Showing posts with label तांदुळाच्या पिठाचे पदार्थ. Show all posts
Showing posts with label तांदुळाच्या पिठाचे पदार्थ. Show all posts

Wednesday, December 30, 2009

ताकातली उकड



वाढणी:२ जणांना


पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे


पाककृतीचे जिन्नस


खूप आंबट ताक १ मोठा ग्लास भरून
तांदुळाचे पीठ
हिरव्या तिखट मिरच्या ३-४
तेल,
मोहोरी, हिंग, हळद


क्रमवार मार्गदर्शन: तेलाची फोडणी करून त्यात ३-४ हिरव्या तिखट मिरच्या चिरून घाला. नंतर त्यात ताक आणि चवीपुरते मीठ घालून ढवळा. ताक खूप दाट नसावे. गॅस मोठा करून ताक उकळून द्यावे. उकळी आली की एकिकडे तांदुळाचे पीठ घालत राहा, व त्याच वेळी एकीकडे कालथ्याने भराभर ढवळा. गोळा होण्याइतपतच तांदुळाचे पीठ घाला, जास्ती पीठ नको. आणि पीठाची गूठळी न होण्याबद्दल काळजी घ्या. नंतर गॅस बारीक करून १-२ वेळा वाफेवर शिजवा.


खायला देताना खोलगट डीशमध्ये उकड घालून त्यावर कच्चे तेल५-६ चमचे घालून द्या. कच्चे तेल जितके जास्ती घालू तितके ते उकडीमध्ये मुरते व चवीला चांगली लागते. गरम गरम उकड खाताना बरोबर पांढऱ्या कांद्याचे काप खायला विसरू नये.

Thursday, November 19, 2009

तांदुळाच्या पीठाचे धिरडे

जिन्नस : तांदुळाचे पीठ ४ ते ५ डाव चवीपुरते मीठ तेल पाणी ३-४ ग्लास क्रमवार मार्गदर्शन : तांदुळाच्या पीठात चवीपुरते मीठ घालून पीठ पातळ भिजवा. गुठळी होऊन देऊ नका. पीठ आमटीसारखे पातळ भिजवा. नंतर मध्यम आचेवर तवा तापत ठेवा. तो जरूरीपुरता तापला की त्यावर चमच्याने तेल घाला व कालथ्याने तेल तवाभर पसरवून घ्या. आता तांदुळाच्या पीठाचे धिरडे तव्यावर घाला. हे पीठ डावेने वरून घालावे. पीठ सैल असल्याने ते आपोआप जितके पसरेल तितकेच पसरू दे. हे पीठ तव्यावर घातल्यावर डावेने पसरू नये. डावेला ते चिकटते. काही सेकंदाने धिरड्यावर व धिरड्याच्या सर्व बाजूने तेल सोडा व काही वेळाने धिरडे कालथ्याने उलटा. उलटल्यावर परत एकदा तेल घालून मग ते तव्यावरून काढा. हे पीठ पातळ असल्याने तव्यावर पसरून त्याला जाळी पडते. दुसरे धिरडे घालताना परत एकदा पीठ डावेने ढवळून घ्या. पीठ घट्ट वाटल्यास परत एकदा थोडे पाणी घाला. हे धिरडे बटाट्याच्या काचऱ्या किंवा उकडून बटाट्याच्या भाजीबरोबर चांगले लागते. ओल्या नारळाची चटणी किंवा लसूण खोबरे, लसूण दाणे यांची झणझणीत चटणीही छान लागते. सोपे व पटकन करतायेण्यासारखे आहे.

Wednesday, September 03, 2008

मोदक


जिन्नस :

२ वाट्या खवलेला ओला नारळ, २ वाट्या चिरलेला गूळ
१ चमचा खसखस,
२ वाट्या तांदुळाचे पीठ, २ वाट्या पाणी
२ चमचे तेल, मीठ
उकड मळण्यासाठी तेल व पाणी
साजूक तूप २ चमचे



खवलेला ओला नारळ व चिरलेला गूळ एकत्रित करा. मध्यम आचेवर पातेले ठेवून त्यात २ चमचे साजूक तूप घालून एकत्रित केलेले मिश्रण घालून शिजवा. काही वेळाने या मिश्रणाचे सारण बनायला लागते व ते कोरडे पडायला लागते. गॅस बंद करा. सारण शिजत आले की त्यात खसखस भाजून घाला.


मध्यम आचेवर एका पातेल्यात २ वाट्या पाणी तापत ठेवा. त्यात थोडेसे मीठ व २ चमचे तेल घाला. या पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करा. उकळलेल्या पाण्यात तांदुळाची पीठी घालून कालथ्याने पटापट एकसारखे ढवळा. नंतर परत मंद आचेवर हे पातेले ठेवून त्यावर झाकण ठेवा. एक दणदणीत वाफ येऊ देत. नंतर झाकण काढून ही तयार झालेली उकड एका ताटलीत काढून घ्या व त्यामध्ये पाणी व तेल घालून चांगली मळून घ्या.


उकडीचा साधारण मोठ्या लिंबाएवढा गोळा घेऊन त्याला गोल आकार द्या. पाणी व तेलाचा हात घेऊन हातानेच या गोल आकाराची पातळ, नितळ व खोलगट पारी बनवा. पारीच्या वरच्या कडा जास्त पालळ असायला हव्यात. नंतर या खोलगट पारीमध्ये पूरेसे सारण घालून थोड्या थोड्या अंतरावर पाकळीसारखा आकार द्या. पाकळीचा आकार देताना पारीच्या कडा दोन बोटांच्या चिमटीमध्ये पकडून दाब द्या. हा दाब तसाच पारीच्या खालपर्यंत द्या. अश्या प्रकारे सर्व पाकळ्या अगगद हाताने एकत्रित करून त्याचे मोदकाच्या वर एक टोक बनवा जसा देवळाला कळस असतो तसा.


अश्या प्रकारे सर्व मोदक करून घ्या. चाळणीला तेल लावून मोदक त्यामध्ये घालून कूकरमध्ये उकडून घ्या. कालावधी १५ मिनिटे. जश्या इडल्या उकडतो त्याप्रमाणे.

गरम गरम मोदकांवर साजूक तूप भरपूर प्रमाणात घ्या. चव चांगली लागते. वरील प्रमाणात साधारण १५ ते २० मोदक होतात.

Tuesday, January 16, 2007

निवगरी




वाढणी:जितकी माणसे तितक्या निवगऱ्या

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

उकडीच्या मोदकांना करतो तशी उकड करणे
कोथिंबीर, मिरच्या, जिरे किंवा जिऱ्याची पावडर
मीठ
उकड मळण्यासाठी तेल,पाणी

क्रमवार मार्गदर्शन:

ही पाककृती सोपी आहे. ज्यांना उकडीचे मोदक करता येतात, त्यांना निवगरी करणे काही अवघड नाही. तांदुळाच्या पीठाची केलेली उकड तेल-पाण्यामधे मळून घेणे. त्यात चवीप्रमाणे मिरच्या वाटून घालणे, चवीप्रमाणे मीठ, चिरलेली कोथिंबीर व जिरे/जिरे पावडर घालुन परत मळून घेउन वड्याच्या गोल आकाराप्रमाणे पातळ थापणे. मोदक जसे वाफेवर उकडतो त्याचप्रमाणे केळीच्या पानावर ठेवून उकडणे. गोड मोदक खाताना मधुन मधुन तिखट निवगरी खायला छानच लागते.
मध्यम आचेवर एका पातेल्यात २ वाट्या पाणी तापत ठेवा. त्यात थोडेसे मीठ व २ चमचे तेल घाला. या पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करा. उकळलेल्या पाण्यात तांदुळाची पीठी घालून कालथ्याने पटापट एकसारखे ढवळा. नंतर परत मंद आचेवर हे पातेले ठेवून त्यावर झाकण ठेवा. एक दणदणीत वाफ येऊ देत. नंतर झाकण काढून ही तयार झालेली उकड एका ताटलीत काढून घ्या व त्यामध्ये पाणी व तेल घालून चांगली मळून घ्या.


रोहिणी