Thursday, October 26, 2006

रंगीत सांजा
वाढणी:२ जणांना


पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस

रवा १ वाटी (बारीक अथवा जाड)
टोमॅटो १, अर्धे गाजर, अदपाव वाटी मटार, अर्धा कांदा
१ लहान बटाटा, अर्धी सिमला मिरची, ४-५ श्रावणघेवडा शेंगा
अदपाव भाजलेले दाणे, २ मिरच्या, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
खवलेला ओला नारळ १ वाटी, अर्धे लिंबू, अर्धा चमचा लाल तिखट,
तेल, मोहरी, हिंग, हळद, जिरे, मीठ, साखर, बारीक शेव


क्रमवार मार्गदर्शन:

सर्वात आधी मध्यम आचेवर रवा किंचीत तांबुस रंग येईपर्यंत भाजून घ्या. . फोडणीमध्ये हिरव्या मिरच्या, लाल तिखट व वरील सर्व भाज्या बारीक चिरून घाला व परतून घ्या. १-२ वाफा देवून शिजवा.  नंतर त्यात २ वाट्या पाणी घालून व लिंबू पिळून, चवीनुसार मीठ व थोडीशी साखर घालून कालथ्याने ढवळून एक उकळी
आणा. उकळी आली की त्यात भाजलेला रवा घालून पटापट कालथ्याने ढवळा. गुठळी होऊन न देणे. नंतर त्यावर झाकण ठेवून १-२ वेळा दणदणीत वाफ आणून परत कालथ्याने  ढवळा. सांजा मोकळा झाला पाहिजे.


वर दिलेल्या सर्व भाज्या बारीक चिरून (बटाटा, कांदा, मटार, श्रावणघेवडा उर्फ बीन्स, सिमला मिरची, गाजर, टोमॅटो ) साधारण २-३ वाट्या होतात.अधिक टीपा:हा रंगीत सांजा खाताना त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर , खवलेला ओला नारळ व बारीक शेव घालून खा. सर्व भाज्या घातल्याने हिरवा, पिवळा, पांढरा, लाल रंग येतो. शिवाय त्यावर कोथिंबीर,ओला नारळ व शेव घातल्याने खायलाही मजा येते.

रवा लाडूवाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस

रवा १ वाटी, खवलेला ओला नारळ अर्धी वाटी
साजूक तूप ४ चमचे,
१ वाटी साखर,
साखर बुडेल एवढे पाणी

क्रमवार मार्गदर्शन:

मध्यम आचेवर रवा साजूक तुपावर तांबुस रंगावर भाजणे. रवा अर्धा भाजत आला की त्यात ओला नारळ घालून परत थोडे भाजणे.

साखर बुडेल इतके पाणी घालून पाक कराणे. पाक होण्यासाठी साखरपाणी या मिश्रणाला चांगली उकळी आली आणि ती विरली की गॅस बंद करून लगेचच भाजलेला रवा व नारळ पाकामध्ये घालून कालथ्याने चांगले ढवळणे. खूप गार झाले की मग लाडू वळणे.

पाक करताना रंग बदलेल. किंचीत पिवळसर दिसेल. खूप पक्का पाक नको.

एका वाटीत छोटे १० लाडू होतात.


अधिक टीपा:आवडत असल्यास यात बेदाणे व बदामाचे काप घालू शकता. एकतारी व दोनतारी पाक कसा ओळखावा हे मला माहित नाही, तेवढा अनुभव नाही. त्यामुळे जसा पाक केला तशीच कृती वर दिलेली आहे. याप्रमाणे लाडू खूप कडक होत नाहीत. नारळ घातल्यामुळे चवीला चांगले लागतात.