Thursday, October 30, 2008

शेवया खीर

जिन्नसः३ वाट्या दूध (whole milk)
१-२ चमचे शेवया
६ चमचे साखर
काजु, बदाम, पिस्ते यांचे तुकडे १-२ चमचे
बदाम पावडर अर्धा चमचा
साजूक तूप १ चमचाक्रमवार मार्गदर्शन :सर्वात आधी एका पातेल्यात दूध तापवून घ्या. मंद आचेवर छोटे कढले ठेवून त्यात साजूक तूप, शेवया व काजू -बदाम- पिस्ते यांचे तुकडे घालून बाऊन रंगावर परतून घ्या. नंतर हे सर्व तापलेल्या दूधात घाला. नंतर हे दूधाचे पातेले गॅसवर ठेवा. त्यात आवडीनुसार साखर व बदामाची पावडर घाला. दूध चांगले उकळू द्यावे. उकळताना डावेने ढवळत राहावे, म्हणजे साय धरणार नाही. थोडे दूध आटले की गॅसवरून उतरवा. दूध थंड होईपर्यंत अधून मधून दूध ढवळावे म्हणजे साय धरणार नाही. गार झाले की खीर दाट होईल.

Friday, October 24, 2008

तिखटमीठाचा शिराजिन्नस :


१ वाटी रवा, दीड वाटी पाणी१
मध्यम चिरलेला जाड कांदा, मूठभर कच्चे अथवा भाजके दाणे
२-३ चिरलेल्या मिरच्या, कढिपत्ता ३-४ पाने
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद
लाल तिखट अर्धा चमचा, मीठ, साखर अर्धा चमचा
चिरलेली कोथिंबीर, खवलेला ओला नारळ, बारीक शेव, लिंबूक्रमवार मार्गदर्शनःगॅस वर मध्यम आचेवर कढई ठेवून त्यात रवा ब्राऊन रंग येईपर्यंत खमंग भाजा. भाजून झाल्यावर एका ताटलीत काढून ठेवा. नंतर कढईत पुरेसे तेल घालून त्यात मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात चिरलेल्या मिरच्या, कांदा, दाणे घालून पुरेसे परतून घ्या. नंतर त्यावर झाकण ठेऊन एक वाफ द्या म्हणजे कांदा व मिरच्या व्यवस्थित शिजतील. नंतर त्यात लाल तिखट घालून परत थोडे परता. काही सेकंदाने चवीपुरते मीठ व साखर घालून त्यात भाजलेला रवा घाला व परत एकदा एकसारखे ढवळून घ्या. रव्याला सर्व मसाला एकसारखा लागला पाहिजे. नंतर त्यात पाणी घालून कालथ्याने पटापट ढवळा म्हणजे गुठळी होणार नाही. नंतर त्यावर झाकण ठेवून गॅस बारीक करा. ५ मिनिटांनी झाकण काढून तयार झालेला खमंग शिरा परत एकदा कालथ्याने ढवळा. गॅस बंद करून परत एकदा शिऱ्यावर झाकण ठेवा. ५ मिनिटांनी झाकण शिरा कालथ्याने ढवळून खायला द्या.खायला देताना डीश मध्ये आधी शिरा घालून त्यावर चिरलेली कोथिंबीर व ओल्या नारळाचा खव व बारीक शेव घालून द्या. सोबत लिंबाची फोड.हा तिखटमीठाचा शिरा खूपच खमंग व चविष्ट लागतो.

Tuesday, October 21, 2008

करंजीजिन्नस :

१ वाटी बारीक रवा, १ वाटी मैदा किंवा all purpose flour ,
५-६ चमचे तेल कडकडीत गरम करून घालण्यासाठी, मीठ
३ वाट्या ओल्या नारळाचा खव, अडीच वाट्या साखर,
थोडी वेलची पूड, १-२ चमचे साजूक तूप
तळणीसाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन :

मध्यम आचेवर कढई तापत ठेवून त्यात १-२ चमचे साजूक तूप घाला. नंतर त्यात नारळाचा खव व साखर असे एकत्रित केलेले मिश्रण घालून शिजवत ठेवा. साखर वितळायला लागली की गॅस थोडा मोठा करा. थोड्या वेळाने नारळ व साखर यांचे मिश्रण घट्ट होईल. डावेने एकसारखे ढवळून मिश्रण गॅसवरून खाली उतरवून ठेवा. मग त्यात थोडी वेलची पूड घालून परत एकसारखे करा. हे झाले करंजीत घालायचे सारण.


सारण करायच्या आधी रवा व मैदा दूधात किंवा पाण्यात भिजवून ठेवा. भिजवायच्या आधी त्यात ५- ६ चमचे तेल एका कढल्यात तापवून घाला व चवीपुरते थोडे मीठ. तेल खूप गरम करा. रवामैद्यात घालताना चूर्र असा आवाज यायला पाहिजे. गरम तेल घातले की रवा मैदा चमच्याने एकसारखा करा.


सारण गार झाले की करंज्या करायला घ्या.


आता रवा मैद्याची एक मोठी पोळी लाटा. त्याचे मोठ्या वाटीने ३-४ गोल करा. पुरीसारख्या गोल आकारात सारण भरा व त्याचा अर्धगोलाकार आकार बनवून हाताने सर्व बाजूने दाब द्या म्हणजे सारण बाहेर येणार नाही. नंतर कातणाने अथवा कालथ्याने बाजूने कापून चंद्रकोरीसारखा आकार द्या. सर्व करंज्या करून घ्या. ३-४ करंज्या झाल्या की प्रत्येक वेळी त्यावर ओले फडके ठेवा म्हणजे त्या वाळणार नाहीत. नंतर करंज्या तेलात तळून घ्या.


एकेक वेगळी पुरी करून पण करंज्या करता येतील. पोळी लाटून वाटीने गोल करून घेतल्यास सर्व करंज्या एकसारख्या दिसतात.

Friday, October 17, 2008

साबुदाणा थालिपीठजिन्नस :

भिजलेला साबुदाणा १ वाटी
बारीक वाटलेल्या तिखट मिरच्या २ चमचे
शिंगाड्याचे पीठ ३-४ चमचे
१ छोटा कच्चा बटाटा किसलेला (साले काढून)
बारीक चिरलेली कोथिंबीर व नारळाचा खव अर्धी वाटी
१ चमचा साखर
अर्धी वाटी दाण्याचे कूट
चवीपुरते मीठ
साजूक तूप/तेल

क्रमवार मार्गदर्शन :
वरील सर्व साहित्य एकत्र करून नीट कालवून घ्या. हे कालवलेले पीठ जर घट्ट वाटले तर अगदी थोडे पाणी घाला. एकत्रित केलेल्या मिश्रणाचे २ मोठे गोळे करा. तव्याला तेल/तूप लावून घ्या. त्यावर एक गोळा ठेवून सर्वबाजूने एकसारखे थालिपीठ थापा. नंतर त्यावर ४-५ भोके पाडून त्यात तेल/तूप घालून मध्यम आचेवर तवा ठेवावा. त्यावर झाकण ठेवावे. काही सेकंदाने झाकण काढून थालिपीठ कालथ्याने उलटून घ्या. काही सेकंदाने थालिपीठ तव्यावरून काढा. थालिपीठ तांबूस रंग येईपर्यंत ठेवा. म्हणजे खरपूस होईल.


हे थालिपीठ लाल तिखट घालूनही करतात. बाकीचे सर्व साहित्य वरील प्रमाणे फक्त बारीक वाटलेल्या मिरची ऐवजी लाल तिखट व थोडी जिरे पावडर घालून असेच थालिपीठ करा.


दोन्ही प्रकारे हे थालिपीठ छान लागते. सोबत थंडगार दही व गोड लिंबू लोणचे छान लागते.

मसाला पुरी

जिन्नसः

पाणीपुरीच्या पुऱ्या, उकडलेला व कुस्करलेला बटाटा, चिरलेला कांदा, लाल तिखट, धनेजीरे पूड, पाणीपुरीचा मसाला, चिरलेली कोथिंबीर, चिंचगुळाचे दाट पाणी, मीठ, बारीक शेव


कृती : पाणीपुरीच्या पुऱ्या जितक्या हव्या असतील तितक्या मध्ये फोडून त्यात वर दिलेले सर्व जिन्नस थोडे थोडे घाला. मसाला पुरी तय्यार!


पाणीपुरी, रगडा पॅटीस, दही बटाटा शेव पुरी, वगैरे सर्व खाऊन झाले की या मसाला पुरीने चमचमीत खाण्याची सांगता करा. किंवा वेगळी चव म्हणूनही फक्त अशाच पद्धतीने खायलाही छानच!

Monday, October 13, 2008

बटाटा पोहे

बटाटा पोह्यांची ओळख मला माझ्या प्रिय मैत्रिणीकडून झाली. तिचे नाव शैला. अतिशय साधी व हासरी आहे ही शैला. आम्ही कॉलेजला असतना एकत्र अभ्यास करायचो. खास करून accounts चा अभ्यास करताना खूप मजा यायची. balance sheet tally करताना आमच्या दोघींची धडपड! कारण जिचा balance sheet tally होईल ती दुसरीला उत्साहात आंगायची हेहे! माझा झाला tally!


दुपारचे जेवण करून लगेचच आम्ही अभ्यासाला बसायचो. एकदा मी तिच्या घरी जायचे अभ्यासाला तर कधी ती यायची आमच्याकडे अभ्यासाला. तिचे व माझे घर साधारण १५ ते २० मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर होते. तिच्या घरी जेव्हा अभ्यास असायचा तेव्हा तिचे 'बटाटे पोहे' ही डीश ठरलेली असायची. अभ्यास झाला की म्हणायची "थांब रोहिणी मी बटाटे पोहे करते आपल्याला खायला. "


पहिल्यांदा ती ३-४ मिरच्या व मीठ घेऊन पाटा वरवंट्यावर वाटायची. त्याचा हिरवागार गोळा एका वाटीत काढून ठेवायची. तिच्याकडे एक पिटुकला पाटा वरवंटा होता. नंतर बटाट्याची साले काढून पातळ काप करून एका वाटीत पाण्यात घालून ठेवायची. अशी सर्व तयारी करून तिखट चमचमीत पोहे करायची. नंतर अर्थातच चहा. तिचा चहा नेहमी दुधाळ व खूप गोड असायचा. खरे तर असा चहा मला आवडत नाही, पण का कोण जाणे तिच्या हातचा चहा मात्र आवडायचा!


खाणे पिणे झाले की सर्व भांडी घेऊन ती हौदावर घासायची. सर्व भांडी म्हणजे कप बशा, चहाचे भांडे, पोह्यांची कढई, स्टीलच्या डीश वगैरे. हौदाच्या बाजूला वेड्यावाकड्या फरशांची एक चौकोनी जागा बनवली होती भांडी घासायला. भांडी घासून व धुवून झाली की लगेचच एका कोरड्या फडक्यावर उपडी करून ठेवायची. नंतर आम्ही दोघी हौदातल्या पाण्याने हातपाय तोंड धुवायचो. गार पाण्याने छान वाटायचे. कारण आमचा अभ्यास सलग ४-५ तास चालायचा. पावडर कुंकू लावून फ्रेश व्हायचो. मग ती माझ्याबरोबरच निघायची भाजी आणायला. भाजी आणायला ती दुसऱ्या वळणावर वळायची व मी पुढे माझ्या घराकडे जायचे.


जाता जाता आम्ही दुसऱ्या दिवशी कोणत्या विषयाचा व काय काय अभ्यास करायचा ते ठरवायचो.

Tuesday, October 07, 2008

सँडविच
जिन्नस:


मटार, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची, बटाटा, कांदा, टोमॅटो,
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद,
लाल तिखट, धनेजीरे पूड, पावभाजी मसाला, मीठ, लिंबू
स्लाईस ब्रेड
बटर अथवा साजूक तूप

वाढणी : ज्या प्रमाणात हवे असेल त्या प्रमाणात.


क्रमवार मार्गदर्शन :


जाड चिरलेला फ्लॉवर, कोबी व सिमला मिरची, मटार, बटाटा कूकरमध्ये शिजवून घ्या. नंतर ते चाळणीमध्ये घालून ठेवा म्हणजे त्यातले पाणी निथळून जाईल. कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्या.
मध्यम आचेवर कढईमध्ये थोडे तेल तापवून घ्या व नेहमीसारखी फोडणी करा. त्यात बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घालून परता. गॅस बारीक करून अधून मधून परतत राहा खमंग होईपर्यंत. मग त्यात उकडलेल्या भाज्या डावेने घोटून घेऊन घाला व ढवळा. नंतर त्यात लाल तिखट, धनेजीरे पूड, पावभाजी मसाला घाला. चवीप्रमाणे मीठ घालून चांगले ढवळून घ्या. नंतर त्यावर चवीप्रमाणे लिंबू पिळून परत एकदा एकसारखे ढवळून घ्या.


भाजी गार झाली की ब्रेडच्या स्लाईसच्या कडा काढून घ्या. ब्रेडच्या एका स्लाईसला बटर अथवा साजूक तूप लावा व एका स्लाईसवर मसालेदार भाजी पसरवून घ्या. दोन्ही स्लाईस एककेकांवर ठेवून सँडविच टोस्टर मध्ये भाजून घ्या.


थोडक्यात पावभाजी साठी जी भाजी करतो तशीच करायची आहे.


टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम असतानाच खा!

Monday, October 06, 2008

दुधी हलवा
वाढणी: २ जण


पाककृतीला लागणारा वेळ : ३० मिनिटे


जिन्नस :


किसलेला दुधी भोपळा ३ वाट्या
साखर 1 वाटी
दूध 2 वाटी
खवा २-४ चमचे अथवा Ricotta cheese २-४ चमचे
साजूक तूप २ चमचेक्रमवार मार्गदर्शन:

मध्यम आचेवर पातेले ठेवून त्यात साजूक तूप घाला. नंतर किसलेला दुधी भोपळा घालून परतून घ्या. नंतर त्यावर झाकण ठेवून वाफेवर दुधी शिजवा. नंतर त्यात दूध व साखर घालून ढवळा. आता हे मिश्रण चांगले शिजवा. दूध आटत आले की त्यात खवा अथवा Ricotta Cheese घालून मिश्रण चांगले ढवळा. अजून थोडे शिजले की गॅस बंद करा. वर झाकण ठेवा म्हणजे गार झाला की घट्ट होईल. दुधी हलवा तयार!
याच पद्धतीने गाजर हलवा बनवा.


साखरेचे प्रमाण कमी जास्त आवडीनुसार घ्यावे.
रिकोटा चीझ किंवा खवा नसला तरी चालतो. नुसते दूध आटवूनही घट्ट झाला की छान लागतो.
Sunday, October 05, 2008

वाटली डाळ


१ किंवा २ वाट्या हरबरा डाळ ७-८ तास पाण्यात भिजत घाला. वाटतानाच त्यामध्ये ४-५ हिरव्या मिरच्या व पुरेसे मीठ घालून बारीक वाटा. वाटताना जरूरीपुरते पाणी घाला. हिरवी मिरची चवीला तिखट आहे याची खात्री करून घ्या. कारण जर मिरचीला तिखटपणा नसेल तर वाटली डाळ रूचकर लागत नाही. वाटून झाल्यावर तेलाच्या फोडणीमध्ये ती वाटलेली डाळ घालून ढवळा. झाकण ठेवून वाफ द्या. २-३ मिनिटांनी झाकण काढून परत एकदा ढवळा. असे बरेच वेळा ती शिजेपर्यंत आणि मोकळी होईपर्यंत करावे लागेल. कालथ्याने डाळीचा वाटलेला गोळा मोकळा करत जावे प्रत्येक वाफेला. मध्यम आच ठेवावी. इलेक्ट्रीक शेगडीवर काही वेळा डाळ पातेल्याला लागते, तेव्हा सारखे बघावे लागते. वाफेवर डाळ हळूहळू शिजून मोकळी होईल व कोरडी होईल. खायच्या वेळी त्यावर चिरलेली कोथिंबीर व ओला नारळ पेरून घ्या. आवडत असल्यास चवीला थोडे लिंबू पिळा.