Showing posts with label लोणचे. Show all posts
Showing posts with label लोणचे. Show all posts

Thursday, March 07, 2013

खारातल्या मिरच्या



जिन्नस :

हिरव्या मिरच्यांचे तुकडे २ वाट्या
हळद ४ चमचे
हिंग पूड १ चमचा
मेथी पूड १ चमचा
मोहरीची डाळ अथवा मोहरीची पूड अर्धी वाटी
लिंबाचा रस पाव वाटी
मीठ १० ते १२ चमचे
तेल फोडणीसाठी अर्धी वाटी
मोहरी, हिंग, हळद
वर दिलेले मसाले तळण्यासाठी तेल ५ ते ६ चमचे

मार्गदर्शन : हिरव्या मिरच्या धुवून कोरड्या फडक्याने पुसून घ्या. मिरच्या एकदम कोरड्या झाल्या पाहिजेत. मिरच्यांची देठे काढा व मिरच्यांचे छोटे तुकडे करा. ते तुकडे एका ताटात घालून त्यात मोहरीची डाळ अथवा पूड घाला. चमच्याने मिश्रण एकसारखे करून ताटाच्या एका साईडला करून ठेवा. आता मध्यम आचेवर एक कढले तापत ठेवा. ते तापले की त्यात १ ते २ चमचे तेल घालून मेथी पावडर थोडी परतून घ्या. ही मेथी पावडर मिरच्यांच्या ताटात एका बाजूला काढून घ्या. आता परत कढले गॅस वर ठेऊन परत त्यात थोडे तेल घाला व हळद घालून परतून घ्या. परतलेली हळद त्याच ताटात बाजूला काढून घ्या. याचप्रमाणे हिंगही परतून घ्या. आता त्याच कढल्यात अर्धी वाटी तेल घाला. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा व गॅस बंद करा. ही फोडणी पूर्णपणे गार होऊ देत. मिरच्या व बाजूला परतलेले मसाले ज्या ताटात आहेत ते सर्व एकत्र कालवा. नंतर त्यात मीठ घाला व लिंबाचा रस घाला. आता परत हे मिश्रण हाताने/चमच्याने कालवून घ्या व ते एका बाटलीत भरा. गार झालेली फोडणी कालवलेल्या मिरच्या ज्या बाटलीत भरल्या आहेत त्या बाटलीत घाला.

गरम गरम आमटी भात, पिठले भात, शिवाय गोडाचा शिरा, पोहे, थालिपीठ या सर्वाबरोबर अधुनमधून खायला या खारातल्या मिरच्या खूप छान लागतात. तोंडाला खूप छान चव येते.

टीप : कमी तिखट असलेल्या मिरच्या घ्या.

Tuesday, April 26, 2011

कैरीचे लोणचे






जिन्नस :

१ मोठी कैरी
२ चमचे लाल तिखट
२ चमचे हळद
अर्धा चमचा मेथी पावडर
पाव चमचा हिंग पावडर
मोहरीची डाळ ४ चमचे
मीठ ३-४ चमचे
तेल
फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद

क्रमवार मार्गदर्शन : कैरी धूवून घ्या व कोरड्या फडक्याने पुसून घ्या. नंतर त्याच्या बारीक फोडी करा. फोडींवर थोडी हळद व मीठ घालून थोडे ढवळून ठेवा. नंतर मध्यम आचेवर कढलं तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात २-३ चमचे तेल घालून त्यात लाल तिखट घालून थोडे परतून घ्या. परतल्यावर एका ताटलीते ते मिश्रण ओता. मग परत तेल घालून त्यात हळद, नंतर हिंग व मेथी वेगवेगळे तेल घालून परतून घ्या व असेच लाल तिखटाप्रमाणे एका ताटलीत काढून ठेवा. मोहरीची डाळ काढून घ्या त्याच ताटलीत. ही डाळ परतायची नाही. मोहरीची डाळ नसेल तर मोहरी भाजून घेऊन ती मिक्सरवर बारीक करून घ्या.

आता हे सर्व मिश्रण व कैरीच्या फोडी मीठ घालून ढवळून घ्या व एका बरणीत घाला. पाव ते अर्धा वाटी तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा. ही फोडणी पूर्ण गार झाली की तयार झालेल्या मिश्रणात (कैरी व मसाला) ओतून ढवळा. हे लोणचे पोळी व गरम आमटीभाताबरोबर खूप छान लागते.

फोटोतील लोणच्यामध्ये मोहरीची डाळ घातलेली नाही. ती घातली नाही तरी चालते.

Monday, July 12, 2010

गोड लिंबू लोणचे



वाढणी: २ जण

पाककृतीला लागणारा वेळ: १५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

* लिंबू ६ (हिरव्या/पिवळ्या सालीचे)
* लाल तिखट पाव वाटी
* मीठ 1 वाटी
* साखर दोन वाट्या
* जीरे पूड अर्धा चमचा

क्रमवार मार्गदर्शन:

६ पैकी ५ लिंबाच्या प्रत्येकी चार किंवा आठ फोडी करून त्यात लाल तिखट, मीठ, साखर व जीरेपूड घालून चमच्याने ढवळा/एकत्रीत करा. या मिश्रणाची चव घेऊन जे काही कमी वाटत आहे (तिखट, मीठ साखर) त्याप्रमाणे अजून थोडे घालून ढवळा. नंतर काचेच्या बरणीमधे हे तयार झालेले लोणचे भरून ठेवा. बाटलीमधे भरल्यावर एक लिंबू चिरून त्याचा रस लोणच्यामधे पिळावा. लिंबाच्या फोडी मुरायला बराच वेळ लागतो पण लोणच्याचा खार २-४ दिवसात तयार होतो.

हे लोणचे उपासाला चालते. शिवाय मेतकूट-तूप-भात याबरोबर खायलाही छान लागते.

Thursday, November 01, 2007

भाज्यांचे लोणचे






वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

गाजराच्या फोडी २ वाट्या
फ्लॉवरची फुले २ वाट्या
लाल/काळी मोहरी ५-६ चमचे, लाल तिखट २ चमचे
हळद २ चमचे, हिंग पावडर अर्धा चमचा
मेथीचे दाणे २५-३०, मीठ चवीपुरते,
लिंबू अर्धे
फोडणीकरता मोहरी,हिंग, हळद, व अर्धी वाटी तेल

क्रमवार मार्गदर्शन: आदल्या दिवशी संध्याकाळी गाजराच्या व फ्लॉवरच्या फोडी मीठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व पाणी काढून रोवळीमधे भाज्या निथळत ठेवा. नंतर २ तासाने कॉटनवर सर्व चिरलेल्या भाज्या पसरून ठेवा म्हणजे सर्व पाणी शोषून घेतले जाईल. कढल्यात मोहरी व मेथीचे दाणे थोडे भाजून घ्या व ते मिक्सरमधून बारीक करून एका ताटलीत ठेवा. नंतर परत थोडे कढल्यात तेल घालून ते तापले की त्यामध्ये लाल तिखट, हळद, व हिंग पावडर घालून अगदी थोडे परतून ज्या ताटलीत मोहरीपावडर ठेवलेली आहे त्यात बाजुला घाला. हे मिश्रण गार झाले की मग त्यामधे कोरड्या झालेल्या भाज्या घालून त्यात चवीपुरते मीठ व लिंबू पिळून एकत्र कालवा. त्यानंतर नेहमीप्रमाणे तेलात फोडणी करून ती एकदम गार झाली की तयार झालेल्या लोणच्यामधे ओता. त्याआधी तयार झालेले लोणचे काचेच्या बाटलीत भरून ठेवा.


या लोणच्यात मी फक्त गाजर व फ्लॉवर घेतले आहेत. बाकीच्या भाज्या पण घालायच्या आहेत. मटार, ओले हरबरे, ओली हळद, मुळा. ज्याप्रमाणे भाज्या आवडत असतील त्याप्रमाणे घ्याव्यात. हे लोणचे मी पहिल्यांदाच केले आहे त्यामुळे अंदाजाने लोणच्याचा मसाला घेतला आहे. अजून थोडा चालू शकेल असे वाटते.

माहितीचा स्रोत:सौ आई

अधिक टीपा:
हे लोणचे हिवाळ्यात जेव्हा भरपूर भाज्या असतात तेव्हा घालावे म्हणजे उन्हाळ्यात उपयोगी पडते.