Thursday, April 30, 2009

पोळीचा लाडू


वाढणी : २ जण

जिन्नस :

शिळ्या पोळ्या २
चिरलेला गूळ ४ चमचे
पातळ साजुक तूप ३ ते ४ चमचे
गोटा खोबरे/कोरडे खोबरे किसून ३-४ चमचे
खसखस अर्धा चमचा


मार्गदर्शन : शिळ्या पोळ्यांचा हाताने अथवा मिक्सर मधून कुस्करा करा/बारीक करा. त्यात गूळ व साजुक तूप घाला. किसलेले कोरडे खोबरे व खसखस एका कढल्यामध्ये भाजून घ्या. गार झाल्यावर पोळीच्या कुस्कऱ्यामध्ये घाला. हे सर्व मिश्रण एकत्र हाताने कालवून त्याचे हवे त्या आकाराचे लाडू करा. २ पोळ्यांमध्ये लहान ५-६ लाडू होतात. गूळ, खसखस आणि कोरडे खोबरे घातल्याने खमंग लागतात. चित्रात दाखवलेल्या लाडवामध्ये खोबरे व खसखस नाही.

Monday, April 20, 2009

श्रावणघेवडा - बटाटा - टोमॅटो

जिन्नस :


खूप बारीक चिरलेला श्रावणघेवडा उर्फ ग्रीन बीन्स ३ वाट्या
१ मधम टोमॅटो
एक खूप लहान बटाटा साले काढून
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा धणेजीरे पूड
पाऊण चमचा गरम मसाला
४-५ चमचे दाण्याचे कूट
४-५ चमचे ओल्या नारळाचा खव
पाव चमचा साखर
चवीपुरते मीठ
अर्धी वाटी पाणी
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग हळदक्रमवार मार्गदर्शन :टोमॅटो व बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. नंतर मध्यम आचेवर एक छोटा कूकर तापत ठेवा. तो पुरेसा तापला की त्यात फोडणीसाठी तेल घाला. तेल तापले की त्यात मोहरी हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात चिरलेला श्रावणघेवडा उर्फ ग्रीन बीन्स, चिरलेला बटाटा व टोमॅटो घाला. लाल तिखट, धनेजीरे पूड, गरम मसाला, दाण्याचे कूट, नारळाचा खव, साखर, मीठ व अर्धी वाटी पाणी घाला. हे सर्व घातले की डावेने भाजी नीट ढवळून घ्या म्हणजे मसाला सर्व भाजीला एकसारखा पसरला जाईल. नंतर कूकरचे झाकण लावून एक शिट्टी करा व गॅस बंद करा. ही एक पळीवाढी भाजी तयार होईल. पोळीभाताबरोबर छान लागते.

Sunday, April 19, 2009

लसूण चटणी

वाढणी : २ जण (साधारण ८ दिवस पुरेल)

जिन्नस:

मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या ४ ते ५
खोबरे कीस २ वाट्या
लाल तिखट १ चमचा
जिरे १ चमचा
साखर अर्धा चमचा
चवीनुसार मीठ


वरील सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सर/ग्राइंडर वर बारीक करा। लोखंडाच्या खल बत्यात ही चटणी बारीक केली तर अजुनही चव छान येते. तांदुळ मुग डाळीच्या गरम गरम खिचडीबरोबर जास्त छान लागते.

Friday, April 17, 2009

भरली तोंडली


वाढणी : २ जणजिन्नस :
तोंडली २० ते २२ नग
ओल्या नारळाचा खव अर्धी वाटी
दाण्याचे कूट अर्धी वाटी
तीळ कूट पाव वाटीच्या कमी
लाल तिखट १ चमचा
धनेजीरे पूड १ चमचा
गरम मसाला १ चमचा
गूळ चिरून 5-6 चमचे
मीठ
चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, हळद


क्रमवार मार्गदर्शन : तोंडली पाण्याने धूवून ती रोवळीत पाणी निथळण्यासाठी ठेवा. पाणी निथळले की कोरड्या फडक्याने पुसून घ्या. प्रत्येक तोंडल्याची देठे काढा दोन्ही बाजुने. नंतर दोन्ही बाजूने अगदी थोडे चिरा मसाला भरण्यासाठी. नारळाचा खव, दाणे व तीळाचे कूट, लाल तिखट, गरम मसाला, धनेजीरे पूड, गूळ, चवीपुरते मीठ व चिरलेली कोथिंबीर हे सर्व एकत्र करून मसाला तयार करून घ्या. मसाल्याची चव बघा. काही कमी जास्त हवे असल्यात ते जिन्नस घाला. नंतर प्रत्येक तोंडल्यामध्ये मसाला भरून घ्या चित्रात दाखवल्याप्रमाणे. मसाला पूर्ण भरून झाला आणि तरीही थोडा उरला तर तो उरलेला मसाला वाटीत भरून ठेवा.मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात फोडणीसाठी तेल घाला. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा व लगेच त्यात मसाला भरलेली तोंडली घालून थोडी ढवळून घ्या. आच मध्यम असुदेत. त्यावर झाकण ठेवा. वाफेवर ही तोंडली शिजतील. काही सेकंदांनी झाकण काढा व त्यात थोडे पाणी घाला. परत झाकण ठेवा. व परत ते काढून परत पाणी घाला. उरलेला मसालाही त्यात घाला. मसाला उरला नसेल आणि कमी वाटत असेल तर नंतर हवा तसा मसाला वरूनही घालता येतो. वाफेवर तोंडली शिजली की गॅस बंद करा. तोंडली शिजली की त्याचा रंग बदलेल. आणि शिवाय डावेने टोचूनही बघा. तोंडली सहज तुटली की ती शिजली असे समजावे. पाणी पण ज्याप्रमांणे रस हवा असेल त्याप्रमाणात घालावे.ही भरली तोंडली खूपच चविष्ट लागतात. पूर्वी लग्नकार्यामधे मुंबईत ही भरली तोंडली खाल्ली आहेत. बऱ्याच प्रमाणात करायची असेल तर तोंडली आधी कूकर मध्ये शिजवून घ्यावीत. ती खूप गार झाली की मग त्यामध्ये मसाला भरावा. पोळीभाताबरोबर छान लागतात. नुसती वाटीत घेऊन खायला पण मस्त लागतात.

Thursday, April 16, 2009

कारली रस भाजी

वाढणी : २ जण


जिन्नसःहिरवीगार कारली २ मध्यम आकाराची
तीळकूट पाव वाटी
दाण्याचे कूट अर्धी वाटी
लाल तिखट १ चमचा
धनेजीरे पूड १ चमचा
गरम मसाला १ चमचा
नारळाचा खव अर्धी वाटी
चिंचगुळाचे दाट आंबटगोड पाणी अर्धी ते पाऊण वाटी
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, हळद
मीठक्रमवार मार्गदर्शन : सर्वात आधी कारली धुवून घ्या. ती कोरड्या फडक्याने पुसून घ्या. नंतर त्याच्या मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी करा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात तेल घाला. नेहमीपेक्षा तेल थोडे जास्त घ्या. तेल तापले की त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा व त्यात कारल्याच्या फोडी घालून त्यावर झाकण ठेवा. वाफेवर कारली शिजतील. अधून मधून झाकण काढून थोडे ढवळा. कारली अर्धवट शिजली की त्यात लाल तिखट, धनेजीरे पूड, गरम मसाला, चिंचगुळाचे दाट पाणी व चवीपुरते मीठ घाला. थोडे ढवळून परत त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदांनी झाकण काढून त्यात तीळकूट, दाण्याचे कूट व नारळाचा खव घाला. परत भाजी सर्व बाजूने नीट ढवळा. आता थोडे पाणी घालून अजून थोडी शिजवा. शिजवल्यावर ही भाजी थोडी आटून दाट होते. अजून पातळ हवी असल्यास थोडे पाणी घालावे. वर मसाल्याचे प्रमाण दिले आहे त्यापेक्षा थोडे जास्त घेतले तरी चालेल. कारली शिजली आहेत की नाही हे पाहण्याकरता ती डावेने मोडून पहा.

Wednesday, April 15, 2009

तोंडली काचऱ्या

जिन्नस:

खूप पातळ चिरलेल्या तोंडल्याच्या गोल चकत्या
एक मिरची (जाड तुकडे)
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, हळद
थोडी चिरलेली कोथिंबीर
थोडा ओल्या नारळाचा खव
लाल तिखट
धनेजीरे पूड
गरम मसाला
मीठ
साखरक्रमवार मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात जरूरीपुरते तेल घाला व मोहरी, हिंग हळद घालून फोडणी करा. त्यात बारीक चिरलेल्या तोंडल्याचा गोल चकत्या व मिरच्यांचे जाड तुकडे घालून कालथ्याने परता. नंतर त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदानी झाकण काढून परत ही भाजी परता. असे २-४ वेळा केले की भाजी अर्धवट शिजेल. मग त्यात चवीप्रमाणे लाल तिखट, धनेजीरे पूड, गरम मसाला मीठ घाला. थोडी साखरही घाला. परत एकदा चांगली ढवळा/परतून घ्या. यावेळेस आच थोडी वाढवा. परतून परतून भाजी करा. आता त्यात चिरलेली कोथिंबीर व ओल्या नारळाचा खव घाला व परत एकदा परतून झाकण ठेवा. काही सेकंदांनी झाकण काढून ढवळा/परता. तोंडली शिजली आहे की नाही हे बघण्याकरता कालथ्याने एक तोंडल्याची चकती टोचून बघा. ती तुटली तर तोंडली चांगली परतली/शिजली गेली आहेत हे समजावे.या तोंडल्याच्या काचऱ्या खूप खमंग लागतात. लोखंडी कढईत केलेली ही भाजी खूपच खरपूस व खमंग लागते. पोळीबरोबर छान लागते. मला तर या काचऱ्या नुसत्या वाटीत घेऊन खायला आवडतात.

Monday, April 13, 2009

बेला

शीर्षकाचे नाव वाचून तुम्हाला कदाचित वाटेल की ही बाई बहुतेक मुलीबद्दल लिहीत आहे. बेला म्हणजे बेला हो! बेसन लाडू! एक नंबरचा हट्टी, पण तरीही खूप आवडता!


लग्न झाले की प्रत्येक मुलीला काहीतरी नवीन पदार्थ करण्याची हुक्की येते, तशी मला पण आली काही वर्षांपूर्वी. लाडू चिवडा करण्याचे ठरवले. गोडतिखटामध्ये मला तिखट पदार्थ खूपच आवडतात त्यामुळे सहसा बिघडत नाहीत. गोडाच्या फंदात कमी पडते. बेलाबद्दल आई मावशी व माम्यांकडून बरेच काही ऐकले होते. बेला खूप सोप्पा आहे त्यामानाने र. ला. अवघड. आता हा र. ला कोण!? र. ला म्हणजे बेलाचा भाऊ रवा लाडू. रवा लाडू पाकातच होतात आणि पाक म्हणजे खूप किचकट प्रकार, आपल्याला तो कधीच जमणार नाही, त्यामुळे र. ला. च्या भानगडीत कधीच पडायचे नाही असे ठरवले होते.


तर ऐकीव माहितीवर बेला करायचे ठरवले. आईचे वाक्य आठवले. बेसन लाडवाला खमंग भाजले गेले पाहिजे की छान होतात लाडू. ठरले तर मग! बेला आमच्या दोघांचाही आवडीचा. गॅस पेटवला, कढई ठेवली. तूप बेसन घातले आणि कालथ्याने ढवळायला लागले. काही वेळाने बेसन रंग बदलायला लागला. मनातून खूप खूश झाले. बेसनाचा रंग बदलला. तो काळपट चॉकलेटी दिसू लागला. बेसनाला खमंग वास येत नव्हता म्हणून अजून थोडे भाजले. डोक्यात फक्त एकच की बेसन खमंग भाजले गेले पाहिजे. बाकी तूप किती घ्यायचे, गॅस तीव्र ठेवायचा की मध्यम? की मंद? हे काहीही माहित नव्हते. गॅस बंद केला. त्यात पिठीसाखर घालून थोडे ढवळले.


गार झाल्यावर वळायला घेतले तेव्हा मला जरा संशय आला. हे असे काय दिसत आहेत लाडू!?? ५-६ वळल्यावर देवाला नैवेद्य दाखवल व एक लाडू खाल्ला. चव अजिबातच चांगली नव्हती. काय चुकले असावे? मूडच गेला. विनायक कामावरून आल्यावर म्हणाला काय गं , काय झाले? "काही नाही रे. लाडू साफ बिघडले आहेत." हे बेसन लाडू नाही तर काळे लाडू झाले आहेत. मी तर याला "काळे लाडू" असेच नाव दिले आहे. विनायकने एक लाडू खाल्ला. माझे मन न दुखवण्याच्या हेतूने म्हणाला. चांगले झालेत की लाडू. मी नाक मुरडून चांगले कुठचे? दिसायला काळे व बेचव लाडू झालेत. मी ते सर्व फेकून देणार आहे. आच तीव्र ठेवल्याने हा प्रकार झाल्याचे लक्षात आले होते. तूप कमी झाल्याने थोडे भुरभुरीत पण दिसत होते.


परत एकदा ऐकीव माहितीवर आधारीत प्रयोग केला! बेलाला तूप भरपूर लागते हं ! नाहीतर वळले जात नाहीत आणि चविष्टही होत नाहीत. परत एकदा बेसनतुपाचे मिश्रण कढईत व कढई गॅसवर पण यावेळी आच मध्यम. ढवळायला सुरवात केली. काही वेळाने वास, रंग, सारं कसं छान छान!! यावेळेला अगदी व्यवस्थित जमलेत. हं..... म्हणजे तूप पण सढळ हाताने घालावे लागते तर! पिठीसाखर घातली. ढवळले. गार झाल्यावर लाडू एकदम छान झाले! नितळही दिसत होते! ताटात ठेवले. नैवेद्य दाखवून एक तोंडात घातला. अहाहा! चवीला छानच! खुसखुशीत शिवाय नितळही, दिसायला पण छान! एका ताटात सर्व लाडू एकेक करून वळून ठेवले. त्यावर एक पेपर ठेवला. पूर्ण गार झाले की भरू या डब्यात. काही कामानिमित्ताने बाहेर गेले. आल्यावर बघते तर काय! सर्व लाडू बसलेले! बसले तर बसू देत. पण इतके काही ऐसपैस बसले की एकमेकात मिसळून गेले! परत मग तो सर्व गोळा भरला डब्यात. नंतर थोडे थोडे करून खाल्ले मिश्रण. त्यावेळेला अंदाज आला की आपण लाडू "छान" होण्याच्या अगदी जवळ आलेलो आहोत!


तिसऱ्या प्रयोगाच्या वेळी लाडू "सर्वांगसुंदर" झाले. तुपाचे प्रमाण निश्चित कळाले आणि तेही कसे घालायचे तेही कळाले. तूप पातळ घालून बेसनामध्ये घालायचे आणि एकीकडे कालथ्याने ढवळायला घ्यायचे. बेसन पूर्णपणे भिजेल इतकेच घालायचे. बेसन पूर्णपणे भिजले गेले पाहिजे पण अति भिजायला नको. परत जेव्हा लाडू करीन तेव्हा तूपाचे नक्की प्रमाण देईनच. बेलाचे सर्व हट्ट पुरवले तरच तो शहाण्यासारखा वागतो.


बेला माझ्या तरी खूप आवडता आहे, तुमचा आहे का?

Friday, April 10, 2009

सजावट (७)


काकडी, गाजर, लाल मुळा, कोथिंबीर

Wednesday, April 08, 2009

डाळ पालक

वाढणी : २ जण


जिन्नस :अडीच ते ३ वाट्या बारीक चिरलेला पालक
अर्धी वाटी तुरीची/मुगाची डाळ
१ लहान टोमॅटो
२ पाकळ्या लसूण बारीक चिरून
चिरलेला जाड कांदा थोडासा
मिरची अर्धी जाड तुकडे करून
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजीरे पूड अर्धा चमचा
मीठ चवीपुरते
फोडणीकरता तेल
मोहरी, हिंग, हळद
१ वाटी पाणी


क्रमवार मार्गदर्शन : चिरलेला पालक चाळणीमध्ये पाण्याने धुवून घ्या व निथळत ठेवा. त्याचवेळेला अर्धी वाटी डाळही पाण्यामध्ये भिजत घाला. साधारण १५ ते २० मिनिटांनी पालकामधले निथळलेले पाणी काढून टाका. पाणी निथळण्यासाठी चाळणीखाली एक ताटली ठेवा. भिजत घातलेल्या डाळीमधले पाणी पण काढून टाका.आता एक छोटा कूकर मध्यम आचेवर तापत ठेवा. तो पुरेसा तापला की त्यामध्ये तेल घाला. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, कांदा व टोमॅटो घालून थोडे परतून घ्या. नंतर त्यात चिरलेला पालक व तुरीची/मुगाची डाळ घाला. लाल तिखट, धनेजीरे पूड व चवीपुरते मीठ घालून परत एकदा डावेने ढवळून घ्या. नंतर त्यामध्ये १ वाटी पाणी घाला. परत एकदा डावेने ढवळून घ्या व कूकरचे झाकण लावा. १ शिट्टी झाली की गॅस बंद करा.एक चविष्ट व पौष्टीक पळीवाढी भाजी तयार होईल. ही पोळी भाताबरोबर छान लागते. शिवाय नुसती वाटीतून गरम गरम खायलाही छान लागते. ही भाजी तुरीच्या डाळीची जास्त छान लागते.माहितीचा स्त्रोत : मैत्रिण सौ सुनिता येमुल
मूळ रेसिपीमध्ये मी थोडा बदल केला आहे.

Tuesday, April 07, 2009

पोळी प्रकरण

माझा आणि पोळीचा संबंध तसा अगदी लहानपणीच आला साधारण ४थी ५वीत असताना. आम्ही दोघी बहिणी व आमची एक मामेबहीण जी आमच्यापेक्षा दोन एक वर्षांनी मोठी होती. आम्ही तिघी नेहमी भातुकलीचा खेळ खेळायचो. या खेळामध्ये कच्चे पोहे, दाणे व गूळ हे ठरलेले असायचे. एकदा खेळता खेळता विचार केला की पोहे दाणे गूळ हे नेहमीचेच झाले, आपण खराखुरा स्वयंपाक करायचा का? पण काय करायचा? यावर एकमताने ठरले की पोळी व बटाट्याच्या काचऱ्या करायच्या. ठरले, जाड जाड बटाट्याच्या फोडी केल्या. मामेबहिणीला गॅस कसा पेटवायचा माहीत होता. खरीखुरी कणीक भिजवली. ती अर्थातच खूप सैल झाली! नक्की काय करायचे काहीच माहीत नव्हते. खूप तापलेल्या तव्यावर मोडकी तोडकी पोळी टाकली आणि उलटायला गेलो तर हातच भाजला. खूप धूर व्हायला लागला. घाबरलो. पटकन गॅस बंद करून कालथ्याने तव्याला चिकटलेली पोळी कशीबशी काढली. खूप वेळा खसाखसा घासून सुद्धा काळ्याकुट्ट झालेल्या तव्यात काहीच सुधारणा दिसली नाही म्हणून आम्ही एक युक्ती केली. ताटाळ्यात सगळ्यात मागे तवा ठेवून दिला! अर्थात लगेचच आईला झालेला प्रकार कळलाच!!

लग्न झाल्यावर सासरी माझी हालत झाली. घरात माणसे बरीच, शिवाय आला गेल्याचे घर. माझ्या सासरी अजुनही बऱ्याच पोळ्या करायला लागतात. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या कणकेतच हात घालावा लागतो. लग्न झाल्यावर खूप मोठ्या प्रमाणात कणीक भिजवायची माझ्यावर पहिल्यांदाच वेळ आली. कणीक खूपच "घट्ट" भिजली गेली. सासुबाई म्हणाल्या एकटी लाटू नकोस गं पोळ्या. आपण दोघी मिळून लाटू. पोळ्या लाटताना म्हणाल्या, "अगं रोहिणी किती घट्ट भिजवली आहेस गं कणीक. मग त्यांनी त्यांच्या वाटणीची कणीक पाणी घालून घालून सैल केली व पोळ्या केल्या. मी मात्र तश्याच घट्ट कणकेच्या पोळ्या केल्या. नंतर चांगलेच जाणवले हात खूप दुखायला लागल्यावर!

आदल्या दिवशीचा अनुभव लक्षात घेता दुसऱ्या दिवशीची कणीक सैल भिजवली. ती इतकी काही सैल झाली की त्याच्या पोळ्याच लाटता येईनात. त्यात आणखी कणीक घालून घालून चौपट कणीक भिजली गेली. मग मात्र मी सासुबाईंना म्हणाले की तुम्हीच मला कणीक भिजवून द्या. मी सर्व पोळ्या करीन. मला म्हणाल्या की एकदा तू मला कणीक भिजवताना बघ म्हणजे तुला कणीक कशी भिजवतात ते कळेल.

काही दिवसांनी चुलत सासऱ्यांकडे गेलो. तिथल्या पोळ्या पाहून तर मी चाटच पडले. मी जिथे पाहुणी म्हणून जाते तिथे मी आपणहून पोळ्यांचे काम घेते कारण इतर तिखट मीठ कुठे ठेवले हे आपल्याला माहीत नसते, ते त्या घरातील बायकांनाच माहीत असते. त्यातून आपण सासुरवाशीण म्हणल्यावर कोणते तरी काम करणे आलेच. मी सरसावले पुढे पोळ्या करायला. तर चुलत सासुबाई म्हणाल्या अगं रोहिणी तू बाजुला बस. पोळ्यांच्या भानगडीत पडू नकोस. तू इतकी बारीक आहेस की पोळ्या लाटता लाटता चक्कर येऊन पडशील इतक्या पोळ्या लागतात आमच्या घरी. त्या म्हणाल्या आम्ही पण या पोळ्यांच्या भानगडीत पडत नाही. ते काम त्यांच्या सासुबाईंचे असते. दोन चुलींवर दोन तवे ठेऊन त्या पटापट पोळ्या लाटतात.

माझ्या आईच्या व सासुबाईंच्या पोळ्या किती छान होतात मग आपल्यालाच का नाही तशा जमत?! एकदा मी माझ्या मामेबहिणीला सांगितले की तू मला शिकव ना पोळ्या करायला मला अजून नीट नाही जमत. तर म्हणाली की अगं तू नवीनच आहेस अजून. मला तरी लग्नाच्या आधी कुठे येत होत्या? एकदा करायला घेतल्यास की आपोआपच जमतील. तु जितक्या जास्त पोळ्या लाटशील तितक्या तुला त्या जमतील. आपोआप कळत जाते त्यात काही अवघड नाही.

मग ठरवले की आपण विनायकलाच गुरू करायचे. त्याला सांगितले की पानात वाढले की प्रत्येक पदार्थ कसा झाला आहे ते सांग. पूर्णपणे बिघडला आहे असे सांगितलेस तरी चालेल. मला वाईट वाटणार नाही. पोळ्या पण कशा होत आहेत ते सांग. शिवाय हेही ठरवले की कुणाकणे गेले की आपणहून पोळ्यांचे काम करायला घ्यायचे नाही की जे मी आधी करत होते. याउलट बहिणी, आई, सासुबाई, मैत्रिणी यांच्याकडे गेले की गप्पा मारता मारता त्या पोळ्या करायला लागल्या की त्यांच्या शेजारी जाऊन निरिक्षण करायचे.

पहिल्याप्रथम सासुबाई. त्या काय करतात की कणकेचा छोटा गोळा घेऊन लाटतात, त्याची तेल लावून त्रिकोणी घडी करतात आणि पीठ लावून एकदा का लाटणे पोळीला लावले की काही सेकंदातच त्याची गोल पोळी तयार होते. त्यांची पोळी गोल गोल फिरते. वाव! किती सोपे ना! ठरले, पोळी करायला घेतले पण पोळी गोलगोल न फिरता मीच गोल गोल फिरायला लागले. ओम फस!! सासुबाई पोळी भाजताना आच तीव्र करतात. दोन तीन वेळा उलटतात. छान टम्म फुगलेली पोळी तय्यार! पोळी लाटायच्या वेळेला मात्र त्या आठवणीने गॅस एकदम मंद करतात. असे तंत्र वापरायला गेले पण जमले नाही. एक तर दुसरी पोळी करताना गॅस बारीक करायला विसरायचे, बरं गॅस बारीक केला तर प्रत्यक्ष पोळी करताना आच तीव्र करायलाही विसरायचे. सासुबाईंचे कणीक भिजवण्याचे तंत्र मात्र एकदम छान जमले.

आता आई! आईपण तिकोणी घडीचीच पोळी लाटते. लाटताना एकदा डावीकडून व एकदा उजवीकडून लाटणे फिरवते. अशी पोळी मी लाटून पाहिली पण हे तंत्र मला खास पटले नाही. पोळ्या भाजताना आई आच ठेवते ती मध्यम आचेच्या थोडी वर. हे तंत्र मात्र मला मनापासून पटले. याचा फायदा असा की तवा एकाच तापमानाला व सतत तापत राहतो आणि दुसरे म्हणजे एक पोळी लाटता लाटता अगदी त्याच वेळेला तव्यावरची पोळी पण भाजली जाते. म्हणजे लाटण्यामध्ये व भाजण्यामध्ये अजिबात खंड नाही. एकाचवेळी दोन कामे. वेळेची बचत! सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तव्यावरून पोळी काढल्यावर ती तव्यावर मोडायची म्हणजे पोळीतली वाफ निघून जाते व पोळी कधीही कडक होत नाही.

पोळीचे दोन धडे तर मिळाले. आता लाटायचे नीट जमत नव्हते. त्रिकोणी घडीची काही सेकंदात होणारी गोल गोल पोळी नीट जमत नव्हती. एकदा तर त्रिकोणाचा चोकोन व पंचकोनही झाला. आणि एकदा अचानक लाटण्याचे तंत्र बघायला मिळाले. माझी एक मैत्रिण स्वरदा तिला पण माझ्यासारखीच पोळी प्रिय. रोजच्या रोज पोळी भाजी झालीच पाहिजे. ती गोल घडीची पोळी करते. व पोळी लाटता लाटता सतत उलटी पालटी करते. हे तंत्र मला आवडलेही आणि जमलेही. या तंत्राचा फायदा असा झाला की त्रिकोणी घडीची पोळी अगदी छान जमायला लागली.

अशा रितीने पोळी प्रकरणातून माझ्या पोळ्या खूपच छान व्हायला लागल्या! त्रिकोणी घडीची, ३-४ पदर सुटलेली, गोल व मऊसूत पोळी जमायला लागल्यावर माझा आनंद गगनात मावेनासा झाला.


निरिक्षण व अनुभवातून शिकलेल्या गोष्टी :

कणीक भिजवणे : कणीक भिजवताना अगदी थोडे थोडे पाणी घेऊन भिजवावी. कणीक ओली होण्याइतपतच पाणी घालावे व ओल्या कणकेचे गोळे करून नंतर सर्व कणीक जोर लावून मळावी. आपल्या हाताला कणीक मऊ झाली की कडक झाली ते कळते. त्यानुसारच पाणी घालावे. १५ मिनिटे मूरू द्यावी. मुरल्यावर परत तेलाचा हात घेऊन मळावी व छोटे छोटे गोळे करून पोळ्या लाटाव्या.


पोळी लाटणे : पोळी लाटताना लाटण्याचा दाब कणकेच्या गोळ्याला सर्व बाजुंनी सारखा असला पाहिजे. पोळी खूप पातळ झाली की ती कडक होण्याचा संभव असतो. पोळी कडेकडेने नीट लाटली गेली पाहिजे नाही तर कडा जाड राहून कच्या राहतात. लाटताना पीठ थोडे जास्त वापरा.


भाजणे : तव्याला सतत एकसारखी आच लागायला हवी. तापलेल्या तव्यावर पोळी जास्त वेळ राहता कामा नये. ३ते ४ वेळेला उलटली की पोळी भाजली गेली पाहिजे. पोळी भाजताना वाफ बाहेर येत असेल तर त्यावर वाटीने दाब द्या म्हणजे वाफ पोळीच्या इतर बाजुला जाऊन पोळी फुगेल.

अमेरिकेत मी चांगल्या पोळ्यांना मिस करत आहे. कारण की इथे मिळणारी कणीक अजिबात चांगली नाही. त्यात मैदा जास्त प्रमाणात असतो. भारतात गिरणीमधून बारीक दळून होणारी कणीक ही केव्हाही चांगली. त्यात कोंडा असतो. शिवाय भारतात आपल्याला चांगल्या प्रतीचा गहू पण वापरता येतो. इथे अमेरिकेत all nature best व स्वाद या दोन कंपन्याची कणीक मला त्यातल्या त्यात चांगली वाटते. याच्या पोळ्या बऱ्यापैकी चांगल्या होतात.

पोळी प्रकरण समाप्त!!!

Friday, April 03, 2009

सजावट (६)

किसलेले गाजर, किसलेले चीझ, स्ट्रॉबेरी