Friday, September 29, 2023

तळणीचे मोदक

 जिन्नस

ओल्या नारळाचा खव ३ वाट्या
साखर दीड वाटी
साजूक तूप अर्धा चमचा
दूध (ओला नारळाचा खव भिजेल इतपत)
कणिक १ वाटी
मैदा १ वाटी
२-३ चमचे मोहन (कडकडीत गरम तेल)
चिमूटभर मीठ

क्रमवार मार्गदर्शन : मंद आचेवर कढई ठेवा. त्यात साजूक तूप, दूध, नारळाचा खव व साखर घाला व सारण एकजीव करा. आता आच मध्यम करा आणि सारण एकसारखे ढवळत रहा. सारख वितळून ओल्या नारळात एकजीव झाली की सारण तयार होते. गॅस बंद करा. आता एका परातीत कणिक मैदा घ्या. त्यात थोडे मीठ टाका व कडकडीत तेलाचे मोहन घाला आणि पीठ भिजवा. पीठ भिजवायला पाणी थोडे लागते. पुरी करताना खूपच घट्ट कणिक भिजवायला लागते. कणिक घट्ट भिजवा पण खूप घट्ट नको. भिजवल्यावर हातात थोडे तेल घेऊन कणिक मळा.


अर्ध्या तासाने मोदक करायला सुरवात करा. भिजवलेल्या पिठाची बारीक गोळी करून खूप पातळ पुरी लाटा. त्यात सारण भरा आणि उकडीच्या मोदकासारख्याच सर्व बाजूने कळ्या पाडा आणि मोदक वळा. एकेक मोदक करून झाला की तो ओल्या फडक्यात ठेवा म्हणजे वाळणार नाहीत. आता मध्यम आचेवर कढई ठेऊन त्यात मोदक तळण्यासाठी तेल घाला. तेल व्यवस्थित तापू दे. तेल तापले आहे की नाही ते बघण्यासाठी त्यात पिठाचा छोटा कण घाला. तो लगेच वर आला की तेल तापले असे समजावे. आता आच परत मंद करा व सर्व मोदक तळून घ्या. त्यात एक करंजी पण तळा. वरील दिलेल्या साहित्यात ११ मोदक आणि एक करंजी होते. मोदक खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. बाप्पाला नैवेद्य दाखवा.


 

Wednesday, April 26, 2023

कोथिंबिरीची भजी

 जिन्नस:

चिरलेली कोथिंबीर २ वाट्या
हरबरा डाळीचे पीठ पाव ते अर्धी वाटी
पाव चमचा लाल तिखट
पाव चमचा धनेजिरे पूड
चिमूटभर हळद,
चवीपुरते मीठ
तेल अर्धा चमचा (गार किंवा गरम केलेले)
तळणीसाठी तेल

मार्गदर्शन : चिरलेली कोथिंबीर चाळणीत घालून धुवून घ्या. पाणी निथळण्यासाठी चाळणीखाली एक ताटली ठेवा. पाणी पुर्णपणे निथळायला हवे. नंतर ही चिरलेली कोथिंबीर एका भांड्यात काढून घ्या. त्यात  डाळीचे पीठ, चिमूटभर हळद, लाल तिखट, धनेजिरे पूड व चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण कालवा. नंतर अगदी थोडे पाणी घालून परत कालवा. हे मिश्रण थोडे सैलसर झाले पाहिजे. पातळ नको आणि घट्ट तर नकोच. नंतर यात अर्धा चमचा तेल (गार किंवा गरम) घाला. परत एकदा चमच्याने मिश्रण ढवळा. आता कढईत तेल तापत ठेवा. तेल पुरेसे तापले की त्यात चमच्याने एकेक करत भजी सोडा. आच मध्यम ठेवा. लालसर रंग येईपर्यंत भजी तळा व नंतर झाऱ्याने टिश्यु पेपर वर काढून घ्या म्हणजे तेल झिरपेल.

ही भजी खाताना कोथिंबिरीचा उग्रपणा चवीत आला पाहिजे म्हणूनच डाळीचे पीठ जास्त घालायचे नाही. याचप्रमाणे मेथीची व पालकाची भजी करा. मस्त लागतात. पालक-मेथी-कोथिंबीर याची चव भजी खाताना लागली पाहिजे.


 

Monday, April 24, 2023

लिंबू सरबत (साधे-सोपे आणि सर्वात श्रेष्ठ)

 

जिन्नस:
२ लिंबांचा रस
साखर १० चमचे
मीठ पाव चमच्यापेक्षाही खूपच थोडे (अगदी चिमूटभर नको)
पाणी ५ वाट्या
मार्गदर्शन : वरील सर्व जिन्नस एकत्र करून मिश्रण ढवळा. वर साखरेचे प्रमाण दिले असले तरी ते तुम्हाला हवे तसे घ्यावे. सरबत चवीला कसे पाहिजे यावर अवलंबून आहे. सरबत आंबट-गोड आणि किंचित खारट चव असलेले मला आवडते. लिंबांचा आकार, ते किती प्रमाणात रसदार आहे यावर साखर-मीठ आणि पाण्याचे प्रमाण ठरवावे. २ लिंबांचे २ ग्लास भरून सरबत होते. (फोटोतला ग्लास)
मी डोंबिवलीत रहात असतना २५ लिंबांचे घट्ट मिश्रण तयार करून ते फ्रीज मध्ये ठेवायचे. काचेची बरणी स्वच्छ धुवून कोरड्या फडक्याने पुसून घ्यावी. बरणी पूर्ण कोरडी पाहिजे. त्यात पहिल्यांदा मीठ पेरावे व नंतर तयार केलेले घट्ट मिश्रण ओतावे. बरणीचे झाकण घट्ट लावावे. जेव्हा सरबत करायचे असेल तेव्हा बरणीतून चमच्याने एका ग्लासमध्ये मिश्रण घ्यावे व त्यात पाणी घालून ढवळले की सरबत तयार.
बऱ्याच लिंबाचे सरबत बनवून ठेवायचे असेल तर लिंबाचा रस काढावा व वाटीने मोजावा. एका वाटीला अडीच वाट्या साखर घालावी म्हणजे ते टिकते. मीठही घालावे. बरणीत ओतण्या आधी मिश्रण डावेने नीट ढवळून घ्या.
सरबतासाठी मिश्रण घेण्या आधी डावेने बरणीच्या खालपासून मिश्रण ढवळावे. फ्रीजमध्ये ठेवलेले सरबताचे मिश्रण आठवड्यातून एकदा २ दिवसांनी डावेने बरणीच्या खालपासून ढवळून ठेवावा, नाहीतर साखर खाली बसते व आंबट लिंबाचा रस वर राहतो.
सरबत थंडगार हवे असल्यास बर्फाचे तुकडे घाला. लिंबू सरबत साखरेचे व पाण्याचे प्रमाण अगदी व्यवस्थितच हवे. सरबत पांचट तर नकोच नको, शिवाय ते अति आंबट व दाटही नको. साखरेची चव कळायलाच हवी. सरबत प्यायले की तुमचा मूड छान होणारच. बरे वाटत नसेल तर गरम पाण्यातून लिंबू सरबत द्यावे.
बाजारात बर्फाचे तुकडे तयार करण्यासाठी प्लॅस्टीकचे ट्रे मिळतात. ते आणून त्यात पाणी भरून ते फ्रीजर मध्ये ठेवा म्हणजे बर्फाचे तुकडे तयार होतील.
हिवाळ्यात आई १०० लिंबे आणायची व त्यात बरेच पदार्थ करत असे. लिंबाचे सरबत, गोड लोणचे, तिखट लोणचे, खारातल्या मिरच्या. Rohini Gore



Wednesday, April 12, 2023

पळीवाढं पिठलं

 जिन्नस :
हरबरा डाळीचे पीठ अर्धी ते पाऊण वाटी
लाल तिखट पाव चमचा
धनेजिरे पूड पाव चमचा
चवीपुरते मीठ
तेल २ ते ३ चमचे
लसूण पाकळ्या २ (बारीक चिरलेल्या)
१ मिरची ( तुकडे करून व बिया काढून)
कांदा पाव किंवा त्यापेक्षा थोडा कमी ( बारीक चिरलेला)
कढिपत्ता २-३ पाने
फोडणी करता मोहरी, जिरे, हिंग, हळद

क्रमवार मार्गदर्शन : एका भांड्यात डाळीचे पीठ, लाल तिखट, धनेजिरे पूड, (वर लिहिल्याप्रमाणे पाव चमचा,) चिमूटभर हळद, चिमुटभर हिंग आणि चवीपुरते मीठ एकत्र करून पीठ भिजवा. त्यात अडीच ते पावणे तीन वाट्या पाणी घालून पीठ कालवून घ्या. पिठाची गुठळी राहाता कामा नये. एका कढईत तेल तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घाला आणि लगेचच मिरची-लसूण-कांदा (चिरलेले) कडिपत्ता घाला व झाकण ठेवा. कांदा पटकन शिजण्याकरता अगदी थोडे पाणी घाला. कांदा लसूण शिजले की त्यात तयार केलेले डाळीचे पीठ घाला.

आता गॅसची फ्लेम तीव्र करायची आहे आणि कालथ्याने हे मिश्रण पटापट ढवळायचे आहे जेणेकरून सर्व मिश्रण एकसंध शिजले गेले पाहिजे. मिश्रणाला बुडबुडे आले की समजावे पिठलं तयार झाले आहे. तरीही अजून ढवळत रहा. मिश्रणातून वाफा यायला लागतील. आता गॅस बंद करा आणि लगेचच पिठलं पानात वाढून पोळीशी खा.असे हे गरम गरम, तिखट तिखट पिठलं खूप चविष्ट लागते. घसा शेकून निघतो आणि तोंडालाही चव येते.


 







Sunday, September 11, 2022

सणाला सजवलेली ताटे

 














फेबु नेहमीच त्या त्या दिवशीच्या आठवणी दाखवते. आत्ता पाहिले तर सणाला सजवलेली ताटे दिसली. आणि मी माझ्या ब्लॉगवर पाहिले तर ती ताटे तिथे नव्हती. मी ती लगेच अपलोड केली. काही पदार्थांना लेबल द्यायचे राहिले होते ते पण दिले. माझे मन भूतकाळात गेले. मनोगत मराठी संकेत स्थळ २००५ साली सुरू झाले आणि त्यानंतर काही दिवसांनी तिथे पाककृती विभाग सुरू झाला. मनोगतचे विदागर कोसळल्याने प्रशासकांनी सर्व सदस्यांना आपापले लेखन जतन करून ठेवा हे सांगितले होते. आणि त्यातूनच माझ्या ब्लॉगचा जन्म झाला. २००६ साली मी माझा " उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" हा रेसिपी ब्लॉग सुरू केला. त्यावेळी ब्लॉगचे वारे जोरात वाहत होते. मनोगतचे सदस्य श्री पेठकर काका यांनी एक चर्चा टाकली होती की आम्ही सर्व पदार्थ लिहितो तर कोण कोण पदार्थ करून बघतो? त्यावर काही प्रतिक्रियाही आल्या होत्या. आता ब्लॉग मागे पडत चालले आहेत. युट्युब वर थेट पदार्थ दाखवले जातात. खूप पूर्वी प्रत्येकीकडे एखादे रेसिपीचे पुस्तक असे. काही जणांनी/जणींनी मला पूर्वी सांगितले होते की तुझा ब्लॉग गुगल शोधात सापडला. काहींनी सांगितले की मी तुझा ब्लॉग बुकमार्क करून ठेवला आहे. अर्थात या सगळ्या आठवणी भूतकाळातल्या ! तर मला इथे असे विचारायचे आहे की कोण कोण माझा ब्लॉग फॉलो करते आणि कोणी कोणी यातले पदार्थ करून बघितले आहेत? कमेंट मध्ये लिहा. मुख्यत्वे करून मी सर्व पारंपारिक पदार्थ लिहिले आहेत. मराठी, मद्रासी, पंजाबी, बेकींग, मेक्सिकन, इटालियन या सर्व लेबल्स मध्ये ते ते पदार्थ आहेत. मी ज्याप्रमाणे पदार्थ करते त्याप्रमाणेच सर्व मोजमापे देते. माझी मोजमापे वाटी चमच्याची असतात.
मी पदाथांना दिलेली लेबल्स - मला कोशिंबीर खूप आवडते, मी स्वयंपाकघरात नवीन आहे, भाजी, लाडू, वडी, वडे, पाककृतींची ओळख, मेवामिठाई, बेकींग, पोहे, बाळंतिणीचा आहार, उन्हाळी, पदार्थ, तळलेले पदार्थ, उपवासाचे पदार्थ, खीर, घरगुती औषधोपचार, चमचमीत, डाळीचे पदार्थ, दिवाळीचा फराळ, पेय, दुधापासून बनलेले पदार्थ, इ. इ. Rohini Gore

Thursday, May 06, 2021

बदाम कतली

 १ वाटी बदाम (गरम पाण्यात ४ ते५ तास भिजत घाला. नंतर त्याची साले काढा. व मिक्सरमधुन बारीक वाटुन घ्या. वाटताना
मिश्रण बारीक व्हायला मदत होईल इतपतच दुध घाला. हे मिश्रण २ वाट्या होईल. )
२ वाट्या साखर

१ वाटी किसलेला खवा

१ चमचा साजुक तूप (पातळ करून )

मार्गदर्शन : बदामाची मिक्सर वर बारीक केलेले मिश्रण , साजुक तुप , साखर हे सर्व एकत्र करुन एका पातेल्यात घ्या. गॅस बारीक आच ठेवुन हे पातेले गॅस वर ठेवा. व सतत ढवळत रहा. खूप वेळ ढवळायला लागते. गॅसची आच सतत बारीक ठेवा. मिश्रण पातळ होउन साखर विरघळायला लागते. आणि नंतर हे मिश्रण एकत्र यायला लागते आणि ढवळताना घट्ट लागायला लागते. खुप घट्ट लागायला लागले  की मिश्रण जवळ येउन त्याचा सैलसर गोळा बनायला लागतो.  जेव्हा ढवळायला खुप जड लागायला लागले की गॅस बंद करून अजुनही खुप ढवळा. एकीकडे ताटलीला तुप लावुन ठेवा. त्यावर हे मिश्रण ओता आणि एकसारखे करा.

 

तुपाचा हात घेउन किंवा वाटिच्या मागच्या बाजुला तुप लावुन हे मिश्रण थापावे. थोड्यावेळाने मिश्रण कोमट झाले की वड्या पाडा. बदामकतली तयार झाली आहे. १ वाटी बदामाच्या १५ ते १७ वड्या होतात. चविला खुप चांगल्या झाल्या आहेत. पहिल्यांदाच केल्या आहेत. यापुर्वी पण केल्या आहेत पण त्यात बदाम आणि काजु एकत्र करुन केल्या होत्या.  वडी लेबल मध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या वड्यांची रेसिपी मिळेल.

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी किंवा कुणाकडे जाताना घरचा खाऊ म्हणुन न्यायला छानच ! 





Saturday, December 19, 2020

उडीद डाळीची भजी

 जिन्नस : उडीद डाळ अर्धी वाटी ( ८ तास 

पाण्यात
भिजत घाला. नंतर त्यातले पाणी काढून वाटा)
२ पाकळ्या लसूण (खूप बारीक चिरा)
४ मिरच्या (खूप बारीक चिरा. आतल्या बिया काढा. )
कडिपत्ता ५ ते ६ पाने ( अर्धी करा. )
चिरलेली कोथिंबीर ३ चमचे
अर्धा कांदा  (जाड चिरा)
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा धणे जिरे पूड
मीठ चवीपुरते

मार्गदर्शन : उडीद डाळ मिक्सर मध्ये घालून बारीक वाटा. अगदी जरूरीपुरतेच पाणी घाला. जास्त नको. पाणी कमी घातल्याने ही डाळ थोडी भरड वाटली जाते. वाटलेल्या डाळीमध्ये चिरलेल्या लसूण पाकळ्या, मिरच्यांचे तुकडे , कडिपत्ता व जाड कांदा घाला. शिवाय लाल तिखट, धणेजिरे पूड व मीठ घाला. चिरलेली कोथिंबीर घाला.  डाळीचे हे मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या. आणि लगेचच एका कढईत तेल तापत ठेवा. तेल व्यवस्थित तापले की चमच्याने भजी सोडा. व ब्राऊन रंग येईपर्यंत तळा. तळून झाल्यावर पेपर टॉवेलवर काढून ठेवा म्हणजे तेल शोषले जाईल. 

सर्वात महत्त्वाची टीप : तयार झालेल्या मिश्रणाची लगेचच भजी करावी नाहीतर भजी तेल पितात. शिवाय
वाटतानाही पाणी खुपच कमी घालावे. पीठ घट्ट व्हायला पाहिजे. भजी मस्तच लागतात. 

भज्या सोबत ओल्या नारळाची चटणी दह्यात कालवलेली उत्तम.    




Monday, March 23, 2020

दह्यातला दुधी

जिन्नस :
दुधी भोपळ्याच्या फोडी २ ते ३ वाट्या
टोमॅटो बारीक चिरलेला अर्धा मोठा
कांदा बारीक चिरलेला पाव
लसूण पाकळ्या ३ ते ४ (बारीक चिरलेल्या)
आलं बारीक तुकडा (बारीक चिरलेले
ओल्या नारळाचा खव अर्धी वाटी
दाण्याचे कूट अर्धी वाटी
चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
दही ३ ते ४ चमचे (पाणी घालून पातळ करा)
१ ते २ चमचे डाळीचे पीठ (पातळ केलेल्या दह्यामध्ये कालवून घ्या)
हिरवी मिरचीचे तुकडे ३ ते ४
फोडणीसाठी तेल (नेहमीपेक्षा थोडे जास्त)
फोडणीसाठी मोहरी, जिरे,हिंग, हळद,
लाल तिखट १ चमचा
धनेजिरे पूड १ चमचा
साखर २ चमचे
मीठ चवीपुरते
कढीपत्ता ४ ते ५ पाने

क्रमवार मार्गदर्शन : पातेल्यात फोडणीसाठी तेल टाकून ते गॅसवर ठेवा. आच मध्यम हवी. तेल पुरेसे तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा.

नंतर त्यात लगेच  चिरलेले आलं, लसूण, हिरव्या मिरच्यांचे तुकडे व कढीपत्ता घाला. नंतर लगेच बारीक चिरलेला कांदा, व टोमॅटो घाला व हे सर्व मिश्रण डावेने परतून घ्या. नंतर लगेचच दुधी भोपळ्याच्या फोडी घाला व परत एकसारखे ढवळून घ्या. आता झाकण ठेवा.

आच थोडी वाढवा. तेलाच्या फोडणीमध्ये घातलेले जिन्नस तेलामध्येच चांगले शिजू देत. आता झाकण काढून त्यात
अगदी थोडे  पाणी घाला.


परत पातेल्यावर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून दुधी भोपळ्याच्या फोडी नीट शिजल्या आहेत की नाही ते बघावे. त्या शिजल्या असतील तर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ व साखर घालून ढवळावे. थोडे पाणी घालून त्यात चिरलेली कोथिंबीर, दाण्याचे कूट व नारळाचा खवही घालावा. नंतर हे सर्व मिश्रण एकसारखे करून परत झाकण ठेवून शिजवावे. झाकण काढून त्यात पातळ केलेले दही आणि त्यात कालवलेले हरबरा डाळीचे पीठ हे मिश्रण घालावे. एकसारखे नीट ढवळून घ्यावे. आणि आता फक अजून एक वाफ द्यावी. आता गॅस बंद करा.

अशी ही तयार झालेली गरमागरम भाजी चवीला खूपच छान आणि चविष्ट लागते. ही भाजी स्वनिर्मित आहे. दूधीच्या दोन भाज्या आधीच लिहिल्या आहेत. एक दुधातली आणि दुसरी मुगाची डाळ घालून केलेली. आता परत काहीतरी वेगळेपणा आणण्यासाठी भाजी करून पाहिली.


सुकामेवादाणे लाडू (२)

जिन्नस :
भाजलेल्या सुकामेव्याचे कूट २ वाट्या ( cashews - almonds - pecans - pistachios - hazelnuts)
भाजलेल्या दाण्याचे कूट २ वाट्या   
साखर अर्धी ते पाऊण वाटी
साजूक तूप २ ते ४ चमचे

मार्गदर्शन : वरील सर्व जिन्नस एका भांड्यात एकत्र करून चमच्याने एकसारखे करा म्हणजे साखर सर्व बाजूने लागेल
मग हाताने हे मिश्रण एकत्रीत करून लाडू वळा. वरील मिश्रणाचे १८ लाडू होतात. लाडवामध्ये जो सुकामेवा घातला आहे ते डीशमध्ये आहेत.

टीपा :
साखर घालताना अर्धी वाटी आधी घालावी. नंतर मिश्रण हाताने/चमच्याने एकत्रीत करून आधी चव बघावी. खूपच अगोड वाटले तर परत थोडी घालावी.
साजूक तूप पण २ चमचे आधी  घालावे. नंतर सर्व मिश्रण हाताने/चमच्याने कालवून एकत्रीत करून लाडू वळावा. तो जर नीट वळता
आला नाही तरच नंतर २ ते ४ चमचे लागेल तितकेच तूप घालावे. लाडू वळण्या इतपतच तूप घालायचे आहे.
जास्त झाले तर तूपकट लागतात.

Thursday, December 26, 2019

भेंडीची रसाची भाजी



जिन्नस :


भेंडीच्या गोल आकाराच्या मध्यम चकत्या २ ते ३ वाट्या
चिंचेचा दाट रस अर्धी वाटी
दाण्याचे कूट अर्धी वाटी
गूळ ३ ते ४ चमचे
लाल तिखट १ चमचा
धनेजिरे पूड १ चमचा
मीठ चवीनुसार
मिरच्यांचे तुकडे ३ ते ४
कडीपत्याची पाने ५ ते ६
चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
फोडणी करता तेल पाव वाटी (तेल जास्त घेतल्याने भेंडीला तार सूटत नाही)
मोहरी,  जिरे, हिंग, हळद

क्रमवार मार्गदर्शन : कढईत तेल घाला व गॅस वर ठेवा. तेल तापले की त्यात मोहरी, हिंग, जिरे, हळद घाला. नंतर त्यात चिरलेल्या मिरच्या व कडिपत्त्याची पाने घाला. नंतर त्यात चिरलेली भेंडी घालून परतून घ्या. आता कढईवर झाकण ठेवा. १० मिनिटांनी झाकण काढून भाजी परत एकदा नीट परतून घ्या. ही भाजी व्यवस्थित शिजली की मग त्यात चिंचेचे पाणी, तिखट, धनेजिरे पूड, मीठ, गूळ, दाण्याच कूट घाला. शिवाय चिरलेली कोथिंबीर घाला. व परत एकदा नीट परतून घ्या. आता परत झाकण ठेवा व काही सेकंदाने काढून परता. आता या मध्ये जरूरीनुसार पाणी घाला व ढवळा. परत एकदा वाफ द्या. गॅस बंद करा. ही पळीवाढी रसाची भाजी चवीला छान लागते. पोळी भाकरी बरोबर खायला द्या.

Tuesday, May 07, 2019

पडवळाची भाजी

जिन्नस :

पडवळ १ मोठे
कांदा थोडासा बारीक चिरलेला
लसूण १ पाकळी बारीक चिरलेली
मिरच्यांचे तुकडे ४ ते ५, कडिपत्ता
१ छोटा टोमॅटो (चिरलेला)
नारळाचा खव मूठभर
चिरलेली कोथिंबीर मूठभर
हरभराडाळ मूठभर
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पावडर अर्धा चमचा
२ ते ३ चमचे चिरलेला गूळ
चवीनुसार मीठ

क्रमवार मार्गदर्शन : पडवळाची साले काढा व त्याच्या बारीक काचऱ्यासारख्या फोडी करून ही चिरलेली भाजी धुवून घ्या. नंतर एका पातेल्यात जरूरीपुरते तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात मिरच्यांचे तुकडे,लसूण, कडिपत्ता, कांदा व टोमटो घालून हे मिश्रण थोडे परतून घ्या. नंतर त्यात पाण्यात ४ ते ५ तास भिजलेली हरबरा डाळ घालून परता. नंतर त्यात अगदी थोडे पाणी घालून डाळ शिजवा. नंतर त्यात चिरलेल्या पडवळाच्या फोडी घाला व परतून घ्या. व ही भाजी अगदी थोडे पाणी घालून वाफेवर शिजवून घ्या. शिजल्यावर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, गूळ, मीठ, चिरलेली कोथिंबीर व नारळाचा खव घाला व अजून थोडे जास्त परतून घ्या.

  
आता परत थोडे पाणी घालून  शिजवा. शिजवताना पातेल्यावर झाकण ठेवा. झाकण ठेवले असता भाजी पटकन शिजायला मदत होते.
गॅस बंद करा. ही भाही पोळी किंवा भाताबरोबर खावयास द्या.
 
 

Tuesday, October 02, 2018

दुधी भोपळ्याची भाजी

 
 
 
जिन्नस :
 
दुधी भोपळ्याच्या फोडी ५ ते ६ वाट्या
मुगाची डाळ मूठभर (डाळ पाण्यात एक  ते २ तास भिजवावी)
हिरव्या मिरच्यांचे तुकडे ४ ते ५
लाल तिखट पाऊण चमचा
धनेजिरे पावडर पाऊण चमचा
कडिपत्ता ५ ते ६ पाने
चवीपुरते मीठ
गूळ मूठभर
कोथिंबीर २ ते ३ चमचे
ओल्या नारळाचा खव मूठभर 
दाण्याचे कूट मूठभर
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, जिरे, हळद


क्रमवार मार्गदर्शन :  पातेल्यात  जरूरीपुरते तेल घालून ते तापले की त्यात मोहरी, जिरे,  हिंग, हळद घालून फोडणी करा. त्यात मिरच्यांचे तुकडे, कडिपत्ता घाला व थोडे परतून घ्या. नंतर त्यात भिजवलेली मुगडाळ घाला व परतून घ्या. झाकण ठेवा व काही सेकंदाने
झाकण काढा व परत ढवळा. नंतर त्यात दुधी भोपळ्याच्या फोडी घालून परतून घ्या. मग परत एकदा झाकण ठेवा व एक चांगली वाफ द्या. नंतर झाकण काढून परत भाजी ढवळा. नंतर त्यात थोडे थोडे पाणी घालून वाफेवर ही भाजी चांगली शिजवून घ्या. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, गूळ, मीठ घाला व ढवळा.  परत थोडे पाणी घालून एक वाफ द्या. झाकण काढा. आता त्यात दाण्याचे कूट, कोथिंबीर, ओला नारळ घाला व भाजी परत एकदा नीट ढवळून घ्या. आता थोडे पाणी घालून एक दणदणीत वाफ येऊ देत.

झाकण काढा. भाजी तयार झालेली आहे. पोळी किंवा भाताबरोबर ही भाजी चांगली लागते.

Friday, September 14, 2018

Friday, August 31, 2018

बटाट्याचा चिवडा

जिन्नस
कडक उन्हात वाळवलेला बटाट्याचा कीस
तेल
लाल तिखट
मीठ
साखर
तळलेले दाणे

मार्गदर्शन : कढईत तेल घाला. ते तापले की त्यात वाळलेला बटाट्याचा कीस थोडा थोडा घालून तळा. नंतर तळलेला कीस पेपर टॉवेलवर घाला जेणेकरून जास्तीचे तेल निथळेल. आता दाणे तेलात घालून ते तळून त्यात घाला. गॅस बंद करा. हा तळलेला चिवडा ज्या पेपर टॉवेल वर घातला आहे तो पेपर टॉवेल काढून घ्या. नंतर त्यात चवीनुसार लाल तिखट, मीठ आणि थोडी साखर घालून हा चिवडा हाताने मोडून काढा. हातानेच कालवा म्हणजे सर्व बाजून तिखट मीठाची चव लागेल. हा चिवडा मधवेळेला ऑफीस मधून आल्यावर
खायला उपयोगी पडतो. नंतर चहा हवाच.

उन्हाळ्याच्या दिवसात हा बटाट्याचा कीस भरपूर प्रमाणात वाळवून ठेवता येतो. नंतर केव्हाही तळून चिवडा
बनवता येतो.

मला हा वाळवलेला बटाट्याचा कीस इंडियन स्टोअर्स मध्ये मिळाला. हा चिवडा उपवासाला चालतो.

Saturday, August 11, 2018

काहीतरी वेगळे

आजपासून मी ठरवलं आहे ते म्हणजे शनिवारी मला कामावर ऑफ डे मिळाला तर काहीतरी स्पेशल करायचे. त्यामुळे दिवस वेगळा तर जातोच पण वेगळी चव असलेलं जेवण जेवलो की ताजेतवाने वाटते आणि उत्साह वाढीस लागतो.

तीळकूट
कोथिंबीर भजी
कढी ( कढीमध्ये कांदा, लसूण, मिरची, टोमॅटो आणि कडिपत्ता घातला आहे.)
तोंडल्याची रस भाजी
मूगतूर डाळीचे धिरडे
आंब्याच्या फोडी
तांदुळाचे खिचे (तळून)




Saturday, February 25, 2017

खोबऱ्याची वडी आणि पेढा यांचे लग्न

अंगत पंगत या ग्रुपवर एकांनी गुलाबजाम आणि जिलबीचे लग्न लावले होते . ते वाचले आणि अशीच काही कल्पना करून मला लिहावेसे वाटले. ते मी इथे शेअर करत आहे.
मोदक आणि निवगरी यांची कन्या खोबऱ्याची वडी हिचा विवाह निश्चित झाला. माहीम हलवा आणि सुतरफेणी यांचा मुलगा मलई पेढा या तिघानांही मुलगी पसंद पडली. आम्हाला खूप साध्या पद्धतीने लग्न करायचे आहे आणि हो अगदी फक्त सख्य्या नातेवाईकांनाच बोलवायचे असा दोघांचाही आग्रह होता. फक्त आमची भांवडेच आम्हाला हवीत. बाकी कोणीही नको. नाहीतर तुमचे रुसवे फुगवेच जास्त होतात. त्यांना तुम्ही वेगळे रिसेप्शन द्या. खोबऱ्याची वडी आणि पेढा पिढीजात श्रीमंत असल्याने दोघेही नोकरी करत नव्हते.खोबरी वडीचा नारळाच्या झाडांचा पिढीजात बिझिनेस होता तर पेढ्याचा मेवामिठाईचा पिढीजात बिझिनेस होता.
लग्नामध्ये जास्त बडेजाव नको. पक्वान्ने नकोत असे त्यांचे म्हणणे दोघांच्या आईवडिलांनी मान्य केले.
छोटेखानी मंडप मोदकाच्या घराच्या अंगणातच सजवला गेला. खोबऱ्याच्या वडीला बहीणी खूप होत्या. मामे, मावस, चुलत बहीणी. पेढ्याला मात्र फक्त ३ सख्य्या बहीणी होत्या. खोबऱ्याची वडी आणि पेढा यांनी एकत्र येऊन काय हवे आणि काय नको हे ठरवले आणि त्यांचे " शुभमंगल" झाले.
लग्नाच्या आधी एक दिवस मोदकाच्या घरासमोरचे अंगण तांदुळाच्या पिठीने सारवले गेले. त्या अंगणात साधेच परंतु खूप शोभिवंत सुरळीच्या वडीचे जाजम टाकण्यात आले. जाजमावर कोथिंबिरीची पाने होती. किसलेल्या ओल्या नारळाची छोटी पांढरी शुभ्र फुले होती. आणि छोट्या हिरव्यागार मिरच्यांची किनार होती. एकेक मंडळी लग्नाकरता सजली. खोबरी वडीची एक मानलेली बहिण काजूकतली तिच्या साडीवरच्या चांदीच्या वर्खाने खूप उठून दिसत होती. चुलत बहिणी अनुक्रमे गाजरवडी, भोपळ्याची वडी आणि टोमॅटो वडी यांनी ठरवून शेंदरी रंगाच्या पण थोडी शेड वेगळी असलेल्या साड्या परिधान केल्या होत्या. खोबरी वडीच्या मावसबहीणी अनुक्रमे कोथिंबीर वडी आणि अळू वडी यांनीही ठरवून एक रंग ठरवला आणि तो म्हणजे हिरवा. वेगवेगळ्या शेडच्या साड्या आणि त्यामध्ये विटकरी फिरता रंग होता. त्यामुळे या दोघी बहिणी सगळ्यांच्यात खास उठून दिसत होत्या.
पेढ्याच्या बहिणींनी मात्र भरजरी शालू नेसले होते. वराच्या बहीणी शोभायला नकोत का? पिस्ता बर्फीने तिच्या खास ठेवणीतला पिस्ता रंगाचा शालू नेसला की ज्याचा रंग सगळ्यांमध्ये शोभून दिसेल. आंबा बर्फी सगळ्यात धाकटी. तिने आंब्याच्या रंगाची खूप भारीतली साडी नेसायचे ठरवले होते. तिला शालूचा भपका तितका पसंत नव्हता. सगळ्यात मोठ्या मलई बर्फीने खास आपल्या भावाच्या लग्नानिमित्त क्रीम रंगाचा शालू खरेदी केला होता. त्यावर पिस्ता, बदाम, काजू यांचे अंगभर बुट्टे होते.
खोबरी वडीला अजिबात सजायचे नव्हते. पण सगळ्यांचा आग्रह पडला की निदान यादिवशी तरी तिने थोडेसे नटावे. म्हणून मग तिने थोडासा पिवळसर रंग आणि त्यावर किसलेले बदाम काजू पिस्ते व चारोळ्यांची नक्षी असलेली साडी तिच्या पसंतीने घेतली. या साडीला केशराची किनारपट्टी होती. पेढ्यानेही त्याचा पिवळ्या रंगाचा खानदानी झब्बा घातला आणि बोटात पिस्ते, काजू आणि बदामाच्या अंगठ्या घातल्या.
खोबरी वडीच्या मामेबहिणी अनुक्रमे खसखस वडी, आले वडी यांनी पण आपला वेगळेपणा दाखवण्यासाठी फिकट चॉकलेटी रंगाचे पंजाबी सुट घातले होते. असे केल्याने मंडपात बहिणी बहिंणीमध्ये थोडी कुजबुज सुरू झाली. आपण सगळ्यांच्यात उठून दिसावे म्हणून नेहमीच या दोघीजणी काही ना काही करत असतात. पण आज लग्नाच्या दिवशी तरी त्यांनी असे करायला नको होते. ही कुजबूज आले वडीच्या कानावर आली आणि ती फणकारली आणि म्हणाली घरातच तर साध्या पद्धतीने लग्न आहे मग कशाला एवढा दिमाख दाखवायचा. मोदकाने आणि निवगरीने मात्र त्या दोघींना सांभाळून घेतले.
खोबरी वडी व पेढा यांनि गुरूजींना बोलवायचे नाही. घरीच तुम्ही सर्वांनी मिळून मंगलाष्टके म्हणा आणि आम्ही एकमेकांच्या गळ्यात हार घालू असे सांगितले होते. त्यामुळे एक माहेरचे आणि एक सासरचे मंगलाष्टक् म्हणले. बारीक शेवयांनी विणलेला आंतर्पाट होता तो आंबा बर्फी आणि काजूकतली या दोघींनी मिळून धरला होता. मंगलाष्टक झाल्यावर दोघांनी एकमेकांच्या गळ्यात रंगीबेरंगी हलव्याच्या माळा घातल्या. पेढ्याने खोबरी वडीच्या गळ्यात मनुकांचे मंगळसूत्र घातले आणि टुटीफ्रुटीच्या लाल रंगाचे कुंकू लावले. बडीशेपेच्या रंगीबेरंगी छोट्या गोळ्यांच्या अक्षता होत्या.
त्या दोघांना बाकीचे सोपस्कार म्हणजे लाजा होम, सप्तपदी असे काहीही नको होते लग्नानंतर जेवणाची तयारी झाली. पाटवड्यांचे पाट मांडण्यात आले. त्यापुढे ढोकळ्याचे चौरंग मांडले. त्यावर बत्ताशाचे ताट मांडले गेले. सगळे जण पाटावर बसले आणि त्या दोघांच्या आईवडिलांनी सगळ्यांना आग्रह करून वाढले. जेवणामध्ये फळफळावळ, उसळी, आंबट गोड भाज्या, सलाड, फुलके, भाकऱ्या आणि स्वीट डीश म्हणून साखरभात आणि नारळीभाताच्या मुदी. हा जेवणाचा बेत नवरानवरीनेच ठरवला होता.
लग्न साध्या पद्धतीने तरी पण थाटामाटात पार पडले. रितीरिवाजाप्रमाणे खरे तर खोबरीवडीने पेढ्याच्या घरी जायला पाहिजे पण पेढा जायला निघाला खोबरीवडीच्या घरी. हे गुपीत मात्र दोघांनीही लपवून ठेवले होते. लग्न झाले की सांगायचे असे ठरवले होते. पेढा खोबरी वडीच्या घरी जायला निघतोय हे माहिम हलवा आणि सुतरफेणीला अजिबात पसंत नव्ह्ते. पण पेढा म्हणाला आईबाबा मी काही कायमचा चाललेलो नाहिये. काही महिने मी त्यांच्याकडे राहणार आणि काही महिने ती आपल्याकडे येऊन राहणार आहे. असे आमच्या दोघांच्या मतांनी आम्ही लग्ना आधी फिरायला जायचो तेव्हाच ठरवले आहे. निदान काही महिने तरी खोबरी वडी आपल्याकडे राहील या सांगण्यावर ते तयार झाले खरे पण त्यांना ते तितके पटलेले दिसत नव्हते. खोबरी वडी म्हणाली की तुम्ही काही काळजी करू नका मी नक्किच तुमच्याकडे रहायला येणार आहे. आम्ही दोघांनी ठरवले आहे की वर्षातले काही महिने मी तिकडे व तो इकडे राहील आणि असाच आमचा संसार सुरू राहील म्हणजे आमच्या घरात पेढाही रूळेल आणि मी तर तुमचीच आहे की !
आपली मुलगी साधी आणि आधुनिक विचारांची आहेच पण आपल्याला जावई पण साधाआणि आधुनिक विचारांचा मिळाला आहे हे पाहून मोदक आणि निवगरी खूप सुखावले गेले.

Tuesday, December 29, 2015

ढोकळा



जिन्नस :

१ वाटी हरबरा डाळीचे पीठ
१ चमचा किसलेले आलं
१ चमचा किसलेला लसूण
अर्धा चमचा साखर
२ चमचे लिंबाचा रस
चवीपुरते मीठ
पाव ते अर्धा चमचा इनो
१ चमचा तेल
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, हळद
सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर



मार्गदर्शन :डाळीच्या पीठ एका वाडग्यात काढून घ्या. त्यात पाणी घालून कालवा. कालवताना त्यात पीठाची एकही गुठळी राहता कामा नये. नंतर त्यात किसलेले आले, लसूण घाला. नंतर त्यामध्ये लिंबाचा रस, साखर व चवीपुरते मीठ घाला. अजून थोडे पाणी घालून सर्व मिश्रण  एकजीव करा. नंतर त्यात तेल घाला व परत एकदा थोडे पाणी घालून ढवळून घ्या. हे मिश्रण इडलीच्या पीठाइतपत पातळ हवे. आता हे मिश्रण झाकून ठेवा व अर्ध्या तासाने याचा ढोकळा बनवायला घ्या. कूकरमध्ये पाणी घालून कूकर मध्यम आचेवर तापत ठेवा. तयार केलेले डाळीच्या मिश्रणात इनो घाला व ढवळा आणि हे मिश्रण कूकरमधल्या एका भांड्यात ओता. त्या आधी कूकरच्या भांड्याला तेल लावून घ्या. आता हे  भांडे कूकरमध्ये ठेवा व झाकण लावा. झाकण लावताना त्याची शिटी काढून घ्या. २० मिनिटांनी गॅस बंद करा. मिश्रण गार झाले  की त्याच्या वड्या कापा आणि त्यावर फोडणी करून घाला. सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर पेरावी. हलकाफुलका ढोकळा तयार झाला आहे. आफीसमधून दमून आल्यावर झटपट काहीतरी खायला बनवण्यासाठी हा ढोकळा छान आहे. चहासोबत ढोकळा खायला घ्या. दमलेला जीव फ्रेश होईल.

Thursday, August 13, 2015

मसाला पापड



उडदाचा पापड तळावा. एका डिशमध्ये उडदाचा पापड ठेवा. त्यावर कांदा व टोमॅटो बारीक चिरून घाला. नंतर त्यात चिमूटभर लाल तिखट, धनेजिरे पूड, व चवीपुरते मीठ पेरा. कोथिंबीर बारीक चिरून घाला. चिमूटभर साखरही पेरा. अजून तुम्हाला ज्याप्रमाणे अधिक सजवायचे असेल त्याप्रमाणे पापड सजवा.


उदा. पापडावर बारीक शेव पेरता येईल. तसेच ताजा ओला नारळही पेरता येईल.   जेवणाच्या आधी हा पापड खाल्यास नंतरचे जेवण अधिक रूचकर लागेल. खूप कंटाळवाणे झाले असेल तर असा सजवलेला पापड खाल्यावर उत्साह येईल.



Tuesday, March 10, 2015

मसाला वांगी


जिन्नस :

बारीक चिरलेली वांगी ३ वाट्या
मध्यम चिरलेला कांदा पाऊण वाटी
मध्यम चिरलेला टोमॅटो पाऊण वाटी
पाउण चमचा लाल तिखट
पाऊण चमचा धनेजिरे पूड
पाऊण चमचा गरम मसाला
चवीपुरते मीठ
फोडणीकरता तेल, मोहरी, हिंग, जिरे, हळद
दाण्याचे कूट मूठभर
सजावटीसाठी कोथिंबीर
अर्धा चमचा साखर



मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात नेहमीपेक्षा थोडे जास्त तेल घाला.  ते तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात चिरलेले वांगी, टोमॅटो व कांदा घाला व भाजी ढवळा. आता कढईवर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून परत एकदा भाजी ढवळा. आता अगदी जरूरीपुरतेच थोडेसेच पाणी घाला व परत झाकण ठेवा. एक दणदणीत वाफ येऊ देत म्हणजे वांगी चांगली शिजतील. आता त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला, मीठ  व दाण्याचे कूट घाला. परत एकदा भाजी ढवळून घ्या. तेल कमी वाटले तर परत घाला. नंतर परत काही सेकंदाची वाफ द्या. आता अर्धा चमचा साखर पेरून भाजी ढवळा. भाजी बाऊलमध्ये काढून त्यावर कोथिंबीर पेरा. ही भाजी खूप चविष्ट लागते. या भाजीवर तेलाचा चांगला तवंग आला पाहिजे हे विषेश आहे. तरच ही भाजी चांगली लागते.

Friday, March 06, 2015

थालिपीठाच्या भाजणीचे घावन


जिन्नस
  • थालिपीठाची भाजणी २ ते ३ मूठी
  • लाल तिखट १ चमचा, हळद अर्धा चमचा, चवीपुरते मीठ
  • अर्धा कांदा बारीक चिरलेला
  • पीठ भिजवण्यासाठी पाणी
  • तेल
 मार्गदर्शन:

 वरील सर्व मिश्रण एकत्र करा व पीठ भिजवा. हे पीठ खूप पातळ भिजवा. गॅसवर तवा तापत ठेवा. तो पुरेसा तापला की त्यावर चमच्याने थोडे तेल टाकून तवाभर पसरवा. नंतर डावेने भिजवलेले पीठ तवाभर  घाला. काही सेकंदाने त्यावर थोडे तेल टाका. शिवाय घावनाच्या कडेनेही तेल टाका. काही सेकंदाने  कालथ्याने घावन सोडवून मग ते उलटवावे. व नंतर परत थोडे तेल घाला व काही सेकंदाने घावन तव्यावरून काढा.