Friday, June 29, 2012

चिकवड्या



जिन्नस :

अर्धी वाटी साबुदाणा
४ वाट्या पाणी
चवीपुरते मीठ

क्रमवार मार्गदर्शन : अर्धी वाटी साबुदाणा रात्री भिजवून ठेवा. साबुदाणा खिचडीला जसा साबुदाणा भिजवतो तसा भिजवा. त्यात थोडे पाणी राहू द्या. सकाळी भिजलेला साबुदाणा हाताने मोकळा करून घ्या. मध्यम आचेवर पातेले ठेवा व त्यात ४ वाट्या पाणी व मीठ घाला. नंतर त्यात मोकळा केलेला साबुदाणा घाला व हे मिश्रण शिजवा. शिजवताना डावेने हे मिश्रण ढवळत राहा म्हणजे पातेल्याला खाली लागणार नाही. पळीवाढे इतपत मिश्रण आटले की गॅस बंद करा. साबुदाणा शिजला की त्याचा पांढरा रंग जाईल म्हणजे मिश्रण झाले असे समजावे. नंतर प्लस्टीकच्या कागदावर चिकवड्या घाला. चिकवड्या घालताना जवळ जवळ घाला म्हणजे बऱ्याच चिकवड्या कागदावर मावतील. चिकवड्या चमच्याने घाला. चमच्याने मिश्रण कागदावर घातले की थोड्या गोल आकार देवून पसरवा. चिकवड्या जास्त पातळ नको व जाडही नकोत. चिकवड्यांना वाळवण्यासाठी खूप कडक उन लागते. २-३ तास कडक उन्हात चिकवड्या वाळल्या की हलक्या हाताने त्यांना उलटवा व दुसऱ्या बाजूने परत २-३ तास उन दाखवा. म्हणजे दोन्ही बाजूने चिकवड्या पूर्णपणे वाळतील. नंतर चिकवड्या एका पातेल्यात घाला व दुसऱ्या दिवशी परत उन्हात ठेवा. चिकवड्या चांगल्या कडकडीत वाळल्या पाहिजेत म्हणजे छान फुलतात. नंतर गरम तेलात चिकवड्या तळून भाजक्या शेंगदाण्याबरोबर खा. खूप छान लागतात. उपवसाला या चिकवड्या चालतात. अर्धी वाटी साबुदाण्यात छोट्या चिकवड्या ६० ते ६५ होतात.

Wednesday, June 27, 2012

बटाटा कचोरी


जिन्नस :
४ मधम आकाराचे बटाटे
मिरच्या २
नारळाचा खव मूठभर
लाल तिखट
कोथिंबीर मूठभर
दाण्याचे कूट मूठभर
मीठ चवीनुसार
साखर अर्धा चमचा
चारोळ्या, बेदाणे, बदामाचे काप ऐच्छिक
साबुदाण्याचे पीठ डावभर



क्रमवार मार्गदर्शन : बटाटे कूकरमध्ये उकडून घ्या. कूकर गार झाला की आतील बटाटे एका रोळीमध्ये काढून घ्या म्हणजे जास्तीचे पाणी निथळून जाईल. बटाटे पूर्ण गार झाले की त्याची साले काढून किसून घ्या. बटाटे किसले की त्यात १ मिरची व मीठ वाटून घाला अथवा लाल तिखट अर्धा चमचा व चवीनुसार मीठ घाला. हे सर्व मिश्रण एकजीव करा. ओला नारळाचा खव, कोथिंबीर, दाण्याचे कूट, मीठ व साखर, एका मिरचीचे खूप बारीक तुकडे असे कचोरीत घालायचे सारण तयार करा. त्यात हवे असल्यास चारोळ्या, बदाम काप व बेदाणे घाला. सारण एकत्रित कालवून घ्या.



आता बटाट्याच्या मिश्रणाचे छोटे गोळे करून घ्या व एकेक गोळ्याची कचोरी बनवा. कचोरी बनवताना गोळ्याला तेला/तूपाचा हात घेऊन त्याचा हातानेच नितळ गोळा करा व त्याची पातळ पारी बनवा. या पारीमध्ये ओल्या नारळाच्या खवाचे केलेले सारण बनवा व ही पारी हाताने सर्व बाजूने एकत्र करून पारी बंद करा म्हणजे सारण बाहेर येणार नाही. गोल आकाराच्या कचोऱ्या बनवून घ्या. नंतर एका स्टीलच्या वाडग्यात साबुदाण्याचे पीठ घ्या व या पीठात सर्व कचोऱ्या घोळवून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात तेल/तूप घाला. तेल पुरेसे तापले की  आच मंद ठेवा व तांबूस रंगावर सर्व कचोऱ्या तळून घ्या. या कचोऱ्या उपवासाला चालतात.



Wednesday, June 20, 2012

बटाटा पापड




जिन्नस :
१ मोठा बटाटा
लाल तिखट १ चमचा
जिरे पूड अर्धा- पाव चमचा
मीठ चवीपुरते
साबुदाणा पीठ ३-४ चमचे
पापड लाटण्यासाठी साबुदाणा पीठ वेगळे घ्या.



मार्गदर्शन : बटाटा कूकरमध्ये उकडून घ्या. कूकरमधून शिजलेला बटाटा एका रोळीमध्ये काढून ठेवा म्हणजे जास्तीचे पाणी निथळून जाईल. बटाटा गार झाला की त्याचे साल काढून किसून घ्या. किसलेल्या बटाट्यामध्ये लाल तिखट, जिरेपूड, साबुदाणा पीठ व मीठ घालून हे मिश्रण हातानेच खूप एकजीव करा. नंतर साजूक तूपाचा हात घेऊन हे मिश्रण मळा. नंतर हे मिश्रण खूप कुटा. पीठ एकदम नितळ झाले पाहिजे. लोखंडी खलबत्यात हे मिश्रण खूप छान कुटले जाते. खलबत्ता नसेल तर एका पसरट पातेल्यात पीठ ठेवून त्यावर वाटीने आपटा. वाटी कलती करून हे मिश्रण वाटीनेच कूटा. वाटीच्या कडा या पीठावर पडल्या पाहिजेत. नंतर पोलपाटावर साबुदाण्याचे पीठ घ्या. कुटलेले बटाट्याच्या पीठाला डांगर म्हणतात. या डांगराचे छोटे गोळे करून एका गोळीचा एक पापड असे पापड लाटा. पापड लाटताना पीठाचा वापर जास्त करा. खूप पातळ पापड लाटून झाले की एका प्लॅस्टीकच्या कागदावर हे पापड उन्हात चांगले कडक वाळवा व नंतर एका डब्यात ठेवा. डब्याचे झाकण पूर्णपणे बंद होईल याची काळजी घ्या. नाहीतर हवा लागून हे पापड लापट होतील. उपवासाचा हे पापड चालतात. नंतर हे पापड तळून खा. पापड हलकाफुलका झाला पाहिजे. डांगर एकजीव एकसंध झाले आणि पापड पातळ लाटला गेला की पापड खूप छान होतात. पापड तळले की फुलतात आणि हलकेफुलके होतात. हे पापड चवीला खूप छान लागतात. डांगरही खूप छान लागते. १ मोठ्या बटाट्यामध्ये साधारण लहान २० ते २५ पापड होतात.

हे पापड भाजूनही छान लागतात. भाजलेल्या किंवा तळलेल्या पापडासोबत भाजके शेंगदाणे आवडत असल्यास घ्यावेत.