Tuesday, November 24, 2009

भरली वांगी



जिन्नस :

छोटी वांगी १४ ते १६ नग
दाण्याचे कूट १ वाटी
ओल्या नारळाचा खव १ वाटी
लाल तिखट २ चमचे
धनेजिरे पूड २ चमचे
गरम मसाला/गोडा मसाला २ चमचे
मीठ चवीपुरते
गूळ पाव वाटी
तेल
मोहरी
हिंग
हळद

क्रमवार मार्गदर्शन : वांगी धूऊन व पुसून घ्या. नंतर त्यावर मधोमध एक चिर पाडा सारण भरण्यासाठी. वरील जिन्नस जे दिले आहेत ते सर्व एकत्र करा. नंतर हे सारण प्रत्येक वांग्याच्या चिरेमध्ये भरून घ्या. सारण दाबून भरा. जितके भरता येईल तितके भरा म्हणजे भाजी चांगली मिळून येते. अजून थोडे सारण उरले तर ते नंतर भाजी फोडणीला दिल्यावर घाला. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात तेल घाला व मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा.फोडणीमध्ये सारण भरलेली वांगी घाला.


तेल नेहमीपेक्षा थोडे जास्त घाला म्हणजे भाजी चवीला जास्त छान होते. नंतर त्यावर झाकण ठेवा व आच थोडी कमी करा. काही सेकंदानी झाकण काढून वांगी उलट सुलट करा. म्हणजे सर्व बाजूने शिजतील. आता थोडे पाणी घालून परत एकदा झाकण ठेवा. व काही सेकंदानी झाकण काढून परत भाजी ढवळा व पाणी आटले असेल तर परत थोडे पाणी घाला. वांगी शिजेपर्यंत थोडे थोडे पाणी घालून व झाकण ठेवून शिजवा. वांगी चांगली शिजली पाहिजेत. आता गॅस बंद करा.

पोळी भाकरी बरोबर भरली वांगी छान लागतात. शिवाय गरम भाताबरोबर पण मस्त लागतात. सोबत लसणीची चटणी असल्यास उत्तम.

Thursday, November 19, 2009

तांदुळाच्या पीठाचे धिरडे

जिन्नस : तांदुळाचे पीठ ४ ते ५ डाव चवीपुरते मीठ तेल पाणी ३-४ ग्लास क्रमवार मार्गदर्शन : तांदुळाच्या पीठात चवीपुरते मीठ घालून पीठ पातळ भिजवा. गुठळी होऊन देऊ नका. पीठ आमटीसारखे पातळ भिजवा. नंतर मध्यम आचेवर तवा तापत ठेवा. तो जरूरीपुरता तापला की त्यावर चमच्याने तेल घाला व कालथ्याने तेल तवाभर पसरवून घ्या. आता तांदुळाच्या पीठाचे धिरडे तव्यावर घाला. हे पीठ डावेने वरून घालावे. पीठ सैल असल्याने ते आपोआप जितके पसरेल तितकेच पसरू दे. हे पीठ तव्यावर घातल्यावर डावेने पसरू नये. डावेला ते चिकटते. काही सेकंदाने धिरड्यावर व धिरड्याच्या सर्व बाजूने तेल सोडा व काही वेळाने धिरडे कालथ्याने उलटा. उलटल्यावर परत एकदा तेल घालून मग ते तव्यावरून काढा. हे पीठ पातळ असल्याने तव्यावर पसरून त्याला जाळी पडते. दुसरे धिरडे घालताना परत एकदा पीठ डावेने ढवळून घ्या. पीठ घट्ट वाटल्यास परत एकदा थोडे पाणी घाला. हे धिरडे बटाट्याच्या काचऱ्या किंवा उकडून बटाट्याच्या भाजीबरोबर चांगले लागते. ओल्या नारळाची चटणी किंवा लसूण खोबरे, लसूण दाणे यांची झणझणीत चटणीही छान लागते. सोपे व पटकन करतायेण्यासारखे आहे.

Friday, November 06, 2009

दडपे पोहे



ही दडपे पोहे याची ध्वनीचित्रदर्शी पाककृती आहे.

Tuesday, November 03, 2009

रवा-बेसन लाडू





रवा बेसन लाडू ही माझी पाककृती मनोगत दिवाळी अंक २००९ मध्ये प्रकाशित झाली आहे.


जिन्नस :
रवा १ वाटी
हरबरा डाळीचे पीठ अर्धी वाटी
साखर १ वाटी
साजूक तूप (रवा व बेसन भाजण्यापुरते)
बेदाणे

मार्गदर्शन :


मध्यम आंचेवर कढई/पातेले तापत ठेवा व त्यात रवा व ८-१० चमचे साजूक तूप घालून व्यवस्थित भाजून घ्या. रव्याचा खमंग वास आला की भाजलेला रवा एका ताटलीमध्ये काढून घ्या. त्याच कढई/पातेल्यात हरबरा डाळीचे पीठ व ८-१० चमचे तूप घालून भाजून घ्या. यावेळी गॅस मध्यम आंचेपेक्षा थोडा कमी ठेवावा. डाळीच्या पिठाचा रंग थोडा बदलेल व खमंग वासही येईल. आता हे भाजलेले डाळीचे पीठ एका ताटलीमध्ये काढा. भाजलेला रवा व डाळीचे पीठ एकत्र करून हाताने नीट एकजीव कालवून घ्या.


आता मध्यम आंचेवर एक पातेले ठेवा व त्यात एक वाटी साखर घाला. साखर पूर्णपणे बुडेल इतपतच पाणी घाला व चमच्याने ढवळायला सुरवात करा. काही वेळाने साखर व पाणी उकळून बुडबुडे यायला लागतील व काही सेकंदातच एक तारी पाक होईल. गॅस बंद करा. आता या पाकात भाजलेला रवा व डाळीचे पीठ घाला. कालथ्याने व्यवस्थित ढवळा. कोमट असताना लाडू वळा. लाडू वळताना त्यात एका लाडवाला एक बेदाणा घ्या. मिश्रण जर कोरडे वाटले तर त्यात थोडे साजुक तूप घाला.