Thursday, December 14, 2006

सिमलामसालावाढणी:२ जणांना


पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे


पाककृतीचे जिन्नस:

सिमला उर्फ ढब्बू मिरची २ मोठ्या(जाड्या)
लाल तिखट १ चमचा, धने-जीरे पावडर १ चमचा, गरम/गोडा मसाला १ चमचा,
दाण्याचे कूट, ओला नारळ, चिरलेली कोथिंबीर प्रत्येकी अर्धी वाटी
चिंचेचा दाट रस अर्धी वाटी, गूळ (छोट्या लिंबाएवढा)
मीठ
तेल, मोहोरी, हिंग, हळद (फोडणीसाठी)


क्रमवार मार्गदर्शन: सिमला उर्फ ढब्बू मिरची बारीक चिरणे. नेहमीपेक्षा तेल थोडे जास्त घेवून तेलाच्या फोडणीमधे चिरलेली सिमला मिरची घालून ३-४ वाफांमधे शिजवून घेणे. नंतर त्यात लाल तिखट, धने-जीरे पूड, गरम किंवा गोडा मसाला, गूळ, चिंचेचे पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून परतणे. नंतर त्यात कोथिंबीर, ओला नारळ, दाण्याचे कूट, घालुन परत १-२ वेळा वाफ देवून परतणे.


अशी ही आंबट-गोड भाजी ज्वारीच्या किंवा तांदुळाच्या भाकरीबरोबर चांगली लागते, शिवाय नुसती खायला पण छान लागते.


रोहिणी गोरे

गोडाचा शिरावाढणी:
२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:
१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस


१ वाटी रवा (बारीक अथवा जाड)
साजूक तूप ६ चमचे
साखर पाऊण वाटी
थोडासा गूळ
२ वाट्या पाणी

क्रमवार मार्गदर्शन:


मध्यम आचेवर रवा व तूप कढईत एकत्रित करून तांबूस रंग येईपर्यंत भाजणे. भाजून झाल्यावर त्यात दुप्पट पाणी घालून ढवळणे. नंतर त्यावर झाकण ठेवून १०-१२ सेकंदाने झाकण काढून मिश्रण ढवळणे. नंतर त्यात साखर व थोडासा गूळ घालून परत ढवळणे. हे मिश्रण आता थोडे पातळ होईल. ढवळल्यावर परत झाकण ठेवून १०-१२ सेकंदाने झाकण काढून परत ढवळणे. झाला तयार गोडाचा शिरा.

ज्या वाटीने रवा घेतला असेल त्याच वाटीने पाणी व साखर घेणे. गुळाने खमंगपणा येतो. पूर्ण गुळ घालून पण छान लागतो. अर्धी साखर व अर्धा गूळ घालून पण छान लागतो. खूप गोड हवा असल्यास १ वाटी पूर्ण साखर घेणे. अगोड हवा असल्यास चमच्याने साखर मोजून घेणे. १ वाटीला ८-१० चमचे. यात चमचा आपण पोहे-शिरा ज्याने खातो तो वापरणे.


तूपाचे प्रमाण वर दिले आहे त्याप्रमाणे कमी-जास्त घेणे. रवा तूपामध्ये पूर्णपणे भिजला पाहिजे. म्हणून रवा भाजता भाजता एकीकडे तूप घातले एक-एक चमचा करत तर तूपाचा अंदाज येईल. तूप जास्त झाले तरी चालेल. कमी नको. रवाही व्यवस्थित तांबूस रंग येईपर्यंत भाजणे नाहीतर कच्चा लागतो. दुप्पट पाणी घातल्याने मोकळा होतो. पहिल्यांदाच शिरा करत असाल तर तो पूर्ण साखरेचाच करा.


रोहिणी गोरे

बेसन लाडू


वाढणी:२ जणांना


पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे


पाककृतीचे जिन्नस

हरबरा डाळीचे पीठ १ वाटी
पीठीसाखर १ वाटी
साजूक तूप ६-७ चमचे (पातळ)


क्रमवार मार्गदर्शन: हरबरा डाळीचे पीठ व साजूक तूप कढईत एकाच वेळी घालून मध्यम आचेवर तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेणे. सतत ढवळत राहणे नाहीतर पीठ करपेल. भाजून झाल्यावर गॅस बंद करणे. नंतर लगेच त्यात १ वाटी साखर घालून परत हे मिश्रण ढवळून एकसारखे करणे. खूप गार झाल्यावर लाडू वळणे.


ज्यांना कमी गोड आवडते त्यांनी पाउण वाटी साखर घालावी. लाडवामध्ये वेलची पूड किंवा बेदाणे आवडत असल्यास घालणे. नाही घातले तरी चालते. तूपाचे प्रमाण वर दिल्याप्रमाणेच घालावे. पण डाळीचे पीठ पूर्णपणे तूपामध्ये भिजायला हवे, त्याप्रमाणे तूपाचे प्रमाण कमी जास्त करावे. तूप थोडे जास्त झाले तरी चालेल पण कमी नको. १ वाटी डाळीच्या पीठाचे छोटे छोटे आठ लाडू होतात.


रोहिणी गोरे