Monday, September 22, 2008

चहाआपल्याला ज्या कपात चहा प्यायचा आहे त्या कपाच्या पाउण कप (थोडे वर) पाणी घ्या. त्यात थोडेसे दूध घाला म्हणजे तो पूर्ण कप होईल इतके. आता हे मिश्रण एका प्लॅस्टीकच्या ग्लासामध्ये घाला. हा प्लॅस्टीकचा ग्लॉस मोठा घ्या. त्यात टी बॅग्ज २ घाला व ग्लास मायक्रोवेव्ह मध्ये ठेवा. power - medium high व वेळ ४ मिनिटे. नंतर ग्लास बाहेर काढा. आत असलेल्या टी बॅग्ज चमच्याने खूप दाबा म्हणजे त्यात असलेल्या चहा पावडरचा रंग चहामध्ये उतरेल. नंतर कपात चहा ओतून (टी बॅग्ज वगळून) आवडीप्रमाणे त्यात साखर घालून चमच्याने ढवळा. चहा तयार! प्लॅस्टीक ग्लॉस वापरण्याचे कारण चहा गरम राहतो, लगेच गार होत नाही.

Monday, September 15, 2008

पालक भजी

जितकी पालक पाने तितकी भजी:


पालकाची निवडक पाने पाण्याने धुवून ती अलगद हाताने फडक्याने पुसून घ्या. हरबरा डाळीच्या पीठामध्ये थोडेसे तांदुळाचे पीठ घ्या. त्यात थोडे लाल तिखट, थोडी हळद, थोडी हिंग पावडर व चवीपुरते मीठ घालून पीठ जरा पातळसर भिजवा. कढईत तीव्र आचेवर तेल तापवून घ्या. तेल चांगले तापले की मध्यम आच ठेवा. पालकाची पाने एकेक करून डाळीच्या पीठामध्ये बुडवून ती तळण्यासाठी कढईत अलगद सोडा. काही वेळाने झाऱ्याने उलटा, व तांबुस रंग येईपर्यंत तळा. अशी ही हलकीफुलकी व कुरकुरीत भजी चवीला छान लागतात. पाहुणे आले की जेवणामध्ये ही भजी खूप उठून दिसतात.

Thursday, September 11, 2008

लोणी

आपण रोजच्या रोज दूध घेतो. साधारण १ लिटर दूधाची पिशवी बहुतेक जण रोज घेतात. पहिल्याप्रथम मंद आचेवर दूध तापवून घ्या. ते गार झाले की शीतकपाटात ठेवा. दुपारी ४ च्या सुमारास ते दूध शीतकपाटामधून बाहेर काढून त्यावर जमा झालेली दाट व जाड साय एका भांड्यात काढून ते भांडे परत शीतकपाटात ठेवा. याच पद्धतीने चार दिवसाची साय जमा करा. ४ दिवसानंतर ती जमा झालेली साय एका मोठ्या भांड्यात काढून त्यात दूध तापवून घाला. दूधाचे प्रमाण जमा झालेल्या सायीच्या दूप्पट असायला हवे. मग एका डावेने ढवळून घ्या.


नेहमी दही लावताना आपल्या हाताचे बोट दुधामध्ये घालून ते बोटाला सहन होण्याइतपत झाले की मग त्याला विरजण लावा म्हणजेच त्यामध्ये चांगल्या प्रतीचे दही घाला. दह्याचे प्रमाणही ऋतुमानाप्रमाणे ठरवावे. जसे की हिवाळ्यात दही जास्त घालायला लागते तितके ते उन्हाळ्यात कमी प्रमाणात पुरते. साय व दूध या मिश्रणात पुरेसे दही घालून परत एकदा डावेने/चमच्याने बरेच वेळा ढवळावे.


दाट सायीचे दही तयार झाले की एका भांड्यामध्ये किंवा चिनीमातीच्या बरणीमध्ये ताक घुसळायला घ्यावे. अजिबात पाणी न घालता रवी पूर्ण दह्याच्या खालपर्यंत घुसळायची रवी घालून ताक घुसळायला घ्यावे. ५ ते १० मिनिटात लोण्याचा गोळा रवीभोवती जमा होतो आणि खाली नितळ ताक तयार होते. आता एका भांड्यात पाणी घेऊन पहिल्याप्रथम रवीभोवती जमा झालेले लोणी सोडवून घ्या. रवी पाण्याने धुवून बाजूला ठेवा. नंतर पातेल्याच्या कडेकडेने सर्व लोणी सोडवून घ्या व लोण्याचा गोळा पाणी असलेल्या भांड्यात ठेवा. आता हे लोणी वर खाली करून पाण्याने धुवा भांड्यातच. त्यातले पाणी ताकात घाला. असे २-४ वेळा करा. म्हणजे लोण्यातील राहिलेला ताकाचा अंश पूर्णपणे निघून जाईल. मग हे लोणी दुसऱ्या एका भांड्यात घालून त्यात लोण्याच्या वर पाणी राहील इतके पाणी घालून ते शीतकपाटात ठेवा.
अश्याच प्रकारे परत ४ दिवसांची साय जमा करून परत एकदा याच पद्धतीने दही लावून त्याचे ताक बनवा व लोणी काढून ठेवा. पहिले साठवलेले लोणी आहे त्यातले पाणी काढून परत त्यात पाणी घालून लोणी वर खाली करून पाण्याने धुवा. व ते पाणी टाकून द्या. मग त्यावर दुसरे काढलेले लोणी ठेवून परत त्या लोण्याच्या वर पाणी येईपर्यंत पाणी घालून परत शीतकपाटामध्ये ठेवा. असे ८ दिवसाचे लोणी कढवून त्याचे साजूक तूप बनवा. साजूक तुपाची कृती मनोगतावर दिलेली आहे.


घरचे लोणी बनवले की घरचे सायीचे दही, साधे दही, ताक, लोणी व साजूक तूपही खायला मिळते. चांगल्या प्रतीचे व भरपूर प्रमाणात दूध दुभते तयार होते. पूर्वी हे सर्व जिन्नस ठेवायला एक लाकडी कपाट आणि त्याला वरून जाळी असे. यालाचा दुभत्याचे कपाट म्हणायचे. घरात लहान मूल असेल आणि त्याच्या तळहातावर असे ताजे लोणी ठेवले तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो. घरात कोणतेही शुभकार्य असेल तर जेवणावळीत घरचे तूप भरपूर प्रमाणात वाढता येते.

Wednesday, September 03, 2008

खमंग काकडी
मोदक


जिन्नस :

२ वाट्या खवलेला ओला नारळ, २ वाट्या चिरलेला गूळ
१ चमचा खसखस,
२ वाट्या तांदुळाचे पीठ, २ वाट्या पाणी
२ चमचे तेल, मीठ
उकड मळण्यासाठी तेल व पाणी
साजूक तूप २ चमचेखवलेला ओला नारळ व चिरलेला गूळ एकत्रित करा. मध्यम आचेवर पातेले ठेवून त्यात २ चमचे साजूक तूप घालून एकत्रित केलेले मिश्रण घालून शिजवा. काही वेळाने या मिश्रणाचे सारण बनायला लागते व ते कोरडे पडायला लागते. गॅस बंद करा. सारण शिजत आले की त्यात खसखस भाजून घाला.


मध्यम आचेवर एका पातेल्यात २ वाट्या पाणी तापत ठेवा. त्यात थोडेसे मीठ व २ चमचे तेल घाला. या पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करा. उकळलेल्या पाण्यात तांदुळाची पीठी घालून कालथ्याने पटापट एकसारखे ढवळा. नंतर परत मंद आचेवर हे पातेले ठेवून त्यावर झाकण ठेवा. एक दणदणीत वाफ येऊ देत. नंतर झाकण काढून ही तयार झालेली उकड एका ताटलीत काढून घ्या व त्यामध्ये पाणी व तेल घालून चांगली मळून घ्या.


उकडीचा साधारण मोठ्या लिंबाएवढा गोळा घेऊन त्याला गोल आकार द्या. पाणी व तेलाचा हात घेऊन हातानेच या गोल आकाराची पातळ, नितळ व खोलगट पारी बनवा. पारीच्या वरच्या कडा जास्त पालळ असायला हव्यात. नंतर या खोलगट पारीमध्ये पूरेसे सारण घालून थोड्या थोड्या अंतरावर पाकळीसारखा आकार द्या. पाकळीचा आकार देताना पारीच्या कडा दोन बोटांच्या चिमटीमध्ये पकडून दाब द्या. हा दाब तसाच पारीच्या खालपर्यंत द्या. अश्या प्रकारे सर्व पाकळ्या अगगद हाताने एकत्रित करून त्याचे मोदकाच्या वर एक टोक बनवा जसा देवळाला कळस असतो तसा.


अश्या प्रकारे सर्व मोदक करून घ्या. चाळणीला तेल लावून मोदक त्यामध्ये घालून कूकरमध्ये उकडून घ्या. कालावधी १५ मिनिटे. जश्या इडल्या उकडतो त्याप्रमाणे.

गरम गरम मोदकांवर साजूक तूप भरपूर प्रमाणात घ्या. चव चांगली लागते. वरील प्रमाणात साधारण १५ ते २० मोदक होतात.