Friday, November 22, 2013

खरवस



जिन्नस :
  • चिकाचे दूध १ कप
  • दूध पाऊण कप
  • साखर साधारण १ कप
  • वेलची पूड, केशर


चिकाचे दूध , दूध , साखर, वेलची व केशर सर्व एका भांड्यात एकत्र करा व ढवळा. साखर विरघळली पाहिजे. नंतर कुकर मध्ये कुकराची ताटली बुडेल इतके पाणी घाला व सर्व एकत्रित केलेले मिश्रणाचे भांडे कुकरामध्ये ठेवा व त्यावर झाकण ठेवा. नंतर कुकराचे झाकण लावून शिटी काढा. अर्धा तास मंद आचेवर हे मिश्रण शिजू देत. आता गॅस बंद करा. कुकर गार झाला की मिश्रणाचे भांडे बाहेर काढा. खूप गार झाल्यावर वड्या पाडा. वड्या खाऊन जर उरल्या तर त्या शीतकपाटात ठेवा.

साखरेचे प्रमाण साधारण एक कप  असे दिले आहे तरी प्रथम अर्धा कप  साखर घालून ढवळून मग चव पाहावी. व नंतर परत आवडीप्रमाणे साखर घालावी. खरवस  अगोड  चांगला लागत नाही. चिकाचे दूध पहिल्या दिवशीचे असेल तर दूध पाऊण प्रमाणात घ्यावे . चीक दुसऱ्या दिवशीचा असेल तर चिकाच्या दुधाच्या निम्मे साधे दूध घ्यावे. पहिल्या दिवशीच्या चिकाच्या वड्या छान पडतात. गूळ घालणार असाल तर जायफळ घालावे.

Friday, June 28, 2013

बिस्कीटे



जिन्नस

  • गव्हाचे पीठ अर्धी वाटी, मैदा व हरबरा डाळीचे पीठ मिळून अर्धी वाटी
  • लोणी पाऊण वाटी, ग्रॅन्युलेटेड शुगर आणि ब्राऊन शुगर मिळून अर्धी वाटी
  • २ चिमूट बेकींग सोडा
  • साजूक तूप ट्रे बेकींग ट्रे ला लावण्यापुरते

 
वरील सर्व मिश्रण एका वाडग्यात एकत्र करा व हाताने मळून घ्या. पिठाच्या गुठळ्या रहायला नकोत. नंतर हे मिश्रण झाकून ठेवा. २० मिनिटे हे मिश्रण झाकले गेले पाहिजे. नंतर बेकींग ट्रे ला तूपाचा हात लावून घ्या. मुरवलेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करा व त्यावर काट्या चमच्यामधल्या काट्याने अलगद हाताने चेपा. ट्रे मध्ये हे सर्व गोळे काही अंतर राखून ठेवा. ओव्हन २५० डिग्री फॅरनहाईट वर ठेवून ट्रे त्यात ठेवा. ३० ते ३५ मिनिटे भाजून घ्या. बिस्कीटे तयार होतील. ओव्हन बंद करा. काही वेळाने ट्रे बाहेर काढून सर्व बिस्कीटे एका ताटात गार करायला ठेवा. पूर्ण गार झाली की डब्यात भरून ठेवा.


वरील मिश्रणात ३५ बिस्कीटे होतात. वर जे मिश्रण दिले आहे त्यामध्ये ग्रॅन्युलेटेड शुगर जास्त व बाकीची ब्राऊन शुगर थोडी घालावी. शिवाय मैदा जास्त व बाकीचे डाळीचे पीठ कमी घ्या. वरील सर्व मिश्रणाचा एकत्रित मळून जो गोळा तयार होतो तो सैलसर कणकेसारखा झाला पाहिजे. लोण्याचे प्रमाण दिले आहे तर ते थोडे कमी जास्त घालावे म्हणजे गोळा सैलसर होण्याइतपत घालावे.

Tuesday, June 18, 2013

कणीक भिजवणे


जिन्नस :
गव्हाचे पीठ ४ वाट्या
पाणी २ वाट्या
गोडतेल मोठाले ५ ते ६ चमचे
पाऊण चमचा मीठ


मार्गदर्शन : एका परातीत गव्हाचे पीठ घ्या. त्यात अर्धा चमचा मीठ घाला. थोडे थोडे पाणी घालून कणीक ओली करा. कणीक ओली करताना एकीकडे चमच्याने सगळ्या बाजूने ढवळत रहा. ४ वाट्या कणकेसाठी २ वाट्या पाणी लागते. आता ही ओली झालेली  कणीक अजूनही थोडीफार कोरडीच असेल. नंतर एक चमचा तेल हातावर घ्या आणि ओली झालेली  कणीक हातानेच एकसारखी करून मळून घ्या व त्याचा गोळा बनवा. हा कणकेचा गोळा बनवताना अजूनही कणकेच्या गोळ्याच्या आजुबाजूला थोडे गव्हाचे पीठ कोरडे राहिलेले दिसेल. त्यात अगदी थोडे पाणी घालून तेही त्या गोळ्यात मिक्स करा. कणकेचा गोळा मळताना एकेक चमचा हातावर तेल घेत राहा व गोळा मळत रहा. आता हा मळलेला कणकेचा गोळा अर्धा तास मुरवत ठेवा. कणकेच्या गोळ्यावर झाकण ठेवा. अर्ध्या तासानंतर परत थोडे हातावर तेल घालून कणकेचा गोळा मळा. आता तुम्हाला कणीक नितळ दिसायला लागेल. नितळ झालेल्या कणकेच्या पोळ्या बनवा.

Monday, June 17, 2013

एम आणि एम कुकीज


जिन्नस :

अर्धी वाटी बटर (मीठविरहीत)
अर्धी वाटी (ग्रॅन्युलेटेड शुगर आणि ब्राऊन शुगर) यामध्ये ब्राऊन शुगर पाव वाटीपेक्षा जास्त आणि बाकीची ग्रॅन्युलेटेड शुगर
१ वाटी मैदा किंवा ऑल परपज फ्लोअर आणि हरबरा डाळीचे पीठ (यामध्ये मैदा पाऊण वाटीपेक्षा जास्त आणि बाकीचे डाळीचे पीठ)
 २ चिमटी बेकींग सोडा
एम आणि एम ची चॉकलेट १ छोटे पाकीट (४७.९ ग्रॅम)


मार्गदर्शन : वरील सर्व जिन्नस एकत्र करा व मळून घ्या. चॉकलेट सर्वात शेवटी टाकून अजून थोडे मळून घ्या. २० मिनिटे हे मिश्रण तसेच झाकण ठेवून ठेवा. नंतर त्याचे एकसारखे गोळे करून थोड्या थोड्या अंतरावर बेकींग ट्रे मध्ये ठेवा. नंतर ३५० डिग्री फॅरनहाईटवर २५ मिनिटे कुकीज भाजून घ्या. कूकीज गार झाल्या की डब्यात भरून ठेवा. वरील मिश्रणात १५ कुकीज होतात.
बटर फ्रीजमधून काढून नेहमीच्या तापमानाला येऊ देत.

Tuesday, June 04, 2013

नानकटाई

 

जिन्नस :

१ वाटी मैदा किंवा ऑल परपज फ्लोअर
अर्धी वाटी मीठविरहीत बटर
अर्धी वाटी ग्रॅन्युलेटेड साखर
२ चिमटी बेकींग सोडा
ट्रे ला लावायला थोडेसे साजूक तूप

मार्गदर्शन : वरील सर्व मिश्रण एका भांड्यात घाला व हाताने एकजीव करा.  बटर मिक्स करायच्या आधी फ्रीजमधून काढा व ते नेहमीच्या तापमानाला येऊ देत. भिजवलेल्या मिश्रणावर झाकण ठेवा. २० मिनिटानंतर परत एकदा भिजवलेले मिश्रण मळून घ्या व त्याचे एकसारखे ११ गोळे बनवा व ते हाताने गोल गोल करून घ्या व कूकी ट्रेमध्ये थोड्या थोड्या अंतरावर ठेवा. कूकीज ३०० फॅरनहाईट डीग्रीवर ३० मिनिटे ओव्हनमध्ये भाजून काढा. ट्रे ओव्हनमध्ये मधोमध ठेवा. वरील मिश्रणात ११ नानकटाई होतात.

Thursday, May 30, 2013

घेवड्याची भाजी


जिन्नस :

घेवड्याच्या शेंगा सोललेल्या (३ते ४ वाट्या)
१ बटाटा उकडून त्याच्या फोडी
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
दाण्याचे कूट २ मूठी
नारळाचा खव १ मूठ
थोडा गूळ
चवीपुरते मीठ
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, हळद



मार्गदर्शन : घेवड्याच्या शेंगा कूकरमध्ये शिजवून घ्या. कूकर गार झाला की शिजलेल्या शेंगा बाहेर काढा. शिजताना त्यात थोडे पाणी घाला. शिजल्यावर यातले पाणी एका वाटीत काढा. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. ते तापले की त्यात पुरेसे तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा. नंतर त्यामध्ये घेवड्याच्या शिजलेल्या शेंगा आणि उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घाला आणि ढवळा. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला, मीठ, गूळ, दाण्याचे कूट, नारळाचा खव घाला. परत एकदा भाजी नीट ढवळून घ्या. नंतर शिजवलेल्या घेवड्याच्या शेंगातले पाणी काढून ठेवलेले घाला. नंतर त्यावर झाकण ठेवा. ५ मिनिटे भाजी शिजू दे. थोड्यावेळाने गॅस बंद करा. पोळीपेक्षाही ही भाजी भाताबरोबर छान लागते.

Wednesday, May 29, 2013

मेथीची भाजी



जिन्नस :

मेथीची मोठी १ जुडी
लाल तिखट पाव चमचा
धनेजिरे पूड पाव चमचा
चवीपुरते मीठ
२ते ३ चमचे डाळीचे पीठ
२ते ३ चमचे चिरलेला कांदा
लसूण पाकळ्या चिरलेल्या २
१ ते २ मिरचीचे लहान तुकडे
फोडणीकरता तेल
मोहरी, हिंग, हळद



मार्गदर्शन : मेथी निवडून धुवून घ्या. कूकरमध्ये शिजवून घ्या. कूकर गार झाला की त्यातली शिजलेली मेथी बाहेर काढा व त्यात डाळीचे पीठ मिक्स करा. मिक्स करताना त्यात गुठळी होऊन देवू नका. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ घालून डावेने भाजी एकसारखी करून घ्या. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. ते तापले की त्यात तेल घाला. नेहमी फोडणी करतो त्यापेक्षा जरा जास्त तेल घालावे. तेल तापले की त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. फोडणीमध्ये चिरलेली मिरची, लसूण व कांदा घाला. कांदा लसूण बारीक चिरा. आच कमी करून हे सर्व जिन्नस थोडे परतून घ्या. नंतर त्यात मेथीचे तयार केलेले मिश्रण घाला. व थोडे पाणी घाला. भाजी ढवळा. एकसारखी करा. नंतर त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा. गॅस बंद करा. मेथीची भाजी तयार झाली आहे. कांदा लसूण फोडणीत घातल्याने एक छान चव येते. पोळीपेक्षाही ही भाजी गरम भाकरीशी जास्त छान लागते.

या भाजीला मेथीची गोळा भाजी म्हणतात.





Friday, May 24, 2013

फोडणीची साबुदाणा खिचडी



जिन्नस :

भिजलेला साबुदाणा अर्धी वाटी
दाण्याचे कूट मूठभर
दाणे २-३ चमचे
मटार मूठभर
पाव कांदा चिरलेला
एक छोटा बटाटा (काचऱ्या चिरतो त्याप्रमाणे चिरा)
हिरवी मिरचीचे तुकडे २ते ३
लाल तिखट पाव चमचा
मूठभर चिरलेली कोथिंबीर
फोडणीकरता तेल
मोहरी,जिरे, हिंग, हळद
मीठ चवीपुरते
साखर पाव चमचा



भिजलेला साबुदाणा हाताने ढवळून एकसारखा करून घ्या. त्यात लाल तिखट, मीठ, साखर व दाण्याचे कूट घालून परत एकदा साबुदाणा एकसारखा ढवळून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा. (हळद रंग येण्यापुरती अगदी थोडीच घालावी)  नंतर त्यात मिरचीचे तुकडे, चिरलेला कांदा व बटाटा घाला. मटारही घाला. हे सर्व मिश्रण परतून घ्या. नंतर त्यात अगदी थोडे मीठ घाला व झाकण ठेवा. फोडणीत घातलेले सर्व जिन्नस शिजले की त्यात साबुदाणा घाला. या साबुदाण्यात आपण आधीच दाण्याचे कूट, मीठ, साखर व लाल तिखट मिक्स करून ठेवले आहे. साबुदाणा घातला की परत एकसारखे ढवळून घ्या. नंतर झाकण ठेवून एक वाफ द्या. काही सेकंदाने झाकण काढा व परत ढवळा. आता थोडी चिरलेली कोथिंबीर घालून एकसारखे करून घ्या. आता गॅस बंद करा. गरमागरम खिचडी खा. आवडत असल्यास थोडे लिंबू पिळा. या खिचडीची चव थोडी वेगळी लागते. मला ही चव आवडली. करून पहा. तुम्हालाही आवडेल.


Monday, May 20, 2013

तिखटामीठाच्या पुऱ्या


 जिन्नस :

कणिक अडीच वाट्या
लाल तिखट दीड चमचा
धनेजिरे पूड दीड चमचा
हळद अर्धा चमचा
चवीपुरते मीठ
मूठभर चिरलेली कोथिंबीर
५-६ चमचे तेल (कणकेत घालायला)
तळणीसाठी तेल


मार्गदर्शन : कणकेमध्ये वरील सर्व जिन्नस घालून घट्ट कणिक भिजवा. अर्ध्या तासाने मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात पुरेसे तेल घाला. तेल जरा जास्ती घालावे म्हणजे पुरी फुगण्यास वाव मिळतो. भिजलेली कणिक अजून थोडी मळून घ्या. नंतर त्याचे छोटे गोळे करा व पुऱ्या लाटा. तेल तापले की त्यात सर्व पुऱ्या तळून घ्या. अडीच वाट्यांमध्ये ५० छोट्या पुऱ्या होतात. मधवेळी खाण्यास द्या. या पुऱ्या गरम खाल्या की बरोबर काहीही नसले तरी चालते इतक्या छान होतात. गार झाल्या तर लोणच्यामधेय थोडे दही घालून एकसारखे करा किंवा दाण्याची दह्यातली चटणी सोबत घ्या. 
या पुऱ्या खुसखुशीत व कुरकुरीत होतात.


पुऱ्या चांगल्या होण्यासाठी टीपा :

कणीक भिजवताना मीठ अंदाजे घातले तरी सुद्धा तिखट मीठ घातल्यावर कणीक एकसारखी ढवळा आणि चव बघा. मीठ कमी असेल तर परत घाला. आळणी तिखटामिठाच्या पुऱ्या चांगल्या लागत नाहीत.
पुऱ्यांची कणीक जास्तीत जास्त घट्ट भिजवावी.

तासभर मुरू द्यावी.

तळणीसाठी तेल जरा जास्त घ्यावे म्हणजे पुरी फुगायला वाव मिळतो.

तेल व्यवस्थित तापू द्यावे.

तेल व्यवस्थित तापले आहे की नाही याकरता एक टीप आहे. कणकेचा खूप बारीक अगदी छोटा गोळा तेलामध्ये घालावा. तो जर पटकन वर आला तर तेल पुरीसाठी व्यवस्थित तापले आहे असे समजावे.

पुरी फुगण्यासाठी कडेने जास्त लाटावी.

पुरी तेलात सोडून ती लगेच फुगते जर का ती नीट लाटली असेल तर आणि शिवाय जर ती फुगली नाही तर झारेने त्यावर कढईतल्या कढईत पुरीच्या वर तेल घालावे म्हणजे फुगण्यास वाव मिळतो.

या तिखटामिठाच्या पुऱ्या मधवेळी करून खाऊ शकता. नंतर १ कप चहा. अथवा १ फळ किंवा ताक व दही,
२ ते ३ दिवस टिकतात त्यामुळे स्वयंपाकाचा कंटाळा आला तर पुरीसोबत बटाटा भाजी करून खा.
सहलीसाठी जाण्यासाठी उपयुक्त कोरड्या असल्याने.

पुऱ्या तळून झाल्या की पेपर टावेल वर ठेवा म्हणजे पुरीत असलेले जास्तीचे तेल निथळून जाईल. 




Thursday, May 09, 2013

भाजलेले दाणे



दाणे २४ औंस
अल्युमिनियमचे पसरट भांडे

३५० degree F,,  हे दाणे ४५ मिनिटे भाजत ठेवा. खूप छान भाजले जातात. जसे की कढईत भाजतो तसेच होतात. छान साले सुटतात.



Friday, April 26, 2013

सुकामेव्याचे लाडू (dryfruits laduu) (1)


जिन्नस :
बदामाची सालासकट पूड अर्धी वाटी
काजूची पूड अर्धी वाटी
आक्रोडाची पूड अर्धी वाटी
दाण्याचे कूट अर्धी वाटी
पिस्ताची पूड ५ ते ६ चमचे
साखर पाऊण वाटी
साजूक तूप ४ ते ५ चमचे
वेलची पूड अगदी थोडी


मार्गदर्शन : वर दिलेल्या सर्व पावडरी एकत्र करा. त्यात साखर व साजूक तूप घाला. थोडी वेलची पूड घाला. वरील सर्व मिश्रण हाताने नीट एकसारखे एकत्र करा आणि लाडू वळा. साजूक तूप एकदम घालू नका. आधी ४ ते ५ चमचे घाला. लाडू नीट वळले जात नसतील तरच अजून थोडे तूप घाला. बाकीचे जिन्नसही आवडीनुसार घालू शकता. खसखस भाजून त्याची पूड, खारीक पूड, मनुका व बेदाणे असे सर्व घालू शकता. खसखस थोडीच घालावी कारण की ती खूप उष्ण असते. हे लाडू उपवासाला चालतात. शिवाय बाळंतिणीसाठी हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत.

Friday, April 05, 2013

लाल टोमॅटोचा रस्सा


जिन्नस :

लाल टोमॅटो ६
दाण्याचे कूट मूठभर
ओल्या नारळाचा खव मूठभर
थोडी चिरलेली कोथिंबीर
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
मीठ चवीपुरते
साखर २ चमचे
फोडणीसाठी तेल
मोहरी, जिरे, हिंग, हळद



मार्गदर्शन : टोमॅटो मध्यम आकारात चिरून घ्या. मध्यम आचेवर पातेले ठेवा. ते तापले की त्यात तेल घाला. तेल पुरेसे तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग व हळद घालून फोडणी करा. आता या फोडणीत चिरलेले टोमॅटो घाला व परतून घ्या. थोडे पाणी घालून झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा. आता यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड, साखर, मीठ घाला व परत एकदा ढवळून त्यात थोडे पाणी घाला व परत झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा व त्यात दाण्याचे कूट, ओला नारळ, कोथिंबीर घालून रस्सा पातळ होण्यासाठी परत थोडे पाणी घाला. एक उकळी आली की गॅस बंद करा. रस्सा तयार झाला आहे. गरम गरम भाताबरोबर हा रस्सा छान लागतो. टोमॅटो शिजायला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे हा रस्सा झटपट होतो.

Friday, March 22, 2013

लाल भोपळ्याची भाजी


जिन्नस :

लाल भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी ३ ते ४ वाट्या (पाण्याने धुवून निथळून घ्या)
दाण्याचे कूट २ मुठी
खवलेला ओला नारळ १ मूठ
चिरलेली कोथिंबीर २ ते ३ चमचे
लाल तिखट १ चमचा
मेथी दाणे पाव चमचा
मीठ
गूळ ३ ते ४ चमचे चिरलेला
मोहरी, जिरे,हिंग, हळद

मार्गदर्शन : मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. ते तापले की त्यात तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, हिंग,जिरे, मेथीचे दाणे, व हळद घालून फोडणी करा. फोडणीत अर्धा चमचा तिखट घाला. नंतर त्यात भोपळ्याच्या फोडी घालून डावेने ढवळून घ्या. नंतर अगदी थोडे पाणी घाला व एक वाफ द्या. नंतर त्यात अर्धा चमचा लाल तिखट, मीठ, गूळ घाला व परत एकदा भाजी ढवळून घ्या. नंतर त्यात पाणी घालून वाफेवर शिजवा. नंतर त्यात दाण्याचे कूट, खवलेला ओला नारळ, गूळ व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. परत थोडे पाणी घालून भाजी नीट ढवळा. ही भाजी पटकन शिजते. फोडी लगदा होईपर्यंत शिजवू नका. फोडी पूर्ण राहिल्या पाहिजेत. रस अजून हवा असल्यास अजून थोडे पाणी घाला.


लाल तिखट, मेथीचे दाणे व पुरेसा गूळ या मिश्रणाने ही भाजी चविष्ट लागते.

Thursday, March 07, 2013

खारातल्या मिरच्या



जिन्नस :

हिरव्या मिरच्यांचे तुकडे २ वाट्या
हळद ४ चमचे
हिंग पूड १ चमचा
मेथी पूड १ चमचा
मोहरीची डाळ अथवा मोहरीची पूड अर्धी वाटी
लिंबाचा रस पाव वाटी
मीठ १० ते १२ चमचे
तेल फोडणीसाठी अर्धी वाटी
मोहरी, हिंग, हळद
वर दिलेले मसाले तळण्यासाठी तेल ५ ते ६ चमचे

मार्गदर्शन : हिरव्या मिरच्या धुवून कोरड्या फडक्याने पुसून घ्या. मिरच्या एकदम कोरड्या झाल्या पाहिजेत. मिरच्यांची देठे काढा व मिरच्यांचे छोटे तुकडे करा. ते तुकडे एका ताटात घालून त्यात मोहरीची डाळ अथवा पूड घाला. चमच्याने मिश्रण एकसारखे करून ताटाच्या एका साईडला करून ठेवा. आता मध्यम आचेवर एक कढले तापत ठेवा. ते तापले की त्यात १ ते २ चमचे तेल घालून मेथी पावडर थोडी परतून घ्या. ही मेथी पावडर मिरच्यांच्या ताटात एका बाजूला काढून घ्या. आता परत कढले गॅस वर ठेऊन परत त्यात थोडे तेल घाला व हळद घालून परतून घ्या. परतलेली हळद त्याच ताटात बाजूला काढून घ्या. याचप्रमाणे हिंगही परतून घ्या. आता त्याच कढल्यात अर्धी वाटी तेल घाला. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा व गॅस बंद करा. ही फोडणी पूर्णपणे गार होऊ देत. मिरच्या व बाजूला परतलेले मसाले ज्या ताटात आहेत ते सर्व एकत्र कालवा. नंतर त्यात मीठ घाला व लिंबाचा रस घाला. आता परत हे मिश्रण हाताने/चमच्याने कालवून घ्या व ते एका बाटलीत भरा. गार झालेली फोडणी कालवलेल्या मिरच्या ज्या बाटलीत भरल्या आहेत त्या बाटलीत घाला.

गरम गरम आमटी भात, पिठले भात, शिवाय गोडाचा शिरा, पोहे, थालिपीठ या सर्वाबरोबर अधुनमधून खायला या खारातल्या मिरच्या खूप छान लागतात. तोंडाला खूप छान चव येते.

टीप : कमी तिखट असलेल्या मिरच्या घ्या.

Monday, March 04, 2013

मसालेदार बटाटे


जिन्नस :

बटाटे ४ (साले काढा)
लसूण १ पाकळी
आले छोटा तुकडा
कांदा थोडा
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
मिरपूड पाव चमचा
साखर १ चमचा
मीठ
दाण्याचे कूट १ ते २ मूठी
दही ५ ते ६ चमचे
हरबरा डाळीचे पीठ २ चमचे
तेल
मोहरी,जिरे, हिंग, हळद
चिरलेली कोथिंबीर थोडी

क्रमवार मार्गदर्शन : बटाटे मध्यम आकारामध्ये चिरा. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. ते तापले की त्यात फोडणीकरता तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी जिरे हिंग हळद घालून फोडणी करा. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली लसूण, आले व कांदा घाला व थोडे परतून घ्या. नंतर त्यात चिरलेले बटाटे घाला व परत थोडे परतून घ्या. नंतर त्यात थोडे पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवा.


आता दह्यामध्ये डाळीचे पीठ, लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला, मिरपूड, मीठ घाला व थोडे पाणी घालून नीट एकसारखे करून घ्या. पातेल्यातले बटाटे अजून नीट शिजण्याकरता परत त्यात थोडे थोडे पाणी घालून शिजवून घ्या. बटाट्यामध्ये पाणी घातले की त्यावर झाकण ठेवून ४-५ सेकंद ठेवत जा म्हणजे बटाटे चांगले शिजतील. आता मसाल्याचे केलेले दही घालून नीट ढवळा. परत झाकण ठेवा. आच मध्यम आचेवर असू दे. नंतर त्यात दाण्याचे कूट व चिरलेली कोथिंबीर घाला. मिश्रण एकत्र शिजल्यावर परत वरून थोडे परत लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला व मीरपूड घाला. १ चमचा साखर घाला. परत एकदा नीट ढवळा. मिश्रण अजून थोडे पातळ हवे असेल तर पाणी घालून मिश्रण अजून थोडे उकळू द्या. आता गॅस बंद करा. थोड्यावेळाने मसालेदार बटाटा काचेच्या बाऊलमध्ये घालून त्यावर चिरलेली कोथिंबीर घालून सजवा.




Thursday, February 28, 2013

भाज्यांचे कटलेट


जिन्नस :

श्रावणघेवडा
सिमला मिरची
गाजर
कोबी
मटार (अर्धी वाटी)
बटाटा १ किंवा २ (साले काढावीत)
लसूण पाकळ्या ४-५
आले छोटा तुकडा
चिरलेली कोथिंबीर २-३ चमचे
लाल तिखट १ चमचा
धनेजिरे पूड १ चमचा
गरम मसाला १ चमचा
मीठ चवीपुरते
कॉर्न प्लोअर २-३ चमचे
तांदुळ पीठ २-३ चमचे
डाळीचे पीठ २-३ चमचे
कॉर्न प्लोअर १ वाटी (घोळण्याकरता)
रवा जाड १ वाटी (घोळण्याकरता)
तेल १ वाटी



मार्गदर्शन : वर लिहिलेल्या भाज्या मध्यम आकाराच्या चिरा. ( ४ ते ५ वाट्या ) व धूऊन घेऊन कूकरमध्ये किंवा मायक्रोवेव्ह मध्ये उकडून घ्या. सोबत बटाटाही उकडून घ्या. उकडलेल्या सर्व भाज्या रोळीत घालून त्या खाली एक ताटली ठेवा. भाज्या पाणी निथळण्यासाठी रोळीत ठेवायच्या आहेत. पाणी सर्व निथळले की सर्व भाज्या एका परातीत घाला. त्यात बटाटा किसून घाला. नंतर यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला, मीठ व चिरलेली कोथिंबीर घाला. लसूण पाकळ्या, आले यांचे सुरीने खूप बारीक तुकडे करा व तेही सर्व भाज्यांमध्ये घाला. नंतर त्यात डाळीचे पीठ, तांदुळाचे पीठ, व कॉर्नचे पीठ घालून मिश्रण हाताने एकत्रित करा. वर दिलेली पीठे ही भाज्यामध्ये जास्त घालू नयेत. आता या मिश्रणाचे गोल व चपटे गोळे करा. एका ताटात रवा व कॉर्न फ्लोअर पसरून घ्या व त्यात हे गोळे एकेक करून घोळवून घ्या. आता मध्यम आचेवर एक तवा तापत ठेवा. त्यावर २-३ चमचे तेल घालून कालथ्याने पसरवून घ्या. त्यावर एका वेळी ३ ते ४ तयार केलेले कटलेट ठेवून
ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस दोन्ही बाजूने भाजून घ्या. कटलेट उलटले की परत थोडे तेल घालावे. टोमॅटो केचप बरोबर गरम गरम कटलेट खायला द्या. सोबत चहा हवाच !




उकडलेल्या भाज्यातले पाणी निथळूनही त्या जास्त ओल्या वाटल्या तर पेपर टॉवेल वर थोडावेळ घाला म्हणजे बाकीचे उरलेले पाणी शोषून घेतले जाईल. भाज्या जास्त ओल्या नसल्या की मग त्यात अगदी जरूरीपुरतेच वर लिहिलेली पीठे घालावीत.


Monday, February 18, 2013

रस्सा



जिन्नस :

एक मोठा बटाटा (साले काढावीत. )
अर्धा कांदा
दीड लाल टोमॅटो
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा धनेजिरे पूड
अर्धा चमचा गरम मसाला
४-५ चमचे दाण्याचे कूट
४-५ चमचे ओल्या नारळाचा खव
चवीपुरते मीठ
पाव चमचा साखर
तेल फोडणीसाठी
मोहरी, जिरे, हिंग, हळद



मार्गदर्शन : बटाटा, कांदा, टोमॅटो या सर्वाच्या मध्यम आकाराच्या फोडी करा. मध्यम आचेवर छोटा कूकर तापत ठेवा. तो तापला की त्यात तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात बटाटा कांदा व टोमॅटोच्या केलेल्या फोडी घाला. हे मिश्रण एकदा ढवळून घ्या. नंतर त्यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला, मीठ, साखर, दाण्याचे कूट, व ओला नारळ घालून परत हे मिश्रण डावेने नीट ढवळून घ्या. नंतर त्यामध्ये  एक वाटी पाणी घाला. परत एकदा डावेने ढवळून घ्या. कूकरचे झाकण लावा. व एक शिट्टी करा. झटपट रस्सा तयार झाला आहे. गॅस बंद करा.

Wednesday, February 13, 2013

अडाई


जिन्नस :

मूगडाळ पाव वाटी
हरबरा डाळ पाव वाटी
उडीद डाळ पाव वाटी
तुरीची डाळ पाव वाटी
तांदुळ पाव वाटी
अर्धा कांदा चिरलेला
हिरव्या मिरचीचे २-३ तुकडे/लाल वाळलेल्या मिरच्यांचे तुकडे
आले बारीक २-३ तुकडे
चिरलेली कोथिंबीर ४-५ चमचे
चिमुटभर हिंग पावडर
चिमूटभर मेथी पावडर
चवीपुरते मीठ


मार्गदर्शन : वर दिलेल्या प्रमाणात सर्व डाळी व तांदूळ एका पातेल्यात पाणी घालून त्यात भिजत घाला. ७-८ तासाने त्यातील पाणी काढून टाका व मिक्सर/ ग्राईंडर वर सर्व बारीक वाटून घ्या. वाटताना त्यात आले, मिरची  कांदा व कोथिंबीर घाला. मिश्रण वाटताना त्यात जरूरीपुरतेच थोडे पाणी घाला. जास्त पाणी नको. नंतर हे मिश्रण एका पातेल्यात काढून घ्या. नंतर त्यात हिंग व मेथी पावडर घाला. चवीपुरते मीठ घाला. नंतर हे मिश्रण नीट ढवळून घ्या. आता मध्यम आचेवर एक तवा तापत ठेवा. व त्यावर एकेक करून अडाई डोसा करा. जाडसर किंवा पातळ आवडीप्रमाणे  करा. खायला देताना त्यावर लोणी किंवा साजूक तूप घाला. सोबत सांबार, किंवा कोणतेही लोणचे, किंवा चटणी घ्यावी.

कांदा मिरची आले व कोथिंबीर वाटताना घातले नाही तरी चालेल. डोसा घालताना सर्व बारीक चिरून घातले तरी चालते. आवडीनुसार करावे.

अडाई  खाण्याची पद्धत वेगळी आहे. अडाई वर 'चटणी पूड' नावाची कोरडी चटणी पसरतात व त्यावर तेल घालून त्याची गुंडाळी करून खातात. अडाई  बरोबर गूळ खातात.

माहितीचा स्त्रोत : लक्ष्मी व उमा,, या कृतीत मी थोडेफार बदल केले आहे.



Tuesday, February 12, 2013

झटपट आमटी

जिन्नस :

तुरीची डाळ १ वाटी
अर्धा चमचा तिखट
अर्धा चमचा धनेजिरे पूड
अगदी थोडा गूळ
मीठ
फोडणीकरता तेल
मोहरी, हिंग, हळद
पाणी ३ वाट्या
थोडी चिरलेली कोथिंबीर
अर्धा कांदा चिरलेला
अर्धा टोमॅटो चिरलेला
१ मिरची चिरलेली



मार्गदर्शन : तुरीची डाळ पाण्यामध्ये ५-१० मिनिटे भिजत घाला. मध्यम आचेवर एक छोटा कूकर तापत ठेवा. तो तापला की मग त्यात फोडणीकरता तेल घाला. ते तापले की मग त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. नंतर लगेचच चिरलेली मिरची, कांदा व टोमॅटो घाला. थोडे परतून घ्या. नंतर त्यात तुरीची भिजलेली डाळ (डाळ भिजत घातलेली आहे, त्यातले पाणी काढून टाका. ) तिखट, धनेजिरे पूड, चवीपुरते मीठ व थोडा गूळ व चिरलेली कोथिंबीर घाला. हे सर्व मिश्रण पळीने नीट ढवळून घ्या. नंतर त्यामध्ये ३ वाट्या पाणी घालून परत एकदा नीट ढवळा. आता कूकरचे झाकण लावा व ३ शिट्ट्या करा व गॅस बंद करा. झटपट आमटी तयार झालेली आहे.

माहितीचा स्त्रोत : कु. गौरी जपे ( मावस पुतणी)


Friday, February 08, 2013

गुलाबजाम



जिन्नस :

गिटस गुलाबजामचे पाकीट १
दूध अर्धा वाटी (गरम करून कोमट करावे)
साखर २ वाट्या
पाणी पाऊण वाटी
तळण्यासाठी तेल

मार्गदर्शन : गुलाबजाम मिक्सचे पाकीटातील मिश्रण एका ताटात काढून घ्या व त्यात कोमट दूध घालून हे मिश्रण हाताने खूप मळून घ्यावे. भिजवलेले मिश्रण तासभर मुरवत ठेवावे. नंतर तुपाचा हात घेऊन या मिश्रणाचे खूप छोटे गोळे बनवून घ्या. नंतर कढईत साखर आणि पाणी घालून ही कढई गॅसवर ठेवा. आच मध्यम ठेवा. थोड्यावेळाने साखरेला उकळी येईल. उकळी आली की लगेच गॅस बंद करा. आता बनवलेले गुलाबजाम तळून त्या पाकात घाला व ढवळून घ्या.  गुलाबजाम तळताना कढईत तेल घाला व कढई मध्यम आचेवर ठेवा. तेल तापले की गुलामजाम तळा. तळताना गॅस मंद ठेवा व ब्राऊन रंग येईपर्यंत तळा. गुलाबजाम पाकात घातले की तासाभराने ते पाकात चांगले मुरतील व खाण्यास देता येतील.

ज्यांना पाक आवडत नसेल, कोरडे गुलाबजाम आवडत असतील त्यांच्यासाठी....

पाकात गुलाबजाम मुरले की ते एकेक करून बाहेर काढावेत. एका ताटात साखर पसरावी व त्यात हे गुलाबजाम घोळवावेत म्हणजे ते कोरडे होतील.

Friday, January 25, 2013

गणपती २०१२









गणपती २०१२ चे फोटोज अपलोड करायचे राहून गेले होते,, तुम्हाला आवडतील अशी आशा आहे. मागच्या वर्षी भारतभेटीमध्ये मी पुण्याच्या तुळशीबागेतून गणपतीची मूर्ती आणली. ती आहे पंचधातूची. यावर्षी छोटी आरास करताना खूप छान आणि प्रसन्न वाटले होते. गणपतीच्या मूर्तीकडे आणि थोडक्यात केलेल्या सजावटीकडे परत परत पाहावेसे वाटत होते.