाणे पाव चमचा
मीठ
गूळ ३ ते ४ चमचे चिरलेला
मोहरी, जिरे,हिंग, हळद
मार्गदर्शन : मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. ते तापले की त्यात तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, हिंग,जिरे, मेथीचे दाणे, व हळद घालून फोडणी करा. फोडणीत अर्धा चमचा तिखट घाला. नंतर त्यात भोपळ्याच्या फोडी घालून डावेने ढवळून घ्या. नंतर अगदी थोडे पाणी घाला व एक वाफ द्या. नंतर त्यात अर्धा चमचा लाल तिखट, मीठ, गूळ घाला व परत एकदा भाजी ढवळून घ्या. नंतर त्यात पाणी घालून वाफेवर शिजवा. नंतर त्यात दाण्याचे कूट, खवलेला ओला नारळ, गूळ व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. परत थोडे पाणी घालून भाजी नीट ढवळा. ही भाजी पटकन शिजते. फोडी लगदा होईपर्यंत शिजवू नका. फोडी पूर्ण राहिल्या पाहिजेत. रस अजून हवा असल्यास अजून थोडे पाणी घाला.
लाल तिखट, मेथीचे दाणे व पुरेसा गूळ या मिश्रणाने ही भाजी चविष्ट लागते.
Thursday, March 07, 2013
खारातल्या मिरच्या
जिन्नस :
हिरव्या मिरच्यांचे तुकडे २ वाट्या
हळद ४ चमचे
हिंग पूड १ चमचा
मेथी पूड १ चमचा
मोहरीची डाळ अथवा मोहरीची पूड अर्धी वाटी
लिंबाचा रस पाव वाटी
मीठ १० ते १२ चमचे
तेल फोडणीसाठी अर्धी वाटी
मोहरी, हिंग, हळद
वर दिलेले मसाले तळण्यासाठी तेल ५ ते ६ चमचे
मार्गदर्शन : हिरव्या मिरच्या धुवून कोरड्या फडक्याने पुसून घ्या. मिरच्या एकदम कोरड्या झाल्या पाहिजेत. मिरच्यांची देठे काढा व मिरच्यांचे छोटे तुकडे करा. ते तुकडे एका ताटात घालून त्यात मोहरीची डाळ अथवा पूड घाला. चमच्याने मिश्रण एकसारखे करून ताटाच्या एका साईडला करून ठेवा. आता मध्यम आचेवर एक कढले तापत ठेवा. ते तापले की त्यात १ ते २ चमचे तेल घालून मेथी पावडर थोडी परतून घ्या. ही मेथी पावडर मिरच्यांच्या ताटात एका बाजूला काढून घ्या. आता परत कढले गॅस वर ठेऊन परत त्यात थोडे तेल घाला व हळद घालून परतून घ्या. परतलेली हळद त्याच ताटात बाजूला काढून घ्या. याचप्रमाणे हिंगही परतून घ्या. आता त्याच कढल्यात अर्धी वाटी तेल घाला. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा व गॅस बंद करा. ही फोडणी पूर्णपणे गार होऊ देत. मिरच्या व बाजूला परतलेले मसाले ज्या ताटात आहेत ते सर्व एकत्र कालवा. नंतर त्यात मीठ घाला व लिंबाचा रस घाला. आता परत हे मिश्रण हाताने/चमच्याने कालवून घ्या व ते एका बाटलीत भरा. गार झालेली फोडणी कालवलेल्या मिरच्या ज्या बाटलीत भरल्या आहेत त्या बाटलीत घाला.
गरम गरम आमटी भात, पिठले भात, शिवाय गोडाचा शिरा, पोहे, थालिपीठ या सर्वाबरोबर अधुनमधून खायला या खारातल्या मिरच्या खूप छान लागतात. तोंडाला खूप छान चव येते.
टीप : कमी तिखट असलेल्या मिरच्या घ्या.
Monday, March 04, 2013
मसालेदार बटाटे
जिन्नस :
बटाटे ४ (साले काढा)
लसूण १ पाकळी
आले छोटा तुकडा
कांदा थोडा
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
मिरपूड पाव चमचा
साखर १ चमचा
मीठ
दाण्याचे कूट १ ते २ मूठी
दही ५ ते ६ चमचे
हरबरा डाळीचे पीठ २ चमचे
तेल
मोहरी,जिरे, हिंग, हळद
चिरलेली कोथिंबीर थोडी
क्रमवार मार्गदर्शन : बटाटे मध्यम आकारामध्ये चिरा. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. ते तापले की त्यात फोडणीकरता तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी जिरे हिंग हळद घालून फोडणी करा. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली लसूण, आले व कांदा घाला व थोडे परतून घ्या. नंतर त्यात चिरलेले बटाटे घाला व परत थोडे परतून घ्या. नंतर त्यात थोडे पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवा.
आता दह्यामध्ये डाळीचे पीठ, लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला, मिरपूड, मीठ घाला व थोडे पाणी घालून नीट एकसारखे करून घ्या. पातेल्यातले बटाटे अजून नीट शिजण्याकरता परत त्यात थोडे थोडे पाणी घालून शिजवून घ्या. बटाट्यामध्ये पाणी घातले की त्यावर झाकण ठेवून ४-५ सेकंद ठेवत जा म्हणजे बटाटे चांगले शिजतील. आता मसाल्याचे केलेले दही घालून नीट ढवळा. परत झाकण ठेवा. आच मध्यम आचेवर असू दे. नंतर त्यात दाण्याचे कूट व चिरलेली कोथिंबीर घाला. मिश्रण एकत्र शिजल्यावर परत वरून थोडे परत लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला व मीरपूड घाला. १ चमचा साखर घाला. परत एकदा नीट ढवळा. मिश्रण अजून थोडे पातळ हवे असेल तर पाणी घालून मिश्रण अजून थोडे उकळू द्या. आता गॅस बंद करा. थोड्यावेळाने मसालेदार बटाटा काचेच्या बाऊलमध्ये घालून त्यावर चिरलेली कोथिंबीर घालून सजवा.
Thursday, February 28, 2013
भाज्यांचे कटलेट
जिन्नस :
श्रावणघेवडा
सिमला मिरची
गाजर
कोबी
मटार (अर्धी वाटी)
बटाटा १ किंवा २ (साले काढावीत)
लसूण पाकळ्या ४-५
आले छोटा तुकडा
चिरलेली कोथिंबीर २-३ चमचे
लाल तिखट १ चमचा
धनेजिरे पूड १ चमचा
गरम मसाला १ चमचा
मीठ चवीपुरते
कॉर्न प्लोअर २-३ चमचे
तांदुळ पीठ २-३ चमचे
डाळीचे पीठ २-३ चमचे
कॉर्न प्लोअर १ वाटी (घोळण्याकरता)
रवा जाड १ वाटी (घोळण्याकरता)
तेल १ वाटी
मार्गदर्शन : वर लिहिलेल्या भाज्या मध्यम आकाराच्या चिरा. ( ४ ते ५ वाट्या ) व धूऊन घेऊन कूकरमध्ये किंवा मायक्रोवेव्ह मध्ये उकडून घ्या. सोबत बटाटाही उकडून घ्या. उकडलेल्या सर्व भाज्या रोळीत घालून त्या खाली एक ताटली ठेवा. भाज्या पाणी निथळण्यासाठी रोळीत ठेवायच्या आहेत. पाणी सर्व निथळले की सर्व भाज्या एका परातीत घाला. त्यात बटाटा किसून घाला. नंतर यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला, मीठ व चिरलेली कोथिंबीर घाला. लसूण पाकळ्या, आले यांचे सुरीने खूप बारीक तुकडे करा व तेही सर्व भाज्यांमध्ये घाला. नंतर त्यात डाळीचे पीठ, तांदुळाचे पीठ, व कॉर्नचे पीठ घालून मिश्रण हाताने एकत्रित करा. वर दिलेली पीठे ही भाज्यामध्ये जास्त घालू नयेत. आता या मिश्रणाचे गोल व चपटे गोळे करा. एका ताटात रवा व कॉर्न फ्लोअर पसरून घ्या व त्यात हे गोळे एकेक करून घोळवून घ्या. आता मध्यम आचेवर एक तवा तापत ठेवा. त्यावर २-३ चमचे तेल घालून कालथ्याने पसरवून घ्या. त्यावर एका वेळी ३ ते ४ तयार केलेले कटलेट ठेवून
ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस दोन्ही बाजूने भाजून घ्या. कटलेट उलटले की परत थोडे तेल घालावे. टोमॅटो केचप बरोबर गरम गरम कटलेट खायला द्या. सोबत चहा हवाच !
उकडलेल्या भाज्यातले पाणी निथळूनही त्या जास्त ओल्या वाटल्या तर पेपर टॉवेल वर थोडावेळ घाला म्हणजे बाकीचे उरलेले पाणी शोषून घेतले जाईल. भाज्या जास्त ओल्या नसल्या की मग त्यात अगदी जरूरीपुरतेच वर लिहिलेली पीठे घालावीत.
Monday, February 18, 2013
रस्सा
जिन्नस :
एक मोठा बटाटा (साले काढावीत. )
अर्धा कांदा
दीड लाल टोमॅटो
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा धनेजिरे पूड
अर्धा चमचा गरम मसाला
४-५ चमचे दाण्याचे कूट
४-५ चमचे ओल्या नारळाचा खव
चवीपुरते मीठ
पाव चमचा साखर
तेल फोडणीसाठी
मोहरी, जिरे, हिंग, हळद
मार्गदर्शन : बटाटा, कांदा, टोमॅटो या सर्वाच्या मध्यम आकाराच्या फोडी करा. मध्यम आचेवर छोटा कूकर तापत ठेवा. तो तापला की त्यात तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात बटाटा कांदा व टोमॅटोच्या केलेल्या फोडी घाला. हे मिश्रण एकदा ढवळून घ्या. नंतर त्यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला, मीठ, साखर, दाण्याचे कूट, व ओला नारळ घालून परत हे मिश्रण डावेने नीट ढवळून घ्या. नंतर त्यामध्ये एक वाटी पाणी घाला. परत एकदा डावेने ढवळून घ्या. कूकरचे झाकण लावा. व एक शिट्टी करा. झटपट रस्सा तयार झाला आहे. गॅस बंद करा.
Labels:
झटपट बनणारे पदार्थ,
भाजी,
मी स्वयंपाकघरात नवीन आहे
Wednesday, February 13, 2013
अडाई
जिन्नस :
मूगडाळ पाव वाटी
हरबरा डाळ पाव वाटी
उडीद डाळ पाव वाटी
तुरीची डाळ पाव वाटी
तांदुळ पाव वाटी
अर्धा कांदा चिरलेला
हिरव्या मिरचीचे २-३ तुकडे/लाल वाळलेल्या मिरच्यांचे तुकडे
आले बारीक २-३ तुकडे
चिरलेली कोथिंबीर ४-५ चमचे
चिमुटभर हिंग पावडर
चिमूटभर मेथी पावडर
चवीपुरते मीठ
मार्गदर्शन : वर दिलेल्या प्रमाणात सर्व डाळी व तांदूळ एका पातेल्यात पाणी घालून त्यात भिजत घाला. ७-८ तासाने त्यातील पाणी काढून टाका व मिक्सर/ ग्राईंडर वर सर्व बारीक वाटून घ्या. वाटताना त्यात आले, मिरची कांदा व कोथिंबीर घाला. मिश्रण वाटताना त्यात जरूरीपुरतेच थोडे पाणी घाला. जास्त पाणी नको. नंतर हे मिश्रण एका पातेल्यात काढून घ्या. नंतर त्यात हिंग व मेथी पावडर घाला. चवीपुरते मीठ घाला. नंतर हे मिश्रण नीट ढवळून घ्या. आता मध्यम आचेवर एक तवा तापत ठेवा. व त्यावर एकेक करून अडाई डोसा करा. जाडसर किंवा पातळ आवडीप्रमाणे करा. खायला देताना त्यावर लोणी किंवा साजूक तूप घाला. सोबत सांबार, किंवा कोणतेही लोणचे, किंवा चटणी घ्यावी.
कांदा मिरची आले व कोथिंबीर वाटताना घातले नाही तरी चालेल. डोसा घालताना सर्व बारीक चिरून घातले तरी चालते. आवडीनुसार करावे.
अडाई खाण्याची पद्धत वेगळी आहे. अडाई वर 'चटणी पूड' नावाची कोरडी चटणी पसरतात व त्यावर तेल घालून त्याची गुंडाळी करून खातात. अडाई बरोबर गूळ खातात.
माहितीचा स्त्रोत : लक्ष्मी व उमा,, या कृतीत मी थोडेफार बदल केले आहे.
Tuesday, February 12, 2013
झटपट आमटी
जिन्नस :
तुरीची डाळ १ वाटी
अर्धा चमचा तिखट
अर्धा चमचा धनेजिरे पूड
अगदी थोडा गूळ
मीठ
फोडणीकरता तेल
मोहरी, हिंग, हळद
पाणी ३ वाट्या
थोडी चिरलेली कोथिंबीर
अर्धा कांदा चिरलेला
अर्धा टोमॅटो चिरलेला
१ मिरची चिरलेली
मार्गदर्शन : तुरीची डाळ पाण्यामध्ये ५-१० मिनिटे भिजत घाला. मध्यम आचेवर एक छोटा कूकर तापत ठेवा. तो तापला की मग त्यात फोडणीकरता तेल घाला. ते तापले की मग त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. नंतर लगेचच चिरलेली मिरची, कांदा व टोमॅटो घाला. थोडे परतून घ्या. नंतर त्यात तुरीची भिजलेली डाळ (डाळ भिजत घातलेली आहे, त्यातले पाणी काढून टाका. ) तिखट, धनेजिरे पूड, चवीपुरते मीठ व थोडा गूळ व चिरलेली कोथिंबीर घाला. हे सर्व मिश्रण पळीने नीट ढवळून घ्या. नंतर त्यामध्ये ३ वाट्या पाणी घालून परत एकदा नीट ढवळा. आता कूकरचे झाकण लावा व ३ शिट्ट्या करा व गॅस बंद करा. झटपट आमटी तयार झालेली आहे.
माहितीचा स्त्रोत : कु. गौरी जपे ( मावस पुतणी)
तुरीची डाळ १ वाटी
अर्धा चमचा तिखट
अर्धा चमचा धनेजिरे पूड
अगदी थोडा गूळ
मीठ
फोडणीकरता तेल
मोहरी, हिंग, हळद
पाणी ३ वाट्या
थोडी चिरलेली कोथिंबीर
अर्धा कांदा चिरलेला
अर्धा टोमॅटो चिरलेला
१ मिरची चिरलेली
मार्गदर्शन : तुरीची डाळ पाण्यामध्ये ५-१० मिनिटे भिजत घाला. मध्यम आचेवर एक छोटा कूकर तापत ठेवा. तो तापला की मग त्यात फोडणीकरता तेल घाला. ते तापले की मग त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. नंतर लगेचच चिरलेली मिरची, कांदा व टोमॅटो घाला. थोडे परतून घ्या. नंतर त्यात तुरीची भिजलेली डाळ (डाळ भिजत घातलेली आहे, त्यातले पाणी काढून टाका. ) तिखट, धनेजिरे पूड, चवीपुरते मीठ व थोडा गूळ व चिरलेली कोथिंबीर घाला. हे सर्व मिश्रण पळीने नीट ढवळून घ्या. नंतर त्यामध्ये ३ वाट्या पाणी घालून परत एकदा नीट ढवळा. आता कूकरचे झाकण लावा व ३ शिट्ट्या करा व गॅस बंद करा. झटपट आमटी तयार झालेली आहे.
माहितीचा स्त्रोत : कु. गौरी जपे ( मावस पुतणी)
Labels:
आमटी,
झटपट बनणारे पदार्थ,
मी स्वयंपाकघरात नवीन आहे
Friday, February 08, 2013
गुलाबजाम
जिन्नस :
गिटस गुलाबजामचे पाकीट १
दूध अर्धा वाटी (गरम करून कोमट करावे)
साखर २ वाट्या
पाणी पाऊण वाटी
तळण्यासाठी तेल
मार्गदर्शन : गुलाबजाम मिक्सचे पाकीटातील मिश्रण एका ताटात काढून घ्या व त्यात कोमट दूध घालून हे मिश्रण हाताने खूप मळून घ्यावे. भिजवलेले मिश्रण तासभर मुरवत ठेवावे. नंतर तुपाचा हात घेऊन या मिश्रणाचे खूप छोटे गोळे बनवून घ्या. नंतर कढईत साखर आणि पाणी घालून ही कढई गॅसवर ठेवा. आच मध्यम ठेवा. थोड्यावेळाने साखरेला उकळी येईल. उकळी आली की लगेच गॅस बंद करा. आता बनवलेले गुलाबजाम तळून त्या पाकात घाला व ढवळून घ्या. गुलाबजाम तळताना कढईत तेल घाला व कढई मध्यम आचेवर ठेवा. तेल तापले की गुलामजाम तळा. तळताना गॅस मंद ठेवा व ब्राऊन रंग येईपर्यंत तळा. गुलाबजाम पाकात घातले की तासाभराने ते पाकात चांगले मुरतील व खाण्यास देता येतील.
ज्यांना पाक आवडत नसेल, कोरडे गुलाबजाम आवडत असतील त्यांच्यासाठी....
पाकात गुलाबजाम मुरले की ते एकेक करून बाहेर काढावेत. एका ताटात साखर पसरावी व त्यात हे गुलाबजाम घोळवावेत म्हणजे ते कोरडे होतील.
Friday, January 25, 2013
गणपती २०१२
गणपती २०१२ चे फोटोज अपलोड करायचे राहून गेले होते,, तुम्हाला आवडतील अशी आशा आहे. मागच्या वर्षी भारतभेटीमध्ये मी पुण्याच्या तुळशीबागेतून गणपतीची मूर्ती आणली. ती आहे पंचधातूची. यावर्षी छोटी आरास करताना खूप छान आणि प्रसन्न वाटले होते. गणपतीच्या मूर्तीकडे आणि थोडक्यात केलेल्या सजावटीकडे परत परत पाहावेसे वाटत होते.
Monday, December 03, 2012
पाचक
जिन्नस :
लिंबाचा रस अर्धी वाटी
किसलेले आले अर्धी वाटी
साखर दीड वाटी
सैंधव मीठ पाव चमच्यापेक्षा कमी
मार्गदर्शन : वरील सर्व मिश्रण एकत्रित करा व चमच्याने ढवळून घ्या. बाटलीत भरून ठेवा. अधुनमधून बाटलीतले हे मिश्रण चमच्याने ढवळत रहा. पित्तशामक पाचक तयार. मळमळत असेल तर पाव ते अर्धा चमचा खा. बरे वाटेल. रोज सकाळी चहाच्या आधी खाल्ले तरी चालते. तोंडाला चव नसेल तर खा. बरे वाटेल.
Wednesday, November 28, 2012
पौष्टिक मुडाखि
वाढणी:२ जण
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस :
तांदुळ १ वाटी, अर्धी वाटी मुगाची डाळ, ३ वाट्या पाणी
१ वाटी गाजर व सिमला मिरचीच्या जाड फोडी
१ वाटी मटार, १ वाटी फ्लॉवरची मोठी फुले
१ वाटी जाड चिरलेला कोबी, ४-५ लसुण पाकळ्या, थोडे आले,
२ मिरच्या, बारीक चिरलेला कांदा २ चमचे, मीरपूड अर्धा चमचा, मीठ,
मोहरी, हिंग, जिरे, हळद, फोडणीकरता तेल
क्रमवार मार्गदर्शन: तांदुळ व डाळ पाण्यामध्ये धुवून रोवळीमधे १ तास निथळत ठेवा. नंतर लसूण, आले, मिरच्या व कांदा खूप बारीक चिरा. तेलाच्या फोडणीमधे बारीक चिरलेले आले,लसुण,मिरची,कांदा व मिरपूड घालून २-३ मिनिटे परतून घ्या. नंतर चिरलेल्या सर्व भाज्या व डाळ तांदुळ घालून परत २-३ मिनिटे परतून घ्या. नंतर या मिश्रणात डाळ तांदुळ प्रमाणाच्या दुप्पट पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून एकसारखे ढवळून घ्या व याची खिचडी करा. कूकरमधे खिचडी केली तर वाफ धरल्यावर लगेच गॅस बंद करा. शिट्टी करायची नाही.
मुडाखि म्हणजेच मुगाच्या डाळीची खिचडी हे सर्वांना माहिती आहेच.
अधिक टीपा:गरम व तिखट खिचडी खाताना बरोबर थंडगार दही घ्या. खिचडीबरोबर पाहिजे असल्यास टोमॅटो काकडीचे गोल काप, भाजलेला/तळलेला उडदाचा किंवा पोह्याचा पापड, कैरीचे लोणचे/लिंबाचे लोणचे असल्यास उत्तम !
Friday, November 16, 2012
हिरव्या टोमॅटोची चटणी
साहित्य :
हिरवे टोमॅटो - २
कच्चे दाणे - मूठभर
हिरव्या मिरच्या - ३
लसूण पाकळ्या - ६
तेल - पाव वाटी
जिरे - चिमूटभर (फोडणीपुरते)
मीठ चवीपुरते
कृती :
लसूण पाकळ्या व मिरच्या बारीक चिरून घ्या. तसेच टोमॅटोच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. मध्यम आचेवर तवा तापत ठेवा. तवा तापला की त्यावर २-३ चमचे तेल घालून कच्चे दाणे परतून घ्या व नंतर ते एका ताटलीत काढून घ्या. परत २-३ चमचे तेल घालून त्यावर चिरलेल्या मिरच्या व लसूण पाकळ्या घालून खरपूस परता व नंतर ताटलीत काढून घ्या. याप्रमाणेच तेलावर टोमॅटोच्या फोडी परतून त्या ताटलीत काढून ठेवा. हे सर्व मिश्रण गार झाले की त्यात चवीपुरते मीठ घालून मिक्सरवर बारीक करून घ्या. नंतर ही तयार झालेली चटणी एका बाऊलमध्ये घाला. मध्यम आचेवर एक कढले तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात २ चमचे तेल घाला व ते तापले की त्यात जिरे घाला. जिरे तडतडले की गॅस बंद करा. जिऱ्याची केलेली फोडणी चटणीवर घालून चमच्याने एकसारखे ढवळा. चटणी तयार झालेली आहे. इडली डोश्यासोबत ही चटणी छान लागते.
Wednesday, November 14, 2012
अळीवाचे लाडू
साहित्य :
अळिव पाव वाटी
दूध एक वाटी
नारळाचा खव ३ वाट्या
गूळ २ वाट्या
साजूक तूप १ चमचा
कृती :
दुधामध्ये अळिव १० ते १२ तास भिजत घालावेत. एका पातेल्यात भिजलेले अळिव, नारळाचा खव व गूळ एकत्र करा. नंतर मधम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात एक चमचा साजूक तूप घालून वर एकत्र केलेले मिश्रण घाला. कालथ्याने सर्व मिश्रण ढवळत राहा. थोड्यावेळाने गुळ वितळून मिश्रण पातळ होईल. आता आच मंद करा. थोड्यावेळाने मिश्रण कोरडे होईल व त्याचा गोळा बनायला लागेल. हे मिश्रण शिजताना एकीकडे कालथ्याने ढवळत राहा. आता गॅस बंद करा. थोड्यावेळाने लाडू वळा. पाव वाटी अळिवाचे १५ लाडू होतात.
ही माझी पाककृती मनोगत दिवाळी अंक २०१२ मध्ये प्रकाशित झाली आहे.
Labels:
पौष्टिक पदार्थ,
बाळंतिणीचा आहार,
मनोगत दिवाळी अंक 2012,
लाडू
Tuesday, November 13, 2012
अळूवडी
साहित्य :
अळूची पाने २
हरबरा डाळीचे पीठ २ वाट्या
चिंचगुळाचे दाट पाणी २ वाट्या
लाल तिखट दीड चमचा
हळद अर्धा चमचा
धने जिरे पूड अर्धा चमचा
तीळ १ चमचा
चवीपुरते मीठ
तळणीसाठी तेल
कृती :
अळूची पाने धुवून पुसून घ्या. पसरट भांड्यामध्ये डाळीचे पीठ घ्या. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, हळद, तीळ, मीठ व चिंचगुळाचे पाणी घाला व हे मिश्रण चमच्याने ढवळून घ्या. ढवळताना पीठाच्या गुठळ्या राहणार नाहीत हे पाहा. नंतर जरूरीपुरते पाणी घालून हे मिश्रण थोडे पातळ करा. मिश्रण पेस्ट सारखे झाले पाहिजे इतपत पाणी घालून पीठ भिजवा. नंतर अळूचे एक पान उलटे करून एका ताटात ठेवा. त्यावर हे मिश्रण सर्व पानाला एकसारखे पसरा. नंतर त्यावर दुसरे पान उलटे ठेवा. परत हे मिश्रण सर्व पानाला एकसारखे पसरून घ्या. नंतर या पानाच्या कडेच्या दोन्ही बाजूने दुमडून घ्या व त्यावर डाळीचे मिश्रण पसरून लावा. आता खालच्या बाजूने पान गुंडाळावे. प्रत्येक गुंडाळीला डाळीचे मिश्रण लावत जा. याप्रमाणे या पानाची मोठी गुंडाळी तयार होईल. नंतर ही गुंडाळी मध्ये सुरीने कापा. या दोन छोट्या गुंडाळ्या कूकरमध्ये शिजवून घ्या. & शिजवलेल्या गुंडाळ्या बाहेर काढून एका ताटलीत ठेवा व खूप गार झाल्यावर सुरीने याच्या मध्यम आकाराच्या गोल चकत्या करून तेलात तळून घ्या.
ही माझी पाककृती मनोगत दिवाळी अंक २०१२ मध्ये प्रकाशित झाली आहे.
ही माझी पाककृती मनोगत दिवाळी अंक २०१२ मध्ये प्रकाशित झाली आहे.
Thursday, November 08, 2012
टोमॅटो सूप
जिन्नस :
लाल टोमॅटो ४
बटाटा अर्धा
गाजर छोटे १
कोबी चिरलेला अर्धी वाटी
लसूण १ पाकळी
कांदा चिरलेला २ चमचे
जिरे थोडे
तेल
लाल तिखट
मिरपूड
मीठ
साखर २ चमचे
लोणी
मार्गदर्शन : लाल टोमॅटो, बटाटा, गाजर याच्या मध्यम आकाराच्या फोडी करा. लसूण बारीक चिरा. मध्यम आचेवर छोटा कूकर ठेवा. तो तापला की त्यात तेल घाला. तेल तापले की त्यात जिरे घाला. ते तडतडले की त्यात चिरलेला लसूण व कांदा घालून थोडे परता. नंतर चिरलेले टोमॅटो, बटाटा, गाजर, कोबी घालून थोडे परता. त्यात ३ वाट्या पाणी घालून कूकरचे झाकण लावा. कूकरची एक शिट्टी झाली की गॅस बंद करा. कूकर गार झाला की शिजलेले मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्या. हे पातळ मिश्रण एका पातेल्यात काढून घ्या व ते पातेले मध्यम आचेवर तापत ठेवा. त्यात अगदी थोडे लाल तिखट, २ चिमूट मिरी पावडर, चवीपुरते मीठ व साखर घाला व एक उकळी आणा. आता गॅस बंद करा. टोमॅटो सूप प्यायला देताना त्यात थोडे लोणी घालून द्या.
माहितीचा स्त्रोत : कु. गौरी जपे (माझी मावस पुतणी)
Wednesday, October 31, 2012
दुधी भोपळा
जिन्नस :
मध्यम आकाराचा दुधी भोपळा
पाव वाटी मुगाची डाळ
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
हिरवी मिरची चिरलेली २
दाण्याचे कूट मूठभर
ओल्या नारळाचा खव मूठभर
चवीपुरते मीठ
साखर १ ते २ चमचे
दूध अर्धा ते १ कप
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, हळद
मार्गदर्शन : भाजी करण्याच्या आधी थोडावेळ मुगाची डाळ पाण्यात भिजत घाला. दूधी भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात फोडणीसाठी तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा व लगेचच त्यामध्ये चिरलेल्या मिरच्या व मुगाची डाळ घालून थोडे परतून घ्या. आता दुधीभोपळ्याच्या फोडी घालून ढवळा. त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदांने झाकण काढा व त्यात अगदी थोडे पाणी घाला. असे अगदी थोडे थोडे पाणी घालून भाजी शिजवून घ्या. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ व साखर घाला. भाजी ढवळून घ्या. नंतर त्यात दाण्याचे कूट व नारळाचा खव घाला. व गार दूध घाला. दूध तापवून मग ते गार झाल्यावर घाला. आता परत झाकण ठेवा व थोड्यावेळ भाजी शिजू दे. थोड्यावेळाने झाकण काढा. आता ही भाजी चांगली मिळून मिसळून आलेली असेल. दाटपणाही आला असेल. दुध घातल्याने एक वेगळी चव येते. ही भाजी पोळीपेक्षाही गरम भाताबरोबर जास्त चांगली लागते.
Thursday, October 18, 2012
ढेपसे
जिन्नस :
वांग्याचे काप १५
डाळीचे पीठ १ वाटी
तांदुळाचे पीठ अर्धी वाटी
लाल तिखट दीड चमचा
धने जिरे पूड दीड चमचा
अगदी थोडा हिंग
हळद चिमूटभर
चवीपुरते मीठ
तेल पाव ते अर्धी वाटी
मार्गदर्शन : ढेपश्यांसाठी निमुळते वांगे लागते. या वांग्याच्या जाडसर गोल चकत्या करा व त्या पाण्यात टाका. सर्व चकत्या पाण्यात टाकल्यावर पाणी काढून टाका व चकत्या एका रोळीत ठेवा म्हणजे सर्व पाणी निथळून जाईल. एका भांड्यात डाळीचे पीठ, तांदुळाचे पीठ घ्या. त्यामध्ये लाल तिखट, धने जिरे पूड, हळद, हिंग व मीठ घाला. मीठ थोडे जास्त घालावे. नंतर वांग्याची एकेक चकती घेऊन तिला चमच्याच्या टोकाने टोचावे. दोन्ही कडून टोचावे म्हणजे त्याला चिरा पडतील. आता एका ताटलीत वर तयार केलेले पीठ पसरून घ्या व त्यावर एक चकती ठेवून त्यावर परत पीठ घालून हाताने दाबा. परत चकतीच्या दुसऱ्या बाजूनेही असेच पीठ घालून दाबा. हे पीठ दाबून जितके चकतीमध्ये बसवता येईल तितके बसवा. अश्या रितीने सर्व चकत्या करून घ्या. एकेक चकती झाली की एकावर एक ठेवा. १५ मिनिटांनी ढेपसे करायला घ्या. मध्यम आचेवर तवा तापत ठेवा. तो तापला की त्यावर २-४ चमचे तेल घाला व ते कालथ्याने सर्व तवाभर पसरवा. त्यावर एका वेळी २ चकत्या ठेवा. आता आच थोडी कमी करा व चकत्यांवर झाकण ठेवा. काही सेकंदानी झाकण काढा व चकत्या उलटून परत त्यावर थोडे तेल सोडा. चकतीच्या आजुबाजूनेही तेल सोडा व परत त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून परत त्यावर थोडे तेल घाला.
अश्या रितीने सर्व ढेपसे करून घ्या. चकत्यांवर झाकण ठेवल्याने वांग्याच्या चकत्या व त्यामध्ये दाबून भरलेले पीठ शिजते. चकत्या जाडसर चिरल्याने कुरकुरीत होतात. शिवाय तांदुळाच्या पीठानेही त्या कुरकुरीत होतात. हे ढेपसे गरम गरम खायला जास्त चांगले लागतात. गरम आमटी भाताबरोबर छान लागतात. अथवा चहासोबत खायला हरकत नाही.
Monday, October 15, 2012
डिंकाचे लाडू
जिन्नस :
तळलेला डिंक अर्धी वाटी
बदाम, पिस्ते, काजू प्रत्येकी २५
किसलेले गोटा खोबरे १ वाटी
अदपाव वाटी खसखस
अदपाव वाटी खारकेची पावडर
साजूक तूप १०-१२ चमचे
पिठीसाखर पाऊण वाटी
मार्गदर्शन : डिंक हरबरा डाळ किंवा तुरीची डाळ दिसते इतका बारीक करून घ्यावा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात २ ते ३ चमचे साजूक तूप घालून डिंक तळून घ्या. साजूक तूप थोडे थोडे करत घाला. एकदम घालू नका. नाहीतर मिरगटलेला वास येतो. डिंक तळून झाला की उरलेल्या तूपात बदाम, काजू, पिस्ते लालसर रंग येईपर्यंत परतून घ्या. सर्वात शेवटी खारकेची पूड उरलेल्या तूपात भाजून घ्या. डिंक तळण्याच्या आधी किसलेले गोटा खोबरे व खसखस भाजून घ्या. नंतर परतलेले बदाम, काजू, पिस्ते यांची मिक्सरवर पावडर करून घ्या. थोडी जाडसर असली तरी चालेल. डिंक तळला की छान फुलून येतो. तो हाताने चुरावा. भाजलेले खोबरे व खसखस चुरडावी किंवा मिक्सर मधून थोडी बारीक करावी. पिठीसाखर नसेल तर घरात असलेली साखर मिक्समध्ये बारीक करून घ्यावी. वरील सर्व मिश्रण एकत्रित करावे व लाडू वळावेत. लाडू वळले गेले नाहीत तर अजून थोडे साजूक तूप घालावे. पाहिजे असल्यास एकेका लाडवाला एकेक बेदाणा लावावा. हे लाडू ठिसूळ होतात. त्यामुळे अलगद हाताने डब्यात घालून ठेवावे. हि एक सोपी पद्धत आहे. तळून घेतलेल्या डिंकाचा चुरा जितका होईल त्याच्या दुप्पट बाकीच्या जिन्नसाची पावडर झाली पाहिजे. एका वाटीचा चुरलेला तळून घेतलेला डिंक असेल तर बाकीचा सुकामेवाचा चुरा दोन वाट्या झाला पाहिजे. थोडा जास्ती चालेल.
या सर्व मिश्रणाच्या निम्मी साखर घ्यावी. आवडीप्रमाणे बाकीचा सुकामेवाही घालावा.
Labels:
गोड पदार्थ,
पौष्टिक पदार्थ,
बाळंतिणीचा आहार,
लाडू
Wednesday, September 26, 2012
दोडका
जिन्नस :
२ मोठाले दोडके
अर्धी वाटी हरबरा डाळ
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
अगदी थोडा गूळ
चवीपुरते मीठ
नारळाचा खव मूठभर
दाण्याचे कूट मूठभर
तेल
मोहरी, हिंग, हळद
मार्गदर्शन : दोडक्याची साले काढून त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करा. हरबऱ्याची डाळ भिजत घाला. डाळ अर्धा तास भिजू दे. मधम आचेवर पातेले तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात तेल घाला. तेल तापले की त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा. दोडक्याच्या फोडी धुवून घ्या व नंतर त्या फोडणीत घाला. नंतर त्यात भिजलेली हरबरा डाळ घालून भाजी ढवळा व त्यावर झाकण ठेवा. झाकण ठेवले की भाजी शिजायला मदत होते. काही सेकंदाने झाकण काढून त्यात थोडे पाणी घाला व भाजी शिजवा. भाजी शिजत आली की त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, चवीपुरते मीठ घाला. नंतर थोडा गूळ, नारळाचा खव व दाण्याचे कूट घाला व भाजी एकसारखी ढवळून घ्या. परत थोडे झाकण ठेवा व भाजी शिजवा. काही सेकंदाने झाकण काढा. आता ही भाजी मिळून आली असेल व थोडी दाट दिसेल. गॅस बंद करा.
Thursday, September 13, 2012
शेपू (Dill)
जिन्नस :
शेपूच्या जुड्या २
पाव कांदा
१ टोमॅटो
अर्धी वाटी मुगाची डाळ
१ मिरची
२ ते ३ लसूण पाकळ्या
लाल तिखट पाव चमचा
धने जिरे पूड पाव चमचा
मीठ
तेल
मोहरी, हिंग, हळद
मार्गदर्शन :मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजत घाला. शेपू बारीक चिरून धुवून घ्या. धुवून घेतलेला शेपू चाळणीमध्ये ठेवा म्हणजे सर्व पाणी निथळून जाईल. कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची चिरून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात भिजलेली मुगाची डाळ घालून थोडे परता. नंतर त्यात चिरलेले लसूण कांदा मिरची व टोमॅटो घालून थोडे परतून घ्या. नंतर त्यात चिरलेला शेपू घाला व थोडे परता व ढवळून घ्या. नंतर झाकण ठेवा व वाफेवर भाजी शिजवून घ्या. ती नीट शिजली की त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड व मीठ घाला व भाजी सर्व बाजूने नीट ढवळा म्हणजे तिखट मीठ सर्व भाजीला एकसारखे लागेल. नंतर परत झाकण ठेवून भाजीला परत एक वाफ द्या. गॅस बंद करा. ही तयार झाली डाळ शेपूची भाजी तयार. ही भाजी पीठ पेरून पण छान लागते. भाकरीबरोबर ही भाजी खायला द्या.
Subscribe to:
Posts (Atom)


















