Thursday, October 22, 2009

काजू-पिस्ता वडी
"काजूपिस्ता वडी" ही माझी पाककृती मनोगत दिवाळी अंक २००९ इथे प्रकाशित झाली आहे. खाली लिंक दिली आहे.

http://www.manogat.com/diwali/2009/node/47.html


जिन्नस :
काजू पूड १ वाटी
पिस्ता पूड १ वाटी
साखर सव्वा वाटी
रिकोटा चीझ २ चमचे
साजुक तूप ५-६ चमचे

मार्गदर्शन : मध्यम आंचेवर कढई तापत ठेवा. त्यात सव्वा वाटी साखर व साखर पूर्णपणे बुडून थोडे वर पाणी घाला. थोडी आंच वाढवा. मिश्रण चांगले उकळू दे. अधूनमधून कालथ्याने ढवळत रहा आणि एकीकडे त्यातले काही थेंब एका वाटीत काढून पाक कितपत घट्ट होत आहे त्याचा अंदाज घ्या. एकतारी पाक झाला की आंच मध्यम करून त्यात साजुक तूप, रिकोटा चीझ व काजू-पिस्त्याची पूड घालून ढवळा. हे मिश्रण सारखे ढवळत रहा. काही वेळाने हे सर्व मिश्रण एकत्रित होऊन एकसंध होते. थोडे घट्ट लागायला लागते. गंधासारखे पूर्ण एकजीव झाले की गॅस बंद करा. नंतर काही वेळ कालथ्याने हे मिश्रण ढवळत राहा.

ताटलीला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण ओता. ओतले की हे मिश्रण पसरायला लागेल. थोडे जास्त पसरण्यासाठी ताटली हाताने थोडी सर्व बाजूने वाकडी करा म्हणजे मिश्रण ताटलीभर पसरून त्याची पातळी एकसारखी होईल. हे मिश्रण पटकन कोरडे होते म्हणून लगेच ताटली फिरवून घ्यावी. हे जमले नाही तर एका प्लस्टिकच्या कागदाला साजुक तुपाचा हात लावून, साजुक तूप लावलेला भाग मिश्रणाच्या वर येईल असा ठेवून पटापट एकसारखे थापावे. मिश्रण कोमट झाले की वड्या पाडाव्या.

या वड्या पटकन होतात. मी या वड्यामध्ये रोस्टेड काजू-पिस्ते वापरले आहेत त्यामुळे रंग थोडा फिका आला आहे.

Wednesday, October 21, 2009

भोपळा वडी

"भोपळा वडी" ही माझी पाककृती मनोगत दिवाळी अंक २००९ येथे प्रकाशित झाली आहे. खाली लिंक दिली आहे.


http://www.manogat.com/diwali/2009/node/46.htmlजिन्नस :
लाल/पिवळा भोपळा किसून ३ वाट्या
साखर २ वाट्या
रिकोटा चीझ अर्धी वाटी
साजूक तूप ८ ते १० चमचे

क्रमवार मार्गदर्शन :
भोपळा चिरून त्याची साले काढा व किसून घ्या. मध्यम आंचेवर एका कढईत साजुक तूप व किसलेला भोपळा घालून परतून घ्या. नंतर त्यावर झाकण ठेवा म्हणजे वाफेवर भोपळा शिजेल. थोड्यावेळाने झाकण काढून परत एकदा कालथ्याने परता. असे २-४ वेळा करा म्हणजे भोपळा व्यवस्थित शिजेल. भोपळा शिजण्याकरता पाण्याचा वापर करू नका.

आता हा शिजलेला भोपळा एका भांड्यात काढून ठेवा. त्याच कढईत २ वाट्या साखर घाला. साखर पूर्णपणे बुडून वर अगदी थोडे राहील इतके पाणी घाला. आंच मध्यम असू देत. साखर विरघळायला लागेल. एकीकडे चमच्याने हलवत रहा व अधुनमधून यातले काही थेंब एका वाटीत काढून पाक कसा होत आहे त्याचा अंदाज घ्या. एकतारी पाक करा. एकतारी पाक झाला की त्यात शिजवून घेतलेला भोपळा व रिकोटा चीझ घाला. कालथ्याने हे मिश्रण ढवळत रहा. हे मिश्रण काही वेळाने खूप उकळायला लागेल.

आता थोडी आंच वाढवा. हे मिश्रण आटायला लागेल. हे मिश्रण खूप आटवावे लागते. त्याकरता कालथ्याने सतत ढवळावे लागते. काही वेळाने हे मिश्रण कोरडे पडायला लागेल. आता गॅस बंद करा व अजून काही वेळ मिश्रण ढवळा. आता या मिश्रणाचा एक कोरडा गोळा तयार होईल. हा गोळा एका तूप लावलेल्या ताटलीत काढून तो लगेच एकसारखा थापा. थापण्याकरता एक पातळ प्लॅस्टिकचा कागद तुपाचा हात लावून घ्या. मिश्रण कोमट झाले की कालथ्याने वड्या पाडा.

Monday, October 19, 2009

चकलीजिन्नस :

१ वाटी कणिक
१ वाटी तांदुळाचे पीठ
१ चमचा लाल तिखट
१ चमचा धनेजिरे पूड
पाव चमचा हळद,
पाव चमचा हिंगाची पूड
मीठ चवीप्रमाणे
तेल मोठे २ चमचे
२ वाट्या पाणीक्रमवार मार्गदर्शन : कणिक व तांदुळाच्या पीठामध्ये लाल तिखट, हळद, हिंगपूड धनेजिरे पूड व चवीप्रमाणे मीठ घालून पीठ एकत्र कालवा. चव पहा. काही कमी जास्त चवीला हवे असेल तर ते घालून परत नीट एकदा कालवून घ्या. आता मध्यम आचेवर एका पातेल्यात पाणी तापत ठेवा. पाण्यात तेल घाला. थोड्यावेळाने पाणी उकळायला लागेल. पाणी चांगले दणदणीत उकळू दे. उकळी आल्यावर गॅस बंद करून तिखट मीठ घालून कालवलेले पीठ उकळलेल्या पाण्यात घालून कालथ्याने पटापट ढवळा. त्यावर झाकण ठेवा म्हणजे आतल्या आत पाण्याची वाफ पीठामध्ये मुरेल. थोड्यावेळाने झाकण काढा. पीठ कोमट असतानाच चकल्या पाडा. चकल्या पाडण्यासाठी तयार झालेले थोडे पीठ थोडे पाणी घालून चांगले हाताने मळून घ्यावे म्हणजे चकलीमध्ये एकसंधपणा येईल. या पीठात थोडे तीळ व जिरे भाजून घातले तर चकलीच्या अधून मधून हे तीळजिरे चांगले दिसतील. या चित्रात केलेल्या चकलीमध्ये तीळ व जिरे नाहीत. थोडे भाजलेले तीळ व जिरे कोरडे पीठ तयार करताच घालावे.

चकल्या तळताना मध्यम आचेवर कढई ठेवून त्यात जरूरीपुरते तेल घाला. चकल्या तळण्यासाठी नेहमी थोडे जास्त तेल घ्यावे म्हणजे त्यात चकल्या पूर्णपणे बुडून चांगल्या तळल्या जातात. तेल चांगले तापल्यावरच तयार केलेल्या चकल्या तळा. चकल्या तेलात सोडल्या की थोडा वेळाने चकल्या उलटा. उलटण्याची घाई करू नये. मोडल्या जातील. तेल व्यवस्थित तापले आहे की नाही याची चाचणी करून घ्या. त्यासाठी अगदी थोडे पीठ घालून पहा. ते तरंगून वर आले तर तेल तापले आहे असे समजावे. ह्या चकल्या छान कुरकुरीत होतात.


ही पाककृती माझी नाही. सौ सायली जोशीची आहे. मनोगत या संकेतस्थळावर पूर्वप्रकाशित झाली आहे. खाली मूळ पाककृतीची लिंक देत आहे. या पाककृतीमध्ये मी अगदी थोडे बदल केले आहेत.

http://www.manogat.com/node/8154

Wednesday, October 14, 2009

चिरोटेजिन्नस:

बारीक रवा १ वाटी
मैदा अर्धी वाटी
तांदुळाची पिठी ५-६ मोठे चमचे, साजूक तूप ७-८ मोठे चमचे, थोडे मीठ
४-५ मोठे चमचे तेल, गरम करून घालण्यासाठी
तळणीसाठी तेल
पिठीसाखर चिरोट्यांवर पेरण्यासाठी
दूध (रवा मैदा भिजवण्यासाठी)मार्गदर्शन: सर्वात प्रथम रवा मैदा एका परातीत घ्या. त्यात अगदी थोडे चवीपुरते मीठ घाला. मध्यम आचेवर कढलं तापत ठेवून त्यात ५-६ मोठे चमचे तेल घाला. ते चांगले कडकडीत तापल्यावर रवामैद्यावर घाला. एका चमच्याने पीठ एकसारखे करून घ्या व दूध घालून रवामैद्याचे पीठ भिजवा. हे पीठ २ तास मुरू द्यावे. नंतर एका वाटीमध्ये तांदुळाची पिठी व साजूक तूप घ्या व हे मिश्रण चांगले फेटून घ्या. हे मिश्रण पेस्ट सारखे पातळ करा. पोळीवर लावण्याइतपत पातळ करा.


सगळ्यात कमी आचेवर कढई ठेवा व त्यात चिरोटे व्यवस्थित तळले जातील इतपत तेल घाला. रवामैद्याच्या पिठाचा एक छोटा गोळा घेऊन एक खूप पातळ पोळी लाटा. ही पोळी एका ताटात काढून घ्या. अशीच अजून एक खूप पातळ पोळी लाटा. या पोळीवर सर्व बाजूने तुपात भिजवलेले तांदुळाचे पीठ लावा. त्यावर आधी केलेली पातळ पोळी ठेवा व या पोळीवरही तांदुळाचे पीठ सर्व बाजूने लावा. आता या पोळीच्या घड्या घाला. दोन्ही बाजूने अर्धी अर्धी घडी घाला व या दोन्ही अर्ध्या घड्या एकमेकांवर येऊ देत. प्रत्येक घडी घालताना त्यावर तांदुळाचे पीठ लावून घ्या. आता एक वळकटी तयार होईल. ही वळकटी दोन्ही बाजूने दुमडून घ्या म्हणजे आत लावलेले पीठ बाहेर येणार नाही. आता या वळकटीचे सुरीने अथवा कालथ्याने चौकोनी तुकडे करा. या तुकड्यांवर एकदा आडव्या बाजूने व एकदा उभ्या बाजूने अलगद लाटणे फिरवा. अशा रितीने सर्व चिरोटे करून घ्या.


कढईत तेल तापत ठेवलेले आहे त्याची आच मध्यम करा. तापलेल्या तेलात सर्व चिरोटे तळून घ्या. तळून ताटात काढल्यावर लगेचच गरम असताना त्यावर पिठीसाखर पेरा. हे चिरोटे खुसखुशीत व कुरकुरीत होतात. चविष्ट लागतात.