Wednesday, April 11, 2007

शंकरपाळे


वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

अर्धी वाटी साजुक तूप,
अर्धी वाटी साखर,
अर्धी वाटी दूध
तळणीसाठी तेल किंवा तूप
२ वाट्या मैदा अथवा
unbleached all purpose flour (king arthur)


क्रमवार मार्गदर्शन:

दूध, साखर व तूप एका पातेल्यात एकत्र करून गॅसवर ठेवणे. उकळी आली की गॅस बंद करून त्या गरम मिश्रणात मैदा किंवा (all purpose flour) घालून कालथ्याने ढवळणे. मैदा घालत असतानाच एकीकडे पीठ लगेच ढवळणे, नाहीतर गुठळी होते. सैलसर एकजीव गोळा तयार झाला की तेलाचा हात घेऊन पीठ कणकेप्रमाणे मळून दोन तास मुरवत ठेवणे. हा तयार झालेला पीठाचा गोळा घट्ट नको.

दोन तासानंतर एक मोठा गोळा घेऊन पोलपाटभर एक मोठी पोळी लाटणे. लाटताना थोडी कणीक किंवा मैदा वापरणे. मोठी पातळ पोळी लाटली की त्याचे कालथ्याने किंवा कातण्याने तिरके चोकोन कापून मध्यम आचेवर लालसर रंग येईपर्यंत तळणे. हे शंकरपाळे कुरकुरीत व खुसखुशीत होतात. तळताना ते फुगतात.


२ वाट्यांमध्ये साधारण ५-६ मोठ्या पोळ्या होतात त्याचे तिरके चोकोनी तुकडे करून तळणे.
साधारण २ वाट्या मैद्याचे पीठ (दुध,साखर,तूप) या मिश्रणात मावते. थोडे कमी जास्त प्रमाण करावे लागेल. पीठ घालून ढवळताना एकसारखा गोळा होईपर्यंत पीठ घालणे. साजूक तूप नसेल तर तेल किंवा डालडा तूप वापरले तरी चालेल. पण मी अजून तसे करून पाहिले नाहीत.

रोहिणी

कणीस कीस

वाढणी:१ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

कोवळी मक्याची मध्यम आकाराची कणसे ४
मिरच्यांचे बारीक तुकडे २-३
कोथिंबीर २ चमचे, ओला नारळ २ चमचे,
दाण्याचे कूट मूठभर, मीठ, साखर अर्धा चमचा
तेल 4 चमचे, मोहरी, हिंग, हळद

क्रमवार मार्गदर्शन:

मक्याची कोवळी कणसे किसून घ्या. तेलाच्या फोडणीमध्ये मिरच्यांचे तुकडे घालून नंतर त्यात किसलेला मक्याचा कीस घाला. २-३ वाफा देवून शिजवा. वाफ देताना झाकण काढल्यावर हा कीस परतून घ्या.  नंतर त्यात दाण्याचे कूट, कोथिंबीर, ओला नारळ, साखर व चवीप्रमाणे मीठ घालून परत २-३ वाफा देवून परता. हा कीस पौष्टीक आहे. ४ कणसांच्या कीसामध्ये एका वेळेला एकासाठी पोटभर होतो.