Tuesday, December 30, 2008

चकोल्या

जिन्नस :

तुरीची डाळ १ वाटी
गव्हाचे पीठ दीड वाटी
धनेजीरे पूड दीड चमचा
लाल तिखट दीड चमचा
गोडा/काळा/गरम मसाला दीड चमचा
चिंचगुळाचे दाट पाणी अर्धा ते पाऊण वाटी
मोहरी, हिंग हळद
मीठ
फोडणीसाठी तेल
गोटा खोबऱ्याचा एक छोटा तुकडा
१ चमचा जिरे


क्रमवार मार्गदर्शन :


तुरीची डाळ कूकरमध्ये शिजवून घ्या. गव्हाच्या पीठामध्ये थोडे लाल तिखट, हळद, मीठ व थोडे तेल घालून नेहमीप्रमाणेच पोळीला पाहिजे तशी कणिक भिजवा.



तुरीची डाळ थंड झाली की मध्यम आचेवर एका कढईत/पातेल्यात पूरेसे तेल घालून फोडणी करा व त्यामध्ये शिजलेली डाळ एकसारखी करून घाला. त्यात थोडे पाणी घालून लाल तिखट, धनेजीरे पूड, गरम/गोडा/काळा मसाला घाला. चवीपुरते मीठ घालून आमटी ढवळून घ्या. नंतर त्यामध्ये चिंचगुळाचे दाट पाणी घाला. गोटा खोबऱ्याचा एक छोटा तुकडा गॅसवर भाजून घ्या. खूप काळा होईतोवर भाजा. थंड झाला की त्यात थोडे जीरे घालून मिक्सर ग्राईंडर वर बारीक करा व उकळत्या आमटीत घाला. अशी ही मसालेदार आमटी थोडावेळ उकळा. अजून थोडे पाणी घाला. खूप पातळ आमटी नको.



आता गॅस बारीक करा. भिजवलेल्या कणकेचा एक मोठा गोळा घेऊन एक मोठी पोळी लाटा. खूप जाड नको, व खूप पातळ नको. पोळीचे कालथ्याने अथवा कातण्याने चोकोनी काप करा. आता हे काप पटापट आमटीत सोडा व ढवळा. अशा प्रकारे कणकेच्या पोळ्या लाटून व काप करून सर्व काप आमटीमध्ये सोडा. एकीकडे ढवळत राहावे. आता आच थोडी वाढवा. म्हणजे आमटी उकळताना शंकरपाळ्यासारखे जे काप करून आमटीमध्ये सोडलेले आहेत ते शिजतील. ५ मिनिटांनी परत गॅस मंद ठेवा. आता थोडे कच्चे तेल वरून घाला व कढईवर/पातेल्यावर झाकण ठेवा म्हणजे वाफेवर या चकोल्या चांगल्या शिजतील. थोड्यावेळाने झाकण काढा. एक चकोली बाहेर काढून ती हाताने शिजली आहे का नाही ते पहा. चकोल्या शिजायला जास्त वेळ लागत नाही. चकोल्या खूप दाट आहेत असे वाटल्यास थोडे पाणी घालून ढवळा.



आता या चकोल्या गरम गरम असतानाच खा. आणि त्यावर भरपूर साजूक तूप घाला. सोबत कुरडई, सांडगी मिरची अथवा पोह्याचा पापड तळून घ्या. भरपूर पोटभर खा म्हणजे अगदी रात्रीपर्यंत तुम्हाला अजिबात भुक लागणार नाही. हा एक अत्यंत पौष्टीक पदार्थ आहे.


हा माझा एक अत्यंत आवडता खाद्यपदार्थ आहे. यालाच डाळ ढोकळी किंवा वरणफळे असेही नाव आहे.

Friday, December 12, 2008

पुरणपोळी





जिन्नस :
१ वाटी हरबरा डाळ
अर्धी वाटी साखर,
अर्धी वाटी चिरलेला गूळ
कणीक दीड वाटी
मीठ
तेल व पाणी
तांदुळाची पीठी/गव्हाचे पीठ


क्रमवार मार्गदर्शन :

डाळीचे पूरण : १ वाटी हरबरा डाळ पाण्यात धुवून घ्या. त्यात अडीच वाट्या पाणी घालून कूकरमध्ये शिजवून घ्या. वरणभात करण्यासाठी साधारण कूकरच्या ३ शिट्ट्या व्हाव्या लागतात. हरबरा डाळ शिजायला थोडी कठीण आहे म्हणून ५-६ शिट्ट्या करा. कूकर गार झाला की शिजलेली डाळ एका चाळणीमध्ये ओतून घ्या. चाळणीखाली एक ताटली ठेवा म्हणजे डाळीमधले सर्व पाणी निथळून जाईल. डाळीमधले पाणी पूर्णपणे निथळले गेले पाहिजे. डाळ कोरडी झाली पाहिजे. नंतर ही डाळ फूड प्रोसेसर मध्ये घालून बारीक वाटा. बारीक वाटलेली डाळ, गूळ व साखर एका पातेल्यात एकत्रित करून मध्यम आचेवर हे पातेले ठेवा. काही वेळाने साखर व गूळ वितळेल. मिश्रण ढवळत राहा. काही वेळाने हे मिश्रण कोरडे होईल. गॅस बंद करा. मिश्रण पूर्णपणे गार करा.


कणीक भिजवणे व तिंबणे : जेव्हा कूकरला डाळ शिजवत ठेवाल तेव्हा एकीकडे कणीक भिजवून ठेवा. कणीक चाळून त्यात थोडे तेल व मीठ घालून भिजवा. कणीक सैल भिजवा. साधारण १ तासानंतर कणीक तिंबायला घ्या. कणकेमध्ये थोडे थोडे पाणी घालून मळून घ्या. मळताना उजव्या हाताची मूठ करून कणकेला सर्व बाजूने दाब द्या म्हणजे ही कणीक पूर्ण परातभर पसरेल. नंतर त्यात तेल घालून व तेलाचा हात घेऊन परत एकत्रित गोळा बनवा. असे बरेच वेळा केले की कणीक सैल होईल व ती हाताला चिकटायला लागेल व कणकेला थोडी तार सुटायला लागेल. आता फक्त तेल घालून कणीक मळा. तेल घेतल्यामुळे चिकटणार नाही व एकसंध नितळ मळली जाईल आणि आता कणकेचा रंगही बदलायला लागेल. कणीक पांढरी दिसायला लागेल. आता ही कणीक एका पातेल्यात झाकून ठेवा.


नंतर साधारण तासभराने पोळ्या करायला घ्या. मध्यम आचेवर तवा तापत ठेवा. हाताला थोडेसे तेल घेऊन कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याचा हातानेच छोट्या पुरीएवढा एकसारखा आकार बनवा. आपल्या मुठीत मावेल इतके पूरण घ्या व हा पुरणाचा गोळा त्या छोट्या पुरीएवढ्या केलेल्या आकारामध्ये घालून सर्व बाजूने बंद करून एक गोळा बनवा. नंतर पोलपाटावर थोडे तांदुळाचे पीठ पसरा व त्यावर गोळा ठेवून परत थोडे तांदुळाचे पीठ गोळ्यावर पसरून अगदी हलक्या हाताने कडेकडेने पोळी लाटा. थोडी लाटल्यावर अलगद हाताने उलटी करून उरलेली लाटा. तव्यावर घालून भाजा. तव्यावर पोळी हाताने घालायला जमत नसेल तर लाटण्यावर गुंडाळून घेऊन तव्यावर घाला. पोळी भाजताना कालथ्याचा वापर करा. गुलाबी रंगावर पोळी भाजा.


गरम पोळीवर भरपूर साजूक तूप घ्या व गरम गरम खा. अशी ही तलम पुरणपोळी खूप छान लागते. साखरेचा गोडवा व गुळाचा खमंगपणा अशी दुहेरी चव!

मला फार गोड आवडत नाही म्हणून साखर गुळाचे प्रमाण एकास एक दिले आहे. पण गोड हवे असल्यास साखर गुळाचे प्रमाण एकास सव्वा किंवा दीड वाटी घ्यावे. पूर्ण साखर अथवा गुळाची पण पुरणपोळी करतात. साखर गुळ याचे प्रमाणही आवडीप्रमाणे कमी जास्त घ्यावे.

Monday, December 08, 2008

उडीद वडा





जिन्नस :


२ वाट्या उडीद डाळ
२-३ मिरच्या
५-६ लसूण पाकळ्या
थोडी कोथिंबीर
मीठ

क्रमवार मार्गदर्शन :

उडीद डाळ पाण्यामध्ये ७-८ तास भिजवा. नंतर त्यातले पाणी काढून टाका व ही डाळ मिक्सर/ग्राईंडर वर बारीक दळून घ्या. वाटताना जरूरीपुरते पाणी घाला. नंतर त्यात लसूण मिरची यांचे खूप बारीक तुकडे घाला. बारीक चिरलेली कोथंबीर घालून चवीपुरते मीठ घाला. कढईत पूरेसे तेल घालून तापवा व वडे तळा. वडे तळून ते पेपर टॉवेल वर ठेवा म्हणजे त्यातले तेल निथळून जाईल. सांबार चटणीसोबत हे वडे छान लागतात. वडे घालताना हातावरच पीठाला थोडा पसरट आकार द्या व अलगद तेलात सोडा.