Tuesday, December 30, 2008

चकोल्या

जिन्नस :

तुरीची डाळ १ वाटी
गव्हाचे पीठ दीड वाटी
धनेजीरे पूड दीड चमचा
लाल तिखट दीड चमचा
गोडा/काळा/गरम मसाला दीड चमचा
चिंचगुळाचे दाट पाणी अर्धा ते पाऊण वाटी
मोहरी, हिंग हळद
मीठ
फोडणीसाठी तेल
गोटा खोबऱ्याचा एक छोटा तुकडा
१ चमचा जिरे


क्रमवार मार्गदर्शन :


तुरीची डाळ कूकरमध्ये शिजवून घ्या. गव्हाच्या पीठामध्ये थोडे लाल तिखट, हळद, मीठ व थोडे तेल घालून नेहमीप्रमाणेच पोळीला पाहिजे तशी कणिक भिजवा.



तुरीची डाळ थंड झाली की मध्यम आचेवर एका कढईत/पातेल्यात पूरेसे तेल घालून फोडणी करा व त्यामध्ये शिजलेली डाळ एकसारखी करून घाला. त्यात थोडे पाणी घालून लाल तिखट, धनेजीरे पूड, गरम/गोडा/काळा मसाला घाला. चवीपुरते मीठ घालून आमटी ढवळून घ्या. नंतर त्यामध्ये चिंचगुळाचे दाट पाणी घाला. गोटा खोबऱ्याचा एक छोटा तुकडा गॅसवर भाजून घ्या. खूप काळा होईतोवर भाजा. थंड झाला की त्यात थोडे जीरे घालून मिक्सर ग्राईंडर वर बारीक करा व उकळत्या आमटीत घाला. अशी ही मसालेदार आमटी थोडावेळ उकळा. अजून थोडे पाणी घाला. खूप पातळ आमटी नको.



आता गॅस बारीक करा. भिजवलेल्या कणकेचा एक मोठा गोळा घेऊन एक मोठी पोळी लाटा. खूप जाड नको, व खूप पातळ नको. पोळीचे कालथ्याने अथवा कातण्याने चोकोनी काप करा. आता हे काप पटापट आमटीत सोडा व ढवळा. अशा प्रकारे कणकेच्या पोळ्या लाटून व काप करून सर्व काप आमटीमध्ये सोडा. एकीकडे ढवळत राहावे. आता आच थोडी वाढवा. म्हणजे आमटी उकळताना शंकरपाळ्यासारखे जे काप करून आमटीमध्ये सोडलेले आहेत ते शिजतील. ५ मिनिटांनी परत गॅस मंद ठेवा. आता थोडे कच्चे तेल वरून घाला व कढईवर/पातेल्यावर झाकण ठेवा म्हणजे वाफेवर या चकोल्या चांगल्या शिजतील. थोड्यावेळाने झाकण काढा. एक चकोली बाहेर काढून ती हाताने शिजली आहे का नाही ते पहा. चकोल्या शिजायला जास्त वेळ लागत नाही. चकोल्या खूप दाट आहेत असे वाटल्यास थोडे पाणी घालून ढवळा.



आता या चकोल्या गरम गरम असतानाच खा. आणि त्यावर भरपूर साजूक तूप घाला. सोबत कुरडई, सांडगी मिरची अथवा पोह्याचा पापड तळून घ्या. भरपूर पोटभर खा म्हणजे अगदी रात्रीपर्यंत तुम्हाला अजिबात भुक लागणार नाही. हा एक अत्यंत पौष्टीक पदार्थ आहे.


हा माझा एक अत्यंत आवडता खाद्यपदार्थ आहे. यालाच डाळ ढोकळी किंवा वरणफळे असेही नाव आहे.

Friday, December 12, 2008

पुरणपोळी





जिन्नस :
१ वाटी हरबरा डाळ
अर्धी वाटी साखर,
अर्धी वाटी चिरलेला गूळ
कणीक दीड वाटी
मीठ
तेल व पाणी
तांदुळाची पीठी/गव्हाचे पीठ


क्रमवार मार्गदर्शन :

डाळीचे पूरण : १ वाटी हरबरा डाळ पाण्यात धुवून घ्या. त्यात अडीच वाट्या पाणी घालून कूकरमध्ये शिजवून घ्या. वरणभात करण्यासाठी साधारण कूकरच्या ३ शिट्ट्या व्हाव्या लागतात. हरबरा डाळ शिजायला थोडी कठीण आहे म्हणून ५-६ शिट्ट्या करा. कूकर गार झाला की शिजलेली डाळ एका चाळणीमध्ये ओतून घ्या. चाळणीखाली एक ताटली ठेवा म्हणजे डाळीमधले सर्व पाणी निथळून जाईल. डाळीमधले पाणी पूर्णपणे निथळले गेले पाहिजे. डाळ कोरडी झाली पाहिजे. नंतर ही डाळ फूड प्रोसेसर मध्ये घालून बारीक वाटा. बारीक वाटलेली डाळ, गूळ व साखर एका पातेल्यात एकत्रित करून मध्यम आचेवर हे पातेले ठेवा. काही वेळाने साखर व गूळ वितळेल. मिश्रण ढवळत राहा. काही वेळाने हे मिश्रण कोरडे होईल. गॅस बंद करा. मिश्रण पूर्णपणे गार करा.


कणीक भिजवणे व तिंबणे : जेव्हा कूकरला डाळ शिजवत ठेवाल तेव्हा एकीकडे कणीक भिजवून ठेवा. कणीक चाळून त्यात थोडे तेल व मीठ घालून भिजवा. कणीक सैल भिजवा. साधारण १ तासानंतर कणीक तिंबायला घ्या. कणकेमध्ये थोडे थोडे पाणी घालून मळून घ्या. मळताना उजव्या हाताची मूठ करून कणकेला सर्व बाजूने दाब द्या म्हणजे ही कणीक पूर्ण परातभर पसरेल. नंतर त्यात तेल घालून व तेलाचा हात घेऊन परत एकत्रित गोळा बनवा. असे बरेच वेळा केले की कणीक सैल होईल व ती हाताला चिकटायला लागेल व कणकेला थोडी तार सुटायला लागेल. आता फक्त तेल घालून कणीक मळा. तेल घेतल्यामुळे चिकटणार नाही व एकसंध नितळ मळली जाईल आणि आता कणकेचा रंगही बदलायला लागेल. कणीक पांढरी दिसायला लागेल. आता ही कणीक एका पातेल्यात झाकून ठेवा.


नंतर साधारण तासभराने पोळ्या करायला घ्या. मध्यम आचेवर तवा तापत ठेवा. हाताला थोडेसे तेल घेऊन कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याचा हातानेच छोट्या पुरीएवढा एकसारखा आकार बनवा. आपल्या मुठीत मावेल इतके पूरण घ्या व हा पुरणाचा गोळा त्या छोट्या पुरीएवढ्या केलेल्या आकारामध्ये घालून सर्व बाजूने बंद करून एक गोळा बनवा. नंतर पोलपाटावर थोडे तांदुळाचे पीठ पसरा व त्यावर गोळा ठेवून परत थोडे तांदुळाचे पीठ गोळ्यावर पसरून अगदी हलक्या हाताने कडेकडेने पोळी लाटा. थोडी लाटल्यावर अलगद हाताने उलटी करून उरलेली लाटा. तव्यावर घालून भाजा. तव्यावर पोळी हाताने घालायला जमत नसेल तर लाटण्यावर गुंडाळून घेऊन तव्यावर घाला. पोळी भाजताना कालथ्याचा वापर करा. गुलाबी रंगावर पोळी भाजा.


गरम पोळीवर भरपूर साजूक तूप घ्या व गरम गरम खा. अशी ही तलम पुरणपोळी खूप छान लागते. साखरेचा गोडवा व गुळाचा खमंगपणा अशी दुहेरी चव!

मला फार गोड आवडत नाही म्हणून साखर गुळाचे प्रमाण एकास एक दिले आहे. पण गोड हवे असल्यास साखर गुळाचे प्रमाण एकास सव्वा किंवा दीड वाटी घ्यावे. पूर्ण साखर अथवा गुळाची पण पुरणपोळी करतात. साखर गुळ याचे प्रमाणही आवडीप्रमाणे कमी जास्त घ्यावे.

Monday, December 08, 2008

उडीद वडा





जिन्नस :


२ वाट्या उडीद डाळ
२-३ मिरच्या
५-६ लसूण पाकळ्या
थोडी कोथिंबीर
मीठ

क्रमवार मार्गदर्शन :

उडीद डाळ पाण्यामध्ये ७-८ तास भिजवा. नंतर त्यातले पाणी काढून टाका व ही डाळ मिक्सर/ग्राईंडर वर बारीक दळून घ्या. वाटताना जरूरीपुरते पाणी घाला. नंतर त्यात लसूण मिरची यांचे खूप बारीक तुकडे घाला. बारीक चिरलेली कोथंबीर घालून चवीपुरते मीठ घाला. कढईत पूरेसे तेल घालून तापवा व वडे तळा. वडे तळून ते पेपर टॉवेल वर ठेवा म्हणजे त्यातले तेल निथळून जाईल. सांबार चटणीसोबत हे वडे छान लागतात. वडे घालताना हातावरच पीठाला थोडा पसरट आकार द्या व अलगद तेलात सोडा.


Tuesday, November 25, 2008

बदाम बर्फी



जिन्नस :


बदाम २ वाट्या
दूध थोडेसे
साखर २ वाट्या
साजूक तूप २ चमचे


क्रमवार मार्गदर्शन :


बदाम गरम पाण्यात भिजत घाला. दोन तासानंतर त्याची साले सोला. हे खूप किचकट काम आहे. नंतर बदाम, साखर व थोडे दूध घालून मिक्सर/ब्लेंडर वर त्याची खूप बारीक पेस्ट करा. बदाम बारीक होऊन एकजीव होण्याइतकेच दूध घालावे. नंतर मध्यम आचेवर कढई ठेवून त्यात २ चमचे तूप घाला व बदामाची बारीक केलेली पेस्ट घालून मिश्रण कालथ्याने ढवळावे. आता थोडी आच वाढवावी. एकसारखे ढवळत राहावे. काही वेळाने मिश्रण आटायला लागेल व त्याचा गोळा बनायला लागेल. याचवेळी गॅस बंद करा. मिश्रण खाली उतरवा व बराच वेळ कालथ्याने घोटा. काही वेळाने गोळा अजून थोडा घट्ट होईल. एका थाळीला तूपाचा हात लावा व हे मिश्रण त्यावर ओता. सर्व बाजूने एकसारखे थापा. थापताना प्लॅस्टीकचा तूपाचा हात लावलेला पसरट कागद वापरा. मिश्रण गार झाले की वड्या कापा.

Tuesday, November 18, 2008

सुरळीची वडी




जिन्नस:

हरबरा डाळीचे पीठ १ वाटी
पाऊण वाटी आंबट ताक,
सव्वा वाटी पाणी
१ चमचा मैदा
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या (कमी तिखट असलेल्या)
बारीक चिरलेली कोथिंबीर
नारळाचा खव
किंचित लाल तिखट व हळद, चवीपुरते मीठ
किंचित साखर
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद



मार्गदर्शन:



वाटीभर तेलाची फोडणी करून घ्या. बारीक चिरलेल्या मिरच्या , कोथिंबीर आणि नारळाचा खव 3-4 वाट्या करा. त्यात चवीपुरते थोडे मीठ व थोडी साखर घाला.



डाळीचे पीठ, आंबट ताक, मैदा व पाणी एकत्र करून हाताने कालवावे. त्यात अगदी थोडे तिखट, हळद व चवीपुरते मीठ घाला. पीठ कालवताना पीठाच्या छोट्या गुठळ्या होतात त्या हाताने पूर्णपणे मोडून काढा. नंतर हे एकसंध झालेले मिश्रण एका कढईत घालून गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. कालथ्याने हे मिश्रण सतत ढवळावे लागते. काही वेळाने हे मिश्रण शिजेल. शिजल्यावर त्यावर एक झाकण ठेवा व आच मंद करा. २-३ मिनिटांनी झाकण काढून परत सर्व मिश्रण एकसारखे करा. आता हे मिश्रण पूर्णपणे शिजलेले असेल. गॅस मंद ठेवा.



2 मध्यम आकाराची स्टीलची ताटे उपडी करा व त्यावर प्रत्येकी थोडे मिश्रण घाला. एकावेळी एका ताटावर थोडेसे मिश्रण घालून त्यावर थोडे तेल लावलेला प्लॅस्टीकचा पसरट कागद ठेवून अगदी हलक्या हाताने लाटण्याने लाटा. सर्वबाजूने एकसारखे पातळ लाटा. याप्रमाणे 2 - 3 ताटे करून घ्या. मिश्रण गरम असतानाच लाटले जाते म्हणून एका वेळी एक ताट. तोवर बाकीचे मिश्रण कढईतच ठेवा मंद आच करून.


आता सुरीने उभे कापून वड्या पाडाव्या. नंतर त्यावर मिरच्या कोथिंबीर व नारळाचा खव सर्व बाजूने घाला. शिवाय तयार केलेली फोडणीही घाला. प्रत्येक पट्टी अलगद हाताने गुंडाळी करून एक गोल वळकटी करा. वळकटीसारख्या गोल केलेल्या वड्या म्हणजेच सुरळीच्या वड्या.

त्यावर परत थोडी फोडणी व खवलेल्या ओल्या  नारळाचे  तयार केलेले सारणही घाला. 


Monday, November 10, 2008

आले वडी

जिन्नस :
किसलेले आले २ वाट्या
साखर २ वाट्या
ricotta cheese (fat 9g) 1 वाटी अथवा  1 वाटी किसलेला खवा
साजूक तूप  पातळ करुन  2 चमचे 
 
क्रमवार मार्गदर्शन:
एका पातेल्यात साखर व किसलेले आले एकत्र एकसारखे करून घ्या. नंतर मध्यम आचेवर कढई ठेवा. ती तापली की त्यात थोडे साजूक तूप घाला व एकत्रित केलेले आले व साखर यांचे मिश्रणही घाला. हळूहळू साखर वितळायला लागेल. आता आच थोडी वाढवा. काही वेळाने साखर वितळून हे मिश्रण उकळायला लागेल. आता खवा अथवा रिकोटा चीझ घालुन एकसारखे सारखे ढवळत रहा.
 
 
 
काही वेळाने हे सर्व मिश्रण शिजून कोरडे पडायला लागेल व गोळा बनायला लागेल. अधूनमधून कालथ्याने ढवळत रहा. थोड्यावेळाने गॅस बंद करून हे मिश्रण थोडे कालथ्याने घोटून घ्या व नंतर लगेच एका ताटलीत काढा. या ताटलीला आधी थोडा तूपाचा हात लावून घ्यावा. ताटलीत मिश्रण ओतल्या ओतल्या त्यावर तूपाचा हात लावलेला एक पसरट प्लॅस्टीकचा कागद ठेवून सर्वबाजूने एकसारखे थापून घ्या. नंतर गरम असतानाच कालथ्याने वड्या कापा. हे मिश्रण खूप गार झाले की वड्या काढून डब्यात ठेवा.

Thursday, October 30, 2008

शेवया खीर





जिन्नसः



३ वाट्या दूध (whole milk)
१-२ चमचे शेवया
६ चमचे साखर
काजु, बदाम, पिस्ते यांचे तुकडे १-२ चमचे
बदाम पावडर अर्धा चमचा
साजूक तूप १ चमचा



क्रमवार मार्गदर्शन :



सर्वात आधी एका पातेल्यात दूध तापवून घ्या. मंद आचेवर छोटे कढले ठेवून त्यात साजूक तूप, शेवया व काजू -बदाम- पिस्ते यांचे तुकडे घालून बाऊन रंगावर परतून घ्या. नंतर हे सर्व तापलेल्या दूधात घाला. नंतर हे दूधाचे पातेले गॅसवर ठेवा. त्यात आवडीनुसार साखर व बदामाची पावडर घाला. दूध चांगले उकळू द्यावे. उकळताना डावेने ढवळत राहावे, म्हणजे साय धरणार नाही. थोडे दूध आटले की गॅसवरून उतरवा. दूध थंड होईपर्यंत अधून मधून दूध ढवळावे म्हणजे साय धरणार नाही. गार झाले की खीर दाट होईल.

Friday, October 24, 2008

तिखटमीठाचा शिरा



जिन्नस :


१ वाटी रवा, दीड वाटी पाणी१
मध्यम चिरलेला जाड कांदा, मूठभर कच्चे अथवा भाजके दाणे
२-३ चिरलेल्या मिरच्या, कढिपत्ता ३-४ पाने
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद
लाल तिखट अर्धा चमचा, मीठ, साखर अर्धा चमचा
चिरलेली कोथिंबीर, खवलेला ओला नारळ, बारीक शेव, लिंबू



क्रमवार मार्गदर्शनः



गॅस वर मध्यम आचेवर कढई ठेवून त्यात रवा ब्राऊन रंग येईपर्यंत खमंग भाजा. भाजून झाल्यावर एका ताटलीत काढून ठेवा. नंतर कढईत पुरेसे तेल घालून त्यात मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात चिरलेल्या मिरच्या, कांदा, दाणे घालून पुरेसे परतून घ्या. नंतर त्यावर झाकण ठेऊन एक वाफ द्या म्हणजे कांदा व मिरच्या व्यवस्थित शिजतील. नंतर त्यात लाल तिखट घालून परत थोडे परता. काही सेकंदाने चवीपुरते मीठ व साखर घालून त्यात भाजलेला रवा घाला व परत एकदा एकसारखे ढवळून घ्या. रव्याला सर्व मसाला एकसारखा लागला पाहिजे. नंतर त्यात पाणी घालून कालथ्याने पटापट ढवळा म्हणजे गुठळी होणार नाही. नंतर त्यावर झाकण ठेवून गॅस बारीक करा. ५ मिनिटांनी झाकण काढून तयार झालेला खमंग शिरा परत एकदा कालथ्याने ढवळा. गॅस बंद करून परत एकदा शिऱ्यावर झाकण ठेवा. ५ मिनिटांनी झाकण शिरा कालथ्याने ढवळून खायला द्या.



खायला देताना डीश मध्ये आधी शिरा घालून त्यावर चिरलेली कोथिंबीर व ओल्या नारळाचा खव व बारीक शेव घालून द्या. सोबत लिंबाची फोड.



हा तिखटमीठाचा शिरा खूपच खमंग व चविष्ट लागतो.

Tuesday, October 21, 2008

करंजी



जिन्नस :

१ वाटी बारीक रवा, १ वाटी मैदा किंवा all purpose flour ,
५-६ चमचे तेल कडकडीत गरम करून घालण्यासाठी, मीठ
३ वाट्या ओल्या नारळाचा खव, अडीच वाट्या साखर,
थोडी वेलची पूड, १-२ चमचे साजूक तूप
तळणीसाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन :

मध्यम आचेवर कढई तापत ठेवून त्यात १-२ चमचे साजूक तूप घाला. नंतर त्यात नारळाचा खव व साखर असे एकत्रित केलेले मिश्रण घालून शिजवत ठेवा. साखर वितळायला लागली की गॅस थोडा मोठा करा. थोड्या वेळाने नारळ व साखर यांचे मिश्रण घट्ट होईल. डावेने एकसारखे ढवळून मिश्रण गॅसवरून खाली उतरवून ठेवा. मग त्यात थोडी वेलची पूड घालून परत एकसारखे करा. हे झाले करंजीत घालायचे सारण.


सारण करायच्या आधी रवा व मैदा दूधात किंवा पाण्यात भिजवून ठेवा. भिजवायच्या आधी त्यात ५- ६ चमचे तेल एका कढल्यात तापवून घाला व चवीपुरते थोडे मीठ. तेल खूप गरम करा. रवामैद्यात घालताना चूर्र असा आवाज यायला पाहिजे. गरम तेल घातले की रवा मैदा चमच्याने एकसारखा करा.


सारण गार झाले की करंज्या करायला घ्या.


आता रवा मैद्याची एक मोठी पोळी लाटा. त्याचे मोठ्या वाटीने ३-४ गोल करा. पुरीसारख्या गोल आकारात सारण भरा व त्याचा अर्धगोलाकार आकार बनवून हाताने सर्व बाजूने दाब द्या म्हणजे सारण बाहेर येणार नाही. नंतर कातणाने अथवा कालथ्याने बाजूने कापून चंद्रकोरीसारखा आकार द्या. सर्व करंज्या करून घ्या. ३-४ करंज्या झाल्या की प्रत्येक वेळी त्यावर ओले फडके ठेवा म्हणजे त्या वाळणार नाहीत. नंतर करंज्या तेलात तळून घ्या.


एकेक वेगळी पुरी करून पण करंज्या करता येतील. पोळी लाटून वाटीने गोल करून घेतल्यास सर्व करंज्या एकसारख्या दिसतात.

Friday, October 17, 2008

साबुदाणा थालिपीठ



जिन्नस :

भिजलेला साबुदाणा १ वाटी
बारीक वाटलेल्या तिखट मिरच्या २ चमचे
शिंगाड्याचे पीठ ३-४ चमचे
१ छोटा कच्चा बटाटा किसलेला (साले काढून)
बारीक चिरलेली कोथिंबीर व नारळाचा खव अर्धी वाटी
१ चमचा साखर
अर्धी वाटी दाण्याचे कूट
चवीपुरते मीठ
साजूक तूप/तेल

क्रमवार मार्गदर्शन :
वरील सर्व साहित्य एकत्र करून नीट कालवून घ्या. हे कालवलेले पीठ जर घट्ट वाटले तर अगदी थोडे पाणी घाला. एकत्रित केलेल्या मिश्रणाचे २ मोठे गोळे करा. तव्याला तेल/तूप लावून घ्या. त्यावर एक गोळा ठेवून सर्वबाजूने एकसारखे थालिपीठ थापा. नंतर त्यावर ४-५ भोके पाडून त्यात तेल/तूप घालून मध्यम आचेवर तवा ठेवावा. त्यावर झाकण ठेवावे. काही सेकंदाने झाकण काढून थालिपीठ कालथ्याने उलटून घ्या. काही सेकंदाने थालिपीठ तव्यावरून काढा. थालिपीठ तांबूस रंग येईपर्यंत ठेवा. म्हणजे खरपूस होईल.


हे थालिपीठ लाल तिखट घालूनही करतात. बाकीचे सर्व साहित्य वरील प्रमाणे फक्त बारीक वाटलेल्या मिरची ऐवजी लाल तिखट व थोडी जिरे पावडर घालून असेच थालिपीठ करा.


दोन्ही प्रकारे हे थालिपीठ छान लागते. सोबत थंडगार दही व गोड लिंबू लोणचे छान लागते.

मसाला पुरी

जिन्नसः

पाणीपुरीच्या पुऱ्या, उकडलेला व कुस्करलेला बटाटा, चिरलेला कांदा, लाल तिखट, धनेजीरे पूड, पाणीपुरीचा मसाला, चिरलेली कोथिंबीर, चिंचगुळाचे दाट पाणी, मीठ, बारीक शेव


कृती : पाणीपुरीच्या पुऱ्या जितक्या हव्या असतील तितक्या मध्ये फोडून त्यात वर दिलेले सर्व जिन्नस थोडे थोडे घाला. मसाला पुरी तय्यार!


पाणीपुरी, रगडा पॅटीस, दही बटाटा शेव पुरी, वगैरे सर्व खाऊन झाले की या मसाला पुरीने चमचमीत खाण्याची सांगता करा. किंवा वेगळी चव म्हणूनही फक्त अशाच पद्धतीने खायलाही छानच!

Monday, October 13, 2008

बटाटा पोहे

बटाटा पोह्यांची ओळख मला माझ्या प्रिय मैत्रिणीकडून झाली. तिचे नाव शैला. अतिशय साधी व हासरी आहे ही शैला. आम्ही कॉलेजला असतना एकत्र अभ्यास करायचो. खास करून accounts चा अभ्यास करताना खूप मजा यायची. balance sheet tally करताना आमच्या दोघींची धडपड! कारण जिचा balance sheet tally होईल ती दुसरीला उत्साहात आंगायची हेहे! माझा झाला tally!


दुपारचे जेवण करून लगेचच आम्ही अभ्यासाला बसायचो. एकदा मी तिच्या घरी जायचे अभ्यासाला तर कधी ती यायची आमच्याकडे अभ्यासाला. तिचे व माझे घर साधारण १५ ते २० मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर होते. तिच्या घरी जेव्हा अभ्यास असायचा तेव्हा तिचे 'बटाटे पोहे' ही डीश ठरलेली असायची. अभ्यास झाला की म्हणायची "थांब रोहिणी मी बटाटे पोहे करते आपल्याला खायला. "


पहिल्यांदा ती ३-४ मिरच्या व मीठ घेऊन पाटा वरवंट्यावर वाटायची. त्याचा हिरवागार गोळा एका वाटीत काढून ठेवायची. तिच्याकडे एक पिटुकला पाटा वरवंटा होता. नंतर बटाट्याची साले काढून पातळ काप करून एका वाटीत पाण्यात घालून ठेवायची. अशी सर्व तयारी करून तिखट चमचमीत पोहे करायची. नंतर अर्थातच चहा. तिचा चहा नेहमी दुधाळ व खूप गोड असायचा. खरे तर असा चहा मला आवडत नाही, पण का कोण जाणे तिच्या हातचा चहा मात्र आवडायचा!


खाणे पिणे झाले की सर्व भांडी घेऊन ती हौदावर घासायची. सर्व भांडी म्हणजे कप बशा, चहाचे भांडे, पोह्यांची कढई, स्टीलच्या डीश वगैरे. हौदाच्या बाजूला वेड्यावाकड्या फरशांची एक चौकोनी जागा बनवली होती भांडी घासायला. भांडी घासून व धुवून झाली की लगेचच एका कोरड्या फडक्यावर उपडी करून ठेवायची. नंतर आम्ही दोघी हौदातल्या पाण्याने हातपाय तोंड धुवायचो. गार पाण्याने छान वाटायचे. कारण आमचा अभ्यास सलग ४-५ तास चालायचा. पावडर कुंकू लावून फ्रेश व्हायचो. मग ती माझ्याबरोबरच निघायची भाजी आणायला. भाजी आणायला ती दुसऱ्या वळणावर वळायची व मी पुढे माझ्या घराकडे जायचे.


जाता जाता आम्ही दुसऱ्या दिवशी कोणत्या विषयाचा व काय काय अभ्यास करायचा ते ठरवायचो.

Tuesday, October 07, 2008

सँडविच




जिन्नस:


मटार, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची, बटाटा, कांदा, टोमॅटो,
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद,
लाल तिखट, धनेजीरे पूड, पावभाजी मसाला, मीठ, लिंबू
स्लाईस ब्रेड
बटर अथवा साजूक तूप

वाढणी : ज्या प्रमाणात हवे असेल त्या प्रमाणात.


क्रमवार मार्गदर्शन :


जाड चिरलेला फ्लॉवर, कोबी व सिमला मिरची, मटार, बटाटा कूकरमध्ये शिजवून घ्या. नंतर ते चाळणीमध्ये घालून ठेवा म्हणजे त्यातले पाणी निथळून जाईल. कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्या.
मध्यम आचेवर कढईमध्ये थोडे तेल तापवून घ्या व नेहमीसारखी फोडणी करा. त्यात बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घालून परता. गॅस बारीक करून अधून मधून परतत राहा खमंग होईपर्यंत. मग त्यात उकडलेल्या भाज्या डावेने घोटून घेऊन घाला व ढवळा. नंतर त्यात लाल तिखट, धनेजीरे पूड, पावभाजी मसाला घाला. चवीप्रमाणे मीठ घालून चांगले ढवळून घ्या. नंतर त्यावर चवीप्रमाणे लिंबू पिळून परत एकदा एकसारखे ढवळून घ्या.


भाजी गार झाली की ब्रेडच्या स्लाईसच्या कडा काढून घ्या. ब्रेडच्या एका स्लाईसला बटर अथवा साजूक तूप लावा व एका स्लाईसवर मसालेदार भाजी पसरवून घ्या. दोन्ही स्लाईस एककेकांवर ठेवून सँडविच टोस्टर मध्ये भाजून घ्या.


थोडक्यात पावभाजी साठी जी भाजी करतो तशीच करायची आहे.


टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम असतानाच खा!

Monday, October 06, 2008

दुधी हलवा










वाढणी: २ जण


पाककृतीला लागणारा वेळ : ३० मिनिटे


जिन्नस :


किसलेला दुधी भोपळा 1 वाटी
साखर अर्धी वाटी
दूध 1 वाटी
किसलेला खवा  अर्धी वाटी
साजूक तूप 1चमचा



क्रमवार मार्गदर्शन:

मध्यम आचेवर पातेले ठेवून त्यात साजूक तूप घाला. नंतर किसलेला दुधी भोपळा घालून परतून घ्या. नंतर त्यावर झाकण ठेवून वाफेवर दुधी शिजवा. नंतर त्यात दूध व साखर घालून ढवळा. आता हे मिश्रण चांगले शिजवा. दूध आटत आले की त्यात खवा  घालून मिश्रण चांगले ढवळा. अजून थोडे शिजले की गॅस बंद करा. वर झाकण ठेवा म्हणजे गार झाला की घट्ट होईल. दुधी हलवा तयार!
याच पद्धतीने गाजर हलवा बनवा.


साखरेचे प्रमाण कमी जास्त आवडीनुसार घ्यावे.
रिकोटा चीझ किंवा खवा नसला तरी चालतो. नुसते दूध आटवूनही घट्ट झाला की छान लागतो.




Sunday, October 05, 2008

वाटली डाळ


१ किंवा २ वाट्या हरबरा डाळ ७-८ तास पाण्यात भिजत घाला. वाटतानाच त्यामध्ये ४-५ हिरव्या मिरच्या व पुरेसे मीठ घालून बारीक वाटा. वाटताना जरूरीपुरते पाणी घाला. हिरवी मिरची चवीला तिखट आहे याची खात्री करून घ्या. कारण जर मिरचीला तिखटपणा नसेल तर वाटली डाळ रूचकर लागत नाही. वाटून झाल्यावर तेलाच्या फोडणीमध्ये ती वाटलेली डाळ घालून ढवळा. झाकण ठेवून वाफ द्या. २-३ मिनिटांनी झाकण काढून परत एकदा ढवळा. असे बरेच वेळा ती शिजेपर्यंत आणि मोकळी होईपर्यंत करावे लागेल. कालथ्याने डाळीचा वाटलेला गोळा मोकळा करत जावे प्रत्येक वाफेला. मध्यम आच ठेवावी. इलेक्ट्रीक शेगडीवर काही वेळा डाळ पातेल्याला लागते, तेव्हा सारखे बघावे लागते. वाफेवर डाळ हळूहळू शिजून मोकळी होईल व कोरडी होईल. खायच्या वेळी त्यावर चिरलेली कोथिंबीर व ओला नारळ पेरून घ्या. आवडत असल्यास चवीला थोडे लिंबू पिळा.


Monday, September 22, 2008

चहा



आपल्याला ज्या कपात चहा प्यायचा आहे त्या कपाच्या पाउण कप (थोडे वर) पाणी घ्या. त्यात थोडेसे दूध घाला म्हणजे तो पूर्ण कप होईल इतके. आता हे मिश्रण एका प्लॅस्टीकच्या ग्लासामध्ये घाला. हा प्लॅस्टीकचा ग्लॉस मोठा घ्या. त्यात टी बॅग्ज २ घाला व ग्लास मायक्रोवेव्ह मध्ये ठेवा. power - medium high व वेळ ४ मिनिटे. नंतर ग्लास बाहेर काढा. आत असलेल्या टी बॅग्ज चमच्याने खूप दाबा म्हणजे त्यात असलेल्या चहा पावडरचा रंग चहामध्ये उतरेल. नंतर कपात चहा ओतून (टी बॅग्ज वगळून) आवडीप्रमाणे त्यात साखर घालून चमच्याने ढवळा. चहा तयार! प्लॅस्टीक ग्लॉस वापरण्याचे कारण चहा गरम राहतो, लगेच गार होत नाही.

Monday, September 15, 2008

पालक भजी

जितकी पालक पाने तितकी भजी:


पालकाची निवडक पाने पाण्याने धुवून ती अलगद हाताने फडक्याने पुसून घ्या. हरबरा डाळीच्या पीठामध्ये थोडेसे तांदुळाचे पीठ घ्या. त्यात थोडे लाल तिखट, थोडी हळद, थोडी हिंग पावडर व चवीपुरते मीठ घालून पीठ जरा पातळसर भिजवा. कढईत तीव्र आचेवर तेल तापवून घ्या. तेल चांगले तापले की मध्यम आच ठेवा. पालकाची पाने एकेक करून डाळीच्या पीठामध्ये बुडवून ती तळण्यासाठी कढईत अलगद सोडा. काही वेळाने झाऱ्याने उलटा, व तांबुस रंग येईपर्यंत तळा. अशी ही हलकीफुलकी व कुरकुरीत भजी चवीला छान लागतात. पाहुणे आले की जेवणामध्ये ही भजी खूप उठून दिसतात.

Thursday, September 11, 2008

लोणी

आपण रोजच्या रोज दूध घेतो. साधारण १ लिटर दूधाची पिशवी बहुतेक जण रोज घेतात. पहिल्याप्रथम मंद आचेवर दूध तापवून घ्या. ते गार झाले की शीतकपाटात ठेवा. दुपारी ४ च्या सुमारास ते दूध शीतकपाटामधून बाहेर काढून त्यावर जमा झालेली दाट व जाड साय एका भांड्यात काढून ते भांडे परत शीतकपाटात ठेवा. याच पद्धतीने चार दिवसाची साय जमा करा. ४ दिवसानंतर ती जमा झालेली साय एका मोठ्या भांड्यात काढून त्यात दूध तापवून घाला. दूधाचे प्रमाण जमा झालेल्या सायीच्या दूप्पट असायला हवे. मग एका डावेने ढवळून घ्या.


नेहमी दही लावताना आपल्या हाताचे बोट दुधामध्ये घालून ते बोटाला सहन होण्याइतपत झाले की मग त्याला विरजण लावा म्हणजेच त्यामध्ये चांगल्या प्रतीचे दही घाला. दह्याचे प्रमाणही ऋतुमानाप्रमाणे ठरवावे. जसे की हिवाळ्यात दही जास्त घालायला लागते तितके ते उन्हाळ्यात कमी प्रमाणात पुरते. साय व दूध या मिश्रणात पुरेसे दही घालून परत एकदा डावेने/चमच्याने बरेच वेळा ढवळावे.


दाट सायीचे दही तयार झाले की एका भांड्यामध्ये किंवा चिनीमातीच्या बरणीमध्ये ताक घुसळायला घ्यावे. अजिबात पाणी न घालता रवी पूर्ण दह्याच्या खालपर्यंत घुसळायची रवी घालून ताक घुसळायला घ्यावे. ५ ते १० मिनिटात लोण्याचा गोळा रवीभोवती जमा होतो आणि खाली नितळ ताक तयार होते. आता एका भांड्यात पाणी घेऊन पहिल्याप्रथम रवीभोवती जमा झालेले लोणी सोडवून घ्या. रवी पाण्याने धुवून बाजूला ठेवा. नंतर पातेल्याच्या कडेकडेने सर्व लोणी सोडवून घ्या व लोण्याचा गोळा पाणी असलेल्या भांड्यात ठेवा. आता हे लोणी वर खाली करून पाण्याने धुवा भांड्यातच. त्यातले पाणी ताकात घाला. असे २-४ वेळा करा. म्हणजे लोण्यातील राहिलेला ताकाचा अंश पूर्णपणे निघून जाईल. मग हे लोणी दुसऱ्या एका भांड्यात घालून त्यात लोण्याच्या वर पाणी राहील इतके पाणी घालून ते शीतकपाटात ठेवा.
अश्याच प्रकारे परत ४ दिवसांची साय जमा करून परत एकदा याच पद्धतीने दही लावून त्याचे ताक बनवा व लोणी काढून ठेवा. पहिले साठवलेले लोणी आहे त्यातले पाणी काढून परत त्यात पाणी घालून लोणी वर खाली करून पाण्याने धुवा. व ते पाणी टाकून द्या. मग त्यावर दुसरे काढलेले लोणी ठेवून परत त्या लोण्याच्या वर पाणी येईपर्यंत पाणी घालून परत शीतकपाटामध्ये ठेवा. असे ८ दिवसाचे लोणी कढवून त्याचे साजूक तूप बनवा. साजूक तुपाची कृती मनोगतावर दिलेली आहे.


घरचे लोणी बनवले की घरचे सायीचे दही, साधे दही, ताक, लोणी व साजूक तूपही खायला मिळते. चांगल्या प्रतीचे व भरपूर प्रमाणात दूध दुभते तयार होते. पूर्वी हे सर्व जिन्नस ठेवायला एक लाकडी कपाट आणि त्याला वरून जाळी असे. यालाचा दुभत्याचे कपाट म्हणायचे. घरात लहान मूल असेल आणि त्याच्या तळहातावर असे ताजे लोणी ठेवले तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो. घरात कोणतेही शुभकार्य असेल तर जेवणावळीत घरचे तूप भरपूर प्रमाणात वाढता येते.

Wednesday, September 03, 2008

खमंग काकडी




मोदक


जिन्नस :

२ वाट्या खवलेला ओला नारळ, २ वाट्या चिरलेला गूळ
१ चमचा खसखस,
२ वाट्या तांदुळाचे पीठ, २ वाट्या पाणी
२ चमचे तेल, मीठ
उकड मळण्यासाठी तेल व पाणी
साजूक तूप २ चमचे



खवलेला ओला नारळ व चिरलेला गूळ एकत्रित करा. मध्यम आचेवर पातेले ठेवून त्यात २ चमचे साजूक तूप घालून एकत्रित केलेले मिश्रण घालून शिजवा. काही वेळाने या मिश्रणाचे सारण बनायला लागते व ते कोरडे पडायला लागते. गॅस बंद करा. सारण शिजत आले की त्यात खसखस भाजून घाला.


मध्यम आचेवर एका पातेल्यात २ वाट्या पाणी तापत ठेवा. त्यात थोडेसे मीठ व २ चमचे तेल घाला. या पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करा. उकळलेल्या पाण्यात तांदुळाची पीठी घालून कालथ्याने पटापट एकसारखे ढवळा. नंतर परत मंद आचेवर हे पातेले ठेवून त्यावर झाकण ठेवा. एक दणदणीत वाफ येऊ देत. नंतर झाकण काढून ही तयार झालेली उकड एका ताटलीत काढून घ्या व त्यामध्ये पाणी व तेल घालून चांगली मळून घ्या.


उकडीचा साधारण मोठ्या लिंबाएवढा गोळा घेऊन त्याला गोल आकार द्या. पाणी व तेलाचा हात घेऊन हातानेच या गोल आकाराची पातळ, नितळ व खोलगट पारी बनवा. पारीच्या वरच्या कडा जास्त पालळ असायला हव्यात. नंतर या खोलगट पारीमध्ये पूरेसे सारण घालून थोड्या थोड्या अंतरावर पाकळीसारखा आकार द्या. पाकळीचा आकार देताना पारीच्या कडा दोन बोटांच्या चिमटीमध्ये पकडून दाब द्या. हा दाब तसाच पारीच्या खालपर्यंत द्या. अश्या प्रकारे सर्व पाकळ्या अगगद हाताने एकत्रित करून त्याचे मोदकाच्या वर एक टोक बनवा जसा देवळाला कळस असतो तसा.


अश्या प्रकारे सर्व मोदक करून घ्या. चाळणीला तेल लावून मोदक त्यामध्ये घालून कूकरमध्ये उकडून घ्या. कालावधी १५ मिनिटे. जश्या इडल्या उकडतो त्याप्रमाणे.

गरम गरम मोदकांवर साजूक तूप भरपूर प्रमाणात घ्या. चव चांगली लागते. वरील प्रमाणात साधारण १५ ते २० मोदक होतात.

Tuesday, August 26, 2008

बटाटा भजी





वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

२ बटाटे मध्यम आकाराचे
लाल तिखट १ चमचा,
धनेजीरे पूड १ चमचा, मीठ
चिरलेली कोथिंबीर मूठभर
हरबरा डाळीचे पीठ १ ते दीड वाटी
तळणीसाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन:

बटाट्याची साले काढून बटाटे धुवून घ्या. नंतर त्याचे गोल पातळ काप करा. डाळीच्या पीठामध्ये लाल तिखट, धनेजीरे पूड, चिरलेली कोथिंबीर, व चवीपुरते मीठ घालून पातळ पीठ भिजवा. पीठ खूप पातळ नको. मध्यम आचेवर कढईत पुरेसे तेल तापवून घ्या. भिजलेल्या पीठ थोडे गरम केलेल्या तेलामध्ये घाला ते फुलून वर येईल व तेलावर तरंगायला लागेल म्हणजे हे तेल भजी तळण्यासाठी पुरेसे तापलेले आहे असे समजावे. नंतर कापलेले बटाट्याचे काप एकेक करून भिजलेल्या पीठामध्ये बुडवून तेलात सोडा. काही सेकंदांनी ही भजी झाऱ्याने उलटी करा. तांबुस रंग येईपर्यंत तळा, म्हणजे पक्की तळली जातील.
यासोबत लसणीची चटणी, दाण्याची चटणी, आंब्याचे लोणचे व चिंचेचा ठेचा मस्त लागतो. गरम आमटीभाताबरोबर ही भजी छान लागतात.

बाहेर मुसळधार पाऊस पडत आहे... विजांचा गडगडाट व लखलखाट चालू आहे....तुम्ही ऑफिसमधून भिजत घरी आलेला आहात.. तुमची आवडती व्यक्ती घरी आलेली आहे... आईने चिंच गुळाची आमटी केलेली आहे.. डायनिंग टेबलवर जेवणाची सुरवात झालेली आहे.. आई गरम गरम भजी वाढत आहे... डावीकडे चटणी, लोणचे, कोशिंबीर आहे... एकीकडे गप्पांना बहर आलेला आहे... एकीकडे दूरदर्शनवर बातम्या चालू आहेत... इतक्यात लाईट जातात... पूर्णपणे अंधार... बाबा नेहमीच्या जागी ठेवलेली मेणबत्ती घेऊन ती प्रज्वलित करतात... आणि मग मेणबत्तीच्या प्रकाशात जेवणाची लज्जत अजूनच वाढते.....

Wednesday, August 20, 2008

डाळीचे धिरडे


१ वाटी मूग डाळ, १ वाटी हरबरा डाळ, ७-८ तास भिजत घाला. नंतर मिक्सर/ग्राईंडर वर बारीक वाटा. थोडी भरडही चालू शकेल. वाटताना पुरेसे पाणी घालावे. नंतर त्यात कांदा, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या बारीक चिरून घाला.  व चिरलेली कोथिंबीर घाला. कांदा, लसूण मिरची व कोथिंबीर आवडीप्रमाणे कमी जास्त घाला. शिवाय चिरलेला टोमॅटो, लाल तिखट, हळद,  चवीप्रमाणे मीठ घालून वाटलेले पीठ मिळून येण्यापुरते थोडे पाणी घालून व्यवस्थित मिश्रण ढवळा.


मध्यम आचेवर तवा तापत ठेवा. तो तापला की त्यावर २-३ चमचे तेल घालून ते कालथ्याने सर्व तवाभर पसरून घ्या. नंतर डावेने वाटलेल्या डाळीचे मिश्रण घालून एकसारखे पसरून घ्या. काही सेकंदाने धिरड्यावर २-३ चमचे तेल सर्व बाजूने घाला. धिरड्याच्या कडेने पण थोडे तेल घाला. नंतर धिरडे कालथ्याने उलटून घ्या. परत २-३ चमचे तेल सर्व बाजूने घाला. धिरडे खरपूस झाले की तव्यावरून काढा. खायला देताना सोबत दाण्याची चटणी घ्या.


दाण्याची चटणी - (दाण्याचे कूट, लाल तिखट, मीठ, साखर, दही एकत्र कालवून घेणे. )


याप्रमाणे कोणत्याही मिश्र डाळीचे (उडीद डाळ, तुरडाळ, मुगडाळ, हरबरा डाळ) अथवा कोणत्याही फक्त एकाच डाळीचे धिरडे बनवू शकता. प्रमाण पण हवे तसे घेऊ शकता.

Sunday, August 17, 2008

सिमला मिरची

जिन्नसः

सिमला मिरची
लाल तिखट
धनेजीरे पूड
दाण्याचे कूट
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, हळद
मीठ


क्रमवार मार्गदर्शन : सिमला मिरची बारीक चिरा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात फोडणीसाठी तेल घाला. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात चिरलेली सिमला मिरची घालून परता. त्यावर झाकण ठेवून काही सेकंदानी परत झाकण काढून परता. नंतर त्यात लाल तिखट, धनेजीरे पूड व चवीपुरते मीठ घालून भाजी नीट ढवळा. परत झाकण ठेवा. परत काही सेकंदानी झाकण काढून परत भाजी नीट ढवळा व परता. नंतर त्यामध्ये अगदी थोडे भाजी मिळून येण्याइतपत दाण्याचे कूट घाला व चांगली परतून परतून घ्या. आता गॅस बंद करा. ही कोरडी भाजी पोळीबरोबर छान लागते.

Tuesday, August 12, 2008

डोसा




वाढणी:४ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

तांदुळ २ वाट्या (लाँग ग्रेन राइस)
उडदाची डाळ १ वाटी
चवीपुरते मीठ

क्रमवार मार्गदर्शन:

२ वाट्या तांदुळ व १ वाटी डाळ दोन्ही वेगवेगळ्या पातेल्यात दुपारी १२ ला भिजत घालणे. रात्री १० ला मिक्सर/ब्लेंडर मधून बारीक वाटून घेणे. वाटून झालेले पीठ एका पातेल्यात झाकून ठेवणे. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता न्याहरीला किंवा दुपारी १२ वाजता जेवायला इडली करणे. दुसऱ्यादिवशी हे झाकून ठेवलेले पीठ फसफसून वर येते. आंबट होते.


आंबलेले इडली डोश्याचे पीठ तयार झाले की डोसे करायच्या वेळी हे आंबलेले पीठ चवीपुरते मीठ घालून व थोडे पाणी घालून डावेने चांगले घोटून घ्यावे. गंधासारखे एकसंध पीठ दिसले पाहिजे. डोश्याला पीठ हे नेहमी पातळच असावे म्हणजे डोसे तव्यावर घालताना मोठे पसरवता येतात. मध्यम आचेवर मोठा तवा चांगला तापवून घ्या. नंतर त्यावर १-२ चमचे तेल घालून कालथ्याने हे तेल सर्व तवाभर पसरून घ्या. एका वाटीत थोडे मीठ व पाणी घालून मीठाचे पाणी तयार करा. ते हाताने जरा ढवळून घ्या. नंतर तेल पसरलेल्या तव्यावर हे मीठाचे पाणी शिंपडा. चूर्र असा आवाज येईल. नंतर डोश्यासाठी घोटून तयार केलेले पीठ डावेने घेऊन ते तव्यावर घाला. काही सेकंद थांबा. मग हे पीठ गोल गोल जितके पसरवता येईल तितके पसरवा. मग परत काही सेकंद थांबा. नंतर १-२ चमचे तेल सर्व डोश्यावर पसरून घाला. हा पातळ डोसा अतिशय पातळ असल्याने काही वेळाने तो खालून बारून रंगाचा झालेला दिसेल. आता कालथ्याने डोस सर्व बाजूने सोडवून घ्या. मग त्यावर बटाट्याची भाजी घालून डाव्या व उजव्या बाजूने घडी घाला म्हणजे उपहारगृहात जसा डीश मध्ये देतात तसाच दिसेल. सोबत चटणी व गरम गरम, तिखट तिखट सांबार घ्या.

तेल फक्त एकदाच तव्यावर घातलेले पुरते. नंतर प्रत्येक डोशाच्या वेळी मीठाचे पाणी शिंपडा. बरेच डोसे घालायचे असतील तर ७-८ डोश्यानंतर परत एकदा थोडे तेल तव्यावर पसरून घ्यावे.

Sunday, August 10, 2008

ओल्या नारळाची चटणी


वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

अडीच वाट्या ओल्या नारळाचा खव,
चिरलेली कोथिंबीर २-३ चमचे,
हिरव्यागार मिरच्या २-३
अर्ध्या लिंबाचा रस
मीठ, साखर अर्धा चमचा

क्रमवार मार्गदर्शन:

वरील सर्व मिश्रण मिक्सर/ग्राइंडर मधून बारीक करा. थोडे पाणी घाला म्हणजे मिळून येईल. ही चटणी इडली, बटाटेवडा, मेदुवडा, साबुदाणा वडा यासोबत छान लागते. शिवाय उपवासाला पण चालते आणि सणवारात नैवेद्याच्या ताटात डावीकडे शोभून दिसते.

ही चटणी दह्यामध्ये मिसळून त्यावर तूप/तेल-जिरे- हिंग याची फोडणी दिल्यास अधिक चवदार होते शिवाय पुरवठ्यालाही येते.

माहितीचा स्रोत:स्वानुभव

कांदेभात



 जिन्नस :

शिळा भात जितक्या प्रमाणात असेल त्याप्रमाणात
चिरलेल्या हिरव्या मिरच्या,
चिरलेला कांदा
लाल तिखट, मीठ, साखर
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद
भाजके दाणे

 मार्गदर्शन :मध्यम आचेवर कढईत पुरेसे तेल घालून ते तापवून घ्या. नंतर त्यामध्ये मोहरी, हिंग हळद घालून फोडणी करून त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चिरलेला कांदा व भाजके दाणे घालून वाफेवर शिजवून घ्या. वाफेवर शिजवणे म्हणजे त्यावर एक झाकण ठेवा. आच मंद करा. व काही वेळाने झाकण काढून परत सर्व परतून घ्या. शिळा भात हाताने कालवून मोकळा करून घ्या. त्यात थोडे लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ व थोडी साखर घालून एकसारखे ढवळून घ्या व फोडणीत घालून ढवळा. भात मोकळा होण्याकरता सर्व बाजूने थोडे परता. असा खमंग व चविष्ट कांदेभात गरम गरम खा. यासोबत पोह्याचा भाजलेला पापड छान लागतो. आवडत असल्यास फोडणीत हिरव्या मिरच्यांबरोबर एखादी लाल सुकी मिरचीही घाला. या भातामध्ये चिरलेला कांदा जरा जास्तच घाला. शिवाय अगदी थोडे लाल तिखट फोडणीतही घाला.

दाण्याची चटणी


Wednesday, July 30, 2008

साबुदाणा खिचडी

साबुदाणा खिचडी! वा! प्रत्येकाला आवडणारी, माझी तर अत्यंत लाडकी. मी तिला साखी म्हणते. लहानपणीच हिची ओळख झाली. माझ्या माहेरी आईचा दर सोमवारचा उपवास असायचा त्यामुळे दर सोमवारी आई खिचडी करायची. दुपारची १२ ची शाळा ,त्यामुळे सकाळी साडेदहाला जेवायचो. त्यादिवशी सकाळपासून सगळे लक्ष त्या खिचडीकडे! केव्हा एकदा जेवायची वेळ होते आणि कधी एकदा खिचडी खायला मिळते. पोळी भाजीच्या जेवणामध्ये नैवेद्यासारखी खिचडी मिळायची, तेव्हापासून खिचडीची फॅन आहे.
एकदा आम्ही सगळ्या मामे-मावस बहिणी एकत्र जमलो होतो, आणि आम्हाला खिचडी खायची इच्छा झाली. माझी मोठी मामेबहीण आईला म्हणाली, "आत्या तू आज नको करूस खिचडी, मी करते. " हो हो. आणि खूप तिखट कर गं! लाल तिखट घाल भरपूर! असा आमच्या सगळ्या जणींचा आग्रह! ८-१० वाट्यांचा साबुदाणा भिजलेला, मग तो कालवून त्यात लाल तिखट घालतोय, घालतोय! आणि मजा म्हणजे त्या तिखटाला रंग नव्हता पण चव जाम तिखट होती, त्यामुळे आम्हाला कल्पनाच आली नाही की किती तिखट झाली आहे ते! खिचडी बनवली आणि खाल्ली मात्र....... बापरे! जहाल तिखट!! तोंड पोळणे ज्याला म्हणतात ते आम्ही त्यादिवशी अनुभवले आणि सगळा हिरमोड झाला.
नंतर इथे अमेरिकेत आल्यावर असाच एक मजेशीर अनुभव आला. माझ्या मैत्रिणीकडे साबुदाणा होता आणि मला म्हणाली, तुला येते साबुदाणा खिचडी? हो येते की! मी म्हणाले. त्या दिवशी चतुर्थी होती. मला म्हणाली की मी इथे अमेरिकेत आल्यापासून खिचडी खाल्लीच नाही, कारण मला करता येत नाही, त्यामुळे आज भरपूर खिचडी खाऊ. मी पण अगदी लांबलचक हो...... मस्त! खाऊ की! खिचडी केली. गरमगरम खायला घेतली आणि....... पहिल्या घासालाच दोन दाढांमध्ये इतकी काही चिकटली! खाताच नाही आली आम्हांला. आता याचे काय करायचे? दुधाचा, ताकाचा हबका मारून थोडी मुरवली आणि वाफा देऊन परत शिजवली तरी जैसे थे! साबुदाणा अजिबातच चांगला नव्हता. असा दुसऱ्यांदा हिरमोड झाला.
खिचडी अनेक प्रकारे करता येते. माझी आईची स्पेशालिटी म्हणजे ती हिरव्या मिरच्या कुटून घालते तूप जिऱ्याच्या फोडणीमध्ये. साजूक तुपातली तर लाजवाब होते. नुसती लाल तिखट घालून पण मस्त लागते. काकडी किसून पण घालतात, कांदा घालतात. अशी ही खिचडी माझ्या अत्यंत आवडीची!!!!

Tuesday, July 22, 2008

तेलतिखटमीठपोहे


पातळ पोहे २ मुठी चाळून निवडून घ्या. त्यात अर्धी मूठ भाजलेले शेंगदाणे, मूठभर बारीक चिरलेला कांदा, अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट, चवीपुरते मीठ, ५-६ चमचे कच्चे तेल, पाव चमच्याहून कमी साखर घालून हाताने कालवून घ्या. चमचमीत पोहे तय्यार!!

Saturday, July 19, 2008

सजलेले पोहे






वाढणी:२ जण



पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे



पाककृतीचे जिन्नस:



जाड पोहे अडीच वाट्या, चिरलेला कांदा १ वाटी
बटाट्याचे त्रिकोणी पातळ काप अर्धी वाटी
भाजलेले दाणे अर्धी वाटी, मटार अर्धी वाटी,
चिरलेली कोथिंबीर व ओला नारळ पाउण वाटी
साखर, मीठ, तेल अर्धी वाटी, अर्धा चमचा लाल तिखट
मोहरी, हिंग, हळद, हिरव्या मिरच्या १-२



क्रमवार मार्गदर्शन:




सर्वात आधी पोहे चाळून व निवडून पाण्याने धुवून घ्या व ते पाणी निथळण्यासाठी रोळीमध्ये ठेवा. कढईत तेल मध्यम आचेवर तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी, हिंग, व हळद घालून फोडणी करा. नंतर लगेच लाल तिखट घालून बाकीचे सर्व जिन्नस (कांदा, बटाटा, मटार, मिरच्यांचे तुकडे) घालून परता. नंतर त्यावर झाकण ठेवा व १-२ मिनिटांनी झाकण काढून परत ढवळा. असे १-२ वेळा करा म्हणजे कांदा बटाटा वगैरे सर्व नीट शिजेल. शिजले की त्यात कोथिंबीर व ओला नारळ घालून परत परता व गॅस बारीक करा. नंतर त्यात भिजवून ठेवलेले पोहे घालून चांगले ढवळा. नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ व अर्धा चमचा साखर घालून परत चांगले ढवळा. आता परत त्यावर झाकण ठेवा १-२ मिनिटे म्हणजे पोहे पण वाफेवर शिजतील. नंतर झाकण काढून परत एकदा ढवळा. आणि गरम गरम डीश मध्ये खायला द्या.


Wednesday, July 16, 2008

साबुदाण्याची खिचडी




वाढणी:२ जण


पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे


पाककृतीचे जिन्नस:


१ वाटी चांगल्या प्रतीचा साबुदाणा
दाण्याचे कूट मूठभर, १ छोटा बटाटा
हिरवी मिरची १-२, लाल तिखट पाउण ते १ चमचा
जिरे १ चमचा, साजूक तूप/तेल ५-६ चमचे
मीठ, साखर, चिरलेली कोथिंबीर २-३ चमचे
खवलेला ओला नारळ २-३ चमचे


क्रमवार मार्गदर्शन:


साबुदाणा पाण्याने धुवून २-३ तास भिजत घालावा. थोडेसे पाणी राहू द्या म्हणजे जास्त चांगला भिजेल. कच्चा बटाट्याची साले काढून त्याचे काचऱ्या चिरतो तसे पातळ काप करून पाण्यामध्ये घाला. मध्यम आचेवर कढई ठेवा. त्यात तेल/साजूक तूप घालून ते पूरेसे तापले म्हणजे त्यात जिरे घाला, ते तडतडले की त्यात मिरच्यांचे चिरलेले तुकडे घाला व पातळ चिरलेला बटाटा घाला व परता. बटाटा घालताना त्यातले पाणी काढून टाका. त्यावर १-२ मिनिटे झाकण ठेवून बटाटे वाफवून घ्या. ते शिजले की त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर व खवलेला ओला नारळ घालून परत परता. आता गॅस मंद करा. त्यात थोडेसे मीठ पेरून परत थोडे परता. आता भिजवलेला साबुदाणा आहे तो हाताने मोकळा करून घ्या. त्यात लाल तिखट,चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा साखर व दाण्याचे कूट घालून चांगले ढवळून घ्या. व हे ढवळलेले मिश्रण कढईत घालून सगळीकडून खिचडी चांगली ढवळा. नंतर त्यावर झाकण ठेवून १-२ मिनिटे वाफवून घ्या. असे एक दोन वेळा करा, म्हणजे साबुदाणा चांगला शिजेल व त्याचा रंगही बदलेल. कालथ्याने खिचडी परत परत व्यवस्थित ढवळा म्हणजे मोकळी होईल. गोळा होणार नाही. तेल/तूप कमी वाटले तर वरून थोडे घालून ढवळणे.


साबुदाणा भिजवल्यावर दर अर्ध्या तासाने मोकळा करून घ्या. दोन बोटांच्या चिमटीत साबुदाणा धरून तो व्यवस्थित भिजला आहे ना याची खात्री करून घ्या. भिजला नसेल तर थोडासा पाण्याचा हबका मारून त्यावर परत झाकण ठेवा.


खिचडी सर्वात चविष्ट साजूक तूपातील होते.

Tuesday, July 15, 2008

तेलतिखटमीठपोहे

तेल तिखट मीठ पोह्यांची ओळख मला माझ्या लहानपणी झाली. आम्ही लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत मामाकडे रहायला जायचो. माझी मामी सकाळी धुणे धुवायला जायची. ती धुण्याला गेली की आमच्या भावंडांचा खादडीचा कार्यक्रम सुरू. एकदा असेच झाले माझा मोठा मामेभाऊ म्हणाला आज मी एक फर्स्टक्लास डीश बनवतो. तुम्ही दोघींनी मला पोहे चाळून द्या. मग एक मोठी परात घेतली. त्यात पातळ पोहे चाळून निवडून ठेवले. एका मामेभावानी मोठ्या धारदार सुरीने एकदम बारीक कांदा चिरला, तो त्यात घातला. मग एकाने भरपूर लाल तिखट , चवीपुरते मीठ व कच्चे दाणे घातले. आणि हो, चवीपुरती साखरही घातली, त्याशिवाय या पोह्यांना गोडी येत नाही. मी म्हणाले अय्या! आता काय करायच? हे असं कच्चंच खायच? मामेभाऊ म्हणाला हो मग! यातच खरी मजा आहे. तु खाऊन तर बघ. मग पूरेसे कच्चे गोडंतेल घालून पोहे कालवले व प्रत्येकाने वाडग्यात भरून खायला घेतले. अहाहा!! इतके चमचमीत झाले होते म्हणून सांगू!!


नंतर आम्ही दोघी बहीणी हे असे पोहे नेहमी करून खायला लागलो. आई बाहेर मंडईत गेली की आमचे आजोबा व आम्ही दोघी बहिणी हे असे पोहे करून खायचो. माझ्या आजोबांना पण हे झणझणीत पोहे खूप आवडायचे. त्यांना पण इतकी सवय झाली होती या पोह्यांची की आई बाहेर गेली की तेच आपणहून म्हणायचे ते तुमचे झणझणीत पोहे करा बरं! मला खूप भूक लागली आहे. जेव्हा लेखी अभ्यास करायचो म्हणजे प्रश्न उत्तरे लिहिणे की मांडीवर उशी त्यावर पुस्तक वही व बाजूला अधून मधून तोंडात टाकायला या पोह्यांचा वाडगा!!


हे पोहे मी जेव्हा जेव्हा करून खाते तेव्हा तेव्हा माझ्यामध्ये एक प्रकरचा उत्साह संचारतो!!

Monday, July 14, 2008

प्रस्तावना

आत्तापर्यंत माझ्या ७५ पाककृती लिहून झाल्या. प्रत्येक पाककृतीमागे माझ्या काही आठवणी जडलेल्या आहेत. काही पाककृती आईकडून शिकल्या आहेत. काही मित्रमैत्रिणींकडून माहिती झाल्या आहेत तर काही माझ्या मीच तयार केलेल्या आहेत तर काही निरिक्षण करून बनवलेल्या आहेत. प्रत्येक पाककृतीमधे काहीना काही दडलेले आहे. काहींमध्ये त्यामागचा इतिहास, तर काहींमध्ये आठवणी व कुतुहलही आहे. माझ्या पाककृतींची अशा प्रकारे केलेली ओळख तुम्हाला वाचून नक्की आवडेल याबद्दल खात्री आहे.

Wednesday, June 04, 2008

बासुंदी







वाढणी:२ जण


पाककृतीला लागणारा वेळ:९० मिनिटे


पाककृतीचे जिन्नस:


५ वाट्या दूध
साखर ८-१० चमचे
सुकामेवा आवडीनुसार, वेलची पूड चिमूटभर,


क्रमवार मार्गदर्शन:

पातेल्यात दूध मध्यम आचेवर गरम करत ठेवावे. दूध गरम झाले की साय धरेल व ते वर येईल. वर आले की गॅस मंद करून त्यात साखर घाला. साखर घालून झाली की परत मध्यम आचेवर गॅस ठेवून सतत डावेने दूध ढवळत रहा. दूध उकळत राहील व त्यावर सायही धरत राहील. साय धरली की परत ती साय मोडून ढवळणे. ५ वाट्यांचे २ वाट्या होईपर्यंत दूध आटवा. दूध आटले की गॅस बंद करा. गरम असतानाच त्यात आवडीनुसार वेलची पूड, बदाम, पिस्ते, काजू यांचे बारीक काप घालून ढवळा. आटवलेले दूध गार होत असताना अधूनमधून डावेने ढवळत रहा म्हणजे जी परत परत साय धरेल ती मोडेल. दूध खूप गार झाले की फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खा. मूरल्यावर बासुंदी अतिशय सुंदर लागते. गंधासारखी दाट व गार बासुंदी तयार.

साखर आवडीनुसार घाला व दूध पण आवडीनुसार कमी-जास्त दाट करा.

Thursday, April 10, 2008

भडंग


वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

चुरमुरे ८ वाट्या
शेंगदाणे १ वाटी, खोबऱ्याचे पातळ काप १ वाटी
मेतकूट ४ चमचे, लाल तिखट १ चमचा, धने पूड १ चमचा
जिरेपूड १ चमचा, काळा मसाला १ चमचा,
मीठ १ चमचा, पिठीसाखर १ चमचा, पाव वाटी तेल
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग,हळद

क्रमवार मार्गदर्शन:

पाव वाटी तेलात मेतकूट, लाल तिखट, धने पूड, जिरे पूड, काळा मसाला, मीठ व साखर घालून मसाला कालवून घ्या व तो सर्व चुरमुऱ्याना लावा. नंतर नेहमीप्रमाणे तेलाची फोडणी करून त्यात शेंगदाणे व खोबऱ्याचे पातळ काप घालून लाल रंग येईपर्यंत मंद आचेवर परतून घ्या. परतून झाल्यावर त्यामध्ये मसाला लावून तयार झालेले चुरमुरे घालून परत एकसारखे ढवळा. कोल्हापुरी पांढरे शुभ्र टपोरे चुरमुऱ्यांचे भडंग चविला जास्त छान लागतात.


माहितीचा स्रोत:सौ आई

Friday, March 21, 2008

वडे (थालिपीठ भाजणी)

वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

थालिपीठाची भाजणी १ वाटी
लाल तिखट
मीठ
लसुण पाकळ्या २-३
तळणीसाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन:

थालिपीठाच्या भाजणीत चवीप्रमाणे तिखट व मीठ घाला. लसूण पाकळ्या थोड्या ठेचून घाला. वडे थापण्यासाठी पीठ थोडेसे सैलसर भिजवा. नंतर लगेच प्लॅस्टीकच्या कागदावर वडे थापून तळावे. वडे थापायच्या आधी प्लॅस्टीकच्या कागदाला थोडे तेल लावा. शिवाय वडे थापताना पण हाताला थोडे तेल लावून थापावे. वडे तळण्यासाठी तेल आधी व्यवस्थित तापून घेणे आवश्यक आहे. भिजवलेल्या पीठाचा एक गोळा घेवून एकसारखे व कडेने पातळ थापणे, म्हणजे वडे फुगतात पुरीसारखे आणि खुसखुशीत होतात.


माहितीचा स्रोत:सौ आई

अधिक टीपा:वडे खाताना सोबत लसूण चटणी किंवा दही घ्यावे. बाहेर जोराचा पाऊस पडत असेल तर खूपच छान.