Wednesday, July 30, 2008

साबुदाणा खिचडी

साबुदाणा खिचडी! वा! प्रत्येकाला आवडणारी, माझी तर अत्यंत लाडकी. मी तिला साखी म्हणते. लहानपणीच हिची ओळख झाली. माझ्या माहेरी आईचा दर सोमवारचा उपवास असायचा त्यामुळे दर सोमवारी आई खिचडी करायची. दुपारची १२ ची शाळा ,त्यामुळे सकाळी साडेदहाला जेवायचो. त्यादिवशी सकाळपासून सगळे लक्ष त्या खिचडीकडे! केव्हा एकदा जेवायची वेळ होते आणि कधी एकदा खिचडी खायला मिळते. पोळी भाजीच्या जेवणामध्ये नैवेद्यासारखी खिचडी मिळायची, तेव्हापासून खिचडीची फॅन आहे.
एकदा आम्ही सगळ्या मामे-मावस बहिणी एकत्र जमलो होतो, आणि आम्हाला खिचडी खायची इच्छा झाली. माझी मोठी मामेबहीण आईला म्हणाली, "आत्या तू आज नको करूस खिचडी, मी करते. " हो हो. आणि खूप तिखट कर गं! लाल तिखट घाल भरपूर! असा आमच्या सगळ्या जणींचा आग्रह! ८-१० वाट्यांचा साबुदाणा भिजलेला, मग तो कालवून त्यात लाल तिखट घालतोय, घालतोय! आणि मजा म्हणजे त्या तिखटाला रंग नव्हता पण चव जाम तिखट होती, त्यामुळे आम्हाला कल्पनाच आली नाही की किती तिखट झाली आहे ते! खिचडी बनवली आणि खाल्ली मात्र....... बापरे! जहाल तिखट!! तोंड पोळणे ज्याला म्हणतात ते आम्ही त्यादिवशी अनुभवले आणि सगळा हिरमोड झाला.
नंतर इथे अमेरिकेत आल्यावर असाच एक मजेशीर अनुभव आला. माझ्या मैत्रिणीकडे साबुदाणा होता आणि मला म्हणाली, तुला येते साबुदाणा खिचडी? हो येते की! मी म्हणाले. त्या दिवशी चतुर्थी होती. मला म्हणाली की मी इथे अमेरिकेत आल्यापासून खिचडी खाल्लीच नाही, कारण मला करता येत नाही, त्यामुळे आज भरपूर खिचडी खाऊ. मी पण अगदी लांबलचक हो...... मस्त! खाऊ की! खिचडी केली. गरमगरम खायला घेतली आणि....... पहिल्या घासालाच दोन दाढांमध्ये इतकी काही चिकटली! खाताच नाही आली आम्हांला. आता याचे काय करायचे? दुधाचा, ताकाचा हबका मारून थोडी मुरवली आणि वाफा देऊन परत शिजवली तरी जैसे थे! साबुदाणा अजिबातच चांगला नव्हता. असा दुसऱ्यांदा हिरमोड झाला.
खिचडी अनेक प्रकारे करता येते. माझी आईची स्पेशालिटी म्हणजे ती हिरव्या मिरच्या कुटून घालते तूप जिऱ्याच्या फोडणीमध्ये. साजूक तुपातली तर लाजवाब होते. नुसती लाल तिखट घालून पण मस्त लागते. काकडी किसून पण घालतात, कांदा घालतात. अशी ही खिचडी माझ्या अत्यंत आवडीची!!!!

Tuesday, July 22, 2008

तेलतिखटमीठपोहे


पातळ पोहे २ मुठी चाळून निवडून घ्या. त्यात अर्धी मूठ भाजलेले शेंगदाणे, मूठभर बारीक चिरलेला कांदा, अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट, चवीपुरते मीठ, ५-६ चमचे कच्चे तेल, पाव चमच्याहून कमी साखर घालून हाताने कालवून घ्या. चमचमीत पोहे तय्यार!!

Saturday, July 19, 2008

सजलेले पोहे






वाढणी:२ जण



पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे



पाककृतीचे जिन्नस:



जाड पोहे अडीच वाट्या, चिरलेला कांदा १ वाटी
बटाट्याचे त्रिकोणी पातळ काप अर्धी वाटी
भाजलेले दाणे अर्धी वाटी, मटार अर्धी वाटी,
चिरलेली कोथिंबीर व ओला नारळ पाउण वाटी
साखर, मीठ, तेल अर्धी वाटी, अर्धा चमचा लाल तिखट
मोहरी, हिंग, हळद, हिरव्या मिरच्या १-२



क्रमवार मार्गदर्शन:




सर्वात आधी पोहे चाळून व निवडून पाण्याने धुवून घ्या व ते पाणी निथळण्यासाठी रोळीमध्ये ठेवा. कढईत तेल मध्यम आचेवर तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी, हिंग, व हळद घालून फोडणी करा. नंतर लगेच लाल तिखट घालून बाकीचे सर्व जिन्नस (कांदा, बटाटा, मटार, मिरच्यांचे तुकडे) घालून परता. नंतर त्यावर झाकण ठेवा व १-२ मिनिटांनी झाकण काढून परत ढवळा. असे १-२ वेळा करा म्हणजे कांदा बटाटा वगैरे सर्व नीट शिजेल. शिजले की त्यात कोथिंबीर व ओला नारळ घालून परत परता व गॅस बारीक करा. नंतर त्यात भिजवून ठेवलेले पोहे घालून चांगले ढवळा. नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ व अर्धा चमचा साखर घालून परत चांगले ढवळा. आता परत त्यावर झाकण ठेवा १-२ मिनिटे म्हणजे पोहे पण वाफेवर शिजतील. नंतर झाकण काढून परत एकदा ढवळा. आणि गरम गरम डीश मध्ये खायला द्या.


Wednesday, July 16, 2008

साबुदाण्याची खिचडी




वाढणी:२ जण


पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे


पाककृतीचे जिन्नस:


१ वाटी चांगल्या प्रतीचा साबुदाणा
दाण्याचे कूट मूठभर, १ छोटा बटाटा
हिरवी मिरची १-२, लाल तिखट पाउण ते १ चमचा
जिरे १ चमचा, साजूक तूप/तेल ५-६ चमचे
मीठ, साखर, चिरलेली कोथिंबीर २-३ चमचे
खवलेला ओला नारळ २-३ चमचे


क्रमवार मार्गदर्शन:


साबुदाणा पाण्याने धुवून २-३ तास भिजत घालावा. थोडेसे पाणी राहू द्या म्हणजे जास्त चांगला भिजेल. कच्चा बटाट्याची साले काढून त्याचे काचऱ्या चिरतो तसे पातळ काप करून पाण्यामध्ये घाला. मध्यम आचेवर कढई ठेवा. त्यात तेल/साजूक तूप घालून ते पूरेसे तापले म्हणजे त्यात जिरे घाला, ते तडतडले की त्यात मिरच्यांचे चिरलेले तुकडे घाला व पातळ चिरलेला बटाटा घाला व परता. बटाटा घालताना त्यातले पाणी काढून टाका. त्यावर १-२ मिनिटे झाकण ठेवून बटाटे वाफवून घ्या. ते शिजले की त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर व खवलेला ओला नारळ घालून परत परता. आता गॅस मंद करा. त्यात थोडेसे मीठ पेरून परत थोडे परता. आता भिजवलेला साबुदाणा आहे तो हाताने मोकळा करून घ्या. त्यात लाल तिखट,चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा साखर व दाण्याचे कूट घालून चांगले ढवळून घ्या. व हे ढवळलेले मिश्रण कढईत घालून सगळीकडून खिचडी चांगली ढवळा. नंतर त्यावर झाकण ठेवून १-२ मिनिटे वाफवून घ्या. असे एक दोन वेळा करा, म्हणजे साबुदाणा चांगला शिजेल व त्याचा रंगही बदलेल. कालथ्याने खिचडी परत परत व्यवस्थित ढवळा म्हणजे मोकळी होईल. गोळा होणार नाही. तेल/तूप कमी वाटले तर वरून थोडे घालून ढवळणे.


साबुदाणा भिजवल्यावर दर अर्ध्या तासाने मोकळा करून घ्या. दोन बोटांच्या चिमटीत साबुदाणा धरून तो व्यवस्थित भिजला आहे ना याची खात्री करून घ्या. भिजला नसेल तर थोडासा पाण्याचा हबका मारून त्यावर परत झाकण ठेवा.


खिचडी सर्वात चविष्ट साजूक तूपातील होते.

Tuesday, July 15, 2008

तेलतिखटमीठपोहे

तेल तिखट मीठ पोह्यांची ओळख मला माझ्या लहानपणी झाली. आम्ही लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत मामाकडे रहायला जायचो. माझी मामी सकाळी धुणे धुवायला जायची. ती धुण्याला गेली की आमच्या भावंडांचा खादडीचा कार्यक्रम सुरू. एकदा असेच झाले माझा मोठा मामेभाऊ म्हणाला आज मी एक फर्स्टक्लास डीश बनवतो. तुम्ही दोघींनी मला पोहे चाळून द्या. मग एक मोठी परात घेतली. त्यात पातळ पोहे चाळून निवडून ठेवले. एका मामेभावानी मोठ्या धारदार सुरीने एकदम बारीक कांदा चिरला, तो त्यात घातला. मग एकाने भरपूर लाल तिखट , चवीपुरते मीठ व कच्चे दाणे घातले. आणि हो, चवीपुरती साखरही घातली, त्याशिवाय या पोह्यांना गोडी येत नाही. मी म्हणाले अय्या! आता काय करायच? हे असं कच्चंच खायच? मामेभाऊ म्हणाला हो मग! यातच खरी मजा आहे. तु खाऊन तर बघ. मग पूरेसे कच्चे गोडंतेल घालून पोहे कालवले व प्रत्येकाने वाडग्यात भरून खायला घेतले. अहाहा!! इतके चमचमीत झाले होते म्हणून सांगू!!


नंतर आम्ही दोघी बहीणी हे असे पोहे नेहमी करून खायला लागलो. आई बाहेर मंडईत गेली की आमचे आजोबा व आम्ही दोघी बहिणी हे असे पोहे करून खायचो. माझ्या आजोबांना पण हे झणझणीत पोहे खूप आवडायचे. त्यांना पण इतकी सवय झाली होती या पोह्यांची की आई बाहेर गेली की तेच आपणहून म्हणायचे ते तुमचे झणझणीत पोहे करा बरं! मला खूप भूक लागली आहे. जेव्हा लेखी अभ्यास करायचो म्हणजे प्रश्न उत्तरे लिहिणे की मांडीवर उशी त्यावर पुस्तक वही व बाजूला अधून मधून तोंडात टाकायला या पोह्यांचा वाडगा!!


हे पोहे मी जेव्हा जेव्हा करून खाते तेव्हा तेव्हा माझ्यामध्ये एक प्रकरचा उत्साह संचारतो!!

Monday, July 14, 2008

प्रस्तावना

आत्तापर्यंत माझ्या ७५ पाककृती लिहून झाल्या. प्रत्येक पाककृतीमागे माझ्या काही आठवणी जडलेल्या आहेत. काही पाककृती आईकडून शिकल्या आहेत. काही मित्रमैत्रिणींकडून माहिती झाल्या आहेत तर काही माझ्या मीच तयार केलेल्या आहेत तर काही निरिक्षण करून बनवलेल्या आहेत. प्रत्येक पाककृतीमधे काहीना काही दडलेले आहे. काहींमध्ये त्यामागचा इतिहास, तर काहींमध्ये आठवणी व कुतुहलही आहे. माझ्या पाककृतींची अशा प्रकारे केलेली ओळख तुम्हाला वाचून नक्की आवडेल याबद्दल खात्री आहे.