Showing posts with label उपवासाचे पदार्थ. Show all posts
Showing posts with label उपवासाचे पदार्थ. Show all posts

Wednesday, July 17, 2024

उपासाचे बटाटेवडे

जिन्नस

मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे २
किसलेले आले १ ते दीड चमचा
खूप बारीक चिरलेल्या मिरच्या १ ते दीड चमचा
लिंबू पाव चमचा
चवीपुरते मीठ (सारण व पीठ भिजवण्यासाठी)
चिरलेली कोथिंबीर २ ते ३ चमचे
शिंगाड्याचे पीठ अर्धी वाटी
साबुदाण्याचे पीठ २ चमचे
दाण्याचे कूट २ - ३ चमचे
लाल तिखट अर्धा ते पाऊण चमचा
तेल अर्धा चमचा
वडे तळण्यासाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन : उकडलेले बटाटे कुस्करून घ्या. त्यात चिरलेले आले, मिरच्या व कोथिंबीर घाला. लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घाला. शिवाय दाण्याचे कूट घाला. आता एका पातेल्यात शिंगाडा पीठ, साबुदाणा पीठ, लाल तिखट व चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण पाणी घालून भिजवावे. जास्त घट्ट आणि जास्त पातळ नको. या पिठात अर्धा चमचा कच्चे तेल घालून परत एकदा पीठ कालवून घ्या. कढईत तेल तापत ठेवा. ते व्यवस्थित तापले की गॅस बारीक करा. बटाटेवड्याचे जे सारण बनवले आहे त्याचे चपटे-गोल गोळे करून शिंगाड्याचे जे पीठ भिजवले आहे त्यात बुडवून वडे कढईत सोडा आणि तपकिरी लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या. २ बटाट्याचे ६ वडे होतात. चवीला छान लागतात. हे वडे खास उपास स्पेशल आहेत. नेहमीच्या बटाटया वड्यांसारखेच हे वडे लागतात. खूप महिने झाले ही मी तयार केलेली रेसिपी डोक्यात घोळत होती. आज मुहूर्त लागला.





Friday, August 31, 2018

बटाट्याचा चिवडा

जिन्नस
कडक उन्हात वाळवलेला बटाट्याचा कीस
तेल
लाल तिखट
मीठ
साखर
तळलेले दाणे

मार्गदर्शन : कढईत तेल घाला. ते तापले की त्यात वाळलेला बटाट्याचा कीस थोडा थोडा घालून तळा. नंतर तळलेला कीस पेपर टॉवेलवर घाला जेणेकरून जास्तीचे तेल निथळेल. आता दाणे तेलात घालून ते तळून त्यात घाला. गॅस बंद करा. हा तळलेला चिवडा ज्या पेपर टॉवेल वर घातला आहे तो पेपर टॉवेल काढून घ्या. नंतर त्यात चवीनुसार लाल तिखट, मीठ आणि थोडी साखर घालून हा चिवडा हाताने मोडून काढा. हातानेच कालवा म्हणजे सर्व बाजून तिखट मीठाची चव लागेल. हा चिवडा मधवेळेला ऑफीस मधून आल्यावर
खायला उपयोगी पडतो. नंतर चहा हवाच.

उन्हाळ्याच्या दिवसात हा बटाट्याचा कीस भरपूर प्रमाणात वाळवून ठेवता येतो. नंतर केव्हाही तळून चिवडा
बनवता येतो.

मला हा वाळवलेला बटाट्याचा कीस इंडियन स्टोअर्स मध्ये मिळाला. हा चिवडा उपवासाला चालतो.

Friday, April 26, 2013

सुकामेव्याचे लाडू (dryfruits laduu) (1)


जिन्नस :
बदामाची सालासकट पूड अर्धी वाटी
काजूची पूड अर्धी वाटी
आक्रोडाची पूड अर्धी वाटी
दाण्याचे कूट अर्धी वाटी
पिस्ताची पूड ५ ते ६ चमचे
साखर पाऊण वाटी
साजूक तूप ४ ते ५ चमचे
वेलची पूड अगदी थोडी


मार्गदर्शन : वर दिलेल्या सर्व पावडरी एकत्र करा. त्यात साखर व साजूक तूप घाला. थोडी वेलची पूड घाला. वरील सर्व मिश्रण हाताने नीट एकसारखे एकत्र करा आणि लाडू वळा. साजूक तूप एकदम घालू नका. आधी ४ ते ५ चमचे घाला. लाडू नीट वळले जात नसतील तरच अजून थोडे तूप घाला. बाकीचे जिन्नसही आवडीनुसार घालू शकता. खसखस भाजून त्याची पूड, खारीक पूड, मनुका व बेदाणे असे सर्व घालू शकता. खसखस थोडीच घालावी कारण की ती खूप उष्ण असते. हे लाडू उपवासाला चालतात. शिवाय बाळंतिणीसाठी हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत.

Friday, June 29, 2012

चिकवड्या



जिन्नस :

अर्धी वाटी साबुदाणा
४ वाट्या पाणी
चवीपुरते मीठ

क्रमवार मार्गदर्शन : अर्धी वाटी साबुदाणा रात्री भिजवून ठेवा. साबुदाणा खिचडीला जसा साबुदाणा भिजवतो तसा भिजवा. त्यात थोडे पाणी राहू द्या. सकाळी भिजलेला साबुदाणा हाताने मोकळा करून घ्या. मध्यम आचेवर पातेले ठेवा व त्यात ४ वाट्या पाणी व मीठ घाला. नंतर त्यात मोकळा केलेला साबुदाणा घाला व हे मिश्रण शिजवा. शिजवताना डावेने हे मिश्रण ढवळत राहा म्हणजे पातेल्याला खाली लागणार नाही. पळीवाढे इतपत मिश्रण आटले की गॅस बंद करा. साबुदाणा शिजला की त्याचा पांढरा रंग जाईल म्हणजे मिश्रण झाले असे समजावे. नंतर प्लस्टीकच्या कागदावर चिकवड्या घाला. चिकवड्या घालताना जवळ जवळ घाला म्हणजे बऱ्याच चिकवड्या कागदावर मावतील. चिकवड्या चमच्याने घाला. चमच्याने मिश्रण कागदावर घातले की थोड्या गोल आकार देवून पसरवा. चिकवड्या जास्त पातळ नको व जाडही नकोत. चिकवड्यांना वाळवण्यासाठी खूप कडक उन लागते. २-३ तास कडक उन्हात चिकवड्या वाळल्या की हलक्या हाताने त्यांना उलटवा व दुसऱ्या बाजूने परत २-३ तास उन दाखवा. म्हणजे दोन्ही बाजूने चिकवड्या पूर्णपणे वाळतील. नंतर चिकवड्या एका पातेल्यात घाला व दुसऱ्या दिवशी परत उन्हात ठेवा. चिकवड्या चांगल्या कडकडीत वाळल्या पाहिजेत म्हणजे छान फुलतात. नंतर गरम तेलात चिकवड्या तळून भाजक्या शेंगदाण्याबरोबर खा. खूप छान लागतात. उपवसाला या चिकवड्या चालतात. अर्धी वाटी साबुदाण्यात छोट्या चिकवड्या ६० ते ६५ होतात.

Wednesday, June 27, 2012

बटाटा कचोरी


जिन्नस :
४ मधम आकाराचे बटाटे
मिरच्या २
नारळाचा खव मूठभर
लाल तिखट
कोथिंबीर मूठभर
दाण्याचे कूट मूठभर
मीठ चवीनुसार
साखर अर्धा चमचा
चारोळ्या, बेदाणे, बदामाचे काप ऐच्छिक
साबुदाण्याचे पीठ डावभर



क्रमवार मार्गदर्शन : बटाटे कूकरमध्ये उकडून घ्या. कूकर गार झाला की आतील बटाटे एका रोळीमध्ये काढून घ्या म्हणजे जास्तीचे पाणी निथळून जाईल. बटाटे पूर्ण गार झाले की त्याची साले काढून किसून घ्या. बटाटे किसले की त्यात १ मिरची व मीठ वाटून घाला अथवा लाल तिखट अर्धा चमचा व चवीनुसार मीठ घाला. हे सर्व मिश्रण एकजीव करा. ओला नारळाचा खव, कोथिंबीर, दाण्याचे कूट, मीठ व साखर, एका मिरचीचे खूप बारीक तुकडे असे कचोरीत घालायचे सारण तयार करा. त्यात हवे असल्यास चारोळ्या, बदाम काप व बेदाणे घाला. सारण एकत्रित कालवून घ्या.



आता बटाट्याच्या मिश्रणाचे छोटे गोळे करून घ्या व एकेक गोळ्याची कचोरी बनवा. कचोरी बनवताना गोळ्याला तेला/तूपाचा हात घेऊन त्याचा हातानेच नितळ गोळा करा व त्याची पातळ पारी बनवा. या पारीमध्ये ओल्या नारळाच्या खवाचे केलेले सारण बनवा व ही पारी हाताने सर्व बाजूने एकत्र करून पारी बंद करा म्हणजे सारण बाहेर येणार नाही. गोल आकाराच्या कचोऱ्या बनवून घ्या. नंतर एका स्टीलच्या वाडग्यात साबुदाण्याचे पीठ घ्या व या पीठात सर्व कचोऱ्या घोळवून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात तेल/तूप घाला. तेल पुरेसे तापले की  आच मंद ठेवा व तांबूस रंगावर सर्व कचोऱ्या तळून घ्या. या कचोऱ्या उपवासाला चालतात.



Wednesday, June 20, 2012

बटाटा पापड




जिन्नस :
१ मोठा बटाटा
लाल तिखट १ चमचा
जिरे पूड अर्धा- पाव चमचा
मीठ चवीपुरते
साबुदाणा पीठ ३-४ चमचे
पापड लाटण्यासाठी साबुदाणा पीठ वेगळे घ्या.



मार्गदर्शन : बटाटा कूकरमध्ये उकडून घ्या. कूकरमधून शिजलेला बटाटा एका रोळीमध्ये काढून ठेवा म्हणजे जास्तीचे पाणी निथळून जाईल. बटाटा गार झाला की त्याचे साल काढून किसून घ्या. किसलेल्या बटाट्यामध्ये लाल तिखट, जिरेपूड, साबुदाणा पीठ व मीठ घालून हे मिश्रण हातानेच खूप एकजीव करा. नंतर साजूक तूपाचा हात घेऊन हे मिश्रण मळा. नंतर हे मिश्रण खूप कुटा. पीठ एकदम नितळ झाले पाहिजे. लोखंडी खलबत्यात हे मिश्रण खूप छान कुटले जाते. खलबत्ता नसेल तर एका पसरट पातेल्यात पीठ ठेवून त्यावर वाटीने आपटा. वाटी कलती करून हे मिश्रण वाटीनेच कूटा. वाटीच्या कडा या पीठावर पडल्या पाहिजेत. नंतर पोलपाटावर साबुदाण्याचे पीठ घ्या. कुटलेले बटाट्याच्या पीठाला डांगर म्हणतात. या डांगराचे छोटे गोळे करून एका गोळीचा एक पापड असे पापड लाटा. पापड लाटताना पीठाचा वापर जास्त करा. खूप पातळ पापड लाटून झाले की एका प्लॅस्टीकच्या कागदावर हे पापड उन्हात चांगले कडक वाळवा व नंतर एका डब्यात ठेवा. डब्याचे झाकण पूर्णपणे बंद होईल याची काळजी घ्या. नाहीतर हवा लागून हे पापड लापट होतील. उपवासाचा हे पापड चालतात. नंतर हे पापड तळून खा. पापड हलकाफुलका झाला पाहिजे. डांगर एकजीव एकसंध झाले आणि पापड पातळ लाटला गेला की पापड खूप छान होतात. पापड तळले की फुलतात आणि हलकेफुलके होतात. हे पापड चवीला खूप छान लागतात. डांगरही खूप छान लागते. १ मोठ्या बटाट्यामध्ये साधारण लहान २० ते २५ पापड होतात.

हे पापड भाजूनही छान लागतात. भाजलेल्या किंवा तळलेल्या पापडासोबत भाजके शेंगदाणे आवडत असल्यास घ्यावेत.

Wednesday, March 28, 2012

साबुदाणा वडा



वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस

साबुदाणा १ वाटी
बटाटा १, अर्धे छोटे लिंबू
बारीक वाटलेल्या हिरव्या तिखट मिरच्या ५-६ किंवा दीड ते २ चमचे लाल तिखट
पाव वाटी चिरलेली कोथिंबीर
दाण्याचे कूट पाव ते अर्धी वाटी
चवीपुरते मीठ,
१ चमचा साखर
तळणीसाठी तेल,

क्रमवार मार्गदर्शन: १ वाटी साबुदाणा ४ तास भिजत घालावा. भिजवताना पाणी निथळून घ्यावे. ४ तासानंतर भिजलेला साबुदाणा मोकळा करून घ्यावा. त्यात कच्चा बटाटा साल न काढता किसून घाला. नंतर त्यात वाटलेल्या मिरच्या किंवा लाल तिखट, मीठ व साखर घाला. नंतर त्यात दाण्याचे कूट घालून लिंबू पिळा व चिरलेली कोथिंबीर घाला. हे मिश्रण हाताने नीट कालवा. कालवताना थोडे पाणी घाला. मिश्रण मिळून येण्यापुरतेच पाणी घालावे.



आता मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात तेल घाला व साबुदाण्याचे मिश्रण बनवले आहे त्याचे गोल आकाराचे वडे लालसर रंगावर तळून घ्या. वडे तळल्यावर ते पेपर टॉवेल वर ठेवा म्हणजे त्यातले तेल निथळून जाईल. नारळ्याच्या चटणीसोबत हे वडे छान लागतात.

Wednesday, January 04, 2012

शिंगाडा पीठ लाडू



जिन्नस:

शिंगाडा पीठ १ वाटी
दाण्याचे कूट अर्धी वाटी
साजूक तूप ५ ते ६ चमचे
पीठीसाखर सपाट १ वाटी

क्रमवार मार्गदर्शन: मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात शिंगाडा पीठ व साजूक तूप घालून लालसर रंग येईपर्यंत भाजा. भाजल्यावर गॅस बंद करून त्यात दाण्याचे कूट व साखर घालून चांगले ढवळा. मिश्रण कोमट असताना लाडू वळा. आधी २-३ चमचे साजूक तूप घालून भाजायला सुरवात करा व नंतर बाकीचे तूप भाजत असतानाच थोडे थोडे घाला म्हणजे शिंगाडा पीठ पूर्णपणे तूपात भिजले का नाही ते कळेल. वर साजूक तूपाचे प्रमाण दिले आहे, पण कमी-जास्त लागेल, कारण पीठ तूपात भिजले पाहिजे. शिंगाडापीठ तूपात भिजल्यावर तपकिरी दिसते पण भाजून झाल्यावर थोडा रंग बदलतो. रंग बदललेला तसा कळत नाही. अंदाजाने नीट बघून भाजावे.

बेसन लाडवाप्रमाणेच ह्या लाडवाची पद्धत आहे. हे लाडू खूप खमंग लागतात. १ वाटीत छोटे छोटे १० ते १२ लाडू होतात.

Tuesday, August 09, 2011

बटाटा कीस



जिन्नस :

बटाटे ३
लाल तिखट पाव चमचा
हिरव्या मिरच्यांचे तुकडे ५-६
जिरे पाव चमचा
तेल/तूप फोडणीसाठी
मीठ, साखर,
कोथिंबीर २-३ चमचे चिरलेली
खवलेला ओला नारळ २-३ चमचे
दाण्याचे कूट मूठभर



मार्गदर्शन : बटाटे धुवून घ्या व ते किसणीवर सालासकट किसा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात पुरेसे तेल/तूप घाला. ते तापले की त्यात जिरे घाला. जिरे तडतडले की त्यात मिरच्यांचे तुकडे व किसलेला बटाट्याचा कीस घाला. थोडे परता. नंतर त्यावर झाकण ठेवा व काही सेकंदाने झाकण काढा व परता. असे २-३ वेळा करा म्हणजे बटाट्याचा कीस शिजेल. नंतर त्यात लाल तिखट, चवीपुरते मीठ , थोडी साखर व दाण्याचे कूट घालून परत नीट ढवळा. झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून त्यात चिरलेली कोथिंबीर व खवलेला नारळ घालून परत एकदा नीट ढवळा. परत झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा व गरम गरम कीस डीश मध्ये खायला घ्या. हा कीस खूपच चविष्ट लागतो. ही उपवासाची डीश आहे.

Wednesday, August 03, 2011

भोपळा खीर



जिन्नस:

लाल भोपळ्याचा कीस अडीच वाट्या
दूध ३ वाट्या
साजूक तूप ३-४ चमचे
साखर ८-१० चमचे

क्रमवार मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात साजूक तूप व किसलेला भोपळ्याचा कीस घाला व परता. झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून परता. असे २-३ वेळा करा. वाफेवर किसलेला भोपळा शिजवून घ्या. हा भोपळा पटकन शिजतो. शिजवण्याकरता पाणी अजिबात घालू नये. नंतर त्यात दूध व साखर घाला व आटवा. आटवताना अधून मधून ढवळत रहा. ही एक भोपळ्याची चवदार खीर छान लागते. खीर दाट होईपर्यंत दूध आटवा. पटकन होणारी, चविष्ट व दाट खीर खूप छान लागते. जेवणानंतर स्वीट डिश म्हणून ही एक खूप छान खीर आहे.

Friday, July 01, 2011

खांडवी



जिन्नस :

वऱ्याचे तांदुळ अर्धी वाटी
चिरलेला गूळ पाऊण वाटी

साजूक तूप  १ चमचा
पाणी दोन वाट्या (सव्वा दोन वाट्या) अर्धी वाटी घेताना काही वेळा थोडे जास्त घेतले जाते म्हणून
खवलेला ओला नारळ अर्धी वाटी



क्रमवार मार्गदर्शन : वऱ्याचे तांदुळ पाण्याने धुवून घ्या व निथळत ठेवा. पाणी निथळून गेले की मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. त्यात साजूक तूप घालून धुतलेले वऱ्याचे तांदुळ घाला व भाजा. रवा भाजतो त्याप्रमाणे भाजा ब्राऊन रंग येईपर्यंत. त्याच वेळेला एका पातेल्यात पाणी घ्या आणि मध्यम आचेवर तापत ठेवा. उकळी यायला लागली की गॅस बंद कर


नंतर भाजलेल्या वऱ्याच्या तांदुळात साधारण उकळी आलेले पाणी घाला आणि गूळही घाला.  आता हे सर्व मिश्रण उकळायला लागेल आणि वऱ्याचे तांदुळ शिजायला लागतील. एकीकडे ढवळत रहा. नंतर आच कमी करून त्यावर झाकण ठेवा व वाफ द्या. झाकण काढून परत थोडे ढवळा. अशा ४-५ वाफा येऊ द्यात म्हणजे वऱ्याचे तांदुळ चांगले शिजतील व त्याचा गोळा बनायला लागेल. वऱ्याचे तांदुळ व्यवस्थित शिजायला हवेत. नीट शिजले नाहीत तर थोडे पाणी घालून अजून थोडी वाफ द्या. एकत्र झालेला गोळा तूप लावलेल्या एका ताटलीत पसरवून एकसारखा थापून घ्या. थोड्यावेळाने जाडसर वड्या पाडा. त्यावर खवलेला नारळ सर्व वड्यांवर घाला. खांडवी खाताना त्यावर साजूक तूप घेऊन खा. ही खांडवी पूर्ण साखर घालून पण करता येते किंवा निम्मे साखर व निम्मे गूळ घालून पण करता येते. कमी गोड हवी असल्यास गूळ अर्धा वाटी घ्या.

ही खास उपवासाची खांडवी आहे. याप्रमाणे तांदुळाच्या रव्याची पण खांडवी करतात.

Monday, July 12, 2010

गोड लिंबू लोणचे



वाढणी: २ जण

पाककृतीला लागणारा वेळ: १५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

* लिंबू ६ (हिरव्या/पिवळ्या सालीचे)
* लाल तिखट पाव वाटी
* मीठ 1 वाटी
* साखर दोन वाट्या
* जीरे पूड अर्धा चमचा

क्रमवार मार्गदर्शन:

६ पैकी ५ लिंबाच्या प्रत्येकी चार किंवा आठ फोडी करून त्यात लाल तिखट, मीठ, साखर व जीरेपूड घालून चमच्याने ढवळा/एकत्रीत करा. या मिश्रणाची चव घेऊन जे काही कमी वाटत आहे (तिखट, मीठ साखर) त्याप्रमाणे अजून थोडे घालून ढवळा. नंतर काचेच्या बरणीमधे हे तयार झालेले लोणचे भरून ठेवा. बाटलीमधे भरल्यावर एक लिंबू चिरून त्याचा रस लोणच्यामधे पिळावा. लिंबाच्या फोडी मुरायला बराच वेळ लागतो पण लोणच्याचा खार २-४ दिवसात तयार होतो.

हे लोणचे उपासाला चालते. शिवाय मेतकूट-तूप-भात याबरोबर खायलाही छान लागते.

Saturday, January 24, 2009

दाण्याचे लाडू

जिन्नस

दाण्याचे कूट २ वाट्या
साखर १ वाटी
साजूक तूप पातळ ७-८ चमचे


वरील सर्व जिन्नस एकत्र करून लाडू वळा. तूप घालताना आधी थोडेसेच घालावे. मिश्रण एकत्र करून लाडू वळून पाहावा. नीट वळला गेला नाही तर अजून तूप घालावे. जास्त तूप झाले तरीही हे लाडू बेसनाच्या लाडवांप्रमाणे बसतात! दाणे भाजण्याची गरज नाही. भारतात भट्टीतून दाणे भाजून मिळतात. अमेरिकेत भाजक्या शेंगा मिळतात. दाण्याची टरफले काढून कूट करा. असे हे झटपट लाडू तय्यार!


ह्यात थोडा गूळही छान लागतो. खमंगपणा येतो. पूर्ण गुळाचेही छान लागतात. तसेच यात आवडीनुसार सुकामेव्याची पूडही घालू शकता. मनुका बेदाणे घाला. आपापल्या आवडीप्रमाणे सजवा! पण मला फक्त नुसते दाण्याच्या कुटाचेच लाडू आवडतात!

Friday, January 16, 2009

फ्रूट सॅलड





जिन्नस :
३ वाट्या दाट दूध (whole milk)
१ वाटी साखर

फळे:

टरबूज
केळी
पपई
सफरचंद
द्राक्षे
pear
संत्री
चिक्कू
अंजीर
डाळिंबाचे दाणे
हापुस आंब्याच्या फोडी
स्ट्रॉबेरी (फक्त सजावटीसाठी)
ब्ल्युबेरी (फक्त सजावटीसाठी)

सुकामेवा:

काजू
बदाम
पिस्ते
मनुका
सुके अंजिर
केशर
खजूर
मध
क्रमवार मार्गदर्शन :

एका पातेल्यात दूध घेऊन ते मध्यम आचेवर तापवत ठेवा. दूध तापले की त्यात साखर घाला व चांगले उकळू द्या. उकळल्यावर दूध वर येईल. डावेने दूध सतत ढवळत रहा. साय येत राहते व दूध आटत जाते. प्रत्येक वेळी साय आली की डावेने मोडून काढा म्हणजे एकसंध दूध दिसेल. दूध निम्मे आटले की गॅस बंद करा. दूध गार झाले की फ्रीज मध्ये ठेवा. एका वाटीत केशर सोडून सर्व सुकामेवा दूधात भिजत घाला व ती वाटी पण फ्रीजमध्ये ठेवा. दूधात भिजत घालताना दूध तापवून घ्या. व ते थंड झाले की त्यामध्ये सर्व सुकामेवा भिजत घाला.

दुसऱ्या दिवशी चित्रात दाखवल्याप्रमाणे सर्व फळे बारीक चिरा. शिवाय थोडा कोरडा सुकामेवा घाला. दूधात भिजलेला सुकामेवाही घाला. नंतर चिरलेल्या फळामध्ये आटीव दूध घाला. केशराच्या काड्या तव्यावर/कढल्यात गरम करून त्या गार दूधात चुरडून ते दूध घाला. रंग छान येतो. दुध थोडे व फळे जास्त असे प्रमाण आहे. पण सर्व फळे दूधामध्ये बुडतील इतपत दूध घाला. फळे आवडीप्रमाणे कमी जास्त घालावी.

स्ट्रॉबेरी व ब्ल्युबेरी फक्त सजावटीसाठी आहेत. आंबट फळे दूधात घालू नयेत. आंबटगोड फळे चालतील. शिवाय यामध्ये थोडा मधही घाला. आवडीप्रमाणे दूध जर जास्त दाट हवे असेल तर त्यात कस्टर्ड पावडर, मिल्क पावडर अथवा कंडेन्स्ड मिल्क घालू शकता.

असे हे फ्रूट सॅलड तयार झाले की परत फ्रीजमध्ये ठेवा. थंडगार फ्रूट सॅलड छान लागते. जेवणानंतर खाण्याची ही एक स्वीट डीश आहे. हे फ्रूट सॅलड काचेच्या कपातून खायला द्यावे ज्यातून आपण आयस्क्रीम खातो. वरील प्रमाणात चार जणांची स्वीट डीश होते.


Friday, October 17, 2008

साबुदाणा थालिपीठ



जिन्नस :

भिजलेला साबुदाणा १ वाटी
बारीक वाटलेल्या तिखट मिरच्या २ चमचे
शिंगाड्याचे पीठ ३-४ चमचे
१ छोटा कच्चा बटाटा किसलेला (साले काढून)
बारीक चिरलेली कोथिंबीर व नारळाचा खव अर्धी वाटी
१ चमचा साखर
अर्धी वाटी दाण्याचे कूट
चवीपुरते मीठ
साजूक तूप/तेल

क्रमवार मार्गदर्शन :
वरील सर्व साहित्य एकत्र करून नीट कालवून घ्या. हे कालवलेले पीठ जर घट्ट वाटले तर अगदी थोडे पाणी घाला. एकत्रित केलेल्या मिश्रणाचे २ मोठे गोळे करा. तव्याला तेल/तूप लावून घ्या. त्यावर एक गोळा ठेवून सर्वबाजूने एकसारखे थालिपीठ थापा. नंतर त्यावर ४-५ भोके पाडून त्यात तेल/तूप घालून मध्यम आचेवर तवा ठेवावा. त्यावर झाकण ठेवावे. काही सेकंदाने झाकण काढून थालिपीठ कालथ्याने उलटून घ्या. काही सेकंदाने थालिपीठ तव्यावरून काढा. थालिपीठ तांबूस रंग येईपर्यंत ठेवा. म्हणजे खरपूस होईल.


हे थालिपीठ लाल तिखट घालूनही करतात. बाकीचे सर्व साहित्य वरील प्रमाणे फक्त बारीक वाटलेल्या मिरची ऐवजी लाल तिखट व थोडी जिरे पावडर घालून असेच थालिपीठ करा.


दोन्ही प्रकारे हे थालिपीठ छान लागते. सोबत थंडगार दही व गोड लिंबू लोणचे छान लागते.

Sunday, August 10, 2008

ओल्या नारळाची चटणी


वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

अडीच वाट्या ओल्या नारळाचा खव,
चिरलेली कोथिंबीर २-३ चमचे,
हिरव्यागार मिरच्या २-३
अर्ध्या लिंबाचा रस
मीठ, साखर अर्धा चमचा

क्रमवार मार्गदर्शन:

वरील सर्व मिश्रण मिक्सर/ग्राइंडर मधून बारीक करा. थोडे पाणी घाला म्हणजे मिळून येईल. ही चटणी इडली, बटाटेवडा, मेदुवडा, साबुदाणा वडा यासोबत छान लागते. शिवाय उपवासाला पण चालते आणि सणवारात नैवेद्याच्या ताटात डावीकडे शोभून दिसते.

ही चटणी दह्यामध्ये मिसळून त्यावर तूप/तेल-जिरे- हिंग याची फोडणी दिल्यास अधिक चवदार होते शिवाय पुरवठ्यालाही येते.

माहितीचा स्रोत:स्वानुभव

Wednesday, July 16, 2008

साबुदाण्याची खिचडी




वाढणी:२ जण


पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे


पाककृतीचे जिन्नस:


१ वाटी चांगल्या प्रतीचा साबुदाणा
दाण्याचे कूट मूठभर, १ छोटा बटाटा
हिरवी मिरची १-२, लाल तिखट पाउण ते १ चमचा
जिरे १ चमचा, साजूक तूप/तेल ५-६ चमचे
मीठ, साखर, चिरलेली कोथिंबीर २-३ चमचे
खवलेला ओला नारळ २-३ चमचे


क्रमवार मार्गदर्शन:


साबुदाणा पाण्याने धुवून २-३ तास भिजत घालावा. थोडेसे पाणी राहू द्या म्हणजे जास्त चांगला भिजेल. कच्चा बटाट्याची साले काढून त्याचे काचऱ्या चिरतो तसे पातळ काप करून पाण्यामध्ये घाला. मध्यम आचेवर कढई ठेवा. त्यात तेल/साजूक तूप घालून ते पूरेसे तापले म्हणजे त्यात जिरे घाला, ते तडतडले की त्यात मिरच्यांचे चिरलेले तुकडे घाला व पातळ चिरलेला बटाटा घाला व परता. बटाटा घालताना त्यातले पाणी काढून टाका. त्यावर १-२ मिनिटे झाकण ठेवून बटाटे वाफवून घ्या. ते शिजले की त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर व खवलेला ओला नारळ घालून परत परता. आता गॅस मंद करा. त्यात थोडेसे मीठ पेरून परत थोडे परता. आता भिजवलेला साबुदाणा आहे तो हाताने मोकळा करून घ्या. त्यात लाल तिखट,चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा साखर व दाण्याचे कूट घालून चांगले ढवळून घ्या. व हे ढवळलेले मिश्रण कढईत घालून सगळीकडून खिचडी चांगली ढवळा. नंतर त्यावर झाकण ठेवून १-२ मिनिटे वाफवून घ्या. असे एक दोन वेळा करा, म्हणजे साबुदाणा चांगला शिजेल व त्याचा रंगही बदलेल. कालथ्याने खिचडी परत परत व्यवस्थित ढवळा म्हणजे मोकळी होईल. गोळा होणार नाही. तेल/तूप कमी वाटले तर वरून थोडे घालून ढवळणे.


साबुदाणा भिजवल्यावर दर अर्ध्या तासाने मोकळा करून घ्या. दोन बोटांच्या चिमटीत साबुदाणा धरून तो व्यवस्थित भिजला आहे ना याची खात्री करून घ्या. भिजला नसेल तर थोडासा पाण्याचा हबका मारून त्यावर परत झाकण ठेवा.


खिचडी सर्वात चविष्ट साजूक तूपातील होते.

Monday, August 20, 2007

बटाट्याचे डांगर




वाढणी:२ जण


पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे


पाककृतीचे जिन्नस:


१ मोठा बटाटा
लाल तिखट २ चमचे, जिरे पावडर पाऊण चमचा,
साजूक तूप ६-७ चमचे, साबुदाणा पीठ १० चमचे,
मीठ चवीपुरते


क्रमवार मार्गदर्शन:


बटाटा कूकरमध्ये उकडून घ्या. गार झाल्यावर साले काढून त्यात लाल तिखट, जिरे पावडर, साबुदाणा पीठ, व मीठ घालून खलबत्त्यात कूट कूट कूटा. खलबत्ता नसेल तर फूड प्रोसेसरमध्ये एकजीव करा. कुटून झाल्यावर तूप लावून थोडे हाताने एकसारखे करा. कूटतानाही अधून मधून थोडे तूप घालावे म्हणजे एकजीव होण्याकरता मदत होते. आणि खा. खूप मस्त व चविष्ट लागते. तोंडाला चव येते. डांगर नुसते खाताना साजूक तूप भरपूर घ्यावे.



माहितीचा स्रोत:सौ आई


अधिक टीपा:हे डांगर उपासाला चालते. ह्या डांगराचे पापड अथवा मिरगुंड करा. हे डांगर खूप कुटल्यामुळे पापड खूप हलके फुलके होतात. पापड तळून अथवा भाजुनही छान लागतो. पापड/मिरगुंडा बरोबर भाजके दाणे मस्त लागतात.


Monday, January 15, 2007

वऱ्याचे तांदुळ

वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

१ वाटी वऱ्याचे तांदुळ
मूठभर दाण्याचे कूट,
मूठभर चिरलेली कोथिंबीर, मूठभर खवलेला ओला नारळ
१ तिखट मिरची, साजुक तूप २-३ चमचे
जिरे १ चमचा, ५ वाट्या पाणी
मीठ

क्रमवार मार्गदर्शन: सर्वात आधी वऱ्याचे तांदुळ धुवून घेणे आपण भाताला धुवून घेतो तसे. साजुक तूपामध्ये जिरे, मिरचीचे तुकडे, व वऱ्याचे तांदुळ घालून थोडे परतणे मध्यम आचेवर. नंतर त्यामध्ये ३ वाट्या पाणी घालून शिजवणे. थोडे शिजत आले की त्यात कोथिंबीर, नारळ, दाण्याचे कूट, चवीपुरते मीठ व अजून २ वाट्या पाणी घालून सर्व मिश्रण कालथ्याने ढवळणे. पाणी आटत आले की गॅस मंद करून झाकण ठेवणे. १० मिनिटांनी गॅस बंद करणे. वऱ्याचे तांदुळ लवकर शिजतात, पण गार झाले की खूप घट्ट होतात म्हणून जास्त पाणी घालावे लागते.


रोहिणी