Thursday, May 30, 2013

घेवड्याची भाजी


जिन्नस :

घेवड्याच्या शेंगा सोललेल्या (३ते ४ वाट्या)
१ बटाटा उकडून त्याच्या फोडी
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
दाण्याचे कूट २ मूठी
नारळाचा खव १ मूठ
थोडा गूळ
चवीपुरते मीठ
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, हळद



मार्गदर्शन : घेवड्याच्या शेंगा कूकरमध्ये शिजवून घ्या. कूकर गार झाला की शिजलेल्या शेंगा बाहेर काढा. शिजताना त्यात थोडे पाणी घाला. शिजल्यावर यातले पाणी एका वाटीत काढा. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. ते तापले की त्यात पुरेसे तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा. नंतर त्यामध्ये घेवड्याच्या शिजलेल्या शेंगा आणि उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घाला आणि ढवळा. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला, मीठ, गूळ, दाण्याचे कूट, नारळाचा खव घाला. परत एकदा भाजी नीट ढवळून घ्या. नंतर शिजवलेल्या घेवड्याच्या शेंगातले पाणी काढून ठेवलेले घाला. नंतर त्यावर झाकण ठेवा. ५ मिनिटे भाजी शिजू दे. थोड्यावेळाने गॅस बंद करा. पोळीपेक्षाही ही भाजी भाताबरोबर छान लागते.

Wednesday, May 29, 2013

मेथीची भाजी



जिन्नस :

मेथीची मोठी १ जुडी
लाल तिखट पाव चमचा
धनेजिरे पूड पाव चमचा
चवीपुरते मीठ
२ते ३ चमचे डाळीचे पीठ
२ते ३ चमचे चिरलेला कांदा
लसूण पाकळ्या चिरलेल्या २
१ ते २ मिरचीचे लहान तुकडे
फोडणीकरता तेल
मोहरी, हिंग, हळद



मार्गदर्शन : मेथी निवडून धुवून घ्या. कूकरमध्ये शिजवून घ्या. कूकर गार झाला की त्यातली शिजलेली मेथी बाहेर काढा व त्यात डाळीचे पीठ मिक्स करा. मिक्स करताना त्यात गुठळी होऊन देवू नका. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ घालून डावेने भाजी एकसारखी करून घ्या. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. ते तापले की त्यात तेल घाला. नेहमी फोडणी करतो त्यापेक्षा जरा जास्त तेल घालावे. तेल तापले की त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. फोडणीमध्ये चिरलेली मिरची, लसूण व कांदा घाला. कांदा लसूण बारीक चिरा. आच कमी करून हे सर्व जिन्नस थोडे परतून घ्या. नंतर त्यात मेथीचे तयार केलेले मिश्रण घाला. व थोडे पाणी घाला. भाजी ढवळा. एकसारखी करा. नंतर त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा. गॅस बंद करा. मेथीची भाजी तयार झाली आहे. कांदा लसूण फोडणीत घातल्याने एक छान चव येते. पोळीपेक्षाही ही भाजी गरम भाकरीशी जास्त छान लागते.

या भाजीला मेथीची गोळा भाजी म्हणतात.





Friday, May 24, 2013

फोडणीची साबुदाणा खिचडी



जिन्नस :

भिजलेला साबुदाणा अर्धी वाटी
दाण्याचे कूट मूठभर
दाणे २-३ चमचे
मटार मूठभर
पाव कांदा चिरलेला
एक छोटा बटाटा (काचऱ्या चिरतो त्याप्रमाणे चिरा)
हिरवी मिरचीचे तुकडे २ते ३
लाल तिखट पाव चमचा
मूठभर चिरलेली कोथिंबीर
फोडणीकरता तेल
मोहरी,जिरे, हिंग, हळद
मीठ चवीपुरते
साखर पाव चमचा



भिजलेला साबुदाणा हाताने ढवळून एकसारखा करून घ्या. त्यात लाल तिखट, मीठ, साखर व दाण्याचे कूट घालून परत एकदा साबुदाणा एकसारखा ढवळून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा. (हळद रंग येण्यापुरती अगदी थोडीच घालावी)  नंतर त्यात मिरचीचे तुकडे, चिरलेला कांदा व बटाटा घाला. मटारही घाला. हे सर्व मिश्रण परतून घ्या. नंतर त्यात अगदी थोडे मीठ घाला व झाकण ठेवा. फोडणीत घातलेले सर्व जिन्नस शिजले की त्यात साबुदाणा घाला. या साबुदाण्यात आपण आधीच दाण्याचे कूट, मीठ, साखर व लाल तिखट मिक्स करून ठेवले आहे. साबुदाणा घातला की परत एकसारखे ढवळून घ्या. नंतर झाकण ठेवून एक वाफ द्या. काही सेकंदाने झाकण काढा व परत ढवळा. आता थोडी चिरलेली कोथिंबीर घालून एकसारखे करून घ्या. आता गॅस बंद करा. गरमागरम खिचडी खा. आवडत असल्यास थोडे लिंबू पिळा. या खिचडीची चव थोडी वेगळी लागते. मला ही चव आवडली. करून पहा. तुम्हालाही आवडेल.


Monday, May 20, 2013

तिखटामीठाच्या पुऱ्या


 जिन्नस :

कणिक अडीच वाट्या
लाल तिखट दीड चमचा
धनेजिरे पूड दीड चमचा
हळद अर्धा चमचा
चवीपुरते मीठ
मूठभर चिरलेली कोथिंबीर
५-६ चमचे तेल (कणकेत घालायला)
तळणीसाठी तेल


मार्गदर्शन : कणकेमध्ये वरील सर्व जिन्नस घालून घट्ट कणिक भिजवा. अर्ध्या तासाने मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात पुरेसे तेल घाला. तेल जरा जास्ती घालावे म्हणजे पुरी फुगण्यास वाव मिळतो. भिजलेली कणिक अजून थोडी मळून घ्या. नंतर त्याचे छोटे गोळे करा व पुऱ्या लाटा. तेल तापले की त्यात सर्व पुऱ्या तळून घ्या. अडीच वाट्यांमध्ये ५० छोट्या पुऱ्या होतात. मधवेळी खाण्यास द्या. या पुऱ्या गरम खाल्या की बरोबर काहीही नसले तरी चालते इतक्या छान होतात. गार झाल्या तर लोणच्यामधेय थोडे दही घालून एकसारखे करा किंवा दाण्याची दह्यातली चटणी सोबत घ्या. 
या पुऱ्या खुसखुशीत व कुरकुरीत होतात.


पुऱ्या चांगल्या होण्यासाठी टीपा :

कणीक भिजवताना मीठ अंदाजे घातले तरी सुद्धा तिखट मीठ घातल्यावर कणीक एकसारखी ढवळा आणि चव बघा. मीठ कमी असेल तर परत घाला. आळणी तिखटामिठाच्या पुऱ्या चांगल्या लागत नाहीत.
पुऱ्यांची कणीक जास्तीत जास्त घट्ट भिजवावी.

तासभर मुरू द्यावी.

तळणीसाठी तेल जरा जास्त घ्यावे म्हणजे पुरी फुगायला वाव मिळतो.

तेल व्यवस्थित तापू द्यावे.

तेल व्यवस्थित तापले आहे की नाही याकरता एक टीप आहे. कणकेचा खूप बारीक अगदी छोटा गोळा तेलामध्ये घालावा. तो जर पटकन वर आला तर तेल पुरीसाठी व्यवस्थित तापले आहे असे समजावे.

पुरी फुगण्यासाठी कडेने जास्त लाटावी.

पुरी तेलात सोडून ती लगेच फुगते जर का ती नीट लाटली असेल तर आणि शिवाय जर ती फुगली नाही तर झारेने त्यावर कढईतल्या कढईत पुरीच्या वर तेल घालावे म्हणजे फुगण्यास वाव मिळतो.

या तिखटामिठाच्या पुऱ्या मधवेळी करून खाऊ शकता. नंतर १ कप चहा. अथवा १ फळ किंवा ताक व दही,
२ ते ३ दिवस टिकतात त्यामुळे स्वयंपाकाचा कंटाळा आला तर पुरीसोबत बटाटा भाजी करून खा.
सहलीसाठी जाण्यासाठी उपयुक्त कोरड्या असल्याने.

पुऱ्या तळून झाल्या की पेपर टावेल वर ठेवा म्हणजे पुरीत असलेले जास्तीचे तेल निथळून जाईल. 




Thursday, May 09, 2013

भाजलेले दाणे



दाणे २४ औंस
अल्युमिनियमचे पसरट भांडे

३५० degree F,,  हे दाणे ४५ मिनिटे भाजत ठेवा. खूप छान भाजले जातात. जसे की कढईत भाजतो तसेच होतात. छान साले सुटतात.