Tuesday, December 06, 2011

पुरणपोळी

आमच्यात पुरणावरणाचा घाट असतो बरं का! कोणताही सण आला की बाकीचे कोणतेही पक्वान्न असले तरी पुरण हे लागतेच! इति देब्रा! कोब्रा या पुरणावरणाच्या फंदात कधी पडत नाहीत. घाट घालण्याच्या क्रियेत ते जरा लांबच राहतात!

मला पण आठवायला लागेल की मी पुरण किती वेळा आणि केव्हा घातले होते बरे! आठवून काही फायदा नाही. कारण की लांबलचक रेसिपींपासून मी जरा दूरच असते. भारतात असताना जास्तीचे कोणी पाहुणे आले किंवा सणासुदीला तयार श्रीखंडच आणायचे, अमूल व वारणा! या अमुलवारणाचे डबे तर मला खूपच आवडायचे.

अमेरिकेत आल्यावर मात्र बरेच आवडणारे तिखटगोड पदार्थ घरात करण्यावाचून गत्यंतर उरले नाही. एकदा माझ्या पंजाबी मैत्रिणीने फोन करून मला सांगितले की मला पुरणपोळी शिकायची आहे आपण करायची का एकदा? मी तुझ्या मदतीला येईन. मी म्हणाले चालेल की! करू या, येत्या होळीच्या मुहूर्तावरच करू. मलाही खूप आवडते! विचार केला या दोघा पंजाबी नवराबायकोबरोबर अजूनही ओळखीच्या चार पाच मित्रमैत्रिणींना बोलावू. मस्तपैकी पुरणावरणाचा घाटच घालू की जो जन्मात कधी घातला नाही!


पंजाबी दोघे जण, दक्षिण भारतीय दोघे जण, आम्ही दोघे व एक मराठमोळा मित्र म्हणजे ७ ते ८ जणांचा पुरणपोळीचा बेत ठरवला. त्यावेळी माझ्याकडे पुरणयंत्र नव्हते, अजूनही नाही. खरे तर पुरण हे पुरणयंत्रातूनच जास्त चांगले वाटले जाते. पुरणयंत्र नसताना पुरणपोळीचा घाट घातला होता.


पुरण जास्तीत जास्त बारीक कसे करायचे यावर एक युक्ती काढली. त्यावेळेला माझ्याकडे भारतातून आणलेला मोठा कुकर होता. त्यात ६ वाट्यांची हरबरा डाळ शिजवली. इलेक्ट्रिक शेगडीवर कुकराला वाफ धरायला अर्धा तास तरी जातोच. कुकराला शिट्या भरपूर केल्या, इतक्या की आतल्या डाळीचा भुगा पडून ती उलट शिट्टीतून बाहेर यायला लागली! नंतर डाळ साखरगुळ घालून शिजवायला कढईत ठेवली. शिजवताना एकीकडे कालथ्याने डाळीवर वार करत राहिले जेणेकरून सर्व डाळ खूप बारीक झाली पाहिजे. मिश्रण छान मिळून आले होते. मिश्रण गार झाले. कणकेलाही चांगलेच तिंबून घेतले होते. आता एवढी सगळी जय्यत तयारी झाल्यावर पोळ्या कशा काय बिघडतील!?


कणकेच्या छोट्या गोळ्याला हातानेच पुरीसारखा आकार दिला. त्यात पुरणाचा साधारण मुठीइतका गोळा भरून पोळी लाटायला सुरवात केली. पोळी लाटली जात होती पण लाटताना भरड लाटली जात आहे हे जाणवत होते. पोळीमधून अगदी छोटे छोटे न शिजलेले डाळीचे बारीक कण पोळीच्या वरती आले होते. पोळी ठिगळ लावलेल्या कापडाप्रमाणे दिसत होती. पूरण शिजले होते पण त्यात खूप छोटे डाळीचे बारीक कण न शिजताच तसेच राहून गेले होते. सर्व पोळ्या करून मग एकत्रच सर्व जेवायला बसणार होतो. कुणीतरी म्हणाल्याचे आठवले की पुरणयंत्र नसेल तर मिक्सर मधून बारीक करता येते. इथले ब्लेंडर म्हणजे काय दिव्यच असतात. पुरण घातले ब्लेंडरमध्ये तर पुरणाचा सगळ्यात खालचा थर फिरत होता. वरचा थर' जैसे थे' स्थितीत होता. म्हणतात ना की काम बिघडले तर कामात काम अजूनच वाढत जाते. मिक्सरमध्ये पुरण बारीक झाले नाहीच, शिवाय मिक्सर धुण्याचे एक काम वाढले.


मैत्रिणीला सांगितले की या पुरणामधले सर्व न शिजलेले डाळीचे बारीक कण वेगळे करायला घे. मला जाम वैतागायला झाले होते. मैत्रीण म्हणाली 'आप क्युं चिंता कर रही है, मै ये काम कर देती हुँ अलग करनेका' काम खूपच किचकट होऊन बसले होते. ती मैत्रीण आरामात एका परातीत पुरण घेऊन न शिजलेले कण बाजूला करत होती. एकीकडे दूरदर्शन बघत होती. मी मनात 'अगं बाई ही वेळ आरामात दूरदर्शन बघून तांदूळ निवडण्याची नाहीये. युद्धपातळीवर कामे व्हायला हवीत.' मग मी पण अर्धे मिश्रण एका परातीत घेतले आणि दोघींनी मिळून डाळीचे बारीक कण अलग करण्याचे काम करत राहिलो. तसे काम पटकन झाले आणि एकीकडे हासत राहिलो:D एकमेकींना छोटे कण दाखवत राहिलो, 'ये देख,,, कितने है,,, छोटे कण,,:) ' या डाळीच्या कणांचे अलग करण्याच्या कामात मी जास्त वेळ रेंगाळत राहिले नाही. एकेक करत मी पुरणपोळ्या लाटायला सुरवात केली. आता पुरणपोळ्या मऊसूत छान होत होत्या. दोघे दोघे करत जेवायला बसले. गरम गरम पोळ्यांवर भरपूर साजूक तूप! पोळ्या पटापट संपत होत्या. सगळ्यात शेवटी माझ्या वाटणीच्या गरम पोळ्या घेऊन त्यावर भरपूर साजूक तूप घातले आणि 'आहाहा,,, ' करत पोळ्या खाल्ल्या. मला पुरणपोळी वर भरपूर तूप लागते. पोळीवर तूप तरंगायला हवे.


त्या एपिसोडनंतर मी इतक्या पोळ्या कधीच केल्या नाहीत. आम्हाला दोघांना एक वाटी हरबरा डाळीच्या पोळ्या भरपूर होतात. अजूनही माझ्याकडे पुरणयंत्र नाही. पण माझे काहीही अडत नाही. आता मी हरबरा डाळ शिजवण्या आधी एक तास गरम पाण्यात भिजत घालते आणि मग कुकरामध्ये शिजवते. बाकीचे सर्व तसेच.

Tuesday, November 01, 2011

खसखशीच्या वड्याजिन्नस :
खसखस अर्धी वाटी
दूध अर्धा कप
बदाम अर्धी वाटी
काजू अर्धी वाटी
साजूक तूप २ चमचे
साखर दीड वाटी

मार्गदर्शन :
खसखस दूधामध्ये भिजत घाला. बदाम गरम पाण्यामध्ये भिजत घाला. तासाभराने भिजवलेले सर्व बदाम सोला. मिक्सरमध्ये सोललेल्या बदामाची व काजूची पूड करा. नंतर भिजवलेली खसखस मिक्सरमध्ये घालून बारीक करा व त्यात बदाम काजूची केलेली पूड घालून परत एकदा मिक्सरमधूनध्ये सर्व बारीक करा. हे सर्व मिश्रण साधारण ३ वाट्या होईल. नंतर मध्यम आंचेवर कढई तापत ठेवा व त्यात २ चमचे तूप घालून त्यात खसखस, बदाम व काजू यांचे बारीक केलेले मिश्रण घाला व कालथ्याने थोडे परतून घ्या. नंतर मध्यम आचेवर दुसऱ्या कढईत साखर व साखर बुडेल इतके पाणी घ्या व त्याचा एक तारीहून थोडा जास्त कडक पाक करून परतलेले मिश्रण त्यात घाला व कालथ्याने ढवळत रहा. काही वेळाने हे मिश्रण घट्ट होईल व त्याचा एक गोळा तयार होईल. गॅस बंद करा व मिश्रण कालथ्याने थोडे घोटा.पाक करायच्या आधी स्टीलच्या दोन ताटल्यांना साजूक तूपाचा हात लावून ठेवा. त्यावर हे गोळा झालेले मिश्रण घाला, एकसारखे पसरवा व लगेच वड्या पाडा. वड्या गार झाल्यावर डब्यात भरा. या वड्या थंडीसाठी उपयुक्त आहेत.

Monday, October 31, 2011

बदाम खीर
जिन्नस :

बदाम २२
साखर १० चमचे
साजूक तूप १ चमचा
दूध अडीच कप


मार्गदर्शन :
मिक्सरवर २ बदामांची सालासकट पूड करा. २० बदाम गरम पाण्यात भिजत घाला. एक तासानंतर बदाम सोला. नंतर मिक्सरवर सोललेल्या बदामाची बारीक पूड करा. मंद आंचेवर कढई तापत ठेवा. नंतर त्यात साजूक तूप व बदामाची बारीक केलेली पूड घाला व हे मिश्रण कालथ्याने परतून घ्या. नंतर त्यात दूध व साखर घालून ढवळत रहा. आता आंच मध्यम करा. दूध थोडे आटले की गॅस बंद करा. बदामाची खीर प्यायला देताना त्यावर थोडी सालासकट केलेली बदामाची पूड पेरून द्या. ही खीर चविष्ट व पौष्टिक आहे.

Thursday, September 01, 2011

गणपती २०११

खोबऱ्याची खिरापतजिन्नस :

गोटा खोबऱ्याचा कीस १ वाटी
काजू पावडर अर्धी वाटी
साखर पाव वाटी

मध्यम आचेवर कढई तापत ठेवून त्यात खोबऱ्याचा कीस गुलाबी रंगावर भाजावा. गॅस बंद करून नंतर थोड्यावेळाने खोबऱ्याचा भाजलेला कीस हाताने चुरावा व नंतर त्यात काजू पावडर व साखर घालावी. गणपतीसाठी ही एक साधीसोपी खिरापत आहे.

Thursday, August 18, 2011

दही पालकजिन्नस :

चिरलेला पालक २ ते ३ वाट्या
दही मोठे २ चमचे/ ताक पाव ते अर्धी वाटी
मीठ चवीपुरते
साखर १ चमचा
डाळीचे पीठ १ चमचा
दाण्याचे कूट १ चमचा
तेल
मोहरी, हिंग, हळद फोडणीसाठी
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
मिरच्यांचे तुकडे २-४


मार्गदर्शन : एका पातेल्यात चिरलेला पालक घाला व तो कूकरमध्ये शिजवून घ्या. कूकर गार झाला की पालक बाहेर काढा व डावेने नीट ढवळून घ्या. एकजीव करा. पालक एकजीव केल्यावर त्यामध्ये मिळून येण्याइतपतच डाळीचे पीठ व दही/ताक घाला.नंतर त्यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड, साखर , मीठ व दाण्याचे कूट घाला. सर्व मिश्रण डावेने एकजीव करा/ढवळून घ्या. नंतर मध्यम आचेवर एक पातेले तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात तेल घाला. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. फोडणीत हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून त्यावर पालकाचे तयार केलेले मिश्रण घालून नीट ढवळा. एक उकळी आली की गॅस बंद करा. ही पातळ भाजी गरम भाताबरोबर खूपच छान लागते.

Monday, August 15, 2011

सजावट
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!!

Wednesday, August 10, 2011

रंगीत भातजिन्नसः

अर्धी वाटी तांदुळाचा शिजवलेला भात (मोकळा शिजवलेला हवा)
प्लॉवर, श्रावणघेवडा, सिमला मिरची, मटार, गाजर, कांदा, बटाटा, टोमॅटो, भोपळा, वांगे, हिरवी मिरची १
फोडणीसाठी तेल
मोहरी, जिरे, हिंग, हळद
धनेजिरे पूड अर्धा चमचा
लाल तिखट अर्धा चमचा,
काळा मसाला अर्धा चमचा
मिरपूड २ चिमटी
मीठ चवीपुरते,
साखर अगदी चिमुटभर (चवीपुरती)मार्गदर्शन : अर्धी वाटी तांदुळाचा भात शिजवून घ्या व तो गार झाला की अलगद हाताने मोकळा करून घ्या. हा भात शिजवताना पहिली शिट्टी होऊ द्यायची नाही. त्या आधीच गॅस बंद करा. भात शिजवण्याच्या आधी तांदुळ धुवून घ्या व रोळीत २ तास निथळत ठेवा म्हणजे भात मोकळा शिजण्यास मदत होते. वर दिलेल्या सर्व भाज्या मध्यम आकारात चिरा. कांदा, बटाटा उभे चिरा. कांदा व टोमॅटो फोडणीत शिजवण्या इतपतच घ्या. जास्त नको. सर्व भाज्या चिरल्यावर पाण्याने धुवून घ्या व रोळीत निथळत ठेवा. या सर्व भाज्या मिळून २ ते ३ वाट्या घ्या.

नंतर मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात तेल घाला. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा. त्यात आधी मिरचीचे तुकडे (उभे चिरलेले) घाला व नंतर कांदा व टोमॅटो घालून थोडे परतून घ्या. नंतर चिरलेल्या सर्व भाज्या घाला व शिजवा. शिजवताना त्यावर झाकण ठेवा व फोडणीवर या भाज्या शिजू देत. झाकण काढा व भाज्या कालथ्याने परतत रहा. या भाज्या शिजल्या तर पाहिजेत पण जास्त शिजायला नकोत. भाजी शिजवताना पाणी अजिबात घालू नये.भाजी परतताना त्यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड, काळा मसाला, मिरपूड , चवीपुरते मीठ व अगदी थोडी साखर घाला व भाजी सगळीकडून परतून व्यवस्थित ढवळा. नंतर त्यामध्ये मोकळा केलेला भात घाला व अलगद हाताने सर्व मिश्रण ढवळा. हा भात तिखट, चमचमीत छान लागतो. तोंडाला खूप छान चव येते. गरम गरम भाताबरोबर दही छान लागते. हा भात पार्टीसाठी पण करता येईल.

Tuesday, August 09, 2011

बटाटा कीसजिन्नस :

बटाटे ३
लाल तिखट पाव चमचा
हिरव्या मिरच्यांचे तुकडे ५-६
जिरे पाव चमचा
तेल/तूप फोडणीसाठी
मीठ, साखर,
कोथिंबीर २-३ चमचे चिरलेली
खवलेला ओला नारळ २-३ चमचे
दाण्याचे कूट मूठभरमार्गदर्शन : बटाटे धुवून घ्या व ते किसणीवर सालासकट किसा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात पुरेसे तेल/तूप घाला. ते तापले की त्यात जिरे घाला. जिरे तडतडले की त्यात मिरच्यांचे तुकडे व किसलेला बटाट्याचा कीस घाला. थोडे परता. नंतर त्यावर झाकण ठेवा व काही सेकंदाने झाकण काढा व परता. असे २-३ वेळा करा म्हणजे बटाट्याचा कीस शिजेल. नंतर त्यात लाल तिखट, चवीपुरते मीठ , थोडी साखर व दाण्याचे कूट घालून परत नीट ढवळा. झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून त्यात चिरलेली कोथिंबीर व खवलेला नारळ घालून परत एकदा नीट ढवळा. परत झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा व गरम गरम कीस डीश मध्ये खायला घ्या. हा कीस खूपच चविष्ट लागतो. ही उपवासाची डीश आहे.

Wednesday, August 03, 2011

भोपळा खीरजिन्नस:

लाल भोपळ्याचा कीस अडीच वाट्या
दूध ३ वाट्या
साजूक तूप ३-४ चमचे
साखर ८-१० चमचे

क्रमवार मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात साजूक तूप व किसलेला भोपळ्याचा कीस घाला व परता. झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून परता. असे २-३ वेळा करा. वाफेवर किसलेला भोपळा शिजवून घ्या. हा भोपळा पटकन शिजतो. शिजवण्याकरता पाणी अजिबात घालू नये. नंतर त्यात दूध व साखर घाला व आटवा. आटवताना अधून मधून ढवळत रहा. ही एक भोपळ्याची चवदार खीर छान लागते. खीर दाट होईपर्यंत दूध आटवा. पटकन होणारी, चविष्ट व दाट खीर खूप छान लागते. जेवणानंतर स्वीट डिश म्हणून ही एक खूप छान खीर आहे.

Monday, August 01, 2011

पॅटीसपाककृतीचे जिन्नस:

बटाटे ४
कांदा १
मिरच्या ६ तिखट, लसूण पाकळ्या ४ मोठ्या, कोथींबीर १ जुडी, अर्धे लिंबू
मीठ, साखर चवीपुरते
लाल तिखट व धनेजिरे पूड प्रत्येकी पाव चमचा,

क्रमवार मार्गदर्शन: बटाटे उकडून, त्याची साले काढून कुस्करून घ्यावेत. त्यात कांदा, लसुण पाकळ्या, मिरच्या व कोथिंबिर खूप बारीक चिरून घाला. लिंबू पिळा. लाल तिखट व धनेजिरे पूड प्रत्येकी पाव चमचा घाला. चवीपुरते मीठ व साखर घाला, व ह्या सर्व मिश्रणाचा लगदा करावा. हे बटाट्याचे सारण तसेच कच्चे राहू देत.पॅस्ट्री पट्या फ्रीजर मधून १-२ तास आधी बाहेर काढून ठेवा म्हणजे त्या नॉर्मल तापमानात येतील. २-३ गुळांडी असलेल्या २ पट्या असतात. त्यातल्या एका पट्टीचे ३ ते ४ भाग करा. प्रत्येक भाग थोडा लाटण्याने लाटावा म्हणजे थोडा मोठा होईल व त्यात प्रत्येकात वरील तयार केलेले सारण घाला व गुंडाळी करा. गुंडाळी दोन्ही बाजूने चिकटवून घ्या. या सहज चिकटल्या जातात कारण की या पट्या ओलसर असतात. अशा रितीने सर्व पॅटीस करून घ्या. ओव्हन ४०० डिग्रीवर ऑन करा व हे सर्व पॅटीस अल्युमिनियम (ओवन मध्ये चालत असलेले) ट्रेमध्ये थोड्या थोड्या अंतरावर ठेवा. ओव्हन बंद करा. ३५ मिनिटे ठेवा. अर्धा वेळ झाला की सर्व पॅटीस पापड भाजण्याच्या चिमट्याने उलटवा म्हणजे दोन्ही बाजूने ब्राऊन होतील. पॅटीस उलटताना ओव्हन बंद करावा. पॅटीस करताना एका पट्टीचे २ भागही करू शकता, पण त्याने गुंडाळी जास्त होईल व सारण कमी पडेल. ओव्हन मध्ये हे पॅटीस खूप छान फुलून येतात. हे पॅटीस पुण्यातील हिंदुस्तान बेकरीमध्ये मिळणाऱ्या पॅटीस प्रमाणे लागतात. हे एक मधवेळचे छान खाणे आहे चहासोबत.
ओव्हन बंद केल्यावर १० मिनिटांनी ट्रे बाहेर काढा व सर्व पॅटीस एका ताटात ठेवा. खायला घेताना बरोबर टोमॅटो केच अप घ्यावे. मी हे सारण बटाट्याचे दिले आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे सारण बनवू शकता.

Thursday, July 21, 2011

ढक्कूजिन्नस:

अर्धी वाटी तूरडाळ शिजवलेली
लाल तिखट पाव चमचा , धनेजिरे पूड पाव चमचा, मीठ, लिंबू अर्धे, छोटा गुळाचा खडा
वांगे, भोपळा, फ्लॉवर, मटार, फरसबी, सिमला मिरची, पालक
कांदा, टोमॅटो, मिरच्या
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, जिरे, हळद,
मार्गदर्शन: वर दिलेल्या सर्व भाज्या मध्यम आकारात चिरा. या सर्व भाज्यांच्या फोडी २-३ वाट्या. तुरीची डाळ शिजवून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात तेल घाला. तेल तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात चिरलेली मिरची, कांदा, टोमॅटो व पालक घालून थोडे परता. नंतर सर्व भाज्यांच्या फोडी घाला व परता. अगदी थोडे पाणी घालून झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून भाज्या परताव्या. अगदी थोडे थोडे पाणी घालून वाफेवर भाज्या शिजवा. त्यात थोडे लाल तिखट, धनेजिरे पूड घाला व चवीपुरते मीठ घाला. नंतर शिजवलेले तुरीच्या डाळीचे वरण डावेने एकजीव करा व त्यात थोडे लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ घाला व थोडे लिंबू पिळा. हे सर्व मिश्रण शिजवलेल्या भाज्यांमध्ये घाला व पाणी घाला. उकळी येऊ दे. नंतर त्यात अगदी छोटा गूळाचा खडा घालावा. भाज्या कच्या नकोत पण खूप शिजलेल्याही नकोत. एक दणदणीत उकळी आणा. गरम भाताबरोबर ही भाज्या घातलेली आमटी खूप छान लागते. सर्व भाज्यांची चव छान लागते.


मी यामध्ये इथे मिळणारे सर्व भोपळे घातलेले आहेत. zucchini, yellow, butternut squashआई,आजीची रेसिपी : भाज्या : बटाटा, कांदा, हिरवे टोमॅटो, वांगे, भोपळा, शेवगा शेंगा, चिंच गुळाचे दाट पाणी, खवलेला ओला नारळ व कोथिंबीर. या आमटीला कोकणात ढक्कू म्हणतात.ही आमटी गरम गरम प्या अथवा गरम भाताबरोबर खा.


माहितीचा स्रोत
स्वानुभव, आईआजीची रेसिपी


या पाककृतीची एक मजा आहे. मी आईशी फोनवर बोलताना खादाडीचा विषय असतोच. त्यात मी आईला सांगितले की मी एकदा भाज्या घालून आमटी केली होती ती तू करून बघ. आईलाही अचानक आठवले की ही आमटी ती व तिच्या वाड्यातल्या मैत्रिणी मिळून बरेच वेळा करायच्या व या आमटीचे नाव ढक्कू असे आहे. ढक्कू भात खायच्या या मैत्रिणी मिळून बरेच वेळा! मी ही स्वानुभवातून निर्माण झालेली रेसिपी लिहिणारच होते पण याला नाव काय द्यावे असा प्रश्न होता. ढक्कू हे नाव मला खूपच आवडले आणि या स्वानुभव/आईआज्जीची रेसिपी जन्माला आली. नामकरणही झाले "ढक्कू" छान आहे ना नाव, मला तर खूपच आवडले आहे!

Friday, July 01, 2011

खांडवीजिन्नस :

वऱ्याचे तांदुळ अर्धी वाटी
चिरलेला गूळ पाऊण वाटी
साखर २-३ चमचे
साजूक तूप २-३ चमचे
पाणी पावणे दोन वाट्या
खवलेला ओला नारळ अर्धी वाटीक्रमवार मार्गदर्शन : वऱ्याचे तांदुळ पाण्याने धुवून घ्या व निथळत ठेवा. पाणी निथळून गेले की मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. त्यात साजूक तूप घालून धुतलेले वऱ्याचे तांदुळ घाला व भाजा. रवा भाजतो त्याप्रमाणे भाजा ब्राऊन रंग येईपर्यंत. त्याच वेळेला एका पातेल्यात पाणी घ्या व त्यात चिरलेला गूळ व साखर घाला व ते पातेले गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. रवा भाजून होईपर्यंत पाण्याला उकळी येईल. नंतर भाजलेल्या वऱ्याच्या तांदुळात गूळ व साखर घालून उकळलेले पाणी घाला व ढवळा. आता हे सर्व मिश्रण उकळायला लागेल आणि वऱ्याचे तांदुळ शिजायला लागतील. एकीकडे ढवळत रहा. नंतर आच कमी करून त्यावर झाकण ठेवा व वाफ द्या. झाकण काढून परत थोडे ढवळा. अशा ४-५ वाफा येऊ द्यात म्हणजे वऱ्याचे तांदुळ चांगले शिजतील व त्याचा गोळा बनायला लागेल. वऱ्याचे तांदुळ व्यवस्थित शिजायला हवेत. नीट शिजले नाहीत तर थोडे पाणी घालून अजून थोडी वाफ द्या. एकत्र झालेला गोळा तूप लावलेल्या एका ताटलीत पसरवून एकसारखा थापून घ्या. थोड्यावेळाने जाडसर वड्या पाडा. त्यावर खवलेला नारळ सर्व वड्यांवर घाला. खांडवी खाताना त्यावर साजूक तूप घेऊन खा. ही खांडवी पूर्ण साखर घालून पण करता येते किंवा निम्मे साखर व निम्मे गूळ घालून पण करता येते. कमी गोड हवी असल्यास गूळ अर्धा वाटी घ्या.

ही खास उपवासाची खांडवी आहे. याप्रमाणे तांदुळाच्या रव्याची पण खांडवी करतात. वऱ्याचे तांदुळ भाजल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेतल्यास खांडवी अजून जास्त चांगली होईल असे वाटते. अर्ध्या वाटी वऱ्याच्या तांदुळाच्या १२ ते १५ वड्या होतात.

Friday, June 24, 2011

पापड, पापड्या व इतर उन्हाळी पदार्थ

उन्हाळा सुरू होण्याच्या आत आईची तयारी सुरू व्हायची ती म्हणजे प्लॅस्टिकचे जाड कागद स्वच्छ करून ते वाळवून ठेवणे, सुती कापड धुऊन वाळवणे व आम्हालाही सांगायची मोठमोठाले दगड साठवून ठेवा. दगड अशाकरता की वाळवणे प्लॅस्टिक कागदावर घातली की चार सहा बाजूने वजन म्हणून दगड ठेवायचे. आम्ही राखणदाराचे काम अगदी व्यवस्थित पार पाडायचो. आमच्याकडे इतर भावंडांचाही अड्डा असायचा. सर्वांनाच उन्हाळी पदार्थ कच्चे खाण्याची आवड! वर्षभर पुरतील इतकी वाळवणे घरात व्हायची. पोह्याचे पापड, उडदाचे पापड, बटाट्याचे पापड, कुरडया, फेण्या, बटाट्याचा चिवडा, साबुदाण्याच्या चिकवड्या. सकाळी उजाडल्यापासून सूर्य मावळेपर्यंत ही कामे चालायची. आई पहाटे उठून सर्वांचा स्वयंपाक करून ठेवायची.

सर्वांत आधी अंगण स्वच्छ झाडून सडा घालून घ्यायचा. नंतर अंगणात एक दोन पलंग ठेवायचे. दोन आडवे लोखंडी स्टँड एकमेकांसमोर काही अंतरावर ठेवून त्यावर ३-४ सपाट मोठमोठाली फळकुटे जोडून ठेवून त्यावर सुती कापड व नंतर प्लॅस्टिकचा जाड कागद घालायचो. शिवाय खाली अंगणात वेगळी सतरंजी अंथरून त्यांवरही सुती कापड व नंतर प्लॅस्टिकचा कागद घायालचो. आम्ही भावंडे आळीपाळीने पायऱ्यांवर राखणदार म्हणून बसायचो. डोक्यावर पंचा गुंडाळलेला असायचा कारण की ऊन म्हणजे अगदी तळपते असायचे. काही जण पापड लाटायला, काही जण राखण करायला असे आलटून पालटून. काही जण सर्वांना चहाची तलफ आली की चहा करून द्यायला सज्ज असायचे.

पापडांमध्ये आम्हाला जास्त रस पोह्यांच्या पापडात असायचा. पोह्यांचा पापड अर्धवट लाटून त्यावर तेल घालून घडी करून परत थोडा लाटायचा आणि मग तो तेलात बुडवून खायचा. असा पापड खायला खूपच छान लागतो! नुसती लाटी खाण्यापेक्षा असा पापड खूप मस्त लागतो. पापड करण्यासाठी जे डांगर लागते त्याला खूप म्हणजे खूप कुटावे लागते. आईकडे खूप जड असे दोन खलबत्ते होते. जाड तरट ठेवून मग त्यावर खल ठेवायचा आणि दणादणा घाव घालायचो आम्ही आळीपाळीने त्या डांगरावर. बत्ता तर इतका काही जड होता की तो हातात धरून कुटले ही तळहात लाल व्हायचे! पोह्याच्या व बटाट्याच्या पापडाला खूप कुटावे लागते. कुटून डांगर हलके होते व पापड वाळून तळायला घेतला की हलकाफुलका होतो आणि छान फुलतो. बटाट्याच्या पापडाला साजुक तूप लागते. पोह्याच्या डांगराचे कोरडे पीठ, बटाट्याच्या डांगराला घालण्यासाठी साबुदाण्याचे पीठ अशी पिठे आई आधीच तयार करून ठेवायची. बरेच पापड लाटून झाले की मध्ये थोडासा ब्रेक असायचा. गरम गरम चहा प्यायल्यावर लाटण्यासाठी किंवा राखणदारीसाठी ताजेतवाने व्हायचो. पापड होत आले की डांगर कुटले जायचे ते खास खाण्यासाठी. गोळेच्या गोळे डांगर खायचो. तिखट तिखट डांगर खाल्ल्यावर खूप उत्साह आणि ताकद यायची. पापड पण सर्व मोजायचे. ४००/५०० पापड होत असत. आम्ही आतेमामे भावंड असायचोच शिवाय आईच्या मैत्रिणीही पापड लाटण्यासाठी यायच्या. आम्ही पण आईच्या मैत्रिणींच्या घरी मदत म्हणून पापड लाटायला जायचो. आम्ही सगळ्या मुली व मुले पापड लाटण्यासाठी म्हणून कमी तर खाण्यासाठी म्हणून जास्त असायचो.

उडदाच्या डांगराला खूप मागणी नसायची. आम्हाला कोणालाही उडदाचे डांगर जास्त आवडायचे नाही. आम्हाला सर्वांना पोह्याचे व बटाट्याचे डांगर जास्त आवडायचे. पापड वाळत घातले की कडक उन्हामुळे ते वेडेवाकडे होत असत. असे वेडेवाकडे झालेले पापड मग मोठ्या परातीत , पातेल्यात काढून ठेवायचो. त्यालाही ऊन असायचे. हे वेडेवाकडे झालेले पापड ताज्या पापडांना वाळण्यासाठी जागा करून द्यायचे. पापड पूर्णपणे कडक उन्हात वाळवून झाले की मग ते मोठमोठ्या पत्र्याच्या डब्यात भरून ठेवले जात. या पत्र्याच्या डब्यांनाही ऊन दाखवले जाई. बाहेरून कधी रंगकाम केले जाई डबे जास्त टिकण्यासाठी. उन्हाळा संपून रपारप पाऊस सुरू झाला की मग पोह्याचे पापड तळून गरम आमटी भाताबरोबर खायचो. मोठ्या कढईत पापड पूर्णपणे भरून जायचा इतका तो फुलायचा. हे पापड वर्षभरात खूप कामाला येत असत. कधी भूक लागली की भाजून किंवा तळून भाजक्या शेंगदाण्याबरोबर खायचो.

कुरडया करण्यामध्ये आमची लुडबुड नसायची. कारण कुरडईचा चीक आईच करायची व सोऱ्यातून कुरडयाही तीच पाडायची. काही वेळा मोठ्या बहिणी आईला कुरडया पाडायला मदत करायच्या. गरम चिकाच्या कुरडया पटापट घातल्या जात. कुरडई करण्याच्या दिवशी आई चीक करते कधी आणि आम्ही तो खातो कधी इतकी त्या चिकाची आम्ही वाट पाहायचो. गरम गरम चीक मोठ्या वाडग्यात घेऊन त्यात गोडंतेल घालून मस्त लागतो! नंतर दिवसभर राखण. कुरडया वाळत घातल्या की काही वेळाने काही बऱ्याच वाळलेल्या कुरडया उलट्या करून ठेवायचो. वाळलेल्या कुरडया तळून कुरुम कुरुम आवाज करत भाजक्या शेंगदाण्याबरोबर मस्त लागतात. कुरडया घालून झाल्या की काही भावंडे सर्वात तळाशी उरललेला चीक खात असत. तळाशी उरलेल्या चिकाची वाळलेली खरपुडी काहींना आवडायची.
बटाट्याचा वाळलेला कीस म्हणजे १० ते १५ किलो बटाट्यांचा असे. बटाटे खूप मोठाले! आम्ही आईला सर्व बटाटे सोलून द्यायचो. बटाटे सोलून सोलून हात दुखायला लागायचे. वर्षभरातले जितके म्हणून उपवास येतील त्यावेळेला आई आदल्या दिवशी डबे भरून वाळलेल्या किसाचा चिवडा करून ठेवायची. कच्चा वाळलेला कीस यांच्या जाळ्या कढईत तळल्या जायच्या. मोठी परातभर तळलेल्या जाळ्या. त्यावर तळलेले शेंगदाणे, लाल तिखट, मीठ, साखर, जिऱ्याची पूड घालून त्या जाळ्या मोडल्या जाऊन बारीक झालेला चिवडा खूप मस्त लागायचा! एकदम चविष्ट, हलकाफुलका सहज चावता येईल असा.

साबुदाण्याच्या चिकवड्या घालण्यासाठी साबुदाणा मोठमोठ्या पातेल्यात शिजवला जाई. साबुदाण्याच्या चिकवड्या मात्र आम्ही सगळ्या बहिणी मिळून घालायचो. आईला अजिबात हात लावून द्यायचो नाही. आई प्रत्येकीला एका वाडग्यात शिजवलेले साबुदाण्याचे मिश्रण घालून द्यायची. मग आम्ही मोठ्या चमच्याने छोट्या गोल चिकवड्या घालायचो. खूप मोठ्या प्लॅस्टिकच्या कागदावर गोल चिकवड्यांची नक्षी तयार व्हायची. चिकवड्या पूर्णपणे वाळून झाल्या की अलगद हाताने सोडवायच्या. सोडवलेल्या चिकवड्या मग मोठमोठ्या परातीत, पातेल्यात परत कडक उन्हात पूर्णपणे वाळू द्यायच्या. उपवासाला मग फुललेला बटाट्याचा पापड, चिवडा व साबुदाण्याची चिकवडी. सोबत भाजलेले शेंगदाणे!
फेण्या उर्फ तांदुळाची पापडी उर्फ सोलपापडी ही सर्वात आमच्या सर्वांच्याच आवडीची . याला तर भरपूर तयारी. मिक्सर यायच्या आधी या पापड्यांना लागणारे तांदुळाचे पीठ आई जात्यावर दळायची. ३ दिवस तांदूळ भिजत घालून नंतर ते दळायला घ्यायचे. जात्याखाली पांढरे शुभ्र मऊसर सुती कापड. जात्यातून पांढरे शुभ्र पीठ बाहेर पडायचे. जात्यात आधी थोडे तांदूळ मग थोडे पाणी, परत थोडे तांदूळ परत थोडे पाणी असे करत करत दळून झाल्यावर पांढरे शुभ्र पीठ तयार व्हायचे. या पिठात थोडे पाणी, खसखस, मीठ घालून ते पापड्यांसाठी तयार व्हायचे. आम्ही त्याला पांढरीशुभ्र बासुंदी म्हणायचो. एकावेळी ६ पापड्या तयार होत. एका पाटावर ६ पत्र्यांवर या तांदुळाच्या पापड्या पसरवायच्या. या पसरवण्याच्या क्रियेला पापड्या लिहिणे असे म्हणतात. त्यावेळी लाकडी पाट होते. एक पाट उलटा करून त्यावर ६ पत्रे तयार असत शिजण्यासाठी. आधीचे शिजलेले पत्रे बाहेर काढून थोडी वाफ जाऊ द्यायची मग ते सुती कापडावर पालथे पाडायचे. त्याच वेळी पिठाने पसरवलेले ६ गोल पत्रे शिजवण्यासाठी पातेल्यात जायचे. पापड्यांना शिजवण्यासाठी व सोलण्यासाठी पाणी खूप लागते. संबंध दिवस स्टोव्ह चालू असायचा. पापड्या सोलणासाठी आमची खूप घाई! पापड्या सोलल्या की त्या सुपावर घालायच्या मग ते सूप घेऊन अंगणात यायचे व एकेक पापडी प्लॅस्टिकच्या कागदावर वाळत घालायचो. सुपावरच्या पापड्या मोजायच्या. त्या आम्ही कमी मोजायचो म्हणजे मग खायला मोकळीक! सोलताना पापडी तुटली की ती खायची हा नियम. या पापड्या पण वाळल्या की वेड्यावाकड्या व्हायच्या. पापड्या वाळवण्याचा कोटा पूर्ण झाला की मग नुसत्या खायच्या! एकेकाची टर्न खाण्यासाठी. एका वेळेला एकेकाने १२ ओल्या पापड्या खायच्या. मग दुसऱ्याची टर्न. ओल्या पापड्या खायला मर्यादा नाहीत. भरपूर खा! आई म्हणायची खा भरपूर मग करपट ढेकरा सुरू झाल्या की कळेल! बाबा तर आमच्या या खाण्याला म्हणायचे किती खाताय! अशाने पोटे दुखतील तुमची. पण आमचे कोणाचेही पोट दुखायचे नाही की खाल्लेले बाधायचे नाही. या ओल्या पापड्यांबरोबर खाण्याकरता सायीचे आंबट दही तयार असे! ओली पापडी घ्यायची त्यात सायीचे आंबट दही घालायचे. पापडीची चौकोनी घडी घालून पापडी तोंडात!
कोण म्हणते अमेरिकेत ऊन नाही! भरपूर रणरणते ऊन आहे इथे! या उन्हाचा फायदा घेण्याचा विचार येत आहे. भारतात असताना काही सोपे पदार्थ करायचे जसे की बटाट्याचा चिवडा, बटाट्याचे पापड, उडदाचे पापड, चिकवड्या. पण तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात कधीच नाही! आता सर्व एकेक करायचा विचार आहे. फेण्या झाल्या, बटाट्याचा कीस वाळवून झाला. पण प्रमाण किती तर एक वाटी तांदूळ, २ बटाटे. या प्रमाणाकडे पाहिल्यावर हसू येते! इतके छोटे प्रमाण घेऊनही खूप दमायला होते. पूर्वीच्या बायका म्हणजे आपल्या सर्वांच्याच आया, मावश्या, आज्या कसे काय एवढे पदार्थ करायच्या आणि तेही भरपूर प्रमाणात!

Thursday, June 09, 2011

फेणीजिन्नस:

तांदुळ १ वाटी
खसखस २-३ चिमूट
मीठ चवीपुरते


मार्गदर्शन : तांदूळ पाण्यात ३ दिवस भिजत घाला. सकाळ संध्याकाळ पाणी बदलावे. तिसऱ्या किंवा चोथ्या दिवशी भिजवलेले तांदूळ मिक्सर ग्राइंडर वर बारीक करा. तांदूळ बारीक होण्याकरता पाणी लागेल तितकेच घालून तांदूळ वाटून घ्या. नंतर एका पातेल्यात बारीक गंधासारखे वाटलेले तांदूळ घाला व थोडे पाणी घाला. हे मिश्रण पातळ बासुंदीइतके दाट हवे. नंतर त्यामध्ये खसखस व चवीपुरते मीठ घाला.खूप कमी आचेवर कुकरामध्ये पाणी तापवत ठेवा. नंतर सर्व फेण्या, फेण्या करण्याच्या गोलाकार पत्र्यांवर पसरवा. हे मिश्रण पातळ पसरले गेले पाहिजे. प्रत्येक गोलाकार पत्रा स्टँडमध्ये घालून तो स्टँड कुकरामध्ये ठेवा. त्यावर कुकराचे झाकण लावा. शिट्टी काढून घ्या. सुरवातीला १५ मिनिटे ठेवा. नंतरच्या फेण्या उकडायला गॅस १० मिनिटे ठेवा. प्रत्येक फेणी स्टँडला उकडायच्या वेळी कुकरामध्ये नवीन पाणी घाला. जसे आपण इडली उकडतो तसेच उकडायचे आहे. नंतर गॅस बंद करून ५ मिनिटांनी आतील फेण्याचा स्टँड काढा. त्यातील प्रत्येक पत्रा एका सुती कापडावर उपडा करा. पाण्याच्या साहाय्याने पापड्या सोला. पापडी सोलताना ती तुटत नाही याची काळजी घ्या. यासाठी नखाने सर्व बाजूने फेणी सोडवा. नंतर फेणी सोलताना फेणीच्या मागे पाणी घालून ती आपोआप सुटेल. फेणी सोलली की ती लगेच प्लॅस्टिकच्या जाड कागदावर पसरवा आणि कडक उन्हात वाळवा. पूर्णपणे फेणी वाळली की तळून खा. सोबत भाजलेले शेंगदाणे हवेत. ही फेणी भाजून पण छान लागते.

फेणी म्हणचे तांदुळाची पापडी. फेणी हे नाव दिले आहे ते माहीत नाही. फेणी करण्याचा स्टँड विकत मिळतो. त्यात ६ गोलाकार पत्रे येतात. हे पत्रे १२ घ्यायचे म्हणजे फेण्या पटापट होतात. तो नसला तर मी असा प्रयोग केला पण तो खूपच तापदायक आहे. एका वेळेला एकच फेणी होत होती. कुकराचे भांडे उपडे करून मी फेणी पसरवली व ती वाफेवर शिजवली.ओल्या फेण्या खायला खूपच छान लागतात. सोबत सायीचे आंबट दही घ्या.

Monday, May 16, 2011

बदाम वडी
जिन्नस :

बदामाची पावडर १ वाटी
साखर अर्धी वाटी
दूध पाव वाटी
साजूक तूप १ चमचा

क्रमवार मार्गदर्शन : बदामाच्या पावडरीमध्ये दूध घालून मिक्सर ग्राईंडरवर बारीक करून घ्या. नंतर मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात साजूक तूप, बदाम पावडर, साखर, व दूध घालून कालथ्याने ढवळत रहा. काही वेळाने हे मिश्रण पातळ होईल. अजूनही ढवळत रहा. थोड्यावेळाने मिश्रण घट्ट व्हायला लागेल व त्याचा गोळा बनला की ते एका ताटलीत काढून एकसारखे पसरून घ्या व वड्या पाडा.बदामाची पावडर - २ वाट्या बदाम गरम पाण्यात १ तास भिजवा. नंतर त्यातले पाणी काढून टाका व सर्व बदाम सोला. सोलायला १ तास लागतो. हे खूप किचकट काम आहे. नंतर सोललेल्या बदामाची मिक्सर/ग्राइंडर वर बारीक पावडर करा. ही पावडर रवाळ होते. एकदा का ही मेहनत घेतली की मग त्यात बदामाच्या वड्या, बदामाची खीर व बदामाचा शिरा सर्व काही होते.सायली जोशी हिने सांगितलेल्या काजूकतली पद्धतीनुसार या वड्या बनवल्या आहेत. तिने ही सांगितलेली पद्धत खूप सोपी आणि छान आहे. प्रमाण एकदम बरोबर आहे. सायली जोशी अनेक धन्यवाद!

Friday, May 13, 2011

बटाटेवडे

जिन्नस : उकडलेले बटाटे, कांदे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण, मीठ साखर, लाल तिखट, हळद, हिंग, डाळीचे पीठ ही बटाटेवड्याची ध्वनीचित्रदर्शन पाककृती आहे.

Thursday, May 12, 2011

बदाम काजू वडीजिन्नस :

बदाम पावडर १ वाटी
काजू पावडर १ वाटी
साखर १ वाटी
दूध अर्धी वाटी
साजूक तूप १ चमचा
क्रमवार मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. नंतर त्यात थोडे तूप घालून लगेचच बदाम-काजू पावडर, साखर व दूध घालून कालथ्याने ढवळत राहा. मिश्रण पातळ होईल. मिश्रण कोरडे होईपर्यंत कालथ्याने एकसारखे ढवळत राहा. मिश्रण आळायला लागेल व कालथ्याला हे मिश्रण जड लागायला लागेल व कोरडे पडायला लागेल. बदाम काजू मिश्रण आळायला बराच वेळ लागतो. कालथ्याने सतत ढवळत रहा. मिश्रणाचा गोळा होईपर्यंत हे मिश्रण आटवायला लागते. दोन ताटांना साजुक तूप पसरवून लावून ठेवा. आता गॅस बंद करून परत एकदा थोडे ढवळून घ्या व मिश्रण ताटात घालून गरम असतानाच एकसंध पसरा. मिश्रण कोमट झाले की वड्या पाडा. यात छोट्या ३० ते ३५ वड्या होतात.

बदामाची पावडर - २ वाट्या बदाम गरम पाण्यात १ तास भिजवा. नंतर त्यातले पाणी काढून टाका व सर्व बदाम सोला. सोलायला १ तास लागतो. हे खूप किचकट काम आहे. नंतर सोललेल्या बदामाची मिक्सर/ग्राइंडर वर बारीक पावडर करा. ही पावडर रवाळ होते. एकदा का ही मेहनत घेतली की मग त्यात बदामाच्या वड्या, बदामाची खीर व बदामाचा शिरा सर्व काही होते.

सायली जोशी हिने सांगितलेली काजूकतली पाककृती पद्धत वापरली आहे. काजूबरोबर त्यात अक्रोड पावडर घातलेली आहे. सायली जोशीने सांगितलेली काजूकतली पाककृती लिहीली आहे. या वड्या झटपट होतात. काजूबरोबर अक्रोड खूप छान लागतो. याच पद्धतीने नुसत्या अक्रोड पावडरच्या वड्याही छान लागतात.काजू, काजू-अक्रोड व बदाम काजू या सर्वांमध्ये काजू अक्रोड या वड्या चवीलाही खूप छान लागतात. झटपट व खुटखुटीत होतात. मला सर्वात जास्त काजू अक्रोड या वड्या आवडल्या.

Friday, May 06, 2011

अक्रोड काजू वडीजिन्नस :

अक्रोड पावडर १ वाटी
काजू पावडर १ वाटी
साखर १ वाटी
दूध अर्धी वाटी
साजूक तूप १ चमचा

क्रमवार मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. नंतर त्यात थोडे तूप घालून लगेचच अक्रोड-काजू पावडर, साखर व दूध घालून कालथ्याने ढवळत रहा. मिश्रण पातळ होईल. मिश्रण कोरडे होईपर्यंत कालथ्याने एकसारखे ढवळत रहा. मिश्रण आळायला लागेल व कालथ्याला हे मिश्रण जड लागायला लागेल व कोरडे पडायला लागेल. दोन ताटांना साजुक तूप पसरवून लावून ठेवा. आता गॅस बंद करून परत एकदा थोडे ढवळून घ्या व मिश्रण ताटात घालून गरम असतानाच एकसंध पसरा. मिश्रण कोमट झाले की वड्या पाडा. यात छोट्या ३० ते ३५ वड्या होतात.

सायली जोशी हिने सांगितलेली काजूकतली पाककृती पद्धत वापरली आहे. काजूबरोबर त्यात अक्रोड पावडर घातलेली आहे. सायली जोशीने सांगितलेली काजूकतली पाककृती लिहीली आहे. या वड्या झटपट होतात. काजूबरोबर अक्रोड खूप छान लागतो. याच पद्धतीने नुसत्या अक्रोड पावडरच्या वड्याही छान लागतात.

Tuesday, April 26, 2011

कैरीचे लोणचे


जिन्नस :

१ मोठी कैरी
२ चमचे लाल तिखट
२ चमचे हळद
अर्धा चमचा मेथी पावडर
पाव चमचा हिंग पावडर
मोहरीची डाळ ४ चमचे
मीठ ३-४ चमचे
तेल
फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद

क्रमवार मार्गदर्शन : कैरी धूवून घ्या व कोरड्या फडक्याने पुसून घ्या. नंतर त्याच्या बारीक फोडी करा. फोडींवर थोडी हळद व मीठ घालून थोडे ढवळून ठेवा. नंतर मध्यम आचेवर कढलं तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात २-३ चमचे तेल घालून त्यात लाल तिखट घालून थोडे परतून घ्या. परतल्यावर एका ताटलीते ते मिश्रण ओता. मग परत तेल घालून त्यात हळद, नंतर हिंग व मेथी वेगवेगळे तेल घालून परतून घ्या व असेच लाल तिखटाप्रमाणे एका ताटलीत काढून ठेवा. मोहरीची डाळ काढून घ्या त्याच ताटलीत. ही डाळ परतायची नाही. मोहरीची डाळ नसेल तर मोहरी भाजून घेऊन ती मिक्सरवर बारीक करून घ्या.

आता हे सर्व मिश्रण व कैरीच्या फोडी मीठ घालून ढवळून घ्या व एका बरणीत घाला. पाव ते अर्धा वाटी तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा. ही फोडणी पूर्ण गार झाली की तयार झालेल्या मिश्रणात (कैरी व मसाला) ओतून ढवळा. हे लोणचे पोळी व गरम आमटीभाताबरोबर खूप छान लागते.

फोटोतील लोणच्यामध्ये मोहरीची डाळ घातलेली नाही. ती घातली नाही तरी चालते.

Monday, April 18, 2011

झटपट बटाटा चिवडा
जिन्नस :

पोटॅटो स्टीक्स पाकिट १
अदपाव चमचा लाल तिखट
अदपाव चमचा जिरे पावडर
अदपाव चमचा साखर
चवीपुरते मीठ
अदपाव चमचा तेल
मूठभर भाजलेले दाणे

मार्गदर्शन : पोटॅटो पाकीटातून स्टीक्स एका पातेल्यात काढून घ्या. त्यात लाल तिखट, मीठ, जिरेपावडर, साखर घाला. एका कढल्यात तेल घालून दाणे थोडे भाजून घ्या व ते स्टिक्स मध्ये घाला. एकत्र ढवळून घ्या. झटपट चिवडा तयार! उपवासाला चालतो. शिवाय असेच थोडे चहाबरोबर तोंडात टाकायला छान वाटतो.

Friday, April 15, 2011

आंबेडाळपाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

हरबरा डाळ १ वाटी
मिरच्या २-३
कोथिंबीर, ओला नारळ मिळून अर्धी वाटी
तेल, मोहरी, हिंग, हळद
आंबट मध्यम आकाराची कैरी अर्धी
मीठ, साखर

क्रमवार मार्गदर्शन: हरबरा डाळ ७-८ तास भिजत घाला. नंतर डाळीतले सर्व पाणी काढून टाका व डाळ भरड वाटा. डाळ वाटतानाच त्यात २-३ मिरच्या घालाव्यात, म्हणजे तिखटपणा सर्व डाळीला सारखा मिसळला जाईल. नंतर त्यात अर्धी कैरी किसून घाला. चवीप्रमाणे कैरीचे प्रमाण कमी-जास्त करण्यास हरकत नाही. नंतर वरून फोडणी घाला. चवीपुरते मीठ, अर्धा चमचा साखर, व चिरलेली कोथिंबीर व ओला नारळ घालून हे सर्व मिश्रण चमच्याने एकसारखे करा. झाली आंबेडाळ तयार.


ही आंबेडाळ चैत्र महिन्यात चैत्रगौरीचा नैवेद्य म्हणून करतात. सोबत पन्हे असते. काही वेळेला सणासुदीला पानामध्ये डावी बाजुला तोंडीलावणे म्हणूनही करायला हरकत नाही किंवा अशीच संध्याकाळची खायला करा.

Monday, April 04, 2011

साजूक तूपवाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस

"लॅन्डोलेक्सचे" मीठविरहीत स्वीट बटर

क्रमवार मार्गदर्शन:

एका पातेल्यात किंवा कढईत बटरच्या ४ कांड्या ठेवून गॅस अतितीव्र आचेवर ठेवणे. कांड्या पूर्ण वितळल्या की आच मध्यमाहून थोडी कमी करणे. बटर वितळायला लागले की फेस येईल. नंतर चमच्याने वितळलेले बटर सारखे ढवळत रहावे. बटर पूर्णपणे वितळल्यावर बरेच बारीक बारीक बुडबुडे येउन ते उकळायला लागते. नंतर या उकळलेल्या मिश्रणाला पिवळा रंग येईल. नंतर हळू हळू फेस कमी होईल. फेस पुर्णपणे जात नाही. नंतर एका क्षणी किंचित लालसर रंग आला की लगेच गॅस बंद करणे. हा क्षण महत्वाचा. तूप करताना सारखे ढवळत रहावे आणि रंग बघण्यासाठी तूप चमच्यामधे घेऊन पहाणे.

पूर्ण गार झाल्यावर तूप गाळून एका काचेच्या बाटलीत ओतणे. गाळले नाही तरी चालते. ४ कांड्या वितळून तूप होण्यासाठी बरोबर १५ मिनिटे लागतात.

माहितीचा स्रोत:भारतात माझी आई व अमेरीकेत तेलगू मैत्रिण सौ प्रविणा

अधिक टीपा:साजुक तूप प्रमाणात खाल्ले तर उपयुक्त आहे. साबुदाण्याची खिचडी, बटाट्याचा कीस, गोडाचा शिरा, गाजर हलवा करताना किसलेले गाजर परतण्यासाठी, खीर करताना शेवया परतण्यासाठी किंवा असे बरेच पदार्थ करण्यासाठी साजुक तूप वापरावे. हानीकारक नाही. पदार्थ स्वादिष्ट बनतो.

Friday, February 18, 2011

सुपारीजिन्नस :

सुपारी अर्धा किलो पांढरी/भाजकी/भरडी (आवडीनुसार) ५०० ग्रॅम
जेष्टमधाची पावडर २५० ग्रॅम
बडीशेप २०० ग्रॅम
लवंग, वेलदोडा, दालचिनी प्रत्येकी १० ते १५ ग्रॅम
ओवा ५ ते १० ग्रॅम
बाळंतशेपा ५ ते १० ग्रॅम
शिंदेलोण पादेलोण अगदी थोडे (आवडत असल्यास घाला)


सुपारी खूप बारीक दळून आणा. बाकीचे सर्व जिन्नस कढईत साजूक तूप (थोडेसे) घालून मंद आचेवर भाजा. खरपूस भाजायला नको. जेष्टमधाची पावडर पण भाजा. बाकी सर्व जिन्नस मिक्सरमधून बारीक दळा. दळलेली सुपारी व बाकीचे सर्व जिन्नस (भाजून दळलेले) जिन्नस एकत्र करा. सुपारी तयार!