Tuesday, November 25, 2008

बदाम बर्फीजिन्नस :


बदाम २ वाट्या
दूध थोडेसे
साखर २ वाट्या
साजूक तूप २ चमचे


क्रमवार मार्गदर्शन :


बदाम गरम पाण्यात भिजत घाला. दोन तासानंतर त्याची साले सोला. हे खूप किचकट काम आहे. नंतर बदाम, साखर व थोडे दूध घालून मिक्सर/ब्लेंडर वर त्याची खूप बारीक पेस्ट करा. बदाम बारीक होऊन एकजीव होण्याइतकेच दूध घालावे. नंतर मध्यम आचेवर कढई ठेवून त्यात २ चमचे तूप घाला व बदामाची बारीक केलेली पेस्ट घालून मिश्रण कालथ्याने ढवळावे. आता थोडी आच वाढवावी. एकसारखे ढवळत राहावे. काही वेळाने मिश्रण आटायला लागेल व त्याचा गोळा बनायला लागेल. याचवेळी गॅस बंद करा. मिश्रण खाली उतरवा व बराच वेळ कालथ्याने घोटा. काही वेळाने गोळा अजून थोडा घट्ट होईल. एका थाळीला तूपाचा हात लावा व हे मिश्रण त्यावर ओता. सर्व बाजूने एकसारखे थापा. थापताना प्लॅस्टीकचा तूपाचा हात लावलेला पसरट कागद वापरा. मिश्रण गार झाले की वड्या कापा.

Tuesday, November 18, 2008

सुरळीची वडी
जिन्नस:

हरबरा डाळीचे पीठ १ वाटी
पाऊण वाटी आंबट ताक,
सव्वा वाटी पाणी
१ चमचा मैदा
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या (कमी तिखट असलेल्या)
बारीक चिरलेली कोथिंबीर
नारळाचा खव
किंचित लाल तिखट व हळद, चवीपुरते मीठ
किंचित साखर
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळदमार्गदर्शन:वाटीभर तेलाची फोडणी करून घ्या. बारीक चिरलेल्या मिरच्या , कोथिंबीर आणि नारळाचा खव 3-4 वाट्या करा. त्यात चवीपुरते थोडे मीठ व थोडी साखर घाला.डाळीचे पीठ, आंबट ताक, मैदा व पाणी एकत्र करून हाताने कालवावे. त्यात अगदी थोडे तिखट, हळद व चवीपुरते मीठ घाला. पीठ कालवताना पीठाच्या छोट्या गुठळ्या होतात त्या हाताने पूर्णपणे मोडून काढा. नंतर हे एकसंध झालेले मिश्रण एका कढईत घालून गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. कालथ्याने हे मिश्रण सतत ढवळावे लागते. काही वेळाने हे मिश्रण शिजेल. शिजल्यावर त्यावर एक झाकण ठेवा व आच मंद करा. २-३ मिनिटांनी झाकण काढून परत सर्व मिश्रण एकसारखे करा. आता हे मिश्रण पूर्णपणे शिजलेले असेल. गॅस मंद ठेवा.2 मध्यम आकाराची स्टीलची ताटे उपडी करा व त्यावर प्रत्येकी थोडे मिश्रण घाला. एकावेळी एका ताटावर थोडेसे मिश्रण घालून त्यावर थोडे तेल लावलेला प्लॅस्टीकचा पसरट कागद ठेवून अगदी हलक्या हाताने लाटण्याने लाटा. सर्वबाजूने एकसारखे पातळ लाटा. याप्रमाणे 2 - 3 ताटे करून घ्या. मिश्रण गरम असतानाच लाटले जाते म्हणून एका वेळी एक ताट. तोवर बाकीचे मिश्रण कढईतच ठेवा मंद आच करून.


आता सुरीने उभे कापून वड्या पाडाव्या. नंतर त्यावर मिरच्या कोथिंबीर व नारळाचा खव सर्व बाजूने घाला. शिवाय तयार केलेली फोडणीही घाला. प्रत्येक पट्टी अलगद हाताने गुंडाळी करून एक गोल वळकटी करा. वळकटीसारख्या गोल केलेल्या वड्या म्हणजेच सुरळीच्या वड्या.

त्यावर परत थोडी फोडणी व खवलेल्या ओल्या  नारळाचे  तयार केलेले सारणही घाला. 


Monday, November 10, 2008

आले वडी
जिन्नस :किसलेले आले २ वाट्या
साखर २ वाट्या
ricotta cheese (fat 9g) पाऊण वाटी
साजूक तूप २ चमचे

क्रमवार मार्गदर्शन:


एका पातेल्यात साखर व किसलेले आले एकत्र एकसारखे करून घ्या. नंतर मध्यम आचेवर कढई ठेवा. ती तापली की त्यात थोडे साजूक तूप घाला व एकत्रित केलेले आले व साखर यांचे मिश्रणही घाला. हळूहळू साखर वितळायला लागेल. आता आच थोडी वाढवा. काही वेळाने साखर वितळून हे मिश्रण उकळायला लागेल. हे मिश्रण शिजत आले की ricotta cheese घाला व कालथ्याने एकसारखे ढवळा. काही वेळाने हे सर्व मिश्रण शिजून कोरडे पडायला लागेल व गोळा बनायला लागेल. अधूनमधून कालथ्याने ढवळत रहा. थोड्यावेळाने गॅस बंद करून हे मिश्रण थोडे कालथ्याने घोटून घ्या व नंतर लगेच एका ताटलीत काढा. या ताटलीला आधी थोडा तूपाचा हात लावून घ्यावा. ताटलीत मिश्रण ओतल्या ओतल्या त्यावर तूपाचा हात लावलेला एक पसरट प्लॅस्टीकचा कागद ठेवून सर्वबाजूने एकसारखे थापून घ्या. नंतर गरम असतानाच कालथ्याने वड्या कापा. हे मिश्रण खूप गार झाले की वड्या काढून डब्यात ठेवा.