Showing posts with label पोहे. Show all posts
Showing posts with label पोहे. Show all posts

Tuesday, July 22, 2008

तेलतिखटमीठपोहे


पातळ पोहे २ मुठी चाळून निवडून घ्या. त्यात अर्धी मूठ भाजलेले शेंगदाणे, मूठभर बारीक चिरलेला कांदा, अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट, चवीपुरते मीठ, ५-६ चमचे कच्चे तेल, पाव चमच्याहून कमी साखर घालून हाताने कालवून घ्या. चमचमीत पोहे तय्यार!!

Saturday, July 19, 2008

सजलेले पोहे






वाढणी:२ जण



पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे



पाककृतीचे जिन्नस:



जाड पोहे अडीच वाट्या, चिरलेला कांदा १ वाटी
बटाट्याचे त्रिकोणी पातळ काप अर्धी वाटी
भाजलेले दाणे अर्धी वाटी, मटार अर्धी वाटी,
चिरलेली कोथिंबीर व ओला नारळ पाउण वाटी
साखर, मीठ, तेल अर्धी वाटी, अर्धा चमचा लाल तिखट
मोहरी, हिंग, हळद, हिरव्या मिरच्या १-२



क्रमवार मार्गदर्शन:




सर्वात आधी पोहे चाळून व निवडून पाण्याने धुवून घ्या व ते पाणी निथळण्यासाठी रोळीमध्ये ठेवा. कढईत तेल मध्यम आचेवर तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी, हिंग, व हळद घालून फोडणी करा. नंतर लगेच लाल तिखट घालून बाकीचे सर्व जिन्नस (कांदा, बटाटा, मटार, मिरच्यांचे तुकडे) घालून परता. नंतर त्यावर झाकण ठेवा व १-२ मिनिटांनी झाकण काढून परत ढवळा. असे १-२ वेळा करा म्हणजे कांदा बटाटा वगैरे सर्व नीट शिजेल. शिजले की त्यात कोथिंबीर व ओला नारळ घालून परत परता व गॅस बारीक करा. नंतर त्यात भिजवून ठेवलेले पोहे घालून चांगले ढवळा. नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ व अर्धा चमचा साखर घालून परत चांगले ढवळा. आता परत त्यावर झाकण ठेवा १-२ मिनिटे म्हणजे पोहे पण वाफेवर शिजतील. नंतर झाकण काढून परत एकदा ढवळा. आणि गरम गरम डीश मध्ये खायला द्या.


Wednesday, September 13, 2006

रंगीत पोहे


वाढणी:दोन जणांना


पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस

पोहे जाड ३ वाट्या
कांदा , सिमला मिरची , बटाटे, टोमॅटो, गाजर , मटार, हिरव्या मिरच्या ४-५,
खवलेला ओला नारळ व चिरलेली कोथिंबीर
तेल,मोहरी,जिरे,हिंग,हळद
मीठ, साखर

क्रमवार मार्गदर्शन: सर्वात आधी पोहे रोळीमधे घुवून ठेवा. नंतर सिमला मिरची, कांदा, गाजर,बटाटे, मिरच्या,  हे सर्व उभे चिरा. प्रमाण प्रत्येकी पाव ते अर्धा तुकडा. हे सर्व उभे आणी खूप बारीक चिरणे महत्वाचे आहे. नंतर तेलाची फ़ोड्णी करुन त्यामधे उभे चिरलेले वरील सर्व जिन्नस आणि मटार व चिरलेला टोमॅटो घालून एक- दोन वाफ़ा आणा.  नंतर त्यामधे पोहे घालून  त्यात चवीप्रमाणे मीठ, व थोडी साखर घालून सर्व एकसारखे परता. व एक दोन वाफा आणा.

खायला देताना त्यावर कोथिंबीर , ओला नारळ , आणि थोडे लिंबू पिळून खावयास द्या.
भाज्या घातल्याने पोहे रंगीबेरंगी दिसतात.

दडपे पोहे













वाढणी:२ जणांना


पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे


पाककृतीचे जिन्नस


पातळ पोहे ३ वाट्या
कांदा लहान १, तिखट हिरव्या मिरच्या ५,६
कोथिंबीर, खवलेला ओला नारळ, लिंबू,
नारळाचे पाणी
शेंगदाणे


क्रमवार मार्गदर्शन:पातळ पोह्यांवर नारळाचे पाणी आणि लिंबू पिळून हातानेच थोडे कालवून त्यावर झाकण ठेवणे. नंतर त्यामधे कांदा, कोथिंबीर बारीक चिरुन घालणे,नंतर वरुन तेलाची फ़ोडणी घालून पोहे ढवळणे. फोडणीत बारीक मिरच्या चिरुन व शेंगदाणे घालणे.

हे पोहे पातेल्यात परतून करत नाहीत. ह्या पोह्यांना पातळ पोहेच वापरायचे असतात. बाजारात पातळ पोहे आणि जाड पोहे असे दोन प्रकारचे पोहे मिळतात. जाड पोहे रंगीत पोह्यांना वापरतात.

रोहिणी गोरे