Friday, May 25, 2007

पातळ पोह्यांचा चिवडावाढणी:२ जण (८-१० दिवस पूरेल इतका)

पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे


पाककृतीचे जिन्नस:
पातळ पोहे १० वाट्या
डाळं १ वाटी,
भाजलेले शेंगदाणे १ वाटी
गोटा खोबऱ्याच्या खूप पातळ चकत्या १ वाटी
हिरव्या मिरच्या ४-५, कढिपत्ता १०-१५ पाने
धनेजीरे पावडर १ चमचा, लाल तिखट १ चमचा, पिठीसाखर २ चमचे
मीठ चवीनुसार, तेल १ वाटी, मोहरी,हिंग,जिरे, हळद फोडणीसाठी


क्रमवार मार्गदर्शन: सर्वात आधी चाळणीने पोहे चाळून ते निवडून घेणे. नंतर मध्यम आचेवर कढई ठेवून ती तापली की त्यात साधारण अर्धी कढई मावतील इतके पोहे घालून सतत ढवळणे. ढवळल्यावर काही वेळाने पोहे दुमडले जातील आणि कुरकुरीत होतील. पोहे कुरकुरीत झाले की नाही हे बघण्याकरता हाताने मोडून बघावेत. त्याचा चुरा झाला की पोहे कुरकुरीत झाले असे समजावे. अशा रितीने सर्व पोहे कुरकुरीत भाजून घेणे. भाजलेले पोहे एका परातीत ठेवणे.पोहे भाजून झाल्यावर मोठ्या कढईत एक वाटी तेल घालून त्यात नेहमी फोडणी करतो त्यापेक्षा जास्त मोहरी, जिरे, हिंग हळद व अर्धा चमचा तिखट घालून लगेच त्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून परतणे. हिरव्या मिरच्यांच्या रंग बदलला की लगेच दाणे घालणे व परतणे. दाण्याचा रंग बदलला(थोडा तांबुस झाला की) की डाळं घालणे व परतणे. डाळ्याचा रंग बदलला (तांबुस) की कढिपत्ता घालून परतणे. कढिपत्त्याचा रंग बदलला की सर्वात शेवटी अतिशय पातळ केलेल्या गोटा खोबऱ्याच्या चकत्या घालून परत परतणे. खोबऱ्याचा काळपट चॉकलेटी रंग झाला की मग त्यात भाजलेले सर्व पोहे घालून पटापट ढवळणे. नंतर गॅस थोडा बारीक करून त्यात अर्धा चमचा लाल तिखट, धनेजीरे पूड, साखर व चवीनुसार मीठ घालून पटापट ढवळणे. पटापट ढवळणे अशासाठी की फोडणी गरम असताना सर्व पोह्यांना समान तेल-तिखट-मीठ लागते. नंतर चिवड्याची चव बघून जे काय कमी असेल त्याप्रमाणे ते घालून (तिखट, मीठ) लगेच पटापट ढवळणे. नंतर गॅस बंद करून ५ -१० मिनिटांनी परत एकदा ढवळून त्यावर वर्तमान पत्राचा कागद झाकण म्हणून कलता ठेवणे. चिवडा एकदम गार झाला की डब्यात भरून घट्ट झाकण लावणे. जी वाटी पोहे घेण्याकरता वापरली तीच वाटी इतर साहित्य घेण्यासाठी वापरणे.

ह्याच पद्धतीने ५-१० किलोचा चिवडा पण करता येतो. पोहे भाजण्याची पद्धत हीच. पोहे बऱ्याच प्रमाणात असल्यामुळे ते भाजल्यावर वर्तमानपत्रावर काढून ठेवणे. नंतर फोडणी न करता दाणे, डाळं ..... इत्यादी तेलात हिंग व हळद घालून वेगवेगळे परतून त्या पसरलेल्या पोह्यांवर ओतणे व लगेच ढवळणे. म्हणजे एकदा फक्त दाणे, एकदा मिरच्या, एकदा खोबरे असे क्रमाक्रमाने. पोहे ढवळताना थोडे मीठ व साखर पण घालणे. हे सर्व झाले की मोठ्या कढईत वेगळी तेलाची फोडणी (मोहरी, हिंग, जीरे, लाल तिखट ) करून त्या कढईत मावतील इतके पोह्यांचे तयार झालेले मिश्रण घालून मीठ, साखर, धनेजीरे घालून ढवळणे. ह्याप्रमाणे थोडा थोडा करून तयार झालेला चिवडा परत दुसऱ्या वर्तमानपत्रावर ओतून चव बघणे. जे कमी असेल ते (फोडणी सुद्धा कमी वाटली तरी ती सुद्धा ) त्याप्रमाणे सर्व घालून परत ढवळणे. या पद्धतीने लग्नकार्यात येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांसाठी घरी केलेला चिवडा व (लाडूही) भरपूर प्रमाणात व चांगल्या चवीचा करता येतो.


रोहिणी
माहितीचा स्रोत:सौ आई

Thursday, May 17, 2007

डाळं लाडूपाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

डाळं ३ वाट्या पीठ होईल इतके
पीठीसाखर दीड वाटी
साजूक तूप १० चमचे

क्रमवार मार्गदर्शन: ३ वाट्या पीठ होईल इतके डाळं घेणे. मिक्सर/ग्राइंडर मधून बारीक करून घेणे. नंतर त्यात साजूक तूप व साखर घालून हाताने/चमच्याने एकसारखे ढवळून मग त्याचे लाडू वळणे. ३ वाट्यांमधे साधारण १२ ते १५ लाडू होतात. वर साखरेचे व तुपाचे प्रमाण दिले असले तरीही साखरेचे प्रमाण ज्याप्रमाणात गोड आवडते त्या प्रमाणात. आणि तूपही लाडू वळतील इतपत घालणे. जी वाटी पीठाचे प्रमाण घ्यायला वापरतो तीच साखर घ्यायला वापरणे.
डाळं म्हणजे आपण जे चिवड्यात घालतो ते आहे.