Monday, December 03, 2012

पाचक


जिन्नस :

लिंबाचा रस अर्धी वाटी
किसलेले आले अर्धी वाटी
साखर दीड वाटी
सैंधव मीठ पाव चमच्यापेक्षा कमी


मार्गदर्शन : वरील सर्व मिश्रण एकत्रित करा व चमच्याने ढवळून घ्या. बाटलीत भरून ठेवा. अधुनमधून बाटलीतले हे मिश्रण चमच्याने ढवळत रहा. पित्तशामक पाचक तयार. मळमळत असेल तर पाव ते अर्धा चमचा खा. बरे वाटेल. रोज सकाळी चहाच्या आधी खाल्ले तरी चालते. तोंडाला चव नसेल तर खा. बरे वाटेल.

Wednesday, November 28, 2012

पौष्टिक मुडाखि



वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस :

तांदुळ १ वाटी, अर्धी वाटी मुगाची डाळ, ३ वाट्या पाणी
१ वाटी गाजर व सिमला मिरचीच्या जाड फोडी
१ वाटी मटार, १ वाटी फ्लॉवरची मोठी फुले
१ वाटी जाड चिरलेला कोबी, ४-५ लसुण पाकळ्या, थोडे आले,
२ मिरच्या, बारीक चिरलेला कांदा २ चमचे, मीरपूड अर्धा चमचा, मीठ,
मोहरी, हिंग, जिरे, हळद, फोडणीकरता तेल


क्रमवार मार्गदर्शन: तांदुळ व डाळ पाण्यामध्ये धुवून रोवळीमधे १ तास निथळत ठेवा. नंतर लसूण, आले, मिरच्या व कांदा खूप बारीक चिरा. तेलाच्या फोडणीमधे बारीक चिरलेले आले,लसुण,मिरची,कांदा व मिरपूड घालून २-३ मिनिटे परतून घ्या. नंतर चिरलेल्या सर्व भाज्या व डाळ तांदुळ घालून परत २-३ मिनिटे परतून घ्या. नंतर या मिश्रणात डाळ तांदुळ प्रमाणाच्या दुप्पट पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून एकसारखे ढवळून घ्या व याची खिचडी करा. कूकरमधे खिचडी केली तर वाफ धरल्यावर लगेच गॅस बंद करा. शिट्टी करायची नाही.

मुडाखि म्हणजेच मुगाच्या डाळीची खिचडी हे सर्वांना माहिती आहेच.



अधिक टीपा:गरम व तिखट खिचडी खाताना बरोबर थंडगार दही घ्या. खिचडीबरोबर पाहिजे असल्यास टोमॅटो काकडीचे गोल काप, भाजलेला/तळलेला उडदाचा किंवा पोह्याचा पापड, कैरीचे लोणचे/लिंबाचे लोणचे असल्यास उत्तम !

Friday, November 16, 2012

हिरव्या टोमॅटोची चटणी


साहित्य :

हिरवे टोमॅटो - २
कच्चे दाणे - मूठभर
हिरव्या मिरच्या - ३
लसूण पाकळ्या - ६
तेल - पाव वाटी
जिरे - चिमूटभर (फोडणीपुरते)
मीठ चवीपुरते


कृती :
लसूण पाकळ्या व मिरच्या बारीक चिरून घ्या. तसेच टोमॅटोच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. मध्यम आचेवर तवा तापत ठेवा. तवा तापला की त्यावर २-३ चमचे तेल घालून कच्चे दाणे परतून घ्या व नंतर ते एका ताटलीत काढून घ्या. परत २-३ चमचे तेल घालून त्यावर चिरलेल्या मिरच्या व लसूण पाकळ्या घालून खरपूस परता व नंतर ताटलीत काढून घ्या. याप्रमाणेच तेलावर टोमॅटोच्या फोडी परतून त्या ताटलीत काढून ठेवा. हे सर्व मिश्रण गार झाले की त्यात चवीपुरते मीठ घालून मिक्सरवर बारीक करून घ्या. नंतर ही तयार झालेली चटणी एका बाऊलमध्ये घाला. मध्यम आचेवर एक कढले तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात २ चमचे तेल घाला व ते तापले की त्यात जिरे घाला. जिरे तडतडले की गॅस बंद करा. जिऱ्याची केलेली फोडणी चटणीवर घालून चमच्याने एकसारखे ढवळा. चटणी तयार झालेली आहे. इडली डोश्यासोबत ही चटणी छान लागते.

Wednesday, November 14, 2012

अळीवाचे लाडू


साहित्य :
अळिव पाव वाटी
दूध एक वाटी
नारळाचा खव ३ वाट्या
गूळ २ वाट्या
साजूक तूप १ चमचा


कृती :

दुधामध्ये अळिव १० ते १२ तास भिजत घालावेत. एका पातेल्यात भिजलेले अळिव, नारळाचा खव व गूळ एकत्र करा. नंतर मधम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात एक चमचा साजूक तूप घालून वर एकत्र केलेले मिश्रण घाला. कालथ्याने सर्व मिश्रण ढवळत राहा. थोड्यावेळाने गुळ वितळून मिश्रण पातळ होईल. आता आच मंद करा. थोड्यावेळाने मिश्रण कोरडे होईल व त्याचा गोळा बनायला लागेल. हे मिश्रण शिजताना एकीकडे कालथ्याने ढवळत राहा. आता गॅस बंद करा. थोड्यावेळाने लाडू वळा. पाव वाटी अळिवाचे १५ लाडू होतात.

ही माझी पाककृती मनोगत दिवाळी अंक २०१२ मध्ये प्रकाशित झाली आहे.

 

Tuesday, November 13, 2012

अळूवडी



साहित्य :

अळूची पाने २
हरबरा डाळीचे पीठ २ वाट्या
चिंचगुळाचे दाट पाणी २ वाट्या
लाल तिखट दीड चमचा
हळद अर्धा चमचा
धने जिरे पूड अर्धा चमचा
तीळ १ चमचा
चवीपुरते मीठ
तळणीसाठी तेल

कृती :
अळूची पाने धुवून पुसून घ्या. पसरट भांड्यामध्ये डाळीचे पीठ घ्या. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, हळद, तीळ, मीठ व चिंचगुळाचे पाणी घाला व हे मिश्रण चमच्याने ढवळून घ्या. ढवळताना पीठाच्या गुठळ्या राहणार नाहीत हे पाहा. नंतर जरूरीपुरते पाणी घालून हे मिश्रण थोडे पातळ करा. मिश्रण पेस्ट सारखे झाले पाहिजे इतपत पाणी घालून पीठ भिजवा. नंतर अळूचे एक पान उलटे करून एका ताटात ठेवा. त्यावर हे मिश्रण सर्व पानाला एकसारखे पसरा. नंतर त्यावर दुसरे पान उलटे ठेवा. परत हे मिश्रण सर्व पानाला एकसारखे पसरून घ्या. नंतर या पानाच्या कडेच्या दोन्ही बाजूने दुमडून घ्या व त्यावर डाळीचे मिश्रण पसरून लावा. आता खालच्या बाजूने पान गुंडाळावे. प्रत्येक गुंडाळीला डाळीचे मिश्रण लावत जा. याप्रमाणे या पानाची मोठी गुंडाळी तयार होईल. नंतर ही गुंडाळी मध्ये सुरीने कापा. या दोन छोट्या गुंडाळ्या कूकरमध्ये शिजवून घ्या. & शिजवलेल्या गुंडाळ्या बाहेर काढून एका ताटलीत ठेवा व खूप गार झाल्यावर सुरीने याच्या मध्यम आकाराच्या गोल चकत्या करून तेलात तळून घ्या.

ही माझी पाककृती मनोगत दिवाळी अंक २०१२ मध्ये प्रकाशित झाली आहे.

Thursday, November 08, 2012

टोमॅटो सूप


जिन्नस :

लाल टोमॅटो  ४
बटाटा अर्धा
गाजर छोटे १
कोबी चिरलेला अर्धी वाटी
लसूण १ पाकळी
कांदा चिरलेला २ चमचे
जिरे थोडे
तेल
लाल तिखट
मिरपूड
मीठ
साखर २ चमचे
लोणी

मार्गदर्शन :  लाल टोमॅटो, बटाटा, गाजर  याच्या मध्यम आकाराच्या फोडी करा. लसूण बारीक चिरा. मध्यम आचेवर छोटा कूकर ठेवा. तो तापला की त्यात तेल घाला. तेल तापले की त्यात जिरे घाला. ते तडतडले की त्यात चिरलेला लसूण व कांदा घालून थोडे परता. नंतर चिरलेले टोमॅटो, बटाटा, गाजर, कोबी घालून थोडे परता. त्यात ३ वाट्या पाणी घालून कूकरचे झाकण लावा. कूकरची एक शिट्टी झाली की गॅस बंद करा. कूकर गार झाला की शिजलेले मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्या. हे पातळ मिश्रण एका पातेल्यात काढून घ्या व ते पातेले मध्यम आचेवर तापत ठेवा. त्यात अगदी थोडे लाल तिखट, २ चिमूट मिरी पावडर, चवीपुरते मीठ व साखर घाला व एक उकळी आणा. आता गॅस बंद करा. टोमॅटो सूप प्यायला देताना त्यात थोडे लोणी घालून द्या.

माहितीचा स्त्रोत : कु. गौरी जपे (माझी मावस पुतणी)

Wednesday, October 31, 2012

दुधी भोपळा


जिन्नस :

मध्यम आकाराचा दुधी भोपळा
पाव वाटी मुगाची डाळ
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
हिरवी मिरची चिरलेली २
दाण्याचे कूट मूठभर
ओल्या नारळाचा खव मूठभर
चवीपुरते मीठ
साखर १ ते २ चमचे
दूध अर्धा ते १ कप
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, हळद



मार्गदर्शन :  भाजी करण्याच्या आधी थोडावेळ मुगाची डाळ पाण्यात भिजत घाला. दूधी भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात फोडणीसाठी तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा व लगेचच त्यामध्ये चिरलेल्या मिरच्या व मुगाची डाळ घालून थोडे परतून घ्या. आता दुधीभोपळ्याच्या फोडी घालून ढवळा. त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदांने झाकण काढा व त्यात अगदी थोडे पाणी घाला. असे अगदी थोडे थोडे पाणी घालून भाजी शिजवून घ्या. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ व साखर घाला. भाजी ढवळून घ्या. नंतर त्यात दाण्याचे कूट व नारळाचा खव घाला. व गार दूध घाला. दूध तापवून मग ते गार झाल्यावर घाला. आता परत झाकण ठेवा व थोड्यावेळ भाजी शिजू दे. थोड्यावेळाने झाकण काढा. आता ही भाजी चांगली मिळून मिसळून आलेली असेल. दाटपणाही आला असेल. दुध घातल्याने एक वेगळी चव येते. ही भाजी पोळीपेक्षाही गरम भाताबरोबर जास्त चांगली लागते.


Thursday, October 18, 2012

ढेपसे


जिन्नस :


वांग्याचे काप १५
डाळीचे पीठ १ वाटी
तांदुळाचे पीठ अर्धी वाटी
लाल तिखट दीड चमचा
धने जिरे पूड दीड चमचा
अगदी थोडा हिंग
हळद चिमूटभर
चवीपुरते मीठ
तेल पाव ते अर्धी वाटी



मार्गदर्शन : ढेपश्यांसाठी निमुळते वांगे लागते. या वांग्याच्या जाडसर गोल चकत्या करा व त्या पाण्यात टाका. सर्व चकत्या पाण्यात टाकल्यावर पाणी काढून टाका व चकत्या एका रोळीत ठेवा म्हणजे सर्व पाणी निथळून जाईल. एका भांड्यात डाळीचे पीठ, तांदुळाचे पीठ घ्या. त्यामध्ये लाल तिखट, धने जिरे पूड, हळद, हिंग व मीठ घाला. मीठ थोडे जास्त घालावे. नंतर वांग्याची एकेक चकती घेऊन तिला चमच्याच्या टोकाने टोचावे. दोन्ही कडून टोचावे म्हणजे त्याला चिरा पडतील. आता एका ताटलीत वर तयार केलेले पीठ पसरून घ्या व त्यावर एक चकती ठेवून त्यावर परत पीठ घालून हाताने दाबा. परत चकतीच्या दुसऱ्या बाजूनेही असेच पीठ घालून दाबा. हे पीठ दाबून जितके चकतीमध्ये बसवता येईल तितके बसवा. अश्या रितीने सर्व चकत्या करून घ्या. एकेक चकती झाली की एकावर एक ठेवा. १५ मिनिटांनी ढेपसे करायला घ्या. मध्यम आचेवर तवा तापत ठेवा. तो तापला की त्यावर २-४ चमचे तेल घाला व ते कालथ्याने सर्व तवाभर पसरवा. त्यावर एका वेळी २ चकत्या ठेवा. आता आच थोडी कमी करा व चकत्यांवर झाकण ठेवा. काही सेकंदानी झाकण काढा व चकत्या उलटून परत त्यावर थोडे तेल सोडा. चकतीच्या आजुबाजूनेही तेल सोडा व परत त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून परत त्यावर थोडे तेल घाला.


अश्या रितीने सर्व ढेपसे करून घ्या. चकत्यांवर झाकण ठेवल्याने वांग्याच्या चकत्या व त्यामध्ये दाबून भरलेले पीठ शिजते. चकत्या जाडसर चिरल्याने कुरकुरीत होतात. शिवाय तांदुळाच्या पीठानेही त्या कुरकुरीत होतात. हे ढेपसे गरम गरम खायला जास्त चांगले लागतात. गरम आमटी भाताबरोबर छान लागतात. अथवा चहासोबत खायला हरकत नाही.

Monday, October 15, 2012

डिंकाचे लाडू


जिन्नस :

तळलेला डिंक अर्धी वाटी
बदाम, पिस्ते, काजू प्रत्येकी २५
किसलेले गोटा खोबरे १ वाटी
अदपाव वाटी खसखस
अदपाव वाटी खारकेची पावडर
साजूक तूप १०-१२  चमचे
पिठीसाखर पाऊण वाटी


मार्गदर्शन : डिंक हरबरा डाळ किंवा तुरीची डाळ दिसते इतका बारीक करून घ्यावा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात २ ते ३ चमचे साजूक तूप घालून डिंक तळून घ्या. साजूक तूप थोडे थोडे करत घाला. एकदम घालू नका. नाहीतर मिरगटलेला वास येतो. डिंक तळून झाला की उरलेल्या तूपात बदाम, काजू, पिस्ते लालसर रंग येईपर्यंत परतून घ्या. सर्वात शेवटी खारकेची पूड उरलेल्या तूपात भाजून घ्या. डिंक तळण्याच्या आधी किसलेले गोटा खोबरे व खसखस भाजून घ्या. नंतर परतलेले बदाम, काजू, पिस्ते यांची मिक्सरवर पावडर करून घ्या. थोडी जाडसर असली तरी चालेल. डिंक तळला की छान फुलून येतो. तो हाताने चुरावा. भाजलेले खोबरे व खसखस चुरडावी किंवा मिक्सर मधून थोडी बारीक करावी. पिठीसाखर नसेल तर घरात असलेली साखर मिक्समध्ये बारीक करून घ्यावी. वरील सर्व मिश्रण एकत्रित करावे व लाडू वळावेत. लाडू वळले गेले नाहीत तर अजून थोडे साजूक तूप घालावे. पाहिजे असल्यास एकेका लाडवाला एकेक बेदाणा लावावा. हे लाडू ठिसूळ होतात. त्यामुळे अलगद हाताने डब्यात घालून ठेवावे. हि एक सोपी पद्धत आहे.  तळून घेतलेल्या डिंकाचा चुरा जितका होईल त्याच्या दुप्पट बाकीच्या जिन्नसाची पावडर झाली पाहिजे. एका वाटीचा चुरलेला तळून घेतलेला डिंक असेल तर बाकीचा सुकामेवाचा चुरा दोन वाट्या झाला पाहिजे. थोडा जास्ती चालेल.
या सर्व मिश्रणाच्या निम्मी साखर घ्यावी. आवडीप्रमाणे बाकीचा सुकामेवाही घालावा.

Wednesday, September 26, 2012

दोडका


जिन्नस :
२ मोठाले दोडके
अर्धी वाटी हरबरा डाळ
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
अगदी थोडा गूळ
चवीपुरते मीठ
नारळाचा  खव मूठभर
दाण्याचे कूट मूठभर
तेल
मोहरी, हिंग, हळद




मार्गदर्शन : दोडक्याची साले काढून त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करा. हरबऱ्याची डाळ भिजत घाला. डाळ अर्धा तास भिजू दे. मधम आचेवर पातेले तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात तेल घाला. तेल तापले की त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा. दोडक्याच्या फोडी धुवून घ्या व नंतर त्या फोडणीत घाला. नंतर त्यात भिजलेली हरबरा डाळ घालून भाजी ढवळा व त्यावर झाकण ठेवा. झाकण ठेवले की भाजी शिजायला मदत होते. काही सेकंदाने झाकण काढून त्यात थोडे पाणी घाला व भाजी शिजवा. भाजी शिजत आली की त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, चवीपुरते मीठ घाला. नंतर थोडा गूळ, नारळाचा खव व दाण्याचे कूट घाला व भाजी एकसारखी ढवळून घ्या. परत थोडे झाकण ठेवा व भाजी शिजवा. काही सेकंदाने झाकण काढा. आता ही भाजी मिळून आली असेल व थोडी दाट दिसेल. गॅस बंद करा.

Thursday, September 13, 2012

शेपू (Dill)


जिन्नस :
शेपूच्या जुड्या २
पाव कांदा
१ टोमॅटो
अर्धी वाटी मुगाची डाळ
१ मिरची
२ ते ३ लसूण पाकळ्या
लाल तिखट पाव चमचा
धने जिरे पूड पाव चमचा
मीठ
तेल
मोहरी, हिंग, हळद


मार्गदर्शन :मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजत घाला. शेपू बारीक चिरून धुवून घ्या. धुवून घेतलेला शेपू चाळणीमध्ये ठेवा म्हणजे सर्व पाणी निथळून जाईल. कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची चिरून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात भिजलेली मुगाची डाळ घालून थोडे परता. नंतर त्यात चिरलेले लसूण कांदा मिरची व टोमॅटो घालून थोडे परतून घ्या. नंतर त्यात चिरलेला शेपू घाला व थोडे परता व ढवळून घ्या. नंतर झाकण ठेवा व वाफेवर भाजी शिजवून घ्या. ती नीट शिजली की त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड व मीठ घाला व भाजी सर्व बाजूने नीट ढवळा म्हणजे तिखट मीठ सर्व भाजीला एकसारखे लागेल. नंतर परत झाकण ठेवून भाजीला परत एक वाफ द्या. गॅस बंद करा. ही तयार झाली डाळ शेपूची भाजी तयार. ही भाजी पीठ पेरून पण छान लागते. भाकरीबरोबर ही भाजी खायला द्या.

Monday, July 23, 2012

कांदा भजी


 जिन्नस :

मोठा कांदा अर्धा
हरबरा डाळीचे पीठ ६ चमचे मोठे
तांदुळाचे पीठ २ चमचे मोठे
तिखट १ चमचा
पाव चमचा हळद
चवीपुरते मीठ
मूठभर चिरलेली कोथिंबीर
तळणीसाठी तेल
पीठ भिजवण्यापुरते पाणी




मार्गदर्शन : कांदा उभा व पातळ चिरा. हरबरा डाळीच्या पीठामध्ये तांदुळाचे पीठ घाला. नंतर त्यात तिखट, हळद, मीठ व चिरलेली कोथिंबीर घालून व पाणी घालून पीठ भिजवा. पीठ खूप पातळ नको व खूप जाड नको. चमच्याने भजी कढईत सहज सोडता येतील इतपत पीठ भिजवा. पीठ भिजले की त्यात चिरलेला कांदा घालून चमच्याने ढवळा. आता कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात तेल घाला. तेल जरा जास्तच घालावे म्हणजे भजी नीट तळली जातात. तेल पुरेसे तापले की त्यात चमच्याने एकेक भजी सोडून लालसर रंगावर तळून ती एका पेपर टॉवेल वर घाला. भजी झाऱ्याने नीट निथळून घ्या. तेल पुरेसे तापले हे बघण्यासाठी भजी तळण्याच्या आधी अगदी थोडे पीठ घालून पहा. चूर्र असा आवाज आला पाहिजे. भजी तळण्यासाठी तेल खूप तापवावे लागते. मध्यम आच ठेवा व भजी तळा. एका बाजूने भजी तळून झाली की भजी झाऱ्याने उलटी करा व दुसऱ्या बाजूनेही भजी लालसर रंगावर तळली गेली पाहिजेत म्हणजे कच्ची राहणार नाहीत.

Monday, July 09, 2012

Fajita


जिन्नस :
चिरलेला पालक २ मूठ (पालकाची कोरडी पाने चिरा, ओली नकोत )
एक मोठी सिमला मिरची
एक मध्यम बटाटा
एक लाल टोमॅटो
अर्धा कांदा
एक हिरवी मिरची
फोडणीसाठी तेल
मोहरी हिंग, हळद
लाल तिखट
धनेजिरे पूड
मीठ
किंचित साखर



मार्गदर्शन : सिमला मिरची, बटाटा, कांदा, टोमॅटो, मिरची चिरून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली कि त्यात तेल घाला. तेल पुरेसे तापले की त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा व त्यात चिरलेली हिरवी मिरची, सिमला मिरची, कांदा, बटाटा,  टोमॅटो घालून परतावे. नंतर एक वाफ द्यावी. नंतर त्यात चिरलेला पालक घालून परतावे. मिश्रण परतत राहावे. नंतर परत एकदा वाफेवर भाजी शिजवून त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड अगदी थोडे चवीपुरते घाला. मीठ चवीपुरते व किंचिती साखर घालून परत ही भाजी परता. आता गॅस थोडा मोठा करून भाजी परतत रहा. ही भाजी थोडी कच्ची ठेवली तर जास्त चांगली लागते. वाफेवर भाजी शिजवताता थोडे पाणी राहील तेही परतून पाणी घालवून टाका. किंवा झाकण ठेवून वाफेवर शिजवली नाही तर सतत शिजेपर्यंत परतत रहा. यात मसाले अगदी चवीपुरते घालायचे आहेत. मूळ भाजीची चव तशीच रहायला हवी. ही मूळ मेक्सिकन पाककृती आहे पण मी इंडियन स्टाईलने केली आहे. गरम गरम ही भाजी जास्त चांगली लागते. पोळीबरोबर भाजी खा.

Wednesday, July 04, 2012

भोपळ्याचे भरीत



वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

लाल/पिवळ्या भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी १५-२०
दाण्याचे कूट ६-७ चमचे,
चिरलेली कोथिंबीर ४-५ चमचे, मिरची १
लाल तिखट व साखर अदपाव चमचा, मीठ
दही ७-८ चमचे
फोडणीकरता तेल २ चमचे, मोहरी, हिंग, हळद

क्रमवार मार्गदर्शन: लाल/पिवळ्या भोपळ्याच्या फोडी कूकरमध्ये थोडेसेच पाणी घालून उकडून घ्या. फोडी गार झाल्यावर त्यात दाण्याचे कूट, कोथिंबीर, साखर, दही व चवीनुसार मीठ घाला. तेलाच्या फोडणीमध्ये एका मिरचीचे तुकडे व लाल तिखट घालून ती फोडणी भोपळ्याच्या फोडींवर घाला व मिश्रण एकसारखे करा. उकडलेल्या फोडी चमच्याने बारीक करा.

उपासाला हे भरीत करतात.

Friday, June 29, 2012

चिकवड्या



जिन्नस :

अर्धी वाटी साबुदाणा
४ वाट्या पाणी
चवीपुरते मीठ

क्रमवार मार्गदर्शन : अर्धी वाटी साबुदाणा रात्री भिजवून ठेवा. साबुदाणा खिचडीला जसा साबुदाणा भिजवतो तसा भिजवा. त्यात थोडे पाणी राहू द्या. सकाळी भिजलेला साबुदाणा हाताने मोकळा करून घ्या. मध्यम आचेवर पातेले ठेवा व त्यात ४ वाट्या पाणी व मीठ घाला. नंतर त्यात मोकळा केलेला साबुदाणा घाला व हे मिश्रण शिजवा. शिजवताना डावेने हे मिश्रण ढवळत राहा म्हणजे पातेल्याला खाली लागणार नाही. पळीवाढे इतपत मिश्रण आटले की गॅस बंद करा. साबुदाणा शिजला की त्याचा पांढरा रंग जाईल म्हणजे मिश्रण झाले असे समजावे. नंतर प्लस्टीकच्या कागदावर चिकवड्या घाला. चिकवड्या घालताना जवळ जवळ घाला म्हणजे बऱ्याच चिकवड्या कागदावर मावतील. चिकवड्या चमच्याने घाला. चमच्याने मिश्रण कागदावर घातले की थोड्या गोल आकार देवून पसरवा. चिकवड्या जास्त पातळ नको व जाडही नकोत. चिकवड्यांना वाळवण्यासाठी खूप कडक उन लागते. २-३ तास कडक उन्हात चिकवड्या वाळल्या की हलक्या हाताने त्यांना उलटवा व दुसऱ्या बाजूने परत २-३ तास उन दाखवा. म्हणजे दोन्ही बाजूने चिकवड्या पूर्णपणे वाळतील. नंतर चिकवड्या एका पातेल्यात घाला व दुसऱ्या दिवशी परत उन्हात ठेवा. चिकवड्या चांगल्या कडकडीत वाळल्या पाहिजेत म्हणजे छान फुलतात. नंतर गरम तेलात चिकवड्या तळून भाजक्या शेंगदाण्याबरोबर खा. खूप छान लागतात. उपवसाला या चिकवड्या चालतात. अर्धी वाटी साबुदाण्यात छोट्या चिकवड्या ६० ते ६५ होतात.

Wednesday, June 27, 2012

बटाटा कचोरी


जिन्नस :
४ मधम आकाराचे बटाटे
मिरच्या २
नारळाचा खव मूठभर
लाल तिखट
कोथिंबीर मूठभर
दाण्याचे कूट मूठभर
मीठ चवीनुसार
साखर अर्धा चमचा
चारोळ्या, बेदाणे, बदामाचे काप ऐच्छिक
साबुदाण्याचे पीठ डावभर



क्रमवार मार्गदर्शन : बटाटे कूकरमध्ये उकडून घ्या. कूकर गार झाला की आतील बटाटे एका रोळीमध्ये काढून घ्या म्हणजे जास्तीचे पाणी निथळून जाईल. बटाटे पूर्ण गार झाले की त्याची साले काढून किसून घ्या. बटाटे किसले की त्यात १ मिरची व मीठ वाटून घाला अथवा लाल तिखट अर्धा चमचा व चवीनुसार मीठ घाला. हे सर्व मिश्रण एकजीव करा. ओला नारळाचा खव, कोथिंबीर, दाण्याचे कूट, मीठ व साखर, एका मिरचीचे खूप बारीक तुकडे असे कचोरीत घालायचे सारण तयार करा. त्यात हवे असल्यास चारोळ्या, बदाम काप व बेदाणे घाला. सारण एकत्रित कालवून घ्या.



आता बटाट्याच्या मिश्रणाचे छोटे गोळे करून घ्या व एकेक गोळ्याची कचोरी बनवा. कचोरी बनवताना गोळ्याला तेला/तूपाचा हात घेऊन त्याचा हातानेच नितळ गोळा करा व त्याची पातळ पारी बनवा. या पारीमध्ये ओल्या नारळाच्या खवाचे केलेले सारण बनवा व ही पारी हाताने सर्व बाजूने एकत्र करून पारी बंद करा म्हणजे सारण बाहेर येणार नाही. गोल आकाराच्या कचोऱ्या बनवून घ्या. नंतर एका स्टीलच्या वाडग्यात साबुदाण्याचे पीठ घ्या व या पीठात सर्व कचोऱ्या घोळवून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात तेल/तूप घाला. तेल पुरेसे तापले की  आच मंद ठेवा व तांबूस रंगावर सर्व कचोऱ्या तळून घ्या. या कचोऱ्या उपवासाला चालतात.



Wednesday, June 20, 2012

बटाटा पापड




जिन्नस :
१ मोठा बटाटा
लाल तिखट १ चमचा
जिरे पूड अर्धा- पाव चमचा
मीठ चवीपुरते
साबुदाणा पीठ ३-४ चमचे
पापड लाटण्यासाठी साबुदाणा पीठ वेगळे घ्या.



मार्गदर्शन : बटाटा कूकरमध्ये उकडून घ्या. कूकरमधून शिजलेला बटाटा एका रोळीमध्ये काढून ठेवा म्हणजे जास्तीचे पाणी निथळून जाईल. बटाटा गार झाला की त्याचे साल काढून किसून घ्या. किसलेल्या बटाट्यामध्ये लाल तिखट, जिरेपूड, साबुदाणा पीठ व मीठ घालून हे मिश्रण हातानेच खूप एकजीव करा. नंतर साजूक तूपाचा हात घेऊन हे मिश्रण मळा. नंतर हे मिश्रण खूप कुटा. पीठ एकदम नितळ झाले पाहिजे. लोखंडी खलबत्यात हे मिश्रण खूप छान कुटले जाते. खलबत्ता नसेल तर एका पसरट पातेल्यात पीठ ठेवून त्यावर वाटीने आपटा. वाटी कलती करून हे मिश्रण वाटीनेच कूटा. वाटीच्या कडा या पीठावर पडल्या पाहिजेत. नंतर पोलपाटावर साबुदाण्याचे पीठ घ्या. कुटलेले बटाट्याच्या पीठाला डांगर म्हणतात. या डांगराचे छोटे गोळे करून एका गोळीचा एक पापड असे पापड लाटा. पापड लाटताना पीठाचा वापर जास्त करा. खूप पातळ पापड लाटून झाले की एका प्लॅस्टीकच्या कागदावर हे पापड उन्हात चांगले कडक वाळवा व नंतर एका डब्यात ठेवा. डब्याचे झाकण पूर्णपणे बंद होईल याची काळजी घ्या. नाहीतर हवा लागून हे पापड लापट होतील. उपवासाचा हे पापड चालतात. नंतर हे पापड तळून खा. पापड हलकाफुलका झाला पाहिजे. डांगर एकजीव एकसंध झाले आणि पापड पातळ लाटला गेला की पापड खूप छान होतात. पापड तळले की फुलतात आणि हलकेफुलके होतात. हे पापड चवीला खूप छान लागतात. डांगरही खूप छान लागते. १ मोठ्या बटाट्यामध्ये साधारण लहान २० ते २५ पापड होतात.

हे पापड भाजूनही छान लागतात. भाजलेल्या किंवा तळलेल्या पापडासोबत भाजके शेंगदाणे आवडत असल्यास घ्यावेत.

Friday, April 20, 2012

ढोकळा

गिटसचे एक पाकीट दोन मोठाले चमचे तेल एक वाटी पाणी फोडणीसाठी तेल मोहरी, हिंग हळद, लाल तिखट अर्धा चमचा चिरलेली कोथिंबीर व ओला नारळ थोडासा भाजलेले दाणे मिरची १ क्रमवार मार्गदर्शन : गिटस चे एक पाकीट कापून त्यातले ढोकळ्याचे पीठ एका पातेल्यात काढून घ्या. त्यात २ चमचे तेल घाला. एका वाटीत पाणी घ्या. थोडे थोडे पाणी घालून आणि एकीकडे पीठ चमच्याने ढवळून हे पीठ भिजवावे. एकसारखे एकही गुठळी होऊन देवू नका. म्हणून सतत एकीकडे पाणी घालून चमच्याने ढवळत रहा. कूकरच्या दोन भांड्यांना तेल लावून घ्या व पीठ ओता. मध्यम आचेवर कूकर ठेवा. त्यात थोडे पाणी घालून कूकरची दोन भांडी एकमेकांवर ठेवा. शिट्टी काढून घ्या व गॅसवर हा कूकर १५ ते २० मिनिटे ठेवा. कूकर गार झाला की त्यातली पातेली बाहेर काढून त्यात उकडलेल्या ढोकळ्याच्या पीठाचे सुरीने चौकोन करा. आता मध्यम आचेवर कढले तापत ठेवा. त्यात थोडे तेल घाला व ते तापले की त्यात मोहरी हिंग व हळद घालून फोडणी करा व त्यातच चिरलेली एक मिरची व अर्धा चमचा लाल तिखट व भाजलेले दाणे घाला. आता ही फोडणी ढोकळ्यांवर पसरवून घ्या व नंतर डीश्मध्ये घालून खायला द्या. त्यावर चिरलेली कोथिंबीवर व खवलेला नारळ घाला. आवडत असल्यास पीठ भिजवतानाच पीठामध्ये आलेमिरची व लसूण याची पेस्ट घाला.

Wednesday, March 28, 2012

साबुदाणा वडा



वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस

साबुदाणा १ वाटी
बटाटा १, अर्धे छोटे लिंबू
बारीक वाटलेल्या हिरव्या तिखट मिरच्या ५-६ किंवा दीड ते २ चमचे लाल तिखट
पाव वाटी चिरलेली कोथिंबीर
दाण्याचे कूट पाव ते अर्धी वाटी
चवीपुरते मीठ,
१ चमचा साखर
तळणीसाठी तेल,

क्रमवार मार्गदर्शन: १ वाटी साबुदाणा ४ तास भिजत घालावा. भिजवताना पाणी निथळून घ्यावे. ४ तासानंतर भिजलेला साबुदाणा मोकळा करून घ्यावा. त्यात कच्चा बटाटा साल न काढता किसून घाला. नंतर त्यात वाटलेल्या मिरच्या किंवा लाल तिखट, मीठ व साखर घाला. नंतर त्यात दाण्याचे कूट घालून लिंबू पिळा व चिरलेली कोथिंबीर घाला. हे मिश्रण हाताने नीट कालवा. कालवताना थोडे पाणी घाला. मिश्रण मिळून येण्यापुरतेच पाणी घालावे.



आता मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात तेल घाला व साबुदाण्याचे मिश्रण बनवले आहे त्याचे गोल आकाराचे वडे लालसर रंगावर तळून घ्या. वडे तळल्यावर ते पेपर टॉवेल वर ठेवा म्हणजे त्यातले तेल निथळून जाईल. नारळ्याच्या चटणीसोबत हे वडे छान लागतात.

Saturday, March 24, 2012

वांग्याचे भरीत



जिन्नस :

मध्यम आकाराचे वांगे
पाव कांदा चिरलेला
थोडी कोथिंबीर चिरलेली
मूठभर दाण्याचे कूट
लाल तिखट पाव चमचा
चवीपुरते मीठ
चिमूटभर साखर
तेल फोडणीसाठी
मोहरी, हिंग, हळद


मार्गदर्शन : मध्यम आचेवर वांगे भाजून घ्या. ते पूर्ण गार झाले की मग त्याची साले काढून बारीक करून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पूरेशी तापली की त्यात तेल घालून त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा. नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घालून परतून घ्या. कांदा शिजला की त्यात खूप बारीक केलेले वांगे घालून मग त्यावर लाल तिखट, मीठ व साखर घालून परता. परतत असताना गॅस मंद ठेवा. नंतर त्यात चिरलेली कोथिंबीर व दाण्याचे कूट घालून नीट ढवळून घ्या. हे वांग्याचे भरीत खूप छान लागते. भाकरीबरोबर या भरताची चव अजूनही छान लागते. वांग्याचे भरीत २-३ प्रकारे करतात. दह्यातले व कांदा पात घालूनही करतात. त्याची कृती नंतर लिहीन.

Monday, March 12, 2012

अरूगुला



जिन्नस:

अरूगुला १ पॅकेट
पाव कांदा
३-४ लसूण पाकळ्या
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
मीठ चवीपुरते
तेल, मोहरी, हिंग, हळद

मार्गदर्शन : अरुगुला चिरून धुवून घ्या. रोळीमध्ये चिरलेला अरूगुला घालून त्याखाली ताटली ठेवा म्हणजे त्यातले पाणी निथळून जाईल. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात फोडणीकरता थोडे तेल घालून त्यात मोहरी, हिंग व हळद घाला. नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा व चिरलेल्या लसूण पाकळ्या घाला. कांदा व लसूण थोडे परतून घ्या. नंतर त्यात चिरलेला अरुगुला घालून त्यावर झाकण ठेवा. २-३ सेकंदाने झाकण काढून परता. असे दोन तीन वेळा केले की भाजी चांगली शिजेल. नंतर त्यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड व मीठ घालून परत एकदा भाजी परतून घ्या व झाकण ठेवा. २-३ सेकंदाने झाकण काढून परता. भाजी तयार झाली आहे. या भाजीची चव थोडी उग्र लागते पण छान आहे. करडई भाजीसारखी थोडी चव जाणवली.

Wednesday, January 25, 2012

brussels sprouts balls



जिन्नस :

किसलेले brussels sprouts ८ ते १० नग
एका मिरचीचे बारीक तुकडे
लाल तिखट
धने जिरे पूड
कोथिंबीर
मीठ
डाळीचे पीठ
तळणीसाठी तेल


क्रमवार मार्गदर्शन : वरील सर्व जिन्नस एकत्र करा व त्यात अगदी थोडे पाणी घालून छोटे छोटे गोल बनवा. गोल बनवण्याइतपतच पीठ घट्ट भिजवावे. नंतर मध्यम आचेवर कढई ठेवा व त्यात पुरेसे तेल घाला. तेल तापले की गॅस मंद ठेवा व त्यात वरील जिन्नसापासून बनवलेले गोळे सोडा. लालसर रंग येईपर्यंत तळा. एका बाजूने लालसर झाले की गोळे अलगद उलटा व परत लाल रंग येईपर्यंत तळा. वर तिखट मीठाचे प्रमाण दिले नाही. अगदी थोडे घालायचे आहे सर्व काही. मिरची पण तिखट नसलेली घाला. काही मिरच्या तिखट नसतात. कोथिंबीर पण थोडीच घाला. हे गोळे मधल्यावेळी चहासोबत खायला छान लागतात. नाहीतर जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी पण करायला हरकत नाही.

Monday, January 16, 2012

तीळवडी


जिन्नस :


तीळाचे कूट १ वाटी
दाण्याचे कूट अर्धी वाटी
गूळ १ वाटी
साजूक तूप १ चमचा


क्रमवार मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात साजूक तूप, गूळ व गूळ भिजेल इतके पाणी घाला. थोड्यावेळाने मिश्रण उकळायला लागेल व त्याचा एक तारी पाक बनेल. एकतारी पाक झाला की गॅस बंद करून लगेच त्यात तीळ व दाण्याचे कूट घालून मिश्रण पटापट ढवळा. २ स्टीलच्या ताटल्यांवर थोडे साजूक तूप पसरवा व त्यावर मिश्रण ओता. हे मिश्रण कोमट झाले की वड्या पाडा.

Wednesday, January 04, 2012

शिंगाडा पीठ लाडू



जिन्नस:

शिंगाडा पीठ १ वाटी
दाण्याचे कूट अर्धी वाटी
साजूक तूप ५ ते ६ चमचे
पीठीसाखर सपाट १ वाटी

क्रमवार मार्गदर्शन: मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात शिंगाडा पीठ व साजूक तूप घालून लालसर रंग येईपर्यंत भाजा. भाजल्यावर गॅस बंद करून त्यात दाण्याचे कूट व साखर घालून चांगले ढवळा. मिश्रण कोमट असताना लाडू वळा. आधी २-३ चमचे साजूक तूप घालून भाजायला सुरवात करा व नंतर बाकीचे तूप भाजत असतानाच थोडे थोडे घाला म्हणजे शिंगाडा पीठ पूर्णपणे तूपात भिजले का नाही ते कळेल. वर साजूक तूपाचे प्रमाण दिले आहे, पण कमी-जास्त लागेल, कारण पीठ तूपात भिजले पाहिजे. शिंगाडापीठ तूपात भिजल्यावर तपकिरी दिसते पण भाजून झाल्यावर थोडा रंग बदलतो. रंग बदललेला तसा कळत नाही. अंदाजाने नीट बघून भाजावे.

बेसन लाडवाप्रमाणेच ह्या लाडवाची पद्धत आहे. हे लाडू खूप खमंग लागतात. १ वाटीत छोटे छोटे १० ते १२ लाडू होतात.