Thursday, October 28, 2010

बटाटेवडे

माझ्या बाबतीत बटाटेवडे बनवणे म्हणजे म्हणता ना 'किस झाड की पत्ती! ' किंवा 'बाए हाथ का खेल' अगदी तसेच आहे. बटाटेवडे करायला मला कधीच कंटाळा आला नाही आणि येणारही नाही. बटाटावडा हा माझा सर्वात आवडता आहे, तसा तो कधी कुणाला आवडला नाही असे ऐकीवात नाही.बटाटेवडे कसे करायचे असे मी कधी कोणाला विचारले नाही. खूप आवडीचा पदार्थ असल्याने आई कसे वडे बनवत ते पाहून कॉलेजमध्ये असतानाच आम्ही दोघी बटाटेवडे करण्यात तरबेज होतो. कधीही पटकन मनात आले की करायचे का बटाटेवडे! असे एकमेकींना विचारत असू. बटाटेवडे असे म्हणायचाच अवकाश की तासाच्या आत आम्ही दोघी बहिणी गरम गरम बटाटेवडे खायला सुरवात करायचो. जलद चित्रफीत कशी चालते अगदी तसेच व्हायचे आम्हा दोघींचे. एकजण कुकराला बटाटे उकडत ठेवायचो गॅस मोठा करून. दुसरी लसूण सोलून, मिरच्या आले लसूण वाटून तयार ठेवायची. कुकराची वाफ मुरून ते बटाटे बाहेर काढले जायचे. कुकराचे झाकण पटकन उघडले गेले नाही तर राग यायचा. किती मुरायला वेळ! झाकण सैल करून कुकराची शिट्टी वर करून फूऽ‌ऽस असा आवाज येऊन वाफ बाहेर यायची की झाकण पटकन पडायचे! गरम गरम बटाटे साणशीने एकेक करत पकडून रोळीत ठेवायचो. रोळी लगेच गार पाण्याच्या नळाखाली! तरीही बटाटे इतके काही गरम असायचे! फडक्यात एकेक बटाटा ठेवून साले काढायचो. एकीकडे तोंडाने फुंकर! हाताला खूप चटके बसायचे. खूप गरम बटाटे चमच्याने बारीक करायचो. ते करेपर्यंत एक जण खूप बारीक कांदा चिरायची. लाल सालींचे कांदे व हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून बटाटेवड्याचे सारण तयार होईतो एकजण डाळीचे पीठ भिजवायची. कढईत तेल घालून तापले रे तापले की बटाटेवडे तळून ते ताटलीत घालून गरम गरम, तिखट तिखट, हायहुई करत बटाटेवडे खायचो. असे गरम गरम व तिखट तिखट बटाटेवडे खाल्ले ना की तोंडाला जी चव येते ती काही औरच!

भारतात असताना कंपनीने दिलेल्या घरात जेव्हा राहायला गेलो तेव्हा मला 'पॉटलक' हा प्रकार माहिती झाला. पहिल्या पॉटलकच्या वेळी मला माझ्या आवडीचा पदार्थ करायला मिळाला नाही. बाहेरगावी गेलो होतो. परत आल्यावर पॉटलक असल्याचे कळले व माझ्याकडे कोणीच न घेतलेला पदार्थ आला तो म्हणजे 'पुरी' ७० ते ८० पुऱ्या बनवल्या होत्या. दिवाळीच्या वेळी मला मैत्रिणीने सांगितले ' तू तुझ्या आवडीचा पदार्थ आधीच सांगून ठेव' मला माझ्या आवडीचा पदार्थ आणि तोही मोठ्या प्रमाणात बनवण्याची संधी आली आणि तो पदार्थ म्हणजे बटाटेवडे! कोणाचीही मदत न घेता एकटीने ७० ते ८० वडे बनवले. मला कोणी मदतीला येऊ का? असे विचारले तर मी सरळ 'नाही' असे सांगते कारण की माझा खूप गोंधळ होतो. लसूण सोलण्यापासून ते मोठ्या डब्यात बटाटेवडे भरण्यापर्यंत सगळे एकटीने केले. त्यातला एकही वडा घरी परत आला नाही. मला खूप आनंद झाला होता त्यावेळी.

दुसरे पॉटलक अमेरिकेत आलो तेव्हा त्या वर्षाअखेरीस झाले. नववर्ष साजरे केले तेव्हा. त्यावेळीही असेच ७०-८० बटाटेवडे बनवले होते. तेलगू कुटुंबे होती. त्यांना हा मराठी पदार्थ खूप आवडला. तिसऱ्या पॉटलकच्या वेळी उत्तर भारतीय कुटुंबे होती. त्यात एक मुसलमान जोडपे होते, इक्बाल फरहाना. जेव्हा एकत्र जेवणावळी होत तेव्हा फरहाना मला म्हणायची 'आप वो बटाटा करके लाइए. बटाटेवड्यांना ती बटाटा म्हणायची.

Thursday, October 14, 2010

भरडा वडे भाजणीभरडा वडे भाजणी

जिन्नस:

हरबरा डाळ २ वाट्या
तांदुळ १ वाटी
उडदाची डाळ १ वाटी
पाव वाटी तुरीची डाळ
पाव वाटी मुगाची डाळ
गहू पाव वाटी
जिरे पाव वाटी

वरील सर्व जिन्नस जाडसर दळून आणा.

Wednesday, October 13, 2010

थालिपीठाची भाजणीजिन्नस :

ज्वारी २ पेले
बाजरी २ पेले
तांदुळ २ पेले

याच्या निम्मे डाळी

हरबरा डाळ दीड पेला
उडदाची डाळ दीड पेला

अर्धा पेला गहू
धने १ पेला

मधम आचेवर कढई ठेवा व वरील सर्व जिन्नस भाजून घ्या. गार झाले की गिरणीतून जाडसर दळून आणा.

Monday, October 04, 2010

बटाटा भाजीजिन्नस :

बटाटे ३-४
पाऊण कांदा
३-४ मिरच्या
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा धनेजिरे पावडर
मीठ
साखर
तेल
मोहरी, हिंग, हळद (फोडणीसाठी)

क्रमवार मार्गदर्शन : बटाटे कूकरमध्ये उकडून घ्या. गार झाले की त्याची साले काढून मध्यम आकाराच्या फोडी करा. कांदाही मध्यम आकाराच्या फोडी करून चिरा. मिरच्यांचे तुकडे करा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात जरूरीपुरते तेल घाला. तेल तापले की त्यात मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात मिरच्यांचे तुकडे व चिरलेला कांदा घाला. परतून घ्या. त्यावर झाकण ठेवा. नंतर काही सेकंदाने झाकण काढा व परत थोडे परता. असे दोन तीन वेळा करा. कांदा कच्चा राहता कामा नये. कांदा शिजला का नाही हे पाहण्यासाठी कालथ्याने शिजलेल्या कांद्यावर थोडे टोचून पहा. कांदा कालथ्याने तुटला की तो शिजला असे समजावे. नंतर त्यात चिरलेले बटाटे घाला व परतून घ्या. ढवळा. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड व चवीप्रमाणे मीठ घाला. थोडी साखर घाला. नंतर परत हे सर्व मिश्रण नीट सर्व बाजूने ढवळा. आता परत झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून परत थोडे परता. असे दोन तीन वेळा करा. गॅस बंद करा. भाजीवर झाकण ठेवा. वाफेवर ही भाजी चांगली शिजली की चविष्ट लागते.

या भाजीत कांदा जास्त घालावा म्हणजे डोशाबरोबर बटाट्याची भाजी देतात तशी लागते. वाढताना त्यावर थोडी चिरलेली कोथिंबीर व ताजा खवलेला नारळ घाला. या भाजीत कडीपत्त्ता घातल्यास जास्त चांगली चव येते. कडीपत्ता फोडणीत घालावा.