Thursday, December 11, 2014

सणाला सजवलेली ताटे
ही सर्व ताटे नैवेद्याची आहेत. वर्षभरातील सणांना सजवलेली आहेत. सण आहेत दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, श्रावणी शुक्रवार.

Wednesday, August 06, 2014

तुरीच्या डाळीचे वडेजिन्नस :
तुरीची डाळ २ वाट्या
तांदुळ २ चमचे
आले एक छोटा तुकडा
कडिपत्ता १० ते १२ पाने
अगदी थोडी हळद
मीठ

मार्गदर्शन : तुरीची डाळ आणि तांदूळ पाण्यामध्ये ७ ते ८ तास भिजत घाला. नंतर मिक्सर - ग्राइंडर वर वाटा. वाटतानाच त्यात आल्याचे तुकडे घाला. वाटताना जरूरीपुरतेच पाणी घालावे व डाळ भरड वाटावी. नंतर हे मिश्रण एका पातेल्यात काढून त्यात चवीप्रमाणे मीठ व थोडी हळद घाला व कडिपत्याची पाने हातानेच अर्धी करून घाला. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात वडे चांगले तळले जातील इतपत तेल घाला व ते तापले की त्यात वडे घालावेत व खरपूस रंग येईपर्यंत तळावेत. कडीपत्ता वर दिसला पाहिजे इतका घाला. या वड्यात आल्याची व कडिपत्याचीच चव आहे. ही रेसिपी माझ्या मैत्रिणीची आहे. २००३ साली आम्ही ज्या शहरात राहत होतो तेव्हा माझ्या शेजारणीने हे वडे मला खायला दिले होते. तेव्हा आमची भारतासारखी पदार्थांची देवाणघेवाण चालायची. मी तिला बटाटेवडे दिले होते व तिने मला हे वडे ! त्याच वेळेला तिला रेसिपी विचारली होती पण मुहूर्त आज लागला.

Saturday, March 22, 2014

प्रसादाचा शिराजाड रवा १ वाटी
दीड वाटी दूध
अर्धी / पाऊण वाटी पाणी
१ वाटी साखर
केळ्याच्या चकत्या ५ ते ६
केशर ४ ते ५ काड्या
अर्धी वाटी साजूक तूप

मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात रवा व साजूक तूप घालून कालथ्याने परतायला सुरवात करा. रवा परतून थोडा रंग बदलायला लागेल. मग त्यात केळ्याच्या चकत्या घाला व अजून थोडे परता. रवा व केळ्याचे काप खमंग परतावेत. नंतर त्यात गरम करून थोडे कोमट झालेले दूध  व पाणी घाला. केशर गरम करून ते चुरडून दुधात घाला म्हणजे त्याचा रंग दूघात उतरेल आणि ते दूधही घाला. रवा कालथ्याने भराभर ढवळा त्यामुळे गुठळ्या होणार नाहीत. आता झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून परत रवा ढवळून घ्या. आता साखर घाला व परत एकदा ढवळा. आता परत थोडे हे मिश्रण पातळ होईल. आता परत झाकण ठेवा. म्हणजे शिरा चांगला शिजेल व साखरेशी एकरूप होईल. काही सेकंदाने झाकण काढा व परत ढवळा. आता प्रसादाचा शिरा तयार झाला आहे. गॅस बंद करा. हा शिरा चवीला खूप छान लागतो.

Tuesday, March 18, 2014

भाज्यांचे कसेडिया जिन्नस :
ब्रोकोली, पालक, कांद्याची पात, सिमला मिरची, झुकिनी स्वॅश, बटाटा, गाजर, टोमॅटो,
कांदा, लसूण, आले
किसलेले चीझ
टोमॅटो केचप
तेल अथवा लोणी
मिरपूड
मीठ
टॉर्टिया
बारीक चिरलेले लेट्युस, कांदा, टोमॅटो व कोथिंबीर

 मार्गदर्शन : वरील सर्व भाज्या बारीक चिरा.


 कांद्याची पात यातील खालचा भाग चिरून घ्यावा. हिरवी पात घेऊ नये कारण ती पटकन शिजत नाही व दातात येते. या सर्व चिरलेल्या भाज्या साधारण ४ ते ५ वाट्या होतील इतक्या चिरा. वर दिलेल्या भाज्यांपैकी तुम्हाला आवडतील तशा कमीजास्त प्रमाण घ्या अथवा अजून तुमच्या काही आवडीच्या भाज्या असतील त्या घेतल्या तरी चालतील. फक्त या भाज्या बारीक चिराव्या म्हणजे कमी तेलावर पटकन शिजतील. अर्थात या सर्व भाज्या थोड्या अर्धवट शिजलेल्याच ठेवायच्या आहेत. मध्यम आचेवर पसरट पातेले ठेवा व त्यात लोणी अथवा तेल घाला. भाज्या कोरड्या राहणार नाहीत पण शिजल्या पाहिजेत इतकेच तेल किंवा लोणी घाला. जास्त नको. तेल तापले/लोणी विरघळले की त्यात आधी बारीक चिरलेला थोडा कांदा व आले लसूण मिरच्यांची पेस्ट/पेस्ट नसेल तर खूप बारीक चिरून परता. नंतर त्यात चिरलेल्या भाज्या घालून कालथ्याने ढवळत रहा. बारीक चिरल्याने भाज्या पटकन शिजतात. आता गॅस बंद करा व त्यात मिरपूड व चवीपुरते मीठ घाला.


 थोड्या वेळाने  गॅसवर तवा ठेवा व मध्यम आचेवर लोणी अथवा तेल घालून टॉर्टिया दोन्ही बाजूने  भाजून घ्या. भाजताना त्यावर कालथ्याने थोडे प्रेस करा. टॉर्टिया फुगून येतील. आता गॅस खूप मंद ठेवा. टॉर्टियाच्या अर्ध्या भागावर केलेली भाजी पसरवून घ्या व त्यावर किसलेले चीझही पसरवून घ्या. आता उरलेली अर्धी पोळी त्यावर दुमडून ठेवा. आणि कालथ्याने प्रेस करा. आता परत थोडे तेल किंवा लोणी घालून दोन्ही बाजूने टॉर्टिया खरपूस भाजून घ्या. हा खरपूस भाजलेला टॉर्टिया एका ताटलीत काढा व त्याचे सुरीने दोन भाग करा.

एका छान डिशमध्ये दोन भाग केलेला टॉर्टिया घालून  त्यावर थोडे टोमॅटो केचप घालून व चिरलेली कोथिंबीर घालून खायला द्या. थोडे किसलेले चीझही घाला. सोबत लेट्युस व बारीक कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्या. ही एक पटकन होणारी डिश आहे.

Tuesday, March 11, 2014

नाचणी लाडू


जिन्नस :
नाचणीचे पीठ दीड वाटी
एक वाटी साखर (ग्रॅन्युलेटेड शुगर अथवा पीठीसाखर)
५ ते ६  चमचे साजूक तूप
अर्धी वाटी दाण्याचे कूट
अर्धी वाटी बदामाची पूड

मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की लगेच त्यात साजूक तूप व नाचणीचे पीठ घाला व कालथ्याने ढवळायला लागा. तूप जर कमी पडत असेल तर अजून थोडे घाला. नाचणीचे पीठ तूपात पूर्णपणे बुडायला हवे. आता आच कमी करा व नाचणीचे पीठ कालथ्याने सतत ढवळून भाजा (जसे बेसन पीठ भाजतो तसेच) ते भाजून होत आले की त्यात दाण्याचे कूट व बदामाची पावडर घालून अजून थोडे परतावे. आता गॅस बंद करा  व साखर घाला आणि ढवळा. किंवा मिश्रण कोमट असताना साखर घातली तरी चालेल. मिश्रण कोमट असतानाच लाडू वळा. हे लाडू पौष्टिक आहेत. चवीलाही छान लागतात.  या मिश्रणाचे १५ लाडू होतील.

Thursday, February 13, 2014

टोमॅटो वडी


जिन्नस :

लाल टोमॅटो २ कच्चे अथवा उकडून (साले काढावीत)
एक मध्यम उकडलेला बटाटा
अर्धी वाटी नारळाचा खव
साखर पावणे दोन वाट्या
दूध अगदी थोडे
साजूक तूप २ चमचे
रिकोटा चीझ २ ते ३ चमचे
मार्गदर्शन : उकडलेला बटाटा,  टोमॅटो आणि नारळाचा खव मिक्सर मधून बारीक करून घ्या. एका कढईत २ चमचे साजूक तूप घालून ती कढई मध्यम आचेवर गॅसवर ठेवा. यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेले मिश्रण थोडे परतून घ्या. त्यात अगदी थोडे दूध घाला. नंतर अजून थोडे परता. आता हे मिश्रण एका पातेल्यात काढून घ्या. याच कढईत किंवा पातेल्यात साखर घाला व साखर बुडेल इतके पाणी घाला आणि कालथ्याने ढवळत राहा. एक तारी पाक बनला की लगेचच परतलेले मिश्रण घालून ढवळत राहा.  आता हे मिश्रण चांगले उकळेल व आटायला लागेल. नंतर यात रिकोटा चीझ घाला व परत ढवळत रहा.  काही वेळाने या मिश्रणाचा गोळा बनायला लागेल व हा गोळा थोडा कोरडा पडायला सुरवात होईल. आता गॅस बंद करा. ताटलीला साजूक तूपाचा हात लावून घ्या व हे गरम मिश्रण त्यावर ओता व सर्व बाजून थापा. थापताना वाटीचा वापर करा. वाटीच्या बाहेरच्या तळाला साजूक तूप लावा व ही वाटी त्या गरम मिश्रणावर एकसारखी फिरवा म्हणजेच हे सारण ताटलीभर पसरवा. कोमट असताना वड्या पाडा. टोमॅटोने या वडीला छान रंग येतो.


बटाटा टोमॅटो आणि नारळाचा खव हे सर्व मिक्सर मध्ये वाटून केलेले मिश्रण जर १ वाटी तयार झाले तर पावणे दोन वाट्या साखर पाकाकरता घ्यावी.