Tuesday, December 14, 2010

माझ्या पाककृतींच्या लेखनाची वाटचाल (2)


























..........वर नमूद केलेल्या ऑर्कुटवरच्या काही समुदायांमध्ये मी १९ पाककृती स्पर्धेत भाग घेतला. त्या पाककृती स्पर्धेत जे विषय होते त्यात मी दिलेल्या पाककृतींचे दुवे देत आहे. या पाककृती तुम्हाला आवडल्यास त्या जरूर करून पहा.

१... इंडियन ब्रेड - पुरी
२... स्वनिर्मित पाककृती - मसाला चिप्स (१) मसाला चिप्स (२)
३... हॉलिडे कुकिंग - फ्रुट सॅलड
४... पौष्टिक पदार्थ - भाज्या घालून केलेले सँडविच
५... पार्टी व ऍपेटायझर - उपविजेती सुरळीची वडी
६... ग्रीन कलर - सिमलामसाला
७... प्ले विथ कलर्स - उपविजेता रंगीत सांजा
८... इट ग्रीन -उपविजेती भरली तोंडली
९... एनी कलर डीश विथ इंडियन फ्लॅग कलर - पालक भजी
१०.. इंडियन स्ट्रीट फूड - उपविजेता रगडा पॅटीस
११.. ब्रेकफास्ट फूड - उकड
१२.. इंडियन स्वीट - काजूपिस्ता वडी
१३.. स्मुदीज आणि मिल्कशेक - खजूर बदाम काजू मिल्क शेक
१४.. ब्रेड - सँडविच
१५.. डाळीचे पदार्थ - तुरीच्या डाळीची आमटी
१६.. तांदुळाचे पदार्थ - विजेती निवगरी
१७.. साऊथ इंडियन डीश - विजेती इडली
१८.. हेल्दी न्युट्रीशियस होलसम रेसिपीज - पाव भाजी
१९.. इंडियन ब्रेड - उपविजेती पोळी

पाककृती लेखनाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांची मी आभारी आहे. धन्यवाद!



सर्वांना २०१० ची दिवाळी सुखसमाधानाची, आनंदाची, भरभराटीची, उत्साहाची, चैतन्याची, व उत्कर्षाची जावो ही शुभेच्छा

वरील लेख मनोगत दिवाळी अंक २०१० मध्ये प्रकाशित झाला आहे.

Sunday, November 21, 2010

माझ्या पाककृतींच्या लेखनाची वाटचाल (1)

मला चवीने खायला खूप आवडते आणि स्वयंपाकाचा कधीच कंटाळा नाही. चमचमीत पदार्थ तर खूपच आवडतात त्यामुळे वरचेवर केले जातात. बटाटेवडे , समोसे तर कित्येक वेळा केले आहेत. गोड अजिबातच आवडत नसल्याने मुद्दामहून गोड पदार्थ केला आणि चवीने खाल्ला असे कधीच झाले नाही. आवडीचे करणे, खाणे हे ठीक आहे पण ते लिहायचे वगैरे असते हे तर कधीच डोक्यात आले नाही. पूर्वी मासिकामध्ये येणार्‍या पाककृती पण कधी आवडीने वाचल्या नाहीत. त्यामुळे पाककृतींचे लेखन माझ्या हातून होईल असे कधीच वाटले नाही. मला मराठीतून लिहायची आवड मात्र आहे.




मनोगत या संकेतस्थळाची ओळख आम्हाला २००४ मध्ये झाली. मराठी संकेतस्थळ आणि त्यातूनही तिथे मराठीत लिहिताही येते ही तर माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट होती. अगदी सुरवातीला मला आठवत आहे, एका चर्चेत मनोगती श्रावणी हिने पाककृतींचा विषय टाकला होता. तिने लिहिले होते की आपल्याला माहीत असलेल्या पाककृती आपण इथे लिहू या, म्हणजे तेवढीच पाककृतींची देवाणघेवाण होईल. त्यानंतर त्या चर्चेत श्री. प्रभाकर पेठकर, अनू यांच्या काही पाककृतीही आल्या होत्या. सुरवातीला मी फक्त मनोगताचे वाचन करत असे आणि त्यातले काही लेखन आवडले तर त्यावर प्रतिसाद लिहीत असे. काही दिवसांनी मनोगताच्या प्रशासकांनी एक वेगळा पाककृती विभाग सुरू केला. मनोगताचे पूर्वीचे रूप मला अजूनही आठवत आहे.




असेच एकदा सहजच एक पाककृती लिहिली. मुद्दामून ठरवून लिहिली नाही, अशीच एक मनात आली आणि लिहिली. त्या पाककृतीचे नाव "कुड्या". कुड्याला एकही प्रतिसाद आला नाही. कुड्या पाककृती हे माझे आयुष्यातील पहिलेवहिले लेखन. मनोगतावर पूर्वी एका चर्चेत म्हणी लिहू या का? असे कोणीतरी सुरू केले. त्यात आठवून आठवून म्हणी लिहिल्या होत्या. मनोगत जेव्हा माहीत झाले त्यानंतर काही दिवसातच दुसर्‍या शहरात आलो. शहर नवीन असल्याने सुरवातीला पटकन ओळखी होत नाहीत, तेव्हा एकमेव आधार होता तो मनोगताचा. निरनिराळे लेखनप्रकार वाचण्यात वेळ जाई. त्यावेळी संगणकाचे व्यसन असे नव्हते. ई-सकाळ, लोकसत्ता वाचणे, एखादे विपत्र पाठवणे, गाणी ऐकणे, इतकेच मर्यादित होते. याहू निरोपकावर पण सुरवातीला २-३ मैत्रिणीच होत्या.




माझी एक मैत्रिण याहू निरोपकावर भारतातून सकाळी ८ वाजता यायची, तेव्हा अमेरिकेत संध्याकाळचे ६ वाजलेले असायचे. तिचे नाव आशा. मी रोज संध्याकाळी काही ना काही खायला करते. गप्पांमध्ये खादाडीचा विषय असायचाच. त्या दिवशी मी पोहे केले होते. नेहमीचे तेच तेच पोहे करून कंटाळा आला होता. यामध्येच काहीतरी वेगळे करू म्हणून कांदे-बटाट्यांबरोबर सिमला मिरची, गाजर, मटार असे सर्व काही घातले. सर्व भाज्या व कांदे बटाटे चिरताना पण वेगळ्या पद्धतीने चिरले - बारीक व उभे. याहूवर बोलताना मैत्रिणीला सांगितले की आज मी वेगळ्या पद्धतीचे पोहे करून पाहिले. तिने लगेच कृती विचारली. गप्पांमध्ये मी तिला मनोगताबद्दल सांगितले होते. ती म्हणाली छान आहेत की गं पोहे! मी करून पाहीन आणि तू पण लिही की मनोगतावर! मी म्हणाले, नको मला काही लिहिता येत नाही. तर म्हणाली लिही गं. म्हटले बरं चालेल लिहीन. बोलता बोलता तिला सांगितले की लिहीनच. वेगळेपणा आहे या पोह्यात. नावही ठरले माझे, "रंगीत पोहे".




रंगीत पोहे लिहिली व त्यावर एक प्रतिसाद आला- "मला इथे कोणी दडपे पोह्याची कृती देईल का?" दडपे पोहे म्हटल्यावर मला जो काही आनंद झाला! लगेच वहीत लिहिली आणि मनोगतावर टंकीत केली. दडपे पोह्यांना छान प्रतिसाद आले आणि तेव्हापासून खर्‍या अर्थाने माझी पाककृती लेखनाची वाटचाल सुरू झाली. एकेक करत लिहीत गेले. प्रतिसाद मिळाला की हुरूप येतो. मला आठवत आहे त्यावेळी मी आठवड्यातून दोन दोन पाककृती लिहायचे. जे रोज काही खायला करायचे ते लगेच रात्री मनोगतावर लिहायचे. कोणतीही पाककृती ठरवून लिहायची नाही. तिखट पदार्थ आवडत असल्याने तिखट पदार्थ्यांच्या पाककृती लिहिल्या. त्यात वडे, भजी, काही भाज्या, मसाला पापड वगैरे. मनोगतावर शरण्या नावाची मुलगी आहे, तिच्या पुरणपोळीला मी प्रतिसाद दिला. तिचा व्यक्तिगत निरोप मला आला की तू लवकरात लवकर ऑर्कुट वर ये. मी निरोपाला उत्तर दिले की मला ऑर्कुट अजिबात आवडत नाही, निमंत्रणाबद्दल धन्यवाद.




एकदा अशीच लिहीत बसले होते. विनायक म्हणाला काय लिहीत आहेस. मी म्हणाले असेच जरा काहीतरी वेगळे. पोळीच्या गमतीजमती, म्हणजे मी पोळ्या कशा शिकत गेले, असे जरा गमतीशीर. त्याने सुचवले की ते लिहिण्यापेक्षा तू पोळीचीच पाककृती दे. ती सगळ्यांना उपयोगी ठरेल. अरे वा! चांगली आहे कल्पना. मग एकदा पोळी करताना काय काय करावे लागते याचे निरीक्षण करून सविस्तर पोळी पाककृती लिहिली. त्यानंतर भाकरीची पण कृती लिहिली. एकदा श्री. पेठकर यांनी चर्चा टाकली की "आम्ही मेहनतीने पदार्थ करतो व पाककृती लिहिण्याकरता वेळ देतो तर कोणकोण करतात इथे दिलेले पदार्थ?" त्या चर्चेला बरीच उत्तरे आली. त्यात मृदुलाने माझ्या पद्धतीचे बटाटेवडे करून पाहिले होते. नंतर सर्व मनोगती जो कोणी पदार्थ करायचे त्या पाककृतीला प्रतिसाद म्हणून "मी हे करून पाहिले. छान झाले." असे लिहीत. किंवा "करून पाहिले पण बिघडले आता काय करू?" असेही प्रतिसाद येत असत. कोणीतरी आपले पदार्थ करून पाहत आहे हे वाचल्यावर पाककृती लिहायला आणखी हुरूप आला.




एकदा मनोगती गौरी हिने मला सुचवले की तुम्ही ऑर्कुटवर या आणि तिने हेही सुचवले की तुम्ही तुमच्या पदार्थांचे फोटो काढा. पाककृतींचे फोटो असलेल्या एका पाककृतींच्या ब्लॉगचा दुवाही तिने मला दाखवला. त्यात फोटो खूपच छान होते. ऑर्कुटवर खरे तर मी नाराजीनेच गेले. गौरी म्हणाली तुम्ही ऑर्कुटवर येऊन तर बघा, नाही आवडले तर सोडून द्या. ऑर्कुट वर गेले आणि ऑर्कुटच्या प्रेमातच पडले. काही कारणांनी मनोगताच्या विदागाराला अपघात झाला होता त्यामुळे प्रशासकांनी आपापले लेखन जतन करून ठेवा असे सांगितले होते. त्यावेळेला बर्‍याच मनोगतींमध्ये ब्लॉगचे वारे वाहत होते. तेव्हा मी पण माझ्या पाककृतींचा ब्लॉग काढायचे ठरवले. विचार केला त्यानिमित्ताने माझ्या सर्व पाककृती जतन केल्या जातील. मनोगतावरच्या सर्व पाककृती ब्लॉगमध्ये जतन केल्या.




ऑर्कुटला गेल्यावर तिथे एक स्वयंपाक नावाचा समुदाय पाहिला. तिथे मी माझ्या पाककृती ब्लॉगचा दुवा दिला. स्वयंपाक समुदायाच्या चालिकेने मला एक निरोप लिहिला, "रोहिणी स्वयंपाक समुदायात तुझे स्वागत आहे." तिला विचारले की तू मला ओळखतेस का? मग लगेचच लक्षात आले की हीच ती मनोगतावरची शरण्या. गौरीने फोटोचे सुचवल्याप्रमाणे पाककृतींचे फोटो काढायचे हे मनात होतेच. त्यावेळेला आमच्याकडे साधा कॅमेरा होता. विचार केला या कॅमेर्‍याने आधी फोटो काढून पाहू. चांगले आले नाहीत तर डिजिटल कॅमेरा घेऊ. साध्या कॅमेर्‍याने काढलेले फोटो प्रभावी नव्हते म्हणून मग डिजिटल कॅमेरा घेतला. सुरवातीचे फोटो व सध्याच्या फोटोमध्ये खूपच फरक आहे.




ऑर्कुटवर आणखी एक समुदाय आहे, तो म्हणजे 'एच ४ एम एम', म्हणजे एच ४ मराठी मंडळ समुदाय. अमेरिकेत एच-४ विसावर असलेल्या मराठी मंडळींचा समुदाय. तिथे डॉ. उल्का जोशी हिने पाककृती स्पर्धा आयोजित केल्या व सुरवातीला विषय होता 'तांदूळ'. मला तिने निरोप लिहिला की तू भाग घे. मी तिला लिहिले की भाग घेईन, पण मला पाककृती लिहिण्याचा कंटाळा आला आहे. त्या पाककृती स्पर्धांमध्ये असे होते की जी स्पर्धा जिंकेल तिने दुसर्‍या स्पर्धेचा विषय द्यायचा. पाककृती स्पर्धेमध्ये पदार्थाची कृती चित्रासहित द्यायची असते. नंतर मतदान होते व त्यात मते दिली जातात. पाककृती वाचून किंवा फोटो पाहून तिथल्या मुली पदार्थांना मते देतात. एका पाककृती स्पर्धेच्या विषयात माझी सिमलामसाला भाजी बसत होती. उल्काला निरोप लिहिला की पाककृती नवीन पाहिजे की आधीच प्रकाशित असली तरी चालेल. तिने निरोपाला उत्तर दिले की कोणतीही असू दे, भाग घेणे महत्त्वाचे. 'सिमलामसाला' लिहिली. फोटो दिला. नंतर अशा अनेक पाककृती स्पर्धेत भाग घेतला. आधी उल्काला म्हणाले होते की मला पाककृती लिहायचा कंटाळा आला आहे, पण झाले उलटेच. स्पर्धेच्या विषयात बसणारी पाककृती माझ्या ब्लॉगवर असली तरी ती न देता मी नवीन पाककृती लिहून स्पर्धेत भाग घेऊ लागले. या स्पर्धेमुळे माझे पाककृती लेखन खूप वाढले. प्रचंड उत्साह आला.




'एच ४ एम एम' समुदाय फक्त मराठी मुलींकरताच आहे. एच ४ सारखाच दुसरा समुदाय आहे तो म्हणजे 'आय. एच. एम. इन युएस' म्हणजेच अमेरिकेतल्या भारतीय गृहिणी. तिथे सर्व प्रांतातल्या मुली आहेत. तिथे एका स्पर्धेत भाग घेतला. विषय होता 'साउथ इंडियन डिश'. त्यात 'इडली' ची पाककृती लिहिली. शिवाय फोटोही दिला. 'इडली' विजेती ठरली. त्याच समुदायात एका स्पर्धेत 'भरली तोंडली' लिहिली व फोटोही दिला. 'भरली तोंडली' उपविजेती ठरली. तिथल्या काही अमराठी मुलींनी ही भाजी करून पाहिली व त्यांना ती आवडली. ऑर्कुटवर एक कोकणस्थ ब्राह्मणांचा समुदाय आहे तिथल्या एका पाककृती स्पर्धेत 'निवगरी' जिंकली. विजेत्या व उपविजेत्या पाककृतींना एक ऑनलाईन प्रशस्तिपत्रक देतात. त्यात मला 'इडली' साठी मिळाले. हे प्रशस्तिपत्रक वेळेच्या उपलब्धतेप्रमाणे देतात. हे सर्व उत्साह वाढवणारे व प्रोत्साहन देणारे आहे.




गूगल टॉकवर एका मैत्रिणीशी, वैशालीशी, बोलता बोलता ती म्हणाली की मी सर्व सण साजरे करते. तिला म्हणाले की मला इथे उत्साहच वाटत नाही, कारण आमच्या शहरात भारतीय खूपच कमी आहेत. तर ती म्हणाली की इथेही इंग्लंडमध्ये बरेच कमी आहेत. पण तरी मी घरातल्या घरात सर्व सण साजरे करते. ती म्हणाली की त्यानिमित्ताने केले जाते व उत्साह येतो. आमचे हे बोलणे झाले २००७ साली. २००७ च्या पाडव्यापासून मी एक संकल्प सोडला, तो म्हणजे घरातल्या घरात सर्व सण साजरे करण्याचा. तेव्हापासून सर्व पक्वान्नांच्या पाककृती लिहिल्या. मोदक, बासुंदी, श्रीखंड, पुरणपोळी, गुळपोळी. इत्यादी.




या सर्व पाककृती लिहीत असतानाच मध्यंतरी सर्व पदार्थांना लेबले लावली. गोड पदार्थ, तळलेले पदार्थ, चमचमीत पदार्थ, झटपट पदार्थ. लेबले लावताना अजून कोणकोणते पदार्थ लिहिले गेले नाहीत याची कल्पना आली. यात आणखी असे सुचले की जो स्वयंपाकाला नवीन आहे, ज्याला काहीही येत नाही, अगदी सुरवातीला तो कशापासून सुरवात करेल. यामध्ये मग फोडणीची पाककृती लिहिली. शिवाय थालीपिठ कसे लावावे, किंवा मिक्सर ग्राइंडर मध्ये कसे वाटावे, धिरडे-घावन कसे घालावे, साबुदाणा कसा भिजवावा, वगैरे. या आणि अशा बर्‍याच प्रकारच्या साध्या वाटणार्‍या, तरीही नवोदितांना उपयुक्त अशाही काही पाककृती लिहायच्या आहेत. बाळंतिणीसाठी पदार्थ, आजारपणातील पदार्थ, खूप पूर्वीच्या काही पारंपरिक पाककृती किंवा 'वाळवणे' अशा प्रकारच्या बर्‍याच पाककृती लिहायच्या आहेत.




पाककृतींना लेबले द्यायच्या आधी ज्या पाककृती मी केल्या त्या एकच विषय घेऊन केल्या आणि लिहिल्या. तसे तर स्पर्धेमुळे मला विषय व नवीन पाककृतीही सुचत होत्याच, पण तरीही काही माझ्या मनाने ठरवून केल्या. उदा. भाज्या, कोशिंबिरी, डाळींचे पदार्थ. गोड पदार्थांमध्ये बर्‍याच प्रकारच्या वड्या केल्या. एका चर्चेत असे कळले की खव्याला पर्याय म्हणून रिकोटा चीझ वापरतात. त्याआधी मी वडी प्रकार कधीच केला नव्हता. माझी पहिलीवहिली वडी, म्हणजे आल्याची वडी, रिकोटा चीझ घालून केली. ती यशस्वी झाली. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ते, गाजर, भोपळा या वड्या करत गेले. शिवाय मित्रमैत्रिणींकडून तुमच्याकडे अमुक एका पदार्थाची पाककृती आहे का अशी विचारणा झाल्यावर त्याही पाककृती लिहिल्या गेल्या.




मराठीबरोबरच एक इंग्रजी ब्लॉग सुरू केला आहे, पण त्याला अजूनही वेग आलेला नाही. असाच मनाचा निर्धार करून लिहायला पाहिजे. माझ्यासारख्या अनेक बायका आहेत की ज्या पाककृती लेखन करतात पण त्यांची सुरवात ब्लॉगमधून झाली. माझी पाककृती लेखनाची सुरवात मनोगत या संकेतस्थळापासून झाली. ब्लॉग सुरू केला तेव्हा ब्लॉगचे नाव निर्मल रेसिपीज असे होते. माझ्या आईचे नाव निर्मला म्हणून निर्मल रेसिपीज. पण नंतर काही ब्लॉग्ज पाहिले तेव्हा खाण्याच्या संदर्भात ब्लॉगचे नाव हवे असे वाटले म्हणून मग ब्लॉगला नाव दिले "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म."





माझ्या पाककृती लेखनामधील जास्तीत जास्त पाककृती मी माझ्या आईकडून शिकले आहे. बरेच वेळा काही पदार्थांबद्दल माहिती असूनसुद्धा परत एकदा फोनवर नीट विचारून घेते. तिच्याकडून अजूनही बर्‍याच पाककृती घेऊन, त्या करून बघून लिहायच्या आहेत. मी कधीही पाककृती केल्याशिवाय आणि चव घेतल्याशिवाय लिहीत नाही. शिवाय भारतात असताना आणि इथे अमेरिकेत आल्यावर जे काही मित्रमैत्रिणी मिळाले त्यांच्याकडून माहिती झालेल्या व मला आवडलेल्या काही पाककृतीही लिहिल्या आहेत.




या लेखामध्ये मी ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्यांचे विषय काय होते व त्यात मी कोणकोणत्या पाककृती दिल्या होत्या त्यांची चित्रे देत आहे.


.......(2).....


चित्रे व दुवे भाग (२) मध्ये पहा.

वरील लेख मनोगत दिवाळी अंक २०१० मध्ये प्रकाशित झालेला आहे.

Thursday, November 18, 2010

छोले भटूरे




छोले
जिन्नस:
काबूली चणे - १ वाटी
बारीक चिरलेला कांदा - १ वाटी
बारीक चिरलेला टोमॅटो - १ वाटी
बारीक चिरलेला उकडलेला बटाटा - १ वाटी
लाल तिखट - १ चमचा
धने-जिरे पावडर - १ चमचा
गरम मसाला - १ चमचा
मीठ
लसूण-मिरच्यांचा वाटलेला गोळा (लसूण ४-५ पाकळ्या, मिरच्या ४-५)
अगदी थोडा गूळ
तेल
मोहरी, हिंग, हळद (फोडणीकरता)

क्रमवार मार्गदर्शन :
ज्या दिवशी छोले करायचे असतील त्याच्या आदल्या दिवशी काबूली चणे भिजत घाला. दुसर्‍या दिवशी चणे कुकरमध्ये उकडून घ्या. चणे उकडताना त्यात थोडे पाणी घाला म्हणजे लवकर शिजतील. शिजल्यावर त्यातले पाणी एका वाटीत काढून ठेवा. मध्यम आंचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात तेल घाला. तेल तापले की त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. फोडणी झाली की त्यात लगेच लसूण -मिरच्यांचा वाटलेला गोळा घाला. थोडे परतून घ्या. नंतर त्यात चिरलेला कांदा व टोमॅटो घाला. व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत परता. नंतर त्यात चिरलेला बटाटा, लाल तिखट, धने-जिरे पावडर, गरम मसाला व मीठ घालून परत एकदा परतून घ्या. याची एकजीव एकसंध ग्रेव्ही तयार होईल. त्यात अजून थोडे तेल घाला. नंतर त्यात उकडलेले चणे घाला व अगदी थोडा गूळ घाला. शिजलेल्या चण्यातील काढून ठेवलेले पाणी घाला. पातळ/ दाट जसे हवे त्याप्रमाणे पाणी घाला व परत एकदा नीट ढवळा. उकळी आणा. छोले तयार आहेत.

आता भटूरे बनवायला घ्या.

भटूरे

जिन्नस :
मैदा - २ वाट्या
उकडलेला बटाटा - अर्धा (किसून)
मीठ
दही - २-३ चमचे
तेल -२-३ चमचे
तळणीसाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन :
वरील सर्व जिन्नस एकत्रित करून कणीक भिजवतो त्याप्रमाणे पीठ भिजवा. हे पीठ ४ तास मुरू दे. नंतर याचे लाटून भटूरे बनवा. भटूरे बनवताना थोडी पिठी घेऊन मोठ्या पुरीच्या आकाराचे बनवा. भटूरा तळताना तो फुलून येईल इतकी कढई मोठी घ्या. तळताना कढईत तेलही भरपूर घाला, कारण भटूरे फुलण्याकरता वाव पाहिजे.

छोले- भटूरे गरम गरम खायला द्या. सोबत कच्चा कांदा, तळलेली मिरची द्या. शिवाय छोले सजावटीसाठी थोडी कोथिंबीर पेरा व हवे असल्यास थोडे लिंबू पिळा.

वरील पाककृती मनोगत दिवाळी अंक २०१० मध्ये प्रकाशित झाली आहे.

Thursday, November 11, 2010

बुंदी लाडू



जिन्नस :
हरबरा डाळीचे पीठ - १ वाटी
साखर -दीड वाटी
पाणी
तेल
बदाम - ५-६
पिस्ते -५-६
काजू - ५-६

२ झारे (एक तळण्याकरता, एक बुंदी पाडण्याकरता)

क्रमवार मार्गदर्शन :

एका पातेलीत डाळीचे पीठ भिजवावे. थोडे थोडे पाणी घालून डाळीचे पीठ भिजवा. डाळीचे पीठ भिजवताना अजिबात गुठळी होता कामा नये. एकसंध गंधासारखे पीठ भिजवा. पीठ सहज ओतता आले पाहिजे इतपत पातळ भिजवा. साधारण दाट बासुंदी असते इतके पीठ पातळ हवे. दुसर्‍या पातेल्यात साखर घाला. साखर बुडून थोडेसे वर पाणी राहील इतके पाणी घाला व मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. सारखे ढवळत राहा. हे मिश्रण पूर्ण उकळून त्यावर बुडबुडे येतील व थोड्यावेळाने एक तारी पाक होईल. एक तारी पाक झाला की लगेच गॅस बंद करा.



मध्यम आंचेवर कढई तापत ठेवा. त्यात तळण तळण्याकरता जितके तेल घालतो तितके तेल घाला. तेल व्यवस्थित तापू दे. तेल तापले आहे की नाही हे पाहण्यासाठी हाताने थोडे भिजवलेले पीठ घाला. ते वर येऊन तरंगले की तेल बरोबर तापले असे समजावे. आता कढईवर झारा ठेवून त्यात वाटीने झारा भरेल इतके पीठ घाला. झार्‍यातून आपोआप बुंदी तेलात पडतील. त्या पडल्या की लगेच झारा पाण्याने स्वच्छ करून घ्या. आता दुसर्‍या झार्‍याने बुंदी निथळून घ्या व लगेचच गरम पाकात घाला. अशा प्रकारे सर्व बुंदी पाडून त्या लगेच गरम पाकात घाला. प्रत्येक नवीन बुंदी पाडण्यासाठी झारा स्वच्छ हवा. सर्व बुंदी पाडून झाल्या की लगेच पाकातल्या बुंदी डावेने ढवळून घ्या. बुंदी पाकात मुरतील. पाकबुंदीचे मिश्रण कोमट झाले की त्यात बदाम, काजू, पिस्ते यांची पूड घाला. पूड भरड असावी. लाडू वळा. या मिश्रणाचे ८ ते १० लाडू होतील.


वरील पाककृती मनोगत दिवाळी अंक २०१० मध्ये प्रकाशित झाली आहे.

Wednesday, November 03, 2010

करंजी



जिन्नस:

१ वाटी बारीक रवा, १ वाटी मैदा किंवा all purpose flour,
५-६ चमचे तेल कडकडीत गरम करून घालण्यासाठी, मीठ
तळणीसाठी तेल
गोटा खोबऱ्याचा कीस अडीच वाट्या,
खसखस अर्धी वाटी
काजू पूड अर्धी वाटी
पिठिसाखर १ वाटी

क्रमवार मार्गदर्शन : करंजीसाठी आधी सारण करून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात खसखस घालून कालथ्याने परतायला लागा. काही सेकंदाने खोबऱ्याचा कीस घालून परता. मिश्रण थोडे लालसर झाले की गॅस बंद करा. आता या मिश्रणात काजू पूड व साखर घाला व मिश्रण एकत्रित करा.


सारण करायच्या आधी रवा व मैदा दूधात किंवा पाण्यात भिजवून ठेवा. भिजवायच्या आधी त्यात ५- ६ चमचे तेल एका कढल्यात तापवून घाला व चवीपुरते थोडे मीठ. तेल खूप गरम करा. रवामैद्यात घालताना चूर्र असा आवाज यायला पाहिजे. गरम तेल घातले की रवा मैदा चमच्याने एकसारखा करा.




आता रवा मैद्याची एक मोठी पोळी लाटा. त्याचे मोठ्या वाटीने ३-४ गोल करा. पुरीसारख्या गोल आकारात सारण भरा व त्याचा अर्धगोलाकार आकार बनवून पुरीच्या कडेकडेने हाताने सर्व बाजूने दाब द्या म्हणजे सारण बाहेर येणार नाही. नंतर कातणाने अथवा कालथ्याने पुरीच्या कडेने कापून चंद्रकोरीसारखा आकार द्या. सर्व करंज्या करून घ्या. ३-४ करंज्या झाल्या की प्रत्येक वेळी त्यावर ओले फडके ठेवा म्हणजे त्या वाळणार नाहीत. नंतर करंज्या तेलात तळून घ्या.



एकेक वेगळी पुरी करून पण करंज्या करता येतील. पोळी लाटून वाटीने गोल करून घेतल्यास सर्व करंज्या एकसारख्या दिसतात.

Thursday, October 28, 2010

बटाटेवडे

माझ्या बाबतीत बटाटेवडे बनवणे म्हणजे म्हणता ना 'किस झाड की पत्ती! ' किंवा 'बाए हाथ का खेल' अगदी तसेच आहे. बटाटेवडे करायला मला कधीच कंटाळा आला नाही आणि येणारही नाही. बटाटावडा हा माझा सर्वात आवडता आहे, तसा तो कधी कुणाला आवडला नाही असे ऐकीवात नाही.



बटाटेवडे कसे करायचे असे मी कधी कोणाला विचारले नाही. खूप आवडीचा पदार्थ असल्याने आई कसे वडे बनवत ते पाहून कॉलेजमध्ये असतानाच आम्ही दोघी बटाटेवडे करण्यात तरबेज होतो. कधीही पटकन मनात आले की करायचे का बटाटेवडे! असे एकमेकींना विचारत असू. बटाटेवडे असे म्हणायचाच अवकाश की तासाच्या आत आम्ही दोघी बहिणी गरम गरम बटाटेवडे खायला सुरवात करायचो. जलद चित्रफीत कशी चालते अगदी तसेच व्हायचे आम्हा दोघींचे. एकजण कुकराला बटाटे उकडत ठेवायचो गॅस मोठा करून. दुसरी लसूण सोलून, मिरच्या आले लसूण वाटून तयार ठेवायची. कुकराची वाफ मुरून ते बटाटे बाहेर काढले जायचे. कुकराचे झाकण पटकन उघडले गेले नाही तर राग यायचा. किती मुरायला वेळ! झाकण सैल करून कुकराची शिट्टी वर करून फूऽ‌ऽस असा आवाज येऊन वाफ बाहेर यायची की झाकण पटकन पडायचे! गरम गरम बटाटे साणशीने एकेक करत पकडून रोळीत ठेवायचो. रोळी लगेच गार पाण्याच्या नळाखाली! तरीही बटाटे इतके काही गरम असायचे! फडक्यात एकेक बटाटा ठेवून साले काढायचो. एकीकडे तोंडाने फुंकर! हाताला खूप चटके बसायचे. खूप गरम बटाटे चमच्याने बारीक करायचो. ते करेपर्यंत एक जण खूप बारीक कांदा चिरायची. लाल सालींचे कांदे व हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून बटाटेवड्याचे सारण तयार होईतो एकजण डाळीचे पीठ भिजवायची. कढईत तेल घालून तापले रे तापले की बटाटेवडे तळून ते ताटलीत घालून गरम गरम, तिखट तिखट, हायहुई करत बटाटेवडे खायचो. असे गरम गरम व तिखट तिखट बटाटेवडे खाल्ले ना की तोंडाला जी चव येते ती काही औरच!





भारतात असताना कंपनीने दिलेल्या घरात जेव्हा राहायला गेलो तेव्हा मला 'पॉटलक' हा प्रकार माहिती झाला. पहिल्या पॉटलकच्या वेळी मला माझ्या आवडीचा पदार्थ करायला मिळाला नाही. बाहेरगावी गेलो होतो. परत आल्यावर पॉटलक असल्याचे कळले व माझ्याकडे कोणीच न घेतलेला पदार्थ आला तो म्हणजे 'पुरी' ७० ते ८० पुऱ्या बनवल्या होत्या. दिवाळीच्या वेळी मला मैत्रिणीने सांगितले ' तू तुझ्या आवडीचा पदार्थ आधीच सांगून ठेव' मला माझ्या आवडीचा पदार्थ आणि तोही मोठ्या प्रमाणात बनवण्याची संधी आली आणि तो पदार्थ म्हणजे बटाटेवडे! कोणाचीही मदत न घेता एकटीने ७० ते ८० वडे बनवले. मला कोणी मदतीला येऊ का? असे विचारले तर मी सरळ 'नाही' असे सांगते कारण की माझा खूप गोंधळ होतो. लसूण सोलण्यापासून ते मोठ्या डब्यात बटाटेवडे भरण्यापर्यंत सगळे एकटीने केले. त्यातला एकही वडा घरी परत आला नाही. मला खूप आनंद झाला होता त्यावेळी.





दुसरे पॉटलक अमेरिकेत आलो तेव्हा त्या वर्षाअखेरीस झाले. नववर्ष साजरे केले तेव्हा. त्यावेळीही असेच ७०-८० बटाटेवडे बनवले होते. तेलगू कुटुंबे होती. त्यांना हा मराठी पदार्थ खूप आवडला. तिसऱ्या पॉटलकच्या वेळी उत्तर भारतीय कुटुंबे होती. त्यात एक मुसलमान जोडपे होते, इक्बाल फरहाना. जेव्हा एकत्र जेवणावळी होत तेव्हा फरहाना मला म्हणायची 'आप वो बटाटा करके लाइए. बटाटेवड्यांना ती बटाटा म्हणायची.

Thursday, October 14, 2010

भरडा वडे भाजणी



भरडा वडे भाजणी

जिन्नस:

हरबरा डाळ २ वाट्या
तांदुळ १ वाटी
उडदाची डाळ १ वाटी
पाव वाटी तुरीची डाळ
पाव वाटी मुगाची डाळ
गहू पाव वाटी
जिरे पाव वाटी

वरील सर्व जिन्नस जाडसर दळून आणा.

Wednesday, October 13, 2010

थालिपीठाची भाजणी



जिन्नस :

ज्वारी २ पेले
बाजरी २ पेले
तांदुळ २ पेले

याच्या निम्मे डाळी

हरबरा डाळ दीड पेला
उडदाची डाळ दीड पेला

अर्धा पेला गहू
धने १ पेला

मधम आचेवर कढई ठेवा व वरील सर्व जिन्नस भाजून घ्या. गार झाले की गिरणीतून जाडसर दळून आणा.

Monday, October 04, 2010

बटाटा भाजी



जिन्नस :

बटाटे ३-४
पाऊण कांदा
३-४ मिरच्या
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा धनेजिरे पावडर
मीठ
साखर
तेल
मोहरी, हिंग, हळद (फोडणीसाठी)

क्रमवार मार्गदर्शन : बटाटे कूकरमध्ये उकडून घ्या. गार झाले की त्याची साले काढून मध्यम आकाराच्या फोडी करा. कांदाही मध्यम आकाराच्या फोडी करून चिरा. मिरच्यांचे तुकडे करा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात जरूरीपुरते तेल घाला. तेल तापले की त्यात मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात मिरच्यांचे तुकडे व चिरलेला कांदा घाला. परतून घ्या. त्यावर झाकण ठेवा. नंतर काही सेकंदाने झाकण काढा व परत थोडे परता. असे दोन तीन वेळा करा. कांदा कच्चा राहता कामा नये. कांदा शिजला का नाही हे पाहण्यासाठी कालथ्याने शिजलेल्या कांद्यावर थोडे टोचून पहा. कांदा कालथ्याने तुटला की तो शिजला असे समजावे. नंतर त्यात चिरलेले बटाटे घाला व परतून घ्या. ढवळा. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड व चवीप्रमाणे मीठ घाला. थोडी साखर घाला. नंतर परत हे सर्व मिश्रण नीट सर्व बाजूने ढवळा. आता परत झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून परत थोडे परता. असे दोन तीन वेळा करा. गॅस बंद करा. भाजीवर झाकण ठेवा. वाफेवर ही भाजी चांगली शिजली की चविष्ट लागते.

या भाजीत कांदा जास्त घालावा म्हणजे डोशाबरोबर बटाट्याची भाजी देतात तशी लागते. वाढताना त्यावर थोडी चिरलेली कोथिंबीर व ताजा खवलेला नारळ घाला. या भाजीत कडीपत्त्ता घातल्यास जास्त चांगली चव येते. कडीपत्ता फोडणीत घालावा.

Thursday, September 02, 2010

कडधान्य भिजवणे



१ वाटी हिरवे मूग
पाणी

दुपारी किंवा रात्री जेवणासाठी मुगाची/इतर कडधान्याची उसळ करायची असेल तर आदल्या दिवशी सकाळी मूग पाण्यात भिजत घाला त्यावर झाकण ठेवा. रात्री झोपताना पाण्यासकट हे मूग एका चाळणीत ओता. पाणी निघून जाईल. या चाळणीवर मूग पूर्णपणे झाकून जातील असे झाकण ठेवा व चाळणीखाली एक पातेली ठेवा. उरलेले सर्व पाणी निथळून जाईल. दुसऱ्यादिवशी सकाळी मुगाला मोड आलेले असतील. भिजलेल्या एका वाटीचे मोड आलेले मूग ४ वाट्या होतील. ४ जणांकरता उसळ होईल.

Friday, July 23, 2010

चमचमीत बटाटा



जिन्नस :

३-४ मध्यम आकाराचे बटाटे
पाणीपुरी मसाला
चाट मसाला
लाल तिखट
धनेजिरे पूड
चिंचगुळाचे दाट पाणी
हिरवी चटणी (कोथिंबीर मिरची लसूण)
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेला टोमॅटो
बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ
बारीक शेव
दही
बटर३-४ चमचे
साखर

क्रमवार मार्गदर्शन : बटाटे कूकर मध्ये उकडून घ्या. नंतर उकडलेले बटाटे बारीक चिरा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात बटर घालून बारीक चिरलेले बटाटे घाला व परता. नंतर त्यात आवडीप्रमाणे पाणीपुरी मसाला, चाट मसाला, लाल तिखट, धनेजिरे पूड घाला. चवीला मीठ घाला. नंतर हे सर्व मिश्रण खरपूस परता. कालथ्याने बारीक बटाटे अजुनही खूप बारीक करा. त्याचा लगदा झाला पाहिजे. गार झाल्यावर त्याचे गोल आकाराचे पॅटीस करा.

मिरची, कोथिंबीर, लसूण व मीठ याची चटणी करा. चिंच गुळाच्या दाट पाण्यात थोडे लाल तिखट, धनेजिरे पूड व मीठ घालून त्याची चटणी करा.

एका खोलगट डीश मध्ये बटाट्याचे तयार केलेले पॅटीस घाला. त्यावर लसूण मिरचीची चटणी घाला. नंतर चिंचगुळाची चटणी घाला. नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा,टोमॅटो व बारीक शेव घाला. थोडी कोथिंबीर पेरा. नंतर त्यावर दही घाला व चिमुटभर लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ व साखर पेरून खायला द्या. अतिशय चविष्ट डीश आहे.

ही पाककृती माझी नाही. माझ्या मैत्रिणीची आहे. तिचे नाव सौ दिप्ती जोशी.

Wednesday, July 21, 2010

कोथिंबीर वडी



जिन्नस :

जाडसर चिरलेली कोथिंबीर ३ वाट्या
अर्धी वाटी हरबरा डाळीचे पीठ
५ चमचे तेल
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा धनेजिरे पूड
हळद चिमूटभर
चवीपुरते मीठ

क्रमवार मार्गदर्शन : चिरलेली कोथिंबीर धुवून घ्या. धुवून रोळीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवा. पाणी पूर्णपणे निथळले गेले पाहिजे. नंतर त्यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड, हळद, तेल व मीठ घालून ढवळा व त्यामध्ये मावेल इतके डाळीचे पीठ घाला. ३ वाट्या चिरलेल्या कोथिंबीरीत अर्धा वाटी डाळीचे पीठ मावले. नंतर हाताने सर्व मिश्रण एकत्र करून त्याचा लोडासारखा आकार बनवा व तो एका पातेल्यात घालून कूकर मध्ये उकडून घ्या. पातेल्यावर झाकण ठेवा.पातेल्याला थोडे तेल लावून घ्या. कूकर थंड झाला की त्याचे झाकण काढून लोडासारख्या बनवलेल्या आकाराच्या पाहिजे त्या आकाराच्या वड्या पाडा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. त्यात पुरेसे तेल घालून वड्या खरपूस तळा. आकर्षक सजावट करून खाण्यासाठी ठेवा. चहासोबत या वड्या छान लागतात. या वड्या हलक्याफुलक्या, खुसखुशीत व कुरकुरीत होतात.

Monday, July 19, 2010

कुरडई



  • गहू २ वाट्या
  • हिंग
  • मीठ
  • पाणी
  • तेल

२ वाट्या गहू पाण्यात ३ दिवस भिजत घाला. रोज एकदा पाणी बदला. ४ थ्या दिवशी मिक्सर ग्राईंडर मधून गहू वाटा. गहू वाटताना त्यात थोडे पाणी घाला. एका भांड्यामध्ये थोडे पाणी घ्या व त्यात हे वाटलेले गहू घालून सपीटाच्या चाळणीने गाळून घ्या. गाळलेले गव्हाचे पाणी एका भांड्यात जमा होईल व वर राहिलेले गव्हाचे मिश्रण परत एकदा पाणी घेउन ते चाळणीने परत चाळून घ्या. हे गव्हाचे वाटलेले मिश्रण आहे ते हाताने पिळून ते पाणी सपीटाच्या चाळणीत ओता. असे २-४ वेळा केले की जे पाणी भांड्यात जमा होईल ते एक दिवस तसेच राहू देत. नंतर दुसऱ्या दिवशी भांड्यात जमा झालेले वरचे पाणी काढा. खाली पांढरा शुभ्र गव्हाचा साका जमा होईल. तो साधारण लाप्शीइतका दाट असेल. साका १ वाटी असेल तर पाणी १ वाटी घ्या. एका वाटीच्या पाण्यात थोडा चवीपुरता हिंग घाला. तसेच मीठही घालून पाणी एका भांड्यात घेऊन मध्यम आचेवर तापत ठेवा. उकळी यायच्या आत गव्हाचा एक वाटी साका त्यात घालून लगेच पटापट ढवळा. गुठळी होऊन देऊ नका. नंतर गॅस मंद आचेवर ठेवा व त्यावर झाकण ठेवा. वाफेवर चीक तयार होईल. २-३ दणदणीत वाफा द्या.


हा चीक गरम असतानाच सोऱ्यात घालून कुरडया घाला. कुरडया घालताना सोऱ्याला तेलाचा हात लावा. खाण्यासाठी हा चीक उत्तम लागतो. चीकामध्ये गोडतेल घालून खा. खूप पौष्टिक व चविष्ट आहे हा चीक.

कुरडया कडक उन्हात वाळवा. सणासुदीला पानात डावीकडे तळण या प्रकारात कुरडई तळून ठेवा.

सजावट (१४)




blueberry, watermelon, apple, pear, cilantro

Monday, July 12, 2010

गोड लिंबू लोणचे



वाढणी: २ जण

पाककृतीला लागणारा वेळ: १५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

* लिंबू ६ (हिरव्या/पिवळ्या सालीचे)
* लाल तिखट पाव वाटी
* मीठ 1 वाटी
* साखर दोन वाट्या
* जीरे पूड अर्धा चमचा

क्रमवार मार्गदर्शन:

६ पैकी ५ लिंबाच्या प्रत्येकी चार किंवा आठ फोडी करून त्यात लाल तिखट, मीठ, साखर व जीरेपूड घालून चमच्याने ढवळा/एकत्रीत करा. या मिश्रणाची चव घेऊन जे काही कमी वाटत आहे (तिखट, मीठ साखर) त्याप्रमाणे अजून थोडे घालून ढवळा. नंतर काचेच्या बरणीमधे हे तयार झालेले लोणचे भरून ठेवा. बाटलीमधे भरल्यावर एक लिंबू चिरून त्याचा रस लोणच्यामधे पिळावा. लिंबाच्या फोडी मुरायला बराच वेळ लागतो पण लोणच्याचा खार २-४ दिवसात तयार होतो.

हे लोणचे उपासाला चालते. शिवाय मेतकूट-तूप-भात याबरोबर खायलाही छान लागते.

Saturday, July 03, 2010

गुलाबजाम

गुलाबजाम माझ्या स्वप्नात आला असे कधीच झाले नाही आणि होणारही नाही कारण की तो माझ्या अजिबातच आवडीचा नाही. आणि असेही गुलाबजाम हा काय स्वप्नात येण्यासारखा पदार्थ आहे का!? स्वप्नात येणारे पदार्थ म्हणजे आमरस, पुरणपोळी, श्रीखंडपुरी!! सासरीमाहेरी पण वरचेवर गुलाबजाम कधीच कुणी केले नाहीत.




मध्यंतरी डॉ कपूर यांच्याकडे एका मित्राला भेटण्यासाठी म्हणून जाण्याचा योग आला. तिथे त्यांनी बनवलेले गुलाबजाम खाल्ले आणि ते मला खूपच आवडून गेले. ५-६ गुलाबजाम आवडीने खाल्ले. माझ्या खाण्यात जर दुसऱ्याने बनवलेला पदार्थ आला आणि जर का तो मला खूपच आवडला तर मी लगेचच त्याची कृती विचारून घेते. डॉ कपूरांनी मला सविस्तर कृती सांगितली आणि मी पण त्यातल्या खाचाखोचा विचारून घेतल्या. गुलाबजाम बनवण्याकरता जे जिन्नस त्यांनी सांगितले होते ते आणले व आत्मविश्वासाने करायला घेतले. त्यांनी जे प्रमाण सांगितले होते त्याच्या अर्धे प्रमाण घेतले. पाकाबद्दल खात्री होतीच. सांगितलेले जिन्नस एकत्र करून गुलाबजामचे गोळे बनवले. मध्यम आचेवर कढई तापत ठेवून त्यात तेलही घातले. गुलाबजाम तळताना मंद आचेवर सावकाशीने तळावेत असे सांगितले होते म्हणून मी मुद्दाम जाड तळ असलेली कढई घेतली म्हणजे तेलही पटकन तापत नाही. तेल तापले आहे का नाही ते बघायला बनवलेल्या पिठाचा छोटा कण घातला तो हळूहळू करत तेलाच्या वर आला. आता हे अगदी बरोबर तापमान आहे. सावकाशपणे छान गुलाबजाम तळले जातील म्हणून तीन चार तेलामध्ये घातले. थोड्यावेळाने उलटले पाहते तो काय! कमी कमी होत जाऊन पार विरघळून गेले! अरेच्या हे कसे काय झाले? बहुतेक तेल नीट तापले नसावे म्हणून असे झाले असेल म्हणून अजून २-३ घातले तरी असेच परत. कढई दुसरीकडे ठेवून पटकन नेहमीची पटकन तापणारी पातळ तळ असणारी कढई ठेवली. यावेळी तेल थोडे जास्त घातले कारण गुलाबजाम तळायला थोडा वाव कमी पडला असेल आधी म्हणून असे झाले असेल असे वाटले. यावेळी मोजून दोनच गुलाबजाम तेलात सोडले. यावेळी तर घातल्या घातल्या पटकन विरघळले. होत्याचे नव्हते झाले! पूर्ण मूड ऑफ झाला. गॅस बंद केला. इतके सगळे व्यवस्थित अर्थात अंदाजानुसार निम्मे केलेले जिन्नस घेतले तरी हे असे व्हावे! एका कढईच्या तळाशी काळपट थर तर दुसऱ्या कढईच्या तळाशी काळपट चॉकलेटी थर! सर्व काही फेकून देण्याच्या लायकीचे झाले होते.


दुसऱ्या दिवशी आईशी फोनवर बोलताना सांगितले की मी एका पद्धतीने गुलाबजाम करून बघितले पण सर्व विरघळले. तू सांग ना मला गुलाबजामची कृती. रवामैद्याचे होतात का गं गुलाबजाम? आईने सांगितले की गुलाबजामाला खवा लागतो. खव्यात थोडा मैदा घालून तो दुधात भिजवायचा. पण इथे खवा नाही ना मिळत! खव्यावरून मला रिकोटा चीझची आठवण झाली. मी खव्याला पर्याय म्हणून रिकोटा चीझ वापरते व माझ्या पद्धतीने तशा काही पाककृतीही केल्या आहेत. नाहीतरी मला गुलाबजामचा प्रयोग करायचा होताच.


सकाळी फोन झाल्यावर जेवणानंतर शांत चित्ताने आईने सांगितलेल्या कृतीनुसार सुरवात केली. रिकोटा चीझ मैदा व दूध एकत्र केले. खरं तर दूध खूप काही घातले नाही कारण रिकोटा चीझ ओलसर असते त्यात आईने सांगितलेल्या प्रमाणानुसारच मैदा घातला व अगदी थोडे दूध घातले. एकत्र केल्यावर पीठ बरेच सैलसर वाटले म्हणून अजून थोडा मैदा घातला कारण की गुलाबजामचे गोळे व्यवस्थित बनायला पाहिजेत. आदल्यादिवशीचा विरघळण्याचा अनुभव होता. मला वाटले की पीठ वळण्या इतपत तरी घट्ट झाले पाहिजे. पाक केला. मध्यम आच ठेवून कढई व त्यात तेल घालून गोल वळलेले गुलाबजामही घातले. विरघळणे तर सोडाच पण जरासुद्धा इकडचे तिकडे हालले नाहीत. मला खूप आनंद झाला. चॉकलेटी रंगाचे गुलाबजाम खूप छान दिसत होते. पाकातही सोडले. डावेने ढवळले. थोडे मुरू देत मग चव घेऊ! थोड्यावेळाने बघितले तर पाक गरमच होता. विचार केला की चव बघायला काय हरकत आहे. पाक गुलाबजाम मध्ये शिरत आहे का नाही हे तरी कळेल. वाटीत घालून चमचा गुलाबजाम मध्ये घातला तर थोडा कडक लागला. खाल्ला तर पाक अजिबातच आत शिरला नव्हता. गरम पाकातच गुलाबजाम आणि तेही गरम असतानाच घालायचे असे सांगितल्यासारखेच केले तरीही पाक गुलाबजाम मध्ये शिरत नाही म्हणजे कमाल झाली! बहुतेक हे सर्व प्रकरण बिघडले आहे याचा अंदाज आलाच. पाक गार झाल्यावर चव घेतली तर पहिल्यापेक्षाही गंभीर परिस्थिती होती. खूप चिवट व कडक झाले होते. बाहेरून पाक होता तितकेच गोड.


आता कधीही या गुलाबजामच्या फंदात पडायचे नाही असे ठरवले पण चैन कुठे पडते! काही दिवसांनी परत एकदा गुलाबजामच्या जय्यत तयारीत. यावेळी पूर्णपणे माझा अंदाज वापरला. मूळ पाककृतीमधला एक जिन्नस बदलून दुसरा घेतला. बटर व दूधही थोडे कमीच घेतले. यावेळी मात्र एकदम छान!! अजूनही एक दोन प्रयोग केले की "खूपच "छान या सदरात मोडतील. त्यादिवशीचे गुलाबजाम किती छान झालेत ना! असे म्हणून एकेक करत लगेचच संपले. मूळ पाककृतीनुसारही एक दोन वेळा बनवणार आहे. किंचित सोडा घालतात असे ऐकीवात आहे. माझ्या अंदाजानुसार बनवले त्यात सोडा घातला नव्हता. तसेही मूळ कृतीमध्येही सोडा सांगितलेला नाही. दूध व बटरही अंदाजाने घेतले आहे त्यामुळे नेमके प्रमाण पाककृती लिहीन तेव्हाच. मूळ पाककृतीमध्ये दुधाची पावडर, बिस्व्किक, बटर व दूध सांगितले आहे. गुलाबजाम जमल्याचा आनंद आहे. जेवणानंतर स्वीट डिश म्हणून ही पाककृती तर अगदी उत्तम आहे याबद्दल वाद नाही!!

Tuesday, June 22, 2010

ओल्या नारळाच्या वड्या



वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

ओल्या नारळाचा खव २ वाट्या/स्वादची कोकनट पावडर
3-4 चमचे साजूक तूप
अदपाव वाटी दूध
सव्वा वाटी साखर (ज्यांना वड्या व्यवस्थित गोड हव्या असतील त्यांनी साखरेच प्रमाण दीड ते पावणेदोन वाट्या घ्यावे.)
साखर बुडेल एवढे पाणी
रिकोटा चीझ २/३ चमचे



क्रमवार मार्गदर्शन : एका पातेल्यात साखर व साखर बुडेल इतके पाणी घ्या व ते गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. त्याचवेळी दुसऱ्या पातेल्यात थोडे साजूक तूप, नारळाचा खव, दूध व रिकोटा चीझ घालून परतून घ्या. एकतारी पाक झाला की त्यात नारळाच्या खवाचे परतून झालेले मिश्रण घाला व कालथ्याने ढवळत रहा. थोड्यावेळाने साखर विरघळून मिश्रण घट्ट व्हायला लागेल. मिश्रण कडेने कोरडे झाले आणि घट्ट लागायला लागले की त्याचा एकत्र गोळा तयार होईल. गॅस बंद करून अजून थोडे मिश्रण घोटून घ्या. दोन ताटल्यांना साजूक तूप लावून घ्या व हे तयार झालेले मिश्रण ओता व कालथ्यानेच थोडे एकसारखे करा. नंतर तूपाचा हात घेऊन किंवा एका प्लॅस्टिकच्या कागदाला तूपाचा हात लावून मिश्रण एकसारखे थापा. कोमट असताना कालथ्याने किंवा सुरीने वड्या पाडा. मिश्रण खूप गार झाले की कापलेल्या वड्या कालथ्याने सोडवून डब्यात भरा.

खाऊ म्हणून न्यायला ह्या वड्या छान आहेत. या वड्या उपवासाला चालतात. तळून केलेल्या बटाट्याच्या चिवड्याबरोबर ही वडी छान लागते.

Wednesday, June 16, 2010

काजूवडी



वाढणी : १ जण

जिन्नसः

काजू पूड सव्वा वाटी
अर्धी वाटी साखर
पाव वाटी दूध
साजूक तूप १ चमचा

क्रमवार मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. त्यात १ चमचा तूप, काजूपूड, साखर व दूध घालून लगेचच हे मिश्रण कालथ्याने ढवळायला घ्या. सतत एकसारखे सर्व बाजूने ढवळत रहा. काही वेळाने मिश्रण कोरडे होऊ लागेल. ढवळताना कालथा जड लागायला लागेल. मिश्रण कोरडे होऊन जवळ येईल व गोळा होईल. एका ताटलीला थोडे साजूक तूप लावा व हे मिश्रण त्यावर घालून सर्व बाजूने एकसारखे थापा. कोमट असताना वड्या पाडा. १० ते १५ वड्या होतात. ही पाककृती खूप सोपी आहे आणि झटपट होणारी आहे.

ही पाककृती माझी नाही. माझ्या मैत्रिणीची आहे. तिचे नाव सायली जोशी. धन्यवाद सायली.

Thursday, May 27, 2010

गोड लिंबू लोणचे

लग्नानंतर आयायटीत वसतिगृहात राहिल्या लागल्यापासून जी काही छोटी मोठी सुट्टी मिळत असे तेव्हा आमची धाव नेहमी पुण्याकडेच असायची. माझी मोठी मामी त्यावेळेला दादरला रहायची तिच्याकडे अधुनमधून जायचो. ती नेहमी म्हणायची एकदा ये माझ्याकडे रहायला नेहमी पुण्याला पळत असतेच.

मामीकडे राहण्याचा योग लवकरच जुळून आला. विनायकला काही कामानिमित्ताने बाहेरगावी जायचे होते. विचार केला यावेळेला मामीकडे जाऊया. तिच्याकडे रहायला गेले आणि तिला म्हणाले मामी मला लिंबू लोणचे शिकवशील का? म्हणजे नेहमीचे नाही हं. गोड लिंबू लोणचे, मला ते खूप आवडते. म्हणाली मी तुला करूनच देते. १५ लिंबांचे करून देते. करताना बघ म्हणजे पुढच्यावेळी तू लोणचे घालशील तेव्हा सोपे जाईल. हे लोणचे तर खूपच सोपे असते. त्याकरता तुला दोन काचेच्या बरण्या लागतील त्या घेऊ आधी आपण आणि अजून आहेस ना ५-६ दिवस तेव्हा सावकाशीने घालू.

बाजारात लिंबांसाठी व बरण्यांसाठी फेरफटके मारले. बरण्या छानच मिळाल्या. चॉकलेटी रंगाच्या आणि त्याला लाल झाकण. जाड काचेच्या पारदर्शक ठेंगण्याठुसक्या बरण्या खूप छान दिसत होत्या. बरण्या घरी आल्यापासून आम्ही दोघींनी बरण्यांचे खूप कौतुक चालवले होते. कमी किंमतीत किती छान मिळाल्या ना! आकाराने पण वेगळ्याच आहेत, रंग पण नेहमीसारखा नाही, खूप वेगळा आणि छान! लिंबांकरता परत दुसऱ्या दिवशी भाजीमार्केटमध्ये फिरलो. इकडे बघ, तिकडे बघ, कितीला दिली लिंबे? खूप महाग आहेत. मामी भाजीवाल्यांकडचे लिंबू बघून वास घ्यायची, हाताने दाबून बघायची. मी खूप वैतागले होते. एक तर दादरला नेहमी गर्दी असते. एवढी काय चिकित्सा! मला तर कधी एकदा लिंबू कोणचे घालून खाते असे झाले होते! परत तिसऱ्या दिवशी आमच्या दोघींचे फेरफटके बाजारात! मला म्हणाली अगं लिंबू पण नीट बघून घ्यावी लागतात. खूप मोठी नकोत, लहानही नकोत. लिंबाचे साल पण पातळ हवे. शेवटी मामीला हवी तशी लिंबे मिळाली.

घरी आल्यावर जेवलो. दुपारचा चहा प्यायला मग लोणच्याला सुरवात. लिंबे धुवून घेतली. ती कोरड्या फडक्याने पुसली. विळी धुवून घेतली ती पण कोरड्या फडक्याने पुसली. बरण्या आधीच धुवून पुसून तयार होत्या. लिंबू सुद्धा चिरण्याची एक पद्धत आहे. उभे नाही चिरायचे, आडवे चिरायचे. मला तर त्यावेळेला उभे आडवे काहीच कळाले नाही! लिंबे चिरताना पण त्यावर दाब द्यायचा नाही, हलक्या हाताने चिरायची. त्यात लाल तिखट व मीठपण नेहमीचे मिसळण्याच्या डब्यातले घालायचे नाही कारण की हे उपवासाचे लोणचे असते. पूर्वी लाल तिखट वर्षाचे घालून ठेवलेले असायचे त्यातले लागेल तेवढेच लाल तिखट काढून ठेवले होते मामीने. मीठ पण उपवासाला वेगळे म्हणून ठेवलेले त्यातलेच वापरले.

लोणचे कालवले व बरण्यात भरले. रात्रीच्या जेवणाला म्हणले घ्यायचे का लोणचे ह्यातले. मामी म्हणाली अगं थांब मुरू देत जरा थोडेसे! दुसऱ्या दिवशी लोणच्याच्या खाराची चव बघितली. मामी किती छान झालयं गं लोणचे! मामी म्हणाली झालाय ना छान. आवडले ना तुला. आवडले म्हणजे काय मस्तचं झाले आहे. मी नेहमी घालणार आता हे लोणचे. मला खूप आवडते. दोन दिवसांनी घरी आल्यावर आम्ही दोघांनी लोणचे खाण्याचा जो सपाटा लावला की खार संपून लोणच्याच्या फोडीच शिल्लक राहिल्या. त्याही मुरल्यावर मस्त लागल्या.

त्यानंतर मी हे लोणचे कधी घातलेच नाही. लिंबाच्या लोणच्याचा मुहूर्त बरेच वर्षानंतर इथे अमेरिकेत आल्यावर लागला. भारतात असताना आई तर दरवर्षी नवीन लोणचे घातल्यावर जुने मुरलेले आम्हां दोघी बहिणींना द्यायची, मग मुद्दामून कोण घालतयं लोणचे! इथे सुद्धा दोनदाच घातले गेले. परत एकदा घालायचे आहे. दर वेळेला लिंबे आणते आणि घोकत राहते घालायचे घालायचे म्हणून, शेवटी ती अशीच पोहे उपम्यांवर पिळून संपतात!

Tuesday, May 18, 2010

टोमॅटो सूप




वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

लाल टोमॅटो छोटे ६,
छोटा अर्धा कांदा,
एक छोटा बटाटा
लाल तिखट,
मिरपूड,
साखर, मीठ


क्रमवार मार्गदर्शन: टोमॅटो, कांदा व बटाटा चिरून एका पातेल्यात घाला व त्यात ते बुडतील इतपत पाणी घालून कूकरमध्ये शिजवून घ्या. गार झाल्यावर त्यातील पाणी एका पातेल्यात काढा. बटाटा व टोमॅटोची साले काढून बटाटे टोमॅटो व कांदा मिक्सरमधून बारीक करून घ्या. नंतर हे मिश्रण गाळणीने गाळून घ्या. नंतर शिजवताना घातलेले पाणी की जे आधिच काढलेले आहे ते पण या गाळलेल्या मिश्रणामधे घाला.


नंतर या मिश्रणामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट, मिरपूड, मीठ व साखर घालून एक उकळी आणा. झाले सूप तयार.

टोमॅटो सूपास कांद्यामुळे तिखटपणा व बटाट्यामुळे दाटपणा येतो.

गाळून घेतल्यामुळे टोमॅटोतील बिया व मिक्सरमधे बारीक करताना जर बटाट्याचे तुकडे राहिले असतील तर ते सूपामध्ये येत नाहीत. एकजीव व दाट सूप होते. गरम गरम सूपामध्ये थोडे बटर घाला.



माहितीचा स्रोत:बहिण सौ रंजना जेरे

Friday, May 07, 2010

भरलेली चिली पोबलॅनो




जिन्नस :

चिली पोबलॅनो २
बटाटे मध्यम २
लाल तिखट अर्धा ते पाऊण चमचा
धनेजिरे पूड अर्धा ते पाऊण चमचा
मीठ
पाव लिंबू
लसूण २-३ पाकळ्या बारीक चिरून
कांदा थोडा बारीक चिरून
तेल
सजावटी साठी किसलेले चीझ

क्रमवार मार्गदर्शन : बटाटे उकडून घ्या. उकडल्यावर त्याची साले काढून हाताने बारीक करा. नंतर त्यात कांदा लसूण अगदी बारीक चिरून घाला. लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ घालून थोडे लिंबू पिळा. हे झाले मिरचीच्या आतमध्ये भरायचे सारण. मिरची धुवून कोरड्या फडक्याने पुसून घ्या व मध्ये एक चिर पाडा. आता तयार केलेले बटाट्याचे सारण चिर पाडलेल्या भागातून मिरचीमध्ये भरा. मध्यम आचेवर पसरट पॅन ठेऊन त्यात थोडे तेल घाला. ते तापले की लगेचच त्यावर भरलेल्या मिरच्या ठेवा. त्यावर झाकण ठेवा. आता आच एकदम मंद ठेवा. मंद आचेवर या मिरच्या शिजतील. अधून मधून झाकण काढून बघावे. नंतर थोड्यावेळाने अलगद मिरच्या उलटा व परत झाकण ठेवा. दुसऱ्या बाजून मिरची शिजेल. आता परत सुलट्या करा व शिजवा. मंद आचेवर मिरची शिजते.

मिरच्या गार झाल्या की एका ताटलीत काढून त्यावर किसलेले चीझ घाला. अशा पद्धतीची मिरची मेक्सीकन उपहारगृहामध्ये मिळते. पण ती उकडलेली असते. व आतील सारणात पण तिखट मीठ नसते. फक्त उकडलेले बटाटे बारीक करून घातलेले असतात. ही मिरची मी इंडीयन स्टाईलने केलेली आहे. जशी आपण भरली सिमला मिरची करतो तशीच पद्धत आहे. याची चव छान लागली. ही मिरची चवीला अगदी थोडी तिखट असते. आणि शिजल्यावर पण छान वास येतो. ही मिरची फ्राईड राईस किंवा मसालेभाताबरोबर छान लागते. नुसती सुद्धा खायला छान लागते.

Wednesday, April 28, 2010

घारगे





वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

लाल/पिवळा भोपळ्याचा कीस १ वाटी
गूळ १ वाटी
तांदुळाचे पीठ अर्धी वाटी
रवा अर्धी वाटी
कणीक अदपाव वाटी
साजूक तूप अर्धा चमचा

क्रमवार मार्गदर्शन: मध्यम आचेवर कढई ठेवा. कढईत थोडे साजूक तूप घालून भोपळ्याचा कीस व गूळ एकत्र करून शिजवून घ्या. शिजवताना त्यावर ताटली ठेवली तर पटकन शिजतो. शिजल्यावर गरम असतानाच त्या मिश्रणात पूरेल इतकेच तांदुळाचे पीठ, रवा व कणीक घालून व्यवस्थित ढवळा. ढवळल्यावर या मिश्रणाचा गोळा तयार होईल. नंतर अर्ध्या तासाने त्या मिश्रणाचे छोटे गोळे करून ते प्लॅस्टीकच्या कागदावर थोडासा तेलाचा हात लावून जाड थापा. थापताना तेलाचा हात घेऊन थापले तर पटकन थापले जातात. साधारण लहान पुरी एवढ्या आकाराचे हे घारगे तेलात मध्यम आचेवर लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या.

यामध्ये घेतलेले गुळाचे प्रमाण थोडे जास्त आहे असे वाटते, कारण खूप गोड झाले. ज्यांना खूप गोड आवडत नसेल त्यांनी गुळाचे प्रमाण निम्मे किंवा पाऊण घ्या.

घारग्यांवर गोठलेले साजूक तूप पसरवून खावे. हे घारगे श्रावणात सोमवारी संध्याकाळी उपास सोडताना नैवेद्याला करतात. ह्याबरोबर भाजणीचे तिखट वडेही करतात. तिखट वडे व गोड घारगे असा नैवेद्य असतो.

Tuesday, April 27, 2010

भरड्याचे वडे



वाढणी : २ जण

जिन्नस :

भरड्याचे/भाजणीचे पीठ २ वाट्या
तिखट १ चमचा
हळद अर्धा चमचा
चवीपुरते मीठ
थोडीशी चिरलेली कोथिंबीर

क्रमवार मार्गदर्शन : भरड्याचे पीठ एका ताटलीत घ्या व त्यामध्ये हळद, तिखट, मीठ व चिरलेली कोथिंबीर घालून हे मिश्रण चांगले कालवून घ्या म्हणजे तिखट मीठाची चव सर्व पीठाला लागेल. नंतर एका पातेल्यात २ वाट्या पाणी घालून ते मध्यम आचेवर गॅसवर ठेवा. पाण्याला उकळी आली म्हणजे पाण्याला बुडबुडे आले की गॅस बंद करा. त्यातले थोडे पाणी एका वाटीत बाजूला काढून ठेवा. नंतर त्यामध्ये कालवलेली भाजणी घालून पटापट ढवळा. ढवळताना ओले झालेले पीठ जर कोरडे वाटले तर काढून ठेवलेले पाणी त्यात घाला अन्यथा नको. नंतर त्यावर झाकण ठेवा. २ तास हे पीठ असेच मुरू देत. झाकण ठेवल्याने आतल्या आत जी पाण्याची वाफ आहे त्यात हे मीठ मुरते व शिजते. याला उमले करणे असे म्हणतात.


२ तासाने पीठ थोडे तेल व पाणी घेऊन मळून घ्या व त्याचे छोटे गोळे करा. एका प्लॅस्टिकच्या पातळ कागदावर तेल लावून हे गोळे त्यावर थापून एकेक करून लालसर रंगावर तळा. गोळे थापताना ते मध्यम आकाराचे करा. फार जाड नकोत व फार पातळ नकोत असे थापा. या वड्यांबरोबर लोणी अथवा दही खूप छान लागते. हे वडे घारगे/वडे या नैवेद्यासाठी करतात श्रावणी सोमवरी संध्याकाळी उपवास सोडताना. ही वड्यांची भाजणी वेगळी आहे. या भाजणीला भरडा असेही म्हणतात. कारण हे पीठ जाडसर भरड्यासारखे दळतात. ही थालिपीठाची भाजणी नाही. त्याची रेसिपी लवकरच देईन. मी ही भाजणी भारतातून आणली. इथे इंडीयन स्टोअर्स मध्ये मिळते का नाही ते माहिती नाही. थालिपीठाच्या भाजणीचेही अश्याच पद्धतीने वडे करतात पण त्यात लसूण घालतात. हे वडेही छान लागतात.

Thursday, April 22, 2010

मोकळ भाजणी



वाढणी : १ जण

जिन्नस :

थालिपीठाची भाजणी १ वाटी
लाल तिखट अर्धा ते पाऊण चमचा
हळद चिमूटभर
हिंग पावडर चिमूटभर
मीठ
चिरलेला कांदा १ वाटी
कच्चे/ भाजलेले दाणे अर्धी वाटी
तेल
फोडणीकरता मोहरी, हिंग, हळद
चिरलेली कोथिंबीर
ओला नारळ
साजूक तूप


क्रमवार मार्गदर्शन : एका ताटलीत थालिपीठाची भाजणी घ्या. त्यात लाल तिखट, हळद, हिंग व चवीपुरते मीठ घालून व पाणी घालून पीठ भिजवा. थालिपीठ बनवण्याकरता जसे पीठ बनवतो तसे पीठ बनवा. हा भिजवलेला पीठाचा गोळा थोडा सैलसर असावा. नंतर मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात जरूरीपुरते तेल घाला. तेल तापले की त्यात मोहरी, हिंग हळद घालून फोडणी करून त्यात चिरलेला कांदा घाला . नंतर त्यावर झाकण ठेवा व वाफेवर कांदा शिजवा. नंतर त्यात दाणे घालून थोडे परतून घ्या व भिजवलेल्या भाजणीचा गोळा घाला. हा गोळा कालथ्याने मोडून मोकळा करावा. नंतर त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदाने हे झाकण काढून परत कालथ्याने मिश्रण मोकळे करा. असे बरेच वेळा करा म्हणजे मिश्रण मोकळे होईल. एकीकडे सर्व बाजूने ढवळत राहा म्हणजे फोडणी सर्वत्र एकसारखी लागेल. थोडक्यात वाटली डाळीसारखीच ही कृती आहे.


मोकळी भाजणी तयार झाली की खायला देताना एका डीश मध्ये घालून त्यावर चिरलेली कोथिंबीर, ओला नारळ व साजूक तूप घालून द्यावी. सोबत लिंबाची फोड. ही एक चविष्ट व पौष्टिक पाककृती आहे.

Saturday, April 17, 2010

पास्ता

वाढणी:२ जणांना पाककृतीचे जिन्नस: पास्ता ३ मुठी भरुन नळकांडीच्या आकाराचा किंवा जो आवडेल त्या आकाराचा चिरलेला कोबी वाटीभर, चिरलेले गाजर १ वाटी चिरलेली सिमला मिरची १ वाटी मटारचे दाणे वाटीभर लसूण २-३ पाकळ्या चिरलेला कांदा ४ चमचे टोमॅटो सॉस ४२५ ग्रॅम, (hunt's किंवा spaghetii) जे आवडेल ते तेल, तिखट १ चमचा, धने-जीरे पूड १ चमचा, मोहरी, हिंग, हळद मीठ क्रमवार मार्गदर्शन: सर्वात प्रथम एका कढईत पास्ता पाणी घालून शिजवून घ्यावा. नंतर दुसऱ्या कढईत तेल घालून ते तापले की त्यात मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करावी. नंतर बारीक चिरलेल्या लसुण पाकळ्या व कांदा घालून नंतर बारीक चिरलेला कोबी, गाजर, सिमला मिरची उर्फ ढब्बू मिरची, व मटारचे दाणे घालून परतून घ्या व मंद वाफेवर शिजवा. (जशी भाजी शिजवतो तसे). नंतर त्यात १ चमचा लाल तिखट, १ चमचा धने-जिरे पूड व चवीप्रमाणे मीठ घालून परता. परतून झाल्यावर त्यात शिजवलेला पास्ता व टोमॅटो सॉस घालून ढवळा. नंतर एक दोन वाफा देऊन परत एकदा नीट ढवळून घ्या. गरम गरम पास्ता तयार! नंतर आवडीचे एखादे आयस्क्रीम खा. एका वेळचे दोघांचे मस्त जेवण होते. माहितीचा स्त्रोत : श्री राजेश गोस्वामी

Tuesday, March 23, 2010

मेतकूट



जिन्नस :

हरबरा डाळ २ वाट्या
उडदाची डाळ सव्वा वाटी
तांदुळ पाऊण वाटी
गहू व मुगाची डाळ दोन्ही मिळून अर्धी वाटी

वरील सर्व धान्य कढईत वेगवेगळे घेऊन भाजा. आच मध्यम असावी.

मसाला

जिरे १ चमचा
धने अर्धा चमचा
लवंग १० ते १२
वेलदोडे ४
दालचिनी १ तुकडा - १ ते दीड इंच लांबीचा
मोहरी १ चमचा
हिंग पावडर २ चमचे
हळद अर्धी वाटी
सुंठ १ चमचा
मिरे व मेथी मिळून अर्धा चमचा

वरील सर्व मसालाही मध्यम आच ठेवून कढईत भाजा.

भाजलेले सर्व जिन्नस गार झाले की एकत्र करा आणि बारीक दळा. घरघंटीतून दळून आणा अथवा घरी मिक्सरवर पण मेतकूट दळता येते. मेतकूट खूप दिवस टिकते.

मऊभातावर मेतकूट व साजूक तूप घालून छान लागते. शिवाय भडंगमध्ये पण घालतात. आयत्यावेळची चटणी पण होते. मेतकूटामध्ये बारीक कांदा चिरून घाला. चवीनुसार मीठ व थोडी साखर घाला. नंतर दह्यामध्ये घालून ढवळा. आवडत असल्यास वरून फोडणी घाला.

Saturday, March 20, 2010

सजावट (१३)



लाल मुळा, गाजर, कोथिंबीर

गाजर लालमुळा कोशिंबीर



जिन्नस :

गाजर अर्धी वाटी किसून
लाल मुळा अर्धी वाटी किसून
लाल तिखट चिमूटभर
थोडी कोथिंबीर चिरून
दही ५-६ चमचे
साखर पाव चमचा
मीठ चवीपुरते

वरील सर्व जिन्नस एकत्र करून चमच्याने एकसारखे करा.

Tuesday, March 02, 2010

कढी



जिन्नस

आंबट ताक २ पेले
अर्धी मिरची चिरून
बारीक चिरलेले आले पाव चमचा
साखर २ चमचे
डाळीचे पीठ २-३ चमचे
थोडी चिरलेली कोथिंबीर १ चमचा
ओल्या नारळाचा खव १ चमचा
तेल २ चमचे
मोहरी, जिरे, हिंग, हळद
लाल तिखट चिमुटभर
मीठ चवीपुरते

मार्गदर्शन : एका पातेल्यात आंबट ताक घाला. आंबट ताकामध्ये डाळीचे पीठ नीट कालवून घ्या. गुठळी होऊन देऊ नका. नंतर त्यात साखर व मीठ घालून ढवळा. हे मिश्रण मध्यम आचेवर तापत ठेवा. दुसरीकडे एक कढलं तापत ठेवा. चांगले तापले की त्यात थोडे तेल घाला. तेल तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग व हळद घाला. नंतर लगेचच त्यात मिरचीचे तुकडे, लाल तिखट व चिरलेले आले घालून ही फोडणी ताकामध्ये घाला. नंतर त्यात कोथिंबीर व ओला नारळाचा खव घाला. नंतर हे सर्व मिश्रण ढवळा व उकळा. गरम गरम कढी थंडीमध्ये प्यायला छान वाटते. गरम भाता बरोबर ही कढी छान लागते. आवडत असल्यास कढी उकळताना त्यात थोडे काकडीचे गोल काप घाला.

Saturday, February 27, 2010

गवार बटाटा



जिन्नसः

गवारीच्या शेंगांचे तुकडे ३-४ वाट्या
१ बटाटा (फोडी करून)
लाल तिखट १ चमचा
धनेजिरे पूड १ चमचा
गरम मसाला १ चमचा
मीठ
गूळ ५-६ चमचे
दाण्याचे कूट मूठभर
ओल्या नारळाचा खव ४-५ चमचे
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, हळद

क्रमवार मार्गदर्शन : कूकरमध्ये गवारीच्या शेंगांचे तुकडे शिजवून घ्यावे. शिजवताना त्यात थोडे पाणी घालावे. कूकर गार झाला की शिजलेल्या गवारीच्या शेंगा बाहेर काढा. त्यातले पाणी एका वाटीत काढून ठेवा. गॅसवर कढई मध्यम आचेवर तापत ठेवा. ती तापली की जरूरीपुरते तेल घालून ते तापवा व मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात शिजलेल्या गवारीचे तुकडे, बटाट्याच्या फोडी, लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला, मीठ व गूळ घाला. भाजी ढवळून घ्या. नंतर त्यात दाण्याचे कूट व खवलेला ओला नारळ घाला. शिजलेल्या गवारीच्या शेंगेतले पाणी काढलेले आहे ते त्यात घाला. जरूर वाटल्यास अजूनही थोडे पाणी घालून भाजी थोडी उकळू दे. जास्त पाणी नको. ही भाजी थोडी ओलसर असावी. आवडत असल्यास थोडासा रस ठेवायला हरकत नाही. गवार ही चवीला खूप उग्र असते त्यामुळे त्याला गूळही बराच घालावा लागतो. तिखट गूळ व बाकीचा मसाला थोडा जास्तच घालावा लागतो तरच ही भाजी चविष्ट लागते.या भाजीत बटाट्यासारखे लाल भोपळ्याचे तुकडेही छान लागतात.

Sunday, January 10, 2010

सेलेरी


जिन्नस :

सेलेरी चिरलेली ४ वाट्या
लाल तिखट १ चमचा
धनेजिरे पूड १ चमचा
मीठ चवीपुरते
थोडी साखर
डाळीचे पीठ
तेल
मोहरी, हिंग, हळद

क्रमवार मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात तेल घालून तेही पुरेसे तापले की त्यात मोहरी, हिंग हळद घालून त्यात चिरलेली सेलेरी घालून परता. झाकण ठेवून २-४ मिनिटांनी काढून परत एकदा भाजी परता. भाजी शिजली की त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ व साखर घालून परत एकदा परता व वाफ द्या. नंतर त्यात अगदी थोडे डाळीचे पीठ घालून ढवळा. ही भाजी थोडी चरचरीत लागते. पण एक वेगळी चव छान आहे. त्याच त्याच भाज्या करून कंटाळा येतो म्हणून ही वेगळ्या चवीची भाजी अधून मधून करायला हरकत नाही.