Saturday, September 23, 2006

बटाटेवडे

वाढणी:४ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:६० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस

बटाटे ४
कांदा १
मिरच्या ६ तिखट, लसूण पाकळ्या ४ मोठ्या, कोथींबीर १ जुडी, अर्धे लिंबू
डाळीचे पीठ १ वाटी, ३ चमचे मैदा, वडे तळण्यासाठी तेल
मीठ , साखर चवीपुरते
हळद, हिंग

क्रमवार मार्गदर्शन: बटाटे उकडून, त्याची साले काढुन कुस्करुन घ्यावेत. त्यात कांदा, लसुण पाकळ्या, मिरच्या व कोथिंबिर खूप बारीक चिरुन घालणे, लिंबू पिळावे. चवीपुरते मीठ व साखर घालावे, व ह्या सर्व मिश्रणाचा लगदा करावा. हे बटाट्याचे सारण तसेच कच्चे राहु देत. ( कांदा व इतर मसाला अजिबात तेलात परतून घ्यायचा नाही, कारण वडे तेलकट होतात शिवाय लसूण,मिरच्या मिक्सरमधुन बारीक करायचे नाही).


डाळीचे पीठ भिजवताना त्यात थोडा मैदा, चवीप्रमाणे तिखट,मीठ घालणे, शिवाय थोडी हळद व हिंग घालणे. बारीक चिरलेली कोथिंबिर आठवणीने घालणे. (गरम केलेले तेल डाळीच्या पिठामधे अजिबात घालायचे नाही, त्यामुळे वडे तेलकट होतात.)

नेहमीप्रमाणे वडे तळणे.


रोहिणी गोरे

Wednesday, September 13, 2006

रंगीत पोहे


वाढणी:दोन जणांना


पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस

पोहे जाड ३ वाट्या
कांदा , सिमला मिरची , बटाटे, टोमॅटो, गाजर , मटार, हिरव्या मिरच्या ४-५,
खवलेला ओला नारळ व चिरलेली कोथिंबीर
तेल,मोहरी,जिरे,हिंग,हळद
मीठ, साखर

क्रमवार मार्गदर्शन: सर्वात आधी पोहे रोळीमधे घुवून ठेवा. नंतर सिमला मिरची, कांदा, गाजर,बटाटे, मिरच्या,  हे सर्व उभे चिरा. प्रमाण प्रत्येकी पाव ते अर्धा तुकडा. हे सर्व उभे आणी खूप बारीक चिरणे महत्वाचे आहे. नंतर तेलाची फ़ोड्णी करुन त्यामधे उभे चिरलेले वरील सर्व जिन्नस आणि मटार व चिरलेला टोमॅटो घालून एक- दोन वाफ़ा आणा.  नंतर त्यामधे पोहे घालून  त्यात चवीप्रमाणे मीठ, व थोडी साखर घालून सर्व एकसारखे परता. व एक दोन वाफा आणा.

खायला देताना त्यावर कोथिंबीर , ओला नारळ , आणि थोडे लिंबू पिळून खावयास द्या.
भाज्या घातल्याने पोहे रंगीबेरंगी दिसतात.

दडपे पोहे

वाढणी:२ जणांना


पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे


पाककृतीचे जिन्नस


पातळ पोहे ३ वाट्या
कांदा लहान १, तिखट हिरव्या मिरच्या ५,६
कोथिंबीर, खवलेला ओला नारळ, लिंबू,
नारळाचे पाणी
शेंगदाणे


क्रमवार मार्गदर्शन:पातळ पोह्यांवर नारळाचे पाणी आणि लिंबू पिळून हातानेच थोडे कालवून त्यावर झाकण ठेवणे. नंतर त्यामधे कांदा, कोथिंबीर बारीक चिरुन घालणे,नंतर वरुन तेलाची फ़ोडणी घालून पोहे ढवळणे. फोडणीत बारीक मिरच्या चिरुन व शेंगदाणे घालणे.

हे पोहे पातेल्यात परतून करत नाहीत. ह्या पोह्यांना पातळ पोहेच वापरायचे असतात. बाजारात पातळ पोहे आणि जाड पोहे असे दोन प्रकारचे पोहे मिळतात. जाड पोहे रंगीत पोह्यांना वापरतात.

रोहिणी गोरे

Monday, September 04, 2006

साबुदाणा भजी

वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस

१ वाटी साबुदाणा
मूठभर दाण्याचे कूट
१ साल न काढलेला कच्चा बटाटा (मध्यम आकाराचा)
१ चमचा लाल तिखट
अर्धा चमचा साखर, चवीपुरते मीठ
शिंगाड्याचे पीठ ३-४ चमचे, तळणीसाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन:
१ वाटी साबुदाणा २-३ तास भिजत घालणे. नंतर त्यात कच्चा बटाटा साल न काढता किसून घालणे. तिखट, मीठ, साखर, दाण्याचे कूट व शिंगाड्याचे पीठ घालून हे मिश्रण एकसारखे करून घेणे. या मिश्रणाची लहान लहान भजी मध्यम आचेवर तेलामध्ये तांबुस रंगावर तळणे. ही भजी ओल्या नारळाच्या चटणीसोबत खायला छान लागतात. ओल्या नारळाच्या चटणीमध्ये दही मिसळले तर जास्त छान लागते.
लाल तिखटाच्या ऐवजी हिरव्या मिरच्यांची पेस्ट घातली तरी चालते.

माहितीचा स्रोत:सौ आई

अधिक टीपा:उपवासाच्या दिवशी संध्याकाळी खायला छान लागतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे साबुदाण्याच्या वड्याप्रमाणे ही अजिबात तेलकट होत नाहीत.

रोहिणी गोरे

वरण भाताचे थालिपीठ


वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस

तुरीच्या डाळीचे वरण १ वाटी
भात १ वाटी
लाल तिखट १ चमचा, कांदा अर्धा
अर्धा चमचा हळद, चवीपुरते मीठ
गव्हाचे पीठ १ वाटी, हरबरा डाळीचे पीठ अदपाव वाटी
तेल, चिरलेली कोथिंबीर मूठभर

क्रमवार मार्गदर्शन:आदल्यादिवशी उरलेले वरण व भात यामध्ये गव्हाचे पीठ, डाळीचे पीठ, हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर, व कांदा बारीक चिरून घालणे. वर दिलेले गव्हाचे व डाळीचे प्रमाण कमी-जास्त लागेल त्याप्रमाणात घेणे. थालिपीठ थापता यावे इतपत पीठ मिसळावे. थोडासा तेलाचा हात घेऊन थालिपीठ भिजवणे. वरण भात पण जसा उरेल त्याप्रमाणे. हे थालिपीठ चविष्ट व कुरकुरीत लागते. थालिपीठ लावताना तेल जरा जास्त घालावे म्हणजे खरपूस भाजले जाते व चवीला खमंग लागते.

माहितीचा स्रोत:स्वानुभव

अधिक टीपा:तुरीच्या व मुगाच्या डाळीच्या वरणाचे वेगवेगळे थालिपीठ करून पाहिले. पण इतके चविष्ट लागले नाही. पण वरण भाताचे चवीला खूपच छान लागले.