Friday, April 26, 2013

सुकामेव्याचे लाडू (dryfruits laduu)


जिन्नस :
बदामाची सालासकट पूड अर्धी वाटी
काजूची पूड अर्धी वाटी
आक्रोडाची पूड अर्धी वाटी
दाण्याचे कूट अर्धी वाटी
पिस्ताची पूड ५ ते ६ चमचे
साखर पाऊण वाटी
साजूक तूप ४ ते ५ चमचे
वेलची पूड अगदी थोडी


मार्गदर्शन : वर दिलेल्या सर्व पावडरी एकत्र करा. त्यात साखर व साजूक तूप घाला. थोडी वेलची पूड घाला. वरील सर्व मिश्रण हाताने नीट एकसारखे एकत्र करा आणि लाडू वळा. साजूक तूप एकदम घालू नका. आधी ४ ते ५ चमचे घाला. लाडू नीट वळले जात नसतील तरच अजून थोडे तूप घाला. बाकीचे जिन्नसही आवडीनुसार घालू शकता. खसखस भाजून त्याची पूड, खारीक पूड, मनुका व बेदाणे असे सर्व घालू शकता. खसखस थोडीच घालावी कारण की ती खूप उष्ण असते. हे लाडू उपवासाला चालतात. शिवाय बाळंतिणीसाठी हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत.

Friday, April 05, 2013

लाल टोमॅटोचा रस्सा


जिन्नस :

लाल टोमॅटो ६
दाण्याचे कूट मूठभर
ओल्या नारळाचा खव मूठभर
थोडी चिरलेली कोथिंबीर
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
मीठ चवीपुरते
साखर २ चमचे
फोडणीसाठी तेल
मोहरी, जिरे, हिंग, हळदमार्गदर्शन : टोमॅटो मध्यम आकारात चिरून घ्या. मध्यम आचेवर पातेले ठेवा. ते तापले की त्यात तेल घाला. तेल पुरेसे तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग व हळद घालून फोडणी करा. आता या फोडणीत चिरलेले टोमॅटो घाला व परतून घ्या. थोडे पाणी घालून झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा. आता यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड, साखर, मीठ घाला व परत एकदा ढवळून त्यात थोडे पाणी घाला व परत झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा व त्यात दाण्याचे कूट, ओला नारळ, कोथिंबीर घालून रस्सा पातळ होण्यासाठी परत थोडे पाणी घाला. एक उकळी आली की गॅस बंद करा. रस्सा तयार झाला आहे. गरम गरम भाताबरोबर हा रस्सा छान लागतो. टोमॅटो शिजायला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे हा रस्सा झटपट होतो.