Tuesday, December 29, 2015

ढोकळाजिन्नस :

१ वाटी हरबरा डाळीचे पीठ
१ चमचा किसलेले आलं
१ चमचा किसलेला लसूण
अर्धा चमचा साखर
२ चमचे लिंबाचा रस
चवीपुरते मीठ
पाव ते अर्धा चमचा इनो
१ चमचा तेल
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, हळद
सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीरमार्गदर्शन :डाळीच्या पीठ एका वाडग्यात काढून घ्या. त्यात पाणी घालून कालवा. कालवताना त्यात पीठाची एकही गुठळी राहता कामा नये. नंतर त्यात किसलेले आले, लसूण घाला. नंतर त्यामध्ये लिंबाचा रस, साखर व चवीपुरते मीठ घाला. अजून थोडे पाणी घालून सर्व मिश्रण  एकजीव करा. नंतर त्यात तेल घाला व परत एकदा थोडे पाणी घालून ढवळून घ्या. हे मिश्रण इडलीच्या पीठाइतपत पातळ हवे. आता हे मिश्रण झाकून ठेवा व अर्ध्या तासाने याचा ढोकळा बनवायला घ्या. कूकरमध्ये पाणी घालून कूकर मध्यम आचेवर तापत ठेवा. तयार केलेले डाळीच्या मिश्रणात इनो घाला व ढवळा आणि हे मिश्रण कूकरमधल्या एका भांड्यात ओता. त्या आधी कूकरच्या भांड्याला तेल लावून घ्या. आता हे  भांडे कूकरमध्ये ठेवा व झाकण लावा. झाकण लावताना त्याची शिटी काढून घ्या. २० मिनिटांनी गॅस बंद करा. मिश्रण गार झाले  की त्याच्या वड्या कापा आणि त्यावर फोडणी करून घाला. सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर पेरावी. हलकाफुलका ढोकळा तयार झाला आहे. आफीसमधून दमून आल्यावर झटपट काहीतरी खायला बनवण्यासाठी हा ढोकळा छान आहे. चहासोबत ढोकळा खायला घ्या. दमलेला जीव फ्रेश होईल.

Thursday, August 13, 2015

मसाला पापडउडदाचा पापड तळावा. एका डिशमध्ये उडदाचा पापड ठेवा. त्यावर कांदा व टोमॅटो बारीक चिरून घाला. नंतर त्यात चिमूटभर लाल तिखट, धनेजिरे पूड, व चवीपुरते मीठ पेरा. कोथिंबीर बारीक चिरून घाला. चिमूटभर साखरही पेरा. अजून तुम्हाला ज्याप्रमाणे अधिक सजवायचे असेल त्याप्रमाणे पापड सजवा.


उदा. पापडावर बारीक शेव पेरता येईल. तसेच ताजा ओला नारळही पेरता येईल.   जेवणाच्या आधी हा पापड खाल्यास नंतरचे जेवण अधिक रूचकर लागेल. खूप कंटाळवाणे झाले असेल तर असा सजवलेला पापड खाल्यावर उत्साह येईल.

Tuesday, March 10, 2015

मसाला वांगी


जिन्नस :

बारीक चिरलेली वांगी ३ वाट्या
मध्यम चिरलेला कांदा पाऊण वाटी
मध्यम चिरलेला टोमॅटो पाऊण वाटी
पाउण चमचा लाल तिखट
पाऊण चमचा धनेजिरे पूड
पाऊण चमचा गरम मसाला
चवीपुरते मीठ
फोडणीकरता तेल, मोहरी, हिंग, जिरे, हळद
दाण्याचे कूट मूठभर
सजावटीसाठी कोथिंबीर
अर्धा चमचा साखरमार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात नेहमीपेक्षा थोडे जास्त तेल घाला.  ते तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात चिरलेले वांगी, टोमॅटो व कांदा घाला व भाजी ढवळा. आता कढईवर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून परत एकदा भाजी ढवळा. आता अगदी जरूरीपुरतेच थोडेसेच पाणी घाला व परत झाकण ठेवा. एक दणदणीत वाफ येऊ देत म्हणजे वांगी चांगली शिजतील. आता त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला, मीठ  व दाण्याचे कूट घाला. परत एकदा भाजी ढवळून घ्या. तेल कमी वाटले तर परत घाला. नंतर परत काही सेकंदाची वाफ द्या. आता अर्धा चमचा साखर पेरून भाजी ढवळा. भाजी बाऊलमध्ये काढून त्यावर कोथिंबीर पेरा. ही भाजी खूप चविष्ट लागते. या भाजीवर तेलाचा चांगला तवंग आला पाहिजे हे विषेश आहे. तरच ही भाजी चांगली लागते.

Friday, March 06, 2015

थालिपीठाच्या भाजणीचे घावन


जिन्नस
  • थालिपीठाची भाजणी २ ते ३ मूठी
  • लाल तिखट १ चमचा, हळद अर्धा चमचा, चवीपुरते मीठ
  • अर्धा कांदा बारीक चिरलेला
  • पीठ भिजवण्यासाठी पाणी
  • तेल
 मार्गदर्शन:

 वरील सर्व मिश्रण एकत्र करा व पीठ भिजवा. हे पीठ खूप पातळ भिजवा. गॅसवर तवा तापत ठेवा. तो पुरेसा तापला की त्यावर चमच्याने थोडे तेल टाकून तवाभर पसरवा. नंतर डावेने भिजवलेले पीठ तवाभर  घाला. काही सेकंदाने त्यावर थोडे तेल टाका. शिवाय घावनाच्या कडेनेही तेल टाका. काही सेकंदाने  कालथ्याने घावन सोडवून मग ते उलटवावे. व नंतर परत थोडे तेल घाला व काही सेकंदाने घावन तव्यावरून काढा.

Sunday, February 22, 2015

पालक- मूगडाळ


जिन्नस :
चिरलेला पालक ४ मुठी
एक मध्यम बटाटा
अर्धा कांदा
अर्धा टोमॅटो
२ लसूण पाकळ्या
लाल तिखट पाऊण चमचा
धनेजिरे पूड पाऊण चमचा
चवीनुसार मीठ
मूगडाळ अर्धी वाटी
फोडणी साठी तेल
मोहरी, हिंग. हळद


मार्गदर्शन : चिरलेला पालक पाण्याने धुवून रोळीमध्ये निथळत ठेवा. पाणी सर्व निघून गेले पाहिजे. मुगाची डाळ २ तास भिजत घाला. २ तासानंतर भाजी करायला घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात फोडणीसाठी पुरेसे तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, हिंग , हळद घालून फोडणी करा. त्यात आधी मुगाची डाळ घालून परता व त्याला थोडी वाफ द्या. नंतर त्यात चिरलेली मिरची, लसूण, कांदा, घालून थोडे परता. नंतर त्यात चिरलेला बटाटा, टोमॅटो घालून थोडे परता. आता या मिश्रणावर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा व परत मिश्रण नीट परता. आता त्यात चिरलेला पालक घाला व परता. झाकण ठेवा व एक दणदणीत वाफ द्या. परत झाकण काढून त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड व चवीपुरते मीठ घालून नीट ढवळा. अजून एक वाफ द्यावी. नंतर परतून भाजी सर्व बाजूने एकसारखी करून घ्यावी. पोळी बरोबर खायला द्या. ही भाजी चवीला खूप छान लागते.