Saturday, January 31, 2009

मसाला चिप्स (२)


जिन्नस:टॉरटिला चिप्स (Tostitos)
बटाटावड्याचे सारण
चिंचगुळाचे दाट पाणी
लाल तिखट
धनेजीरे पूड
मीठ
साखर
लिंबू
बारीक शेव
कोथिंबीरीची पाने (सजावटीसाठी)
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेला टोमॅटो


बटाटावड्याचे सारण: बटाटे उकडून, त्याची साले काढुन कुस्करुन घ्यावेत. त्यात कांदा, लसुण पाकळ्या, मिरच्या व कोथिंबिर खूप बारीक चिरुन घालणे, लिंबू पिळावे. चवीपुरते मीठ व साखर घालावे, व ह्या सर्व मिश्रणाचा लगदा करावा. हे बटाट्याचे सारण तसेच कच्चे राहु देत.


सर्वात आधी एका डीशमध्ये कोथिंबिरीची पाने सजावटीसाठी घाला. नंतर एकेक टॉरटीला चिप्स ठेवून त्यात आधी बटाटावड्याचे सारण व चिंचगुळाचे दाट पाणी घाला. नंतर बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घाला. किंचित लाल तिखट, धनेजीरे पूड पेरा. चवीप्रमाणे थोडे मीठ व थोडी साखरही पेरा. नंतर एकेका पुरीमध्ये थोडी बारीक शेव घाला. नंतर अगदी थोडे लिंबू पिळा.


ह्या चिप्स पाणीपुरीच्या पुरीला एक पर्याय होऊ शकतो. जसे आपण शेव बटाटा पुरी खातो याप्रमाणेच असे करूनही खाता येईल.

Saturday, January 24, 2009

दाण्याचे लाडू

जिन्नस

दाण्याचे कूट २ वाट्या
साखर १ वाटी
साजूक तूप पातळ ७-८ चमचे


वरील सर्व जिन्नस एकत्र करून लाडू वळा. तूप घालताना आधी थोडेसेच घालावे. मिश्रण एकत्र करून लाडू वळून पाहावा. नीट वळला गेला नाही तर अजून तूप घालावे. जास्त तूप झाले तरीही हे लाडू बेसनाच्या लाडवांप्रमाणे बसतात! दाणे भाजण्याची गरज नाही. भारतात भट्टीतून दाणे भाजून मिळतात. अमेरिकेत भाजक्या शेंगा मिळतात. दाण्याची टरफले काढून कूट करा. असे हे झटपट लाडू तय्यार!


ह्यात थोडा गूळही छान लागतो. खमंगपणा येतो. पूर्ण गुळाचेही छान लागतात. तसेच यात आवडीनुसार सुकामेव्याची पूडही घालू शकता. मनुका बेदाणे घाला. आपापल्या आवडीप्रमाणे सजवा! पण मला फक्त नुसते दाण्याच्या कुटाचेच लाडू आवडतात!

Friday, January 23, 2009

गाजर टोमॅटो कोशिंबीर

२ लहान लाल टोमॅटो व एक लहान शेंदरी गाजर बारीक चिरा. त्यात एक चमचा दाण्याचे कूट, चिमुटभर लाल तिखट, पाव चमचा साखर, २ चमचे दही व चवीपुरते मीठ घाला. थोडी हिरवीगार कोथिंबीर चिरून घाला. सर्व मिश्रण चमच्याने एकत्रित करा. एक चविष्ट कोशिंबीर तयार होईल!

Friday, January 16, 2009

फ्रूट सॅलड

जिन्नस :
३ वाट्या दाट दूध (whole milk)
१ वाटी साखर

फळे:

टरबूज
केळी
पपई
सफरचंद
द्राक्षे
pear
संत्री
चिक्कू
अंजीर
डाळिंबाचे दाणे
हापुस आंब्याच्या फोडी
स्ट्रॉबेरी (फक्त सजावटीसाठी)
ब्ल्युबेरी (फक्त सजावटीसाठी)

सुकामेवा:

काजू
बदाम
पिस्ते
मनुका
सुके अंजिर
केशर
खजूर
मध
क्रमवार मार्गदर्शन :

एका पातेल्यात दूध घेऊन ते मध्यम आचेवर तापवत ठेवा. दूध तापले की त्यात साखर घाला व चांगले उकळू द्या. उकळल्यावर दूध वर येईल. डावेने दूध सतत ढवळत रहा. साय येत राहते व दूध आटत जाते. प्रत्येक वेळी साय आली की डावेने मोडून काढा म्हणजे एकसंध दूध दिसेल. दूध निम्मे आटले की गॅस बंद करा. दूध गार झाले की फ्रीज मध्ये ठेवा. एका वाटीत केशर सोडून सर्व सुकामेवा दूधात भिजत घाला व ती वाटी पण फ्रीजमध्ये ठेवा. दूधात भिजत घालताना दूध तापवून घ्या. व ते थंड झाले की त्यामध्ये सर्व सुकामेवा भिजत घाला.

दुसऱ्या दिवशी चित्रात दाखवल्याप्रमाणे सर्व फळे बारीक चिरा. शिवाय थोडा कोरडा सुकामेवा घाला. दूधात भिजलेला सुकामेवाही घाला. नंतर चिरलेल्या फळामध्ये आटीव दूध घाला. केशराच्या काड्या तव्यावर/कढल्यात गरम करून त्या गार दूधात चुरडून ते दूध घाला. रंग छान येतो. दुध थोडे व फळे जास्त असे प्रमाण आहे. पण सर्व फळे दूधामध्ये बुडतील इतपत दूध घाला. फळे आवडीप्रमाणे कमी जास्त घालावी.

स्ट्रॉबेरी व ब्ल्युबेरी फक्त सजावटीसाठी आहेत. आंबट फळे दूधात घालू नयेत. आंबटगोड फळे चालतील. शिवाय यामध्ये थोडा मधही घाला. आवडीप्रमाणे दूध जर जास्त दाट हवे असेल तर त्यात कस्टर्ड पावडर, मिल्क पावडर अथवा कंडेन्स्ड मिल्क घालू शकता.

असे हे फ्रूट सॅलड तयार झाले की परत फ्रीजमध्ये ठेवा. थंडगार फ्रूट सॅलड छान लागते. जेवणानंतर खाण्याची ही एक स्वीट डीश आहे. हे फ्रूट सॅलड काचेच्या कपातून खायला द्यावे ज्यातून आपण आयस्क्रीम खातो. वरील प्रमाणात चार जणांची स्वीट डीश होते.


Saturday, January 03, 2009

तुरीच्या डाळीची आमटी


जिन्नस:


१ वाटी शिजलेली तुरीची डाळ
दीड चमचा लाल तिखट
दीड चमचा गोडा/काळा/गरम मसाला
चिंचगुळाचे दाट पाणी अर्धी वाटी
हिरव्या मिरच्यांचे तुकडे ३-४
तेल, मीठ
फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद
थोडी चिरलेली कोथंबीर
थोडा खवलेला ओला नारळ


क्रमवार मार्गदर्शन:


मध्यम आचेवर कढई तापत ठेवावी. नंतर त्यात फोडणीसाठी पुरेसे तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी हिंग व हळद घालून फोडणी करा. लगेच त्यात शिजलेली डाळ डावेने चांगली घोटून घेऊन घाला. लाल तिखट, गोडा/काळा/गरम मसाला जो आवडेल तो किंवा जो उपलब्ध असेल तो घाला. चिंचगुळाचे दाट पाणी व चवीपुरते मीठ घाला. वाटी दीड वाटी पाणी घालून डावेने चांगले ढवळा. नंतर त्यात मिरच्यांचे जाड तुकडे, चिरलेली कोथिंबीर व खवलेला ओला नारळ घालून परत एकदा डावेने आमटी ढवळून घ्या. अजून २-३ वाट्या पाणी घाला. आता आच वाढवा व एक चांगली दणदणीत उकळी आणा. थोड्यावेळाने गॅस बंद करा. (आमटी दाट/पातळ जशी हवी असेल त्याप्रमाणात पाणी घालावे.)


आता एका ताटलीत वाफाळलेला गरम गरम भात घ्या. त्यावर गरम गरम आमटी वाढून घ्या. त्यावर साजूक तूप घाला. सोबत कैरीचे लोणचे घ्या आणि खा. बाहेर मुसळधार पाऊस पडत असेल तर हा गरम आमटी भात जरा जास्त खावासा वाटतो.

Thursday, January 01, 2009

श्रीखंड (2)
दही (Dannon All Natural Plain Yogurt 2 LB)
साखर
वेलची पूड
काजू, पिस्ते, बदाम
एका कॉटनच्या पातळ कपड्यामध्ये दही घाला. कपडा सर्व बाजुने गुंडाळून घेऊन घट्ट बांधा. व हे बांधलेले गाठोडे एका दांडीला रात्रभर टांगून ठेवा. रात्री ९ वाजता टांगून ठेवले तर सकाळी ९ वाजता त्या दह्याचा चक्का तयार होईल. जेव्हा दही गाठोड्यात बांधाल तेव्हा बाहेरूनच हाताने दाब द्या म्हणजे पाणी निथळून जाईल. असे टांगल्यावर काही तासांनी १-२ वेळेला बाहेरून दाबून पाणी निथळून घ्यावे. सकाळी पण गाठोडे उतरवताना थोडे बाहेरुनच पिळून घ्यावे म्हणजे उरलेले सर्व पाणी निथळून जाईल. शेवटी कपड्याच्या बाहेर दही यायला लागेल इथपर्यंत पाणी निथळू द्यावे.
तयार झालेला चक्का एका पातेल्यात काढून घ्या. जितका चक्का तयार होईल तितकी त्यात साखर घालून ढवळा. २-३ तासाने साखर मिसळलेला चक्का पुरणयंत्रातून काढा अथवा चाळणीतून घोटून घ्या. आता नितळ श्रीखंड तयार होईल. त्यात आवडीप्रमाणे वेलची पूड, काजू बदाम पिस्ते घाला. आवडत असल्यात थोडे केशर गरम करून त्याचा चुरा करून अगदी थोड्या दुधामध्ये मिक्स करून घाला.
वरील दह्यामध्ये साधारण दीड ते दोन वाट्या चक्का होतो. साखर मिसळून ३-४ वाट्या श्रीखंड बनते.तयार दही नसेल तर दुधाला विरजण लावून घरीच दही बनवा व त्याचा वरील प्रमाणे चक्का तयार करा.