जिन्नस :
पातळ पोहे ३ मुठी
चिरलेला कांदा मूठभर
चिरलेला अर्था टोमॅटो
साखर अर्था चमचा
लिंबू पिळून २/३ चमचे
मीठ चवीनुसार
फोडणी साठी तेल, मोहोरी, जिरे, हिंग, हळद
कच्चे दाणे मूठभर
चिरलेली कोथिंबीर २/३ चमचे
खवलेला ओला नारळ २/३ चमचे
लाल तिखट १ चमचा
क्डीपत्ता ५-६ पाने
क्रमवार मार्गदर्शन : सर्वात आधी पोहे चाळून एका वाडग्यात घ्या. पोह्यांवर लाल तिखट, मीठ, व साखर
पेरा. सगळीकडे एकसारखी घाला. नंतर एका कढल्यात तेल तापत ठेवा. ते तापले की
त्यात कच्चे दाणे तळून वाडग्यातील पोह्यात घाला. ते पण असेच सगळीकडे पसरून
घाला. नंतर उरलेल्या तेलात कडीपत्ता घाला व तो तडतडला की तो पोह्यात घाला.
आता फोडणीकरता तेल घालून त्यात मोहरी जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा व
ही फोडणी पोह्यात घाला. सगळीकडे पसरून घाला व लगेचच डावेने पोहे एकसारखे
करा. चिवडा करतो तसेच हे पोहे करायचे आहेत. असा चिवडा तयार झाला की खमंग वास दरवळतो. नंतर त्यात चिरलेली कोथिंबीर ,
कांदा व टोमॅटो घालून खवलेला नारळही घाला. लिंबाचा रस घाला. आता डावेनेच एकसारखे पोहे ढवळा.
असे हे दडपे पोहे केले. नेहमीचे दडपे पोहे खाऊन कंटाळा आला होता. त्यामुळे
उलट्या क्रमाने रेसिपी केली. म्हणजे सर्व जिन्नस आधी घालून मग आपण फोडणी
घालतो व नंतर तिखट मीठ घालतो. तसे न करता आधी तिखट,मीठ, साखर वगैरे घालून
नंतर बाकीचे जिन्नस घातले. टोमॅटोने पोहे ओलसर झाले व चविला अप्रतीम लागले. चिवडा व भेळेची एकत्र चव
आली होती.
Wednesday, October 01, 2025
चविष्ट दडपे पोहे
Tuesday, September 09, 2025
ब्रेडचा उपमा
जिन्नस :
ब्रेडचे स्लाईस ४ (याचे छोटे तुकडे करून घ्या)
चिरलेला कांदा १ वाटी
मिरच्या ३ ते ४ (मध्यम आकाराचे तुकडे करा)
टोमॅटोच्या फोडी ३-४
चिरलेली कोथिंबीर २ चमचे
ओला नारळ खवलेला २ चमचे
मूठभर कच्चे/भाजलेले दाणे
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्था चमचा
चवीपुरते मीठ
अर्धा चमचा साखर
कडिपत्ता ५ ते ६ पाने
फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग हळद
चवीपुरते लिंबू (उपम्यावर घालण्यासाठी)
क्रमवार मार्गदर्शन : मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. पातेले पुरेसे तापले
की त्यात तेल घाला. तेल पुरेसे तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग हळद घालून
फोडणी करा व त्यात मिरच्यांचे तुकडे, कडिपत्ता, चिरलेला कांदा व टोमॅटो
घालून मूठभर कच्चे/भाजलेले दाणे घाला. परतून घ्या. परतल्यावर झाकण ठेवा.
काही सेकंदाने झाकण काढा. परतून घ्या. सर्व जिन्नस चांगले शिजले पाहिजेत. आता शिजलेल्या मिश्रणात ब्रेडचे तुकडे घाला. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे
पूड, मीठ व साखर घालून ढवळा. नंतर त्यात ओल्या नारळाचा खव व चिरलेली
कोथिंबीर घालून परत एकदा नीट ढवळा. गॅस थोडा मोठा करून मिश्रण परतून घ्या
म्हणजे ब्रेडचे तुकडे पण भाजले जातील. आता गॅस बंद करा. बाऊल मध्ये आता
ब्रेडचा उपमा घाला व त्यावर थोडे लिंबू पिळून खायला द्या. पोटभरीचा उपमा
तयार आहे. वेगळी चव येते.
Wednesday, April 09, 2025
दुधी भोपळ्याचे भरीत
जिन्नस :
दुधी भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी २ ते ३ वाट्या
दाण्याचे कूट मूठभर
दही ५-६ चमचे
मीठ, साखर,
लाल तिखट, धनेजिरे पूड दोन्ही मिळून पाव ते अर्धा चमचा
३-४ मिरच्यांचे तुकडे, कडीपत्ता
बारीक कांदा व टोमॅटो बारीक चिरून घाला- १-२ चमचे
मोहरी,हिंग हळद तेल फोडणीसाठी
क्रमवार
मार्गदर्शन : दुधीच्या फोडी कूकरमध्ये शिजवून घ्या. शिजताना थोडे पाणी
घाला. शिजल्यावर त्यातले पाणी काढून टाका. फोडी पूर्णपणे थंड होऊ देत.
शिजवलेल्या फोडीत, दाण्याचे कूट, लाल तिखट, धनेजिरे पूड, साखर, मीठ व दही
घाला व ढवळा. नंतर त्यामध्ये अगदी थोडा कांदा व टोमॅटो चिरून घाला. थोडी कोथिंबीर चिरून
घाला. मिश्रण ढवळा. नंतर तेल तापवून त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद घालून
फोडणी करा. फोडणीत मिरच्यांचे तुकडे व कडीपत्ता घाला. फोडणी करून दुधीच्या
फोडीच्या मिश्रणात घाला. वेगळे व छान लागते हे भरीत. आज सहज विचार मनात आला आणि हे भरीत केले. भोपळ्याच्या भरीतासारखीच याची
कृती आहे. फक्त भरताला थोडा रंग व चव येण्यासाठी कांदा व टोमॅटो चिरून
घातला आहे.
Sunday, September 08, 2024
कांदे बटाटे
Tuesday, July 23, 2024
मक्याचा दाण्याचे थालिपीठ
जिन्नस :
२ कणसे किसून घ्या. त्यात मावेल इतके हरबरा डाळीचे पीठ
घाला व थोडेसे तांदुळाचे पीठ घाला. नंतर त्यात किसलेले आलं (थोडेसे) व १
पाकळी लसूण (बारीक चिरून) घाला. शिवाय बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा
तिखट, धनेजिरे पूड, अगदी थोडी हळद व चवीपुरते मीठ घाला. हरबरा व तांदुळाचे
पीठ खूप नको. त्यातही तांदुळाचे पीठ अगदी थोडे घाला. हे पीठ थोडे सैलसर
भिजवा. त्यात १ चमचा तेल घाला. आता एका तव्याला तेल लावून ते तव्यावर पसरवा
व त्यावर भिजलेल्या पिठाचे थालिपीठ लावा. थालिपीठ थापताना हातावर थोडे तेल
घालून थापा. थालिपिठाला भोके पाडा व त्यातही तेल घाला. मध्यम आचेवर
थालिपीठ करताना त्यावर झाकण ठेवावे. चुर्र असा आवाज आला की झाकण काढून
थालिपीठ उलटून घ्या व परत त्यावर झाकण ठेवा.
काही सेकंदाने झाकण काढा व गॅस बंद करा. थालिपीठ खरपूस झालेले असेल. टोमॅटो
सॉस बरोबर हे कुरकुरीत व खुसखुशीत थालिपीठ छान लागते. जरा वेगळी चव.
Wednesday, July 17, 2024
उपासाचे बटाटेवडे
जिन्नस
मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे २
किसलेले आले १ ते दीड चमचा
खूप बारीक चिरलेल्या मिरच्या १ ते दीड चमचा
लिंबू पाव चमचा
चवीपुरते मीठ (सारण व पीठ भिजवण्यासाठी)
चिरलेली कोथिंबीर २ ते ३ चमचे
शिंगाड्याचे पीठ अर्धी वाटी
साबुदाण्याचे पीठ २ चमचे
दाण्याचे कूट २ - ३ चमचे
लाल तिखट अर्धा ते पाऊण चमचा
तेल अर्धा चमचा
वडे तळण्यासाठी तेल
Wednesday, January 03, 2024
मुगाच्या डाळीची आमटी
जिन्नस :
मुगाची डाळ १ वाटी (कूकरमध्ये शिजवून घ्या. यातील
शिजवलेली अर्ध्या डाळीची आमटी बनवा. अर्धी फ्रीज मध्ये ठेवा म्हणजे नंतर
परत एकदा आमटी करता येईल) शिजवताना २ वाट्या पाणी घाला.
थोडे आले, २ मिरच्या, ३ ते ४ लसूण पाकळ्या (बारीक तुकडे करा अथवा मिक्सर मधून बारीक करा)
कांदा ५ ते ६ पाकळ्या (कांदा उभा आणि बारीक चिरा)
टोमॅटो अर्धा किंवा १ (मध्यम आकाराचे तुकडे करा)
फोडणीसाठी तेल (नेहमीपेक्षा थोडे जास्त घ्या)
मोहरी, जिरे, हिंग, हळद
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
चवीपुरते मीठ
आमटीला लागणारे पाणी (पातळ/घट्ट जसे हवे त्याप्रमाणात पाणी घालावे)
मार्गदर्शन : कढई मध्यम आचेवर तापत ठेवा. नंतर त्यात फोडणीसाठी तेल घाला. (५ ते ६ चमचे) नेहमी फोडणी करतो त्यापेक्षा थोडे जास्त घाला. तेल तापले की त्यात मोहरी जिरे हिंग हळद घालून फोडणी करावी. नंतर चिरलेले आले, लसूण, कांदा, कडीपत्ता, टोमॅटो एकेक करत घाला. आच थोडी वाढवावी. फोडणी छान झाली पाहिजे. आणि हा घातलेला मसाला चांगला परतून घ्यावा म्हणजे आमटीला छान चव येते. नंतर शिजलेली मूगडाळ घालून ढवळावे व नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड व चवीपुरते मीठ घालून परत नीट ढवळावे. आता यात जरूरीपुरत पाणी घाला व परत नीट ढवळा. आमटीला छान उकळी येऊ देत. आता ही गरम व चविष्ट आमटी तयार झाली आहे. गॅस बंद करा. परत एकदा आमटी सर्व बाजूने नीट ढवळून घ्या. गरम भातावर ही आमटी घाला व साजूक तूपही घाला. थंडी मध्ये ही आमटी खूपच छान लागते. नुसती वाटी मध्ये घेऊन प्यायली तरी चालेल. त्यात थोडे साजूक तूप घालावे. चव अप्रतीम आहे. तुम्हाला हवा तसा मसाला कमी जास्त घाला. मसाला जास्त झाला तरी चालेल पण कमी नको.
Tuesday, January 02, 2024
कोथिंबीर वडी
जिन्नस :
चिरलेली कोथिंबीर २ वाट्या ( चिरलेली कोथिंबीर धुवुन चाळणीत निथळत ठेवा)
हरबरा डाळीचे पीठ १ वाटी
तांदुळाचे पीठ २ चमचे
लसूण २ पाकळ्या, आलं अगदी थोडे, कडिपत्ता ४-५ पाने, मिरच्यांचे तुकडे २-४ (बिया काढून टाका)
पाणी १ वाटी
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
फोडणीसाठी तेल २ चमचे
मोहरी, जिरे, हिंग, हळद (फोडणीसाठी)
चवीपुरते मीठ
मार्गदर्शन :
डाळीचे पीठ, तांदुळाचे पीठ, लाल तिखट, धनेजीरे पूड, मीठ घालून पीठ सैलसर भिजवा. हे पीठ पातळही नको आणि घट्टही नको. पळीवाढं झाले पाहिजे. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. नंतर त्यात २ चमचे तेल घाला. तेल तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा व त्यात चिरलेलं आलं, लसूण पाकळ्या, मिरच्यांचे तुकडे, आणि चिरलेली कोथिंबीर घाला. कडीपत्याची पानाचे तुकडे करून घाला व हे मिश्रण परता. नंतर त्यात डाळीचे भिजवलेले पीठ घाला. आच मध्यम आचेवरून थोडी जास्त करा. हे सर्व मिश्रण आपण पिठलं करतो त्याप्रमाणे ढवळत रहा. आता गॅस बंद करा. ढवळताना या मिश्रणाचा गोळा होतो. आता हा गोळा एका ताटलीत पसरवून घ्या. गोळा पसरवण्याच्या आधी ताटलीला तेल लावून घ्या. पूर्ण थंड झाल्यावर वड्या कापा व तेलात खरपूस तळा. खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत वड्या होतील.
Thursday, November 30, 2023
सांज्याची पोळी
जिन्नस
जाड रवा १ वाटी
चिरलेला गूळ १ वाटी
साखर अर्धी वाटी
साजूक तूप २ ते ४ चमचे
पाणी दीड वाटी
गव्हाचे पीठ २ वाट्या
थोडे मीठ
तेल १ ते २ चमचे
क्रमवार मार्गदर्शन :
मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. नंतर त्यात २ चमचे साजूक तूप आणि रवा घालून खमंग भाजा. नंतर त्यात दीड वाटी पाणी घालून झाकण ठेवा. आच मंद करा. एक दणदणीत वाफ येऊ देत. नंतर रवा नीट ढवळून घ्यावा. नंतर त्यात गूळ १ वाटी व अर्धी वाटी साखर घालून परत ढवळा. परत झाकण ठेवा. आच मंद असू देत. परत काही सेकंदाने झाकण काढून परत एकसारखे नीट ढवळा. हा आपला नेहमीचा शिरा झाला आहे. फक्त यात दुप्पट पाणी घालायचे नाहीये आणि तूपही जास्त घालायचे नाही. शिरा थंड करायला ठेवा. आता कणिक भिजवून घ्या. आपण नेहमी पोळ्यांना भिजवतो तशीच कणिक भिजवायची आहे. कणकेत थोडे मीठ व १-२ चमचे तेल घाला. कणिक सैल भिजवा. थोडे पाणी जास्त घालून मळा व नंतर त्यात तेल घालून अजून नीट मळून घ्या. पुरणपोळीला जितकी सैल कणिक लागते तितकी सैल भिजवायची नाहीये. कणिक अर्धा तास भिजली की परत एकदा नीट मळून घ्या. आता शिराही थंड झाला असेल. आता मध्यम आचेवर तवा ठेवा. पुरणपोळीसारखीच ही पोळी करायची आहे. पुरणपोळीसारखी हलक्या हाताने लाटावी लागत नाही. पिठी लावताना गव्हाचीच लावा. तव्यावर पोळी घाला व छान खरपूस भाजा. पोळी लाटताना आपण जसे कडेकडेने लाटतो तशीच ही पोळी लाटायची आहे. खूप फुगते. शिऱ्याचा गोळा करून घेताना शिऱ्यात थोडे साजूक तूप घालून मळा. गरम पोळीवर साजूक तूप घाला व गरम असतानाच खा ! या पोळ्या गारही छान लागतात. १ पोळी खाल्ली तरी पोट भरते. १ वाटीच्या शिऱ्यात ७ पोळ्या होतात.
Tuesday, November 28, 2023
कोबीची भाजी
जिन्नस :
बटाटा १ (साले काढू नका, काचऱ्यांना चिरतो तसा पातळ चिरा)
टोमॅटोच्या फोडी ४ ते ५
लाल तिखट १ चमचा
धनेजीरे पूड १ चमचा
मीठ चवीपुरते
चिमूट भर साखर
हिरव्या मिरच्या २ (जाड तुकडे करा)
कढीपत्ता ५-६ पाने
फोडणीकरता तेल, मोहरी, जिरे, हिंग व हळद
क्रमवार मार्गदर्शन :
चिरलेला कोबी पाण्याने धुवून एका रोळीत पाणी निथळण्याकरता ठेवा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. त्यात जरूरीपुरते तेल घाला. तेल तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, बटाटा व टोमॅटो घाला व कालथ्याने परतून घ्या. नंतर त्यात चिरलेला कोबी घाला व परत सर्व मिश्रण चांगले परतून घ्या. आता गॅस बारीक करा व कढईवर झाकण ठेवा. मंद आचेवर भाजी शिजवा. काही मिनिटांनी झाकण काढा व भाजी परता. परत एकदा वाफ द्या. भाजी शिजली की त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ व साखर घालून भाजी सर्व बाजूने ढवळा व झाकण ठेवून एक वाफ द्या. ही भाजी खूप चविष्ट लागते. पोळी भाताबरोबर खा.
Wednesday, November 08, 2023
7 cup barfi
जिन्नस :
हरबरा डाळीचे पीठ
ओल्या नारळाचा खव
साजूक तूप (पातळ करून)
भाजलेले बदाम-पिस्ते-काजू पूड
दूध (गरम करून गार करा)
साखर दीड वाटी
(साखर सोडून बाकी सर्व जिन्नस अर्धी वाटी)
क्रमवार मार्गदर्शन : मंद आचेवर कढई तापत ठेवा. त्यात आधी हरबरा डाळीचे पीठ घाला व पातळ केलेले तूपही घाला आणि मिश्रण भाजायला सुरवात करा. काही सेंकंद झाले की त्यात ओल्या नारळाचा खव घालून परत भाजा. नंतर काही सेकंद झाले की त्यात सुकामेवाची (बदाम,काजू,पिस्ते) पावडर घाला व ढवळा. नंतर लगेच दूध व साखर घाला आणि सतत ढवळत रहा. आता हे मिश्रण पातळ होईल. सर्व बाजूने सारखे ढवळत रहा. मिश्रण हळूहळू एकत्र यायला लागते. अजूनही खूप ढवळत रहा व मिश्रण कढईच्या बाजूने कोरडे पडायला लागेल. ढवळताना जड लागायला लागेल. आता गॅस बंद करा. मिश्रण अजूनही एकसारखे काही सेकंद ढवळत रहा. कूकर मध्ये भात लावतो त्या डब्याला साजूक तूपाचा हात लावा व हे मिश्रण त्यात ओता. त्यावर बारीक केलेले काजूचे तुकडे सजावटीसाठी घाला व एकसारखे करा. पूर्ण गार झाल्यावर वड्या पाडा. बर्फी चवीला खूप छान झाली आहे. यावर्षीच्या दिवाळीत लक्ष्मी पूजनाला प्रसाद म्हणून छान होईल. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
Friday, September 29, 2023
तळणीचे मोदक
जिन्नस
ओल्या नारळाचा खव ३ वाट्या
साखर दीड वाटी
साजूक तूप अर्धा चमचा
दूध (ओला नारळाचा खव भिजेल इतपत)
कणिक १ वाटी
मैदा १ वाटी
२-३ चमचे मोहन (कडकडीत गरम तेल)
चिमूटभर मीठ
क्रमवार
मार्गदर्शन : मंद आचेवर कढई ठेवा. त्यात साजूक तूप, दूध, नारळाचा खव व
साखर घाला व सारण एकजीव करा. आता आच मध्यम करा आणि सारण एकसारखे ढवळत रहा.
सारख वितळून ओल्या नारळात एकजीव झाली की सारण तयार होते. गॅस बंद करा. आता एका परातीत
कणिक मैदा घ्या. त्यात थोडे मीठ टाका व कडकडीत तेलाचे मोहन घाला आणि पीठ
भिजवा. पीठ भिजवायला पाणी थोडे लागते. पुरी करताना खूपच घट्ट कणिक भिजवायला
लागते. कणिक घट्ट भिजवा पण खूप घट्ट नको. भिजवल्यावर हातात थोडे तेल घेऊन
कणिक मळा.
अर्ध्या तासाने मोदक करायला सुरवात करा. भिजवलेल्या पिठाची बारीक गोळी करून
खूप पातळ पुरी लाटा. त्यात सारण भरा आणि उकडीच्या मोदकासारख्याच सर्व बाजूने कळ्या पाडा आणि मोदक वळा. एकेक मोदक करून झाला की तो ओल्या फडक्यात
ठेवा म्हणजे वाळणार नाहीत. आता मध्यम आचेवर कढई ठेऊन त्यात मोदक
तळण्यासाठी तेल घाला. तेल व्यवस्थित तापू दे. तेल तापले आहे की नाही ते
बघण्यासाठी त्यात पिठाचा छोटा कण घाला. तो लगेच वर आला की तेल तापले असे
समजावे. आता आच परत मंद करा व सर्व मोदक तळून घ्या. त्यात एक करंजी पण तळा.
वरील दिलेल्या साहित्यात ११ मोदक आणि एक करंजी होते. मोदक खूप खुसखुशीत
आणि कुरकुरीत होतात. बाप्पाला नैवेद्य दाखवा.
Wednesday, April 26, 2023
कोथिंबिरीची भजी
जिन्नस:
चिरलेली कोथिंबीर २ वाट्या
हरबरा डाळीचे पीठ पाव ते अर्धी वाटी
पाव चमचा लाल तिखट
पाव चमचा धनेजिरे पूड
चिमूटभर हळद,
चवीपुरते मीठ
तेल अर्धा चमचा (गार किंवा गरम केलेले)
तळणीसाठी तेल
मार्गदर्शन : चिरलेली कोथिंबीर चाळणीत घालून धुवून घ्या. पाणी निथळण्यासाठी चाळणीखाली एक ताटली ठेवा. पाणी पुर्णपणे निथळायला हवे. नंतर ही चिरलेली कोथिंबीर एका भांड्यात काढून घ्या. त्यात डाळीचे पीठ, चिमूटभर हळद, लाल तिखट, धनेजिरे पूड व चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण कालवा. नंतर अगदी थोडे पाणी घालून परत कालवा. हे मिश्रण थोडे सैलसर झाले पाहिजे. पातळ नको आणि घट्ट तर नकोच. नंतर यात अर्धा चमचा तेल (गार किंवा गरम) घाला. परत एकदा चमच्याने मिश्रण ढवळा. आता कढईत तेल तापत ठेवा. तेल पुरेसे तापले की त्यात चमच्याने एकेक करत भजी सोडा. आच मध्यम ठेवा. लालसर रंग येईपर्यंत भजी तळा व नंतर झाऱ्याने टिश्यु पेपर वर काढून घ्या म्हणजे तेल झिरपेल.
ही भजी खाताना कोथिंबिरीचा उग्रपणा चवीत आला पाहिजे म्हणूनच डाळीचे पीठ जास्त घालायचे नाही. याचप्रमाणे मेथीची व पालकाची भजी करा. मस्त लागतात. पालक-मेथी-कोथिंबीर याची चव भजी खाताना लागली पाहिजे.
Monday, April 24, 2023
लिंबू सरबत (साधे-सोपे आणि सर्वात श्रेष्ठ)
Wednesday, April 12, 2023
पळीवाढं पिठलं
जिन्नस :
हरबरा डाळीचे पीठ अर्धी ते पाऊण वाटी
लाल तिखट पाव चमचा
धनेजिरे पूड पाव चमचा
चवीपुरते मीठ
तेल २ ते ३ चमचे
लसूण पाकळ्या २ (बारीक चिरलेल्या)
१ मिरची ( तुकडे करून व बिया काढून)
कांदा पाव किंवा त्यापेक्षा थोडा कमी ( बारीक चिरलेला)
कढिपत्ता २-३ पाने
फोडणी करता मोहरी, जिरे, हिंग, हळद
क्रमवार मार्गदर्शन : एका भांड्यात डाळीचे पीठ, लाल तिखट, धनेजिरे पूड, (वर लिहिल्याप्रमाणे पाव चमचा,) चिमूटभर हळद, चिमुटभर हिंग आणि चवीपुरते मीठ एकत्र करून पीठ भिजवा. त्यात अडीच ते पावणे तीन वाट्या पाणी घालून पीठ कालवून घ्या. पिठाची गुठळी राहाता कामा नये. एका कढईत तेल तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घाला आणि लगेचच मिरची-लसूण-कांदा (चिरलेले) कडिपत्ता घाला व झाकण ठेवा. कांदा पटकन शिजण्याकरता अगदी थोडे पाणी घाला. कांदा लसूण शिजले की त्यात तयार केलेले डाळीचे पीठ घाला.
आता गॅसची फ्लेम तीव्र करायची आहे आणि कालथ्याने हे मिश्रण पटापट ढवळायचे आहे जेणेकरून सर्व मिश्रण एकसंध शिजले गेले पाहिजे. मिश्रणाला बुडबुडे आले की समजावे पिठलं तयार झाले आहे. तरीही अजून ढवळत रहा. मिश्रणातून वाफा यायला लागतील. आता गॅस बंद करा आणि लगेचच पिठलं पानात वाढून पोळीशी खा.असे हे गरम गरम, तिखट तिखट पिठलं खूप चविष्ट लागते. घसा शेकून निघतो आणि तोंडालाही चव येते.
Sunday, September 11, 2022
सणाला सजवलेली ताटे
Thursday, May 06, 2021
बदाम कतली
१ वाटी बदाम (गरम पाण्यात ४ ते५ तास भिजत घाला. नंतर त्याची साले काढा. व मिक्सरमधुन बारीक वाटुन घ्या. वाटताना
मिश्रण बारीक व्हायला मदत होईल इतपतच दुध घाला. हे मिश्रण २ वाट्या होईल. )
२ वाट्या साखर
१ वाटी किसलेला खवा
१ चमचा साजुक तूप (पातळ करून )
मार्गदर्शन : बदामाची मिक्सर वर बारीक केलेले मिश्रण , साजुक तुप , साखर हे सर्व एकत्र करुन एका पातेल्यात घ्या. गॅस बारीक आच ठेवुन हे पातेले गॅस वर ठेवा. व सतत ढवळत रहा. खूप वेळ ढवळायला लागते. गॅसची आच सतत बारीक ठेवा. मिश्रण पातळ होउन साखर विरघळायला लागते. आणि नंतर हे मिश्रण एकत्र यायला लागते आणि ढवळताना घट्ट लागायला लागते. खुप घट्ट लागायला लागले की मिश्रण जवळ येउन त्याचा सैलसर गोळा बनायला लागतो. जेव्हा ढवळायला खुप जड लागायला लागले की गॅस बंद करून अजुनही खुप ढवळा. एकीकडे ताटलीला तुप लावुन ठेवा. त्यावर हे मिश्रण ओता आणि एकसारखे करा.
तुपाचा हात घेउन किंवा वाटिच्या मागच्या बाजुला तुप लावुन हे मिश्रण थापावे. थोड्यावेळाने मिश्रण कोमट झाले की वड्या पाडा. बदामकतली तयार झाली आहे. १ वाटी बदामाच्या १५ ते १७ वड्या होतात. चविला खुप चांगल्या झाल्या आहेत. पहिल्यांदाच केल्या आहेत. यापुर्वी पण केल्या आहेत पण त्यात बदाम आणि काजु एकत्र करुन केल्या होत्या. वडी लेबल मध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या वड्यांची रेसिपी मिळेल.
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी किंवा कुणाकडे जाताना घरचा खाऊ म्हणुन न्यायला छानच !
Saturday, December 19, 2020
उडीद डाळीची भजी
जिन्नस : उडीद डाळ अर्धी वाटी ( ८ तास
२ पाकळ्या लसूण (खूप बारीक चिरा)
४ मिरच्या (खूप बारीक चिरा. आतल्या बिया काढा. )
कडिपत्ता ५ ते ६ पाने ( अर्धी करा. )
चिरलेली कोथिंबीर ३ चमचे
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा धणे जिरे पूड
मीठ चवीपुरते
मार्गदर्शन : उडीद डाळ मिक्सर मध्ये घालून बारीक वाटा. अगदी जरूरीपुरतेच पाणी घाला. जास्त नको. पाणी कमी घातल्याने ही डाळ थोडी भरड वाटली जाते. वाटलेल्या डाळीमध्ये चिरलेल्या लसूण पाकळ्या, मिरच्यांचे तुकडे , कडिपत्ता व जाड कांदा घाला. शिवाय लाल तिखट, धणेजिरे पूड व मीठ घाला. चिरलेली कोथिंबीर घाला. डाळीचे हे मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या. आणि लगेचच एका कढईत तेल तापत ठेवा. तेल व्यवस्थित तापले की चमच्याने भजी सोडा. व ब्राऊन रंग येईपर्यंत तळा. तळून झाल्यावर पेपर टॉवेलवर काढून ठेवा म्हणजे तेल शोषले जाईल.
सर्वात महत्त्वाची
टीप : तयार झालेल्या मिश्रणाची लगेचच भजी करावी नाहीतर भजी तेल पितात. शिवाय
वाटतानाही पाणी खुपच कमी घालावे. पीठ घट्ट व्हायला पाहिजे. भजी मस्तच लागतात.
भज्या सोबत ओल्या नारळाची चटणी दह्यात कालवलेली उत्तम.
Monday, March 23, 2020
दह्यातला दुधी
टोमॅटो बारीक चिरलेला अर्धा मोठा
कांदा बारीक चिरलेला पाव
लसूण पाकळ्या ३ ते ४ (बारीक चिरलेल्या)
आलं बारीक तुकडा (बारीक चिरलेले
ओल्या नारळाचा खव अर्धी वाटी
दाण्याचे कूट अर्धी वाटी
चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
दही ३ ते ४ चमचे (पाणी घालून पातळ करा)
१ ते २ चमचे डाळीचे पीठ (पातळ केलेल्या दह्यामध्ये कालवून घ्या)
हिरवी मिरचीचे तुकडे ३ ते ४
फोडणीसाठी तेल (नेहमीपेक्षा थोडे जास्त)
फोडणीसाठी मोहरी, जिरे,हिंग, हळद,
लाल तिखट १ चमचा
धनेजिरे पूड १ चमचा
साखर २ चमचे
मीठ चवीपुरते
कढीपत्ता ४ ते ५ पाने
क्रमवार मार्गदर्शन : पातेल्यात फोडणीसाठी तेल टाकून ते गॅसवर ठेवा. आच मध्यम हवी. तेल पुरेसे तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा.
नंतर त्यात लगेच चिरलेले आलं, लसूण, हिरव्या मिरच्यांचे तुकडे व कढीपत्ता घाला. नंतर लगेच बारीक चिरलेला कांदा, व टोमॅटो घाला व हे सर्व मिश्रण डावेने परतून घ्या. नंतर लगेचच दुधी भोपळ्याच्या फोडी घाला व परत एकसारखे ढवळून घ्या. आता झाकण ठेवा.
आच थोडी वाढवा. तेलाच्या फोडणीमध्ये घातलेले जिन्नस तेलामध्येच चांगले शिजू देत. आता झाकण काढून त्यात
अगदी थोडे पाणी घाला.
परत पातेल्यावर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून दुधी भोपळ्याच्या फोडी नीट शिजल्या आहेत की नाही ते बघावे. त्या शिजल्या असतील तर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ व साखर घालून ढवळावे. थोडे पाणी घालून त्यात चिरलेली कोथिंबीर, दाण्याचे कूट व नारळाचा खवही घालावा. नंतर हे सर्व मिश्रण एकसारखे करून परत झाकण ठेवून शिजवावे. झाकण काढून त्यात पातळ केलेले दही आणि त्यात कालवलेले हरबरा डाळीचे पीठ हे मिश्रण घालावे. एकसारखे नीट ढवळून घ्यावे. आणि आता फक अजून एक वाफ द्यावी. आता गॅस बंद करा.
अशी ही तयार झालेली गरमागरम भाजी चवीला खूपच छान आणि चविष्ट लागते. ही भाजी स्वनिर्मित आहे. दूधीच्या दोन भाज्या आधीच लिहिल्या आहेत. एक दुधातली आणि दुसरी मुगाची डाळ घालून केलेली. आता परत काहीतरी वेगळेपणा आणण्यासाठी भाजी करून पाहिली.
सुकामेवादाणे लाडू (२)
भाजलेल्या सुकामेव्याचे कूट २ वाट्या ( cashews - almonds - pecans - pistachios - hazelnuts)
भाजलेल्या दाण्याचे कूट २ वाट्या
साखर अर्धी ते पाऊण वाटी
मग हाताने हे मिश्रण एकत्रीत करून लाडू वळा. वरील मिश्रणाचे १८ लाडू होतात. लाडवामध्ये जो सुकामेवा घातला आहे ते डीशमध्ये आहेत.
आला नाही तरच नंतर २ ते ४ चमचे लागेल तितकेच तूप घालावे. लाडू वळण्या इतपतच तूप घालायचे आहे.
जास्त झाले तर तूपकट लागतात.






























