Wednesday, March 28, 2012

साबुदाणा वडावाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस

साबुदाणा १ वाटी
बटाटा १, अर्धे छोटे लिंबू
बारीक वाटलेल्या हिरव्या तिखट मिरच्या ५-६ किंवा दीड ते २ चमचे लाल तिखट
पाव वाटी चिरलेली कोथिंबीर
दाण्याचे कूट पाव ते अर्धी वाटी
चवीपुरते मीठ,
१ चमचा साखर
तळणीसाठी तेल,

क्रमवार मार्गदर्शन: १ वाटी साबुदाणा ४ तास भिजत घालावा. भिजवताना पाणी निथळून घ्यावे. ४ तासानंतर भिजलेला साबुदाणा मोकळा करून घ्यावा. त्यात कच्चा बटाटा साल न काढता किसून घाला. नंतर त्यात वाटलेल्या मिरच्या किंवा लाल तिखट, मीठ व साखर घाला. नंतर त्यात दाण्याचे कूट घालून लिंबू पिळा व चिरलेली कोथिंबीर घाला. हे मिश्रण हाताने नीट कालवा. कालवताना थोडे पाणी घाला. मिश्रण मिळून येण्यापुरतेच पाणी घालावे.आता मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात तेल घाला व साबुदाण्याचे मिश्रण बनवले आहे त्याचे गोल आकाराचे वडे लालसर रंगावर तळून घ्या. वडे तळल्यावर ते पेपर टॉवेल वर ठेवा म्हणजे त्यातले तेल निथळून जाईल. नारळ्याच्या चटणीसोबत हे वडे छान लागतात.

Saturday, March 24, 2012

वांग्याचे भरीतजिन्नस :

मध्यम आकाराचे वांगे
पाव कांदा चिरलेला
थोडी कोथिंबीर चिरलेली
मूठभर दाण्याचे कूट
लाल तिखट पाव चमचा
चवीपुरते मीठ
चिमूटभर साखर
तेल फोडणीसाठी
मोहरी, हिंग, हळद


मार्गदर्शन : मध्यम आचेवर वांगे भाजून घ्या. ते पूर्ण गार झाले की मग त्याची साले काढून बारीक करून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पूरेशी तापली की त्यात तेल घालून त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा. नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घालून परतून घ्या. कांदा शिजला की त्यात खूप बारीक केलेले वांगे घालून मग त्यावर लाल तिखट, मीठ व साखर घालून परता. परतत असताना गॅस मंद ठेवा. नंतर त्यात चिरलेली कोथिंबीर व दाण्याचे कूट घालून नीट ढवळून घ्या. हे वांग्याचे भरीत खूप छान लागते. भाकरीबरोबर या भरताची चव अजूनही छान लागते. वांग्याचे भरीत २-३ प्रकारे करतात. दह्यातले व कांदा पात घालूनही करतात. त्याची कृती नंतर लिहीन.

Monday, March 12, 2012

अरूगुलाजिन्नस:

अरूगुला १ पॅकेट
पाव कांदा
३-४ लसूण पाकळ्या
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
मीठ चवीपुरते
तेल, मोहरी, हिंग, हळद

मार्गदर्शन : अरुगुला चिरून धुवून घ्या. रोळीमध्ये चिरलेला अरूगुला घालून त्याखाली ताटली ठेवा म्हणजे त्यातले पाणी निथळून जाईल. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात फोडणीकरता थोडे तेल घालून त्यात मोहरी, हिंग व हळद घाला. नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा व चिरलेल्या लसूण पाकळ्या घाला. कांदा व लसूण थोडे परतून घ्या. नंतर त्यात चिरलेला अरुगुला घालून त्यावर झाकण ठेवा. २-३ सेकंदाने झाकण काढून परता. असे दोन तीन वेळा केले की भाजी चांगली शिजेल. नंतर त्यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड व मीठ घालून परत एकदा भाजी परतून घ्या व झाकण ठेवा. २-३ सेकंदाने झाकण काढून परता. भाजी तयार झाली आहे. या भाजीची चव थोडी उग्र लागते पण छान आहे. करडई भाजीसारखी थोडी चव जाणवली.