Thursday, February 28, 2013

भाज्यांचे कटलेट


जिन्नस :

श्रावणघेवडा
सिमला मिरची
गाजर
कोबी
मटार (अर्धी वाटी)
बटाटा १ किंवा २ (साले काढावीत)
लसूण पाकळ्या ४-५
आले छोटा तुकडा
चिरलेली कोथिंबीर २-३ चमचे
लाल तिखट १ चमचा
धनेजिरे पूड १ चमचा
गरम मसाला १ चमचा
मीठ चवीपुरते
कॉर्न प्लोअर २-३ चमचे
तांदुळ पीठ २-३ चमचे
डाळीचे पीठ २-३ चमचे
कॉर्न प्लोअर १ वाटी (घोळण्याकरता)
रवा जाड १ वाटी (घोळण्याकरता)
तेल १ वाटी



मार्गदर्शन : वर लिहिलेल्या भाज्या मध्यम आकाराच्या चिरा. ( ४ ते ५ वाट्या ) व धूऊन घेऊन कूकरमध्ये किंवा मायक्रोवेव्ह मध्ये उकडून घ्या. सोबत बटाटाही उकडून घ्या. उकडलेल्या सर्व भाज्या रोळीत घालून त्या खाली एक ताटली ठेवा. भाज्या पाणी निथळण्यासाठी रोळीत ठेवायच्या आहेत. पाणी सर्व निथळले की सर्व भाज्या एका परातीत घाला. त्यात बटाटा किसून घाला. नंतर यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला, मीठ व चिरलेली कोथिंबीर घाला. लसूण पाकळ्या, आले यांचे सुरीने खूप बारीक तुकडे करा व तेही सर्व भाज्यांमध्ये घाला. नंतर त्यात डाळीचे पीठ, तांदुळाचे पीठ, व कॉर्नचे पीठ घालून मिश्रण हाताने एकत्रित करा. वर दिलेली पीठे ही भाज्यामध्ये जास्त घालू नयेत. आता या मिश्रणाचे गोल व चपटे गोळे करा. एका ताटात रवा व कॉर्न फ्लोअर पसरून घ्या व त्यात हे गोळे एकेक करून घोळवून घ्या. आता मध्यम आचेवर एक तवा तापत ठेवा. त्यावर २-३ चमचे तेल घालून कालथ्याने पसरवून घ्या. त्यावर एका वेळी ३ ते ४ तयार केलेले कटलेट ठेवून
ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस दोन्ही बाजूने भाजून घ्या. कटलेट उलटले की परत थोडे तेल घालावे. टोमॅटो केचप बरोबर गरम गरम कटलेट खायला द्या. सोबत चहा हवाच !




उकडलेल्या भाज्यातले पाणी निथळूनही त्या जास्त ओल्या वाटल्या तर पेपर टॉवेल वर थोडावेळ घाला म्हणजे बाकीचे उरलेले पाणी शोषून घेतले जाईल. भाज्या जास्त ओल्या नसल्या की मग त्यात अगदी जरूरीपुरतेच वर लिहिलेली पीठे घालावीत.


Monday, February 18, 2013

रस्सा



जिन्नस :

एक मोठा बटाटा (साले काढावीत. )
अर्धा कांदा
दीड लाल टोमॅटो
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा धनेजिरे पूड
अर्धा चमचा गरम मसाला
४-५ चमचे दाण्याचे कूट
४-५ चमचे ओल्या नारळाचा खव
चवीपुरते मीठ
पाव चमचा साखर
तेल फोडणीसाठी
मोहरी, जिरे, हिंग, हळद



मार्गदर्शन : बटाटा, कांदा, टोमॅटो या सर्वाच्या मध्यम आकाराच्या फोडी करा. मध्यम आचेवर छोटा कूकर तापत ठेवा. तो तापला की त्यात तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात बटाटा कांदा व टोमॅटोच्या केलेल्या फोडी घाला. हे मिश्रण एकदा ढवळून घ्या. नंतर त्यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला, मीठ, साखर, दाण्याचे कूट, व ओला नारळ घालून परत हे मिश्रण डावेने नीट ढवळून घ्या. नंतर त्यामध्ये  एक वाटी पाणी घाला. परत एकदा डावेने ढवळून घ्या. कूकरचे झाकण लावा. व एक शिट्टी करा. झटपट रस्सा तयार झाला आहे. गॅस बंद करा.

Wednesday, February 13, 2013

अडाई


जिन्नस :

मूगडाळ पाव वाटी
हरबरा डाळ पाव वाटी
उडीद डाळ पाव वाटी
तुरीची डाळ पाव वाटी
तांदुळ पाव वाटी
अर्धा कांदा चिरलेला
हिरव्या मिरचीचे २-३ तुकडे/लाल वाळलेल्या मिरच्यांचे तुकडे
आले बारीक २-३ तुकडे
चिरलेली कोथिंबीर ४-५ चमचे
चिमुटभर हिंग पावडर
चिमूटभर मेथी पावडर
चवीपुरते मीठ


मार्गदर्शन : वर दिलेल्या प्रमाणात सर्व डाळी व तांदूळ एका पातेल्यात पाणी घालून त्यात भिजत घाला. ७-८ तासाने त्यातील पाणी काढून टाका व मिक्सर/ ग्राईंडर वर सर्व बारीक वाटून घ्या. वाटताना त्यात आले, मिरची  कांदा व कोथिंबीर घाला. मिश्रण वाटताना त्यात जरूरीपुरतेच थोडे पाणी घाला. जास्त पाणी नको. नंतर हे मिश्रण एका पातेल्यात काढून घ्या. नंतर त्यात हिंग व मेथी पावडर घाला. चवीपुरते मीठ घाला. नंतर हे मिश्रण नीट ढवळून घ्या. आता मध्यम आचेवर एक तवा तापत ठेवा. व त्यावर एकेक करून अडाई डोसा करा. जाडसर किंवा पातळ आवडीप्रमाणे  करा. खायला देताना त्यावर लोणी किंवा साजूक तूप घाला. सोबत सांबार, किंवा कोणतेही लोणचे, किंवा चटणी घ्यावी.

कांदा मिरची आले व कोथिंबीर वाटताना घातले नाही तरी चालेल. डोसा घालताना सर्व बारीक चिरून घातले तरी चालते. आवडीनुसार करावे.

अडाई  खाण्याची पद्धत वेगळी आहे. अडाई वर 'चटणी पूड' नावाची कोरडी चटणी पसरतात व त्यावर तेल घालून त्याची गुंडाळी करून खातात. अडाई  बरोबर गूळ खातात.

माहितीचा स्त्रोत : लक्ष्मी व उमा,, या कृतीत मी थोडेफार बदल केले आहे.



Tuesday, February 12, 2013

झटपट आमटी

जिन्नस :

तुरीची डाळ १ वाटी
अर्धा चमचा तिखट
अर्धा चमचा धनेजिरे पूड
अगदी थोडा गूळ
मीठ
फोडणीकरता तेल
मोहरी, हिंग, हळद
पाणी ३ वाट्या
थोडी चिरलेली कोथिंबीर
अर्धा कांदा चिरलेला
अर्धा टोमॅटो चिरलेला
१ मिरची चिरलेली



मार्गदर्शन : तुरीची डाळ पाण्यामध्ये ५-१० मिनिटे भिजत घाला. मध्यम आचेवर एक छोटा कूकर तापत ठेवा. तो तापला की मग त्यात फोडणीकरता तेल घाला. ते तापले की मग त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. नंतर लगेचच चिरलेली मिरची, कांदा व टोमॅटो घाला. थोडे परतून घ्या. नंतर त्यात तुरीची भिजलेली डाळ (डाळ भिजत घातलेली आहे, त्यातले पाणी काढून टाका. ) तिखट, धनेजिरे पूड, चवीपुरते मीठ व थोडा गूळ व चिरलेली कोथिंबीर घाला. हे सर्व मिश्रण पळीने नीट ढवळून घ्या. नंतर त्यामध्ये ३ वाट्या पाणी घालून परत एकदा नीट ढवळा. आता कूकरचे झाकण लावा व ३ शिट्ट्या करा व गॅस बंद करा. झटपट आमटी तयार झालेली आहे.

माहितीचा स्त्रोत : कु. गौरी जपे ( मावस पुतणी)


Friday, February 08, 2013

गुलाबजाम



जिन्नस :

गिटस गुलाबजामचे पाकीट १
दूध अर्धा वाटी (गरम करून कोमट करावे)
साखर २ वाट्या
पाणी पाऊण वाटी
तळण्यासाठी तेल

मार्गदर्शन : गुलाबजाम मिक्सचे पाकीटातील मिश्रण एका ताटात काढून घ्या व त्यात कोमट दूध घालून हे मिश्रण हाताने खूप मळून घ्यावे. भिजवलेले मिश्रण तासभर मुरवत ठेवावे. नंतर तुपाचा हात घेऊन या मिश्रणाचे खूप छोटे गोळे बनवून घ्या. नंतर कढईत साखर आणि पाणी घालून ही कढई गॅसवर ठेवा. आच मध्यम ठेवा. थोड्यावेळाने साखरेला उकळी येईल. उकळी आली की लगेच गॅस बंद करा. आता बनवलेले गुलाबजाम तळून त्या पाकात घाला व ढवळून घ्या.  गुलाबजाम तळताना कढईत तेल घाला व कढई मध्यम आचेवर ठेवा. तेल तापले की गुलामजाम तळा. तळताना गॅस मंद ठेवा व ब्राऊन रंग येईपर्यंत तळा. गुलाबजाम पाकात घातले की तासाभराने ते पाकात चांगले मुरतील व खाण्यास देता येतील.

ज्यांना पाक आवडत नसेल, कोरडे गुलाबजाम आवडत असतील त्यांच्यासाठी....

पाकात गुलाबजाम मुरले की ते एकेक करून बाहेर काढावेत. एका ताटात साखर पसरावी व त्यात हे गुलाबजाम घोळवावेत म्हणजे ते कोरडे होतील.